Monday, 27 April 2015

SWITZERLAND SION II


SION II

......... आपल्याकडेही अशाप्रकारची गावाच सौंदर्य जपणारी नेटकी घरं कधी बांधली जातील हा विचार, त्याच्या प्रत्यक्षात येण्याच्या धूसर शक्यतेने, मन विषण्ण करून टाकणारा होता



पण आम्हाला या अशा वैचारिक डायव्हर्शनला वेळ द्यायचाच नाही याची खबरदारी घ्यायला ते टुमदार शहर मात्र बांधील होतं. गावातील तटबंदीच्या कडेकडेने त्या फरसबंदी रस्त्यावरून चालताना किल्ल्याजवळ कधी पोहोचलो कळलं नाही. दोन वेगळे किल्ले किंवा टॉवर म्हणू या तसे आहेत. दोन्ही ठिकाणी जायच तर वेळ अपुरा होता. निदान तास दीड तास तरी लागला असता वर चढून फिरून येण्याकरता. आम्ही मग ठरवलं की डाव्या बाजूच्या किल्ल्यावर जायचं.




चढ काही विशेष नव्हता. पायर्‍या होत्या. व्यवस्थित बांधलेल्या वगैरे. एका ठिकाणी सुंदर कमान होती, प्रवेशद्वारासारखी. लोकही जात येताना दिसत होती. स्थानिकच असावेत कारण कुत्र्यांना घेऊन फिरायला निघालेले दिसत होते. मध्यावर थांबून वेध घेतल्यावर उतारावरच्या द्राक्षाच्या बागा दिसत होत्या. त्यांच्या एकसारख्या सर्‍यांमुळे डोंगर उतार सजल्यासारखे दिसत होते. मला खरतर त्या मळ्यांकडे बघून आफ्रिकन बायकांच्या डोक्यावरच्या, केसांच्या लहान लहान असंख्य वेण्यांची आठवण झाली



किल्ल्यावर तसं काहीच नव्हतं. तटबंदी होती. वरून शहर मात्र फार सुरेख दिसत होतं. नेहेमी असतात त्याप्रमाणे इथेही शहराचं सौंदर्य आस्वादता येइल असे ऑब्झर्वेशन पॉइंटस होते. नदीचं पात्र, एरवी त्याचा इतका आवाका लक्षातही आला नसता. दूरवर दिसणार्‍या विमानतळावरली छोटी विमानं. समोरच्या डोंगररांगांपलीकडे दिसणारी बर्फाच्छादित शिखरं सूर्याच्या किरणात चमकत होती. इथे जवळच्या डोंगरांवर ना बर्फाचा मागमूस ना थंडीचा. उकाडा म्हटला तरी चालेल अशी हवा होती मात्र आत्ता  इतक्या उंचीवर वार्‍यामुळे आम्ही त्यापासून बचावत होतो.

आम्हाला शेवटच्या गाडीची चिंता होती. त्याआधी जेवणाची व्यवस्था बघणं आवश्यक होतं आमच्या शाकाहाराचं इकडे काय होणार हा प्रश्न होताच. पुनः आम्ही वळलो सिटी सेंटरच्या दिशेने. उतरायला लागलो तर एक कॅथेड्रल दिसलं. डोकावून तरी बघू या म्हणून गेलो पण काहीतरी कार्यक्रम सुरू होता त्यामुळे आम्हाला जाता येणार नाही असं कळलं. तिथेच म्युझियमही होतं पण एकंदरीतच आम्हाला म्युझियम बघण्याचा उत्साह तितपतच असतो. आम्ही पुनः उताराला, सेंटरच्या दिशेला लागलो. पुनः तेच सव्यापसव्य. तीन चार तरी फेर्‍या झाल्या असतील पण आत जावं असं रेस्तरॉं काही सापडलं नाही. अर्थात तो दोष आमच्या सवयींचा! सगळ्या ठिकाणी संध्यासमयीची आन्हिकं सुरू होती. त्यात इथे शाकाहार मिळण्याची शक्यता फारच कमी वाटू लागली. इथल्या पद्धतीप्रमाणे पाच वाजता सगळी दुकानं बंद होणार म्हणजे आज फळं वगैरे काही मिळणंही कठीण तेव्हा कडकडीत उपासाची तयारी ठेवायची या निर्णयाला आलो असताना एका अगदी छोट्या गल्लीच्या तोंडाशी एक बोर्ड दिसला Vegetarian Restaurant आम्हाला हसू आलं. इथे कोण मरायला व्हेज खाणारे असतील? बघू तर खरं म्हणून आम्ही गल्लीच्या वर चढणार्‍या दिशेने पुढे गेलो. बाहेर एक छोटं गोल टेबल त्याभोवती दोन खुर्च्या टाकून दोघजण आरामात पीत बसले होते. हे काही खरं नाही असं म्हणून आम्ही पुढे गेलो. कदाचित पुढे असेल म्हणून पण नाही याचाच बोर्ड होता तो. मग रेस्तरॉं कुठे? शेवटी ठरवलं पुढे होऊन विचारायचं. पुढे गेल्याबरोबर त्या माणसांपैकी एकाने खुर्चीतून उठून लगेच काय हवं आहे ते विचारलं. हेच "रेस्तरॉं" होतं. आम्हाला काही हवं असेल ते इथेच रस्त्यावर खरतर त्या बोळकंडीमध्ये आणखी दोन/तीन खुर्च्या आणि टेबल टाकून देणार होते. आम्ही तिथे बसायच ठरवलं.

रंगरूपावरून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही हे दिसत होतं. पण आपद्धर्म म्हणून दुसरा पर्याय नसल्यामुळे गोड मानून घेणं किंवा उपाशी रहाणं असे दोनच पर्याय समोर दिसत होते. आम्ही पहिला निवडला. त्या माणसाने आत वळून हाक मारल्यावर एक जटा असलेलं पोनीटेल बांधलेला माणूस समोर आला. हाय हॅलो झालं. आम्ही व्हेजिटेरिअन म्हणजे नो मीट, नो फिश, नो एग्ज चा मंत्र म्हटला. त्याने तो शांतपणे ऐकून घेतला.

आम्ही या ठिकाणी कोणतेही प्राणिज पदार्थ सर्व्ह करत नाही. त्यामुळे तुम्हाला आमच्याकडे दूध, योगर्ट, चीज, बटर किंवा तत्सम पदार्थ मिळणार नाहीत. तुम्हाला मी वेलकम ड्रिंक आणून देतो. चालेल का? आता हे काय नवीन असा आमचा चेहरा बघून तो म्हणाला ठीक मी दोन प्रकार आणून देतो आवडले तर बघा. सरबतासारख काहीतरी. आम्हाला आल्याचा वास कळला. काहीतरी हर्बल ड्रिंक आहे असं तो म्हणाला. वाईट नव्हतं पण आवर्जून पुनः मागवावं असही काही नव्हतं. आता मेन  कोर्स म्हणून काय देणार ही उत्सुकता होती. बाकी काही चाललं असतं पण वांगं नको याविषयी हे दोघे मायलेक ठाम होते. श्रीशैलने त्याला त्याप्रमाणे वांग नको असं सांगितलं.  प्रथम आपल्याप्रमाणे ब्रिंजाल मग एगप्लांट तेही न कळल्यावर वर्णन करूनही त्याच्या लक्षात येइना त्याचा तो दुसरा मित्र की मालक तोही पुढे आला पण शून्य. मग तो एक मिनिट म्हणून आत गेला आणि वांगं घेऊन बाहेर आला. आम्ही निश्वास टाकला पण तरी उत्सुकता होती त्याला नक्की कोणतं वर्णन कळलं. त्याने सरळ आत जाऊन नेटवर टाकलं त्याला समोर चित्र दिसलं आणि तो वांगं घेऊन आम्हाला दाखवायला आला. किती सोपी गोष्ट! तंत्रज्ञानाची कमाल वाटते.

तसा खूप वेळ गेला किंवा आम्हाला तसं वाटलं असावं. त्याने डिश आणून ठेवली. समोर काहीतरी भातासारखं होतं. नाही तो चक्क भात होता आणि साधा नव्हे नारळी भात होता. अतिशय उत्कृष्ट प्रतीचा हातसडीचा असावा असा लाल तांदूळ. भाताखाली काहीतरी बिस्किट सदृष होतं. म्हणजे त्या बिस्किटावर तो भात रचला होता. अ‍ॅपल पाय सारखं काहीतरी फळाचं केलेलं एका कोपर्‍यात होतं. इतकं सुग्रास जेवण मी इटलीतसुद्धा जेवलो नव्हतो. अचानक आणि अनपेक्षित अशा या जेवणाने आमची सिऑन ट्रीप अगदी संस्मरणीय ठरली.

इतकं सुंदर जेवण देणार्‍या माणसाबरोबर काहीच संभाषण होणार नाही हे कसं शक्य आहे? त्याला मुद्दाम बोलावून त्याच कौतुक केलं तर म्हणाला  मी पण सहा आठ महिने भारतात होतो. खूप छान देश आहे तुमचा. कलकत्त्याला होतो, दक्षिणेत होतो आणि हो मुंबई खूप सुंदर आहे. भारावल्याप्रमाणे सांगत होता. आपल्या देशाविषयी परक्या माणसाकडून परक्या देशात ऐकताना मन हळवं होतं. ऐकल्यानंतर त्याला विचारलं की तो कसा व्हेजिटेरिअन झाला? तर तो कोणत्यातरी आश्रमात रहात होता तेव्हापासून त्याने मांसाहार  सोडून दिला होता. तो योग शिक्षक होता आणि हॉटेलचं हे काम करून पैसेही मिळवत होता. आम्हाला वाटलं तो स्विस नागरीक असावा पण तसं नव्हतं तो स्वतः फ्रेंच होता पण त्याची मैत्रीण जर्मन होती. ती इथे रहाणारी म्हणून हा इथे. आम्हाला भेटलेल्या खूपजणांपैकी पुरूष बाईच्या गावाला लग्नानंतर स्थलांतर करून राहिलेले आम्ही बघितले होते.

"कुठे उगीच हा आपले हट्ट चालवण्यासाठी आम्हाला घेऊन येतो" असं सिऑनच नाव ऐकल्यानंतर आम्ही कुरकुरत होतो, ते आता बरं झालं आलो या ठिकाणी, इथवर आलो. शेवटच्या गाडीची टांगती तलवार नसती तर आमच्या गप्पा आणखीही रंगल्या असत्या पण.......


दुसर्‍या दिवशी उठून इंटरलाकेनला जायचं होतं. स्टेशनपर्यंतचा रस्ता आता अगदी पायाखालचा वाटत होता त्यामुळे सकाळी टेंशन वगैरे असण्याचा प्रश्न नव्हता. हमरस्त्यावरून वळण्यापूर्वी पुनः एकदा डोंगर उतारावरच्या द्राक्षमळ्यांना डोळ्यात साठवून घेतलं. स्टेशनच्या दिशेने वळून स्टेशनजवळ येता येता श्रीशैलने आमच लक्ष वेधलं. तिकडे बघा. दूरवर किल्ल्याचे दोन्ही बुरूज आम्हाला बाय करत उभे होते!    

                                                                     पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड इंटरलाकेन      

No comments:

Post a Comment