Monday, 2 February 2015

ITALY VENEZIA (VENICE ) II


इटली वेनेझिया (व्हेनिस) (२)

जोरात पुढे झालो आणि बेल वाजवली. आतून काही जाग नाही. जिना चढून वर गेलो. दरवाजा उघडा. आत मी पूर्ण घर फिरून आलो, कोणी नाही. फसलो गेलो की कापण इथे असं होण्याची शक्यता नाही असं वाटत तरी होतं. एक प्रयत्न म्हणून फोन लावला. कोणी बाई फोनवर, काय बोलली कोण जाणे! हताश हा एकच शब्द ती अवस्था वर्णन करण्याकरता! शेवटी मी आमचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं! म्हणजे श्रीशैलला फोन केला आणि त्याला सांगितलं. त्याचा लगेच फोन आला. क्रिस्तिआनो जरा बाहेर गेला आहे पाच मिनिटात पोहोचेल तुम्हाला बसायला सांगितलं आहे. सुटलो! म्हणत वर जाऊन निवांत बसलो.

पाचव्या नाही पण फार वाट बघायला न लावता क्रिस्तिआनो आला. आला तो मात्र वा-यासारखा! मोटरसायकलवरून आला होता. केसांचं पोनीटेल, त्याला जटा असतात तशा, सिंगल फसली, पण प्रचंड एनर्जी असावी असा सळसळता उत्साह. तो दुसर्‍यामध्ये ट्रान्स्मिट करण्याची क्षमता असणार त्याच्यात! कारण त्याचा उशीर, आम्हाला बाहेर उभं रहायला लागणं हे मी विसरूनच गेलो. एक मिनिट असं म्हणून काहीतरी काम करून आला. आणि हं आता फक्त तुमच्याशी बोलतो म्हणून समोर बसला. त्याला म्हटलं बाबा तू इटलीत रहातोस ना? म्हणाला हो, का? मग हे असं सगळं घर उघडं टाकून जातोस, तुझा लॅपटॉप वर आहे सगळ्या वस्तू विखुरलेल्या आहेत. घराला कुलुप लावण्याची पद्धत आहे की नाही? हसला म्हणाला काही होत नाही. हे त्याचं घोष वाक्य असावं बहुधा

मग त्याने त्याच्या रोल मधले प्रश्न विचारायला सुरवात केली. पासपोर्ट घेतला नोटिंग केलं आणि तुम्ही उद्या निघणार, बरोबर? आम्ही मान डोलावली. तो उठला आणि आम्हीही त्याच्यामागोमाग. डावीकडची एक खोली त्याने उघडली आणि सॉरी सॉरी म्हणत मागे आला. नंतर म्हणाला जाऊ दे आलोच आहोत तर बघूनच घ्या ही खोली. मार्बल बघा इथला. तुम्हाला प्रत्येक खोलीत वेगळा मार्बल दिसेल. अस्सल इटालिअन मार्बल पण आता या क्वालिटीचा मार्बल कोणी वापरत नाही, खूप महाग असतो म्हणून. परत फिरलो आणि त्याने दार लॉक केलं. समोरची खोली उघडून आम्हाला दिली. चहा, कॉफी विचारली. फ्रेश होऊन माझ्या खोलीत या. मग बोलू म्हणाला. आम्ही आमचं आवरलं. आमच्याकडे होतं ते खाऊन घेतलं आणि त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. कुठे कुठे आणि काय काय बघणार आहात? मी म्हटलं तुझ्यावर आहे. तू सांगशील ते आम्ही बघणार! त्याने लगेच नकाशा घेतला. आम्हाला इंटरेस्ट वाटतील अशा जागांवर खुणा केल्या आणि बरोबर एक कागद दिला कारण प्रत्येकवेळी नकाशा बघण्यापेक्षा ते चिटोरं जास्त उपयोगी पडावं म्हणून! आम्ही काहीतरी विचारत होतो तेवढ्यात म्हणाला आता लगेच बस आहे तुम्ही निघा. थोडं आज बघून होइल उरलेलं उद्या. आणि सगळेजण काय वाटेल ते सांगतील पण व्हेनिसमध्ये पायी हिंडण्यात जी मजा आहे ती आणि कशात नाही.  लोकं उगीच खर्च करतात आणि धंदे चालवतात! हो आणि महत्वाचं लक्षात ठेवा की परत येताना बस घ्यायची ती n7 मिरानो असं लिहिलेली कारण खूपदा शॉर्ट ट्रिप्स असतात. तिथे खाऊ नका. खूप महाग असतं. त्यापेक्षा कोपर्‍यावरचं रेस्तरॉं छान आहे. आता लवकर निघा आणि हो आल्यानंतर आपण बोलू खूप आहे बोलण्यासारखं!

बोलघेवडा आहे! खरं तर बोलबच्चन म्हणायला हवं चांगला सेल्स टॉक दिला हे खरं. हे लोक एवढ्या रात्री जागे रहाणार? आपण येईपर्यंत हा डाराडूर असेल इति उत्तरा! तिचा आतापर्यंतचा अनुभव बोलत होता. गंमत म्हणजे आम्ही ज्या दिशेने आलो होतो त्याच दिशेने बस जाणा होती. मला तर चक्रावल्यासारखं झालं होतं. दिशांचा काही अंदाजच नाही. बसचा हा स्टॉप पुनः अपवाद, किती वेळाने बस येईल हे दाखवणारा इंडिकेटर नाही. त्यातून दोन वेगळे स्टॉप्स होते म्हणजे गोंधळ आलाच. पण सुदैवाने रस्त्यावर माणसं होती आणि आम्ही पोहोचेपर्यंत तिथे स्टॉपवरपण दोघेजण आले. त्यांना विचारून खात्री करून घेतली.

आम्ही रहात होतो तो भाग, मूळ व्हेनिस जेव्हा रहाण्याजोगं नाही असं विविध कारणांनी लोकांना जाणवायला लागलं तेव्हा विकसित झालेलं उपनगर. इथे रहाणारे हे मूळ बेटावरचे पण तिथल्या डासांना, हवेला, खा-या पाण्याच्या दुष्परिणामांना वैतागून इथे आलेले. यांची बेटावरची  घरं आता बी अ‍ॅन्ड बी म्हणजे बेड अ‍ॅन्ड ब्रेकफास्ट्मध्ये बदललेली. तसाही इथे नोक-यांचा दुष्काळ त्यामुळे टूरिझम ही चांगली मिळकत देणारी इंडस्ट्री आहे हे त्यांनी लक्षात घेतलेलं आहे.

बस थेट व्हेनिसपर्यंत जाते. बेटापर्यंत रस्ता आणि रेल्वे दोन्ही एका पुलावरून जातात आणि त्यांच्या मर्यादेत उभ्या रहातात. पुढे मग सामानासाठी पोर्टर्स (तेवढीच काळी लोकं किंवा आपण (बांगलादेशी प्रामुख्याने) यांची पोटापाण्याची सोय!) आणि बाकी आपले पाय! तसाही त्यांचा अंतर्गत व्यवहार पाण्यावर सुरू असतो. ट्रांसपोर्ट कंपनीच्या वॉटर बसेस आहेत. होड्या असतात, गंडोला आहेत. अडचण कसलीच नाही. वॉटर बस स्वस्त आहे आणि तिचे वेगवेगळे रूटसही आहेत. जेवढ्या शक्य असतील तेवढ्या सोयी करण्याबाबत या युरोपिअन लोकांकडून शिकून घ्यावं. आणि त्या सोयीही खासगी नव्हे तर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था.

वॉटर बस

बस शेवटच्या थांब्यावर थांबली आणि आम्ही उतरून  छोटा पूल पार करून मुख्य बेटावर गेलो. आज एक दिशा घेऊन सुटायचं असं ठरवून निघालो. कालव्याच्या कडेने सगळीकडे खाणावळी,   जेवणावळी आणि त्याहीपेक्षा पिणावळी सुरू होत्या. म्युझिक,  नाचगाणी असं उत्फुल्ल वातावरण आमच्या स्वागताला आणि मावळतीचे रंग या सा-याची शोभा वाढवायला. समुद्राच्या अतिपरिचित सहवासात कायम राहिल्याकारणने असेल पण आता इथे आल्यावर खूप बरं वाटत होतं. हवा दमट असली तरी उष्ण नव्हती कदाचित संध्याकाळची वेळ म्हणूनही असेल पण सुखद वाटत होतं. आम्ही डावीकडची एक दिशा धरून पुढे जाताना असं लक्षात आलं की आता आपण जात आहोत तो भाग शांत होत चालला आहे. उगीच भलतीकडे तर जात नाही ना ही शंका आली मनात पण तसच दामटून पुढे जात राहिलो. बेटाचा तो शेवट होता. अगदी टोकाला आलो. दोन्ही काठांना इमारती त्यामुळे आतापर्यँत  समुद्र असा दिसत नव्हता. पुढे आल्यावर त्याचं व्यवस्थित दर्शन झालं .




सूर्य मावळला असावा का? आकाश तरी रंगात न्हाऊन निघालं होतं. मागे फिरून परतलो आणि मग एका ठिकाणी पूल ओलांडून पलीकडे गेलो. खूप चहल पहल. सिटी सेंटर असावं तशी. खूपशी दुकानं आणि काय नि काय! सूर्य मावळलेला बघितला तरी आतापर्यँत घड्याळाची आठवण झाली नव्हती. वेळेत परतायला हवं होतं. नंतर बसची फ्रिक्वन्सी कमी होते आणि ते जवळचं रेस्तरॉं बंद होऊन चालणार नव्हतं.

मग आणखी पुढे जाण्याचं टाळलं आणि माघारी फिरलो. व्हेनिसचं मावळतीचं हे सौंदर्य मात्र खासच होतं. पाण्यातल्या तरंगणा-या रोषणाई केलेल्या बोटी, माणसांनी भरलेल्या वॉटर बसेस आणि एकूणच उत्साही वातावरण, आपण इथे न राहून चूक केली का? क्षणभर का होईना विचार मनात तरळून गेला.




इथे बसमध्ये तिकिटं काढण्याचा प्रश्न नसतो. आमच्या क्रिस्तिआनो साहेबांनी आम्हाला आज आणि उद्या पुरतील एवढी तिकिटं देऊन ठेवलेली होती ही कृपाच म्हणायची. कारणही गमतीशीर. सगळ्या स्टॉपच्या जवळ पेपर स्टॉल किंवा तबाक (तंबाखू) शॉप असतात त्यात ही तिकिटं मिळतात. आमचा स्टॉप अपवाद. मग येणार्‍या पाहुण्यांची गैरसोय होणार म्हणून हे गृहस्थ ती विकत आणून ठेवतात आणि देतात येणार्‍याला.

बसचा नंबर बरोबर होता पण त्यावरची पाटी भलतीच होती. आम्ही विचारल्यावर जोरात नो नो मान हलवली ड्रायव्हरसाहेबांनी आणि भलताच नंबर म्हाला सांगितला. आम्ही हो म्हटलं खरं पण विचार केला की नंतरची बस तरी शॉर्ट ट्रीप नसेल कशावरून? नवीन प्रयोग करण्यापेक्षा निदान रूट माहीत आहे तर याच बसमध्ये बसू या. तशीही आपल्याला चालायची आणि गोंधळ घालायची (सुद्धा)  सवय आहे. आम्ही मागच्या दाराने तिकिट स्वाइपकरून आत गेलो. रात्र झाली होती. परतताना मघाच्या रस्त्याच्या कोणत्याही खुणा आता दिसत नव्हत्या. बस एका ठिकाणी थांबली. सगळेजण उतरून गेले होते. आम्ही आणि एक माणूस वगळता. उत्तराच्या चेहे-यावर प्रश्नचिन्ह आणि काळजी दोन्ही दिसत होती. मला तेही स्वातंत्र्य नव्हतं त्यामुळे माझा चेहेरा मख्खं होता. बसने एक वळण घेतलं आणि आल्या दिशेला तोंड करून ती उभी राहिली. आता तिचा परतीचा प्रवास सुरू होणार होता.

आमच्याप्रमाणे बसमध्ये असलेला माणूस उतरून तरातरा निघून गेला. आम्ही उतरलो. उत्तराच्या आता? या प्रश्नाला माझ्याकडे ठाम उत्तर नसलं तरी एक निश्चित होतं. तिला म्हटलं आपण जेव्हा निघालो दुपारी तेव्हा बसने आपल्या घराजवळचा पूल ओलांडला होता. आपण बसच्या दिशेने परत फिरून उपयोग नाही हे तुला माहित आहे तेव्हा तसेच पुढे जाऊ. पूल (फ्लायओव्हर) लागला तर आपण पोहोचलो नाही तर आपल्याकडे फोन आहे. घाबरायचं कारण नाही. आम्ही उतरून पुढे आलो आणि पूल दिसला. सुटकेचा निःश्वास वगैरे ठीक पण पुलासारखे पूल अनेक असू शकतात याची जाणीव मनात होतीच आणि ती अस्वस्थ करणारी होती. रस्ता पूर्ण सुनसान चिटपाखरू नाही आणि आम्ही दोघेच त्या रस्त्यावर. हॉरर फिल्ममधला थंडगार  काळोख, अर्थात मनाच्या त्या अवस्थेत आम्हाला भासणारा आणि एव्हढ्यात ठक ठक चालण्याच्या आवाजाची चाहूल आमच्याच दिशेने, जवळ जवळ येणारी  मागे वळून बघू नको. मी उत्तराला सांगत होतो. ती ठक ठक मोठी होत आमच्या जवळ आणि.......

                                                                                  उर्वरीत भाग पुढील  मंगळवारी

1 comment:

  1. फार उत्कण्ठावर्धक.कमाल आहे तुमची.

    ReplyDelete