Monday, 30 March 2015

SWITZERLAND GLACIER EXPRESS


स्वित्झर्लंड ग्लेशिअर एक्सप्रेस

फुटबॉलच्या वर्ल्ड कप फायनलमुळे रात्री झोपायला उशीर झाला तरी सकाळी आरामात उठणे शक्य नव्हते. सकाळी जमेल तितका हेवी ब्रेकफास्ट करून ९ वाजता सेंट मॉरित्झहून सुटणारी ग्लेशिअर एक्सप्रेस पकडायची होती. सेलेरिनाला ती थांबते, नाही अशी दोन्ही मते होती. रेकॉर्डप्रमाणे हो पण तिथल्या लोकांच्या मते थोडं लवकर निघून सेंट मॉरित्झ गाठणे श्रेयस्कर. आम्ही safe रहायचं ठरवलं आणि आठ वाजता बाहेर पडलो. रात्री भरपूर पाऊस झाला होता. तसेही रात्री आम्ही जेवून परत येताना भिजूनच आलो होतो. ते सत्र रात्रभर तसेच चालू असणार असं बाहेरचं वातावरण सांगत होतं. सेलेरिना स्टाझला आलो तेव्हा स्टेशन सुनसानच होतं. मशीनवर तिकिटं काढण्याकरता आमच्याकडे सुट्टी नाणी नव्हती. पण कार्ड चालणार होते.


सेलेरिना स्टाझ स्टेशन परिसर. लाकडी कुंपणाचे दोन प्रकार. निसर्गाशी तादात्म्य


काल संध्याकाळी तसेही आम्ही त्या झोपाळू सेंट मॉरित्झला भेट दिली होतीच. त्यामुळे नव्याने काही बघण्याचा उत्साह नव्हता. पण प्रत्येक दिवस नवा उजाडतो. आज आम्ही सेंट मॉरित्झला पोहोचेपर्यंत सूर्य वर आला होता. डोंगराच्या कुशीत विसावलेला तो विस्तार असलेला तलाव छान झळाळत होता. वर चढावावरचं गावही उगीचच मग उत्फुल्ल वगैरे वाटून गेलं. मनाचे खेळ सगळे! वातावरणाच्या फरकाने आपल्या दृष्टीत किती फरक पडू शकतो त्याचं प्रत्यंतर येत होतं. आम्ही तसे वेळेआधी पोहोचलो होतो त्यामुळे या सौंदर्याकडे निवांतपणे बघायला वेळ मिळाला.

ग्लेशिअर एक्सप्रेसविषयी खूप वाचलं होतं. त्या वाचनातून आमच्यापर्यंत त्याचं ग्लॅमर पुरेपूर पोहोचलं होतं. या आधीची आमची तिरानो ते सेंट मॉरित्झची र्‍हेटिशं रेल्वे इतकी सुंदर होती तर ही आणखी किती छान असेल याची कल्पना करवत नव्हती. सेँट मॉरित्झ ते झरमॅट असा प्रवास करणारी ही गाडी. या गाडीला म्हणायचं एक्सप्रेस! पण तिची जाहिरातच मुळी जगातली सर्वात हळू जाणारी एक्सप्रेस म्हणून केली जाते! हा तिचा यूएसपी आहे! तिच्याविषयी लिहिलेलं मुळातून वाचायला हवं असं वाटतं म्हणून ते इथे देत आहे.

"The world’s slowest express train carves a cross-section through multifaceted Switzerland and offers pure travelling pleasure. Meals prepared by the chef are served in the Glacier Express restaurant car. The Railbar serves coffee, drinks and snacks in your seat.

This railway classic is the most scenic route between sightseeing attractions in the Graubunden holiday region, the high Engadin valley with St. Moritz, Davos, Europe’s highest-altitude town, sunny Canton Valais with its glacier world and the enchanting southern regions. The comfortable train passes through an area of outstanding natural beauty with fragrant, primeval forests, peaceful Alpine pastures, rushing mountain streams and spectacular valleys with a wealth of centuries-old customs.

हे जसेच्या तसे देण्यात माझा उद्देश म्हणजे त्यांची कोणत्याही गोष्टीची जाहिरात करण्याची पद्धत. “Slowest Express” या गोष्टीचं भांडवल होऊ शकतं? आपण बार्शी लाइट म्हणून ज्या गाडीला हिणवत असू तीसुद्धा हेरिटेजच्या नावाखाली यांनी खपवली असती!

गाडी देखणीच होती. नावाला शोभेलसा डब्यांचा स्नो व्हाइट रंग! त्याला तसाच छान लाल पट्टा. गाडीचं इंजिन त्या देशाच्या झेंड्याच्या लाल रंगाचं आणि त्याच रंगाचा लाल डबा onboard kitchen चा! सगळं मुळी राजेशाही! गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खिडकीला असलेल्या पूर्ण लांबीच्या काचा आणि पॅनोरामिक व्ह्यू!. म्हणजे छतापर्यंत जाऊन वरच्या बाजूला थोडी आतल्या बाजूला (अंतर्वक्र) आलेली काच, ज्यामुळे आकाशही नजरेत यावं! (याचा प्रत्यक्षात काही फायदा होतो असं मला तरी जाणवलं नाही हा भाग अलाहिदा!) एकूण दिमाखदार रंगरूप आणि स्विस नोकझोक असं हे तिचं स्वरूप! न आवडण्यासारखं काहीच नव्हतं त्यात!

 खिडकीच्या अंतर्वक्र काचा


बसल्यानंतर नेहेमीप्रमाणे सीटस, इंटिरिअर वगैरेचं कौतुक वाटून झालं आणि मग तो सीटजवळचा मॅप बघितला. सेलेरिना स्टाझला जाताना गाडीत असलेला मॅप सीटजवळच्या कॉफी टेबलसारख्या छोट्या फ़ळीवर मानचित्र असावं तसा होता. इथे एक जास्तीची गोष्ट म्हणजे कानात घालायला प्लग्ज होते. दिल्या जाणार्‍या माहितीपूर्वी त्याची सूचना समोरच्या स्क्रीनवर येत होती. इथे बोलल्या जाणार्‍या फ्रेंच, जर्मन, इटालिअन बरोबर इंग्रजीमधूनही बाहेरील दृष्याची माहिती दिली जाणार होती.  गाडी, तिचा मार्ग याविषयी अगदी संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या परिपत्रकात दिली आहे आणि ते परिपत्रक प्रत्येक सीटवर ठेवलेलेही होते. एकूणच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये याची पूर्ण काळजी त्यांनी घेतलेली दिसत होती.

मात्र एकूण भाड्याचा विचार करता इतका पैसा खर्च करावा का याचा विचार निश्चित करावा असं आता वाटतं. आम्ही तिरानोहून सेंट मॉरित्झला आलो त्या गाडीला असलेल्या उघडणार्‍या खिडक्यांमधून दिसणारा निसर्ग या वातानुकूलित गाडीच्या खिडक्यांमधून गाळून आमच्यापर्यंत पोहोचणार होता. त्यामुळे frgrance वगैरे शब्द तसे अर्थहीनच. काचांच्या अडथळ्यामुळे फोटो काढले तरी तेही आमच्या प्रतिबिंबासह. फोटो काढण्यातला सुरवातीचा उत्साह मग एकदमच मावळून गेला.

गाडीत असलेल्या स्पीकर्सवरून माहिती मिळत होती. पण सतत डावीकडे उजवीकडे बघून नंतर नंतर कित्येकांनी त्या घोषणांचा दिवा लागल्यावर प्लग्ज कानात घालणंही बंद केलं. सतत आपल्याला कोणीतरी सूचना देऊन नाचवतं आहे हे कोणाला आवडणार? तसाही हा प्रवास खूप मोठा आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत. एका ठराविक मर्यादेनंतर हे सगळं अति होतं हे खरच.

गाडी सुटण्यापूर्वीच श्रीशैलने पोटापाण्याची व्यवस्था करून ठेवली होती तरीही उत्सुकता म्हणून मेन्यूकार्ड बघितलं. त्यातले डिशमागे कमीतकमी२७/२८ स्विसफ्रॅन्क असलेले दर घेरी आणणारे होते. पण तरीही त्यातल्या Authentic Indian food ची अक्षर बघून आमचा जीव आनंदाने निवला. भारतीय खाद्यसंस्कृतीला जगातल्या पर्यटनव्यवसायातल्या अग्रगण्य देशाने दिलेली ती दाद बघून मन अगदी भरून आलं! पण ते सुख अगदी क्षणिक ठरलं. तो ऑथेन्टिक मेन्यू वाचल्यानंतर आमची शुद्धच हरपली! सुरवातीचा पदार्थ होता बीफ मद्रास! (Tender pieces of beef in medium hot coconut onion sauce) मद्रासमधल्या त्या सोवळ्या वातावरणातल्या त्या अर्वाच्य (उच्चारू नये असा) अब्रह्मण्यमच नव्हे तर अभारतीय पदार्थाला स्थान देणार्‍या त्या मेन्यू कार्ड बनवणा-या "जाणकाराला" भर चौकात फटके मारावेत असं वाटून गेलं (त्यावेळी बीजेपीचं राज्य नसूनही माझी ही प्रतिक्रिया! किती गोष्टी आपल्यात भिनलेल्या असतात त्याचा हा प्रत्यय!).

प्रवास तसा निवांत म्हणावा असा. सुरवातीला चुरपर्यंत असणारा उतार म्हणजे 1775 मीटरपासून पासून सुरवात करून आम्ही चुरला साधारण 600 मीटरपर्यँत खाली आलो. तिथून पुनः वर जात नंतर डिझेन्टिस करून Oberalp pass ला 2033 मीटरची उंची गाठली आणि उताराला लागत ब्रिगला 670 मीटरला येऊन झरमॅट्ला 1604 मीटरवर स्थिरावलो . हा सगळा मार्ग युनेस्कोने हेरिटेज मार्ग म्हणून जाहीर केला आहे आणि त्याची त्याच तर्‍हेने जपणूक होताना दिसत आहे. वर्षाचे 12 महिने अगदी हिमवर्षावातदेखील या गाड्या सुरू असतात.

या गाडीला सुरवातीला काही डबे आमच्या पूर्वीच्या गाडीसारख़े म्हणजे खिडक्यांच्या काचा उघडणारे होते. आमचं मध्यमवर्गीय मन लगेच श्रीशैलला सांगून मोकळं झालं, उगीच तुमचा हा खर्च असतो! त्याच मार्गाने या डब्यातून प्रवास करता आला असता! कमी तिकिटामुळे बचतही झाली असती ! ते डबे बहुधा स्थानिकांच्या सोयीसाठी असावेत. ते चुरला जाणारे होते. मधल्या एका स्टेशनवर ते आमच्यापासून वेगळे झाले! नंतर चौकशी केली तेव्हा मिळालेल्या माहितीप्रमाणे या गाडीनेच हा संपूर्ण प्रवास करायला हवा अस नाही. पण या हेरिटेज मार्गाची मजा घ्यायची तर ग्लेशियरला पर्याय नाही

सर्व प्रकारच्या उंच, सखल, उतरत्या, चढत्या, डोंगरातून, राना वनातून, घनदाट आणि विरळ अरण्यातून प्रवास करताना यावेळी गावांची फारशी सोबत नव्हती. विस्तीर्ण जलाशय हे तर आल्प्समधील वैशिष्ट्यच त्यामुळे त्यांचं अस्तित्व जागोजागी भेटत होतं. भेटत होतं म्हणण्यापेक्षा दिसत होतं. समुद्रकिनारी उत्कृष्ट बंगल्यात बसून वातानुकूलित खोलीतून रंगवलेल्या काचांमधून सूर्यास्ताचा आनंद घ्यायचा हे काही फारस रुचणारं नाही. समुद्राची गाज ऐकू आली नाही तर मग तो आपल्यापर्यंत पोहोचणार कसा? राणीच्या बागेत जाऊन वाघाला काय बघायचं? प्रत्ययकारी अनुभव नाही म्हणजे मग चित्र किंवा फारतर टीव्हीवर बघितल्यासारखं वाटणार!


तर असं स्विस विश्वरूपदर्शन झाल्यानंतर एक स्टेशन आलं आणि माणसांची झुंड्च्या झुंडं आत आली. ही संपूर्ण आरक्षित गाडी तर हे लोक कसे येऊ शकतात? झरमॅट हे कारफ्री झोन आहे. तेव्हा येणार्‍यांनी त्यांच्या गाड्यातून पाय उतार होणे आवश्यक. त्यांना इथे या झरमॅट आधीच्या टेश (Täsch) स्टेशन बाहेरील पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करून या गाडीत झरमॅटला जाण्याकरता प्रवेश मिळतो

                                                                            पुढील मंगळवारी झरमॅट


या प्रवासातल्या फोटोंविषयी माझी तक्रार असली आणि ती खरी असली तरीही काही फोटोंनी समाधानही दिलं त्यातले काही इथे देत आहे.
Monday, 16 March 2015

SWITZERLAND ST MORITZ (II)


स्वित्झर्लंड (सेंट मॉरित्झ(२)


या इथे बर्फाळ प्रदेशात अडचणींच्या डोंगरातून मार्ग काढून हे सगळेजण वर्षाचे १२ महिने वाहतूक कशी सुरू ठेवत असतील? त्याहीपलीकडे एकापेक्षा अधिक मार्ग कसे चालवत असतील? यांना फायदा तोट्याची गणितं नसतील काहे सगळं एका क्षणात मनात येऊन गेलेलं तसच विरून गेलं. या वेळी गाडीत असलेल्यापैकी बिगरपर्यटक कोण असतील? म्हणजे सगळा डोलारा पर्यटनाचा. उन्हाळ्यात आमच्यासारखे तर हिवाळ्यात स्कीइंगवाले. म्हणजे वर्षाचे बारा महिने यांना जगभरातून ओघ असल्यानंतर त्यांनी काळजी कशाला करायची?

निसर्गाशी तादात्म्य पावणे या शब्दाचा अर्थ इथे उमगतो. सगळी स्टेशन्स, छोटासा प्लॅटफॉर्म आहे नाही अशी. एकच लाइन त्यामुळे स्टेशनमध्ये मात्र दोन लाइन्स दिसतात. त्या तिथे फक्त आपल्याला रूळ ओलांडण्याची परवानगी असते. एरवी कोणी रेल्वे लाइनमधून चालले आहेत असं नजरेस तरी आलं नाही. स्टेशन म्हणजे एक छोटं, एक किंवा दुमजली घर लाकडाचं. त्याला काळा रंग की व्हार्निश काहीतरी दिलं आहे असं. त्या इमारतीला स्वतंत्रपणे व्यक्तिमत्व काहीच नाही कारण तस तिचं असणंही नामधारीच. बँक म्हणजे एटीएम म्हटलं, तर स्टेशन म्हणजे असला तर एक प्लॅटफॉर्म, एक तिकिटं मिळण्याचं स्वयंचलित यंत्र आणि पदार्थांसाठीचं व्हेन्डिंग मशीन! संपलं. टाइमटेबल दिसेल समोरच. बाकी माणूस औषधालाही नाही सापडणार. तशी त्याची आवश्यकताही नाही कारण सगळ्या यंत्रणा व्यवस्थित काम करत असतील याची पूर्ण खबरदारी घेतलेली असते.

मिरालागो स्टेशन. मलातर पळसदरी स्टेशनची                                          आठवण झाली!


तीन स्टेशनं तीन प्रकारची!


बरं यात सरकारी वगैरे काही नाही. ही आहे र्‍हेटिशन बाह्न या खासगी कंपनीची Rhätischen Bahn सेवा. त्यांच्या माहिती पत्रकातलं वर्णन* सांगतं की गाडीचं मुळी हेच वैशिष्ट्य आहे की तुम्हाला विशाल दृष्टी मिळेल. हो आपली दृष्टी विशाल होते किंवा नाही कोण जाणे पण आपल्याला वरपर्यंत असलेल्या स्वच्छ काचांच्या उभ्या खिडक्यांमुळे आणि त्यातून बाहेर डोकावून पाहता येण्याच्या सवलतीमुळे जो अवकाश दिसतो तो कितीतरी विशाल असतो. या सगळ्या प्रवासात एखाद्या झाडाची फांदी  लागेल किंवा खांब जवळ आहे अशी कोणतीच गोष्ट नाही.  खिडक्या उघडतात म्हणजे लोकं त्यांचा वापर करणारच आणि त्यांना निसर्गाचा आनंद उपभोगायचा पूर्ण हक्क आहे आणि त्या प्रवासात त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे ही जाणीव इथे दिसतेनिर्विघ्नपणे निसर्गाशी एकरूप होऊन डोळ्यात त्याचं जमेल तितकं रूप साठवत आणि कॅमेर्‍यात त्याला पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न करत हा प्रवास पुढे सरकतो.

*The train consists of panoramic cars only and has compulsory reservation. It runs over one of the most scenic railway routes in Europe, most part of it being “UNESCO World Culture Heritage“. It runs on the route Chur/Davos/St. Moritz – Pontresina - Tirano

तसही आपल्याकडे गाडीत सुरवातीला भांडणारे प्रवासी नंतर ओळख झाल्यावर छान प्रवासी मित्र होतात इथे आमच्या शेजारचं जपानी जोडपं तर पहिल्यापासूनच आमच्या प्रेमात होतं त्यामुळे कुठे त्यांच्या बाजूला काही छान दिसलं की ती अत्यानंदाने ओरडून स्वतः बाजूला होत आम्हाला तिथे बोलवत असे. ती दोघच होती त्या चार जणांच्या सीटसवर त्यामुळे समोरासमोर न बसता पटकन आमच्याकरता ती त्याच्याशेजारी बसून जागा करून देत असे. मग हा सिलसिला सुरूच राहिला. तसेही या सीटस अधून मधून बसण्याच्या उपयोगात येत होत्या. श्रीशैल तर सगळा वेळ उभाच होता. आमच्या बाजूला किंवा त्यांच्या बाजूला. एक गंमत तर सांगायलाच हवी. खूप काहीतरी बोलायची इच्छा असणार्‍या तिला इंग्रजीचा सराव नसावा, कदाचित त्यालासुद्धा. पण हातातल्या पॉकेट डिक्शनरीत बघून ती आमच्याबरोबरचा संवाद मोजके शब्द आणि अतिशय बोलका चेहरा यांच्या सहाय्याने पुढे नेत होती.

अतिशय सुंदर असं गाव दूरवर दिसत होतं. गाडी थोडी मोकळ्या ठिकाणी होती पण कॅमेर्‍यात त्याला खेचण्याच्या आत मधे आलेल्या झाडांमध्ये रस्ता बुडून गेला. असे हळहळणारे किती क्षण या प्रवासाने दिले असं म्हटलं तर ग्लास अर्धा रिकामा राहील! तरीसुद्धा हे देखील तितकच सत्य आहे की या चुकलेल्या(?) क्षणांवरून माझ्यात आणि श्रीशैलमध्ये वादावादी होत असे. निरर्थक वगैरे ठीक पण तो तो क्षण जगताना आपण किती त्यात बुडून जातो याचा नंतर त्या गोष्टींकडे बघताना प्रत्यय येतो. या प्रवासात वेळोवेळी जाणीव होत होती की खरा आनंद हा आपल्यामधेच(within) आहे. तो उपभोगायचा सोडून कॅमेरा, मोबाइल या साधनांमध्ये त्या दृष्यांना बंदिस्त करण्याच्या प्रयत्नात गुंतताना आपण कदाचित त्या खर्‍या आनंदाला तर मुकणार नाही ना याची जाणीव मनात असायला हवी.

प्रवासात किती गोष्टी नजरेत साठवल्या असतील त्याला सुमारच नाही. पण अतिशय लक्षणीय गोष्ट म्हणजे विस्तीर्ण जलाशय. त्यांचा पसारा किती आहे त्याचा विचार करणं आम्ही सोडूनच दिलं होतं. रेल्वे ट्रॅकला सोबत करत, प्रवाशांच्या डोळ्यांचं पारणं फेडत, कधी त्या घनदाट झाडांच्या मागे लपून, नंतर एकदम समोर येऊन दचकवत अशा किती रूपात आम्ही त्यांना भेटलो! रंगांची उधळण तर विचारून सोय नाही. त्याला सी ग्रीन म्हणावा, आकाशी म्हणावा? खरतर नावं न ठेवता फक्त चकित नजरेने त्याला शक्य तेवढं डोळ्यात साठवून ठेवावं असं सारखं वाटे. निस्तब्ध वातावरणातला तो ध्यानस्थ जलाशय आकाशाचं प्रतिबिंब त्यात दिसतं की आजूबाजूच्या झाडांचा हिरवाकंच रंग त्यात उतरतो ते न कळण्याइतकी भूल म्हणा नजरबंदी म्हणा होत असे. पाण्याचं दर्शन सर्वसाधारणपणे उत्साहवर्धक असतं पण इथे तोच तलाव कधी कधी खूप डिप्रेसिंग वाटला आहे.

                                      दोन टोकाचे मूड. निसर्गाचे विभ्रम! 


स्वित्झर्लंड स्वर्ग वगैरे असेलही पण तो स्वर्ग नक्कीच त्या माऊंट टिटलीस किंवा युंग फ्राऊवर नसावा. तो या अशा अस्पर्शित सौंदर्यात सापडेल. शिखर गाठण्यापेक्षा त्या शिखरापर्यंतचा प्रवास महत्वाचा म्हणतात. त्याचा पुनः एकदा प्रत्यय आला. हा प्रवास असाच सुरू रहावा अशी इच्छा होती. पण ती भारतीय रेल्वे नाही! त्यांना वेळापत्रक असतं आणि ते सेकंदाबर हुकूम पाळण्यासाठी असतं. Diavolezza दिआवोलेझ्झा नावाचं एक स्टेशन आलं आणि भराभरा तो जपानी ग्रूप उतरून गेला. जातानाelectronic dictionary मधे बघून Nice journey with you म्हणून गेली. डब्यातलं चैतन्य गेल्यासारखं वाटलं. ना ओळख ना पाळख पण त्यांच्यातल्या त्या काही लोकांचे हसरे चेहरे infectious होते हे मात्र खरं!


सगळा मिळून तीन तासांचा हा प्रवास पण आतापर्यंत कुठेही कंटाळलो असं वाटलं नव्हतं. खूप काहीतरी छान, नवीन बघायला मिळत होतं. सहप्रवासी चांगले होते आमचं स्टेशनही लगेचच येणार होतं. आवरायचा प्रश्नच नव्हता. गाडी थांबली. स्टेशनवर पाटी होती सेलेरिना/श्लारिना स्टाझ (Celerina/ Schlarigna Staz)

                                                               उर्वरीत भाग पुढील  मंगळवारी

Monday, 9 March 2015

SWITZERLAND ST MORITZ (I)

स्वित्झर्लंड (सेंट मॉरित्झ(१)

इटलीचा निरोप घेऊन निघताना वाईट जरूर वाटत होतं. मिलानहून तिरानोपर्यंतचा प्रवास, त्यामुळेच असेल, बराचसा गप्प गप्प रहाण्यात संपला. तिरानो हे इटलीचं शेवटचं स्टेशन. स्वित्झर्लंडला घेऊन जाणार्‍या गाड्या इथे आम्हाला दिसत होत्या. त्यांचा अतिशय सुंदर, तेज असलेला (bright) लाल रंग खुणावत होता. त्यांचे फोटो काढायचे होते पण प्लॅटफॉर्मवर जाण्याकरता गेट होतं आणि ते उघडण्याची वाट बघणं आवश्यक होतं.
इटलीचा निरोप घेताना इथल्या स्वस्त आणि स्वादिष्ट पदार्थांची आठवण आम्हाला बरोबर हवी होती आणि त्याबरोबरच तिथल्या प्रसिद्ध आइस्क्रीमलाही आम्हाला सोडायचं नव्हतं. स्टेशनबाहेरच असलेल्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही खाऊन पिऊन आलो तोवर लोकं प्लॅटफॉर्मवर आत जायला सुरवात झाली होती. आम्हीही मग एक डबा धरला आणि आम्हाला सोयीच्या वाटल्या (खरतर अस काही सोय गैरसोय असण्याचा प्रश्न नाही कारण आपल्यासारखी पूर्ण खिडकी अर्धी खिडकी ही भानगड इथे नाही. पण आपलं मुंबईत्व जात नाही. रिकाम्या गाडीत खिडकीत बसल्यावरसुद्धा समोर बसलेल्या माणसाची जागा आपल्याला खूप चांगली असल्याचा भास(?) होत रहातो!)  अशा समोरासमोरच्या चार जागा पकडल्या. थोडा वेळ गेला आणि अचानक एक मोठा ग्रूप आला. मंगोलिअन वंशाच्या खुणा, गोरा रंग, गालाची हाडं बसकी आणि हसरा चेहेरा. आमच्या शेजारीच मध्ये गॅंग वे सोडून त्यांच्यामधलं एक जोडपं बसलं. . बसण्यापूर्वी त्यांनी कमरेत वाकून हसून हॅलो केलं. काही वेळा प्रथमदर्शनीच आपली काही मतं होतात, बर्‍याचदा ती खरी ठरतात! यां दोघांच्याविषयीही तेच झालं.

थोड्या वेळाने गाडी सुटली. त्या ग्रूपपैकीच असावी अशी एक बाई, हातातली यंत्र सगळ्यांना देत फिरत होती. गाईड असावी त्यांची. आमच्याकडे येऊन कटाक्ष टाकून गेली. ते यंत्र वाटण्याचं काम संपवलं, काहीतरी घोषणा केली आणि आमच्याकडे आली. नेहेमीचं हाय हॅलो झालं आणि सांगायला लागली. हा डबा आमच्या या ग्रूपसाठी Reserved डबा आहे. पुढच्या डब्यांमध्ये खूप जागा आहे तर तुम्ही प्लीज, आता गाडी सुटायची वेळ होइलच, तरी लगेच त्या पुढच्या डब्यामध्ये तिथे शिफ्ट व्हाल का? आम्ही दोघं जरा चिंतित आणि उठण्याच्या तयारीत. श्रीशैल शांत बसून होता. म्हणाला डब्याच्याबाहेर कुठे तसा रिझर्वेशनचा वगैरे काही बोर्ड लावलेला नाही. ती जरा चमकलीच, कदाचित अपेक्षा नसावी तिला तशी. तो पुढे म्हणाला आणि तसही या गाडीला रिझर्वेशनच नसतं. असं म्हटल्यावर मात्र ती गडबडली आणि म्हणाली की रेल्वे ऑथोरिटीजनी तिला तसं प्रॉमिस केलं आहे. तो म्हणाला ठीक आहे. आम्ही आता इथे बसलोच आहोत तर ऑथोरिटीजची प्रतिनिधी (म्हणजे टीसी) आल्यावर तिला आपण विचारू आणि ती सांगेल त्याप्रमाणे ठरवू. यावर तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. हे सगळं अगदी शांतपणे सुरू होतं. आपल्याकडे सुरवातीलाच दोन्ही पक्षांचे आवाज चढतात आणि मग मुद्दा बाजूलाच रहातो. ती शांतपणे पण मनात तडफडत निघून गेली.

गाडी सुरू झाली तरी वेग वगैरे काही फारसा नव्हता आणि तो असण्याची शक्यता डोंगराळ भागातल्या प्रवासामुळे अजिबातच नव्हती. स्थिरस्थावर झालं होतं. तो ग्रूप जपानहून आलेला होता आणि आम्ही या डब्यात येऊन बसल्यानंतर डब्यात चढला होता. तशीही गाडी खच्चून भरली वगैरे नव्हतीच. त्या ग्रूपमधल्या आमच्या सरळ रेषेत बसलेल्या जोडप्याच्या एक्सप्रेसिव्ह चेहर्‍यावर सतत हास्य आणि आमच्याबरोबर बोलण्याची उत्सुकता दिसत होती पण भाषेचा प्रश्न असावा. इंदिया? हे नेहेमीचे वाक्य झाल्यावर आम्ही संपूर्ण वाक्यात विचारलेल्या तुम्ही कुठून आलात या प्रश्नाला उत्तर देताना तिची भंबेरी उडत होती. पण अतिशयच लाइव्हली वाटावं असं ते जोडपं होतं. बॉडी लॅन्ग्वेज हा शब्द आपण नेहमी वापरतो पण हे दोघं  त्याच्या वापराचं मूर्तिमंत उदाहरण आमच्यासमोर ठेवत होते.

गाडी मी मघा म्हटलं तशी खूप सुंदर लाल भडक रंगाची होती. थोड्या अंतरावर जाऊन लगेच स्टेशन आलं. आम्ही स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश केला होता. नंतरही खूपशी स्टेशनं जवळ जवळ असणार होती. गाडीचा मार्ग वळणा वळणाचा, घाटातला. निसर्गसौन्दर्य हात जोडून उभं आणि खिडकीच्या बाहेर काचांमधून बघताना फोटो काढता येणार नाहीत म्हणून आम्ही चडफडत होतो. गाडी वळताना पुढल्या डब्यातल्या लोकांच्या माना खिडकीबाहेर आलेल्या बघितल्यावर आमच्या डब्यातल्या खिडक्याही खटाखट उघडल्या गेल्या. इतका वेळ शांतपणे चाललेला प्रवास आता अतिशय vibrant उत्कंठापूर्ण झाला. डब्यातल्या सीटसची आवश्यकताच नव्हती कारण उठून उभे राहिल्याशिवाय ती वरून खाली उघडणारी खिडकी आम्हाला बाहेर डोकावू देणार नव्हती. स्वतःचे दोन डोळे आणि कॅमेर्‍याचा किंवा मोबाइलचा तिसरा डोळा यांचा अतिवापर आता सुरू झाला.

टी सी आली. अगदी लहानसर बाई. तिकिटं बघितली. हॅपी जर्नी वगैरे केलं. कुठे जाणार असं आम्हाला विचारल्यावर श्रीशैल म्हणाला आम्ही या गाडीने सेंट मॉरित्झला जाणार तिथून गाडी बदलून सेलेरिनाला उतरणार. आमचं हॉटेल बुकिंग सेलेरिनाला आहे. तिने हॉटेल बुकिंगचा कागद विचारला. दाखवल्यावर म्हणाली. सेंट मॉरित्झच्या आधीचं स्टेशन सेलेरिना स्टाझ. तिथे उतरा आणि तिथून तुमचं हॉटेल जवळ पडेल. आमच्याकडच्या कागदावर हा उल्लेख कुठेच नव्हता. तिला तसं विचारल्यावर म्हणाली दोन्ही एकाच गावातली पण वेगळ्या ठिकाणी असलेली स्टेशन्स आहेत. उगीच तुम्ही तुमचा दोन अडीच तासाचा वेळ प्रवासात फुकट घालवू नका. त्यापेक्षा तुम्हाला तिथे फिरायला जास्त मजा येईल. आम्हाला धन्य वाटलं. सगळ्यात शेवटच्या पायरीवर असलेल्या अशा लोकांना भेटल्यावर पर्यटन विकास म्हणजे काय असतो त्याची कल्पना येते. अन्यथा आम्ही कुठे जाणार आहोत याच्याशी तिला काहीच कर्तव्य नव्हतं. तिकिटं चेक करून तिचं काम संपलं असतं, पण नाही. आपल्याकडे आलेल्या परदेशी प्रवाशाचं महत्व तिला पूर्ण माहित होतं. त्याला संपूर्ण माहिती देऊन आणि सर्वतोपरी मदत करूनच पर्यटनाला हातभार लागू शकेल याची जाणीव, याचं ज्ञान शेवटच्या पायरीपर्यंत percolate झालं होतं, पोहोचलं होतं. याला टोटल कमिटमेंट म्हणतात! पर्यटक स्नेही वगैरे शब्द आपण वापरले तरी अशा तर्‍हेने प्रत्येक पातळीवर जाणीव निर्माण करण्याबाबतीत अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे याची कल्पना आली.
गाडीचा मार्ग वळणावळणाचा, त्यामुळे प्रत्येकवेळी वळणावर दिसणारे पुढचे डबे हे सुद्धा सुरवाती सुरवातीला लहान मुलाच्या कुतुहलाने बघितले जात होते. इतक्या आडनिड्या जागी एखादा मार्ग असणं हीच केवढी मोठी achivement असं वाटत असतानाच आम्हाला पलीकडे लांबवर दुसर्‍या गाडीच दर्शन झालं आणि या लोकांची कमाल वाटली. कोकण रेल्वे प्रकल्प हा निश्चितपणे आव्हानात्मक पण ते आव्हानच आपल्याला अजून खिळवून ठेवते आहे. दर पावसाळ्यात कोसळणार्‍या दरडींनी आणि वाहून जाणार्‍या मार्गाने आपण जेरीस आलो आहोत. अशा परिस्थितीत या इथे बर्फाळ प्रदेशात अडचणींच्या डोंगरातून मार्ग काढून हे सगळेजण वर्षाचे १२ महिने वाहतूक कशी सुरू ठेवत असतील? त्याहीपलीकडे एकापेक्षा अधिक मार्ग कसे चालवत असतील? यांना फायदा तोट्याची गणितं नसतील का

                                                                पुढील भाग पुढच्या मंगळवारी