Monday 25 November 2013

SPAIN BARCELONA III

स्पेन बार्सिलोना III

आता परत फिरायला हवे होते. आणखी कुठे जायचं त्याचा विचार डोक्यात घोळत असताना मला मॅजिक फाऊंटनची आठवण झाली. इस्पानिया स्टेशनला उतरलो आणि समोर FIRA Barcilona असा बाण दिसला. म्हटलं चला जाऊ असेच. तर एक मोठ्या चौकातल्या बिल्डिंगवर तो बोर्ड! हा चौक देखणा होता. फोटो काढले आणि कोणत्या दिशेने जाऊ या असा विचार करत समोर बघितले तर एक पॅलेससारखी सुंदर वास्तू. त्याच्याकडे जाणा-या रस्त्यावर दोन्ही बाजूला कारंजांच्या खुणा होत्या. वर एका उंच जागी मोठे कारंजे असावे असा अंदाज करत आम्ही त्या पॅलेसच्या दिशेने निघालो. जवळ जात असता उंची आणि पाय-यांचा अंदाज आला. बाप रे इतक्या पाय-या चढून वर जायचं? खरतर खूप दमायला झालं होतं. कॉफी घेऊ आणि मग जाऊ असं ठरवून तिथे असलेल्या स्टॉलवर गेलो.

MNAC Museu Nacional d'Art de Catalunya

स्पेनमध्ये कॉफी कपात मिळते! यात विशेष ते काय असं कदाचित वाटेल पण अमेरिकेच्या सवयी प्रमाणे तो भलामोठा ग्लास त्यातली ८-१० पुड्या साखर घालूनही कडवटपणा न सोडणारी आणि पिता पिता दमवणारी कॉफी माहीत असेल तर स्पेनमधल्या कपातील योग्य प्रमाणातील कॅपुचिनोचं महत्व कळेल. त्यातून आपल्याला सवय असते ती साखर आणि दूध घातलेल्या गरम कॉफीची. इथेसुद्धा दूध गरम असते आणि वर क्रीम घालतात त्याचा गोडवा असतो. त्यामुळे आपल्या प्रमाणात बसणारी अशी कॉफी पिण्याचं समाधान निश्चित मिळतं. कॉफीने रिफ्रेश होऊन आम्ही पाय-यांच्या दिशेने पाय वळवले तर काहीजण दुस-या बाजूने वर जाताना दिसले. अरे इथे तर एस्कलेटर दिसतो आहे मग श्रम का करायचे? अशा मला वाटतं ५-६ लेव्हल्स पार करून आणि मधल्या २५-३० पाय-या चढून वर पोहोचलो आणि थक्क झालो. समोरच्या बाजूला लांबवर दिसणारा तेव्हढ्याच उंचीचा डोंगर. म्हणजे आम्ही इतक्या उंचावरून बार्सिलोनाकडे पहात होतो. ग्रेट! उणीव एकच होती की आम्ही सोमवारी इथे होतो आणि कारंजे फक्त गुरूवार ते रविवार असे सुरू असणार होते. पण या गोष्टीचा विसर पडला तेच खूप चांगले झाले इतका सुंदर चौक आणि MNAC Museu Nacional d'Art de Catalunya ची पॅलेससारखी इमारत बघायची राहूनच गेली असती. (परतल्यावर टिअ‍ॅगो तर म्हणालासुद्धा आम्ही इतके वर्ष आहोत इथे पण अजून गेलो नाही त्या बाजूला)



रात्रीचे नऊ वाजून गेले होते आणि सूर्यही अस्ताला जाण्याच्या विचारात होता. दुपारी एकच्या सुमारापासून भिरभिरणारे आम्ही आता पुरेसे दमलो होतो, आता परतीच्या वाटेवर जायला हवे होते. मेट्रो पकडली आणि एकदम मनात विचार आला साडे नऊ तर वाजले आहेत तो टॉवर जर मिळाला तर पाहून घेऊ. जेवू आणि जाऊ घरी. मोनुमेंटाल स्टेशन येत होतं. आमच्या आधीचच स्टेशन. उतरलो.

वर रस्त्यावर आलो मात्र. निर्णय बदलला. रस्त्यावरचं वातावरण थंड झालेलं होतं. रात्रीची वेळ, रहदारी कमी झालेली आंणि कुठे शोधायचं हे माहीत नाही. बार्सिलोनाची ख्याती इंटरनेटवरील माहितीप्रमाणे तरी चांगली नव्हती. खरतर कोणत्याही मोठ्या शहरात जे अनुभवायला मिळतं तेच त्यातही होतं. श्रीशैल त्या साइटविषयी मी विचारलं असता म्हणाला होता हे खूपसं अमेरिकनांचं लिहिलेलं असतं आणि ते एक नंबरचे टरकू असतात. तुम्ही मुंबईत रहाता तसे रहा काही प्रॉब्लेम वगैरे नाही. तरीही म्हटलं उगीच परीक्षा नको. परत जाण्याचा निर्णय घेतला. फक्त रस्ता ओलांडून तिथे चाललेल्या अन्नछत्रात सामील झाल्यानंतर!. समोरचं हॉटेल बरं वाटलं. सगळा यंग क्राऊड होता. आम्हाला आता त्यांचा पायेया ओळखीचा झाला होता. पतातो ग्रॅशियासुद्धा. आणि हो त्यांची वाइनही मला आवडली होती. श्रीशैल म्हणाला तशी ती होममेड असावी. इथे या देशात हॉलंडच्या मानाने स्वस्तही होतं. जरा चैन करायला वाव मिळाला.
आवरून परत मेट्रो आणि घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे ११ वाजून गेले होते.

अपार्टमेंटच्या बिल्डिंगचा दिंडी दरवाजा जवळच्या किल्लीने उघडून आत आलो आणि लिफ्टने दुसरा मजला. समोर ४ नंबरचं अपार्टमेंट. दरवाजावरील कुलपाचा आणि किल्लीचा काही मेळ जमेना. असं कसं झालं? काही घोळ तर नसेल? मजला चुकला की काय? पण ४ नंबर तर बरोबरच आहे. आणि जिन्याने उतरताना नाही का मघा दुपारी दुसरा मजला मोजला होता. इतक्या उशीरा दरवाज्याची बेल वाजवणं अप्रशस्त वाटलं. नाइलाजाने खिशातला मोबाइल काढून टिऍगोला फोन लावला. त्याने कुठे आहात विचारले. म्हटलं Right in front of your door. फोन ठेवला. मधला अवधी खूप मोठा वाटला तरी. पाच मिनिटं तशीच गेली.  पण दरवाजा काही उघडला नाही.  कळेना, टिऍगोला दरवाजा उघडायला एवढा काय प्रॉब्लेम आहे. पुनः फोन पुनः तोच प्रश्न म्हटलं अरे फ्रंट डोअर उघड.  दरवाजा उघडल्याचा आवाज  आला. पण खालच्या मजल्यावर! म्हणून जिन्यावरून खाली बघितले. जिना उतरून खाली आलो आणि डोळेच फिरले माझे. तिथेही ४ नंबर! अरे बापरे केव्हढा घोळ झाला असता बेल वाजवली असती तर! पण मग कोणता खरा? . जाऊ दे ती वेळ नव्हती हा विचार करण्याची. त्याला दिलेल्या त्रासाने आम्ही कसनुसे झालो होतो..

आम्हाला आत घेऊन टिऍगोने गप्पांनाच सुरवात केली. आम्ही घातलेला गोंधळ बघून तो हसायला लागला. आम्ही शरमेने सॉरी म्हटल्यावर म्हणला कशाबद्दल? होतं असं कधी कधी. रात्रीचे अकरा म्हणजे फार नव्हेत. मी उशीरापर्यंत जागाच असतो. त्याला सहज विचारलं काय कन्फ्युजन काय होतं? एवढा वेळ लागला दरवाजा उघडायला?

तो म्हणाला मला वाटलं तुम्ही तुमच्या खोलीत आत आहात आणि आतून लॉक झालेला दरवाजा तुम्हाला उघडत नाही. मी किल्लीने तुमचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की दरवाजा उघडाच आहे. तरीही माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही की तुम्ही बाहेर असाल. Sorry to keep you waiting!
आमचं हे तू सॉरी मी सॉरी खूप वेळ सुरू राहिलं असतं पण तो म्हणाला आता शांत झोपा तुम्ही. खूप दमले असाल. मला कल्पना नव्हती तुम्ही आजच एवढे फिरून याल! उद्या मी तुम्हाला कस आणि कुठे जायचं ते समजावून सांगेन. मॅप डाऊनलोड करून ठेवतो म्हणजे सोपं होइल.


पुनः एकदा इतक्या उशीरा त्याला उठवून त्रास दिल्याबद्दल सॉरी आणि मदतीबद्दल आभार मानून आम्ही आमच्या खोलीकडे वळलो तर पठ्ठ्या म्हणाला स्पेनमध्ये ११ म्हणजे उशीर नाही आणि तसाही मी उशीरापर्यंत जागा असतोच. आम्हाला हायसं वाटून आम्ही झोपायला आमच्या खोलीकडे वळलो


                                                                     भाग चौथा पुढील मंगळवारी


No comments:

Post a Comment