Monday, 20 July 2015

निरोप

निरोप

13 ऑक्टोबर 2014पासूनचा प्रत्येक सोमवार हा मला प्रेयसीच्या भेटीच्या उत्कंठेची प्रकर्षाने आठवण करून द्यायचा. सोमवारी रात्री 12 नंतर मी लेख अपलोड करत असे. त्यात कोणते फोटो असावेत यावर शेवटच्या क्षणापर्यंत मनाचा निर्णय होत नसे. घरात शांतता आहे आणि आपण फक्त जागे आहोत. कोणाला न कळत आपण हे सगळं करायला हवं अशी उगीचच एक भावना मनात असे. आता पुढच्या सोमवारपासून प्रेमभंगाचं दुःख! (उदासीनता तुझा रंग कैसा अशी काहीतरी संदीप खरेची कविता डोक्यात घोळू लागली आहे.) ते विरहाचं ठरावं अशी मनोमन इच्छा!

प्रवासासंदर्भात माझी कोणत्याही प्रकारे नोंद ठेवण्याची पद्धत नाही. पण सगळी तिकिटं, सगळ्या इ मेल्स(अपार्टमेंट ओनर्सकडून आलेल्या) मी जपून ठेवतो. आणि सगळ्यात मोठं काम करतात ते फोटो. खूपदा त्या वातावरणात घेऊन जाण्याकरता फोटोंचा चांगला उपयोग झाला. आपल्याला आठवत नाही, लक्षात रहात नाही या माझ्या तक्रारींना या लिखित आठवणी हे सणसणीत उत्तर ठरावं. कदाचित आपण आठवायचा प्रयत्न करत नसू त्यामुळे विस्मृतीचा आभास निर्माण होत असावा. अल्झायमरची सुरवात अशीच होत असेल का? तसं असेल तर प्रत्येकानेच याप्रकाराने मेंदूला चालना देण्याचा हा उद्योग करायला हरकत नाही.

आम्ही खूप फिरतो, पायी फिरतो. तिघांपैकी एकाने जरी कंटाळा हा शब्द काढला असता तरी सगळं ओम फ़स होण्याची भीती होती. पण "समानशीले" असं या फिरण्याबाबतीत तरी आमचं आहे त्यामुळे हे सुखेनैव पार पडतं.

या पलीकडे एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं नशीब. आम्ही हा प्रवास केला तो 2014 सालच्या जुलै महिन्यात. त्यांचा (युरोपमधे) तो समर असतो त्यामुळे फारसा प्रश्न येत नाही. तरीही हवामानाची साथ नसेल तर काही खरं नाही. इथला पाऊस बेभरवशी, चिरचिरा आणि उदासीन! सगळा उत्साह घालवून टाकणारा. हतोत्साह होणे म्हणजे काय ते तो शिकवतो. आम्हाला हे धडे त्याच्याकडून मिळाले नाहीत हे आमचं मोठच भाग्य.

प्रवासात आपल्या खाण्यापिण्याच्या असलेल्या खोड्या, विशेषतः भारतीयच जेवणाची अपेक्षा खूपदा प्रवासातील आनंद हिरावून घेते. जाऊ तिकडे उपलब्ध पदार्थांवर भूक भागवण्याची सवय असेल तर मग हा अडथळा निर्माण होत नाही.


अशा सगळ्या सकारात्मकतेतून हा आनंद आमच्यापर्यंत पोहोचला. तसाच तो तुमच्यापर्यंतही पोहोचू दे ही साठा उत्तराची कहाणी.....   

SWITZERLAND LUCERNE


स्वित्झर्लंड ल्युसर्न

एंगेलबर्गहून निघालो आणि थोड्या वेळातच ल्युसर्न/ ल्युझर्नला (Lucerne/ Luzerne) पोहोचलो. नावांबाबतीत इथे गोंधळ होतो. इथली भाषा जर्मन आपण इंग्रजीतून जाणून घेतो. आपल्याकडे जसं शीवचं सायन होतं इंग्रजीत तोच प्रकार इथे होतो. शहर टूरिस्ट डेस्टिनेशन आहे. छोटस गाव पण आल्प्सची पार्श्वभूमी आणि सुंदर असा विस्तीर्ण तलाव हे या शहराचं वैशिष्ट्य. त्यातून तसं हे टिटलिसच्या जवळ आहे त्यामुळे सोयीचं. आम्ही संध्याकाळी स्टेशनवर उतरून तलावाजवळ आलो तेव्हा तिथे अक्षरशः जत्रा होती. गर्दी म्हणावी इतकी लोकं या तळ्याकाठीच्या खाद्यास्वादासाठी जमलेली होती. काहीजणांचा जलविहार सुरू होता. एकूणच अगदी उत्फुल्ल वातावरण होतं. कंटाळा येण्याला अजिबातच वाव नव्हता. आम्ही त्या तळ्याच्या काठाकाठाने जात होतो. पण लक्षात आलं की त्याचा आवाका खूप मोठा आहे तेव्हा फेरी मारणं वगैरे शक्य नाही. आपल्याकडे असलेल्या तासा दोन तासाचा वापर करायचा तर मग इथल्या प्रसिद्ध पुलांपैकी बघता आले तर बघितले पाहिजेत. हो, अर्थातच यांच्या जुन्या भागातून चक्कर मारणंही आवडण्याजोगं. मग आमची टाइम मॅनेजमेंट सुरू झाली.Alt stadt म्हणजे जुनं शहर. सुरवातीला युरोपात आल्यानंतर प्रत्येक शहरात बघण्यासारखं काय याचं उत्तर जुना भाग हे असे. मला मजा वाटे की काय ही लोकं जुनं जुनं जोंबाळून बसतात. आपल्याकडे सुद्धा हे फॉरिनर्स आले की त्यांना जुनी दिल्ली बघण्यात जास्त रस असतो. आता मात्र इतक्या ठिकाणचे जुने भाग बघितल्यानंतर त्याचं महत्व कळतं. जुन्या भागातला एकजिनसीपणा कळतो, त्यातला खानदानी आब कळतो. तिथे चकचकीतपणा नसतो पण एक ऐट असते. लोभस आत्ममग्नता असते. निश्चितच या गोष्टी मनाला भुरळ घालतात. विशेषतः या लोकांना त्याचं महत्व पटलेलं आहे त्यामुळे ते त्याला नूतनीकरणाच्या नावाखाली हिडिस आणि ओंगळ स्वरूप आणू देत नाहीत. या भागातले रस्ते अगदी छोटे असले तरी ते फरसबंदी असतात. कुठेही खड्डे आढळत नाहीत आणि इथल्या वाहनांना हॉर्न नावाचा अवयव नसतो आणि इथल्या प्रजेला शिस्त नावाची गोष्ट जनुकातच टोचल्यामुळे ते त्या छोट्या रस्त्याच्या कडेच्या अरूंद फुटपाथवरून खाली उतरून वाहनांना अडथळा आणत नाहीत. आम्ही हा सगळा माहोल खूप एंजॉय केला. पण अर्थात आज वेळेची खूपच कमतरता होती.

इथला प्रसिद्ध लाकडी पूल बघितला नाही तर मग आलो कशाला इथे हा प्रश्न पडावा. चॅपेल ब्रिज (Chapel Bridge) संपूर्ण लाकडाचं आच्छादन असलेला असा हा पूल चौदाव्या शतकातला सर्वात पुरातन पूल. कोणा नतद्रष्टाच्या सिगरेटमुळे लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या या पुलाची पुनर्बांधणी अगदी अलीकडची म्हणजे विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकातली. पुलाच्या अंतर्भागातली सजावट अनेकविध चित्रकारांच्या पुरातन चित्रांनी केली आहे. ही चित्रं ऐतिहासिक घटना चित्रित करणारी आहेत. या पुलाच्या मध्यभागात एक अष्टकोनी टॉवर आहे. तो तेराव्या शतकातला आहे. पुलाच्या बाहेरील अंगाला लगटून असलेली फुलं आणि पाण्यातली बदकं यांनी आणलेला जिवंतपणा पुलाला राजस रूप प्रदान करतो. पुलावरून चालत पलीकडे जाणं आणि दूरवरून त्याच्याकडे टक लावून बघत बसणं दोन्ही अतिशय आल्हादक आहे.आजचं फिरणं खूप झालं होतं, हाताशी वेळही कमी होता. आम्हाला परत जाऊन उद्या परतीच्या प्रवासाची तयारी करायची होती त्यामुळे इथे रेंगाळून चालणारं नव्हतं. पुढच्या वेळी आपण हा माऊंट टिटलिसचा भागच प्रामुख्याने करू असं श्रीशैलला सांगत आम्ही फ्रायबुर्गला जाण्याकरता स्टेशनकडे परतलो.

दुसर्‍या दिवशी परतीच्या (नेदरलॅंडसमधील आइंडहोवन येथील आमच्या घरी) मार्गात आम्हाला पुनः बर्नला येवून तिथून बाझलला यावयाचं होतं तिथे मग आम्हाला ती आमची ड्यूसेलडॉर्फपर्यंत नेणारी हाय स्पीड ट्रेन मिळणार होती. तिथून जर्मनीची बॉर्डर ओलांडून मग नेदरलॅंन्डसमध्ये येवून मग आमच्या आइंडहोवेनला येणारी गाडी! इतक्या या सव्यापसव्याला इथे थेट प्रवास म्हणतात!

आम्ही बाझलला आलो तेव्हा पुढच्या गाडीकरता थोडा वेळ होता. निघाल्यापासून तसं खाणं काही झालं नव्हतं. श्रीशैल म्हणाला इथे थोडं काहीतरी खायला मिळेल का बघू. आम्ही आपले गतानुगतिकासारखे त्याच्या मागोमाग. एका स्टॉलवरून खायला घेतल्यावर तो म्हणाला जरा पुढे जाऊ या. पुढे गेलो तर तिथे पाटी France आणि बाण दाखवला होता.आम्ही चकीत नजरेने बघत होतो. बाझल हे स्टेशन फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे स्टेशन तीन देशांच्या सीमेवर आहे. त्यामुळे एका बाणाच्या रेषेत आपण देश ओलांडतो. तर या बाजूला हा फ्रान्स दुसरीकडे म्हणजे आम्ही आता जाणार होतो त्या बाजूला एकीकडचा बाण जर्मनी दुसरीकडे स्वित्झर्लंड. आपल्याला No Mans land ची सवय असणार्‍यांना हे पचवणं जरा कठीणच! देशांमधल्या जाऊ द्या, आपल्या राज्यांच्या सीमेवरसुद्धा नाके असतात!
या अशाच एका नाक्यावर मी आता उभा आहे. माझ्या मनाच्या! इथून पुढे बाकी कोणालाही प्रवेश नाही. थोडक्यात मी आता थांबणार आहे. पुनः भेट होइल ही आशा आणि इच्छा दोन्ही आहे पण...... तोपर्यंत Auf Wiedersehen! अगम्य भाषेतलं हे पुनः भेटू का? असं वाटणं स्वाभाविक आहे पण या बाझलमधे स्वित्झर्लंड काय किंवा जर्मनीची काय भाषा जर्मन आहे तेव्हा तिचा मान राखायला हवा

Monday, 13 July 2015

SWITZERLAND MT TITLIS


स्वित्झर्लंड : माऊंट टिटलिस

त्या बर्फातून पुढे गेल्यानंतर तिथे एक छान तरंगता म्हणू की टांगता म्हणू, असा पूल होता (suspension bridge). आपल्याकडल्या लक्ष्मण झुल्यासारख्या त्या पुलावरून जाताना सतत बसणार्‍या हेलकाव्याने एक वेगळीच गंमत येत होती. खाली खूप खोलवर दरी दिसत होती तिच्याकडे बघून पोटात खड्डा पडावा. असा पूल म्हणजे आरडा ओरडा आणि फोटो यांना ऊत येतो. इथेही फारसं वेगळं नव्हतं.
पुलावरची गंमत संपते तिथेच मग बर्फाच्या गुहेचं प्रवेशद्वार आहे. की निर्गमनद्वार? काही का असे ना, आम्ही तिथून बर्फाच्या गुहेत शिरलो. कृत्रिम रित्या ठराविक तापमान राखलेली ती गुहा, आहे सुंदर. आत फोटो काढता येतील अशा छान जागा ठेवल्या आहेत. नागमोडी वळणाची, काही ठिकाणी उंची कमी असलेली, काही ठिकाणचा निळा प्रकाश सुंदर, गूढ वातावरण निर्माण करतो.
या अशा कृत्रिम सौंदर्याचही एक स्थान असतच आयुष्यात याबद्दल जराही वाद नाही. ते त्याचं स्थान मान्य करूनही मला वरून खाली येताना त्याच पातळीवरचा  अनुभव प्रत्ययाला आला. वर असलेला अथांग हिमसंचय आणि त्याचं हे कृत्रिम रूप यातून निवड करायची झाली तर मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचणार्‍या त्या हिमशुभ्र चादरीलाच माझ्याकडून झुकतं माप मिळेल.

गुहेतून बाहेर पडल्यानंतर मग आम्ही तिथल्या गॅलेरीत गेलो. सभोवतालचे सगळे पर्वत, शिखरं हे तर बघण्यासारखे आहेतच पण माऊंट टिटलिसवर स्मारक आहे ते आपल्या यश चोप्रांच्या DDLJ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचं. शाहरुख आणि काजोलचा एक मोठा कट आऊट तिथे आहे. शिलथॉर्न शिखरावर ज्याप्रमाणे त्या बॉन्डसोबत फोटो काढण्यासाठी अहमहमिका होती तोच प्रकार इथेही होता. आमचा अविनाशही याबाबतीत हौशी. शाहरुख काजोलबरोबरचा फोटो काढण्याची संधी तो कसा सोडणार?
उत्तराच्या मैत्रिणीने माऊंट टिटलिसला काय होतं? या प्रश्नाचं उत्तर वडा पाव दिलं होतं. गमतीचा भाग बाजूला, पण इथे खरोखरच भारतीय जेवण मिळतं. इथे वडा पाव काही मिळाला नाही. तिथल्या रेस्तरॉमधे गेलो तर एक सेक्शन भारतीय जेवणाचा होता. आपल्यासारख्या थाळ्या आणि सेल्फ सर्व्हिस. आपल्याला हव्या त्या गोष्टी पानात वाढून घ्यायच्या आणि काऊंटरवर जायचं. तिथे त्या थाळीतील पदार्थांचे वजनाप्रमाणे पैसे द्यायचे. नाही, प्रत्येक पदार्थाचं वेगळं वजन करत नाहीत तर सगळ्या थाळीतील पदार्थांच्या एकत्रित वजनाप्रमाणे पैसे द्यायचे. पण आम्हाला इतक्या सहजी अन्नप्राप्ती होणार नव्हती. आतून ताजे पदार्थ आणण्यासाठी तो माणूस गेला होता त्याची वाट बघत प्रतीक्षा करावी लागली. एकूणात इथे आम्ही येण्यापूर्वी येऊन गेलेल्या लोकांनी जेवणाचा फडशा पाडला होता. अर्थात याकरता आमची अजिबात तक्रार नव्हती कारण त्यांच्यामुळे तर आम्हाला गरम आणि ताजे पदार्थ खायला मिळणार होते. रांगेत मात्र आपल्याबरोबरीने गोरी लोकंही दिसत होती. त्यांच्यापर्यंत आपल्या पदार्थांची चव आणि कीर्ती पोहोचली असावी.

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर स्वित्झर्लंडमधल्या गिरीशिखरावर मिळालेलं भारतीय जेवण म्हणून त्याचं कौतुक पण बाकी ते चवीला सर्वसाधारण होतं. अर्थात ते तिथे उपलब्ध असणं हीच आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट होती. जेवणानंतर तस मग बाकी बघण्यासारखं काही उरलं नव्हतं. आम्ही थोडं इथे तिथे थांबून परतीच्या प्रवासाला लागलो.

पूर्वीच्याच क्रमाने परत आलो, ते ठिकाण जाण्याच्या ठिकाणापेक्षा वेगळी बाजू होती. इथे गाड्या लागलेल्या होत्या. आम्हाला पाहून वडा पाव, वडा पाव म्हणून हाकाटी झाली. म्हणजे उत्तराच्या मैत्रिणीने थाप मारली नव्हती तर! आम्ही कुतुहल म्हणून पुढे गेलो तर अविनाश म्हणाला आपण खाऊयाच. त्याला म्हटलं अरे आपण आत्ता वरून जेवून निघालो ना. पण त्याचं म्हणणं इथे आपण पुनः कधी येणार आहोत. आलो आहोत तर इथला वडा पाव पण होऊन जाऊ दे. तिथल्या वडा पावाची चवही चाखली. आमच्यानंतर येणारी आपली माणसही मग तिथे येत राहिली. गाडी मराठी माणसाची नव्हती. तो होता राजस्थानचा पण त्या गाडीवरचा माणूस मात्र मराठी होता, सातारकडचा. थोड्या गप्पा झाल्या त्यांच्याशी. आता इथे येऊनही त्या लोकांना 20-25 वर्ष होऊन गेली होती.

आता इथून एंगेलबर्ग आणि मग आमचा आणि अविनाशचा मार्ग वेगळा होणार होता. त्याचा इथे स्विसमध्येच प्रोजेक्ट होता. त्याचं जाण्याचं ठिकाणही जवळच होतं आणि आम्हाला वाटेत लुझर्न ला थांबून पुढे जायचं होतं. मग आम्ही इथेच निरोप घेतला. त्याला एंगेलबर्गमध्ये थोडा वेळ हवा होता. इतक्या थोड्या वेळात तो आमच्याबरोबर आमच्यातलाच झाला होता. किती थोड्या वेळात आपल्याला माणसाची सवय होते! कोण कुठला हा मुलगा, महाराष्ट्रातला म्हटला तरी भेटीचा प्रश्न आला नसता तर तो इथे या स्वित्झर्लंडमधे आणि तेही या माऊंट टिटलिसवर भेटावा! योगायोग वगैरे शब्द ऐकल्यावर हास्यास्पद वाटतात पण या अशा घटनांमुळेच याची प्रचिती येत असावी.


एंगेलबर्ग स्टेशनला आम्ही गाडीत चढलो. गर्दी खूप होती. पण आम्हाला बसायला मिळालं. आमच्या ठिकाणी एक जागा रिकामी होती. एक मुलगी इंग्रजीमधून कोरडेपणाने विचारून गेली रिकामी आहे का? नंतर तिचा तो कोरडा वाटणारा उद्धट स्वर कानावर आला, मी सामान आणते म्हटलं ना, तिथे जागा आहे आधी बसून घ्या! एक वयस्क गृहस्थ आणि त्यांच्याबरोबर त्यांची बायको दोघेही आले. बाई आमच्या इथे आणि ते पलीकडे बसले. मुलगी सामान आणायला म्हणून पुनः दुसर्‍या कंपार्टमेंटमधे गेली होती. मराठी कानावर पडलं म्हणून उत्तराने बाईंना विचारलं माऊंट टिटलिसला जाऊन आलात का? तर थोड्या ओशाळ्या स्वरात त्या म्हणाल्या, "नाही हो, तिकिट खूपच आहे ना. तिघांचे मिळून इतके पैसे खर्च करायला जिवावर येतं ना!” ऐकतानासुद्धा आम्हाला वाईट वाटलं. त्या मुलीचा राग, राग म्हणायचा की त्रागा म्हणायचा? तिची इच्छा जरूर होती दोघांना फिरवून आणायची पण..... आपण अर्थात नंतर म्हणू शकतो की इंटरनेटच्या युगात जी मुलगी स्वित्झर्लंडमधे प्रोजेक्टकरता आलेली आहे तिने आधी ही सगळी माहिती काढायला हवी होती म्हणजे हा त्रास आणि हिरमोड वाचला असता... जाऊ दे, काही गोष्टींवर विचार करून शिणायला होतं फक्त. आपल्याकडे उपाय नसतो काहीसुद्धा. त्यांच्या त्या नाराजीचा संसर्ग आम्हालाही थोडा वेळ झालाच.

                                                            पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड लुझर्न 

Monday, 6 July 2015

SWITZERLAND MT TITLIS


स्वित्झर्लंड माऊंट टिटलिस

बर्न शहरातील काम आटोपून फ्रायबुर्गला परत येण्याकरता श्रीशैलला चार वाजून गेले होते. आता फ्रायबुर्गहून पुनः बर्नला जाण्याचा अजिबातच उत्साह नव्हता. आम्ही मग तिथेच छान हिंडून घेतलं. त्या दोन लेव्हल्सवरल्या गावातला नवीन आणि जुना भाग आम्हाला सहजपणे वेगळा करता आला होता. आज दिवसभरात इतकी पायपीट झाली होती! आजवर इतके हिंडलो, कधीकधी तर नाहक सुद्धा जसं इंटरलाकेनचा हार्डर कुल्म, पण कधी चुकूनही पायपीट हा शब्द आला नव्हता, मनातही आणि लिखाणातही, आज या शहरी भागातल्या तशा अर्थहीन फिरण्याकरता मात्र तोच मनात यावा याची गंमत वाटते! पण या फिरण्याने आणि त्याबरोबरच्या शारीरीक दमणुकीतून झोप मात्र छान लागली. दुसर्‍या दिवसाच्या माऊंट टिटलिसच्या प्रवासाच्या प्रतिक्षेतल्या त्या रात्री शांत झोप आवश्यकच होती.

आम्हाला एका ठिकाणी गाडी बदलून टिटलिसला जवळ असलेल्या एंगेलबर्गला (Engelberg) उतरायचं होतं. जवळ जवळ सगळी गाडी टिटलिसला जाणार्‍यांची असावी. जनांचा प्रवाहो चालला अशी सगळी जणं मग स्टेशनमधून बाहेर पडून रस्त्यावर आली. आम्हाला व्हॅटिकनला जाताना जसं कोणालाही न विचारता आणि त्याहीपेक्षा पाट्या बघायच्या आधीच लोकांच्या वहात्या गर्दीवरून दिशा दर्शन झालं तोच प्रकार आत्ता इथे पुनः झाला. अर्थात इथे सर्वत्र पाट्या आहेतच. सूचनांप्रमाणे, चालत 15 एक मिनिटांवर आम्हाला पहिली केबल कार घ्यायची होती. ती पहिली 15 मिनिटंसुद्धा रस्त्याला समांतर जाणार्‍या पाण्याच्या खळाळत्या प्रवाहाने सुंदर केली. शहराच्या धकाधकीतून निसर्गाच्या सान्निध्यात तादात्म्य पावण्यासाठी तर हा 15 मिनिटांचा भाग नसेल ना? पण नसावं तसं, कारण काही खरे रसिक(?) ते अंतरसुद्धा बसमधून पार करणारे होते!इथे आमची मनःस्थिती मात्र ग्रेट होती. इतक्या हट्टाने हे ठिकाण आम्ही या प्लॅनमध्ये बसवलं होतं. जर ओम फस झालं तर? अर्थात आता विचार करून उपयोग नव्हता. रमत गमत आम्ही पहिल्या केबल कारपाशी पोहोचलो. एकापाठोपाठ येणार्‍या, काहीवेळा हाताने पकडून ठेवलेल्या छोट्या 6 जणांच्यासाठीच्या या केबल कार्स. जत्रेतल्या फिरणार्‍या चक्राची आठवण यावी तस होतं . फक्त आम्हाला लहान मुलांप्रमाणे उचलून त्या चालत्या कारमध्ये टाकून देणं नव्हतं! एकापाठोपाठ एक अशा न थांबता घाईत बसायला लागावं अशा तर्‍हेने आत चढावं लागत होतं. कित्येक वेळा ग्रूपने बरोबर जाण्याकरता म्हणून एखाद्या कारमध्ये तीनच किंवा चार चार माणसंच फक्त दिसत होती. आमच्या कारमध्ये आम्ही तिघं आत गेलो आणि एक मुलगा मागोमाग आला. एकटाच होता. आपला, भारतीय. खरतर इथे भारतीय असण्याचं फारस कौतुकाच वाटाव अशी परिस्थिती नव्हती कारण पैशाला पासरी म्हणावे इतके भारतीय इथे दिसत होते. सवय असते ना त्याप्रमाणे आम्ही हसलो, तोही. कुठून आलात या नेहेमीच्या प्रश्नाने झालेली सुरवात मग आम्ही पुनः एंगेलबर्ग स्टेशनवर जाण्याकरता वेगळ्या दिशांना जाईपर्यंत कायम राहिली.

या छोट्या केबल कार्समधून एकामागून एक जाताना मजा येत होतीच पण आम्हाला त्या कारमध्ये बसल्यानंतर समोर दिसलेल्या पाटीने आधी लक्ष वेधून घेतलं. "बैठ लीजिए किंवा बैठे रहिये" अशी काहीतरी पाटी होती. हिंदीमधून पाट्या लिहिण्याची आवश्यकता वाटावी इतके भारतीय इथे येतात हे या पाट्या ओरडून जगाला सांगत होत्या. अमेरीकेमध्ये नायगाराला ज्याप्रमाणे भारतीय लोकांव्यतिरिक्त इतर लोक शोधावे लागतात त्याप्रमाणे इथे अवस्था असावी.

पहिला टप्पा संपला. दुसर्‍या टप्प्यातली केबल कार मोठी होती. त्याच्यावरच्या माहितीप्रमाणे 80 माणसांची क्षमता असलेली ही भली मोठी केबल कार होती. आता आम्ही चौघं असलो तरी इतर लोकही असल्याकारणाने जरा एकमेकांपासून दूर होतो. आतापर्यंतच्या सततच्या केबल कारमधल्या प्रवासाने आणि युंग फ्राऊ रीजनमधल्या शिखरांवर जाण्याच्या अनुभवाने आता आमचं लक्ष बाहेर होतच पण आतही काही टिपण्यासारख्या गोष्टी आहेत का याचा वेध घेत होतं. मघाचा सहप्रवासी इथे तिथे हिंडून पुनः आम्हाला जॉइन झाला होता. प्रवासाचा दुसरा टप्पा संपला.

आता तिसरा आणि शेवटचा टप्पा. जगातला पहिला फिरता गंडोला (World's first revolving Gondola) अशी ज्याची जाहिरात केली जाते त्यातून आता आम्ही जाणार होतो. याआधीच्याप्रमाणेच ही केबल कारही मोठी होती. गर्दी खूप होती. भारतीय जास्त, हे पुनः सांगण्याची आवश्यकताच नाही. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावरची उत्सुकता. गंडोला आल्यानंतर साहजिकपणे आत जाण्याकरता अहमहमिका. खरतर एकदा फिरणारी केबल कार म्हटल्यावर कुठेही उभे राहून चालणार होतं. पण वास्तव तसं नव्हतं. गर्दी खूप होती त्यामुळे जे कठड्याला टेकून उभे होते त्यांना चांगली जागा होती. इथला आमचा चालक मात्र मजेशीर होता. त्याने सुरवातीला नमस्ते केलं . "चाली चाली" असे काहीतरी तो "हिंदीतून" बोलत होता. कदाचित एक दोन वाक्य माहित झाली असावीत त्याचा उपयोग करत असावा. आपल्याकडच्या माणसांचं इथे येण्याचं प्रमाण बघितल्यावर हिंदीमधल्या सूचना, घोषणा आणि असे अनौपचारीक संभाषणाचे प्रसंग हे स्वाभाविक म्हणायला पाहिजेत. ही पर्यटन क्षेत्रातली लोकं बहुभाषी असतात हेच इथेसुद्धा प्रत्ययाला येत होतं
माऊंट टिटलिसला उतरलो. बर्फाचं आता काय कौतुक? असं मनात येण्याआधी मनाने निर्वाळा दिला, नाही, इथे आलो ते बरं झालं. आतापर्यंत बघितलेल्या ठिकाणी बर्फ होताच. पण इथे आम्ही बर्फात होतो. नुकता पडलेला, ताजा ताजा, पायघड्या घातल्या आहेत जणु असा. त्याच्या त्या मऊसूत पणाचीच तर आम्हाला भीती वाटत होती. एखादा साळसूद मुलगा साळसूद चेहेर्‍याने हरकती करत असतो तसा तो बर्फ वाटत होता त्यावेळी. आम्ही त्यातून चालत होतो. आम्ही त्या बर्फातून चालत असता श्रीशैल आईबरोबर होता कारण सतत पाय घसरणं, अडकणं हे सुरू होतं. तिला हसत असताना एक दोन वेळा माझ्यावर जमिनीला समांतर होण्याची (पडलो तरी नाक वर ही म्हण म्हणूनच आली असावी!) पाळी आली त्यावेळी आमचा केबल कारमधला मित्र, त्याचं नाव अविनाश पाटील, चटकन पुढे आला. काका हात धरू का? मी म्हटलं बाबा माझा चालण्यातला आत्मविश्वास जाईल तू हात धरलास तर. मी माझ्या अंदाजाने येतो. त्यानेही उगीच आग्रह केला नाही पण तो त्या सगळ्या बर्फातील चालण्यामधे सतत बरोबर मात्र राहिला.

                                                        उर्वरित भाग पुढील मंगळवारी

Monday, 29 June 2015

SWITZERLAND FRIBOURG


स्वित्झर्लंड फ्रायबुर्ग 

इंटरलाकेनमधला शेवटचा दिवस. मनसोक्त हिंडून झालं होतं. आता फिरण्याने मन भरलं होतं. पण स्वित्झर्लंडमध्ये आता पुरे असं म्हणायची सोयच नाही. खरतर जेव्हा या ट्रीपचं आम्ही ठरवत होतो, यातला आम्ही हा उगाच आहे, खरतर श्रीशैल ठरवत होता आणि मेलवरून आम्हाला हे tentative आहे तुम्ही एकदा हो म्हटलत की मग पुढे जाऊ असं सांगत असे. त्याला उत्तर देताना मेलमध्ये आम्ही मम म्हणत असू एवढाच संबंध आमचा. पण याला एक मोठा अपवाद आहे. इंटरलाकेन शेवटचं. तिथून बर्न ही त्यांची राजधानी. तिथे दोन दिवस राहून बाझलला (Basel) येऊन आपल्याला आइंडहोवनपर्यंत थेट गाडी आहे असं त्यानी सांगितलं मात्र, उत्तराच्या अॅटिनाने काम करायला सुरवात केली.

आत्तापर्यंत वीणा पाटील, केसरी आणि तत्सम यांच्याबरोबरीने सीरिअलमधील हनीमूनर्समुळे झालेल्या ज्ञानाप्रमाणे युंगफ्राऊचं नाव आलं पण माऊंट टिटलिस काही हा म्हणायला तयार नाही हे तिच्या लक्षात आलं. ते विचारल्यावर श्रीशैल म्हणाला ते खूप आऊट ऑफ वे आहे आणि इथल्या साइटसवरून काही फार छान असेल असं वाटत नाही. तो रीजनच वेगळा आहे. एकतर हा युंग फ्राऊ रिजन किंवा माऊंट टिटलिस. तुम्ही काय ते ठरवा आणि सांगा.

आमच्याकडे टप्प्याटप्प्याने, नेगोशिएशन वगैरे शब्दच कोशात नाहीत. थेट तलवार काढून लढाईला सुरवात! माऊंट टिटलिसला जाता येणार नसेल तर मग स्वित्झर्लंड नको दुसरा देश बरा. श्रीशैल अवाकच झाला असावा. त्याने आतापर्यंत सगळं ग्राऊंडवर्क पूर्ण केलं होतं. तसा tentative प्रोग्रॅम आम्ही हो म्हटला होता. कालपर्यंत यावेळी फक्त स्वित्झर्लंड, त्याशिवाय काही नाही म्हणणारी आई ती हीच का असा प्रश्न त्याला पडला असेल. तो म्हणाला ठीक आहे मी कसं बसवता येईल ते बघतो आणि सांगतो. सगळं बघून एक दिवस इकडचा तिकडे करून मग त्यात हे माऊंट टिटलिस जेव्हा आलं तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला! तिचीही परिस्थिती बिकट होती. आत्तापर्यंत जाऊन आलेल्या प्रत्येकाने माऊंट टिटलिसला गेला नाहीत तर मग आयुष्य फुकटच असा सूर लावला होता. अखेरीस तिच्या इज्जतका सवाल होता! तर मांडवली कसली सपशेल शरणागती देऊन ते टिटलिस आमच्या प्लॅनमध्ये समाविष्ट झालं.

तर इतक्या कष्टाने मिळवलेल्या या ठिकाणाविषयीची उत्सुकता ताणलेली निश्चित होती. त्याला आणखी एक कारण होतं इंटरलाकेनला उर्सुलाही पटकन म्हणाली होती You are visiting Mt Titlis also? Strange! कदाचित श्रीशैल म्हणत होता ते खरं असावं. असावं नाही होतच. नंतर जेव्हा आम्ही परत आल्यावर नेट सर्च केला (हे असं उलटं गाडं असतं आमचं) तेव्हा हे आमच्याही लक्षात आलं.

आम्ही इंटरलाकेनहून ट्रेनने निघालो. प्रवासाचा हा तसा शेवटचा टप्पा. आम्हाला बर्न (Bern या शहराच्या नावाची, म्हणण्यापेक्षा उच्चाराची गंमत आहे. आपण बरा मधला ब न घेता हिंदीतल्या बहकावामधला ब चा उच्चार त्यांना अभिप्रेत असतो आणि आपला चुकलेला उच्चार ते आपल्याकडून बरोबर म्हणेपर्यंत म्हणून घेतात हा आमचा स्टेशन काऊंटरवरचा गमतीशीर अनुभव.) या त्यांच्या राजधानीच्या शहराच्या जवळ असलेल्या फ्रायबुर्ग (Fribourge) ला जायच होतं. तिथे स्टेशनजवळचं एक अपार्ट्मेंट आम्ही बुक केलं होतं. ट्रेनच्या या प्रवासात सोबतीला नेहेमीप्रमाणेच बर्फाचे पर्वत, खळखळणार्‍या नद्या, गायींची खिल्लारं, त्यांची पिक्चर परफेक्ट गावं वगैरे वगैरे. प्रवास खूपच छान होतो इथला. वातावारणामुळे आणि अर्थातच सोयीसुविधांमुळेही. बर्न आलं आणि श्रीशैलने त्याच्या कामाकरता त्याला शहरातच एका ठिकाणी जायचं असल्याकारणाने आम्हाला निरोप दिला. आम्ही दोघं आता फ्रायबुर्गच्या दिशेने दुसर्‍या गाडीने निघालो. अगदीच जवळ असलेलं ते उपनगर. उतरलो आणि आपली अक्कल चालवण्यापेक्षा कोणा माहितगाराला विचारावं म्हणून विचारलं आणि त्याप्रमाणे निघालो. जवळ असलेलं ते ठिकाण 20 मिनिटानंतरही आलं नाही तेव्हा जरा काळजी वाटून आम्ही थांबलो. एवढ्यात मघाचा तो माणूस मोटरसायकलवरून परत येताना दिसला. आमच्याकडे थांबून म्हणाला मी बहुधा तुम्हाला चुकीचा रस्ता सांगितला. पण मला खात्री वाटत नाही. तुम्ही जरा मला पत्ता पुनः दाखवाल का? मी तिथे जाऊन येतो तुम्ही मात्र इथून कुठे जाऊ नका. आम्ही गारच झालो. त्याला पत्ता दाखवला, तो गेला आणि आम्ही असेच रस्त्यावर उभे. एवढ्यात एक मुलगी समोरून आली आणि थांबून विचारू लागली काही मदत हवी का म्हणून. आम्ही पत्ता दाखवला. तिने तो मोबाइलवरून बघून आम्हाला सांगितला आणि ती निघून गेली. एवढ्या दरम्यान श्रीशैलचे दोन तीन फोन, बाबा त्या बाईला कामावर जायला उशीर होतो आहे जरा लवकर पोहोचा. आम्ही निघालो शेवटी त्या मोटरसायकलवाल्या माणसाची वाट न पहाता. तेवढ्यात पुनः श्रीशैलचाच फोन ती बाई स्टेशनवर तुम्हाला नेण्यासाठी आली आहे तेव्हा तिला भेटून तुम्ही को ऑर्डिनेट करा. ती स्टेशनबाहेर भेटली आणि आम्ही घरी गेलो.

शहरातलं घर. नेटकं, व्यवस्था असलेलं. तिने किल्ली दिली. जाताना दाराबाहेरच्या डोअर मॅट खाली किल्ली ठेवून जाण्याच्या सूचना दिल्या. तिची आणि आमची आता पुनः भेट होणार नव्हती. महत्वाचं सांगायचं राहिलं. ही बाई या फ्लॅटच्या मालकिणीची मैत्रीण. ती आणखी कुठेतरी रहात होती. ही मालकीण सध्या पोर्तुगालला गेली होती, तशी ती कायम तिच्या कामानिमित्त जगभर फिरतच असते. ती जेव्हा इथे नसते तेव्हा हे अपार्टमेंट भाड्याने देतात. म्हणजे इन्कम सोर्स सुरू. घरात बघितलं तर तिच्या भरलेल्या वॉर्डरोबसकट सगळ्या गोष्टी होत्या. कुठेही कुलूप नव्हतं. आणि हे सगळं येणार्‍या कुठल्यातरी देशाच्या माणसांवर भरोसा टाकून ती जगभर निवांतपणे हिंडत होती. हा माणसांच्या ठायी असलेला विश्वास तिने कसा कमावला असेल? आम्ही आश्चर्य करत होतो.

ती बाई गेल्यानंतर आम्ही आपले चहा पिऊन बाहेर पडू या असा विचार करत होतो. आवरायचं म्हणून उत्तरा टॉयलेटला गेली ती मला हाका मारत सुटली. म्हटलं प्रॉब्लेम काय झाला असावा आत्ता? मी जाऊन बघितलं तर ती हसतच सुटली. " हे बघा काय आहे इथे" मी थंड पडलो. त्या कमोडच्या फ्लश टॅंकवर एक गणपतीची तस्बीर विराजमान झालेली होती. हे काही आपलं घर नाही. कुठे काय ठेवावं हा त्या मालकिणीचा प्रश्न. वगैरे तात्विक विचार मनात आले. पण तिला या गोष्टी कळणार नाहीत हेही आम्हाला समजत होतं. शेवटी गणपती बाप्पांना म्हटलं जरा आम्ही असेपर्यंत तरी आमच्याबरोबर लिविंगरूममध्येच आम्हाला सोबत करा.


बाहेरच्या खोलीत आलो तर घरात विविध देवांचे फोटो ठिकठिकाणी होतेअगदी तिच्या वॉर्डरोबमध्येही फोटो चिकटवलेला होतात्याव्यतिरिक्त खूप काही बघायला मिळालंती जगभर हिंडत होती ती योगप्रसाराच्या निमित्तानेआमच्या आजवरच्या अनेक यजमानांपैकी ही बाईसुद्धा भारतात खूप वेळा योगसाधना आणि शिक्षण यासाठी येवून गेलेली होतीअसं जरी असलं तरी देवाधर्माच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असतातअगदी घाटावरल्या माणसांच्या आणि कोकणातील माणसांच्या सोवळ्या ओवळ्याच्या कल्पनांमधे फरक पडतो तर तिला फ्लश टॅंकवर गणपती ठेवण्यात काय गैर हे कळण्याची आपण अपेक्षा करणं जरा जास्तच हे आम्हाला पटत होतं.

                                                                पुढील मंगळवारी माउंट टिटलीस