Monday 26 January 2015

ITALY VENEZIA (VENICE)



इटली वेनेझिया (व्हेनिस)

फिरेन्झ सान्ता मरिआ नॉव्हेल्ला ते वेनेझिया मेस्त्रे (Firenze S M Novella to Venezia Mestre) हा प्रवासाचा टप्पा. गाडी दुपारी अडीच वाजता सुटून ४ वाजून २३ मिनिटांनी व्हेनिसला पोहोचते. आम्ही आपले गाडीच्या वेळेआधी अर्धा तास स्टेशनवर हजर. वाट बघत बसलो असता उत्तराच्या शेजारी एक बाई येऊन बसली. लांबवर एक सहा फुटाहून उंच मुलगा उभा होता. त्या बाईने उत्तराला एकदम सरळच विचारलं मुंबई का (from Mumbai?)? एकदम मुंबई का म्हटल्यावर उत्तरा हबकलीच. कारण विचारणारी बाई गोरी नसली तरी आपली वाटली नाही. बोलणं सुरू झाल्यावर कळलं ती कुलाब्याची, पारशी. लग्न हिंदू कॉलनीतल्या गुजराथी माणसाबरोबर आणि आता अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथे वास्तव्य. त्यांचं फॅमिली गॅदरिंग होतं व्हेनिसमध्ये. युरोप सगळ्यांना मध्यवर्ती त्यामुळे अमेरिका, आफ्रिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया इथून त्यांचा सगळा गोतावळा यायचा होता. आम्हाला मजा वाटत होती.

ती आणि मुलगा मायामीमार्गे फ्लोरेन्सला आले होते. त्यांचं सामान मात्र पोहोचलच नाही. हातातील बॅगेवर आई आणि मुलगा दोघांनी तीन दिवस फ्लोरेन्सला मुक्काम केला होता. रोज विमानतळावर जा, सामानाची चौकशी करा आणि परत या. इतकाच उद्योग. त्यातून इटलीची ख्याती अमेरिकेत चोर्‍यामार्‍याकरता प्रसिद्ध अशी म्हणजे हे आणखी घाबरून. हे अमेरिकन्स कशाकशाला घाबरतात याची यादी प्रसिद्ध करायला हवी! मजेचा भाग जाऊ दे पण अशा परिस्थितीत अनिश्चित वातावरणात फिरणं बाजूला, बॅगेची चिंता करण्यात दिवस गेल्याचं दुःख किती असेल ते तेच जाणोत. अखेरीस आज ताब्यात आलेल्या बॅगा घेऊन मायलेकरं निघाली होती व्हेनिसला. त्यांना आमच्या अनुभवांमध्येही रस होता. रोमविषयीची त्यांनी ऐकलेली माहिती त्यांनी आमच्याबरोबर ताडून बघितली. त्यांच्याशी बोलताना वेळ चांगला गेला. त्यांची व्हेनिसची गाडी आमच्यानंतरची, साडेतीनची होती. आमची गाडी लागली आणि आम्ही त्यांचा निरोप घेऊन निघालो.

व्हेनिसचं मेस्त्रे हे शेवटचं स्टेशन नाही तेव्हा जरा लक्ष ठेवण्याची गरज आहे. वगैरे सूचना नेहेमीप्रमाणे कानात घुमत होत्या. आता त्यांच्याकडे कितपत लक्ष द्यायचं ते आम्हाला कळण्याइतपत आम्हीही इथे म्हणजे युरोपात तसे सीझन्ड झालो होतो. उतरल्यानंतर सरळ टॅक्सी करा कारण हे तसं कळण्यातलं नाही. उगीच भरकटाल वगैरे वगैरे सूचना होत्याच जोडीला. आम्ही निवांत होतो.

गाडीत समोरच्या सीटवर बसलेली बाई तिच्या समोर पण दुस-या बाजूच्या सीटवरच्या माणसाबरोबर संवाद साधून होती. ती आणि तिची मुलगी दोघीच जणी व्हेनिसला निघाल्या होत्या. त्यांना उतरायचे कुठे तेच कळत नव्हते. ती प्रत्येकाला विचारत होती आणि नवीन नवीन माहिती तिच्या हाती लागत होती. आम्ही गंमत ऐकत बसलो होतो कारण आम्हाला ते लोक दिसत नव्हते. बाई अमेरिकेहून आलेली त्यामुळे बहुधा खूप हबकलेली वाटत होती. आम्हीही तिच्याचसारखे होतो. आमच्याही हातात नकाशा, खाणाखुणा सगळं काही होतं. पण ते खूपच अगम्य होतं हे मात्र खरं. आमचा शहाणपणा इतकाच की आमच्या गोंधळात आम्ही कोणा इतरांना सहभागी होऊ दिलं नाही!

शांतपणे प्रवासाचा आनंद घेत आम्ही निघालो होतो. आता ना त्या हायस्पीड ट्रेनचं कौतुक उरलं होतं ना बाहेरच्या दृष्यांचं. खरतर प्रवासाचा शेवटचा टप्पा येण्याआधी जी अवस्था असते ती आमची आत्ता या क्षणी होती. काहीसा कंटाळा, खूपशी उत्सुकता वगैरे. गंमत म्हणजे हा काही प्रवासाचा शेवटचा टप्पा नव्हताच. खरं असं होतं की आम्ही उद्या व्हेनिसहून मिलानला पोहोचणार होतो. आणि तिकडे श्रीशैल भेटून नंतर मग स्वित्झर्लंडला जायचं होतं. आमच्या दोघांच्या मनावरचा एकटेपणाचा ताण संपण्याचा तो तसा शेवटचा टप्पा होता आणि तीच anxiety आम्हाला पदोपदी अस्वस्थ करत होती. एक नक्की होतं आता आमच्या जवळचे पैसे पुरणारे होते. पण उडवण्याकरता नव्हते. टॅक्सी वगैरे करताना ना अंतराचा अंदाज ना आणखी कशाचा. त्यातून हे इटली म्हणजे आ बैल मुझे मार झालं असतं.

व्हेनिस मेस्त्रे स्टेशनवर उतरलो आणि सिटी सेंटरच्या दिशेने बाहेर पडलो. समोर i दिसला पण तो ट्रेन इतालिआचा. बाहेर पडलो तर तिकडे बस उभ्या होत्या. इथे आम्ही अशिक्षित, अडाणी. हातात पत्त्याचा, नकाशाचा कागद. समोर निळ्या कपड्यातला माणूस दिसला तो बसवाला असेल म्हणून त्याला कागद दाखवला. त्याने हातवारे करत काहीतरी सांगितलं त्यावरून इतकं कळलं की तसेच पुढे जाऊन डावीकडे वळा. पुढे गेलो तर ऑफिससारखं काहीतरी दिसलं. पुन्हा तोच कागद, पुन्हा तेच हातांच्या खुणा आणि अगम्य भाषेतले संवाद. फक्त दोघेही एकाच दिशेने हात दाखवत होते आणि बसचा एकच नंबर सांगत होते. नशीब जगभर इंग्रजी आकडे माहीत असतात!

स्टॉप सापडला पण बाजू कोणती? पुनः कागद. तेवढ्यात समोर दुकान दिसलं. आत नेहेमीप्रमाणे बांगलादेशी. भालो, केम्हुन अछेन यासारखं  काहीतरी माझ्या दृष्टीने बांगलामध्ये विचारलं. त्याने इंडिया? हे नेहेमीचं एकाक्षरी विधान केलं. कागद त्याच्यासमोर धरला. त्याने दुकानाबाहेरच्या स्टॉपकडे बोट दाखवल्यावर निःश्वास टाकला. आम्ही शोधला होता तो स्टॉप उलट्या दिशेचा! त्याच्याकडून फळं घेतली. आता जेवणाची काळजी करायला नको! स्पिनिआला जाणारी n6 बस .वेळेतच आली. पण इथेही त्यांची पब्लिक अनाउन्समेंट सिस्टिम आणि स्क्रीन दोन्ही आऊट ऑफ ऑर्डर!. बस खच्चून भरलेली. ड्रायव्हरला चढताना चिरिनागोला उतरायचं आहे जरा सांग असं सांगितल्यावर त्याने मान डोलावली. पण ते फक्त सौजन्याचा भाग असावा असं म्हणायला वाव होता. काही खरं नव्हतं! पण ठीक आहे सुरवात तर झाली अस म्हणत आम्ही उभे राहिलो

सामान सावरत हळू हळू आजूबाजूला बघत होतो. कोणी आपल्याकडे बघत आहे का? असेल तर कोणाची मदत होऊ शकेल असे विचार मनात होते. पण प्रत्येकजण आपल्यातच गढलेला किंवा तसं दाखवणारा. शेवटी एका माणसाला हिय्या करून विचारलच. तर चार वेळा त्याने चिरिनागो वेगवेगळ्या टोनमध्ये म्हणत,  घोळवून,  माहित नसल्याचं  सांगितलं. होईल ते होईल. आपण बाहे लक्ष ठेवू या. पाटी दिसली की उतरायचं असं ठरवून टाकलं. बाहेरच्या बागा, रस्ते कशाकडेही आमचं लक्ष नव्हतं. अगदी एकच लक्ष्य चिरिनागो! या इतालिअन भाषेची मजाच आहे स्पेलिंग Chirignago पण इथे g सायलेंट आहे. आमचं नशीब म्हणून हे बारकावे आम्हाला श्रीशैलकडून आधी कळलेले असतात, तर खूप वेळ झाला, अजून कसं आलं नाही असं वाटत आहे तोच आम्हा दोघांनाही स्टॉपच्या जरा आधी चिरिनागोची पाटी दिसली. आम्ही गड सर केल्याच्या आनंदात उतरलो आणि हातात नकाशा घेऊन त्याप्रमाणे ही की पुढची गल्ली असे करत शोधू लागलो. सांगितलेल्या खुणांपैकी काहीच दिसत नव्हतं. शेवटी एका ठिकाणी विचारलं. सुदैवाने त्याला थोडं का होईना इंग्रजी येत होतं. म्हणाला इथून अडीच तीन किलोमीटर आहे. बोंबला! म्हणजे जास्त शहाणपणा करून कन्फर्म न करता बसमधून  उतरलो तो मूर्खपणा झाला म्हणायचा! ठीक आहे आता निदान त्या दिशेने तर बरोबर आहोत असं म्हणून आगेकूच सुरू केली. पुढे एका ठिकाणी बांधकाम सुरू होतं. निळ्या डगल्यातला एक  कामगार त्याला विचारून काय उपयोग असं वाटलं पण त्याने नकाशा व्यवस्थित धरला आणि आम्हाला दाखवलं, समोरचा चौरस्ता आहे तिथे डावीकडे जा आणि विचारा. ग्रेट! आम्ही रस्ता ओलांडून पुढे आलो. आणखी एकाला विचारलं पण ते नामधारीच. पत्त्यात म्हटलेला ओव्हरपास म्हणजे पूल / फ्लायओव्हर दिसला आणि तो टाळून खालच्या रस्त्यावरचं ते दुसरं घर Benarrivati दिसलं तेव्हा अत्यानंदाचं भरतं आलं.

जोरात पुढे झालो आणि बेल वाजवली. आतून काही जाग नाही. जिना चढून वर गेलो. दरवाजा उघडा. आत मी पूर्ण घर फिरून आलो, कोणी नाही. फसलो गेलो की का?

                                                                                       भाग दुसरा पुढील मंगळवारी

संध्यासमयीचं व्हेनिस

                                                                                
 




1 comment: