Monday, 23 February 2015

ITALY VENEZIA (VENICE ) Vइटली वेनेझिया (व्हेनिस) ()

दुसर्‍या दिवशी हा आम्हाला काय ब्रेकफास्ट देणार, त्याहीपेक्षा देऊ शकणार का हाच प्रश्न माझ्यापुढे होता. एकतर आम्ही झोपायला गेलो तरी हा पठ्ठ्या त्याच्या ऑफिसमध्ये बसून काम करत होता. ऐकीव माहितीप्रमाणे इटालिअन्स हे आपल्याला जवळचे वाटावेत असे. म्हणजे हा उशीरा उठणार आणि सगळाच घोळ होणार आज, असं मनात होतं. आन्हिकं आटोपून समोरच्याच त्याच्या ऑफिस कम वेटिंग मध्ये गेलो तर तिथे कुकीज, बिस्किटं, ज्यूसचा भरलेला जग, केक्स असे पदार्थ मांडलेले होते. ळं तर होतीच. आम्ही आम्हाला चालणार्‍या गोष्टी ख्रिस्तिआनोच्या येण्याची किंवा परवानगीची वाट न पहाता भरपेट खाऊन घेतल्या. नंतर फिरताना खाण्याकरता वेळ मिळालाच नसता.

आमचं आवरून बस पकडली. कालचाच मार्ग पण आज काळोख नव्हता. आम्ही काल ज्या मेस्त्रे स्टेशनवरून आलो होतो त्याच्या जवळूनच बस जात होती. आज, काल न बघितलेला समुद्रावरचा पूल, रस्त्याला समांतर जाणारी रेल्वे, मोठाल्या बोटी सारं बघत जात होतो. काल व्हेनिसमध्ये बेटावर उतरल्यानंतरची एक बाजू बघून झाली होती. आज पलीकडे गेलो. बेटाचा टूरिस्टच्या दृष्टीने महत्वाचा हा भाग. इथे पाट्या आहेत पण तरी गोंधळ होण्यासारखे गल्ल्या बोळ आहेत. इथे रस्तेच नाहीत, फक्त वॉटर वेज आहेत असं नेहेमी म्हटलं जातं. रस्ते नाहीत ते वाहतुकीकरता. चालण्याकरता रस्ते आहेत. वाहनं मात्र नाहीत. प्रवासाची साधनं म्हणजे लहान मोठ्या बोटीच फक्त. मग वॉटर बस म्हणा किंवा गंडोला म्हणा.गंडोले, राजेशाही, दिमाखदार  बैठक.  

इथला ग्रॅन्ड कनाल हा नावाप्रमाणेच आहे आणि तसा तो वाहतुकीचा भारही घेतो. आम्हाला अर्थात त्या प्रवासात इंटरेस्ट नव्हता. आम्ही इथली दुकानं बघ, गर्दी बघ, माणसांचे नमुने असं काहीबाही बघत पुढे जात होतो. तसा इथला सान मार्को चौक (Piazza San Marco) प्रसिद्ध. तिथेच ती बॅसिलिका म्हणजे चर्च Basillica di San Marco. 

गर्दी खूप. आम्हाला आता या सगळ्यात आत जाऊन बघण्यात काडीचा रस राहिलेला नव्हता. आलो आहोत बघू या इतकच काय ते. पण दोन्ही गोष्टी लक्षवेधी होत्या. बांधकामाची शैली कोणती ते न कळो पण त्यातला भव्यपणा, सौंदर्य हे तरी कळतं ना आपल्याला. माणसांची ही गर्दी! आम्ही निवांतपणे सभोवार एक फेरी मारली आणि दुसर्‍या बाजूने बाहेर पडायला म्हणून गेलो तर पुनः तिथेच पहिल्या जागी आलो. नंतर कळलं बेट असल्याने आणि रस्त्यांची वानवा असल्याने इथून तिथून पुनः त्याच जागी येण्याची शक्यता जास्त. तशी एक दिशा धरून चालू या म्हटलं तर ते शक्य होत नाही.
इथे मुखवट्यांचं प्रस्थ दिसलं . अनेक दुकानातून अनेक प्रकारचे मुखवटे लावलेले दिसतात. कसलातरी फेस्ट असतो त्यावेळी हे घालतात वगैरे वगैरे...मला त्या तपशीलात फारसा रस नव्हता

इथल्या काचेच्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या वस्तूंनी भरलेली दुकानं केवळ प्रेक्षणीय. त्या मुरानो ग्लासची फॅक्टरी बघायला जायचा उत्साह आणि वेळ दोन्ही आमच्यापाशी नव्हता. पण त्या कारखान्यात तयार झालेल्या काचेच्या वस्तूंचे लाल पिवळे असे अतिशय ब्राइट रंग नजर वेधणारे होते.

पोन्टे डी रिआल्टो Ponte de Realto हा सोळाव्या शतकात बांधलेला पूल त्याच्या कमनीय(!) म्हणजे २४ फुटी कमानीकरता प्रसिद्ध. त्यावर असलेली जवाहि-यांची आणि मुरानो काचेच्या वस्तूंची दुकानही तितकीच छान आहेत. हा भाग खूपच गजबजलेला आहे.
इथे एक झोपडपट्टी पण आहे असा उल्लेख खूपजणांच्या तोंडून ऐकला होता. आपण सगळे गूगल भाषांतरात माहीर झालो आहोत त्याचा परिणाम असावा. कारण इथे घेट्टो Ghetto आहे हे खरच आहे. पण त्याचा अर्थ झोपडपट्टी नव्हे. इथे पूर्वापार व्यापाराचं केंद्र होतं. त्यामुळे विविध देशातील वेगवेगळ्या धर्मांचे लोक इथे रहात. तर ज्यू, तुर्की अशा विविध लोकांच्या या वस्त्यांना घेट्टो म्हणतात. दुर्दैवाने यात्रा कंपन्यांमधील गाइडस त्याची माहिती देताना इथे झोपडपट्टी आहे बघायची का अशी करून देतात. अर्थात इथे येऊन कशाला बघा असा विचार करून लोकही नाहीच म्हणतात.

फार वेळ नव्हताच आम्हाला. घरी जाऊन पुनः बस पकडून मिलानची गाडी पकडायची होती. तेव्हा यावेळेपुरते इतके व्हेनिस पुरे आहे असे म्हणत आम्ही परतीच्या दिशेने निघालो. आल्यानंतर क्रिस्तिआनोला भेटणं गरजेचं होतं. त्याची पळापळ सुरू होती. नवीन गेस्ट आले होते. त्यांची विचारपूस, हवं नको वगैरे. त्याला म्हटलं आम्हाला निघायला हवं. तसं गयावाया करत म्हणाला दहा मिनिटं मला द्या. तसेच नका जाऊ. मी येतो. आम्ही वाट बघत बसलो. आला पण जरा आमची चिडचीड झाल्यावरच आला. म्हणाला आता त्याच बसने अमक्या स्टॉपला उतरा. तिथून जवळ आहे स्टेशन. मला आज खूप गप्पा माराव्या वाटत होत्या तुमच्याबरोबर. काल खूप बोललो तरी रात्र झाली म्हणून आवरतं घेतलं. पण मजा आली. परत भेटू या अर्थाचं इटालिअन rivedere म्हणाला. त्याने अर्थ सांगितला म्हणून आम्हाला कळलं इतकच.

मी निघण्याकरता उभा राहिलो आणि म्हटलं तू धंदा करतोस ना रे? असा धंदा करशील तर कठीण बाबा तुझं. तो बघतच राहिला. म्हटलं अरे तुला मी मघा हिशोबाचं विचारलं तर तू म्हणालास काही नाही म्हणून. काल तू आम्हाला बसची आठ तिकिटं दिली होतीस. प्रत्येकी १.३० युरो प्रमाणे त्याचे १०. युरो होतात. असे जर तू वाटलेस..... त्याने वाक्य मधेच तोडत म्हटलं. Its ok. I am so contented when I see you satisfied, money is not important!


त्याला तिकिटाचे पैसे आणि शुभेच्छा देत निरोप घेतला. आज व्हेनिस कसं वाटलं या प्रश्नाला माझं उत्तर असतं क्रिस्तिआनो छान होता!

                                                                      इति व्हेनिस अध्याय. पुढील मंगळवारी मिलान 
###
आत्तापर्यंत मी फक्त  स्वतः काढलेले फोटो माझ्या या ब्लॉगवर दिले आहेत. पण वर मी दिलेल्या या पुलाचा  फोटो मला विश्वास देण्यात कमी पडला म्हणून ही गूगलची केलेली उसनवारी. वाचकांना मी वर्णन केलेल्या पुलाचा अंदाज यावा हा एकमेव उद्देश.


3 comments:

  1. छान पण नेहमीचा एकसंधपणा कमी

    ReplyDelete
  2. छान पण नेहमीचा एकसंधपणा कमी

    ReplyDelete
  3. स्पष्टीकरण म्हणून नव्हे पण कदाचित प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यातला कमी झालेला उत्साह कारणीभूत असू शकेल. सुधारणेकरता ही प्रतिक्रिया निश्चितपणे उपयोगी पडेल.

    ReplyDelete