Monday 27 April 2015

SWITZERLAND SION II


SION II

......... आपल्याकडेही अशाप्रकारची गावाच सौंदर्य जपणारी नेटकी घरं कधी बांधली जातील हा विचार, त्याच्या प्रत्यक्षात येण्याच्या धूसर शक्यतेने, मन विषण्ण करून टाकणारा होता



पण आम्हाला या अशा वैचारिक डायव्हर्शनला वेळ द्यायचाच नाही याची खबरदारी घ्यायला ते टुमदार शहर मात्र बांधील होतं. गावातील तटबंदीच्या कडेकडेने त्या फरसबंदी रस्त्यावरून चालताना किल्ल्याजवळ कधी पोहोचलो कळलं नाही. दोन वेगळे किल्ले किंवा टॉवर म्हणू या तसे आहेत. दोन्ही ठिकाणी जायच तर वेळ अपुरा होता. निदान तास दीड तास तरी लागला असता वर चढून फिरून येण्याकरता. आम्ही मग ठरवलं की डाव्या बाजूच्या किल्ल्यावर जायचं.




चढ काही विशेष नव्हता. पायर्‍या होत्या. व्यवस्थित बांधलेल्या वगैरे. एका ठिकाणी सुंदर कमान होती, प्रवेशद्वारासारखी. लोकही जात येताना दिसत होती. स्थानिकच असावेत कारण कुत्र्यांना घेऊन फिरायला निघालेले दिसत होते. मध्यावर थांबून वेध घेतल्यावर उतारावरच्या द्राक्षाच्या बागा दिसत होत्या. त्यांच्या एकसारख्या सर्‍यांमुळे डोंगर उतार सजल्यासारखे दिसत होते. मला खरतर त्या मळ्यांकडे बघून आफ्रिकन बायकांच्या डोक्यावरच्या, केसांच्या लहान लहान असंख्य वेण्यांची आठवण झाली



किल्ल्यावर तसं काहीच नव्हतं. तटबंदी होती. वरून शहर मात्र फार सुरेख दिसत होतं. नेहेमी असतात त्याप्रमाणे इथेही शहराचं सौंदर्य आस्वादता येइल असे ऑब्झर्वेशन पॉइंटस होते. नदीचं पात्र, एरवी त्याचा इतका आवाका लक्षातही आला नसता. दूरवर दिसणार्‍या विमानतळावरली छोटी विमानं. समोरच्या डोंगररांगांपलीकडे दिसणारी बर्फाच्छादित शिखरं सूर्याच्या किरणात चमकत होती. इथे जवळच्या डोंगरांवर ना बर्फाचा मागमूस ना थंडीचा. उकाडा म्हटला तरी चालेल अशी हवा होती मात्र आत्ता  इतक्या उंचीवर वार्‍यामुळे आम्ही त्यापासून बचावत होतो.

आम्हाला शेवटच्या गाडीची चिंता होती. त्याआधी जेवणाची व्यवस्था बघणं आवश्यक होतं आमच्या शाकाहाराचं इकडे काय होणार हा प्रश्न होताच. पुनः आम्ही वळलो सिटी सेंटरच्या दिशेने. उतरायला लागलो तर एक कॅथेड्रल दिसलं. डोकावून तरी बघू या म्हणून गेलो पण काहीतरी कार्यक्रम सुरू होता त्यामुळे आम्हाला जाता येणार नाही असं कळलं. तिथेच म्युझियमही होतं पण एकंदरीतच आम्हाला म्युझियम बघण्याचा उत्साह तितपतच असतो. आम्ही पुनः उताराला, सेंटरच्या दिशेला लागलो. पुनः तेच सव्यापसव्य. तीन चार तरी फेर्‍या झाल्या असतील पण आत जावं असं रेस्तरॉं काही सापडलं नाही. अर्थात तो दोष आमच्या सवयींचा! सगळ्या ठिकाणी संध्यासमयीची आन्हिकं सुरू होती. त्यात इथे शाकाहार मिळण्याची शक्यता फारच कमी वाटू लागली. इथल्या पद्धतीप्रमाणे पाच वाजता सगळी दुकानं बंद होणार म्हणजे आज फळं वगैरे काही मिळणंही कठीण तेव्हा कडकडीत उपासाची तयारी ठेवायची या निर्णयाला आलो असताना एका अगदी छोट्या गल्लीच्या तोंडाशी एक बोर्ड दिसला Vegetarian Restaurant आम्हाला हसू आलं. इथे कोण मरायला व्हेज खाणारे असतील? बघू तर खरं म्हणून आम्ही गल्लीच्या वर चढणार्‍या दिशेने पुढे गेलो. बाहेर एक छोटं गोल टेबल त्याभोवती दोन खुर्च्या टाकून दोघजण आरामात पीत बसले होते. हे काही खरं नाही असं म्हणून आम्ही पुढे गेलो. कदाचित पुढे असेल म्हणून पण नाही याचाच बोर्ड होता तो. मग रेस्तरॉं कुठे? शेवटी ठरवलं पुढे होऊन विचारायचं. पुढे गेल्याबरोबर त्या माणसांपैकी एकाने खुर्चीतून उठून लगेच काय हवं आहे ते विचारलं. हेच "रेस्तरॉं" होतं. आम्हाला काही हवं असेल ते इथेच रस्त्यावर खरतर त्या बोळकंडीमध्ये आणखी दोन/तीन खुर्च्या आणि टेबल टाकून देणार होते. आम्ही तिथे बसायच ठरवलं.

रंगरूपावरून फार अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही हे दिसत होतं. पण आपद्धर्म म्हणून दुसरा पर्याय नसल्यामुळे गोड मानून घेणं किंवा उपाशी रहाणं असे दोनच पर्याय समोर दिसत होते. आम्ही पहिला निवडला. त्या माणसाने आत वळून हाक मारल्यावर एक जटा असलेलं पोनीटेल बांधलेला माणूस समोर आला. हाय हॅलो झालं. आम्ही व्हेजिटेरिअन म्हणजे नो मीट, नो फिश, नो एग्ज चा मंत्र म्हटला. त्याने तो शांतपणे ऐकून घेतला.

आम्ही या ठिकाणी कोणतेही प्राणिज पदार्थ सर्व्ह करत नाही. त्यामुळे तुम्हाला आमच्याकडे दूध, योगर्ट, चीज, बटर किंवा तत्सम पदार्थ मिळणार नाहीत. तुम्हाला मी वेलकम ड्रिंक आणून देतो. चालेल का? आता हे काय नवीन असा आमचा चेहरा बघून तो म्हणाला ठीक मी दोन प्रकार आणून देतो आवडले तर बघा. सरबतासारख काहीतरी. आम्हाला आल्याचा वास कळला. काहीतरी हर्बल ड्रिंक आहे असं तो म्हणाला. वाईट नव्हतं पण आवर्जून पुनः मागवावं असही काही नव्हतं. आता मेन  कोर्स म्हणून काय देणार ही उत्सुकता होती. बाकी काही चाललं असतं पण वांगं नको याविषयी हे दोघे मायलेक ठाम होते. श्रीशैलने त्याला त्याप्रमाणे वांग नको असं सांगितलं.  प्रथम आपल्याप्रमाणे ब्रिंजाल मग एगप्लांट तेही न कळल्यावर वर्णन करूनही त्याच्या लक्षात येइना त्याचा तो दुसरा मित्र की मालक तोही पुढे आला पण शून्य. मग तो एक मिनिट म्हणून आत गेला आणि वांगं घेऊन बाहेर आला. आम्ही निश्वास टाकला पण तरी उत्सुकता होती त्याला नक्की कोणतं वर्णन कळलं. त्याने सरळ आत जाऊन नेटवर टाकलं त्याला समोर चित्र दिसलं आणि तो वांगं घेऊन आम्हाला दाखवायला आला. किती सोपी गोष्ट! तंत्रज्ञानाची कमाल वाटते.

तसा खूप वेळ गेला किंवा आम्हाला तसं वाटलं असावं. त्याने डिश आणून ठेवली. समोर काहीतरी भातासारखं होतं. नाही तो चक्क भात होता आणि साधा नव्हे नारळी भात होता. अतिशय उत्कृष्ट प्रतीचा हातसडीचा असावा असा लाल तांदूळ. भाताखाली काहीतरी बिस्किट सदृष होतं. म्हणजे त्या बिस्किटावर तो भात रचला होता. अ‍ॅपल पाय सारखं काहीतरी फळाचं केलेलं एका कोपर्‍यात होतं. इतकं सुग्रास जेवण मी इटलीतसुद्धा जेवलो नव्हतो. अचानक आणि अनपेक्षित अशा या जेवणाने आमची सिऑन ट्रीप अगदी संस्मरणीय ठरली.

इतकं सुंदर जेवण देणार्‍या माणसाबरोबर काहीच संभाषण होणार नाही हे कसं शक्य आहे? त्याला मुद्दाम बोलावून त्याच कौतुक केलं तर म्हणाला  मी पण सहा आठ महिने भारतात होतो. खूप छान देश आहे तुमचा. कलकत्त्याला होतो, दक्षिणेत होतो आणि हो मुंबई खूप सुंदर आहे. भारावल्याप्रमाणे सांगत होता. आपल्या देशाविषयी परक्या माणसाकडून परक्या देशात ऐकताना मन हळवं होतं. ऐकल्यानंतर त्याला विचारलं की तो कसा व्हेजिटेरिअन झाला? तर तो कोणत्यातरी आश्रमात रहात होता तेव्हापासून त्याने मांसाहार  सोडून दिला होता. तो योग शिक्षक होता आणि हॉटेलचं हे काम करून पैसेही मिळवत होता. आम्हाला वाटलं तो स्विस नागरीक असावा पण तसं नव्हतं तो स्वतः फ्रेंच होता पण त्याची मैत्रीण जर्मन होती. ती इथे रहाणारी म्हणून हा इथे. आम्हाला भेटलेल्या खूपजणांपैकी पुरूष बाईच्या गावाला लग्नानंतर स्थलांतर करून राहिलेले आम्ही बघितले होते.

"कुठे उगीच हा आपले हट्ट चालवण्यासाठी आम्हाला घेऊन येतो" असं सिऑनच नाव ऐकल्यानंतर आम्ही कुरकुरत होतो, ते आता बरं झालं आलो या ठिकाणी, इथवर आलो. शेवटच्या गाडीची टांगती तलवार नसती तर आमच्या गप्पा आणखीही रंगल्या असत्या पण.......


दुसर्‍या दिवशी उठून इंटरलाकेनला जायचं होतं. स्टेशनपर्यंतचा रस्ता आता अगदी पायाखालचा वाटत होता त्यामुळे सकाळी टेंशन वगैरे असण्याचा प्रश्न नव्हता. हमरस्त्यावरून वळण्यापूर्वी पुनः एकदा डोंगर उतारावरच्या द्राक्षमळ्यांना डोळ्यात साठवून घेतलं. स्टेशनच्या दिशेने वळून स्टेशनजवळ येता येता श्रीशैलने आमच लक्ष वेधलं. तिकडे बघा. दूरवर किल्ल्याचे दोन्ही बुरूज आम्हाला बाय करत उभे होते!    

                                                                     पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड इंटरलाकेन      

Monday 20 April 2015

SWITZERLAND SION I


SION I

शीर्षक मुद्दामच इंग्रजीमधे दिलं आहे. आपण इथे जाणार आहोत म्हटल्यावर मला सुरवातीला चेष्टा वाटली होती. एकाच नावाची गावं असतात म्हटलं तरी हे जरा वेगळच नाही का? त्यातून स्वित्झर्लंड म्हटलं की आपलं ज्ञान वीणा पाटील किंवा केसरीने संपन्न केलेलं असतं आणि त्यात हे असलं काही वाचनात आलं नव्हतं. तर झालं असं की श्रीशैलच्या ऑफिसमध्ये कोणीतरी स्विस इंटर्न आला. स्वित्झर्लंडमध्ये मिलिटरी सर्व्हिस प्रत्येकाला आवश्यक(Mandatory) असते. किती विरोधाभास आहे नाही का हा? म्हणजे देश तटस्थ म्हणून प्रसिद्ध. कोणाच्या भानगडीत न पडणारा पण त्याला सैनिकी शिक्षण सक्तीचं करण्याची मात्र आवश्यकता पडावी! तर तो याचा कलीग किंवा मित्र इथे पोस्टिंगवर होता. त्याच्या प्रेमातलं हे गाव. म्हणून आम्ही तिथे! तसा बादरायण म्हणावा असा संबंध! पण आपल्या आयुष्यातल्या किती गोष्टींची आपण प्रामाणिकपणे, खरी आणि बुद्धीला पटतील अशी उत्तरं देऊ शकतो? हे पण त्यातलं एक असं म्हणायच!

आम्ही सिऑनच्या आधीचं स्टेशन सेंट लिओनार्ड इथे उतरणार होतो. झरमॅटहून निघून हा दोन तासांचा प्रवासमाझ्या कल्पनेतलं स्वित्झर्लंड हे कायम बर्फाच्छादिततिथे वर्षाचे बारा महिने लोकं कुडकुडत असतात असच होतंत्याला पहिला छेद दिला तो या छोट्या गावाने.  आतापर्यंत म्हणजे झरमॅट काय किंवा सेंट मॉरित्झ काय जरा स्वित्झर्लंडमध्ये आहोत असं वाटण्याजोगी परिस्थिती तरी होती. म्हणजे हवा थंड म्हणता येइल अशी. आम्ही उतरलो तेव्हा आपल्या दृष्टीने संध्याकाळ झाली होती पण ऊन मात्र कडक होतं. आम्ही रिझर्वेशन केलं होतं ते एक मोटेल होतं. दिलेल्या सूचनांप्रमाणे स्टेशनवर उतरून रस्त्यापर्यंत या आणि मग डेस्टिनेशनपर्यंत सरळ चालत रहा. आधी लक्षात आलं नव्हतं ते इथे वाचताना जाणवलं. ना अंतराचा ना वेळेचा उल्लेख. आम्ही वाटेत दोघातिघांना विचारून खात्री करून घेतली निदान रस्ता तरी बरोबर आहे याची. ऊन्हातून चालताना आणि अंतराचा अंदाज नसताना खूप दूर वाटलेलं ते मोटेल नंतर आम्ही फिरायला बाहेर पडलो तेव्हा मात्र तेवढं दूर भासलं नाही.

सेंट लिओनार्डला उतरण्यात आपद धर्म वगळता काहीच नव्हतं. सिऑन हे तस लौकिकार्थाने पर्य्टन नकाशावर आहे असं नाही. त्यामुळे तशा आणि तितक्या सोयी सुविधांची अपेक्षा करणं चुकीचं. तशीही इथे हॉटेल्स महाग आणि आत्ता भर सीझन तेव्हा मिळेल ते आणि परवडेल ते हा क्रायटेरिया इथेही लागू होता. एका दिवसाकरता आणखी काय हवं? सामान खोलीवर टाकून आम्ही आलो तसेच स्टेशनच्या दिशेने फिरत फिरत गेलो. डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे गाव. हमरस्ता आणि रेल्वे त्यामुळे जोडलं गेलेलं. त्यातून सिऑनसारखी या प्रांताची राजधानी जवळ. हे गावही इतर युरोपिअन गावांप्रमाणेच अगदी सुस्त होतं. स्टेशनच्या दिशेने जाताना रस्त्यावरच मांडलेला एक स्टॉल दिसला. दोन बायका होत्या आणि फ्रेश फार्म प्रॉडक्टस घेऊन बसल्या होत्या. त्यांच्याकडे टोपलीत असलेली पीचची फळं ताजी आणि रसरशीत दिसत होती. घेऊन तर बघू म्हणून आम्ही थोडी घेतली तर इतकी सुरेख चवीची होती की उरलेली फळंही आम्ही घेऊन टाकली. आणखी सटरफटर गोष्टी घेतल्या आणि निघालो. स्टेशनवर आलो तर गाडीला वेळ होता. रात्रीची परतीची शेवटची गाडी किती वाजता आहे ते आधी बघून ठेवलं. आणि पलीकडल्या बाजूला उगीच एक फेरी मारून आलो. इकडे तसं तिकडे हे कळत नव्हतं असं नाही पण अचानक काही हाती लागणारच असेल तर सुटू नये म्हणून खबरदारी!

सब वे मधून बाहेर आलो तर वार्‍याचा जोर वाढलेला. प्लॅटफॉर्मवरच्या काचेच्या बंद खोलीत जावं म्हणून बघत होतो तर तिथे हा कचरा टाकून ठेवलेला. इतक्या नेटक्या देशातलं हे लहानस स्टेशन, इथे फार कोणी बाहेरचे लोक येतही नसतील आणि इतका कचरा? त्यापेक्षा वारा परवडला म्हणून बाहेर सब वे जवळ जरा आडोसा बघून उभे राहिलो. गाडीला अजून अवकाश असल्यामुळे असेल पण तरूण मुलं वगळता फारस कोणी त्यावेळी प्लॅटफॉर्मवर नव्हतच.

इतक्यात खडख़ड आवाज आला. भीतीदायक वाटावा असा. एक कॉलेजमधला मुलगा सायकल चालवत आला आणि सायकलवरून न उतरता पायर्‍यांवरून खडखडत पायर्‍या उतरून सबवेमधून पलीकडे गेला होता. आम्ही अवाक होत बघत राहिलो. स्टंट म्हणून ठीक पण जीवावरचा खेळ हा. सायकल उलटली असती तर? त्यालाही बहुधा आमच्या प्रतिक्रियांची कल्पना असावी कारण पलीकडे गेल्यानंतर तो आमच्या दिशेने पहात होता. आम्ही वगळता इतर कोणीही या घटनेची दखलही घेतली नाही याचं मात्र मला राहून राहून आश्चर्य वाटत राहिलं. हा टिपिकल वेस्टर्न अ‍ॅटिट्यूड म्हणायचा की यात त्यांना काहीच नाविन्य नव्हतं?

गाडीच्या वेळेवर गाडी आली. प्लॅटफॉर्मवर फार कोणी नव्हतेच तसही सिऑन हे पुढचंच स्टेशन त्यामुळेही गर्दी नसावी. स्टेशबाहेर पडलो. युरोपात एक बर असतं सिटी सेंटर कुठे त्याकडे बाण दाखवलेला असतो. ते बहुतेक वेळा स्टेशनजवळच असतं आणि त्यापलीकडे गाव हिंडावं असं फार काही नसतं. त्यातून हे छोटं गाव! त्यामुळे विचारणं वगैरे काही प्रश्न नव्हता.

सिटी सेंटरही लहान. आम्ही इकडून तिकडून फेर्‍या मारल्या. सायकल घेऊन फ़िरणारे दिसत होते. लहान गल्ल्या बोळ, आपल्याकडे हिल स्टेशनला असतात तशा उतरत्या चढत्या छोट्याछोट्या पण नेटक्या गल्ल्या. फिरताना मजा वाटत होती. दोन तीन चकरा मारल्यानंतर किल्ल्यावर जाण्यापूर्वी जरा चहा पिऊन घेऊ या म्हणून थांबलो. झाडं छान दिसत होती. काहीतरी फळं आहेत असं वाटलं म्हणून निरखून पाहिलं तर बेरीज होत्या कसल्यातरी जांभळट काळा रंग आणि आत रस भरलेला. सहज म्हणून एक खाऊन बघितली तर चव चांगली वाटली. झाडं जरी सार्वजनिक असली तरी फळं खाताना कोणी दिसत नाही त्यामुळे मग इच्छा असूनही फार लोभ केला नाही.

किल्ला तसा समोरच दिसत होता. अंतराचा मात्र अंदाज आला नाही. चालायला लागल्यानंतर कळलं की वाटला तितका जवळ नाही. चालायला लागल्यावर असं वाटलं लांब आहे तेच बरं आहे. खूपच सुंदर गल्ल्या, चढाच्या, उताराच्या, फुलांनी मढवलेल्या. एरवी आम्ही तरी मुद्दाम या आडबाजूला कशाला येणार होतो? स्वच्छता, कचरा नसणं वगैरे आता नवलाईचं वाटावं असे आम्ही नवखे राहिलो नव्हतो. पण काही जरा नवीन दिसलं की ते टिपायचं ही वृत्ती असल्याने आणि अशा स्वच्छंद फिरण्यात दृष्टीस पडत असल्याने चालण्यातला आनंदही द्विगुणित होतो



एका घराजवळ एक कचरापेटी दिसली आणि त्यात एक पाइप सोडलेला दिसला. निरखून बघितल्यावर ती कचर्‍याची "व्यवस्था" आहे हे लक्षात आलं. वरच्या मजल्यावरून खाली न येता आणि कचरा इथे तिथे न सांडता तो थेट कचरापेटीत टाकण्याची ही युक्ती मला आवडली. ही लोकं डोक्याचा वापर करून कमी श्रम आणि जास्त सोय करण्यात किती माहीर आहेत ते पदोपदी लक्षात येतं.


गावात हिंडताना राहून राहून आठवण येत राहिली ती आपल्याकडली. आपली पूर्वीची गावही अशीच नेटकी, सुंदर असत. उतरत्या कौलांची आणि मातीशी नातं सांगणारी. पण आता त्यांना झालेल्या बॉम्बे फॅशनच्या घराच्या रोगाने मग उतरती कौलं इतिहासजमा झाली आणि बॉम्बे फॅशनची गच्ची गळते म्हणून मग त्यावर विद्रूप पत्रे उभे राहतात! आपल्याकडेही अशाप्रकारची गावाच सौंदर्य जपणारी नेटकी घरं कधी बांधली जातील हा विचार त्याच्या प्रत्यक्षात येण्याच्या धूसर शक्यतेने मन विषण्ण करून टाकणारा होता

                                               सिऑन भाग दुसरा आणि शेवटचा पुढील मंगळवारी 

Monday 13 April 2015

SWITZERLAND ZERMATT MATTERHORN ( II )


स्वित्झर्लंड : झरमॅट मॅटरहॉर्न  )

ती गाडी वर येइपर्यंत मग आम्ही तिथेच उभे राहिलो. शेवटच्या टप्प्यातली तिची ती वळणं अगदी दृष्ट लागण्याइतकी सुंदर होती. पण असे इथेच उभे राहून चालणार नव्हते. मॅटरहॉर्न समोर खुणावत होता

कसा आहे तो? पंख पसरून आकाशाकडे मान करून बसलेल्या पक्षासारखा. आपल्याकडचे राजे त्यांच्या रूंद खांद्यावरून खाली उतरणार्‍या पायघोळ झग्यात जसे साजरे दिसत तसा वाटला. एक शिखर उंचावरचं आणि चारी दिशांना असणारी थोड्या कमी उंचीवरची ती शिखरं यामुळे त्याचा तो डौल काही और दिसत होता




सर्वदूर पसरलेलं ताजं हिम त्याच्या त्या हिमशुभ्र रंगामुळे उठून दिसत होतं. आसमंतात फक्त आणि फक्त हिमसाम्राज्य असावं अशी चहूकडे पसरलेली पांढरी शुभ्र हिमशिखरं




आणि तरीही त्यात धाडसाच्या संधी शोधणारे असंख्य वीर. कितीजण आकाशात विहरताना दिसत होते. त्या शिखरांच्या पायथ्याकडे जाऊन परतण्यात सुख मानणार्‍या आम्हाला खिजवल्यासारखे ते त्या शिखरांपर्यंत जाऊन परतत होते. माणसाच्या या दुर्दम्य साहस वृत्तीकडे तो मॅटरहॉर्नही जणू चकित नजरेने स्तंभित होऊन पहात असावा!





पण डौल  हा काही मॅटरहॉर्नचा USP नाही. हा आत्ममग्न( narcissistic) आहे. इतका की पायथ्याशी असणार्‍या एका अल्पाइन तलावात आपलं सौंदर्य न्याहाळत तो कालक्रमणा करत आहे. त्या तलावाचं निळंशार पाणी आणि त्याचा अगदी आरशासारखा आकार हा खासच! वारा नसताना त्या नितळ स्तब्ध पाण्यात त्याचं प्रतिबिंब बघणं ही खरोखरीची पर्वणी. तिथे एक मुद्दाम ठेवावा असा खडक होता. त्याच्या बरोबर मागे मॅटरहॉर्न. आम्ही त्या दृष्याची पार्श्वभूमी लाभेल असा फोटो काढण्यासाठी थांबलो होतो पण तिथे त्या खडकावर एका जपानी जोडप्याचं फोटो शूट सुरू होतं. सगळ्या पोजमध्ये तिचे फोटो काढूनही त्या बाबाच समाधान काही होत नव्हतं आणि आम्ही त्या फोटोशिवाय तिथून हलणार नव्हतो. आम्ही तसेच उभे आहोत हे बहुधा त्यांच्याही लक्षात आलं. पंधरा मिनिटानंतर हौस फिटली म्हणून असेल किंवा आम्हाला कंटाळून असेल एकदाचे बाजूला झाले ते. आणि एकदम तो मागे आला, म्हणाला, आम्हा दोघांचा एक फोटो काढ, एकच . तो काढून झाल्यावर मात्र लगेच त्याने श्रीशैलच्या हातातला कॅमेरा घेतला आणि आमचा तिघांचा फोटो काढून परतफेड केली.




श्रीशैलनेही मग त्याची हौस भागवून घेतली. इतक्या कोनातून त्या शिखराचे फोटो काढले तरी समाधान होइना. पण पुढचा टप्पा तर गाठायचा होताच. टप्पा म्हणजे, आम्ही आता पुनः वर चढून गॉर्नरग्राटला जाऊन गाडी पकडणार नव्हतो. आम्ही चालत निघून रिफेलबर्ग या पुढच्या स्टेशनला परतीची गाडी पकडणार होतो. असे जाणारे फक्त आम्हीच नव्हतो. आमच्या समोर खूपजणं जाताना दिसत होती हाच विचार करून चालत जाणारी. कारण लक्षात यायला वेळ लागला नाही. गॉर्नरग्राट स्टेशन उंचावर होतं. आम्ही त्या तळ्याकडे आलो तो मोठा उतार पार करून. पुनः चढून वर जायचं या विरळ हवेत त्यापेक्षा पुढच्या स्टेशनची उताराची पायवाट बरी. हा फायद्याचाच सौदा होता. तशीही ही गोरी लोकं चालण्याला रडणारी वाटत नाहीत. कित्येक जण तर संपूर्ण मार्गात चालत चढणारे/ उतरणारे दिसत होते.




तसा हा मार्ग म्हणजे फक्त उतरण असेल असं वाटणं ही मात्र आमची चूक होती. डोंगरातली पायवाट ती. फक्त उताराची कशी असू शकेल. तीत चढ उतार दोन्ही असणार, असायलाच हवेत की. जीवनाचं तत्वज्ञान वगैरे पुस्तकात वाचून समजून घेण्यापेक्षा इथे ते प्रत्यक्ष अनुभवताना आणि निसर्ग भाषेत वाचताना अधिक आनंदाचं आणि प्रत्ययकारी असतं हे पटायला लागतं. सर्वदूर पसरलेले खडक, काळे कभिन्न आणि मधेच असलेला गवताचा हिरवा पट्टा, कधीतरीच अवचित सामोरी आलेली पिवळी रानफुलं, वर डोंगरमाथ्यावर चरताना दिसणार्‍या मेंढ्या, ऐन बर्फाच्या साम्राज्यातला निळाशार पाण्याचा डोह यातून आपल्यापर्यंत पोहोचणार्‍या जीवनाच्या तत्वज्ञानाने स्तिमित होत आम्ही मार्गक्रमणा करत होतो. या सगळ्या खडकाळ प्रदेशातही जीवन फुलतं याचं आश्चर्य वाटत होतं. दूरवर दिसणार्‍या झोपड्यांमधून कोणी इथे रहात असेल का? असे प्रश्न मनात उमटत होते. पुढून मागे जाणारे लोक, काही वेळा आम्ही कोणा प्रवाशांना मागे टाकून पुढे होत जात होतो. आणि हा प्रवाह कोणी मागे कोणी पुढे पण त्या पुढल्या स्टेशनपाशी एकवटत होता. गाडी तर सगळ्यांनाच मिळणार होती आणि ही चुकली तर पुढची होतीच की! त्यामुळे अस्वस्थता असण्याचा काही प्रश्न नव्हता.

आम्हाला फार वेळ गाडीची वाट पहावी लागली नाही. परतीचा प्रवास तसा म्हटला तर तृप्तीचा, म्हटला तर आता काही नाविन्य न उरल्यासारखा! पण तो केल्याशिवाय पुढल्या प्रवासाला कसं लागणार? आता आम्हाला पुढच्या प्रवासाची चिंता होती. आम्ही सकाळीच हॉटेलमधून चेक आऊट करून बाहेर पडलो होतो. सामान स्टेशनवरच्या लॉकरमध्ये टाकलेलं होतं . इथे या सोयी उत्तम आहेत. आपण त्यांची ओळख मात्र करून घ्यायला हवी. लॉकरच्या आकाराप्रमाणे त्यांचा चार्ज असतो. ती नाणी आपण आत टाकली म्हणजे लॉकर उघडणार नंतर सामान ठेवा आणि नंबरलॉकने बंद करा. कोणी माणूस आहे का? तो वेळेवर सामान परत देईल का ही भानगड नाही.

आम्ही पोहोचलो ते अगदी गाडीच्या वेळेत. त्यामुळे मग लॉकरमधून बॅगा काढून सिऑनची गाडी गाठताना तारांबळ उडाली खरी पण अशा घाईगर्दीने गाठलेली गाडी ही आखीव रेखीव पणे गाडीत दहा मिनिटे आधी जाऊन बसून केलेल्या प्रवासापेक्षा थ्रिल देणारी असते!. आता थेट सिऑन! स्पेलिंग जाणून घेण्याची उत्सुकता आहे? Sion! आम्ही गमतीने सायन सायन करत होतो.

                                                                        पुढील मंगळवारी सिऑन 


Monday 6 April 2015

SWITZERLAND ZERMATT MATTERHORN (I)

स्वित्झर्लंड : झरमॅट मॅटरहॉर्न (१)

आम्ही झरमॅटला उतरलो तेव्हा स्टेशनमधे काहीसा काळोख होता. हे शेवटचे स्टेशन त्यामुळे रहदारीला मर्यादा पडत असावी . गाडीबरोबर निघून जाणार्‍या गर्दीबरोबरच स्टेशनही निवांतपणा अनुभवतं.  थोडावेळ प्लॅटफॉर्मवर उभे होतो तेवढ्या वेळात गेलेल्या गर्दीनंतरचा स्टेशनचा निवांतपणा आम्हीही अनुभवला

नजरेत भरण्यासारखी गोष्ट म्हणजे जगभराच्या विविध भाषांमध्ये केलेलं प्रवाशांचं स्वागत. हिंदीमधलं सुस्वागतम वाचून जरा आपलेपणा वाटला खरा. तिथे लॉकर सुविधा आहेत का याची चौकशी करून आलेल्या श्रीशैलबरोबर आम्ही  बाहेर पडलो. स्टेशनबाहेर समोरच काटकोनात आणखी कोणतीतरी रेल्वे होती. आता माझ्यावर कसलीच जबाबदारी नव्हती त्यामुळे कोणती, काय बघायचे कष्टही मी घेतले नाहीत. सरळ रस्त्याला लागलो

चिंचोळा रस्ता, वाहनं फक्त इको फ्रेंडली म्हणजे बॅटरीवर चालणारी. रहदारी कमी कारण कार फ्री झोन. तरीही व्यवस्थित फुटपाथवरून चालणारे लोक. दोन्ही बाजूने फक्त आणि फक्त रहायची हॉटेल्स, रेस्तरॉं किंवा सुवेनिअर्सची दुकानं. स्विस नाइफचे असंख्य प्रकार लटकवलेले. आम्हाला त्याच रस्त्याने हॉटेलपर्यंत  जायचं होतं. स्टेशनहॉर्न असं त्या हॉटेलचं नाव. आरामात पुढे जात असता रस्त्याला मोरी असते तशी लागली. पाण्याचा ओहोळ खालून झुळझुळताना दिसला. आम्ही दोघे तिकडे बघत असताना श्रीशैलने आमचं लक्ष समोर वेधलं.




समोर तो उभा होता. पांढरे शुभ्र पंख पसरून. ध्यानस्थ! एकटक, नजरबंदी झाल्यासारखा दिसणारा. मॅटरहॉर्न नाव त्याचं आणि आपण त्याला भेटणार आहोत उद्या. आमच्या मार्गदर्शकाने(!) आठवण दिली. आतापर्यंत आम्ही अगदी हा सिमल्याचा मॉल रोड किंवा मनालीमधला रस्ता दिसतो वगैरे बोलत जात होतो त्यात एकदमच ट्विस्ट येऊन गेला त्याच्या दर्शनाने. पण त्याच्यात आत्ता गुंतायला वेळ नव्हता. आधी हॉटेलवर जाणं महत्वाचं होतं त्या दिशेने आम्ही कूच करते जालो!

मघा म्हटलं तसं खरोखरच आपल्याकडल्या हिल स्टेशनची प्रकर्षाने आठवण होत होती. आमच हॉटेल म्हणजे खाली रेस्तरॉं आणि वर आपल्याकडे लॉज असतं त्या प्रकारचं अर्थात ते तिथल्या वातावरणाला साजेसं फक्त रचनेची कल्पना यावी म्हणून स्पष्ट केलं. बॅगा टाकल्या की निघालं असाच एकूण आमचा खाक्या असतो प्रत्येक वेळी. आजतर तसे उशीराच पोहोचलो होतो. अपवाद कसा असणार? इतर ठिकाणांपेक्षा इथे गर्दी खूपच होती. आपले लोकही खूप दिसत होते. आम्हाला डोसा कुठे मिळतो ते शोधणारं एक आंध्रातलं नवीन लग्न झालेलं जोडपंही भेटलं! पुन्हा मागे वळून स्टेशनवर जाण्यात काही अर्थ नव्हता. हे गाव तसं छोटं त्यामुळे मग गल्ल्या बोळ, दुकानं हे सगळं फिरून घेतलं.

दुसर्‍या दिवशी जायच होतं मॅटरहॉर्न बघायला. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आकार आणि पुनः डेस्टिनेशनइतकाच तिथवरचा प्रवास रोमांचक. काल तसा त्याला बघितला ते दूरदर्शन होतं. दुरून डोंगर साजरे म्हणतात पण हे बर्फाच्छादित शिखरं असलेले पर्वत ऋषीमुनींप्रमाणे वाटतात. दराराही, आदरही आणि त्यांच्या प्रत्येक दर्शनात काहीतरी नव्याने सापडतं, हा निदान हिमालयातल्या शिखरांबाबतचा माझा अनुभव. आज आल्प्समधली शिखरं बघताना हा अनुभव ताडून पहायची संधी मिळणार होती.

सुदैवाने सकाळी हवा, आकाशवाणीच्या भाषेत, स्वच्छ आणि सूर्यप्रकाशयुक्त(?) होती. ढगाळ हवामान हा इथे शाप असतो. पर्यटकांच्या दृष्टीने तर फारच. त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम तर ते बदलू शकत नाहीत आणि ढगाळ वातावरणात काय कप्पाळ ती शिखरं दिसणार? आम्ही आमच्या नशिबाला स्वच्छ हवामानाकरता धन्यवाद दिले.

काल झरमॅटच्या स्टेशनवर उतरलो तेव्हा बाहेर पडल्यावर समोरच गॉर्नरग्राट बाह्न (Gornergrat Bahn) अशी पाटी बघितली होती. त्याच गाडीतून आम्ही मॅर्टरहॉर्न बघायला जाणार होतो. आतापर्यंतच्या आमच्या गाड्या फार सुंदर होत्या. ही गाडी सुंदर म्हणावी अशी नव्हती. रंग लाल. कदाचित बर्फ पडत असता उठून दिसावा म्हणून हा रंग घेत असावेत. तरीही आमची सेंट मॉरित्झची गाडी निश्चितच देखणी होती. यावेळी एक गोष्ट नजरेत आली की वर दोन पेंटोग्राफ होते आणि दोन रूळांमध्ये एक आणखी रूळासारखं काहीतरी दिसत होतं (magnatic?). ही पर्वतीय रेल्वे. चार हजार फुटांपासून ते चौदा हजार फुटांचा पल्ला गाठणारी. एकूणच हा चढ कठीण त्यात पुन्हा आत्ता नसला तरी हिमवर्षावातसुद्धा ही सुरू असणार त्याकरता कदाचित काही सोय असू शकते.

स्त्रीचं सौंदर्य बोहोल्यावर उठून दिसतं अशा प्रकारची एक म्हण (निदान समजूत तरी) आहे. गाडीच्या सौंदर्याबाबत ती जेव्हा झोकदार वळण घेते तेव्हा तिचा डौल बघावा. या गाडीला तर उंच पूल, बोगदे, अतिशय कठीण, उभे चढ, तीव्र उतार आणि वळणं यांच नुसतं वरदान लाभलेलं आहे.




संपूर्ण प्रवासात आपण कंटाळायला वावच नाही. आणि त्यातही खाली दूरवर धूसर होत जाणारं झरमॅट आणि दूरवर ध्यानस्थ बसलेला तो मॅटरहॉर्न म्हणजे नजरबंदीच असते. मार्गावरची स्टेशनं ही मुख्यत्वे पर्यटकांच्या सोयीकरताच आहेत. स्कीइंग करणारे, हायकर्स किंवा अगदी नुसते पर्यटकही, या सगळ्यांना या मधल्या स्टेशनवरून कुठे केबल कार पकडायची असते कुठे हायकिंगला जायच असतं. आम्ही मात्र या गाडीने थेट वरपर्यंत म्हणजे गॉर्नरग्राट स्टेशनपर्यंत गेलो. वर एक हॉटेल आहे, नेहेमीप्रमाणेच! स्टेशनचा परिसर सुंदरच आहे. परिसराची संपूर्ण आणि सविस्तर माहिती देणारा बोर्ड समोरच आहे. आम्ही तिथल्या पुलावरून बघत असताना खाली दूरवर गाडी वर येताना दिसत होती. गाडीत बसल्यानंतर आपल्याला मार्गातला खडतरपणा कळत नाही तो असा दूरवरून चांगला कळतो. ती गाडी वर येइपर्यंत मग आम्ही तिथेच उभे राहिलो. शेवटच्या टप्प्यातली तिची ती वळणं अगदी दृष्ट लागण्याइतकी सुंदर होती. पण असे इथेच उभे राहून चालणार नव्हते. मॅटरहॉर्न समोर खुणावत होता






                                                                            दुसरा भाग पुढील मंगळवारी

एक सूचना वारंवार करण्यात येत होती की फोटो मोठ्या आकारातच दिसावेत. यावेळेपासून ती अमलात आणत आहे. पूर्वीचे फोटोसुद्धा मोठ्या आकारात दिसावेत अशी व्यवस्था केली आहे. हा फरक कसा वाटला ते जरूर कळवा.