Monday 25 November 2013

SPAIN BARCELONA III

स्पेन बार्सिलोना III

आता परत फिरायला हवे होते. आणखी कुठे जायचं त्याचा विचार डोक्यात घोळत असताना मला मॅजिक फाऊंटनची आठवण झाली. इस्पानिया स्टेशनला उतरलो आणि समोर FIRA Barcilona असा बाण दिसला. म्हटलं चला जाऊ असेच. तर एक मोठ्या चौकातल्या बिल्डिंगवर तो बोर्ड! हा चौक देखणा होता. फोटो काढले आणि कोणत्या दिशेने जाऊ या असा विचार करत समोर बघितले तर एक पॅलेससारखी सुंदर वास्तू. त्याच्याकडे जाणा-या रस्त्यावर दोन्ही बाजूला कारंजांच्या खुणा होत्या. वर एका उंच जागी मोठे कारंजे असावे असा अंदाज करत आम्ही त्या पॅलेसच्या दिशेने निघालो. जवळ जात असता उंची आणि पाय-यांचा अंदाज आला. बाप रे इतक्या पाय-या चढून वर जायचं? खरतर खूप दमायला झालं होतं. कॉफी घेऊ आणि मग जाऊ असं ठरवून तिथे असलेल्या स्टॉलवर गेलो.

MNAC Museu Nacional d'Art de Catalunya

स्पेनमध्ये कॉफी कपात मिळते! यात विशेष ते काय असं कदाचित वाटेल पण अमेरिकेच्या सवयी प्रमाणे तो भलामोठा ग्लास त्यातली ८-१० पुड्या साखर घालूनही कडवटपणा न सोडणारी आणि पिता पिता दमवणारी कॉफी माहीत असेल तर स्पेनमधल्या कपातील योग्य प्रमाणातील कॅपुचिनोचं महत्व कळेल. त्यातून आपल्याला सवय असते ती साखर आणि दूध घातलेल्या गरम कॉफीची. इथेसुद्धा दूध गरम असते आणि वर क्रीम घालतात त्याचा गोडवा असतो. त्यामुळे आपल्या प्रमाणात बसणारी अशी कॉफी पिण्याचं समाधान निश्चित मिळतं. कॉफीने रिफ्रेश होऊन आम्ही पाय-यांच्या दिशेने पाय वळवले तर काहीजण दुस-या बाजूने वर जाताना दिसले. अरे इथे तर एस्कलेटर दिसतो आहे मग श्रम का करायचे? अशा मला वाटतं ५-६ लेव्हल्स पार करून आणि मधल्या २५-३० पाय-या चढून वर पोहोचलो आणि थक्क झालो. समोरच्या बाजूला लांबवर दिसणारा तेव्हढ्याच उंचीचा डोंगर. म्हणजे आम्ही इतक्या उंचावरून बार्सिलोनाकडे पहात होतो. ग्रेट! उणीव एकच होती की आम्ही सोमवारी इथे होतो आणि कारंजे फक्त गुरूवार ते रविवार असे सुरू असणार होते. पण या गोष्टीचा विसर पडला तेच खूप चांगले झाले इतका सुंदर चौक आणि MNAC Museu Nacional d'Art de Catalunya ची पॅलेससारखी इमारत बघायची राहूनच गेली असती. (परतल्यावर टिअ‍ॅगो तर म्हणालासुद्धा आम्ही इतके वर्ष आहोत इथे पण अजून गेलो नाही त्या बाजूला)



रात्रीचे नऊ वाजून गेले होते आणि सूर्यही अस्ताला जाण्याच्या विचारात होता. दुपारी एकच्या सुमारापासून भिरभिरणारे आम्ही आता पुरेसे दमलो होतो, आता परतीच्या वाटेवर जायला हवे होते. मेट्रो पकडली आणि एकदम मनात विचार आला साडे नऊ तर वाजले आहेत तो टॉवर जर मिळाला तर पाहून घेऊ. जेवू आणि जाऊ घरी. मोनुमेंटाल स्टेशन येत होतं. आमच्या आधीचच स्टेशन. उतरलो.

वर रस्त्यावर आलो मात्र. निर्णय बदलला. रस्त्यावरचं वातावरण थंड झालेलं होतं. रात्रीची वेळ, रहदारी कमी झालेली आंणि कुठे शोधायचं हे माहीत नाही. बार्सिलोनाची ख्याती इंटरनेटवरील माहितीप्रमाणे तरी चांगली नव्हती. खरतर कोणत्याही मोठ्या शहरात जे अनुभवायला मिळतं तेच त्यातही होतं. श्रीशैल त्या साइटविषयी मी विचारलं असता म्हणाला होता हे खूपसं अमेरिकनांचं लिहिलेलं असतं आणि ते एक नंबरचे टरकू असतात. तुम्ही मुंबईत रहाता तसे रहा काही प्रॉब्लेम वगैरे नाही. तरीही म्हटलं उगीच परीक्षा नको. परत जाण्याचा निर्णय घेतला. फक्त रस्ता ओलांडून तिथे चाललेल्या अन्नछत्रात सामील झाल्यानंतर!. समोरचं हॉटेल बरं वाटलं. सगळा यंग क्राऊड होता. आम्हाला आता त्यांचा पायेया ओळखीचा झाला होता. पतातो ग्रॅशियासुद्धा. आणि हो त्यांची वाइनही मला आवडली होती. श्रीशैल म्हणाला तशी ती होममेड असावी. इथे या देशात हॉलंडच्या मानाने स्वस्तही होतं. जरा चैन करायला वाव मिळाला.
आवरून परत मेट्रो आणि घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे ११ वाजून गेले होते.

अपार्टमेंटच्या बिल्डिंगचा दिंडी दरवाजा जवळच्या किल्लीने उघडून आत आलो आणि लिफ्टने दुसरा मजला. समोर ४ नंबरचं अपार्टमेंट. दरवाजावरील कुलपाचा आणि किल्लीचा काही मेळ जमेना. असं कसं झालं? काही घोळ तर नसेल? मजला चुकला की काय? पण ४ नंबर तर बरोबरच आहे. आणि जिन्याने उतरताना नाही का मघा दुपारी दुसरा मजला मोजला होता. इतक्या उशीरा दरवाज्याची बेल वाजवणं अप्रशस्त वाटलं. नाइलाजाने खिशातला मोबाइल काढून टिऍगोला फोन लावला. त्याने कुठे आहात विचारले. म्हटलं Right in front of your door. फोन ठेवला. मधला अवधी खूप मोठा वाटला तरी. पाच मिनिटं तशीच गेली.  पण दरवाजा काही उघडला नाही.  कळेना, टिऍगोला दरवाजा उघडायला एवढा काय प्रॉब्लेम आहे. पुनः फोन पुनः तोच प्रश्न म्हटलं अरे फ्रंट डोअर उघड.  दरवाजा उघडल्याचा आवाज  आला. पण खालच्या मजल्यावर! म्हणून जिन्यावरून खाली बघितले. जिना उतरून खाली आलो आणि डोळेच फिरले माझे. तिथेही ४ नंबर! अरे बापरे केव्हढा घोळ झाला असता बेल वाजवली असती तर! पण मग कोणता खरा? . जाऊ दे ती वेळ नव्हती हा विचार करण्याची. त्याला दिलेल्या त्रासाने आम्ही कसनुसे झालो होतो..

आम्हाला आत घेऊन टिऍगोने गप्पांनाच सुरवात केली. आम्ही घातलेला गोंधळ बघून तो हसायला लागला. आम्ही शरमेने सॉरी म्हटल्यावर म्हणला कशाबद्दल? होतं असं कधी कधी. रात्रीचे अकरा म्हणजे फार नव्हेत. मी उशीरापर्यंत जागाच असतो. त्याला सहज विचारलं काय कन्फ्युजन काय होतं? एवढा वेळ लागला दरवाजा उघडायला?

तो म्हणाला मला वाटलं तुम्ही तुमच्या खोलीत आत आहात आणि आतून लॉक झालेला दरवाजा तुम्हाला उघडत नाही. मी किल्लीने तुमचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की दरवाजा उघडाच आहे. तरीही माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही की तुम्ही बाहेर असाल. Sorry to keep you waiting!
आमचं हे तू सॉरी मी सॉरी खूप वेळ सुरू राहिलं असतं पण तो म्हणाला आता शांत झोपा तुम्ही. खूप दमले असाल. मला कल्पना नव्हती तुम्ही आजच एवढे फिरून याल! उद्या मी तुम्हाला कस आणि कुठे जायचं ते समजावून सांगेन. मॅप डाऊनलोड करून ठेवतो म्हणजे सोपं होइल.


पुनः एकदा इतक्या उशीरा त्याला उठवून त्रास दिल्याबद्दल सॉरी आणि मदतीबद्दल आभार मानून आम्ही आमच्या खोलीकडे वळलो तर पठ्ठ्या म्हणाला स्पेनमध्ये ११ म्हणजे उशीर नाही आणि तसाही मी उशीरापर्यंत जागा असतोच. आम्हाला हायसं वाटून आम्ही झोपायला आमच्या खोलीकडे वळलो


                                                                     भाग चौथा पुढील मंगळवारी


Monday 18 November 2013

SPAIN BARCELONA II

स्पेन बार्सिलोना II

मी फोनवरील संभाषण उत्तराला सांगितलं. अगं,  दिएगो म्हणाला की त्याचा मित्र येइलच इतक्यात.  ती वैतगलीच एकदम. तुम्ही नीट ऐकूनही घेत नाही. हा स्पॅनिशबाबा आपल्याला म्हणाला मिसेस दिएगो बाहेर गेली कुत्र्याला घेऊन आणि हे मित्राचं काय मधेच काढलं तुम्ही? मुंबईला गेल्यावर ENT specialist डॉक्टरांकडून तपासून घ्यायला हवं. तोंडाच्या पट्ट्याबरोबरच रस्त्यावरच्या प्रत्येक येणा-या जाणा-या कुत्रावाल्या बाईकडे बघत आली असे ती जाहीर करत असे आणि मी आसासून बघत बसे! ती पुढे जाईपर्यंत! 

पाच मिनिटं गेली आणि खरोखर ६ व्या मिनिटाला एक उंच स्लिम असा माणूस हसतमुखाने आमच्यासमोर उभा राहिला. मी टिअ‍ॅगो, नाही दिएगो नाही त्याचा मित्र टिअ‍ॅगो! सॉरी तुम्हाला वाट बघायला लावली. पण सुपरस्टोअरमधून काही वस्तू आणायच्या होत्या. आम्ही त्याच्याबरोबर लिफ्टने वर गेलो. दोघांनाही मिसेस दिएगो आणि कुत्रा आठवून हसू आवरत नव्हतं.  लिफ्टमधून बाहेर येऊन थांबलो. अपार्टमेंटचा चार नंबर लक्षात राहिला. आत शिरल्यानंतर एका खोलीच्या दोन छोट्या केलेल्या खोल्या, त्यातील कामाचा पसारा आणि दुस-या बाजूला किचन बघून जरा काळजीच वाटली. पण त्याने ही माझी खोली, ही बंद खोली दिएगोची असं सांगून शंका निरसन केलं. पुढे गेल्यावर एक खूप मोठा हॉल होता. त्यात एक डायनिंग टेबल, कोच, पुस्तक संग्रह असलेली मांडणी, शोभेच्या, सजावटीच्या वस्तू हे सारं नेटकेपणाने ठेवलेलं होतं. ते ओलांडून आम्ही डावीकडील दरवाजा उघडून आत गेलो. व्यवस्थित डबल बेड आणि स्वच्छ टॉयलेट अशी ती आमच्याकरता असलेली बेडरूम होती. किचन आम्ही वापरलेलं चालणार होतं. हॉलमधे टीव्ही होता त्याचा उपभोग घेता येणार होता. पुस्तकं (स्पॅनिशबरोबर इंग्रजीसुद्धा) तर होतीच. अर्थात येत्या दोन दिवसात शहर बघायचं की हे सारं उपभोगायचं हा आमचा चॉइस असणार होता.

टिअ‍ॅगोला विचारलं आम्ही जरा बाहेर जाऊन येणार आहोत. तर जवळपासची ठिकाणं सांग. तर त्याने ते चर्च, साग्रादा फमिलिआ, जे आम्ही येताना बघितले होते ते आणि एक जवळचा टॉवर सांगितले बघायला. बरं म्हणून आम्ही बाहेर पडलो.बहुधा वयस्कर (आपणच आपल्याला म्हातारे कशाला म्हणायचं?) म्हणून इतकेच पुरे असं त्याला वाटलं असावं.

बिल्डिंगच्या बाहेर पडताना गंमतच झाली. G म्हणजे तळमजला हे गृहीत धरून खाली आलो तर तिथे कचरा टाकायची जागा. पुनः वर आलो आणि एकवर उतरून जिना उतरून खाली आलो. म्हणजे आपला दुसरा मजला आहे तर! असे घोकत आम्ही बाहेर पडलो.

चर्च पुनः एकदा नीट बघून घेतले. भव्यता हा गुण वगळता बाकी काही मनावर परिणाम करत नव्हते हे खर. खूप बटबटीतपणा वाटला. हेच तर त्यातलं सौंदर्य! असं मला नंतर जाणकारांकडून समजलं. तिथून मग त्या टॉवरच्या शोधात निघालो. तसाही नकाशा वाचन हे आमचं क्षेत्र नाही याचा प्रत्यय पुनः आला. मग थोडस खाऊन घेतलं. इथे काय खाणार हा प्रश्न सोडवला पिझ्झेरियाने. ही भाकरी आपली पोटभरीची आणि त्यात आपल्याला चॉइसही असतो. काऊंटरवर एक बाबा होता तो स्पॅनिश असावा. त्याला गंध नाही इंग्रजीचा. एक चिनी(चपट्या नाकाच्या सगळ्यांनाच आपण चिनी म्हणतो मग ती व्यक्ती आपली पूर्वांचलातली का असेना!) मुलगी आली तिची तीच गत पण तिने आणखी एकीला बोलावले. तिला व्हेज म्हणजे काय ते माहीत होते. तिने छान हसून इंग्रजीत आम्हाला बसायला सांगितले. आम्ही काऊंटरवर उभे होतो तेव्हा आमच्या डाव्या हाताला असलेल्या भट्टीत त्या माणसाने दिलेला, एका लांब अशा सुमारे 10-12 फूट लांब, काठीच्या टोकावर असलेल्या पत्र्यावर विसावलेला पित्झ्झा बेस तिने ज्या शिताफीने आणि कौशल्याने आमच्या डोक्यावरून हसत हसत भट्टीत टाकला तो शॉट अप्रतिम होता.

आम्ही खाऊन घेतलं, टॉवर वगैरेचा नाद सोडला आणि साग्रादा फमिलिया स्टेशनला पसाज दी ग्रासियाच्या दिशेने जाणारी मेट्रो पकडली. तिकडे उतरून रेड लाइनने आम्ही कॅटलुनियाला जाणार होतो. त्याकरता वरती न येता भुयारातूनच जावे लागणार होते. एकाच ठिकाणी कितीतरी लाइन्स आहेत हे किती बरं वगैरे म्हणायला ठीक पण हे असे खालून किती किलो मीटर चाललो देव जाणे! भुयारातून जाताना दिशाही कळत नाही फक्त बाण बघत जायचे. यापेक्षा रस्त्यावरून शहर बघत तरी जाता आलं असतं.




इथला प्रसिद्ध रस्ता म्हणजे ला रांबला (La Rambla) जाण्यासाठी कॅटलुनिया स्टेशनवर उतरून बाहेर आलो मात्र ! आपल्या रानडे रोडसारखी जत्रा होती. सरळच्या सरळ जाणारा तो रस्ता. दोन्ही बाजूंनी झाडं आणि त्यापलीकडे दोन्ही बाजूंनी सुरळीत चालू असलेली वाहतूक. चालण्याचा रस्ता मध्यभागी होता. झुंडीच्या झुंडी त्या रस्त्याच्या दोहोकडे असलेल्या स्टॉल्सवरच्या वस्तू बघत खरेदी करत निघाल्या होत्या. इथे घाई कोणालाच नव्हती. मुख्यतः सुव्हेनिअरचे आणि खाण्याचे स्टॉल्स पण तिथे खूपसे रोपं फुलं यांचेही स्टॉल्स दिसले आणि जास्वंदीचं झाड बघितल्यावर तर कोणीतरी जिवाचं भेटावं तसा आनंद झाला.


पुढे जाता जाता उजव्या दिशेला बोखरिया मार्केट (Mercat de La Boqueria )!दिसलं. चला एक गोष्ट तरी हवी असलेली मिळाली म्हणून आम्ही वाहनांचा रस्ता ओलांडून त्यात गेलो. मार्केटसारखेच मार्केट. प्रचंड गर्दी. पण कचरा नाही. व्यवस्थित मांडलेला मांड सगळा. सुरवातीलाच असलेले विविध फळांचे गाळे. त्यात रचलेली फळं म्हणजे अप्रतिम कलाकारी होती. वेगवेगळ्या बेरीजचे आपल्याकडे जसे द्रोण तयार ठेवतात तसे इथे प्लॅस्टिकचे छोटे डबे होते. त्यातली रंगांची उधळण बघून सगळ्यांचे कॅमेरे सरसावत होते. मेडिटेरिनिअन म्हणजे भूमध्य सामुद्रिक हवामान फळा फुलांकरता विशेष पोषक असते हे भूगोलातील सत्य साक्षात समोर उभे होते. फळं काही ओळखीची, संत्री केळी वगैरे, काही अजस्त्र! प्रचंड मोठी भोपळ्यासारखी पण खूप मोठ्या आकाराचा भोपळा! अंजीर होते पण त्यांचा आकार खूप मोठा आणि उभट. त्यावर लिहिलेल्या नावामुळेच ओळखू आले आम्हाला. नेत्रसुख घेत पुढे निघालो तर नंतरचे स्टॉल्स पेयांचे होते. तिथेही तीच रंगांची मुक्त उधळण. खूप कॉम्बिनेशन्स होती. काही तर ऑड वाटण्यासरखी म्हणजे नारळ आणि आंबा किंवा किवी आणि आंबा वगैरे. पण एक युरोला एक ग्लास म्हणजे स्वस्तही. त्यामुळे तृषाशांती सुरू होती. सुका मेवा खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यातही अंजीर होते ते उभट आणि पांढरे होते. जात वेगळी असावी. इथे आम्हाला एका ठिकाणी केशर मिळालं. तितकच महाग, आपल्यासारखच १ ग्रॅम १० २ला १९ आणि ४ ग्रॅमला ३८ युरो. पुढचे अभक्ष भक्षणाचे गाळे वगळून आम्ही बाहेर पडलो.

डोळ्यावर विश्वास  बसत नाही? पण  हे खरे आहे.

पुनः रस्त्यावर येऊन आमची पूर्वीची दिशा पकडली. वाटेत जाता जाता डावीकडे एक सुंदर चौक दिसला. हा भाग म्हणजे बार्सिलोनाचं ओल्ड टाऊन त्यामुळे असे जुने चौक आहेत. त्यात फरसबंदी रस्ते आहेत. मधे सुंदर कारंजे आणि त्या भोवती बसायची व्यवस्था आहे. जुना हुतात्मा चौक आठवतो का? तो जेव्हा फ्लोरा फाऊंटन होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक असे तेव्हासारखाच सुंदर. तिथे थोडावेळ विसावलो आणि पुढे निघालो. हा रस्ता १.२ किमीचा. म्हणजे चालण्यासाठी शिवाजी पार्कची एक राऊंड. फारतर १२-१५ मिनिटं. पण त्यातली अडथळ्यांची (प्रेक्षणीय गोष्टींची) शर्यत मोठी! त्यामुळे आम्हाला वेळ लागत होता पण इथे घाई कसलीच नव्हती. इथला समर म्हणजे पर्यटकांना वरदानच. रात्री साडे नऊ दहापर्यंत उजेड असतो. ऊन्हामुळे वातावरण प्रसन्न मग उत्साहालाही उधाणच असणार. सातच्या आत वगैरेचा घोळ नाही

कोलंबसाचा पुतळा दिसला आणि ला रांबला संपला. इथे पुनः तसाच सुंदरसा चौक. भोवती असलेल्या त्यांच्या सुंदर इमारती. सगळ्या सरकारी. कॅटलुनिया डिफेन्शिया वाचून मजा वाटली. पण नंतर लक्षात आलं हा खरातर स्पेनचा एक प्रांत पण ते, कॅटलान्स, तसं मानत नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते स्वतंत्र आहेत. तशी त्यांची चळवळही आहे. त्यांची कॅटलान ही भाषा स्पॅनिशच्या जवळची असली तरी वेगळी आहे. कॅटलानचा काही भाग स्पेनमध्ये काही फ्रान्समध्ये आहे. म्हणजे काहीसं कुर्दिश किंवा बलुचिस्तानसारखं प्रकरण आहे हे. यांचा झेंडा स्पेनहून वेगळा आणि तो घरा घरांवर फडकत असतो. त्यामुळे या अशा त्यांच्या विविध खात्यांच्या इमारती दिसतात




इथून पुढे गेलं की काही अंतरावर समुद्र! पण त्या आधी आपण पोहोचतो ते बार्सिलोना पोर्टवर. पोर्ट मोठ आहे. मोठ्या बोटी दिसतात. इथेच एक maremagnum मॉल आहे. त्याच्या उतरत्या आरशासारख्या छपरातली आपली त्याकडे जातानाची प्रतिबिम्ब छान दिसतात तिथून पुढे मग बार्सिलोनेट म्हणजे जिथे ऑलिम्पिक अ‍ॅक्वा स्पर्धा झाल्या होत्या, आयमॅक्सचं ४डी थिएटर, अ‍ॅक्वेरियम या सगळ्या गोष्टी लागतात. या सगळ्यात आम्हाला वेळ घालवायचा नव्हता. आम्ही समुद्रावर गेलो. खूप लांबवर पसरलेला, सुंदर पांढरी वाळू आणि नितळ निळे पाणी असणारा किनारा. आधीच हा युरोपातला किनारा आणि त्यातही सूर्यदर्शनाचा योग म्हणजे या वेड्या लोकांना निमित्तच. कुटुंबच्या कुटुम्ब टॅन होण्यासाठी पसरलेली होती. समुद्रात जा पुनः सूर्यकिरणं खात आडवे व्हा हा अखंड उद्योग. किना-यावर अर्थातच फुटबॉल व्हॉलीबॉल वगैरे खेळही सुरू होते. पण मुख्य खेळ वाळूत कमीत कमी कपड्यात आडवं होण्याचा.लांबवर पसरलेला समुद्र, दूरवर दिसणा-या शिडाच्या होड्या आणि पलीकडे सुरू असलेले वॉटर स्कूटरसारखे खेळ याबरोबरच इथला लाकडी डेकही आठवणीत राहण्याजोगता. अधून मधून मंगोल   चेहे-याच्या मुली मसाजसाठी विचारत फिरत होत्या तसेच काही काळे लोक दलालगिरी करताना दिसत होते. अर्थात पर्यटन स्थळ म्हटलं की हे जोडधंदे आलेच.

कोलंबस पुतळ्यापासून आम्ही पहात होतो आपल्याकडे रस्त्यावर मांड मांडून बसतात तसे विक्रेते दिसत होते. अनधिकृतच असावेत असं आमचं बोलणं होत होतं. पुढे पोर्टच्या डेकवरही काहीजण दिसले. मुख्यतः काळे आणि आशियाई. आपले असावेत का? असा विचार डोकावत होता पण तसं कोणी ओळख वगैरे दाखवायला फारसं उत्सुक दिसलं नाही. हे मात्र आमच्या दोघांच्याही लक्षात आलं होतं. एकदम काहीतरी गडबड झाली आणि सगळे एकदम आपल्या मालावर झाकण टाकून (वस्तुतः ते एका लुंगी किंवा स्कार्फसदृश कापड अंथरून त्यावर वस्तू ठेवत.) बोचकं बांधून पुढे धावत गेले. इथेही आपल्याकडे गाडी येते तसे काहीतरी असावे ज्यापासून हे लोक दूर पळत असतील. जगात सगळीकडेच या गोष्टी असतात. प्रमाण कमी किंवा जास्त इतकेच.

                                                        भाग तिसरा पुढील मंगळवारी

Monday 11 November 2013

SPAIN BARCELONA I

स्पेन बार्सिलोना

जिरोनाहून बार्सिलोनाला आम्हाला घेऊन जाणारी गाडी सकाळी दहा एकोणीसची. आम्ही जिरोनाच्या ओल्ड टाऊनमधून निघालो तेव्हा ९.२० झाले होते. आरामात रमत गमत, नदीकाठाने काहीशा दूरच्या रस्त्याने आम्ही दोन दिवस राहिलो त्या ओल्ड टाऊनचे निरीक्षण करत जात होतो. रस्त्याला लागलो आणि मग या इथल्या जीवनाचा शांतपणा, निवांतपणा जाणवला. आपल्याकडे भारतात वातावरणातच एक आवाज असतो. आपल्या जीवनशैलीतच एक प्रकारचा अधीरपणा असतो. त्यामुळे मग रिकामी असलेल्या ट्रेनमध्येही आपण निवांतपणे चढत नाही. खिडकीकडची जागा, गाडी जाते त्या दिशेची, संपूर्ण खिडकी अशा खूप गोष्टींची यादी आपल्या मनात असते आणि तरीही कोणी आपल्या जवळ येऊन बसला की दुसरी जागा रिकामी असूनही हा आपल्याच शेजारी का आला याचा प्रचंड दुस्वास मनात असतो. म्हणजेच अस्वस्थपणा हा आपला स्थायी भाव झाला आहे. इथे नेमकं मला तेच आपल्याकडे जे कमी आहे ते मिळाल्याचा आनंद मिळतो. गाडी येते, थांबते. आधी लोकं उतरतात. तोपर्यंत सगळे खाली प्लॅटफॉर्मवर शांतपणे उभे असतात. नंतर मग न ढकला ढकली करता सगळे आत येतात. रिकाम्या जागांवर बसतात. बसताना शेजारच्या सीटवर आधी बसलेल्या माणसाला सौजन्याने विचारतात. "आम्ही पण तिकिट काढूनच आलो आहोत" हा फुकट माजही नसतो आणि आधीचा माणूसही तसा त्याच्या वागणुकीतून दाखवत नसतो. एकूण माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची आपण सुरवात करण्याची कुठेतरी गरज आहे का हा विचार इथे माझ्या मनात सतत घोळत असतो.

जिरोना स्टेशनवर येण्यासाठी वळलो तर एक भिकारीण दिसली. वर्णावरून स्पॅनिश असावी. इतक्यात उत्तराला आठवण झाली, आपल्याकडे कालचा ब्रेड आहे तो देऊ का असं मला विचारल्यासारखं करून ती तो द्यायला पुढे होणार तेव्हढ्यात एक काळी मुलगी पर्समधून एक नाणं काढून तिच्या हातात देऊन पुढे झाली. काळ्या लोकांनी गो-यांना भीक घालावी या घटनेचं आश्चर्य वाटत असतानाच मला त्या काळ्या मुलीचं कौतुक वाटलं. उत्तराने ब्रेड दिल्यावर "ग्रासियस" म्हणून त्या भिकारी बाईने आभार मानले.

स्टेशनवर आलो. गाडी अर्थातच वेळेवर होती. पण तशी ही ऑफिसची वेळ. त्यामुळे गर्दी होतीच अर्थात आम्हाला बसायला जागा मिळण्याचा काही प्रश्न नव्हता. ही कालच्या सारखीच मिडिआ डिस्टन्शिया म्हणजे एक्सप्रेस. पण ही हाय स्पीड नव्हे. जिरोना बार्सिलोना मार्गावर हाय स्पीड लाइन नुकतीच सुरू झाली असली तरी अजून तितकी फ्रिक्वन्सी नाही. आणि म्हणण्याइतका वेळात फरकही नाही. प्रवास अर्थात सुंदर असतो. प्रवासात स्पेनमधलं वैविध्य दिसत होतच. इथे डोंगर द-या (हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की हॉलंडसारख्या अतिशय सपाट, एकही डोंगर, दरी नसलेल्या देशातून आम्ही इथे आलो आहोत.)  जंगलं जशी आहेत तसं काही ठिकाणी झाडं किंवा हिरवळ नसलेल्या ओसाड जागाही दिसतात. गावातली घरं आपल्याकड्ल्याप्रमाणेच म्हणजे एखादं देशमुख पाटलाचं घर जरी सुंदर असलं तरी काही घरं डागडुजीविना केविलवाणीसुद्धा असतात. इथे चित्रातल्याप्रमाणे नाही तर वास्तवातली माणसं रहातात याचा जागोजागी प्रत्यय येतो.

आम्ही उतरलो ते बार्सिलोनाच पसाज दी ग्रासिया स्टेशन. (Passaeig de Gracia) इथे उतरून मेट्रोचा दोन दिवसांचा पास काढून L2 गाडी पकडायची होती. इथे आता श्रीशैल बरोबर नव्हता. आम्ही तसे अगदी मठ्ठ नाही कारण पॅरीसला याआधी गेल्या खेपेला आम्ही एकटेच गेलो होतो आणि तसा काही प्रश्न आला नव्हता. खरतर प्रश्न आला होता पण तो आमचा आम्ही सोडवला होता. तर स्टेशन आलं आणि उतरलो. फक्त तो एकच प्लॅटफॉर्म बाकी काही नाही. माझ्या माहितीप्रमाणे हे यांचं मोठं स्टेशन. उतरलो ते स्टेशन बरोबर आहे याची पुनः एकदा पाटी बघून खात्री करून घेतली.


Casa Batlló by Anton Gaudi just outside the Passage de Gracia station, Barcelona

स्टेशनच्या बाहेर आलो. दुसरा पर्यायच नव्हता. बाहेर रस्ता वहाता होता पण कुठे मेट्रोचे M हे चिन्ह दिसले नाही. म्हटलं ठीक आहे इथेच कुठेतरी जवळपास दिसेल. तर समोर गौडीची (Antoni Gaudi) Casa Batllo ही इमारत. नेटवर फोटो बघून बघून पाठ झाली होती ती स्टाइल. मग ती बघितली. फोटो काढले. रस्ता ओलांडला आणि एक फेरी मारून परत समोरच्या बाजूला आलो तर Tiket असा बोर्ड दिसला. लायनीत उभं राहून त्याला विचारलं दोन दिवसांचा मेट्रोचा पास.......वाक्यही पुरं होण्याच्या आतच त्याची मान नाही म्हणून हलली. Follow Green signs on the Road. आम्ही रस्ता पुनः ओलांडला आणि "खालमानेने" निघालो रस्त्यावर पायतळी रंगवलेल्या पण आता पुसट झालेल्या हिरव्या लाइन्स आणि बाणाच्या दिशेने. एकदाचे पोहोचलो मेट्रोच्या जवळ. याप्रकारे लीन होवून मेट्रो स्टेशन शोधायला लावणारे ते स्पॅनिश धन्य होत.

खाली उतरून आता काऊंटरचा शोध घेऊन दोन दिवसांचा पास काढला की L2 पकडून साग्रादा फमिलिया. पण काऊंटर होता कुठे? i अर्थात इन्फर्मेशनची खूण होती पण ते मशिन होते. चला प्रॅक्टिकली बघू म्हणून इंग्लिशचा ऑप्शन निवडून (प्रथम भाषा स्पॅनिश ) २ दिवसांचा पास मागितला. १३.४ युरो इथवर ठीक. माझ्याकडे ५०ची नोट होती ती आत टाकली तर परत आली. स्क्रीनवर ५०च्या नोटेवर फुल्ली होती. मग दोन पास मागितले तर ती फुल्ली गेली आणि नोट आत जाऊन नाण्यांचा खणखणाट निनादला. सगळे २, १ युरोची आणि ५० सेंटची नाणी आणि दोन तिकिटं पडली ती घेऊन आम्ही प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघालो.

प्लॅटफॉर्म तसा अरूंद आणि समोरची भिंत संपूर्ण काळी. माणूस चुकून पुढे गेला तर? या कल्पनेने अंगावर काटा उभा राहिला. पुढची गाडी किती वेळात आणि कोणत्या दिशेने हे दाखवणारा इंडिकेटर होता. प्लॅटफॉर्मवरही तसे बाण दाखवले असल्याने चुकण्याचा प्रश्न नव्हता. एकच लाइन असल्याने गाडी नीट बघून चढा ही आपल्याकडची भानगडही नाही. बादालोनियाच्या दिशेने साग्रादा फमिलिया हे तसं तिसरं चौथंच स्टेशन आणि त्याची अनाउन्समेंट आणि इंडिकेटरही गाडीत असल्याने तोही प्रश्न नाही. आम्ही निवांत होतो. स्टेशन आलं उतरून रस्त्यावर आलो तर ही प्रचंड गर्दी. प्रसिद्ध चर्चच्या अगदी दारात हे स्टेशन. त्यामुळे जिना चढून वर आलं की त्याचं दर्शन होतं. गौडी या प्रसिद्ध आर्किटेक्टचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प! गेल्या शतकात सुरू झालेला आणि आणखी किमान ८० वर्षे तरी पुढे सुरू रहाणारा. भव्य तर खरच. तशीही चर्चेस भव्यच असतात. हे ही त्यातलेच पण गौडीच्या संकल्पना घेऊन आलेले. याच्या अनेक मनो-यांवर विविध फळं आहेत. आम्ही अर्थातच बाहेरून बघून चारी बाजूनी एक चक्कर टाकली. (आत जाण्यासाठी १३.५ युरो कोण देईल)


Sagradia Familia Barcelona, Dream Projecy by Anton Gaudi to take another 80 years to complete!




आमचं अपार्टमेंट इथे जवळच होतं म्हणून घर शोधण्यासाठी निघालो. मायोर्का ( La Mallorca) रस्ता समोरच दिसला आणि ४१३ नंबरच्या घराच्या दिशेने आम्ही निघालो. बिल्डिंगपाशी आलो आणि आता पुढे काय असा प्रश्न समोर आला. अपार्टमेंट बिल्डिंग. आत कसं शिरणार किल्लीशिवाय? तेवढ्यात एक जरा वयस्कर गृहस्थ दरवाजा उघडून पुढे आले. स्पॅनिशमधे त्यांनी विचारायला सुरवात केली आणि आमची साइन लॅन्ग्वेज सुरू झाली. हातातील कागद आम्ही त्यांना दाखवला. त्यांनी त्या अपार्टमेंटची बेल वाजवली पण रिस्पॉन्स नाही. खरतर होस्ट्च्या मेलमध्ये मी घरी असेन असं होतं. ( I am eager to receive you personally हे त्यातले शब्द!) शेवटी मी फोन लावला आमच्या होस्टला. तो कामावर गेला होता. पण त्याच्या मित्राला फोन करून त्याने सांगितले होते आणि तो ५ मिनिटात तिथे हजर होणार होता. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. त्या स्पॅनिश गृहस्थाने आम्हाला आधीच बिल्डिंगच्या आत घेऊन कोचावर बसायला सांगितले होते.  आता वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते

                                                                   भाग दुसरा पुढील मंगळवारी     

Monday 4 November 2013

SPAIN GIRONA III

स्पेन जिरोना आणि पोर बाऊ

दुस-या दिवशी जरा लवकर बाहेर पडू या असं जेव्हा श्रीशैल म्हणाला तेव्हा आम्हाला काहीच उलगडा झाला नाही. सकाळी नऊच्या सुमाराची गाडी पकडून आम्ही पोर्ट बाऊ (Port Bau) पण उच्चार मात्र पोरबाऊला (यातला र पुनः सायलेंट!) निघालो

हॉलंडहून स्पेनला येताना आम्ही आलो विमानाने. शेवटच्या पाच सात मिनिटात दिसलेला निळाशार समुद्र आणि बर्फाच्छादित शिखरं वगळता पांढरे ढगच फक्त दिसले होते. त्यातच स्पेनमध्ये कुठले आले बर्फाच्छादित डोंगर ही आमची (=माझी, अडचणीच्या वेळी अशी समावेशक भूमिका घ्यावी असे व्यवहार ज्ञानाच्या पुस्तकात लिहिले आहे) भूगोलासंदर्भातली मुक्ताफळं सुरूच होती. प्रवास तसा तासाभराचा, पण एक्सप्रेस गाडीने (मिडिआ डिस्टन्शिया ). इथे तसा साध्या म्हणजे रेजिओनल (Regional) आणि मिडिआ डिस्टन्शिया मध्ये वेगाचा नसला तरी सीटसच्या क्वालिटीचा फरक आहे. बाकी सगळं तेच
आम्ही जसे पोर बाऊच्या जवळ येत होतो तसा समुद्र दिसू लागला. निळंशार पाणी, आत घुसलेला दंतुर किनारा, जागोजागी उभ्या असणा-या गाड्या आणि किना-यावरील पर्यटक. माहोल उत्साहाचा होता कारण सूर्यदर्शनाचा योग. तसा इथे सूर्य नवीन नाही. हा भाग सनबेदिंग करता प्रसिद्ध असावा. डोंगराआडून दिसणारा समुद्र त्याला लगटून त्याच्याशी लपंडाव खेळणारा आणि लडिवाळपणे वळणं घेत घेत डोंगराच्या अंगाखाद्यावरून सहजपणे सरसर वर जात पुनः खाली उतरुन पुनः पुढच्या डोंगरावर वर वर जाणारा रस्ता. प्रत्येक डोंगरावर जाणारे तीन चार तरी वेगवेगळ्या लेवलवरचे रस्ते आम्हाला दिसत होते. आम्ही तो माहोल खूप enjoy करत असताना  गाडी एका बोगद्यातून बाहेर पडली आणि थांबलीच.



हे पोर बाऊ स्टेशन! आम्ही तसेच, अचंबित. खाली उतरलो. बोगदा संपल्या संपल्या असलेलं ते स्टेशन छान वाटलं. म्हणून प्लॅट्फॉर्मच्या दुस-या टोकाकडे गेलो तर तिथे पुनः एक बोगदा. अगदी अल्याड डोंगर पल्याड डोंगर असं ते डोंगरातलं स्टेशन मग आम्हाला आवडून गेलं. प्लॅटफॉर्मवरच्या लिफ्टने खाली उतरलो तर पुनः दुसरा प्लॅटफॉर्म. तिथून पुनः उतरून आणखी दुस-या प्लॅटफॉर्मवरून मग बाहेर. बाहेर आल्यावर एक सुंदर दगडी पाय-यांचा जिना आणि त्याच्या सभोवताली वृक्षांची खडी ताजीम. असं शाही स्वागत झाल्यावर मग तुमचे पाय गावच्या जमिनीला टेकतात




तसेच थोडे पुढे निघालात की समुद्रावरतोचमघा गाडीतून दिसलेला निळाशार समुद्रबगळ्यांचा तो मानवी वाटावा असा कलकलाटपक्षांचे विविध आवाज आणि या सगळ्यावर ताण करणारा भणाणता वारासमुद्रात याटछोट्या मोठ्या बोटीशिडाच्या होड्या असे बरेच प्रकारकिनारा नाहीचम्हणजे वाळूची पुळण नाहीत्यामुळे उगीच कुठेतरी बांधून काढलेल्या ठिकाणी आणून टाकावी तशी वाळू दिसत होतीपाण्यात दगडी बांधकाम होतं तिथे उघडेटॅन होण्याकरता बसलेले काहीजणहे खरतर ब्लू लगून आहेसमुद्र तर पुढे दिसतो आहेमी माझं ज्ञान पाजळलंते नंतर खर निघालं तो भाग अलाहिदाशांत अशा त्या निळ्या पाण्यात तळाची दगडांची नक्षी दिसत होतीलहान मासे झुंडीने फिरत होतेशेवाळाचा इतका सुंदर हिरवा रंग मी प्रथमच बघत होतोसमुद्राच्या काठाने वळण घेत वर जाणारा रस्तातिथे पुढे बोटीं उभ्या करण्यासाठी जागाश्रीमंतांच्या स्वतःच्या बोटीधंदेवाल्यांच्या बोटी असा बराच पसारा तिथे होता.




समुद्राकडे पाठ करून उभे राहिल्यावर समोर उंचावर, जिथून आम्ही खाली उतरून आलो होतो त्याच्या बाजूलाच एक चर्च दिसत होते. अर्थातच प्राचीन!. कुठेतरी बघितल्यासारखे वाटले म्हणून श्रीशैलला विचारलं तर तो म्हणाला, घरातील (त्याच्या) डेस्कटॉपवरचा वॉलपेपर! अरे हो हा इथे येऊन गेला आहे हे आम्ही दोघं विसरूनच गेलो होतो एव्हाना.

मघा तुम्ही जे कौतुक करत होतात त्या सगळ्या रस्त्यांवरून मी सायकलने गेलो होतो गेल्या वर्षी सायकल ट्रीपच्या वेळी! आमची छातीच दडपली. अज्ञानात सुख असतं म्हणतात त्याप्रमाणे आम्ही या समजुतीत होतो की सायकलचे रस्ते वेगळे असतात त्यावरून याची ट्रीप असणार! इथे बघतो तो हा हाय वे होता. त्यावरून छोट्या गाडीतून जाताना शेजारून ट्रक गेला तरी गाडी हलते अशा रस्त्यांवरून हा माणूस सायकलवरून जातो! तेही एकटा? बर तो रस्ता तरी सरळ असावा तर तोही असा डोंगर द-यातून जाणारा! म्हणजे श्रम हा एक भाग आणि तसा रहदारीमुळे तणावपूर्णही!. अर्थात मिळणारं दृष्टीसुख या सगळ्याची सव्याज भरपाई करणारं होतं यात शंकाच नव्हती! तरीही हे सगळं आधी कळलं नाही हेच खूप बरं म्हणायची वेळ आली. तुम्हाला या भागाचा, जिथून मी सायकल घेऊन एकटाच फिरलो त्याचा अनुभव द्यायचा म्हणून मुद्दाम काल म्हटलं पोर बाऊला जाऊ या म्हणून! श्रीशैल सांगत होता.

हे स्टेशन म्हणजे स्पेनच्या सरहद्दीवरचं शेवटचं. पुढे ज्या बोगद्यात गाडी शिरते त्याच्या डोक्यावरून जाणा-या रस्त्याच्या दुस-या लेव्हलवर असलेली पाटी दाखवून त्याने सांगितलं त्या पलीकडे फ्रान्स! मी सुरवात फ्रान्समधून करून स्पेनमध्ये शेवट केला. सायकल टूरकरता रस्ता नुसता सरळ असेल तर मजा येत नाही. काहीतरी अ‍ॅडव्हेन्चरस असण्याची गरज असते. या वेड्या वाकड्या, वळणा वळणाच्या डोंगर रस्त्याने तशाच आतबाहेर करणा-या समुद्राच्या साथीने प्रवास करण्यात जी मजा आहे ती सरळ रस्त्यात नाही. कुठेही थांबावं वाळूत बसावं आणि पुढे जावं असा हा रस्ता! या छोट्या गावातून रहाण्याची मजाही र असते! कायला कितीही रम्य वगैरे वाटलं तरी त्या तशा वाकणा वळणाच्या रस्त्यांवरून शेजारून मोठमोठ्या गाड्या ट्रक्स वेगाने जात आहेत आणि त्यातच कडेने (म्हणजे कुठून?) सायकलवरून श्रीशैल जात आहे या कल्पनेनेही अंगावर काटा आला. परतीच्या प्रवासात त्या रस्त्यांकडे बघताना आता नवी दृष्टी मिळाली होती.

दुपारी, खरतर संध्याकाळीच म्हणायला हवं कारण इथे सूर्य उशीरापर्यंत असतो म्हणून दुपार वाटते एवढच, जिरोनाला परतलो तेव्हा ऊन्हाचं मान ढगाळ वातावरणाने कमी झालं होतं आणि वा-यामुळे तापमानही कमी झालं होतं. इथे येताना आम्ही घेत असलेले जॅकेटस श्रीशैलने घरीच ठेवायला लावले होते. उन्हाच्या देशात जात आहोत तर जॅकेटस कशाला म्हणून! उन्हाचा देश वगैरे ठीक आहे पण तापमान कमाल २३ आणि किमान १२ हे आपल्याला झेपणारं नाही हे आम्हाला ठाऊक होतच. सुदैवाने थोड्या वेळात सूर्यदर्शन आणि तापमान दोन्ही आम्हाला अनुकूल झालं.

जिरोनाच्या ओल्ड टाऊन मधील गल्ल्या बोळातून हिंडताना विवा बॉम्बे सारखी आपल्या वस्तूंची दुकानं होती. समरकंद नावा्चं एक दुकानही होतं. आपल्या वस्तू म्हणजे प्रामुख्याने पंजाबी ड्रेसवरच्या ओढण्या. स्कार्फसारख्या गळ्याला गुंडाळण्याची इथे फॅशन आहे. फक्त बायका नव्हेत तर पुरूषांच्या गळ्याभोवती या ओढण्या विळखा घालून असतात. बहुधा ते फॅशन स्टेटमेंट असावं! (हा माझा अस्सल भारतीय बाणा. कशावरही आपल्याला खात्रीपूर्वक विरोधी बोलता येतं) खरतर थंडी वा-यापासून संरक्षण म्हणून त्याचा वापर होतो. दुसरी प्रामुख्याने दिसणारी गोष्ट म्हणजे बुद्धाच्या मूर्ती. अर्थात त्याचा संबंध भारतापेक्षा पूर्वेकडील देशांशी आहे.बुद्ध भारतीय होता यावर ब-याच जणांचा विश्वासच नसतो कारण तसाही आपण कुठे त्याला आपला म्हणतो?

या फिरन्तीत महत्वाची गोष्ट अजून शिल्लक होती. गावाभोवतीची (ओल्ड टाउन) भिंतत्यावरून चालत जाता येतंखूप ठिकाणी असलेले कोनाडे आपल्या किल्ल्यांवरील टेहळणी बुरूजांची आठवण देणारे आहेतया भिंतीची राखण मात्र व्यवस्थित दिसतेत्याचं जुनेपण जपणारी दुरुस्ती ही खासच आहेधोकादायक असे मधले जिने बंद केलेले आहेतशहराचा एरिअल व्ह्यू या भिंतींवरून चांगला दिसतोइथले विद्यार्थी नशीबवान म्हणायला हवेत कारण इतक्या सुंदर वातावरणात त्यांची युनिव्हर्सिटी आहेअर्थात पर्यटकांना त्याचा किंवा त्यांना पर्यटकांचा त्रास होण्याचा प्रश्न येत नाही अशीच रचना आहे एकूण.

त्या भिंतीवरुन जाताना गाव नजरेत सामावत होतं. कौलारू उतरती छपरं पण सगळी स्वच्छ होती. हा अधून मधून पडणा-या पावसाचा परिणाम असेल का? तशी इथे धूळ उडताना दिसत नाही हे खरेच पण झाडांची पडणारी पानं नियमितपणे उचलली जातात. तसा कचराही. त्यामुळे कदाचित फरक असेल.  भिंत दमवणारी आहे. अर्थातच मधून उतरून जाण्यासाठी त्यांनी जिनेही ठेवले आहेत. भिंतीवरून चर्चपर्यंत आलो आणि उतरून चर्चकडे गेलो


चर्च बघून आम्ही पुनः फिरायला निघणार तर पावसाने गाठलं. जोरदार सर होती.आपल्याप्रमाणेच बिल्डिंगच्या आडोशाला सगळे उभे होते. थोडा भर ओसरल्यावर मग आम्ही घरी जाऊन छत्र्या घेतल्या, हो,  पावसाची शक्यता आधी बघितली असल्याने त्या आठवणीने बरोबर घेऊन ठेवल्या होत्या. छत्र्या घेतल्या आणि इथले प्रसिद्ध तापाज (Tapas) खायला बाहेर पडलो. दुस-या दिवशी श्रीशैल पहाटे पाचच्या सुमारास घराबाहेर पडणार होता. त्याची परतीची फ्लाइट सातची म्हणजे त्यामानाने बस गाठून विमानतळावार जाणे आवश्यक होते. सकाळी साडेचारच्या सुमारास उठून बघितले तर बाहेर पाऊस. त्याला म्हटले सोडायला येऊ का तर चेष्टा करताहात का म्हणाला. मग सोडून दिलं. मनात कुठेतरी काळजी होती. पण इतक्या सकाळीही तुरळक का होईना माणसं दिसत होती रस्त्यावर. आणि तसं इथे काही काळजी करायला लावेल असं आढळलं तरी नाही.

आम्ही नऊच्या सुमारास निघू त्या हिशोबाने  मालकीणबाईंना यायला सांगितले होते. त्यांची सासू पंधरा मिनिटे आधीच आली. आमचा चहा व्हायचा होता. तिला सा‍गायचा प्रयत्न केला तर भाषेची बोंब. शेवटी तिला म्हटल बाई १५ मिनिटं थांब. तर तेही कळेना. चहाचे कप दाखवून तिला खुणेने सांगितलं. तिने काहीतरी स्पॅनिशमध्ये सांगितलं. शेवटी कागदावर ९.१५ असे लिहून तिला घड्याळ दाखवले तर तिने खुणेनेच मी खाली जाऊन येते सांगितले. आम्ही चहा घेऊन तिची वाट बघत होतो. सहज बाल्कनीतून बघितलं तर बाई खाली उभ्या! वर बोलावलं आणि आभार मानून निघालो. मला गंमत वाटली आपण इतके गोडवे गातो आपल्या कुटुंबपद्धतीचे. स्पेनमधली ही सासू किंवा झरफीलग्रॅटनमधले एलिजाबेथचे आई वडील हे वेगळं काय करत होते? त्यांच्या मुलीला किंवा सुनेच्या मदतीला जाण्याची त्यांची रीत ही कोणत्या  वेगळ्या  कुटुंबसंस्थेची  निदर्शक  होती?  आपण   जरा  आपल्या  गोष्टी  फारच  वाढवून  किंवा
दुस-यांना कमी लेखून सांगतो का याचा विचार करायला हवा असं मनात आलं आणि बार्सिलोनाला जायला निघालो.

मागे वळून बघताना विचार मनात आला या ओल्ड टाऊनमधल्या प्रत्येक गल्लीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्यांची वळणं सुंदर दिसतात. वळणा वळणाने जाणारे हे रस्ते नितांत सुंदर असेच आहेत. या सगळ्याच्या सुरवातीला असणारे चर्च ही भव्य परंतु साधेसे असे, दगडी बांधकाम असणारे आहे. पायाला भरपूर व्यायाम मिळेल असे हे जिरोना स्पेनमधले एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. फक्त ते बघण्यापेक्षा म्हणजे सकाळी इथे येऊन संध्याकाळी परतण्यापेक्षा इथे राहून ते अनुभवण्यात अधिक मजा आहे.

यावेळी फोटो जरा जास्त दिले आहेत तरीही खूप काही राहून गेलं असं वाटत रहिलं आहे म्हणून ही फोटो लिंक देत आहे.. दिवाळीचा तुमचा आनंद नक्की द्विगुणित होइल.  


2) https://picasaweb.google.com/114797344660776295543/SPAINPORTBAU?authkey=Gv1sRgCLyCgb7Sj67VrgE#5940457122608543042


                                                          पुढील भागात बार्सिलोना