Monday, 25 May 2015

SWITZERLAND SCHILTHORN I


स्वित्झर्लंड शिलथॉर्न (१)

उर्सुलाने केलेली घाई आणि अर्थातच तिने आमच्या उरलेल्या कामाची घेतलेली जबाबदारी ( वॉशिंग मशिनमध्ये टाकलेले कपडे वाळवून बॅगेत भरून ठेवण्याची) यांच्या भाराखाली वाकत आम्ही हॉटेलमधून प्रस्थान ठेवले. तिच्या म्हणण्याप्रमाणे उशीरच झाला आहे ही टोचणी मनाला होतीच. हॉटेलपासून स्टेशन जवळ होतं. तिथून आम्हाला इंटरलाकेनमधल्याच ऊस्ट ( ईस्ट) स्टेशनला जायचं होतं. पुढचच स्टेशन. त्यामुळे प्रश्न नव्हता. ऊस्ट स्टेशन आल्यावर गाडीबाहेरबाहेर पडलो तेव्हा लक्षात आलं की ते स्टेशनही सुंदर, नेटकं आहे. मागे डोंगरांची पार्श्वभूमी लाभलेलं. आज अर्थात त्याच्याकडे बघायला त्याचं कौतुक करायला आमच्याकडे वेळ कमी होता. उर्सुलाने दिलेल्या कागदाप्रमाणे 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर गेलो आणि लाऊटरब्रुनेनची गाडी पकडली. त्यामुळे स्टेशनचं बाह्यदर्शन घडलच नाही.

*यावेळच्या गाडीचा रंग मात्र खूप वेगळा होता. हिरवा आणि पिवळा. आतापर्यंत स्वित्झर्लंडच्या झेंड्याच्या लाल रंगाची झालेली सवय आम्हाला या आताच्या गाडीच्या रंगाविषयी बोलताना जरा डावीकडेच रोखून धरत होती. पण सगळा रस्ता त्या गाडीच्या संगतीत काढल्यावर वाटलं की या इथल्या वातावरणाला किती साजेसा आहे हा रंग! आत्तापर्यंत बर्फाळ शिखरांच्या सान्निध्याची सवय, इथे तीही होतीच पण इथल्या डोंगरांवर हिरवाई होती. तसा इथे सपाटीचाही प्रदेश होता. त्यामुळे झाडांचा सहवास सुखद वाटत होता. आणि हो या सगळ्या मार्गावर म्हणजे आम्ही इंटरलाकेन वेस्टपासून सुरवात केली तिथपासून सोबत केल्यासारखा झुळझुळणारानदीचा प्रवाह साथीला होता. एकूणच हा निसर्ग तसा मैत्रीपूर्ण वाटणारा, त्यात या हिरव्या रंगाची साथ आणि त्यात मिसळून जाणारा हा गाडीचाही हिरवा पिवळा रंग! हे निसर्गाच्या तादात्म्याचं भान आपल्याकडेही ठेवायला हवं. तो आपल्याकडच्या डब्यांचा कळकट रंग फार विरूप दिसतो. जाऊ दे. निसर्गाच्या कौतुकात बुडालेलं असतानाच लाऊटरब्रुनेन आलं.

आता उतरून केबल कार घ्यायची की मग ग्र्युटशाल्प (Grütschalp). काही वेळा आपल्या नकळत आपलं शरीर, मन गती घेत असतं का? मधले संदर्भ मग सुटून का जावेत तस नसेल तर? की आपल्या मेंदूच्या आवडत्या गोष्टी साठवण्याच्या सवयीचा हा भाग असेल? गोंधळायला झालं आहे हे निश्चित! खरं तर गोंधळ वगैरे काही नाही. फास्ट फॉरवर्ड केल्याप्रमाणे आपण फिरतो आहोत. आज हे शिखर उद्या ते. जाताना ही गाडी मग फ्युनिक्युलर किंवा केबल कार किंवा माऊंटन रेल्वे....... काय आणि किती साठवणार डोक्यात? मग ही अशी सरमिसळ झाल्यासारखं, भोवंडल्यासारखं होणं स्वाभाविक नाही का? तसही प्रत्यक्षात येणारी भोवळ आपल्याला शांत बसायला उद्युक्त करते. आताही माझ्याकडे तोच उपाय होता त्यावरचा!

सिऑनला गेल्यानंतर आम्हाला स्वित्झर्लंडचं मानवी रूप बघायला मिळालं. नाही, म्हणजे आधी बघितलं ते अमानवी नव्हतं! ते स्वर्गीय होतं. त्यात वावरताना आम्हाला मग काही आवरणं(covers) आवश्यक होत होती. आता ती आवरणं झुगारून द्यायला प्रोत्साहन दिलं ते सिऑनने. साध्या शर्ट पॅन्टमध्ये बाहेर पडता येणं हे किती सुखाचं असतं ते आधी त्या गरम कपड्यांच्या लोढण्यासकट वावरल्यानंतर कळतं. इथेही शिलथॉर्नला जाण्याकरता निघताना आम्ही आलो होतो मोकळे ढाकळे, सगळ्या अनावश्यक गोष्टींना (गरम कपड्यांना) हॉटेलवर ठेवून.

ग्र्युटशाल्पहून आम्हाला रेल्वेने म्युरेनला जायचं होतं. इथे म्हणे पूर्वी सरळ लाऊटरब्रुनेन ते म्युरेन अशी ट्रेन होती. पण हा मधला म्हणजे ग्र्युटशाल्पचा चढ खूप सरळ आहे. त्याकरता ट्रेनऐवजी हा केबल कारचा जास्त सोयीचा पर्याय. लाऊटरब्रुनेनहून ग्र्युटशाल्पला वर येताना मधे मधे ते रेल्वेचे अवशेष दिसतात. केबल कारचा प्रवास तसा जेमतेम 5-7 मिनिटांचा. रोमांचक वगैरे अजिबात नाही. सुरवातीला दिसणारा रस्ता, एखादं दुसरं वाहन, गाव, कामं करणारी माणसं मागे टाकून पुढे जाताना बराचसा खडकाळ भाग दिसतो. झाडं आहेत पण ती आहेत एवढ्यापुरेशीच त्यांचं अस्तित्व. बर्फाळ डोंगरांचं सान्निध्य हा त्यातला चांगला भाग.

ग्र्यूटशाल्पला समोर एक उभा चढ आणि त्यावरून गेलेला रेल्वेमार्ग दिसत होता. इतक्या सरळ चढावर गाडी कशी जात असेल? मनात हा विचार येतो आहे तोच वरून एक डबा येताना दिसला. बोगद्यासारखं काहीतरी दिसत होतं तिथून सरळ खाली येत होता. थोडा वेळ गेला तर खालून वर जाणारा तसाच एक डबा वर चढत होता. दोघेही ठराविक वेळी समोरासमोर आले तिथे तो रेल्वेमार्ग दुभागला होता. आपापल्या रस्त्याने मग त्यांनी एकमेकाला ओलांडलं आणि पुनः एकच लाइन असलेल्या मार्गावरून त्यांच मार्गक्रमण सुरू झालं. लांबून हे सारं बघायला मजा येत होती. आमच्या रमत गमत जाण्यामुळे या गोष्टींचा आनंद मनसोक्त उपभोगता येतो.केबल कार जेव्हा प्लॅटफॉर्मला लागते तेव्हा ती अचूकता बघायला बरं वाटतं. बाहेर पडायची दोन्ही बाजूला असलेली व्यवस्था, एका बाजूला उतरणारी माणसं, ती उतरून रिकाम्या कारमध्ये दुसर्‍या बाजूने आत चढणारी माणसं. उगीच कल्ला नाही. शांतपणे हे व्यवहार होतात. त्यांना त्यांची स्वतःची गती असते आणि तरीही या सगळ्याला घड्याळाचं बंधन असतं. आपल्याकडे आपण हॉर्न वाजवतो, उतावीळपणे ओव्हरटेक करतो, पुढे जातो, तरीही उशीरा पोहोचतो. मग इथे अस काय आहे की कोणतीही लगबग, ढकलाढकल वगैरे न होता निवांतपणे पण रेंगाळत नव्हे तर स्वतःची एक अंगभूत गती असल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट पार पडते तीही ठराविक वेळात?

केबल कारमधून बाहेर आलो. इथून आता रेल्वेने म्युरेन.

                                                     स्वित्झर्लंड शिलथॉर्न भाग दुसरा पुढील मंगळवारी* काही वेळा आपल्याला जे म्हणायचं आहे त्याची प्रचिती देण्यासाठी शब्द आणि फोटोही अपुरे आहेत की काय असं वाटतं. अशा वेळी कदाचित व्हिडिओमुळे अधिक स्पष्टता येइल असं वाटल्यावरून प्रथमच हा व्हिडिओ देत आहे. कॅमेर्‍यावर शूट केला असल्याने मर्यादा आहेत. 


Monday, 18 May 2015

SWITZERLAND INTERLAKEN III


स्वित्झर्लंड इंटरलाकेन ()

इतक्यात श्रीशैल म्हणाला बाबा, आपण सिऑनला किल्ल्यावर गेलो होतो त्याच्या प्रवेशाची वेळ संध्याकाळी साडेपाचपर्यंतच होती. स्वित्झर्लंडमधे सगळ्या गोष्टी साडेपाचला बंद तर होत नसतील ना?

तशी जर इथे असेल तर? म्हणजे इतके वर येऊनही पुनः चालतच खाली जाणे आले आणि आता तर सहा वाजून गेले होते. अर्थात या मुलींकडे (खेळणार्‍या) बघितल्यावर खात्री पटली की ही काही चालत येण्यापैकी नव्हेत. त्यामुळे आम्ही निश्चिंत झालो होतो.

थोडं वर गेल्यानंतर ते हॉटेल आलं. नेहेमीप्रमाणेच छान. आम्ही बसून निवांतपणे कॉफी घेतली. इतक्या भागदौडी नंतर श्रमपरिहार आवश्यक होताच. त्या क्रीम घातलेल्या कॉफीने पोट पुनः दब्ब झालं. पण आता दुपारप्रमाणे काही धावाधाव नव्हती त्यामुळे काळजीचा लवलेशही नव्हता. समोर एक बोर्ड दिसत होता त्याच्याकडे बघून आम्हाला कळत होतं आम्ही फ्युनिक्युलर रेल्वेच्या जवळ पोहोचलो होतो. वाटेतला एक चिंचोळा, झाडांनी झाकोळलेला रस्ता पार करून आम्ही त्या स्टेशनपर्यंत पोहोचलो. फ्युनिक्युलरची पहिलीच वेळ. कशी असते कोण जाणे असं मनात आलं. बघितलं तर आपल्या लिफ्टसारखी दिसत होती. कदाचित रूळावरून जाते म्हणून तिला रेल्वे म्हणत असावेत का?

सगळा मिळून दहा मिनिटांचा प्रवास. पण अनुभवण्याजोगा. मुळात इंटरलाकेनचा परिसर अतिशय सुंदर आहेच. आम्ही वर चढत असतानाही त्याच्याकडे पाहून श्रमपरिहार व्हावा असं वाटत होतच. वाटेत थांबण्याकरता ते एक प्रलोभन असे. पण आता निवांतपणे बसून त्याचा आनंद घेत जाणं म्हणजे खरं सुख होतं. याआधी म्हटले होते ते दोन विस्तीर्ण तलाव आणि शहराची सौंदर्यपूर्ण आकृती यांचा हा हवाई मेळ सुखावून गेला. वर येतानाही उगीच दमणूक झाली असं वाटलं तरी आम्ही चढून आलो ती बाजू वेगळी होती त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंच दर्शन झालं होतं हा फायदा होताच. तरी चालण्याला प्रवृत्त करण्याला कारणीभूत ठरलेल्या दोन गोष्टींच्या आठवणीने आता हसायला येत होतं. एकतर आम्हाला उगीचच सवय आहे आपण दमत नाही, चालायला नाही म्हणत नाही वगैरे सांगण्याची आणि मग असं हे श्रीशैलने विचारलं की बळी पडायला होतं! दुसरं आणि महत्वाच कारण म्हणजे तिथे होता तो बोर्ड. त्यावर चालत जाण्याला लागणारा वेळ दाखवला होता 15 मिनिटे पण तो बोर्ड जुना झाला होता त्यावरची काही अक्षरं पुसली गेली होती त्यामुळे 2 तास पंधरा मिनिटांऐवजी फक्त 15 मिनिटं वाचलं गेलं. काही का असेना आमचा चालत आणि फ्युनिक्युलर दोन्ही दर्शनांचा योग होता आणि तो मनपसंत झाला.

मला मात्र कोणी विचारलच की चालत जाऊ का तर मी आवर्जून सांगेन की फ्युनिक्युलरचं तिकिट जेव्हा हॉटेलमधून देतात तेव्हा त्यात परतीचं तिकिटही असतं. तेव्हा उगीच चढण्याचे एवढे श्रम घेण्यात अर्थ नाही. तसा तो चढ खूप दमवणारा आहे, अंतर आणि चढ दोन्ही बघू जाता.

संध्याकाळ होऊन गेली होती. काय करायचं या विचारात आम्ही निघालो होतो. एका ठिकाणी दुकान बघितलं, आपलं वाटलं. श्रीशैल म्हणाला श्रीलंकन वाटतो आहे. आम्ही म्हटलं ठीक ना, इंडियन स्टोअर तर आहे! काही लागलं तर आपल्याला माहित असलेलं बरं. पुढे रेल्वेचं फाटक ओलांडून गेल्यावर एक स्टोअर होतं तिथे फळं घेण्यासाठी गेलो. रात्रीच्या जेवणाचं काय करू या, कुठे जाऊ या हा प्रश्न होता. हॉटेलवर जाऊन पुनः बाहेर पडणं पायांनी नाकारलंच. उत्तरा म्हणाली मघा ते इंडियन स्टोअर बघितलं त्याच्याकडे काही मिळालं तर बघू. पुनः मागे गेलो. आपले हल्दीराम वगैरे सगळे ब्रॅन्डस होते. उर्सुला दुपारी म्हणालीच होती की किचनमध्ये गॅस स्टोव्ह आणि मायक्रो दोन्ही आहे. त्याचा वापर करा कारण बाहेरचं जेवण हे खूप महाग पडतं. त्यापेक्षा तोच पैसा आपण फिरण्याकरता वापरू शकतो. सरळ रेडी टू कूकची वेगवेगळी पॅकेटस घेतली आणि परतलो.

ती पॅकेटस मायक्रोवेव्हमध्ये टाकताना एक लक्षात आलं की इथले बरेचसे गेस्टस, बहुसंख्य जपानी आणि भारतीय होते, त्यांनी अशीच पॅकेटस आणलेली होती. आम्हाला मुंबईचं एक नवपरिणित अमहाराष्ट्रीय जोडपं भेटलं, हनीमून कपल म्हटलं तर लवकर कळेल का?, बर, तसं म्हणू या! त्यांनी तर मुंबईहून आणलेल्या या पॅकेटसमुळे किती बचत होते याचा आढावाच सादर केला. अमहाराष्ट्रीय असा उल्लेख का? असा विचार वाचताना मनात आला असेल! तर आमच्या या गप्पा सुरू असतानाच एक असाच हनीमूनर आला, मराठी माणूस. बायकोचा गुरूवारचा उपास म्हणून दूध गरम करण्याकरता आला होता. त्याने त्या  जोडप्याला हे सांगितलं म्हणून कळलं. आम्ही त्याच्याकडे आपला म्हणून ओळखीच हसून काही बोलण्याचा प्रयत्न करत होतो तोवर साहेब गायब झाले! आपण इतके का संवादाला घाबरतो? तेही आपल्या माणसांबरोबर? 

खूप दमणूक झाली होती परंतु या पॅकेट फूडमधील का होइना व्यवस्थित पोटभर जेवणामुळे रात्रीची शांत झोप मिळाली.

सकाळी आता लवकर उठून जायची गडबड होती.  जायचं म्हटल्यावर जरा लवकर जागही आली होती. मग आज आम्ही लॉन्ड्रीचाही प्रोग्रॅम काढला. खाली ब्रेकफास्टला जातानाच कपड्यांची बॅग घेऊन खाली जाऊ म्हणजे पुनः पुनः जा ये नको हा विचार. खाली उतरताना प्रत्येक जिन्यावरच्या आपल्या देवांच्या तसबिरींनी आमचं लक्ष वेधून घेतलं. लक्ष्मी, सरस्वती, गणपती यांना या परक्या मुलखात बघितल्यावर अगदी घरचा "फील" आला! या लोकांचं पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठीच्या या क्लृप्त्यांचं कौतुक वाटतं. स्वागतकक्षातला बुद्ध आणि या तसबिरी बघूनही पूर्व आशिया आणि भारत इथे भेटेल हे येणार्‍या माणसाला सहज उमगेल.

लॉन्ड्रीकरता गेलो खरे पण तिकडे आधी आलेल्या माणसाचा नंबर होता. सुदैवाने इंडिकेटर दाखवत होता त्याप्रमाणे त्याचं संपायला फार वेळ लागणार नव्हता. आम्ही त्याचं संपल्यावर कपडे धुवायला टाकले आणि ब्रेकफास्ट करायला गेलो. सकाळची उत्तम न्याहारी असणं आवश्यक कारण नंतर काय कुठे आणि कसं मिळेल ही चिंता होती.

आम्हाला ब्रेकफास्ट टेबलकडे बघून  उर्सुला आली ती आमच्या जाण्याची तिकिटं घेऊनच. सोबत एक प्रिन्टआऊट होतं. बघू नंतर म्हणून बाजूला ठेवलं. आमचा ब्रेकफास्ट निवांत सुरू होता. आमच्या डोक्यात लॉन्ड्रीला लागणारा वेळ हा हिशोब होता. श्रीशैल तिने दिलेला कागद वाचत होता. तिने सांगितलेली माहिती आणि कागदावरली माहिती जुळत नव्हती. ठीक आहे विचारू नंतर म्हणून त्याने तो कागद बाजूला ठेवला. आमचा हा वाजवीपेक्षा जास्त निवांतपणा पाहून तिथे आलेली उर्सुला एकदम कडाडलीच. You are still here? तिच्या मते आम्ही लवकर आटोपून एव्हाना बाहेर पडलो असू. मग तिलाच जाणवलं असावं. आवाजाची पट्टी बदलत म्हणाली आज हवा खूप छान आहे. पण काय होतं, छान आहे म्हणेपर्यंत ढग येतात मग वर जाण्यात काय मजा? तेव्हा आटपा लवकर आणि सुटा! तिच्या बोलण्यातली ती काळजी, कळकळ, ती अधीरता (anxiety) आम्हाला जाणवत होती. येणार्‍या प्रत्येक पाहुण्यात ती अशी गुंतत असेल तर खरच ग्रेट म्हणायला हवं. हे सगळं सुरू असताना एक छोटी गोड मुलगी उर्सुलाने तिच्याकडे लक्ष द्यावं म्हणून हट्ट धरून होती. एका हाताने ती तिला समजावत होती. तिचा संपूर्ण राग झेलत होती आणि आमच्याकडे वळून आम्हाला चुकून दिलेल्या प्रिंटाआऊटबद्दल दिलगिरी व्यक्त करत होती. कामाचा आणि घराचा तोल सांभाळण्याची तिची चाललेली कसरत छान होती. शेवटच्या सूचना तशी तिने आठवण केली गरम, गार पाणी बरोबर घेऊन ठेवा. आम्ही सवयीने दोनही बरोबर ठेवलं होतच.

तिला हो म्हटलं तरी लगेच निघता येणं अशक्य होतं. लॉन्ड्रीमध्ये टाकलेले कपडे धुवून झाल्यानंतर ड्रायरला लावायला हवे होते म्हणजे आणखी किमान अर्धा पाऊण तास. पण उर्सुला द ग्रेट. आमचा प्रश्न तिच्या लक्षात आल्यावर ती पुढे आली. आमच्याकडून ड्रायरकरता लागणारी नाणी तिने घेतली. आमच्या बॅगेवर आमच्या खोलीच्या नंबरचा कागद चिकटवला. म्हणाली, ही माझी जबाबदारी. मी सगळे कपडे वाळवून यात भरून ठेवते आणि बॅग तुमच्या दारासमोर ठेवते पण आता एकही क्षण तुम्ही इथे वाया घालवू नका. ताबडतोब निघा.

आम्हाला काय वाटलं असेल ते शब्दात वर्णन करता येणं केवळ अशक्य. त्या हॉटेलमध्ये प्रत्येक मजल्यावर किमान 10 तरी खोल्या होत्या असे तीन मजले. इतक्या सगळ्या धबडग्यात ही बाई हसतमुख राहून सर्व्हिस देते इथवर ठीक. पण आम्ही आलो तेव्हा आमची ती जड बॅग उचलून तीन जिने चढून जाणं किंवा आता वाळलेले कपडे ठेवण्याची जबाबदारी घेणं आणि तेही का तर आमचं शिलथॉर्न दर्शन व्यवस्थित पार पडावं म्हणून? काय संबंध? आम्ही स्टेशनवर जाता जाता आपल्याकडे अशी परिस्थिती असती तर काय होऊ शकलं असतं याचा विचार करत होतो. एकतर हा प्रश्नच गैरलागू होता कारण 'तुम्हाला जायचं होतं तर कपडे धुवायचं काय नडलं होतं?' ही पहिली प्रतिक्रिया असती. तरीही बाबापुता करून त्याला पैशाचं आमिष दाखवून समजा राजी केलंही असतं तरी त्याने आधी सगळी कॅव्हिएटस (caveats) आम्हाला ऐकवली असती. 'तुमच्या जबाबदारीवर ठेवा! काही हरवलं तर आमची जबाबदारी नाही' वगैरे वगैरे. इथे हा जो विश्वासाचा पाया दिसतो तोच मला वाटतं आपण आणि त्यांच्यातला महत्वाचा फरक आहे. विश्वास टाकावा आणि आपणही बाळगावा हा फरक जेव्हा आपल्याकडे येइल तो सुदिन!

आता आमच्यापुढे पर्याय नव्हता. आता थेट शिलथॉर्न


                                                            पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड शिलथॉर्न
Monday, 11 May 2015

SWITZERLAND INTERLAKEN II


स्वित्झर्लंड इंटरलाकेन (२)

आज्ञा शिरसावंद्य मानून आम्ही बाहेर पडलो. उर्सुला म्हणजे धबधबा होता. तिला विरामचिन्ह, बोलण्यातली आणि कामातली शिकवलीच नव्हती. तिचा नवरा आणि आईही मागच्या खोलीत होते. पण एवढ्या मोठ्या तीन मजली घरातील सगळ्या पाहुण्यांकडे तिचं जातीने लक्ष होतं. नवरा दिसत असे तो कधीतरी स्वच्छता, देखरेख किंवा दुरुस्ती अशी मागील कामं करताना. उर्सुला मात्र सगळ्या हॉटेलला व्यापून राहिली होती.

वाटेत जेवून मग पुढे जायचं म्हणून ठरवून निघालो आणि आधी हॉटेल शोधायला प्रारंभ केला. दिसलेलं पंजाबी हॉटेल बरं वाटलं. तिथे असलेली इतरही आपली हॉटेल्स तशी सारख्याच तर्‍हेची होती मग जाऊ इथेच म्हणून गेलो. गेल्यावर एक गोरा पान हात, बांगड्यांनी पूर्ण भरलेला, कपाळावर कुंकू, पुढे आला. आम्ही आपले हसून नमस्कार केला तर तिने कोर्‍या चेहेर्‍याने मेन्यू कार्ड पुढे करत हाय केलं. कदाचित तिथेच वाढलेली पंजाबी मुलगी असेल! पण श्रीशैल म्हणाला आपल्याकडलीच आहे. तिला धड इंग्रजीही बोलता येत नाही आणि इथे बोलल्या जाणार्‍याही भाषा येत नाहीत. कदाचित गावठी वाटू नये म्हणून हा प्रयास असावा. आजवर परदेशात जिथे कुठे गेलो तिथे, मग ते पाकिस्तानी किंवा बांगला देशी इंडियन रेस्तरॉं असो, संवाद झाला नाही असं झालं नव्हतं. इथे ते पहिल्यांदाच घडलं होतं. आम्हाला आपल्याप्रमाणे पंजाबी थाळी म्हणजे व्यवस्थित रोटी, सब्जी, डाळ, भात सगळं मिळालं आणि ते उत्तमच होतं त्यामुळे तिला माफ करून आम्ही भरपेट जेवून बाहेर पडलो.

आता हार्डर कुल्म!. बाजारातूनही रस्ता आहे आणि तिथून तुम्ही थोडं गावातून जाता असं काहीतरी उर्सुला म्हणाली होती. मग आम्ही रमत गमत निघालो. जेवण अंगावर आलं म्हणतात तसा प्रकार होता. आत्तापर्यंत आम्ही कधीही दुपारचं जेवण इतकं जड जेवत नव्हतो कारण सकाळी ब्रेकफास्ट चांगला होत असे. आज भारतीय जेवण इतक्या दिवसानंतर मिळाल्यावर जरा जास्तच हात मारला होता. बाहेर ऊन मी म्हणत होतं. आत्तापर्यंत ऊन असं कडक नव्हतं. इथे तर तीसच्या आसपासचं तापमान होतं. सावलीत असेपर्यंत ठीक पण जरा ऊन्हात गेलं की जाणवत होतं. कदाचित त्या तेलकट मसालेदार जेवणानंतर आम्ही लगेच बाहेर पडलो होतो त्याचाही परिणाम असेल. आम्ही रमत गमत चाललो होतो
वाटेत नदीचा प्रवाह होता.  नेहेमीप्रमाणेच काठावर फुलांच्या कुंड्यांची सजावट होती. फार न रमता पुढे चालत गेलो. गाव पार करून आम्ही थोडे बाहेर आलो असू तर पाटी दिसली. हार्डर कुल्मला चालत जाणार्‍या लोकांसाठीचा तो रस्ता/ पायवाट होती. आम्ही पायथ्याशी पोहोचलो होतो. आता फ्युनिक्युलर वगैरे शोधत बसण्यापेक्षा इथून चालत जाण्याचा मार्ग दाखवला आहे तो घेऊ या. आपण सरळ चालत जाऊ. या बोर्डवर 15 मिनिटांचा अवधी दाखवला आहे. जाऊ या ना. तसही आज संध्याकाळी मोकळा वेळ आहे. आमच्यातली हायकिंगची सुरसुरी उफाळून आली. आणि आम्ही चढायला सुरवात केली.

दाट म्हणावी अशी नसली तरी झाडांची सावली होती त्यामुळे उन्हाचा थेट उपद्रव नव्हता. थोडं चढून गेलो आणि झाडांमधून दिसणारं शहर आमच्याकडे बघायला लागलं. तलाव कसले, विस्तीर्ण नद्या वाटत होत्या. दोन बाजूंनी आलेल्या त्या तलावांमध्ये एक चिंचोळा जमिनीचा पट्टा दिसत होता. आखीव रेखीव असं त्या शहराच ते रूप इथून फारच गोजिरवाणं वाटत होतं. शहराच ते सुखावणारं दर्शन आमचा चालण्याचा प्रयास हलका करत होतं. सगळीकडे आकाशात उडणारे ग्लायडर्स दिसत होते. दूरवरच्या डोंगरांवरचा बर्फ़ उन्हात चमकून तजेलदार तांबूस दिसत होता.


आज वर जाताना मधून मधून थांबावं लागत होतं आणि तहानही खूप लागत होती. झाडी असल्याकारणाने उन्हाचा तसा त्रास नव्हता पण तापमान त्रासदायक होतं. तासभर गेल्यानंतर आम्हाला कळेना अजून का येत नाही? मघा तर पंधरा मिनिटांचा बोर्ड होता! वाटेत पाट्या होत्या त्यावर दाखवलेल्या बाणावरून रस्ता तर बरोबर होता पण संपण्याचं चिन्ह दिसत नव्हतं. बरं, वाटेत कोणी भेटेल तर तेही नाही. आता परतीचे मार्ग तर बंद होते. थांबत थांबत आम्ही पुढे जात होतो.

एवढ्यात दोघे तरूण खाली उतरताना दिसले. त्यांना विचारलं तर म्हणाले की आमच्या चालीने तास लागेल. तुम्हाला किती ते बघा. कदाचित पोहोचणारही नाही. असं म्हणून त्यांनी डोळे मिचकावले! मग तर आम्हाला चेव येणारच. आम्ही पुढे निघालो. अर्धा तास असाच गेला. आता मात्र काळजी वाटू लागली. किती वेळ चालणार? त्यात त्या भरपेट जेवलेल्या पंजाबी जेवणाच्या तेलकट, मसालेदार गुणांचा त्रास वाटू लागला होता. थोडा वेळ विश्रांती घे असं उत्तराला सांगून आम्ही दोघं थोडे पुढे गेलो काही शेवटाचा मागमूस दिसतो आहे का ते बघायला. श्रीशैल म्हणाला आज कधी नव्हे ते आईची काळजी वाटते आहे. चालत येण्यात चूक तर झाली नाही ना? हे संपण्याचं कुठे चिन्ह नाही. माझ्याही मनात तोच विचार होता पण आता पुढे जाण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता.

प्रत्येक वेळी पुढे जाताना दिसणारं मोकळं आकाश पाहून चला आलं शिखर अशी आशा वाटत असे. पुढे गेल्यानंतर पुढचं वळण. अशी किती वळणं आणि किती आशा आणि नंतरची निराशा. पण एक मात्र होतं की दमल्यावरही काळजी वाटत असतानाही उगीच चिडचिड वगैरे झाली नाही. तरी मी सांगत होते किंवा होतो असही झालं नाही. मजल दरमजल करत चढताना एकदम एका वळणानंतर आवाज आले. कोणीतरी मुलं खेळत असावीत. म्हणजे नक्की आलो. आता अंगात उत्साह भरला होता. पुढची पंधरा मिनिटं कशी गेली कळल नाही. थोडी सपाटी होती. तिथे काही मुली हॅंडबॉल खेळत होत्या. वाळवंटात फिरत असताना पाण्याची चाहूल लागावी तस झालं हे! अजून चढ बाकी होता पण कुठेतरी आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचण्याच्या बेतात आल्यावर मग मनाला उभारी आली होती.

इतक्यात श्रीशैल म्हणाला बाबा आपण सिऑनला किल्ल्यावर गेलो होतो त्याच्या प्रवेशाची वेळ संध्याकाळी साडेपाचपर्यंतच होती. स्वित्झर्लंडमधे सगळ्या गोष्टी साडेपाचला बंद तर होत नसतील ना? मग?.............

                                                                  पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड इंटरलाकेन 3 
उजव्या कोपर्‍यात झाडांच्या वरच्या बाजूला दिसणारा पॅरा ग्लायडर. बर्फावर पडलेल्या  सुवर्ण किरणांचं दर्शन फारच अप्रतिम होतं.
  

Monday, 4 May 2015

SWITZERLAND INTERLAKEN I


स्वित्झर्लंड इंटरलाकेन (१)

इंटरलाकेनला जायचं म्हणून सिऑनहून निघालो तेव्हा रस्त्यावरून स्टेशनकडे वळल्यानंतर उजवीकडे लांबवर दिसलेल्या त्या किल्ल्याच्या निरोपाने आणि द्राक्षमळ्याच्या दर्शनाने भारावलेले होतो. अचानक काहीतरी, अनपेक्षितपणे चांगलं गवसावं तसं हे सिऑन आणि तो फ्रेंच अन्नदाता. इथे येण्यापूर्वी फार काही ऐकलेलं नव्हतं त्यामुळे काही अपेक्षाही मनात ठेवल्या नव्हत्या. पण इथून निघताना मात्र प्रसन्न पण हुरहुरत्या मनाने निघत होतो.

आजचा प्रवास नकाशावर बघितल्यावर मजेशीर वाटावा असा. सिऑनहून पूर्वेकडे विस्पला जाऊन गाडी बदलायची होती. तिथून उत्तरेच्या दिशेने स्पीझ ( Spiez) आणि मग पुनः पूर्वेकडे इंटरलाकेन. इथेही इंटरलाकेन पूर्व आणि पश्चिम अशी दोन स्टेशनं.

इंटरलाकेन जवळ आलं आहे हे सांगायला लागत नाही. laken हे lake या जर्मन शब्दाचं बहुवचन. दोन मोठे तलाव लाभलेलं हे शहर.  द्रवीडची कामगिरी जशी सचिनच्या सान्निध्याने झाकोळली तसं या शहराच झालं आहे. या शहराचं महत्व त्याच्या भोवती असणार्‍या गिरीशिखरांकडे जाण्याकरता मुक्काम करण्याचं ठिकाण एवढच लक्षात येत. वास्तविक हे शहर आणि त्याचा परिसर अतिशय सुंदर आहे पण त्याच्या सभोवताली यापेक्षाही सुंदर स्थळं आहेत.

आम्ही इंटरलाकेन वेस्ट स्टेशनवर उतरलो ते सरळ हॉटेलवर गेलो. चालण्याच्या अंतरावरच होतं ते हॉटेल. पायर्‍या चढून दरवाजा उघडला तर आमचं स्वागत बुद्धाच्या ध्यानस्थ मूर्तीने केलं. समोरच काऊंटर म्हणण्यापेक्षा एक मोकळी चौकट दिसली ती रिसेप्शनची असावी असं गृहीत धरून तिकडे गेलो. मागून आवाज आला. एक मिनिट थांबा मी येतच आहे. आवाजाच्या दिशेने कोणी दिसत तर नव्हतं. दुपारची वेळ. नवीन आलेल्या गेस्टच्या गर्दीव्यतिरिक्त बाकी सगळे बाहेर पडले असतील आणि आत्ता तिथे दिसणारे कामगार असतील हा आमचा होरा अंशतः खरा ठरला. तेव्हढ्यात लगबगीने ती आलीच समोर.

साधारण साडेपाचच्या वर कदाचित पावणे सहाही असेल अशी उंची. गळ्याची हाडं दिसताहेत, उंचीमुळे तिचं बारीकपण की बारीक असल्यामुळे उंची अधोरेखित होत आहे. विलक्षण तेज डोळे आणि आत्मविश्वासपूर्ण बोलणं. हाय! माझं नाव उर्सुला! स्वतःची ओळख करून दिली आणि थांबायला लागलं म्हणून दिलगिरी व्यक्त केली. आमच्या हातातला इ मेलचा कागद बघितला, पासपोर्ट नोंदवले आणि म्हणाली आधी खोली दाखवते. त्या चौकटीतून बाहेर येऊन झटक्यात आम्हाला अवधी न देता आमच्याकडची सगळ्यात जड बॅग तिने उचलली आणि ताडताड समोरच्या जिन्याच्या पायर्‍या चढू लागली. आम्ही चकीत होऊन तिच्यामागे. श्रीशैलने बॅग देण्यासाठी कितीही सांगून उपयोग झाला नाही. ती तिसर्‍या मजल्यावर आमच्या खोलीसमोर जाऊनच थांबली. इथे तीन जिने चढावे लागतात ना. मला सवय आहे त्यामुळे मी मदत करते. जणू काही ते तिच कर्तव्य असल्यासारखी भावना तिच्या बोलण्यात होती. तुम्ही प्रवासातून आला आहात. दमला असाल. काही चहा कॉफी हवी असेल तर खाली या. नंतर मी तुम्हाला सगळी माहिती सांगते. असं म्हणून आली तशीच खाली उतरून गेलीदेखील. नंतरच्या त्या चार दिवसात आम्ही तिला कधीच स्वस्थ, कामाशिवाय बसलेली बघितलीच नाही. सतत on her toes म्हणावं तशी ती भिरभिरत असे.

आम्ही प्रवासातून आलो असलो तरी तो काही आपल्याकडला दम काढणारा प्रवास नव्हता. थोडं फ्रेश होऊन, हल्लीच्या सीरियलच्या भाषेत, जरा तोंडावर पाण्याचा हबका मार ताजंतवानं वाटेल असं सांगणारं कोणी भेटत नाही म्हणून हा सर्वपरिचित फ्रेश शब्द वापरला, पुनः खाली आलो तर टेबलावर या बाईने कॉफीची तयारी ठेवलेलीच होती. लांबूनच आम्हाला घ्यायला सांगितलं आणि कॉफी संपता संपता बाई पुनः आमच्यासमोर हजर. आपल्याकडे जरा भाजी फोडणीला टाकून येते असं म्हणत पदराला हात पुसत येणार्‍या बाईसारखा आविर्भाव !

इथे असणार्‍या सोयी सुविधांची आधी कल्पना देते. लॉंड्रीची सोय आहे. त्यात नाणी टाकली की ते वापरता येईल. तुमच्याकडे नाणी नसतील तर मला सांगा मी देऊ शकेन. पाणी गरम, गार दोन्ही इथे आहेत. गॅस स्टोव्ह आहे किंवा मायक्रोवेव्ह आहे. त्याचा वापर तुम्ही करावा अस मला वाटतं. कारण इथे सगळ्या गोष्टी खूप महाग असतात याची तुम्हाला कल्पना देणं माझं कर्तव्य समजते. यासंबंधात काही मदत हवी असेल तर मला नक्की सांगा मी इथेच असेन. त्यानंतर मग ब्रेकफास्ट्च्या वेळा सांगून झाल्या. त्यात काय काय असतं आणि ते भरपूर खाऊनच बाहेर पडत जा हेही सांगून झालं.

आता मुद्द्याचं. इथे तुम्ही आला आहात ते काही हॉटेलमधे बसण्यासाठी नाही. तर मला तुमचे इंटरेस्ट कळू द्यात मी तुम्हाला सुचवते त्याप्रमाणे. म्हणजे ही बाई स्वखुशीने आता आमचे इथले तीन दिवसही मॅनेज करून देणार! ग्रेटच! आम्ही येता येता आम्हाला समोर डोंगरावर काहीतरी छान दिसलं होतं. सुरवातीला आम्हाला पॅगोडा वाटला पण तो पॅगोडा नव्हता. तिच्याकडे चौकशी करणार तो तिनेच सुरवात केली. तुम्ही येताना डोंगराकडे बघितलं असेल तर ते हार्डर कुल्म Harder Kulm इंटरलाकेन ऊस्टहून तिथे जाण्यासाठी फ्युनिक्युलर रेल्वे आहे. तुम्ही सरळ नदीच्या अंगाने गेलात की ऊस्ट येईल. म्हणजे तो भागही तुमचा जाता जाता बघून होइल. नदीच्या दोन्ही अंगाने रस्ता आहे आणि आज तर स्वच्छ हवा आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. संध्याकाळी जरा गावात फिरून होईल. उद्याचा दिवस जरा लवकर निघा. मला एक सांगा तुम्हाला पैसे खर्च करण्यामध्ये रस आहे की खूप फिरण्यामध्ये? आमच्या "युंग फ्राऊला जायचं आहे" या वाक्यावरचं हे तिचं उत्तर होतं. युंग फ्राऊ हे मार्केट केलेलं डेस्टिनेशन आहे. खूप जण, विशेषतः टूर कंपनीज तिथे घेऊन जातात त्यामुळे प्रसिद्ध आहे पण म्हणूनच एक्सपेन्सिव्ह आहे. मला नेहेमी वाटतं अशा ठिकाणी जाण्यात अर्थ नसतो. जे तुम्ही तिथून बघाल तोच सगळा टेरेन (Terrain) तुम्हाला शिलथॉर्नला गेल्यावर दिसतो. तिथेही सुंदर व्ह्यू आहे आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे शिलथॉर्नचा सगळा प्रवास हा तुम्ही एंजॉय करू शकता. युंग फ्राऊची रेल्वे बोगद्यातून जाते त्यामुळे प्रवासाचं सुख मिळणार नाही. तुम्ही जर माऊंट टिटलिस करणार असाल तर माझा सल्ला आहे की तुम्ही शिलथॉर्नला जावं. तुमचे प्रत्येकी 60 ते 80 फ्रॅंक्स वाचतील. Anyway हा निर्णय उद्याकरताचा आहे. तुम्ही स्वतः विचार करा आणि उद्या ठरवा. मात्र लवकर बाहेर पडा म्हणजे खूप वेळ मिळेल. इथे दुपारनंतर जर हवा बदलली तर मग ही सगळी शिखरं दिसणार नाहीत म्हणून सांगते. आणि हो या सगळ्याची तिकिटं तुम्हाला मी देइन त्याकरता तिथे रांगेत उभे राहण्याची गरज नाही. असं म्हणत तिने आम्हाला हार्डर कुल्मच्या फ्युनिक्युलरच रिटर्न तिकिट हातात ठेवलं. तुम्हाला भारतीय जेवायचं असेल तर इथे खूप रेस्तरॉं आहेत. जाताना जेवून मग वर जा

                                                                                भाग दुसरा पुढील मंगळवारी

हार्डर कुल्म (फोटो सौजन्य गूगल इमेज)