Monday, 11 November 2013

SPAIN BARCELONA I

स्पेन बार्सिलोना

जिरोनाहून बार्सिलोनाला आम्हाला घेऊन जाणारी गाडी सकाळी दहा एकोणीसची. आम्ही जिरोनाच्या ओल्ड टाऊनमधून निघालो तेव्हा ९.२० झाले होते. आरामात रमत गमत, नदीकाठाने काहीशा दूरच्या रस्त्याने आम्ही दोन दिवस राहिलो त्या ओल्ड टाऊनचे निरीक्षण करत जात होतो. रस्त्याला लागलो आणि मग या इथल्या जीवनाचा शांतपणा, निवांतपणा जाणवला. आपल्याकडे भारतात वातावरणातच एक आवाज असतो. आपल्या जीवनशैलीतच एक प्रकारचा अधीरपणा असतो. त्यामुळे मग रिकामी असलेल्या ट्रेनमध्येही आपण निवांतपणे चढत नाही. खिडकीकडची जागा, गाडी जाते त्या दिशेची, संपूर्ण खिडकी अशा खूप गोष्टींची यादी आपल्या मनात असते आणि तरीही कोणी आपल्या जवळ येऊन बसला की दुसरी जागा रिकामी असूनही हा आपल्याच शेजारी का आला याचा प्रचंड दुस्वास मनात असतो. म्हणजेच अस्वस्थपणा हा आपला स्थायी भाव झाला आहे. इथे नेमकं मला तेच आपल्याकडे जे कमी आहे ते मिळाल्याचा आनंद मिळतो. गाडी येते, थांबते. आधी लोकं उतरतात. तोपर्यंत सगळे खाली प्लॅटफॉर्मवर शांतपणे उभे असतात. नंतर मग न ढकला ढकली करता सगळे आत येतात. रिकाम्या जागांवर बसतात. बसताना शेजारच्या सीटवर आधी बसलेल्या माणसाला सौजन्याने विचारतात. "आम्ही पण तिकिट काढूनच आलो आहोत" हा फुकट माजही नसतो आणि आधीचा माणूसही तसा त्याच्या वागणुकीतून दाखवत नसतो. एकूण माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची आपण सुरवात करण्याची कुठेतरी गरज आहे का हा विचार इथे माझ्या मनात सतत घोळत असतो.

जिरोना स्टेशनवर येण्यासाठी वळलो तर एक भिकारीण दिसली. वर्णावरून स्पॅनिश असावी. इतक्यात उत्तराला आठवण झाली, आपल्याकडे कालचा ब्रेड आहे तो देऊ का असं मला विचारल्यासारखं करून ती तो द्यायला पुढे होणार तेव्हढ्यात एक काळी मुलगी पर्समधून एक नाणं काढून तिच्या हातात देऊन पुढे झाली. काळ्या लोकांनी गो-यांना भीक घालावी या घटनेचं आश्चर्य वाटत असतानाच मला त्या काळ्या मुलीचं कौतुक वाटलं. उत्तराने ब्रेड दिल्यावर "ग्रासियस" म्हणून त्या भिकारी बाईने आभार मानले.

स्टेशनवर आलो. गाडी अर्थातच वेळेवर होती. पण तशी ही ऑफिसची वेळ. त्यामुळे गर्दी होतीच अर्थात आम्हाला बसायला जागा मिळण्याचा काही प्रश्न नव्हता. ही कालच्या सारखीच मिडिआ डिस्टन्शिया म्हणजे एक्सप्रेस. पण ही हाय स्पीड नव्हे. जिरोना बार्सिलोना मार्गावर हाय स्पीड लाइन नुकतीच सुरू झाली असली तरी अजून तितकी फ्रिक्वन्सी नाही. आणि म्हणण्याइतका वेळात फरकही नाही. प्रवास अर्थात सुंदर असतो. प्रवासात स्पेनमधलं वैविध्य दिसत होतच. इथे डोंगर द-या (हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे लक्षात घ्यायला हवं की हॉलंडसारख्या अतिशय सपाट, एकही डोंगर, दरी नसलेल्या देशातून आम्ही इथे आलो आहोत.)  जंगलं जशी आहेत तसं काही ठिकाणी झाडं किंवा हिरवळ नसलेल्या ओसाड जागाही दिसतात. गावातली घरं आपल्याकड्ल्याप्रमाणेच म्हणजे एखादं देशमुख पाटलाचं घर जरी सुंदर असलं तरी काही घरं डागडुजीविना केविलवाणीसुद्धा असतात. इथे चित्रातल्याप्रमाणे नाही तर वास्तवातली माणसं रहातात याचा जागोजागी प्रत्यय येतो.

आम्ही उतरलो ते बार्सिलोनाच पसाज दी ग्रासिया स्टेशन. (Passaeig de Gracia) इथे उतरून मेट्रोचा दोन दिवसांचा पास काढून L2 गाडी पकडायची होती. इथे आता श्रीशैल बरोबर नव्हता. आम्ही तसे अगदी मठ्ठ नाही कारण पॅरीसला याआधी गेल्या खेपेला आम्ही एकटेच गेलो होतो आणि तसा काही प्रश्न आला नव्हता. खरतर प्रश्न आला होता पण तो आमचा आम्ही सोडवला होता. तर स्टेशन आलं आणि उतरलो. फक्त तो एकच प्लॅटफॉर्म बाकी काही नाही. माझ्या माहितीप्रमाणे हे यांचं मोठं स्टेशन. उतरलो ते स्टेशन बरोबर आहे याची पुनः एकदा पाटी बघून खात्री करून घेतली.


Casa Batlló by Anton Gaudi just outside the Passage de Gracia station, Barcelona

स्टेशनच्या बाहेर आलो. दुसरा पर्यायच नव्हता. बाहेर रस्ता वहाता होता पण कुठे मेट्रोचे M हे चिन्ह दिसले नाही. म्हटलं ठीक आहे इथेच कुठेतरी जवळपास दिसेल. तर समोर गौडीची (Antoni Gaudi) Casa Batllo ही इमारत. नेटवर फोटो बघून बघून पाठ झाली होती ती स्टाइल. मग ती बघितली. फोटो काढले. रस्ता ओलांडला आणि एक फेरी मारून परत समोरच्या बाजूला आलो तर Tiket असा बोर्ड दिसला. लायनीत उभं राहून त्याला विचारलं दोन दिवसांचा मेट्रोचा पास.......वाक्यही पुरं होण्याच्या आतच त्याची मान नाही म्हणून हलली. Follow Green signs on the Road. आम्ही रस्ता पुनः ओलांडला आणि "खालमानेने" निघालो रस्त्यावर पायतळी रंगवलेल्या पण आता पुसट झालेल्या हिरव्या लाइन्स आणि बाणाच्या दिशेने. एकदाचे पोहोचलो मेट्रोच्या जवळ. याप्रकारे लीन होवून मेट्रो स्टेशन शोधायला लावणारे ते स्पॅनिश धन्य होत.

खाली उतरून आता काऊंटरचा शोध घेऊन दोन दिवसांचा पास काढला की L2 पकडून साग्रादा फमिलिया. पण काऊंटर होता कुठे? i अर्थात इन्फर्मेशनची खूण होती पण ते मशिन होते. चला प्रॅक्टिकली बघू म्हणून इंग्लिशचा ऑप्शन निवडून (प्रथम भाषा स्पॅनिश ) २ दिवसांचा पास मागितला. १३.४ युरो इथवर ठीक. माझ्याकडे ५०ची नोट होती ती आत टाकली तर परत आली. स्क्रीनवर ५०च्या नोटेवर फुल्ली होती. मग दोन पास मागितले तर ती फुल्ली गेली आणि नोट आत जाऊन नाण्यांचा खणखणाट निनादला. सगळे २, १ युरोची आणि ५० सेंटची नाणी आणि दोन तिकिटं पडली ती घेऊन आम्ही प्लॅटफॉर्मच्या दिशेने निघालो.

प्लॅटफॉर्म तसा अरूंद आणि समोरची भिंत संपूर्ण काळी. माणूस चुकून पुढे गेला तर? या कल्पनेने अंगावर काटा उभा राहिला. पुढची गाडी किती वेळात आणि कोणत्या दिशेने हे दाखवणारा इंडिकेटर होता. प्लॅटफॉर्मवरही तसे बाण दाखवले असल्याने चुकण्याचा प्रश्न नव्हता. एकच लाइन असल्याने गाडी नीट बघून चढा ही आपल्याकडची भानगडही नाही. बादालोनियाच्या दिशेने साग्रादा फमिलिया हे तसं तिसरं चौथंच स्टेशन आणि त्याची अनाउन्समेंट आणि इंडिकेटरही गाडीत असल्याने तोही प्रश्न नाही. आम्ही निवांत होतो. स्टेशन आलं उतरून रस्त्यावर आलो तर ही प्रचंड गर्दी. प्रसिद्ध चर्चच्या अगदी दारात हे स्टेशन. त्यामुळे जिना चढून वर आलं की त्याचं दर्शन होतं. गौडी या प्रसिद्ध आर्किटेक्टचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प! गेल्या शतकात सुरू झालेला आणि आणखी किमान ८० वर्षे तरी पुढे सुरू रहाणारा. भव्य तर खरच. तशीही चर्चेस भव्यच असतात. हे ही त्यातलेच पण गौडीच्या संकल्पना घेऊन आलेले. याच्या अनेक मनो-यांवर विविध फळं आहेत. आम्ही अर्थातच बाहेरून बघून चारी बाजूनी एक चक्कर टाकली. (आत जाण्यासाठी १३.५ युरो कोण देईल)


Sagradia Familia Barcelona, Dream Projecy by Anton Gaudi to take another 80 years to complete!




आमचं अपार्टमेंट इथे जवळच होतं म्हणून घर शोधण्यासाठी निघालो. मायोर्का ( La Mallorca) रस्ता समोरच दिसला आणि ४१३ नंबरच्या घराच्या दिशेने आम्ही निघालो. बिल्डिंगपाशी आलो आणि आता पुढे काय असा प्रश्न समोर आला. अपार्टमेंट बिल्डिंग. आत कसं शिरणार किल्लीशिवाय? तेवढ्यात एक जरा वयस्कर गृहस्थ दरवाजा उघडून पुढे आले. स्पॅनिशमधे त्यांनी विचारायला सुरवात केली आणि आमची साइन लॅन्ग्वेज सुरू झाली. हातातील कागद आम्ही त्यांना दाखवला. त्यांनी त्या अपार्टमेंटची बेल वाजवली पण रिस्पॉन्स नाही. खरतर होस्ट्च्या मेलमध्ये मी घरी असेन असं होतं. ( I am eager to receive you personally हे त्यातले शब्द!) शेवटी मी फोन लावला आमच्या होस्टला. तो कामावर गेला होता. पण त्याच्या मित्राला फोन करून त्याने सांगितले होते आणि तो ५ मिनिटात तिथे हजर होणार होता. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. त्या स्पॅनिश गृहस्थाने आम्हाला आधीच बिल्डिंगच्या आत घेऊन कोचावर बसायला सांगितले होते.  आता वाट बघण्याशिवाय गत्यंतर नव्हते

                                                                   भाग दुसरा पुढील मंगळवारी     

2 comments:

  1. Chaan.
    Mee ya shahatat agenda gelo.
    Ya shaharat world mobile congress bharate Feb last week madhye darvarshi.

    ReplyDelete