Monday, 6 April 2015

SWITZERLAND ST MORITZ (III)


स्वित्झर्लंड (सेंट मॉरित्झ) ()


सेलेरिना स्टाझ स्टेशनवर आम्ही उतरलो. उतरून कोणत्या दिशेला जायचं हा प्रश्नच नव्हता कारण रेल्वे लाइनला चिकटून एका बाजूला डोंगरच होता. रस्त्यावर गेलो आणि एक माणूस दिसला. हातातला कागद त्याला दाखवला. सुदैवाने इंग्रजी जाणणारा होता. मलाही त्याच बाजूला जायचं आहे म्हणाला. आमच्या हॉटेलच्या आधीच्या चौकापर्यंत आम्ही बरोबर गेलो तिथे त्याने आम्हाला ते दाखवले आणि स्वतः उजव्या बाजूला वळला. लांबवर चर्चचं टोक दिसत होतं. म्हणजे तो गावाच्या दिशेने पुढे गेला. युरोपातला हा अनौपचारीकपणा मला खूपदा अनुभवायला मिळाला. खूप जवळ येतील असही नाही पण तुम्हाला हवी असलेली मदत देण्यात कुचराई नाही. हा मला या लोकांचा मोठा गुण वाटला.

हॉटेलमधे आलो आणि श्रीशैलला आठवण झाली आज वर्ल्ड कप फायनल, फुटबॉलची! आम्ही येणार आणि आपण बरोबर प्रवास करायचा आहे या नादात बुकिंग करताना लक्षात न आल्यामुळे ही चूक त्याच्या हातून झाली असणार! नाहीतर फुटबॉलचा त्यांच्या आइंडहोवनमधला थरार सोडून तो आमच्याबरोबर आला नसता. त्याने हॉटेलमध्ये स्क्रीन आहे का विचारल्यावर रिसेप्शनिस्टने हो सांगितलं . थोडासा सुटकेचा निश्वास टाकून आम्ही फिरायला लगेचच बाहेर पडलो.

फिरायला म्हणजे कुठे हा तसा प्रश्नच होता. वातावरण क्षणात येते सरसर शिरवे असं. या थंडीत उगीच भिजायला नको ही आमची कटकट. आणि आत्तापासून घरात बसायला आलो आहोत का हा त्याचा प्रश्न

बाहेर पडल्यानंतर ढग दूर झाल्यावर वातावरणातही प्रसन्नता आली. रस्त्यावर सगळीकडे व्यवस्थित पाट्या होत्या. सेंट मॉरित्झला जायचं तर दोन रस्ते दिसत होते. एक गावातून जाणारा आणि दुसरा रेल्वेच्या कडेकडेने, डोंगर उताराला चिकटून जाणारा, पायवाटच असावी असा. गावात जाण्यात काहीच मतलब नव्हता. आम्ही मग डोंगराच्या कडेने जाणार्‍या रस्त्याकडे वळलो.चला! रमत गमत जाऊ. तीन साडे तीन किलोमीटर तर आहे असं म्हणून आम्ही सुरवात केली. रस्ता अगदी सुनसान. छान वाटत होतं. फक्त श्रीशैलचं सगळं लक्ष घड्याळाकडे होतं. दोन गोष्टी होत्या. एकदा मॅच सुरू झाली की मग सगळं गाव त्यात बुडून जाणार अगदी खाण्याचीसुद्धा पंचाइत होइल आणि दुसरं म्हणजे जर्मनी अर्जेंटिना दोन्ही तुल्यबळ तेव्हा पहिल्यापासून मॅच बघायला हवी. त्यातून स्वित्झर्लंडची एक भाषा जर्मनसुद्धा आहे त्यामुळे त्यांचा सॉफ्ट कॉर्नर जर्मनीकडे असेल. जर अर्जेंटिना जिंकले तर काय प्रतिक्रिया असेल ती इंटरेस्टिंग असेल नक्की असे सगळे विचार त्या अस्वस्थतेमागे होते.

सेंट मॉरित्झ आलं. एक प्रचंड मोठा तलाव, डोंगराच्या कुशीत विसावलेला. दुसर्‍या बाजूला स्टेशन. जरा चढावावर मग गाव. दूरवर दिसणारे बर्फाच्छादित डोंगर. पण एकूणच वातावरण झोपाळलेलं. एकतर पावसाची शक्यता वाटत होती. ढगाळ वातावरण, त्यामुळे अनुत्साह असेल पण एकंदरीतच जिवंतपणाचं कोणतही लक्षण दिसलं नाही. फुटपाथवर मधे एक झाडाच खोड होतं. पोखरून त्यात सुंदर फुलांची झाडं लावली होती.
व्हेनिसच्या आमच्या क्रिस्तिआनोच्या बोलण्याची आठवण झाली. सगळं एकदम पिक्चर परफेक्ट होतं. समोरचा रस्ता फार सुंदर होता. रशियन लोकांसारखे सरळ रेषा आखल्यासारखे रस्ते शहरात शोभत नाहीत त्यांना वळण असेल तर उठून दिसतं. अशा तर्‍हेचं काहीतरी अफगाणिस्तानातल्या रस्तेबांधणीसंदर्भात लिहिताना फिरोझ रानडे यांनी लिहिलं होतं. त्याची आठवण करून देइल असं इथलं हे झोकदार वळण म्हणजे एखाद्या लहान मुलीने घेतलेली गिरकी होती. बघत रहावी अशी! एखादं चित्र बघावं तसं ते व्यवस्थित मांडलेलं, सजवलेलं टिपिकल गाव बघून आम्ही परत निघालो.
वाटेत पावसाने गाठू नये हीच फक्त इच्छा होती. डोंगराळ भाग म्हटला की ट्रेल कधीच सरळ नसतो. तसा तो इथेही नव्हता. उंच सखल अशा रस्त्याने येता येता पावसाच्य़ा एका जोरदार सरीने आम्हाला झाडाच्या आश्रयाला आणलच. सुदैवाने फार परीक्षा न बघता थांबलाही लगेच. पण वातावरणात फरक नव्हता. म्हणजे हा पूर्णविराम नसून अर्धविरामच होता. आम्ही पाय उचलले. आता थंडीबरोबरच ओल्या कपड्यांमुळे हुडहुडी होती पण कसा कोण जाणे हवेत एक प्रकारचा उबदारपणा आला होता. त्यामुळे विशेष त्रास न होता आम्ही आठच्या सुमाराला हॉटेलवर गेलो. जरा ताजेतवाने होऊन जेवायला जाण्याकरता बाहेर पडू म्हणून निघालो आणि मग श्रीशैलची चलबिचल सुरू झाली.

गावात जरा दूर ते रेस्टॉरंट होतं. एक अगदी छोटा स्क्रीन तिथे होता त्यामुळे जेवता जेवता मॅच बघू हे शक्य नव्हतं. आणि तसही तिथे क्राऊड नव्हता त्यामुळे आरडा ओरड, चिडणं ही मजा आली नसती. मग त्याचा निर्णय झाला. निवांत जेवण आणि सरळ परत हॉटेलवर. तिथे सेकन्ड हाफ आरामात बघू. द्विधा मनस्थिती दोन्हीमधला आनंद हिरावून घेते. जिवाला स्वस्थता लाभल्यानंतर मग जेवणातही निवांतपणा आला. जेवून परत फिरलो. मघा वाटेत लागलेला चर्च टॉवर वगैरे नेहेमीची वैशिष्ट्य टिपत परतलो तेव्हा मॅचचा उत्तरार्ध सुरू होणार होता. हॉटेलमध्ये मोठा स्क्रीन असेल असं एकूण त्या रिसेप्शनिस्टच्या बोलण्यावरून वाटलं होतं तर आमच्या खोलीप्रमाणेच तिथेही टीव्हीच होता. मग तिथे सगळ्यांसोबत बसण्याचा उत्साहच एकदम मावळला. आम्ही आपले निवांत खोलीवर जाऊन मॅच बघत बसलो. जर्मनीच्या जिंकण्याचा आनंद लॉबीमध्ये साजरा केला जात होता. बाहेर मात्र थंडी म्हणून की त्यांचा स्वतःचा देश नसल्या कारणाने असेल पण विजयाच्या आनंदाचं वातावरण काही दिसलं नाही. अशा वेळी फटाके वगैरे वाजवायला या लोकांना शिकवलेलं नसावं!

इतक्या आतुरतेने वाट पाहिलेल्या त्या सामन्याने आणि त्या थंड त्रयस्थपणाने आमची एकूण निराशाच झाली. पण या निराशेचा आमच्यावर परिणाम होऊन द्यायलाही आम्हाला अवसर नव्हता. उद्या सकाळी लवकर उठून ग्लेशियर एक्सप्रेसने झरमॅटला जायचं होतं. रात्र बरीच झाली होती त्यामुळे स्वित्झर्लंडमधला पहिला दिवस आम्ही उद्याच्या ग्लेशियर एक्सप्रेसची स्वप्नं बघत रात्रीच्या स्वाधीन करून झोपेच्या आधीन झालो.p.s. / ता. क.    एखाद्या लेखाबाबत असं लिहितात का? मला माहित नाही. पण तसही प्रत्येकवेळी आपण पुराणातले दाखले शोधत गतानुगतिक का व्हायचं? नवीन वाटा शोधताना एखादी जुनी वाट हरवते, निसटूनही जाते. हे लेख लिहिताना  माझ्याकडे कोणतीही नोंद किंवा आधार नसतो.  यावेळी हा वेगळा प्रयोग मी करून बघत आहे. गेल्या सत्रात म्हणजे जेव्हा मी ऑस्ट्रिया आणि बार्सिलोनाविषयी लिहिलं होतं तेव्हा  मी प्रवासाहून परतल्यानंतर लगेचच सारे अनुभव  लिहून काढले होते. यावेळी मात्र मी हा नवीन प्रयोग केला. मनात होतं आपण जर तेच पुनः जगू शकलो तर? आणि खरोखर तो प्रवास मला तुमच्या सोबत उलगडत गेला. काही गोष्टी निश्चितपणे निसटून गेल्या आहेत. त्या अशा नंतर उफाळून वर येतात आणि मला जाब विचारतात की त्यांच्यात काय कमी होतं म्हणून मी त्यांना अडगळीत टाकल? मी त्यांची अगदी मनापासून क्षमा मागितली आणि सांगितलं की असं जेव्हा केव्हा होइल तेव्हा चुकीची दुरूस्ती असं एक प्रकरण असावं तसं मी हे लिहून काढेन आजचा हा तसा पहिला प्रयत्न.

सेंट मॉरित्झ प्रवासाविषयी लिहिताना किती बघितलं किती नाही हे मी आधी म्हटलं आहेच. त्यातल्या अनेक सौंदर्यस्थळापैकी एक महत्वाचं मी पार ठेवूनच दिलं. म्हणजे ते महत्वाचं म्हणून बाजूला ठेवलेलं तुम्हाला द्यायलाच विसरलो. गाडीतून बाहेर बघायची प्रत्येकाची ऊर्मी थोडी कमी झाल्यावर आम्ही जरा विसावलो होतो. मी गाडीच्या जाण्याच्या उलट्या दिशेला बसलो  होतो आणि श्रीशैल उत्तरा माझ्या समोर. एकदम डोळे विस्फारतात तसे झाले त्यांचे! शेजारच्या त्या जपानी जोडप्याने त्यावेळी  जो आवाज केला त्याला मी शब्दात पकडू शकत नाही हे दुर्दैव. मी मान वळवली. हे सारं लिहिण्याकरता लागलेला वेळही जास्त आहे. निमिषार्ध कशाला म्हणतात ते अशावेळी कळतं. तर समोर जे काही होतं त्याचा फोटो आम्ही माहितीपत्रकात पाहिला होता. त्यांनी त्याला via duct (त्यांच्या उच्चाराप्रमाणे व्हिआ डक्ट = पूल ) म्हटलं होतं आणि खरोखरच ते  दृष्य अप्रतिम होतं
प्रत्येकवेळी आपल्याकडलं उदाहरण आठवतच पण त्याला इलाज नाही. लांज्याहून रत्नागिरीला एस टी ने निघालो होतो. ती राजमार्गाने न जाता  कोणत्यातरी गावामार्गे म्हणजे व्हाया जाणारी एस टी आहे हे आम्हाला तिकिट काढल्यावर कळलं म्हणून मनातल्या मनात आम्ही नाराजही झालो होतो पण....... त्या एस टी ने आम्हाला कोकण रेल्वेवरचा अति सुंदर पूल दाखवला होता.  पुलावरून धडधडत जाणार्‍या गाडीसकट. आपल्याकडे पर्यटनाची दृष्टी नाही ते आम्हाला इथे येऊन कळलं. हे असे स्पॉटस या लोकांनी व्यवस्थित मार्केट केले आहेत आपल्याला ते माहितच नाहीत. इतक्या वेळा कोकण रेल्वेने प्रवास करूनही तो पूल आम्हाला  दिसणार नव्हताच त्याकरता दूरवरचा रस्ताच कामी येणार होता तो त्या व्हाया ..... रत्नागिरी एसटीने आम्हाला दाखवला!


                                                   इति सेंट मॉरित्झ. पुढील मंगळवारी ग्लेशियर एक्सप्रेस


4 comments:

 1. आनंद,
  आत्ताच तुझा स्वित्झर्लंड सेंट मॉरित्झचा झिमझिम पावसातला वाफाळणारा अनुभव वाचला.
  खरंतर बराच काळ किंवा गेले कित्येक लेख मी ज्याप्रकारचं प्रवास वर्णन अपेक्षून होतो त्याची पुसटशी झलक मला या लेखात सापडली.
  साधारणपणे मी तुझा लेख बुधवारच्या पहिल्या प्रहरीच वाचत आलो आहे. आणि आता इथून पुढे तर 'तत्क्षणी'च भिडायला हरकत नाही.

  आत्ता आत्ता पर्यंत तुझं प्रवास वर्णन सुखद प्रवासच होता. पण आजच्या तुझ्या लेखातील रस्त्यांच्या वळणांचा संदर्भसहीत उल्लेख आणि नाक्यावरील खोडाच्या कुंडीचा उल्लेख मोहरवून गेला. ( गेला कुठे ? राहिला )

  तुझ्या रोमच्या कलोसियम च्या लेखात मी ही अपेक्षा केली होती. २००० वर्षांपूर्वीच्या मानवी कलाविष्काराची भावना दडपून टाकणारी कलाकृती आणि अमानुष मानवी मन यांच्या वेढ्यात गोते खाणारी आपली ( माझी ) जाणीव याबद्दल मला वाटला होता तेव्हढासुद्धा उल्लेख येवू न देता तू पुढच्या प्रवासाला निघाला होतास. पँरीसच्या फुटपाथवर मधेच असणारी गटारांची झाकणं पितळेची असणं आणि त्यावर पुढच्या चौकात येणाऱ्या वाटांचे मार्गदर्शक बाण मला त्या कल्पनेत बराच काळ अडकवून ठेवायला ( अगदी आजसुद्धा ) कारणीभूत झाले. पण तू तर पुढचा चौक पार करून पुढेच निघाला होतास. पण तुझ्या डोळ्यांनी बघायचं तर, देशील ते पाहायला हवं. तुझं प्रवास वर्णन अप्रतिमच आहे पण ते प्रवासाच्या वेगाबरोबरच पुढे जातं असं मला कायमच वाटत आलं आहे.

  मी थोडासा रेंगाळणारा प्राणी असल्यामुळे प्रत्येक वेळेस तू इथे थांबशील, इथे तू त्या वस्तू किंवा वास्तूबद्दल अजून काहीतरी आत जाणवणारं लिहिशील असं जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा तू पुढच्या प्रवासाला लागलेला असायचास.
  आजचा तुझा ताक़. त्यामुळेच भावला.

  असलं काही असो किंवा नसो तुझे लेख अप्रतिमच आहेत. त्यामुळे हाच आनंद आम्हाला जाणवत राहील हि अपेक्षा.

  ReplyDelete
 2. वा आनंद ! ओघवत्या शैलीतील शब्दबद्ध केलेले व लगेचच फोटोंची पुष्टी मिळाल्यामुळे प्रत्येक ठिकाण अनुभवण्याचा आनंद दुणावतच गेला.तुझे बोट धरून सगळीकडे फिरत आहोत असेच वाटले.. फोटो फारच सुंदर.Via duct , रस्त्याचे झोकदार वळण,ओंडक्यात फुलवलेली फुलझाडे. वा वा . श्रीशैल चे पण कौतुक वाटले.प्राप्त परिस्थितीत द्विधा मनःस्थितीवर मात करून "आत्ता"च्या क्षणाचा आनंद निसटू न देणे व हिरमोड होऊ न देणे त्याला साधले हे विशेष.
  आनंद अशा सुंदर सुंदर प्रवासवर्णनासाठी तू जास्तीत जास्त हिंडत रहावस असा स्वार्थी विचार मनात येतोय.:-)

  ReplyDelete
 3. परत एक चुटपुट लावून संपणारा लेख.फोटो अप्रतिम.
  लहानसहान गोष्टींचे तुला असलेले कौतुक वाचकाला ती सवय लावते.

  ReplyDelete
 4. आता आम्ही प्रवास करतांना अशी सौंदर्य स्थळे शोधू

  ReplyDelete