Monday, 26 January 2015

ITALY VENEZIA (VENICE)इटली वेनेझिया (व्हेनिस)

फिरेन्झ सान्ता मरिआ नॉव्हेल्ला ते वेनेझिया मेस्त्रे (Firenze S M Novella to Venezia Mestre) हा प्रवासाचा टप्पा. गाडी दुपारी अडीच वाजता सुटून ४ वाजून २३ मिनिटांनी व्हेनिसला पोहोचते. आम्ही आपले गाडीच्या वेळेआधी अर्धा तास स्टेशनवर हजर. वाट बघत बसलो असता उत्तराच्या शेजारी एक बाई येऊन बसली. लांबवर एक सहा फुटाहून उंच मुलगा उभा होता. त्या बाईने उत्तराला एकदम सरळच विचारलं मुंबई का (from Mumbai?)? एकदम मुंबई का म्हटल्यावर उत्तरा हबकलीच. कारण विचारणारी बाई गोरी नसली तरी आपली वाटली नाही. बोलणं सुरू झाल्यावर कळलं ती कुलाब्याची, पारशी. लग्न हिंदू कॉलनीतल्या गुजराथी माणसाबरोबर आणि आता अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथे वास्तव्य. त्यांचं फॅमिली गॅदरिंग होतं व्हेनिसमध्ये. युरोप सगळ्यांना मध्यवर्ती त्यामुळे अमेरिका, आफ्रिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया इथून त्यांचा सगळा गोतावळा यायचा होता. आम्हाला मजा वाटत होती.

ती आणि मुलगा मायामीमार्गे फ्लोरेन्सला आले होते. त्यांचं सामान मात्र पोहोचलच नाही. हातातील बॅगेवर आई आणि मुलगा दोघांनी तीन दिवस फ्लोरेन्सला मुक्काम केला होता. रोज विमानतळावर जा, सामानाची चौकशी करा आणि परत या. इतकाच उद्योग. त्यातून इटलीची ख्याती अमेरिकेत चोर्‍यामार्‍याकरता प्रसिद्ध अशी म्हणजे हे आणखी घाबरून. हे अमेरिकन्स कशाकशाला घाबरतात याची यादी प्रसिद्ध करायला हवी! मजेचा भाग जाऊ दे पण अशा परिस्थितीत अनिश्चित वातावरणात फिरणं बाजूला, बॅगेची चिंता करण्यात दिवस गेल्याचं दुःख किती असेल ते तेच जाणोत. अखेरीस आज ताब्यात आलेल्या बॅगा घेऊन मायलेकरं निघाली होती व्हेनिसला. त्यांना आमच्या अनुभवांमध्येही रस होता. रोमविषयीची त्यांनी ऐकलेली माहिती त्यांनी आमच्याबरोबर ताडून बघितली. त्यांच्याशी बोलताना वेळ चांगला गेला. त्यांची व्हेनिसची गाडी आमच्यानंतरची, साडेतीनची होती. आमची गाडी लागली आणि आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो.

व्हेनिसचं मेस्त्रे हे शेवटचं स्टेशन नाही तेव्हा जरा लक्ष ठेवण्याची गरज आहे. वगैरे सूचना नेहेमीप्रमाणे कानात घुमत होत्या. आता त्यांच्याकडे कितपत लक्ष द्यायचं ते आम्हाला कळण्याइतपत आम्हीही इथे म्हणजे युरोपात तसे सीझन्ड झालो होतो. उतरल्यानंतर सरळ टॅक्सी करा कारण हे तसं कळण्यातलं नाही. उगीच भरकटाल वगैरे वगैरे सूचना होत्याच जोडीला. आम्ही निवांत होतो.

गाडीत समोरच्या सीटवर बसलेली बाई तिच्या समोर पण दुस-या बाजूच्या सीटवरच्या माणसाबरोबर संवाद साधून होती. ती आणि तिची मुलगी दोघीच जणी व्हेनिसला निघाल्या होत्या. त्यांना उतरायचे कुठे तेच कळत नव्हते. ती प्रत्येकाला विचारत होती आणि नवीन नवीन माहिती तिच्या हाती लागत होती. आम्ही गंमत ऐकत बसलो होतो कारण आम्हाला ते लोक दिसत नव्हते. बाई अमेरिकेहून आलेली त्यामुळे बहुधा खूप हबकलेली वाटत होती. आम्हीही तिच्याचसारखे होतो. आमच्याही हातात नकाशा, खाणाखुणा सगळं काही होतं. पण ते खूपच अगम्य होतं हे मात्र खरं. आमचा शहाणपणा इतकाच की आमच्या गोंधळात आम्ही कोणा इतरांना सहभागी होऊ दिलं नाही!

शांतपणे प्रवासाचा आनंद घेत आम्ही निघालो होतो. आता ना त्या हायस्पीड ट्रेनचं कौतुक उरलं होतं ना बाहेरच्या दृष्यांचं. खरतर प्रवासाचा शेवटचा टप्पा येण्याआधी जी अवस्था असते ती आमची आत्ता या क्षणी होती. काहीसा कंटाळा, खूपशी उत्सुकता वगैरे. गंमत म्हणजे हा काही प्रवासाचा शेवटचा टप्पा नव्हताच. खरं असं होतं की आम्ही उद्या व्हेनिसहून मिलानला पोहोचणार होतो. आणि तिकडे श्रीशैल भेटून नंतर मग स्वित्झर्लंडला जायचं होतं. आमच्या दोघांच्या मनावरचा एकटेपणाचा ताण संपण्याचा तो तसा शेवटचा टप्पा होता आणि तीच anxiety आम्हाला पदोपदी अस्वस्थ करत होती. एक नक्की होतं आता आमच्या जवळचे पैसे पुरणारे होते. पण उडवण्याकरता नव्हते. टॅक्सी वगैरे करताना ना अंतराचा अंदाज ना आणखी कशाचा. त्यातून हे इटली म्हणजे आ बैल मुझे मार झालं असतं.

व्हेनिस मेस्त्रे स्टेशनवर उतरलो आणि सिटी सेंटरच्या दिशेने बाहेर पडलो. समोर i दिसला पण तो ट्रेन इतालिआचा. बाहेर पडलो तर तिकडे बस उभ्या होत्या. इथे आम्ही अशिक्षित, अडाणी. हातात पत्त्याचा, नकाशाचा कागद. समोर निळ्या कपड्यातला माणूस दिसला तो बसवाला असेल म्हणून त्याला कागद दाखवला. त्याने हातवारे करत काहीतरी सांगितलं त्यावरून इतकं कळलं की तसेच पुढे जाऊन डावीकडे वळा. पुढे गेलो तर ऑफिससारखं काहीतरी दिसलं. पुन्हा तोच कागद, पुन्हा तेच हातांच्या खुणा आणि अगम्य भाषेतले संवाद. फक्त दोघेही एकाच दिशेने हात दाखवत होते आणि बसचा एकच नंबर सांगत होते. नशीब जगभर इंग्रजी आकडे माहीत असतात!

स्टॉप सापडला पण बाजू कोणती? पुनः कागद. तेवढ्यात समोर दुकान दिसलं. आत नेहेमीप्रमाणे बांगलादेशी. भालो, केम्हुन अछेन यासारखं  काहीतरी माझ्या दृष्टीने बांगलामध्ये विचारलं. त्याने इंडिया? हे नेहेमीचं एकाक्षरी विधान केलं. कागद त्याच्यासमोर धरला. त्याने दुकानाबाहेरच्या स्टॉपकडे बोट दाखवल्यावर निःश्वास टाकला. आम्ही शोधला होता तो स्टॉप उलट्या दिशेचा! त्याच्याकडून फळं घेतली. आता जेवणाची काळजी करायला नको! स्पिनिआला जाणारी n6 बस .वेळेतच आली. पण इथेही त्यांची पब्लिक अनाउन्समेंट सिस्टिम आणि स्क्रीन दोन्ही आऊट ऑफ ऑर्डर!. बस खच्चून भरलेली. ड्रायव्हरला चढताना चिरिनागोला उतरायचं आहे जरा सांग असं सांगितल्यावर त्याने मान डोलावली. पण ते फक्त सौजन्याचा भाग असावा असं म्हणायला वाव होता. काही खरं नव्हतं! पण ठीक आहे सुरवात तर झाली अस म्हणत आम्ही उभे राहिलो

सामान सावरत हळू हळू आजूबाजूला बघत होतो. कोणी आपल्याकडे बघत आहे का? असेल तर कोणाची मदत होऊ शकेल असे विचार मनात होते. पण प्रत्येकजण आपल्यातच गढलेला किंवा तसं दाखवणारा. शेवटी एका माणसाला हिय्या करून विचारलच. तर चार वेळा त्याने चिरिनागो वेगवेगळ्या टोनमध्ये म्हणत,  घोळवून,  माहित नसल्याचं  सांगितलं. होईल ते होईल. आपण बाहे लक्ष ठेवू या. पाटी दिसली की उतरायचं असं ठरवून टाकलं. बाहेरच्या बागा, रस्ते कशाकडेही आमचं लक्ष नव्हतं. अगदी एकच लक्ष्य चिरिनागो! या इतालिअन भाषेची मजाच आहे स्पेलिंग Chirignago पण इथे g सायलेंट आहे. आमचं नशीब म्हणून हे बारकावे आम्हाला श्रीशैलकडून आधी कळलेले असतात, तर खूप वेळ झाला, अजून कसं आलं नाही असं वाटत आहे तोच आम्हा दोघांनाही स्टॉपच्या जरा आधी चिरिनागोची पाटी दिसली. आम्ही गड सर केल्याच्या आनंदात उतरलो आणि हातात नकाशा घेऊन त्याप्रमाणे ही की पुढची गल्ली असे करत शोधू लागलो. सांगितलेल्या खुणांपैकी काहीच दिसत नव्हतं. शेवटी एका ठिकाणी विचारलं. सुदैवाने त्याला थोडं का होईना इंग्रजी येत होतं. म्हणाला इथून अडीच तीन किलोमीटर आहे. बोंबला! म्हणजे जास्त शहाणपणा करून कन्फर्म न करता बसमधून  उतरलो तो मूर्खपणा झाला म्हणायचा! ठीक आहे आता निदान त्या दिशेने तर बरोबर आहोत असं म्हणून आगेकूच सुरू केली. पुढे एका ठिकाणी बांधकाम सुरू होतं. निळ्या डगल्यातला एक  कामगार त्याला विचारून काय उपयोग असं वाटलं पण त्याने नकाशा व्यवस्थित धरला आणि आम्हाला दाखवलं, समोरचा चौरस्ता आहे तिथे डावीकडे जा आणि विचारा. ग्रेट! आम्ही रस्ता ओलांडून पुढे आलो. आणखी एकाला विचारलं पण ते नामधारीच. पत्त्यात म्हटलेला ओव्हरपास म्हणजे पूल / फ्लायओव्हर दिसला आणि तो टाळून खालच्या रस्त्यावरचं ते दुसरं घर Benarrivati दिसलं तेव्हा अत्यानंदाचं भरतं आलं.

जोरात पुढे झालो आणि बेल वाजवली. आतून काही जाग नाही. जिना चढून वर गेलो. दरवाजा उघडा. आत मी पूर्ण घर फिरून आलो, कोणी नाही. फसलो गेलो की का?

                                                                                       भाग दुसरा पुढील मंगळवारी

संध्यासमयीचं व्हेनिस

                                                                                
 
Monday, 19 January 2015

ITALY FIRENZE (FLORENCE) IV

इटली फिरेन्झ (फ्लोरेन्स) (४)

आजचं पहिलं आणि महत्वाचं उद्दिष्ट होतं ते दुओमो. पण सरळ नेम धरून तिथे जायचं तर शहर बघून होणार कसं? म्हणून मग आम्ही थोडे उलट्या दिशेने चालत जाऊन पूल ओलांडला. हा ऑफिसचा भाग वाटत होता. आम्ही जरा गल्ली बोळातून हिंडत होतो, आपल्या काळबादेवी, पायधुणीसारखा भाग. अगदी खेटून असलेल्या जुन्या इमारती. पुढे जाताना काल सान्ता मारिया नॉव्हेल्ला बघितलं होतं तसं काहीतरी दिसलं. समोरची फुलं छान होती. क्षणभर विश्रांती घेतली आणि पुढे निघालो. दक्षिणेतली देवळं आणि इथली चर्चेस दोन्ही एका पॉइंटनंतर सारखीच कंटाळवाणी होतात. खूपसा तोच तो पणा आणि पुनः आपलं त्यांच्या इतिहासाविषयीचं अज्ञान आपल्याला पूर्णपणे आनंद मिळू देत नाही.

आता आम्ही तो सिग्नोरा चौक पुनः बघत होतो. काल संध्याकाळी तो रसरसलेला होता. आताही लोकं होतीच पण संध्याकाळची वेळच त्या चौकाचं सौंदर्य खुलवते की काय असं वाटलं. वस्तुस्थिती ही की आपण आपल्या मनाच्या अवस्थांकडे लक्ष न देता उत्तर बाह्य गोष्टींमध्ये शोधतो. उफिझी (ऊफ्फिझी) गॅलेरी बघायची का असा प्रश्न मनात आला तरी दोघांचा नकार होता. आता त्या गॅले-या वगैरे पुरेत आपण फक्त हिंडणार आहोत हे मनाशी पक्कं केलं.

पुढे दुओमो. काल पावसाळी वातावरणात उदासवाणा दिसणारा, आज उन्हात लखलखणारा. गर्दी तुफान होती. आत जाण्यासाठीची रांग वेगळी, टॉवरची वेगळी. प्रत्येक ठिकाणी किमान तीन तासाचं वेटिंग आणि त्यानंतर मग लागणारा वेळ. उत्साह आणि वेळ दोन्हीची आता कमतरता होती. कारणे अनेक. दुपारची गाडी गाठून व्हेनिसला जाण्याची उत्सुकता हे पहिलं, दुसरं आता वर चढून जाणं, कल्पनेनेच कंटाळा आला होता आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे प्रत्येक ठिकाणची १२/१५ युरोची तिकिटं. आम्ही आपले बाहेर बरे असं म्हणत प्रदक्षिणा घातली दुओमोला. काल आम्हाला न जाणवलेला सुंदर संगमरवर आज कळत होता. तरीही एका नजरेत न येणारं बांधकाम, आजूबाजूला गचडीत उभा असलेला तो दुओमो, अपेक्षित परिणाम नाही करू शकला हे मात्र खरं. कदाचित आमच्या अपेक्षा अवास्तव असू शकतील!

आता परत निघू या असं ठरवून नदीकडे निघालो. आम्हाला ती पार करून पलीकडल्या किना-यावर जायचं होतं. पण आज कुठेही पूल ओलांडा असं नव्हतं आजचं आमचं डेस्टिनेशन ठरलेलं होतं. तर अर्नो नदी पार करायची ती या ऐतिहासिक पोन्टे वेचिओवरूनच. हा पूल दुस-या महायुद्धात जर्मनांनी उडवून दिला नाही म्हणून टिकला. नंतरच्या पुरानेही त्याला काही केलं नाही. आता यावर दोन्ही बाजूला लखलखाट आहे तो सोनेचांदी आणि जवाहि-यांच्या दुकानांचा. कुठे बघावे ते कळू नये इतका हा लखलखाट आहे. दिपून जाणे म्हणजे काय त्याचा  प्रत्यय इथे येतो. फक्त जवाहि-यांची ही दुकानं या पुलाला अधिकच शोभिवंत करतात.

पूल ओलांडून आम्ही पलिकडे आलो. आता परतायला हवं होतं. त्याआधी काहीतरी खावं म्हणून एका दुकानात शिरलो. पित्झाचे सुंदर तुकडे समोर मांडले होते. बांधून घेतले आणि चालायला लागलो. वेळेची बचत आणि पैशाचीही. तिथे बसून खायचं म्हणजे पुनः त्यांना वेगळे पैसे द्या. आमचं रहाण्याचं ठिकाण काही फारसं लांब नव्हतं. आम्ही आमचं सामान आधीच बाहेर आणून ठेवलं होतं. घरी येऊन ते उचललं, किल्ली तिथे ठेवली, सोबत एक चिठ्ठी आभाराची, कारण डॅनियल त्यावेळी घरी नव्हता. हो, आणखी एक, त्याने चौकशी केली त्या चहाचे सॅशेही ठेवले, तेवढीच त्यांना आठवण आपल्या भारतीय चहाची.

येताना स्टेशनजवळ आल्यावर आठवण झाली फळं वगैरे काहीच बरोबर घेतलं नाही. म्हणून बाहेर येऊन बघितलं तर त्यांचा स्टेशनवरच्या दुकानातला एक युरोला एका केळ्याचा भाव ऐकून मागे फिरलो. आता जे काही असेल ते व्हेनिसमध्ये!


                                                                           इति फ्लोरेन्स अध्याय समाप्त
                                                                           पुढील मंगळवारी व्हेनिस

फ्लोरेन्सला संपन्न केलं ते या विविध वास्तुशिल्पांनी, व्यक्तींनी, खाद्यसंस्कृतींनी! त्या नगरातील विस्तीर्ण चौक वानगीदाखल

Palazzo Vecchio
A towering  personality who was from Florence 
दुओमोची गर्दी
Monday, 12 January 2015

ITALY FIRENZE (FLORENCE) III


इटली फिरेन्झ (फ्लोरेन्स) (३)


फ्लोरेन्समधला दुओमो अतिशय प्रसिद्ध आहे असं ऐकून होतो आणि बघायची उत्सुकताही होती. त्याचं वर्णनही It is as huge and beautiful that won't be ever missed. It is centrally located and visible from anywhere असं म्हटलं होतं. सुंदर आणि भव्य वास्तू म्हटल्यावर आमची कल्पना मोकळ्यावर असणार, पण गल्ल्याबोळांच्या त्या जंजाळात एका छोट्या गल्लीतून पुढे गेलो तर हा समोर.

दुओमो सुंदर आहे यात प्रश्न नाही पण त्याची जागा अगदीच चुकली आहे. इतक्या दाटीवाटीत आहे की धड एका नजरेत तो समोर येऊ नये. खूप कलाकुसर आहे. आम्ही संध्याकाळी बघत होतो, पावसाळी वातावरणाचा परिणाम आमच्या मूडवर झाला होता का? अगदी अशक्य म्हणता येणार नाही. त्याचा अपेक्षित प्रभाव आमच्यावर पडला नाही हे खरं. तरीही त्याच्या बांधणीला, कलाकुसरीला दाद द्यावी लागत होती. मग असं मनाशी ठरवलं की ठीक आहे आत्ता आपण सभोवती फेरी मारू या आणि उद्या नीट बघू या. जमतील तेवढे फोटो, खरतर तुकड्या तुकड्यात त्याला सामावता येणारच नव्हतं, काढले आणि निघालो. तुम्हाला निदान माहिती होते हा इंटरनेटचा फायदा म्हणायचा की तुमचं मत बनण्याची क्षमता त्या माहितीमध्ये असते आणि. मग काही वेळा भ्रमनिरास होण्याचीही शक्यता निर्माण होते हा तोटा म्हणायचा? उद्या काय ते बघू असं म्हणून निघालो खरं.


ढगााळ वातावरणातला दुओमो कोणत्याही बाजूने एका नजरेत न येणारा
थोड्याशा नाराजीने आम्ही पुढे निघालो आणि मग ठरवलं की आता एका दिशेने जायचं. जे समोर येईल ते बघायचं. असं म्हणत पुढे गेलो ते एका भव्य चौकात पोहोचलो. आमचा थोडासा खप्पा मूड एकदमच पालटून गेला. खूप लोकं आहेत, सभोवारच्या इमारती प्रेक्षणीय आहेत आणि त्याहीपेक्षा खुले (Open Museum) संग्रहालय असावे तसा माहोल

पुतळे जागोजाग उभे आहेत. त्यांच्या सौष्ठवाचं वर्णन करावं की पोपच्या देशात ही नग्नता खपवून घेतली गेली याचं समाधान मानावं हेच कळत नव्हतं. या (शिल्पकलेतलं) प्रांतातलं काहीच कळत नाही आणि माहितीही नाही तेव्हा बरोबरच्या माहितीचा आधार घेतला. एखाद्या खरोखरच्या ग्रेट कलाकृतीनी आपण भारावून जायला त्यातलं काही कळायलाच लागतं असं नाही याचा प्रत्यय आला. मायकेल ऍन्जेलोच्या सुप्रसिद्ध डेव्हिड हर्क्युलिस या कलाकृतींच्या या प्रतिकृती होत्या. आणि ते नेपच्युनचे कारंजे

नेपच्युनचे कारंजे व हर्क्युलिस (प्रतिकृती)


सौंदर्य ठायी ठायी भरून राहिलेला तो सिग्नोरिया चौक (Piazza della Signoria) त्यातली ती वेचिओ बिल्डिंग (Vecchio) . त्यातले ते पुतळे. आपल्याला मूर्तीकलेतलं कळायला हवं होतं निदान ग्रीक/ रोमन मायथॉलॉजीतल्या कथांची तरी माहिती हवी होती हे प्रकर्षाने जाणवलं.

सगळ्यात उजवीकडे अाहे ते Rape of Sabine women                                                                                 
आता तिथे एक Rape of Sabine women या नावाचं सुंदर शिल्प आहे. एका पुरूषाला पायाखाली दडपून एका स्त्रीला विळखा घातलेला पुरूष असे तपशील सांगायचे म्हटले तर. मग यात रेप कुठे? त्यामागची कथा माहित नसेल तर अर्थबोध होणार नाही. पूर्वीच्या काळी रोमन लोक शेजारच्या सबिने कुटुंबाच्या (की जात/ समूह मी इथे माहितीमधला family/ clan या शब्दावरून हा अंदाज बांधला आहे) स्त्रीला पळवून आणत. यातील Rape इंग्रजीमधील सध्याच्या अर्थाचा नाही. जबरदस्ती या अर्थाने वापरल्या गेलेल्या शब्दामध्ये त्या काळात बलात्कार ही शेड नव्हती. मघा उल्लेख केला ते नेपच्युन फाऊंटनसुद्धा त्याच्या कथेसकट समजून घेताना मग त्यातल्या वेगळ्या पुतळ्यांचा एकत्रित शिल्पापर्यंतचा प्रवास उलगडतो. Ercole and Centaur या शिल्पाने असेच बुचकळ्यात टाकले होते. यातील Ercole म्हणजे हर्क्युलिस आणि सेंटॉर म्हणजे धड घोड्याचे असा माणूस हे समजल्यावर तो पुतळा उलगडला. कथा वगैरे जाऊ दे पण निदान आपण समोर बघतो ते काय आहे हे तरी कळायला हवेच. एका पुतळ्याच्या हातात एक शिर आहे त्यातून रक्त सांडते आहे.मेडुसा नावाच्या बाईचं हे शिर. ती चेटकिण वगैरे वर्गातली असावी पण ज्याने हे हातात धरले आहे तो कोवळा मुलगा वाटतो. त्याच्या चेहे-यावरचे भावही कुठलाच रौद्रभाव दाखवत नाहीत. जाऊ दे. त्या कथा पूर्णपणे काही माहित नाहीत म्हणून असावं. आपला कृष्ण नाही का ऐन लढाईतसुद्धा सौम्य सात्विक भाव चेहे-यावर वागवत असतो!आम्ही खूप वेळ इथे रमलो होतो. उत्फुल्ल असं ते वातावरण म्हणजे फ्लोरेन्समधलं चैतन्य असावं असं वाटत होतं. इथे या सिग्नोरिया चौकात प्रसिद्ध असं उफिझी (Uffizi) म्युझियम आहे. आमच्या ज्ञान आणि समज पातळीची परीक्षा वेळोवेळी झालेली असल्याकारणाने आम्ही म्युझियम कितीही प्रसिद्ध असली तरी त्यापासून दूर रहाण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे! निदान प्रवेश फीचे पैसे तरी वाचतात! कितीही वेळ त्या तिथे बसून काढता येणं शक्य असलं तरी शहर हिंडायचं तर सूर्यास्ताच्या आधीच शक्य होतं. त्या तिथल्या खजिन्याला तिथेच मागे ठेवून आम्ही तिथून निघालो.

खरतर इथून मागे पोन्टे वेचिओ ब्रिज जवळ पण माहितीपत्रक बघायचं नाही म्हटल्यावर आम्हाला ती वाट कशी दिसणार? आम्ही त्याला बायपास करून नदीकडेने पुढे निघालो. काही वेळा तरी असे निर्णय खूप चांगले ठरतात. नदीच्या दोन्ही अंगाला समांतर असे रस्ते आहेत. पूर्व पश्चिम वाहणारी नदी त्यामुळे सूर्य आता आम्हाला सामोरा होता. आम्हाला नदीवरचे असलेले एकूण सहा सात पूल मागे टाकून नंतरच्या पुलावरून पलीकडे जायचं होतं. समोरच्या बाजूला रंगीबेरंगी इमारती. त्यांच्यामागे हिरवी रांग असावी अशी झाडांची दाटी असलेली टेकडी. आणि उत्कृष्ट कॅमेरामनने आताच्या भाषेत सिनेमाटोग्राफरने झोत टाकावा तसा कोन साधून टाकलेला मावळतीकडे झुकलेल्या सूर्याचा प्रकाश. नदी जशी पूर्व पश्चिमेचा कोन साधून होती तसा तो सूर्य आणि त्या उजळलेल्या रंगीबेरंगी इमारती. कोणत्याही शिल्पापेक्षा हे समोरचं दृष्य अवर्णनीय होतं. मला फक्त कविता आठवली

पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे ओढुनिया दूर
झाडांनी किती मुकुट घातले डोकिस सोनेरी
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी......मघा चुकून चुकलेला तो वेचिओ पूल आता लांबून त्या उन्हात लखलखताना दिसत होता. एका सरळ रेषेतली ती नदी, ओळीत मांडलेले ते पूल, नदीचा तो दुसरा काठ हे नजरेत साठवून ठेवताना आम्हाला पश्चिमेकडे जाताना उलट वळून सारखे मागे पहावे लागत होते, किंबहुना खूपदा नजरबंदीच अशी होती की थांबून अनिमिष पहात रहावं किंवा उलट चालत रहावं.

आम्हाला शाकाहार हवा हे आमच्या यजमानांना म्हणजे डॅनिअलला सांगितल्यावर त्याने आम्हाला खुणा सांगून जे हॉटेल सुचवलं होतं त्याची पाटी बघून आम्ही खूष झालो. पुढे गेलो तर त्याला भलं मोठ्ठं कुलुप! तसेच मग परतीच्या दिशेने निघालो. आम्ही शहराच्या एका टोकाला होतो. हे इटली आहे, हॉलंड नाही याची मनाला सतत जाणीव होती. डॅनिअलने जरी आम्हाला आश्वस्त केलं असलं तरी मनात कुठेतरी खोलवर असुरक्षिततेची ती भावना असतेच. त्यातून तसा हा रेसिडेन्शिअल भाग वाटत होता म्हणजे रहदारी नाही आणि फारशी हॉटेल्स असण्याची शक्यता नव्हती. पण पर्याय नव्हता. तसेच निघालो. पब्ज आणि बार उघडे होते. एखादा पित्झेरिया तरी मिळावा म्हणजे हा शोध संपेल असं वाटत होतं. अर्थात पित्झेरिया ( फक्त पित्झा मिळतो खूपदा तुकडे मिळतात त्यामुळे वेगवेगळे प्रकार खाता येतात) नाही पण एका रेस्टॉरंटमध्ये आम्हाला खायला मात्र मिळालं.

दुसरा दिवस सकाळी फ्लोरेन्स फिरून दुपारच्या गाडीने व्हेनिस गाठायचं होतं. चालण्याबाबत मी काय किंवा उत्तरा काय आम्ही दोघेही भक्कम आहोत. स्पीड आणि अंतर दोन्हीचा प्रश्न नसतो पण इथे उन्हाळ्याचा परिणाम जाणवत होता. विश्रांतीची गरज होती आणि या सुंदरशा घरातल्या निवांतपणाने आम्हाला ती मिळाली. दुस-या दिवसाकरता ताजे तवाने होऊन आमच्या इथल्या दुस-या दिवसाची सुरवात झाली.

                                                                            उर्वरीत भाग पुढील  मंगळवारी


Monday, 5 January 2015

ITALY FIRENZE (FLORENCE) II

इटली फिरेन्झ (फ्लोरेन्स) (२)
पिसाचा मनोरा

फ्लोरेन्सहून पिसाकरता दर तासाला गाडी होती. जाण्या येण्याचे दोन- अडीच तास आणि तिथला वेळ म्हणजे ५-६ तास वजा जाता आमच्या हातात आजच्या दिवसातला फ्लोरेन्सकरता वेळ उरला होता फक्त दोन तीन तासांचा कारण आता साडे बारा वाजायला आले होते. मघा आलो तेव्हा लक्षात आलं की बस फिरून येते. स्टेशनपर्यंतचे प्रत्यक्ष अंतर काही फार नाही. डॅनियलच्या हिशोबात ते १ ते दीड किलोमीटर म्हणजे मग आम्हाला दादर स्टेशनला जाण्याइतकच होतं. तसेच भराभर निघालो. बरोबर फक्त थर्मासमध्ये गरम पाणी घेऊन.

खरोखरच अगदी सरळ रस्ता होता स्टेशनचा. वाटेत नेहेमीप्रमाणे फळं बरोबर घेतली. इथेही दुकानातला हा मुलगाही बांगलादेशी होता, हसनची आठवण अपरिहार्य होती पण याला आमच्याशी काही देणं घेणं नव्हतं. फळं घेतली आणि स्टेशनवर आलो. मशिनवरच तिकिटं काढली. पिसाकरता जाणारी गाडी इंडिकेटर दाखवत होता पण प्लॅटफॉर्मचा पत्ता नव्हता. गाडीची वेळ तर होत आलेली. आम्ही ट्रेन इटालियाच्या काऊंटरवर रांगेत उभे राहिलो पण आमच्या पुढची रांग हटल्याशिवाय तर काही उपाय नव्हता. इतक्यात त्या रोममध्ये दिसत होत्या तशा बायकांपैकी एक लगबगीने May I help? विचारत आली. आम्हाला मघा स्टेशनबाहेरच्या माणसानेही मदत केली होती, या बायकाही तशाच आहेत असं वाटलं आणि त्यांना आम्ही पिसाच्या गाडीचा प्लॅटफॉर्म कुठे विचारलं. त्या बाईने प्रथम तिकिट बघू म्हणून हातात घेतलं आणि ती घाईने पुढे होत, हाताने खुणा करत आम्हाला बोलवू लागली. मी सांगायच्या प्रयत्नात की बाई तू फक्त सांग, आम्ही जातो. पण ती पुढे झाली, तिकिटं तिच्या हातात तेव्हा पर्याय नव्हता. पुढे होऊन तिने तिकिटं व्हॅलिडेट केली. हो इथे तुमच्याकडे फक्त तिकिट असून भागत नाही प्रवासापूर्वी ते व्हॅलिडेटिंग मशिनमध्ये टाकून व्हॅलिडेट करावं लागतं. पाठोपाठ आम्ही दोघं! अगदी टोकाला पुढे काही नाही असं वाटावं अशा ठिकाणी वेगळे काढल्यासाराखे दोन प्लॅटफॉर्म्स होते, त्यातल्या एक नंबरवर जी गाडी होती त्यातल्या तिस-या डब्यात ती बाई चढली, पाठोपाठ आम्ही. तिने सांगितलेल्या जागी आम्ही बसलो. अतिशय कृतज्ञतेने तिच्याकडे बघत तिला थॅन्क्स देता देता तिच्या हातातून तिकिटं ताब्यात घेतली. माझी कृतज्ञता मिळवायला ती आली नव्ह्ती. या बायका धंदेवाईक फसवणा-या होत्या. मदत करण्याच्या मिषाने पुढे होऊन मग पैसे उकळण्याचा हा धंदा होता. माझ्याकडचा एक युरो दिल्यावर तिने पाचची मागणी पुढे केली. मी हात वर केले, माझ्याकडे नाहीत म्हणून तर खूप बडबड करायला लागली. आता आमच्या लक्षात आलं की आधीच्या डब्यात प्रवासी होते त्यांना टाळून ती कोणी नसलेल्या डब्यात आम्हाला घेऊन आली होती. अर्थात मुंबईत अशी कित्येक लोकं भेटतात त्यावेळी जसे आपण निर्ढावलेपणाचा आव आणतो तो आणल्यावर काहीतरी बडबडत तिने काढता पाय घेतला. कदाचित नंतर डब्यात आलेल्या लोकांचाही परिणाम असेल. पण थोडक्यात निभावलं हे खरं. एरवी १४ युरोच्या एका तिकिटामागे द्यावे लागलेले ५ युरो म्हणजे.........

पिसाची ही गाडी लोकल असली तरी फास्ट असावी कारण सगळ्या स्टेशनवर थांबली नाही आणि चाळीस मिनिटात आम्ही पिसा स्टेशनला उतरलो. तसं हे गावही लहान असावं आणि इतर काही इथे नसावं. पावसाची आधी मोठी सर आणि नंतर रिपरिप होती. पण स्टेशनबाहेर आल्यावर समोरच सिटी सेंटर आणि त्यातली दुकानं होती. आपल्याकडे फोर्टमध्ये जसं आपण त्याच्या आश्रयाने चालू लागतो तसे पुढे जात राहिलो आणि नंतर मग पाऊसही तसा सुसह्य झाला.

मनो-याविषयी खरतर काही लिहिण्यासारखं नाही. # ते आश्चर्य आहे कारण तो उभा आहे अजूनही म्हणून. तसा तो कलता बांधला वगैरे नाही तर काहीतरी चुकीने तो तसा आहे. त्या ढगाळ वातावरणाचा परिणामही असेल पण तो जितका उंच आहे तितका आम्हाला भासला नाही. त्याच्या व्यतिरिक्त इतर दोन इमारती उजव्या वाटल्या. इथे पैसे देऊन वर जाणे आम्ही कटाक्षाने टाळणारच होतो कारण वर जाऊन एरिअल दृष्य म्हणावे असे पिसामध्ये काहीच नव्हते. फारसे कोणी वर जाताना दिसतही नव्हते.

इटलीत आल्यापासून जाणवत होतं की इथे जपान, कोरिया फिलिपाइन्स असे पर्यटक खूप होते. प्रत्येकजण त्या मनो-याला हातावर तोलून धरण्याचा हास्यास्पद फोटो काढत होता. काहीजण दोन विरुद्ध बाजूनी हाताचा आधार देत मधे मनोरा असे फोटो काढत होते.

तो मूर्खपणा, मेंढराची वृत्ती आम्ही एन्जॉय करत असताना दोन मुलीनी उत्तराला थांबून विचारलं, कुठून आलात? मुंबई का? चेहे-यावर स्टॅम्प असतो का न जाणे पण हा अनुभव येतो खरा. त्या दोघी, नुकतं लग्न झालेलं असावं, नव-यांबरोबर होत्या, एकीचा नवरा बर्लिनला तर दुसरीचा नॉर्वेमध्ये डॉक्टरेट करत होता. आम्ही रोमहून इथे आलो होतो तर त्या इथून रोमला जाणार होत्या. सोलापूर आणि मराठवाड्यातले ते दोघे इटलीत पिसासारख्या ठिकाणी भेटावेत याची गंमत वाटली. थोड्या गप्पा झाल्यानंतर आम्ही पुढे निघून गेलो.

तसा खूप वेळ गेला नव्हता पण बघण्यासारखं आणखी काही नव्हतं. निदान फ्लोरेन्सला तरी वेळ मिळावा (इटलीतल्या सुंदर भागातलं खूप सुंदर शहर इति श्रीशैल) या उद्देशाने मग आम्ही निघालो. परतीचा प्रवास तसा रखडत असला तरी पाऊस थांबून ऊन पडलं होतं आणि समरमुळे सूर्यप्रकाश रात्री आठ साडे आठपर्यंत असावा अशी अपेक्षा होती.

साडे सहापर्यंत आम्ही फ्लोरेन्समध्ये पोहोचलो. आता तसा घरी पोहोचण्याचा प्रश्न नव्हता. स्टेशनजवळचं सान्ता मारिया बघून पुढे निघालो. एक जरा जुनं मार्केट दिसलं म्हणून आत शिरलो. पावसाची सरही आली होती, तेवढाच आडोसाही.होइल हा विचार मनात होता. जिना चढून वर गेलो तर आपल्या मार्केटसारखे मार्केट. त्याला न्यू मार्केट का म्हटले होते तेच जाणो. मला त्यांच्या दहा बारा फुटी वेताच्या उलट्या टोपलीसारख्या लॅम्प शेडस मात्र आवडल्या.


फ्लोरेन्स मार्केटमधील  दिव्यांच्या शेडस   
खाली उतरून रस्त्यावर आलो. रस्त्यात खूप गर्दी होती. बरेच बांगला देशी आणि काळे विक्रेते आणि आपल्याकडच्या(कदाचित चीनमधल्या) वस्तूंनी भरलेले ते रस्त्यावरचे स्टॉल्स बघत निघालो होतो.

गजबजलेला हा बाजार


फ्लोरेन्समधला दुओमो अतिशय प्रसिद्ध आहे असं ऐकून होतो आणि बघायची उत्सुकताही होती. त्याचं वर्णनही It is as huge and beautiful that won't be ever missed. It is centrally located and visible from anywhere असं म्हटलं होतं. सुंदर आणि भव्य वास्तू म्हटल्यावर आमची कल्पना मोकळ्यावर असणार, पण .............

                                                         उर्वरीत भाग पुढील  मंगळवारी

# लिहिण्यासारखे नाही  पण  बघण्यासारखे जे अाहे त्याचे हे  फोटो  


हा कलता,  मनोरा ढगाळ अाकाशाची पार्श्वभूमीअाधार देणारे(?) वीर / वीरांगना
ही सुंदर इमारत