Thursday 11 July 2024

आषाढीची वारी: ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगाव उभं रिंगण १

 वारीविषयी एवढं ऐकलं आहे आजवर की निदान एकदा तरी हा अनुभव घ्यावा असं राहून राहून वाटत होतं. काही गोष्टी या बघून अनुभवायच्या असतात, प्रत्येक अनुभव स्वतः घेण्याचा अट्टाहास करणं हे आवाक्याबाहेरचं आहे याची जाणीव वाढणारं वय प्रकर्षाने देत होतं. पण अशी संधी केव्हातरी अचानक समोर येते हा विश्वासही होता.


माझा मित्र श्रीरामची आमच्या ग्रूपवरची पोस्ट आली आणि ही आत्ता किंवा कधीच नाही अशी मनाशी खूणगाठ बांधली. त्यावेळी दुसरा मित्र सारंगचा त्यावरचा अंगठा नजरेला पडला. माझी प्रतिक्रिया नेहमी प्रमाणे चिडचिडीची. फोन केला. तू पोस्टवर अंगठा टाकतोस याचा अर्थ काय समजायचा? तुला येण्यात रस आहे की नाही? तो खरंतर कुठेही आणि कधीही तयार असतो तरीही मी आपलं उगीच दमात विचारलं. दोन दिवसांत सांगतो म्हणून त्याने क्लासची पर्यायी व्यवस्था केली आणि नंतर आमचं श्रीराम बरोबर बोलणं होऊन नक्की ठरलं.


त्याचा उत्साह काय वर्णावा? त्याने आमचा ट्रॅव्हल प्लॅन तयार करून पाठवला. रिझर्व्हेशन आमच्यावर सोपवली हे नशीब.


आठ तारखेला उजाडत आम्ही मुंबईकर सातारला उतरलो. त्या आधी अर्धा तास श्रीरामचा फोन. आम्ही रीक्षा करून पोहोचायच्या आत हा हॉटेलच्या दारात स्वागतासाठी उभा. आमचं चेक इन आटोपलं "तुम्ही आता विश्रांती घ्या. नंतर गाडी पाठवतो तुम्ही घरी या. माझी प्रभातफेरीची वेळ झाली " म्हणून हा निघाला.


त्याच्याकडे गेलो तेव्हा चंद्रशेखर टिळक,  डॉ श्रोत्री आणि स्त्री वर्ग उपस्थित होता. या सगळ्या त्याच्या गीता पठण ग्रूप मेंबर्स. आदिम प्रमाणे त्यांनाही आमंत्रण आग्रहाचं असणार. 


सकाळी चहा न्याहारी आवरून स्थानिक देव दर्शन झालं. दक्षिण काशी म्हटलं जाणारं माहुली येथील कोयना वेण्णा संगमावरची दोन्ही काठांवर आमनेसामने असलेली दोन प्राचीन शिव मंदिरं बघितली. 


आम्हाला लोणंदला जायचं आहे हे डोक्यात होतं कारण पालखीचा मुक्काम तिथे होता. पण आम्ही निघालो ते मात्र कापडगावकडे. पालखी निमित्ताने अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. आम्ही रिंगण बघायला जाणार होतो ते होतं तरडगावला. म्हणजे पालखी लोणंदहून निघून कापडगावमार्गे तरडगावी जाणार होती. कापडगाव का तर तिथे गाडी पार्क करून ठेवता येणार होती. तर या बंद रस्त्यांच्या भूल भुलैयातून एका काहीशा कच्च्या रस्त्यावरून आम्ही कापडगाव गाठलं.


गाडी पार्क झाली आणि डिकीतून एक एक वस्तू निघाल्या. कणीक, तांदूळ असा शिधा राजगिरा लाडू हे सगळं घेऊन निघालो. देणार कोणाला? माहीत नाही. पण सुकाणू धरणारा माणूस जागेवर होता. त्याने अनुभवी नजरेने दिंडीचा मुख्य माणसांपैकी कोणाकडे तरी तो शिधा स्वाधीन केला. दिंडी मधील लोकांना वाटेत अशाप्रकारे शिधा देतात. अन्नदान सेवा. असे किती हात लागत असतील. नतमस्तक होऊन जातो आपण या वातावरणात.


या वेळपर्यंत आम्ही इथे तिथे विखुरलेली, जेवणारी, विसावलेली माणसं पहात होतो. श्रीरामने सांगितलं होतं की आता दिंड्या यायला सुरुवात होईल. त्यांच्या बरोबरीने पण दुसऱ्या बाजूने आपण चालत राहायचं आहे. रस्ता उत्तम रूंद. मधे व्यवस्थित दुभाजक. त्याच्या एका बाजूने सगळ्यात पुढे भगवा झेंडाधारी पंधरा वीस जण आणि त्या मागून शिस्तित एकाच बाजूने जाणारा तो प्रवाह. पांढरा सदरा आणि लेंगा किंवा धोतर आणि पांढरीच गांधी टोपी हा वेष.  स्त्रिया नऊ वारी, पाच वारी साड्या, काही पंजाबी ड्रेस मधल्या आणि लहान मोठी मुलं, तरुण सगळे. काही बायकांच्या डोक्यावर तुळशीवृंदावन. चालताना नामस्मरण, भजन, टाळ झांजा असं सगळं. सगळं एकरंगी वाटावं असं. दूर दूरवर फक्त भगवे झेंडे, पांढऱ्या टोप्या. भारलेलं वातावरण.


या दरम्यान सोबत आणलेल्या राजगिरा लाडूचं वाटप सुरू होतं. आमच्यापैकी कोणीतरी सुका मेवा आमच्यात वाटला. एका बाईने तिच्याकडे मागितला तिने तिच्या हातातला. सगळा तिच्या ओंजळीत टाकला आणि शांतपणे चालू लागली.


रस्त्याच्या कडेने काही दुकाने गावकऱ्यांनी लावलेली होती. चहा फरसाण इ बरोबरच पाच रूपयात ग्लासभर ऊसाचा रस देणारी दुकानेही पुष्कळ होती. आम्हीही रसपान केलं. गर्दीतून आमची मार्गक्रमणा सुरु होती पण किती जायचं आहे याचा अंदाज लागत नव्हता. 


आता गर्दीने एकूण परिसर फुलून गेला होता. मध्यावर (दुभाजकावर )लोकं बसून होती किंवा उभी होती. एकीकडे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती होत्या. आणि एक स्क्रीन. त्यावर अधूनमधून गर्दीची ड्रोन दृष्यं. पण पालखी कधी येणार आणि रिंगण सोहळा किती वाजता याचा अंदाज नव्हता. आम्ही पुढे जात असताना आमच्या बरोबरच्या बायकांनी रास्त शंका उपस्थित केली. स्टॅम्पेड झाली तर? आम्हाला पडणं परवडणार नाही आम्ही फार पुढे येत नाही. रास्त शंका होती , हात्रसच्या पार्श्वभूमीवर. आम्ही जरा पुढे गेलो तर समोरच्या बाजूलाच एक मंदिर दिसलं आणि फलकही. पालखी सोहळा उभं रिंगण असं होतं. आम्ही पुढे जात राहिलो. एवढ्यात पालखीचं आगमन झालं. फुलांनी उत्कृष्ट सजवलेली पालखी. आमच्या शेजारच्या वृद्ध जोडप्यातील पुरूषाने मला हाक दिली माऊली हे घ्या. त्यांच्या हातात एक फूल होतं बायकोच्या हातात एक फूल होतं. ती दुसऱ्या बाईला पाकळ्या तोडून देत होती . सांगत होती माऊली पालखीवर वहा. माझ्या हातात पाकळ्या आल्या. त्यातल्या मी सारंग आणि त्याचे मित्र यांना दिल्या. आम्ही दुरूनच पालखीच्या दिशेने ती वाहिली. आणि हळुवार मागे सरकलो. बाकी लोकांना जवळ जाता यावं हा उद्देश.


पालखीचं दर्शन झालं पण रिंगण? तोवर आम्ही रिंगण म्हणजे गोल असेल या अपेक्षेने होतो. आता ते उभं रिंगण आहे कळलं. तर मग हे उभं रिंगण असतं कसं हा प्रश्न पडला.


पालखी सोबत दोन घोडे होते. पुढच्या घोड्यावर स्वार नव्हता. मागील घोड्यावर हातात ध्वजा असलेला स्वार होता. सगळ्या माणसांना मागे सरकून उभे रहाण्याच्या सूचना केल्या होत्या. दूरवरून स्वार नसलेला घोडा पूर्ण वेगात आणि त्याच्या मागे ध्वजा घेतलेला घोडेस्वार दौडत डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर पुढे गेले. हे उभं रिंगण.


वारीची म्हणजे त्यातील दिंड्यांची व्यवस्था म्हणजे management वाखाणण्याजोगी. कुठेही संभ्रम नाही. सगळे बरोबर चालतात. बरोबर रहातात. कुठेही, कसेही आणि गैरसोयीकडे दुर्लक्ष करत कारण महत्व असतं वारीचं, सोय किंवा त्याचा अभाव याकडे त्यांचं लक्ष जातच नसावं. 


बाकी रूग्णवाहिका, आगीचा बंब, पोलिस या सगळ्या गोष्टी तिथे उपस्थित होत्या.


ही न लावलेली शिस्त (स्वयंशिस्त), भारलेलं वातावरण, भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात आपल्या शहरी मनालाही फक्त स्पर्श नव्हे तर  डुंबून जायला होतं. हा तेवढ्यापुरता परिणाम असेलही पण तो अनुभव भारून टाकतो हे निश्चित. निदान माझ्यापुरता तरी तो होता.


परतीच्या वाटेत जागोजाग दिसणाऱ्या पत्रावळ्या, अस्वच्छता वगैरे वगैरे दिसल्या खऱ्या. जाते वेळी एक गोष्ट मनात होती . आपण काय बघायला जातो आहोत तर पालखी. मग आपलं संपूर्ण लक्ष माऊलीची पालखी आणि रिंगण याकडेच केंद्रित करायचं. आणि हे या शहरी मनाला जमलं हे सुद्धा माऊलीचंच देणं की.


पालखीचं दर्शन आणि रिंगण व्यवस्थित पार पडलं , अनुभवलं तोच अनुभव घेण्यासाठी पाऊसही आला. आला तोही नाचत गर्जत पूर्ण ताकदीनिशी. जेमतेम डोकं झाकणारं प्लास्टिकचं इरलं काय पुरणार? पण वारी स्थितप्रज्ञ होती. धांदल गडबड काही नाही. काहीजण तर निवांत बसले होते पावसाची तमा न बाळगता. आम्ही आमच्या आयुधांनिशी पावसाचा सामना करण्याचा प्रयत्न करत होतो. एवढ्यात एका वारकरी बाईने आमच्या ग्रूपमधील एका बाईकडे तिने डोक्यावर धरलेली छत्री मागितली. तिने शांतपणे ती तिच्या स्वाधीन केली आणि स्वतः काहीच झालं नाही अशी भिजत निघाली. विठोबा कोणत्या रूपात समोर उभा ठाकतो हे आपल्याला कळत नाही म्हणून विन्मुख पाठवायचं नाही. हे सगळं खरं पण माझ्याकडे मागितली असती तर ........ कदाचित विठोबाला ही कळत असावं कोण परीक्षेला उतरू शकेल.


दुसऱ्या दिवशीच्या स्थानिक वर्तमानपत्रात बातमी वाचली लोणंद मधील भक्ती पूर्ण वातावरणात पालखीला निरोप दिल्यानंतर प्रस्थान. त्यानंतर सेवकांनी स्वच्छता अभियान राबवून परिस्थिती पूर्वपदावर. 


कित्येक स्वयंसेवक दिसत होते. त्यांच्या शर्टचे टोप्यांचे रंग यातून  एका ग्रूपचे आहेत हे कळत होतं. तर असे युवक विविध जागृती मोहीम वगैरे उद्दिष्टांसाठी वारीचा उपयोग करत आहेत हे पाहून बरं वाटलं.


पुढल्या वर्षी फक्त पर्यटक म्हणून न जाता या सगळ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करता येईल का?

श्रीरामाच्या कृपेने तेही साध्य करता येईल.


राम कृष्ण हरी🙏