Monday, 16 March 2015

SWITZERLAND ST MORITZ (II)


स्वित्झर्लंड (सेंट मॉरित्झ(२)


या इथे बर्फाळ प्रदेशात अडचणींच्या डोंगरातून मार्ग काढून हे सगळेजण वर्षाचे १२ महिने वाहतूक कशी सुरू ठेवत असतील? त्याहीपलीकडे एकापेक्षा अधिक मार्ग कसे चालवत असतील? यांना फायदा तोट्याची गणितं नसतील काहे सगळं एका क्षणात मनात येऊन गेलेलं तसच विरून गेलं. या वेळी गाडीत असलेल्यापैकी बिगरपर्यटक कोण असतील? म्हणजे सगळा डोलारा पर्यटनाचा. उन्हाळ्यात आमच्यासारखे तर हिवाळ्यात स्कीइंगवाले. म्हणजे वर्षाचे बारा महिने यांना जगभरातून ओघ असल्यानंतर त्यांनी काळजी कशाला करायची?

निसर्गाशी तादात्म्य पावणे या शब्दाचा अर्थ इथे उमगतो. सगळी स्टेशन्स, छोटासा प्लॅटफॉर्म आहे नाही अशी. एकच लाइन त्यामुळे स्टेशनमध्ये मात्र दोन लाइन्स दिसतात. त्या तिथे फक्त आपल्याला रूळ ओलांडण्याची परवानगी असते. एरवी कोणी रेल्वे लाइनमधून चालले आहेत असं नजरेस तरी आलं नाही. स्टेशन म्हणजे एक छोटं, एक किंवा दुमजली घर लाकडाचं. त्याला काळा रंग की व्हार्निश काहीतरी दिलं आहे असं. त्या इमारतीला स्वतंत्रपणे व्यक्तिमत्व काहीच नाही कारण तस तिचं असणंही नामधारीच. बँक म्हणजे एटीएम म्हटलं, तर स्टेशन म्हणजे असला तर एक प्लॅटफॉर्म, एक तिकिटं मिळण्याचं स्वयंचलित यंत्र आणि पदार्थांसाठीचं व्हेन्डिंग मशीन! संपलं. टाइमटेबल दिसेल समोरच. बाकी माणूस औषधालाही नाही सापडणार. तशी त्याची आवश्यकताही नाही कारण सगळ्या यंत्रणा व्यवस्थित काम करत असतील याची पूर्ण खबरदारी घेतलेली असते.

मिरालागो स्टेशन. मलातर पळसदरी स्टेशनची                                          आठवण झाली!


तीन स्टेशनं तीन प्रकारची!


बरं यात सरकारी वगैरे काही नाही. ही आहे र्‍हेटिशन बाह्न या खासगी कंपनीची Rhätischen Bahn सेवा. त्यांच्या माहिती पत्रकातलं वर्णन* सांगतं की गाडीचं मुळी हेच वैशिष्ट्य आहे की तुम्हाला विशाल दृष्टी मिळेल. हो आपली दृष्टी विशाल होते किंवा नाही कोण जाणे पण आपल्याला वरपर्यंत असलेल्या स्वच्छ काचांच्या उभ्या खिडक्यांमुळे आणि त्यातून बाहेर डोकावून पाहता येण्याच्या सवलतीमुळे जो अवकाश दिसतो तो कितीतरी विशाल असतो. या सगळ्या प्रवासात एखाद्या झाडाची फांदी  लागेल किंवा खांब जवळ आहे अशी कोणतीच गोष्ट नाही.  खिडक्या उघडतात म्हणजे लोकं त्यांचा वापर करणारच आणि त्यांना निसर्गाचा आनंद उपभोगायचा पूर्ण हक्क आहे आणि त्या प्रवासात त्यांची संपूर्ण जबाबदारी आपली आहे ही जाणीव इथे दिसतेनिर्विघ्नपणे निसर्गाशी एकरूप होऊन डोळ्यात त्याचं जमेल तितकं रूप साठवत आणि कॅमेर्‍यात त्याला पकडण्याचा व्यर्थ प्रयत्न करत हा प्रवास पुढे सरकतो.

*The train consists of panoramic cars only and has compulsory reservation. It runs over one of the most scenic railway routes in Europe, most part of it being “UNESCO World Culture Heritage“. It runs on the route Chur/Davos/St. Moritz – Pontresina - Tirano

तसही आपल्याकडे गाडीत सुरवातीला भांडणारे प्रवासी नंतर ओळख झाल्यावर छान प्रवासी मित्र होतात इथे आमच्या शेजारचं जपानी जोडपं तर पहिल्यापासूनच आमच्या प्रेमात होतं त्यामुळे कुठे त्यांच्या बाजूला काही छान दिसलं की ती अत्यानंदाने ओरडून स्वतः बाजूला होत आम्हाला तिथे बोलवत असे. ती दोघच होती त्या चार जणांच्या सीटसवर त्यामुळे समोरासमोर न बसता पटकन आमच्याकरता ती त्याच्याशेजारी बसून जागा करून देत असे. मग हा सिलसिला सुरूच राहिला. तसेही या सीटस अधून मधून बसण्याच्या उपयोगात येत होत्या. श्रीशैल तर सगळा वेळ उभाच होता. आमच्या बाजूला किंवा त्यांच्या बाजूला. एक गंमत तर सांगायलाच हवी. खूप काहीतरी बोलायची इच्छा असणार्‍या तिला इंग्रजीचा सराव नसावा, कदाचित त्यालासुद्धा. पण हातातल्या पॉकेट डिक्शनरीत बघून ती आमच्याबरोबरचा संवाद मोजके शब्द आणि अतिशय बोलका चेहरा यांच्या सहाय्याने पुढे नेत होती.

अतिशय सुंदर असं गाव दूरवर दिसत होतं. गाडी थोडी मोकळ्या ठिकाणी होती पण कॅमेर्‍यात त्याला खेचण्याच्या आत मधे आलेल्या झाडांमध्ये रस्ता बुडून गेला. असे हळहळणारे किती क्षण या प्रवासाने दिले असं म्हटलं तर ग्लास अर्धा रिकामा राहील! तरीसुद्धा हे देखील तितकच सत्य आहे की या चुकलेल्या(?) क्षणांवरून माझ्यात आणि श्रीशैलमध्ये वादावादी होत असे. निरर्थक वगैरे ठीक पण तो तो क्षण जगताना आपण किती त्यात बुडून जातो याचा नंतर त्या गोष्टींकडे बघताना प्रत्यय येतो. या प्रवासात वेळोवेळी जाणीव होत होती की खरा आनंद हा आपल्यामधेच(within) आहे. तो उपभोगायचा सोडून कॅमेरा, मोबाइल या साधनांमध्ये त्या दृष्यांना बंदिस्त करण्याच्या प्रयत्नात गुंतताना आपण कदाचित त्या खर्‍या आनंदाला तर मुकणार नाही ना याची जाणीव मनात असायला हवी.

प्रवासात किती गोष्टी नजरेत साठवल्या असतील त्याला सुमारच नाही. पण अतिशय लक्षणीय गोष्ट म्हणजे विस्तीर्ण जलाशय. त्यांचा पसारा किती आहे त्याचा विचार करणं आम्ही सोडूनच दिलं होतं. रेल्वे ट्रॅकला सोबत करत, प्रवाशांच्या डोळ्यांचं पारणं फेडत, कधी त्या घनदाट झाडांच्या मागे लपून, नंतर एकदम समोर येऊन दचकवत अशा किती रूपात आम्ही त्यांना भेटलो! रंगांची उधळण तर विचारून सोय नाही. त्याला सी ग्रीन म्हणावा, आकाशी म्हणावा? खरतर नावं न ठेवता फक्त चकित नजरेने त्याला शक्य तेवढं डोळ्यात साठवून ठेवावं असं सारखं वाटे. निस्तब्ध वातावरणातला तो ध्यानस्थ जलाशय आकाशाचं प्रतिबिंब त्यात दिसतं की आजूबाजूच्या झाडांचा हिरवाकंच रंग त्यात उतरतो ते न कळण्याइतकी भूल म्हणा नजरबंदी म्हणा होत असे. पाण्याचं दर्शन सर्वसाधारणपणे उत्साहवर्धक असतं पण इथे तोच तलाव कधी कधी खूप डिप्रेसिंग वाटला आहे.

                                      दोन टोकाचे मूड. निसर्गाचे विभ्रम! 


स्वित्झर्लंड स्वर्ग वगैरे असेलही पण तो स्वर्ग नक्कीच त्या माऊंट टिटलीस किंवा युंग फ्राऊवर नसावा. तो या अशा अस्पर्शित सौंदर्यात सापडेल. शिखर गाठण्यापेक्षा त्या शिखरापर्यंतचा प्रवास महत्वाचा म्हणतात. त्याचा पुनः एकदा प्रत्यय आला. हा प्रवास असाच सुरू रहावा अशी इच्छा होती. पण ती भारतीय रेल्वे नाही! त्यांना वेळापत्रक असतं आणि ते सेकंदाबर हुकूम पाळण्यासाठी असतं. Diavolezza दिआवोलेझ्झा नावाचं एक स्टेशन आलं आणि भराभरा तो जपानी ग्रूप उतरून गेला. जातानाelectronic dictionary मधे बघून Nice journey with you म्हणून गेली. डब्यातलं चैतन्य गेल्यासारखं वाटलं. ना ओळख ना पाळख पण त्यांच्यातल्या त्या काही लोकांचे हसरे चेहरे infectious होते हे मात्र खरं!


सगळा मिळून तीन तासांचा हा प्रवास पण आतापर्यंत कुठेही कंटाळलो असं वाटलं नव्हतं. खूप काहीतरी छान, नवीन बघायला मिळत होतं. सहप्रवासी चांगले होते आमचं स्टेशनही लगेचच येणार होतं. आवरायचा प्रश्नच नव्हता. गाडी थांबली. स्टेशनवर पाटी होती सेलेरिना/श्लारिना स्टाझ (Celerina/ Schlarigna Staz)

                                                               उर्वरीत भाग पुढील  मंगळवारी

2 comments:

  1. परत एक छान वर्णन आणि निरिक्षण.
    खरोखर केमेऱ्यात दृश्ये पकड़ता पकड़ता किंवा तसा प्रयत्न करताना आपण खऱ्या आनंदाला मुकतो का ?पण ते पकडलेले क्षण पुढील आयुष्यात ती आठवण जागी ठेवातात(जर तेव्हढ़ा उत्साह दाखवून फोटो परत परत पाहिले तर!).

    ReplyDelete
  2. परत एक छान वर्णन आणि निरिक्षण.
    खरोखर केमेऱ्यात दृश्ये पकड़ता पकड़ता किंवा तसा प्रयत्न करताना आपण खऱ्या आनंदाला मुकतो का ?पण ते पकडलेले क्षण पुढील आयुष्यात ती आठवण जागी ठेवातात(जर तेव्हढ़ा उत्साह दाखवून फोटो परत परत पाहिले तर!).

    ReplyDelete