Monday 28 October 2013

SPAIN GIRONA II

स्पेन जिरोना II

तर हे ओल्ड टाऊन! या पाश्चिमात्य लोकांनी या जुन्या भागांचं महत्व ओळखलं आणि जपलं आहे. आपली संस्कृती पुरातन म्हणून जुन्या दिल्लीत परदेशी लोक जुनं शहर बघायला येतात. पण आपण याबाबत करंटे! कितीसं जुनं शहर चांगल्या आणि मूळ अवस्थेत राहिलं आहे? आपण सगळच मुळी नवीन करण्याच्या ध्यासाने (?) झपाटून व्यक्तिमत्वहीन शहरं वसवत निघालो आहोत!

इथले हे रस्ते सुंदर आणि फरसबंदी. पेव्हर ब्लॉक्सच पण जुने आणि भक्कम. जागोजागी उखडलेले नव्हेत. एकच छोटी गाडी जेमतेम जाऊ शकेल असा रस्ता. त्याच्या दोन्ही बाजूंनी दुकानं. चालणारे पर्यटक, त्यांच्यासाठी पदपथ. पदपथ गाडीसाठीच्या रस्त्यापेक्षा एक दगड उंच. येणारी गाडी अगदी हळू येणार. हॉर्न हा वाजवण्याकरता नसतो ही त्यांची श्रद्धा. चालणारे बाजूला गेले की गाडी जाईल तोवर थांबायला काही हरकत नाही ही धारणा. अपरात्रीसुद्धा त्याच हळू वेगात गाड्या तेथून धावतात, बहुधा त्यांना मानवी जीवनाचं मूल्य माहीत असावं!




त्या छोट्या गल्ल्यांमध्येही पुरेसे मोठे असे चौमात्र आहेत. काही जे तुलनेने लहान ते वाहनांना बंद असतात. चौकाकिंवा फुटपाथवर हॉटेल्सच्या खुर्च्या मांडलेल्या. निवांत बसलेले अनेक लोक. तसही स्पेन हे सिएस्टासाठी ( वामकुक्षी/ दुपारची झोप) प्रसिद्ध. अजूनही ती प्रथा सुरूच आहे. त्यामुळेच संध्याकाळी तीननंतर हॉटेलंही सुस्तावलेली असतात. अर्थात रात्री साडे सात आठपर्यंत. पण तुम्हाला निवांतपणे बसून बियरचा आस्वाद घेत तापाज (Tapas) खाता येतात.

तापाज हा एक खास प्रकार. इथे तापाज बार असतात. स्पॅनिशमध्ये tapa याचा अर्थ cover. या प्रथेबद्दल खूप कहाण्या ऐकायला मिळतात. शेरीच्या ग्लासमधे वाळू जाऊ नये म्हणून कोणा राजाला त्यावर हॅम घालून दिलं, दुस-या कोणाला ग्लास ब्रेड स्लाइसने झाकून दिला. मग नुसता ब्रेड कसा द्यायचा तर त्यावर टोमॅटो काकडी किंवा कुठलातरी सॉस घालून सजवून द्यायचा. तुम्ही खा किंवा खाऊ नका पण ज्या त-हेने हे सारं सजवून आपल्या समोर ठेवतात ते बघणीय असते. वाइन, बियर किंवा इतर ड्रिन्कसच्या बरोबरचं खाणं असही त्याचं एक स्वरूप. कारण ड्रिंक्सबरोबर आपल्याकडे पापड वगैरे फुकट देण्याची जशी पद्धत आहे तसं इथेही काहीतरी तापाज देतात. तापाज म्हणजे आपल्याकडचे च्याव म्याव. काहीतरी फुटकळ खाणं. उकडलेला बटाटा त्यावर कसलातरी सॉस किंवा तळलेला म्हणण्यापेक्षा भाजलेला मासा आणि सॉस किंवा भाजलेलं मटण वगैरे. क्वांटिटी कमी असते कारण हे जेवण नव्हे. दुपारच्या जेवणानंतर रात्री ९ च्या पुढे ११ वाजेपर्यंत यांची जेवायची वेळ, म्हटल्यावर मधली गॅप भरून काढण्यासाठीचं हे खाणं. पण आपण जसा ऊसाचा रस अर्धा किंवा फुल घेतो तशी सोय असते. त्यामुळे या खाण्याचं जेवणात रुपांतर होऊ शकतं.

पाश्चिमात्य देशात अनेकदा पद्धती वेगळ्या असल्याने गमतीदार प्रसंग घडतात. आम्ही तिघजण दुपारच्या वेळी एका हॉटेलमधे गेलो होतो. तशी प्रत्येक डिशची क्वांटिटी बघता प्रत्येकी एक डिश जास्त आणि कंटाळवाणी होते. म्हणून आम्ही तीन वेगळ्या डिश (पदार्थ) मागवल्या. कोणता पदार्थ कोणत्या प्रकारच्या डिशमध्ये द्यायचा याचेही संकेत असतात. त्याप्रमाणे तीन वेगळ्या प्रकारच्या डिशमध्ये पदार्थ आले. आपल्या पद्धतीप्रमाणे आम्ही तिघांनी ते तीन पदार्थ वाटून घेतले. एका वेटरने आमच्या मागून येऊन राऊंड घेतला. तो गेला. एक वेटर मुलगी येऊन आमच्याकडे बघत बघत गेली. आमच्या लक्षात येतील अशा पद्धतीने सगळ्यांच्या राऊंडस आणि खाणाखुणा सुरू होत्या. असेल काहीतरी म्हणून आम्ही त्यावेळी दुर्लक्ष केलं.

तापाज खायला आम्ही येऊन बसलो तेव्हा आम्ही नवीन आहोत हे बघून त्या मुलीने ( वेटरचे काम करणा-या) आम्हाला सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या डिश ऑर्डर करू शकता आणि मेन कोर्ससारखं याचं नसतं. या डिश तुम्ही शेअर करू शकता! दुपारच्या वेळी सगळे वेटर्स आमच्या भोवती का फिरत होते त्याचा शोध हा असा लागला.

स्पॅनिश लोकांचा जास्त करून भर असतो तो मटण (कार्नेवर). बाकी सामिष म्हणजे मासे वगैरे असतातच पण मुख्यतः मटण. त्यामुळे निरामिष खाणा-यांना तसा इटालिअन खाण्यात असतो तितका चॉइस नाही. इथला एक दोन प्रकारचा पायेआ ( Paella ) म्हणजे आपल्याकडे भाज्या वगैरे घालून केलेला पुलाव. याचेही खूप प्रकार असल्याने आपल्याला नक्की कोणता प्रकार हवा हे नीट बघून त्यांना सांगावे लागते. पण इथे एक बरं आहे त्यांना जरी इंग्रजी आलं नाही तरी मेनू कार्डवर चित्र आणि त्याखाली त्याचं इंग्रजीतून नाव व वापरलेले पदार्थ (Ingredients) देण्याची पद्धत आहे. त्यामुळे तसा गोंधळ होण्याचा संभव अजिबात नाही. चित्रावर बोट ठेवलं की झालं. तापाज मध्येही त्यांची पताता ग्रासिअस किंवा पताता ब्रावाज नावाची डिश छान आहे. बटाट्याच्या फोडी ओवनमधून काढून आपल्या समोर येतात. त्या वेगवेगळे सॉस आणि मीठ मीरपूड घालून खायच्या. छान लागतात.



तर अशी ही अन्नछत्र सुरू असतात चौकाचौकातून. रस्त्यावर उन्हात बसून सुशेगाद खायचं. तुम्हाला खाण्याची पिण्याची मजा लुटायची असेल तर उत्तम संधी. एरवी आतली टेबलं रिकामी असतातच. पण उन्हाचं अप्रूप असणारे (म्हणजे खरतर सगळेच) पर्यटक बाहेरच बसलेले आढळतात. हे पदार्थ शिजवले मात्र रस्त्यावर जात नाहीत. हा युरो देश आहे. पण तसा गरीब म्हणायचा. विशेषतः क्रायसिसनंतर. चलती असलेला बांधकाम व्यवसाय ठप्प आणि इतर म्हणावा असा निर्मिती उद्योग नसल्याने बेकारी खूप आहे. पर्यटन उद्योग त्यामुळे महत्वाचा. परंतु यातही बाहेरची लोकं, विशेषतः चीन फिलिपाइन्स हे पूर्वेकडचे देश, त्यातले अनेकजण वेटरसारखे जॉब्स करतात. ही मंडळी हसतमुख आणि कमी पैशात कामं करणारी, इंग्रजी बोलणारी त्यामुळे त्यांना प्राधान्यही मिळत असावे असं त्यांचा सर्वत्र संचार बघून वाटत रहातं



                                                           पुढच्या भागात पो(र)बाऊ (Port Bau)

Monday 21 October 2013

SPAIN GIRONA

भारतात पकडलेल्या मरीन्सना ख्रिसमसकरता इटलीला जाण्याची परवानगी भारताने दिली ती खटल्याकरता पुनः भारतात परत पाठवण्याच्या अटीवर. इटलीने त्यांना परत पाठवण्यास नकार दिल्यावर वातावरण गढूळ झाले होते. स्वाभाविकपणे आमच्या इटलीला जायच्या निर्णयावर त्याचा परिणाम झाला आणि आम्ही इटलीला न जाता ऑस्ट्रियाला गेलो. परतीच्या प्रवासात जेव्हा गाडी इटलीत शिरून आली तेव्हा तेवढीच संधी घेऊन श्रीशैल म्हणाला होता नाही म्हटलं तरी इटलीला पाय लागलेच तुमचे! यावेळी इटली नाही तर नाही आपण स्पेनला तरी जाऊन येऊ या. श्रीशैलचं खरतर स्पेन आणि इटली या तुलनेने सौम्य हवामान आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या आणि आपल्यासारखी साळढाळ माणसं असलेल्या देशांवरचं प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं ही वस्तुस्थिती! तर ठीक आहे चार दिवस बार्सिलोना जिरोनाला जायचं आपण असं म्हणून त्याने हा प्रश्न (?) सोडवला. रजा नसल्याकारणाने फक्त वीकएंडपुरता म्हणजे शनिवार रविवारी जिरोनाला तो आमच्या बरोबर असणार होता. नंतर आम्ही दोघंच पुढे बार्सिलोनाला जाऊन बुधवारी परतणार होतो.

जाता येता जरी विमान असलं तरी जातेवेळी  आइंडहोवन नव्हे तर मास्ट्रिक्टहून फ्लाइट होती त्यामुळे ट्रेनने मास्ट्रिक्ट नंतर बसने एअरपोर्ट तिथून जिरोना एअरपोर्ट नंतर जिरोना गाव असा थोडासा द्राविडी प्राणायामच होता. आम्ही नेहेमीप्रमाणे श्रीशैलबरोबर  जायचे म्हटल्यावर at ease होतो. पासपोर्ट वरच्या खिशात सहज मिळावा म्हणून (लोकांना!) सहज दिसेल असा ठेवला होता. त्याकडे लक्ष गेल्यावर श्रीशैल लगेच म्हणाला स्पेनला चाललो आहोत, ते हॉलंड नाही. कधी खिशातून गेला ते कळणारसुद्धा नाही तुम्हाला. तेव्हा काळजी घ्या व्यवस्थित. मुकाट्याने मी पासपोर्ट आत ठेवून मोकळा झालो.

अपार्टमेंटच्या मालकिणीने इ मेलमध्ये म्हटल्याप्रमाणे बसमधून जिरोना स्टेशनला उतरल्यानंतर follow the railway line till River या सूचनेप्रमाणे चालायला सुरवात केली. नदीपर्यंतचा रस्ता म्हणजे कोणतही शहर असावं तसा. आखीव रेखीव आणि उंच इमारती असलेलं शहर . यापलीकडे काही त्याला व्यक्तिमत्व आहे अशी शंका घ्यायलाही जागा नव्हती.



नदी ओलांडली मात्र ! समोर आलं ते एक भव्य चर्च आणि त्याच्या उजवीकडून जाणारी अरुंद निमुळती गल्ली. आपल्याकडे काळबादेवीला किंवा ठाकुरद्वारला गेल्यानंतर जशा अगदी लागून एकमेकासमोर उभ्या असलेल्या इमारती आहेत तशाच या इमारती. कमतरता फक्त अस्वच्छतेची.या लोकांचं प्रेम असतं त्यांच्या शहरावर, त्या ऊर्मीतून हे सार साध्य होत असावं. लागून घरं असली तरी ड्रेनेजची व्यवस्था, पाणी, गॅस (पाइप गॅस) इ सुविधा नेहेमीप्रमाणेच.. म्हणजे आपण ज्या गोष्टींचा constraints म्हणून आपल्याकडे उल्लेख करतो ते सगळे constraints इथेही आहेत. अधिक आहे ती त्यांची वृत्ती आणि सामाजिक जाणीव. आपल्याप्रमाणे तिस-या सीटवरच्या माणसाला आत ढकलून चौथी सीट बळकावण्याच्या पेक्षा थोडी कळ सोसणं आणि अधिक सुविधा निर्माण करणं हा त्यांचा चॉइस आहे. हात मारण्याच्या आपल्या वृत्तीपायी आपण काय आणि किती गमावतो ते इथे जाणवतं. संस्कार संस्कार म्हणून जप करताना संस्कार कशाला म्हणतात याचाच विसर आपल्याला पडतो आहे असं खूप वेळा वाटतं.
.



त्या बोळकंडीत शिरून नंबर बघत होतो. दुस-याच बिल्डिंगमधलं एक अपार्टमेंट दोन दिवसांसाठी आम्ही घेतलं होतं. घराचा नंबर बघितला आणि श्रीशैल त्या बाईला फोन लावण्याकरता फोन खिशातून काढत होता तोपर्यंत इमारतीचा दरवाजा उघडून एक बाई हसत होला (स्पॅनिश हॅलो) करत पुढे आली. तिच्या पाठोपाठ पहिल्या मजल्यावर गेलो. अपार्टमेंट सुसज्ज होतं. आम्ही स्वयंपाक घराचा उपयोग करणार नव्हतो कारण तेवढा वेळ नव्हता. असं जरी असलं तरी स्वयंपाकाकरता लागणा-या सगळ्या गोष्टी म्हणजे चहा, साखर, तेल, मीठ इ होतं तशीच जरुरीपुरती भांडी आणि क्रोकरी सगळं होतं. ओवन होता तसा मायक्रोवेव्ह होता. टीवी होता वगैरे वगैरे.

तिने चाव्या आमच्या ताब्यात दिल्या आणि कधी जाणार ती वेळ कळवा म्हणाली. आमचं सोमवारी सकाळी निघायचं पक्कं होतं म्हणून सकाळी नवाची वेळ तिला सांगितली. जरा अवघडून ती म्हणाली मी नऊ वाजता सकाळी नाही येऊ शकणार. पण माझी सासू येईल. तिच्याकडे तुम्ही चाव्या द्या. काही लागलं तर असावा म्हणून तिचा संपर्क नंबर देउन ती निघून गेली.

या अशा देखण्या रस्त्यांच्या आम्ही प्रेमात पडलो यात नवल ते काय?



Monday 14 October 2013

DUTCH BIKING (PART IV)

भर रस्त्यावर सायकल चालवणारी ही इतकी छोटी मुलं ही आमची प्रेरणा!


आम्ही जात होतो तो रस्ता विचित्र होता. सायकलींकरता वेगळा रस्ता नाही. मधेच शोल्डरसारखं खडबडीत आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेला रस्ता अरुंद. इथे नेहेमी धावणारे आणि सायकलवाले दिसत तरी टोकाला असलेल्या क्लब्जमध्ये किंवा स्टेडियममध्ये जाणा-या गाड्या तुरळकपणे का होइना दिसत असत. त्या गाड्या या धावणा-या सायकलस्वारांना अडचण नको म्हणून शोल्डरला(खडबडित पट्ट्याला) मधे ठेवून दोन बाजूंना दोन चाकं अशा चालवल्या जात म्हणजे दोन्ही बाजूचा सपाट रस्ता सायकलकरता मोकळा रहात असे. पण दोन्ही दिशांनी एकाचवेळी गाड्या असतील तर नाइलाजाने काही वेळ एका बाजूने चालवत. गाडी समोरून दिसली की त्यामुळेच घाबरायला होत असे. पण या लोकांचं वैशिष्ट्य हे की त्यांच्याकडे नियमांना महत्व आहे आणि ते पाळण्याची शिकवण अंगी बाणलेली आहे. प्राधान्यक्रम अतिशय स्पष्ट! प्रथम पायी चालणारा. नंतर सायकल नंतर मग गाडी! सायकलवाल्याने समोरून येणा-या धावणा-याला वाट द्यायची, म्हणजे बाजूला व्हायचे तसेच गाडीवाल्याने रस्ता अरूंद असल्या ठिकाणी शांतपणे मागून गाडी आणायची. सायकल ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न नाही किंवा हॉर्न देणं नाही. हॉर्न देणं हा अपमान समजला जातो आणि आपल्यासारखी दुस-याचा पदोपदी अपमान करण्याची यांना शिकवण नाही.

आमचं सायकल चालवणं सुकर झालं ते या सगळ्या गोष्टींमुळे. आम्हाला माहीत होतं, मनात खात्री होती की नियम समजून घेतले आणि पाळले तर प्रश्न नाही. समोरून येणा-या गाडीत बसलेल्याला आपल्याला घाबरवून आनंद लुटण्याची कला अवगत नाही. सिग्नलला तो हिरवा होईपर्यंत थांबायचं हे प्रत्येकाचं कर्तव्य. त्यामुळे आपण हिरवा दिवा बघून गेलो तर धोका नाही. आणि सिग्नल लाल असताना रस्त्यावर एकही गाडी नाही म्हणून आपण सिग्नल तोडून रेटून पुढे जाण्याची यांची पद्धत नाही. अगदी मध्य रात्रीसुद्धा हे लोक सिग्नलला गाडी थांबवून सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत शांतपणे उभे असतात. आमच्या सायकल चालवण्याचं श्रेय त्यामुळे डच लोकांना आहे.

आम्ही आता नेम केला की सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडावेळ सायकल घेऊन बाहेर पडायचं. रोज नवीन रस्ता. ट्रॅफिक आहे किंवा नाही हे पहायचं नाही. पण शक्यतो शांत वेळ निवडायची. म्हणजे साधारण दुपारी ११ आणि ४. तसा आमच्या घराजवळचा रस्ता शांत. पण एकदा असं झालं सायकल रस्त्यावर आणली आणि दोन्ही बाजूंनी मोठ्या गाड्या. काहीच कळेना. सायकल सरळ हातात धरून पुढे गेलो. सिग्नलपर्यंत जाइस्तोवर बस आणि ट्रेलरही या मांदियाळीत सामील झालेले बघितले तेव्हा काहीतरी गडबड आहे असं वाटलं. कसलीतरी मोजणी सुरू होती आणि त्याकरता तो मोठा ऑल्स्टरवेग बंद करून आमच्या इथल्या गल्ल्यांमधून वाहने काढली होती. असे प्रसंग अर्थात कमी आले. या आठवड्यात एक मात्र झालं की समोरून येणारी गाडी किंवा मागून वेगात येऊन पुढे जाणारा डच यांचे काही वाटेनासे झाले. ते त्यांच्या मार्गाने जातील आपण कशाला काही टेन्शन घ्या.

नंतरच्या शनिवारी रविवारी उन्हाचे दिवस होते. पुनः श्रीशैलने उत्साहात विचारले, जायचे का बाहेर? आम्ही यावेळी conditional होकार दिला. म्हटलं जाऊ या पण जरा दूरवर. तो चकितच झाला. आम्ही वरून जाणारा हायवे ओलांडून पलीकडे गेलो तर तिथे रस्त्याच्या कडेला नंबर आणि बाण होते. हे बाइकपाथ आणि चालणा-यांसाठी ट्रेकच्या खुणा. शहराच्या सभोवती छान जंगल आहे. जवळच्या गावांमधून शेतामधून जात हे रस्ते तुम्हाला वेगळ्या बाजूने शहरापर्यंत आणून सोडतात. रस्त्यावरील खुणांना समोर ठेवत गेलं तर चुकण्याचा प्रश्न नाही.


दोन्ही बाजूंना शेतं, गवताचे भारे, गुरं, मधून जाणारा रस्ता आणि सायकलवरचे आम्ही


या रस्त्यांवर काय नाही? हे शहर वसवलं ते पाच गावांना सभोवार ठेवून. ती गावं अजूही गावच आहेत. शेतं, गुरं, गवताचे भारे, शेणाचा वास, सगळी गावाकडची लक्षणं असली तरी मागासपणा नाही. घरं व्यवस्थित आणि सुखवस्तू अशी. रस्तेही तसेच. या सगळ्यापेक्षा कौतुकाची बाब म्हणजे कुठेही सुरक्षेचा प्रश्न नाही. स्त्री पुरू, मुलं एकेकटी सुद्धा दिसत या जंगलवाटांवर. सायकलवरून जाताना, धावताना! हो, इथे व्यायामाचं महत्व इतकं आहे की वयस्कर माणसेही धावताना दिसतात. तर आम्ही साधारण ५-६ कि.मी. चा फेरफटका मारून परतलो. परत येताना झालं असं की सिग्नलपाशी जाईपर्यंत सायकलकरता असलेला सिग्नल नेमका हिरवा होत असे. आम्ही दोघं त्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट करून सिग्नल पार करतो आहोत हे बघून आमच्या गुरूला मग खात्री पटली असावी कारण निदान आता "बरी चालवता" असं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं.

काहीतरी नवीन करायच्या आमच्या प्रयत्नात हॉलंडमध्ये हॉलंडवासीयांप्रमाणे रहाण्याच्या आमच्या प्रयत्नाने आम्हाला खूप बळ दिलं. एरवी वेळ कसा घालवायचा याची आम्ही जरी तक्रार केली नसती तरी कुठे तरी ते मनात खटकत राहिलं असतं हे निश्चित. आता मात्र आम्ही स्वतंत्र होतो.

                                                               समाप्त


ही समाप्ती फक्त  डच बायकिंग या लेखमालेपुरती. पुढच्या मंगळवारी आपण भेटू या स्पेनमधील जिरोना व बार्सिलोना या शहरात.  

Monday 7 October 2013

DUTCH BIKING (PART III)





सायकली घरी आल्या तो शनिवार होता. श्रीशैलच्या anxiety चा परिणाम उलट होत होता. त्याची काळजी आम्हाला कळत होती आणि तो वैतागायला नको म्हणून आम्ही गप्प होतो.

दुसरा दिवस उजाडला. ऊन होतं. न्हाचं या लोकांचं अप्रूप आता श्रीशैलमध्येही आलं होतं. सततच्या ढगाळ हवामानानंतर येणारा सूर्य किती अप्रूपाचा असतो ते मुंबईत राहून कळणार नाही हे आम्हालाही थोड्याच दिवसात कळणार होतं.चला लवकर आटोपून बाहेर जाऊ या. छान ऊन आहे तोपर्यंत सायकल हाणून येऊ. "आटोपणे" म्हणजे आंघोळ हा आमचा concept आता आम्ही बाजूला ठेवला होता. आंघोळ ही सुट्टीच्या दिवशी ऐच्छिक म्हणजे न करण्याची गोष्ट असते हे आम्हाला एव्हाना ठाऊक झालं होतं. खाऊन घेतलं आणि निघालो.

एखाद्या सणासारखी माणसं घराबाहेर पडलेली होती. म्हणजे सजून धजून नव्हे, फक्त संख्येने सणासारखी. इथे ऊन पडलं की कपडे फेडायचे, म्हणजे स्वतःचे, हे सर्वमान्य. हाफ पॅन्ट आणि टी शर्टमध्ये लगेच हे लोक बाहेर पडतात. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळे. त्यांना स्वेटरशिवायचे असे दिवसही फार अनुभवता येत नाहीत हे खरच. तर रस्त्यावर गर्दी होती. यातून सायकल काढायची या कल्पनेने पोटात गोळा आला होता. पण बोलायची सोय नव्हती.

"इथून निघून आपण सिग्नलपर्यंत गेलो की तिथे उतरायचं. स्टॉप साइनच्या आधी.”

(बोलण्यातही अधोरेखित वाक्य असते हे आम्हाला इथे आल्यानंतर कळलेलं व्याकरण!)

"ब्रेक लावण्यापेक्षा आधीच जरा स्पीड कमी करून सायकल सावकाश घेतलीस तर तुलाच बरं पडेल.”

या सूचना आईकरता. त्या कून आम्ही सायकलवर स्वार झालो. मला तिच्यापेक्षा कणभर, कणभरच, जास्त चांगली(?) येते चालवता हे काल जाहीर झालं होतं त्यामुळे मी आधी, नंतर उत्तरा आणि शेवटी  पहा-याला श्रीशैल अशी आमची वरात बाहेर पडली. सुदैवाने एकही गाडी आम्हाला आडवी आली नाही त्यामुळे निर्विघ्नपणे सिग्नलपाशी उतरलो. वाट बघून मग माणूस हिरवा झाल्यावर सायकली हातात धरून पलीकडे गेलो.

"हा ऑल्स्टरवेग. मोठा रस्ता आहे पण इथे बाइकपाथ आहे त्यामुळे बसचं अवधान राखलत तर चालवायला सोपं. फक्त एक करा की सायकल रस्त्याच्या उजव्या कडेनेच चालवा. (वाहतूक आपल्या उलट दिशेने असते) डच लोकं खूप जोरात चालवतात. पुढे जाताना तुम्ही त्यांच्या मधे आला नाहीत तर त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही.”

हे सगळं कायला ठीक. पण तो डच माणूस जवळून जाण्यापूर्वी सूचना म्हणून एक हलकीशी टिंग अशी बेल वाजवे आणि मला दचकायला होत असे. तसेही आमच्या लहान रस्त्यांवर समोरून किंवा बाजूने गाडी आली की माझा थरथराट असे. फक्त माझं वरचं रॅन्किंग सोडायचं नाही म्हणून मी बोलत नव्हतो इतकच. तर आम्ही त्या रस्त्याच्या शेवटी पोहोचलो आणि पुनः थांबायची सूचना!

"आता पुनः रस्ता ओलांडायचा आणि पलीकडून परतायचं. पहिल्याच दिवशी उगीच जास्त नको!”

जास्त आणि कमी हाच ठरवणार मग प्रश्न कुठे येतो आमचा? हे अर्थातच मनातल्या मनात. मुलं मोठी झाली म्हणजे मुलांना घाबरून रहायला लागतं, असं आई नेहेमी म्हणायची त्याचा प्रत्यय आला.
आम्ही रस्ता ओलांडायला उभे होतो तेव्हा मी म्हटलं,
"हा रस्ता नंतर आपल्या रुस्टेनलानला जाऊन मिळतो. मस्त झाडं आहेत दोन्ही बाजूंनी.
श्रीशैल माझ्या तोंडाकडे बघतच राहिला. तुम्हाला काय माहीत? म्हटलं अरे आम्ही फिरायला बाहेर पडलो की या हायवे पर्यंत येतो रोज नवीन रस्त्याने आणि मग परततो. तेव्हा रस्ते चांगले माहीत झाले आहेत गेल्या आठवड्यात.




बर! म्हणून त्याने सोडून दिलं.
घराचा गुण! आमच्या घरात चांगलं म्हणायची पद्धत नाही! (हे अर्थातच उत्तराचं )

रस्ता ओलांडल्यावरचा रस्ता हा वाहने नसलेला. त्यामुळे टेन्शन फ्री होता. पुढच्या वळणावर मात्र डावीकडे वळताना दोन्ही बाजूंनी गाड्या बघण्य़ाची आवश्यकता होती. मी हाताने सिग्नल वगैरे न देताच डावीकडे वळलो त्याबरोबर सूचना झाली.

"लहान मुलं बघा. आई वडिलांबरोबर असतानाही वळण्यापूर्वी हात दाखवतात. तुम्ही सिग्नल न देता वळलात आणि मागून जोरात येणारा कोणी आपटला तर काय होईल याचा विचार करा.”

हे मात्र खरं होतं. आज तो बरोबर आहे, तो सगळी काळजी घेत होता. मागे कोणी नाही याची खात्री करून घेत होता म्हणून प्रश्न नव्हता. उद्यापासून सवय हवी हाताने सिग्नल दाखवून मगच वळण्याची पण त्याआधी सवय करायला हवी एक हात सोडून सायकल चालवण्याची.

फोटोंविषयी

  1. ज्या रस्त्यांवर वेगळे बाइकपाथ असतात ते गेरूच्या रंगात रंगवलेले असतात.  काही ठिकाणी रस्त्याच्या सुरवातीस असलेली पाटी सायकलचा मार्ग फक्त जाण्यासाठी किंवा जाण्या तसेच येण्यासाठीसुद्धा आहे हे बाणाने दाखवते.
  2. झाडांचे आच्छादन असलेले रस्ते, सायकलकरता सायकलचे चिन्ह असलेला सिग्नल आणि वाहतूक नसताही सिग्नलला थांबलेला सायकलस्वार.




                                                    उर्वरित भाग पुढील लेखात