Monday 9 February 2015

ITALY VENEZIA (VENICE ) III


इटली वेनेझिया (व्हेनिस) ()

हॉरर फिल्ममधला थंडगार काळोख, अर्थात मनाच्या त्या अवस्थेत आम्हाला भासणारा आणि एव्हढ्यात ठक ठक चालण्याच्या आवाजाची चाहूल. आमच्याच दिशेने, जवळ जवळ येणारी! मागे वळून बघू नको. मी उत्तराला सांगत होतो. ती ठक ठक मोठी होत आमच्या जवळ आणि विशीतला तरूण मुलगा तरातरा चालत आम्हाला ओलांडून पुढे! . आधार वाटावा की भीती हेसुद्धा कळेनास झालं होतं. तो बिचारा त्याच्या मार्गाने निघून गेला. तो लांबलचक फ्लायओव्हर संपताना आमचं ते छोटं घर दिसलं तेव्हा कुठे जिवात जीव आला..  

दहाला पाच एक मिनिटं असतील क्रिस्तिआनो म्हणाल्याप्रमाणे जर १० पर्यंतच रेस्तरॉं उघडे असेल तर आता उपास असं म्हणत आम्ही तिकडे वळलो तर तिथे जल्लोष सुरू होता. शुक्रवारची रात्र म्हणजे धंद्याचा दिवस. इतक्या लवकर बंद करून कसा धंदा होईल? आम्ही काऊंटरवरच्या माणसाकडे आमचा मंत्र म्हणायच्या तयारीत उभे होतो. तरीही प्रयत्न म्हणून व्हेजिटारिश असे इटालिअनमध्ये(?) सांगायचा प्रयत्न केल्यावर मी कोणत्यातरी अगम्य भाषेत बोलत असल्यासारखा चेहेरा करून त्याने इंग्लिश? असं मला विचारलं आणि हाताने थांबायची खूण केली. शेजारच्या कॅश काउंटरवरची मुलगी त्या उंच स्टुलावरून उतरून वळसा घालून आमच्यापर्यंत आली आणि तिने हळुवार विचारलं how can I help you? आम्ही व्हेजिटेरिअन म्हणजे नो मीट नो फिश नो एगचा मंत्र म्हणत असताना मधेच तोडून I understand म्हणाली आणि पित्झा-पास्ताच्या डिश कोणत्या आम्हाला चालतील अशा आहेत त्या दाखवल्या. त्यातलं मश्रूम नको सांगितल्यावर ती हसली. बहुधा इथे येणार्‍या भारतीयांची तिला सवय असावी. आपण ऑर्डर करतो त्याचा आकार आपल्याला माहित नसतो म्हणून तिला विचारलं तर ती म्हणाली काळजी नको मी एक पित्झा पाठवते. नंतर आणखी काही लागलं तर त्यानंतर बघू. आम्हाला हायसं वाटलं आपल्याला काय म्हणायचं आहे ते दुसर्‍याला कळतं आहे या कल्पनेनेच किती विश्वासाचं वातावरण तयार होतं. यथावकाश तो पित्झा आला आणि तिच्या अंदाजाप्रमाणे आम्ही एकातच आटोपलो. आता निवांत घरी जाऊन झोप! असं म्हणत निघालो. दोन घरं टाकून आमचं घर.

जिना चढून वर आलो तर हा बाबा आमच्या स्वागताला हजर! म्हटलं अरे तुला झोप वगैरे नाही का तर म्हणाला मी एकटाच तर रहातो खाली. बाकी उद्योग काही नाही. मग काम करत बसतो. सगळं व्यवस्थित झालं ना? काही प्रॉब्लेम वगैरे? आम्ही हसलो. म्हणाला नक्कीच काहीतरी घोटाळा झाला, हो ना? मग त्याला बसची गंमत सांगितली तर एकदम चिडल्यासारखा आवाज मोठाच झाला त्याचा! अरे! तुम्ही फोन करायचा ना मला. चालत कशाला यायचं एवढ्या लांब इतक्या रात्री? म्हटलं अरे तुझ्या मोटरसायकलवरून कसे येणार होतो आपण तिघे? त्याचं उत्तर तयार होतं म्हणाला अहो एका वेळी नाही पण मी प्रथम मॅडमना आणून सोडलं असतं ना! त्याच्या आवाजातील concern बघून बरं वाटलं. ते ठीक आहे पण कंटाळला नसाल तर बसा ना जरा वेळ गप्पा मारू. आम्हीही मग निवांतपणे त्याच्याबरोबर गप्पा मारायला बसलो.

नेहेमीचं इंडिया ग्रेट कंट्री वगैरे प्रास्ताविक झालं. हे अहो रूपम अहो ध्वनिच्या चालीवर घ्यायचं असतं हे आतापर्यंतच्या अनुभवातून मी शिकलो होतो. कारण भारताची हिस्ट्री ग्रेट म्हणायची तर मग रोमन इतिहासाला काय म्हणायचं? ऐतिहासिक दृष्टीने बघायला गेलं तर आपण एकाच पातळीवरचे देश आहोत. दोघांनाही इतिहासात रमायला आवडतं. पण वर्तमानाचं काय? सध्या ना त्या देशाचं फारसं चांगलं ऐकू येतं आणि आपल्याबद्दल तर आपण जाणतोच.

विषय बदलायचा म्हणून त्याला म्हटलं हे (अपार्टमेंट रेंट करायचं) सुरू करायचं कस सुचलं? तो म्हणाला, “ मी खूप धंदे केले याआधी. मायामीला होतो, त्याआधी लंडनला. मायामीला खूप श्रीमंतांना हाऊसकीपरसारखी कामं करायलाही माणसं लागतात. पैसा मिळतो पण त्यात मजा नाही. अनुभव घेतला, आलो परत. इथे नोकर्‍यांची बोंब आहे. हे घर असच ओळखीतून मिळालं आणि वाटलं आपण आपल्याला आवडेल असं काहीतरी करू. हे सगळं इंटिरिअर माझं स्वतःचं आहे. रंग मी स्वतः दिला आहे, भिंतींवरची नक्षी, चित्र सगळं माझं. मी खाली रहातो, एकटाच. त्यामुळे २४ तास मला इथे देता येतात. मघा तुम्ही आलात तेव्हा मी क्रॅब्ज आणायला गेलो होतो. इथले क्रॅब्ज अतिशय फेमस आहेत. असं म्हणून त्याने आणलेले राक्षसी आकाराचे खेकडे दाखवले. ही जात इतर कुठे मिळणार नाही. ते समोरच्या खोलीतलं जोडपं आहे ना ते तिकडे युद्ध सुरू आहे ना त्या युक्रेनमधून आले आहेत. त्यांची फर्माइश होती म्हणून आणले. खर म्हणाल तर जिवंत एखादी गोष्ट शिजवणं हे माझ्या तत्वात बसत नाही पण हा धंदा आहे. Customer's satisfaction is foremost! माझ्या आवडी मी बाजूला ठेवल्या आहेत. त्यांना शिजवून घातल्यानंतर त्यांना ते आवडलं की त्याचं समाधान माझ्या चेहे-यावर झळकतं.” त्याची ती थिअरी ऐकून मी चाट पडलो. फन्डाज क्लिअर होते.

मला तेवढ्यात सकाळची आठवण झाली. माझ्या ब्रेकफास्टची मला काळजी होती. बरोबर उपम्याची पाकिटं होती. विचार होता करून खावा. म्हणून त्याला मी म्हटलं उद्या थोडा वेळ जर किचन वापरलं तर....... म्हणाला जरूर वापरा पण ब्रेकफास्ट मीच बनवून देणार तुम्हाला. मला माहित आहे तुम्ही व्हेज आहात. मी व्यवस्थित करतो. काळजी करू नका. त्याच्या मेलमध्ये ब्रेकफास्ट पॅकेजमध्ये असल्याबद्दल उल्लेख नव्हता. मनात धाकधूक, याने त्याचे वेगळे पैसे मागितले तर? कारण फ्लोरेन्सला ब्रेकफास्टचे वेगळे १० युरो प्रत्येकी पडतील अशी सूचना होती आणि ब्रेकफास्टसाठी ही रक्कम निश्चितच जास्त होती. उद्याचं उद्या बघू असं म्हणून आम्ही झोपायला उठणार होतो इतक्यात तो म्हणाला मला थोडीशी माहिती हवी होती. म्हटलं विचार


तुमच्या देशाविषयी, माणसांविषयी काहीतरी सांगा " मलातरी काहीच सुचत नव्हतं. उत्तराने त्याला हॉलिवूड तसं बॉलिवूड आणि अमिताभ असं काहीतरी सांगितलं, कितीसं पोहोचलं कोण जाणे. त्याला म्हटलं अरे इतका मोठा देश, काय आणि किती सांगू असं म्हणताना मला काहीच सांगता येत नाही. मग थोडे महात्मा गांधी, थोडा गौतम बुद्ध, शिवाजी असं काही काही सांगितलं. गौतम बुद्ध आपला हे आश्चर्य वाटणारा हा आणखी एक! कारण आपणच बुद्धाला तसा परका केला आहे. आपले USP काय हेच आपल्याला ठाऊक नसतात. महात्मा गांधींविषयी युरोपात प्रचंड कुतुहल आहे. काही थोडं त्यांनी ऐकलेलं आहे पण आपल्याकडून तिकडे जाणारी माणसं त्यांच्याविषयीची काय भावना घेऊन जातात कोण जाणे! आपल्या मनातील गांधीजींविषयीची परकेपणाची त्याहीपेक्षा द्वेषाची किंवा ५५ कोटी वगैरेंविषयीच्या गैरसमजाची भावना घेवून परदेशी जाणारे लोक काय कप्पाळ त्यांना त्यांच्याविषयी चांगलं सांगणार?

                                                                                   उर्वरीत भाग पुढील  मंगळवारी

परदेशात आपली माणसं भेटल्यानंतर होणार्‍या आनंदाप्रमाणेच आणखी काही ओळखीचं भेटल्यानंतरही तितकाच आनंद होतो. कदाचित शब्दात वर्णन करता येणार नाही पण हे फोटो मात्र तेच जास्त स्पष्टपणे सांगतात.






  

1 comment:

  1. फारच छान आणि चिंतनपूर्ण.भारताबद्दल सांगताना मी एक दोघांना सतीच्या चालीबद्दल सांगताना थांबविले आहे.
    परदेशात आपल्या देशाचे USP s काय आहेत हे सांगणे कठीण काम असते.

    ReplyDelete