Monday 28 September 2020

निरीक्षणं (OBSERVATIONS)



 निरीक्षणं

 

या सगळ्या काळात आम्ही एक पथ्य आवर्जून पाळलं. निसर्गामध्ये ढवळाढवळ नाही. ना आम्ही कधी फोटोकरता म्हणून शेजारील पार्टिशन उघडलं ना त्यांच्या दैनंदिन व्यवहारा आड आलो. त्यांना पुरवायचं ते  संरक्षण पुरवलं इतकंच.

जेव्हा लक्षात आलं की कॅमेरा जाऊ दे पण मोबाईल हातात घेतलेला लक्षात आला तरी ते पळून जातात तेव्हा आम्ही अगदी दुरून फोटो काढायचा प्रयत्न केला. या प्रयत्नात अर्थातच फोटो मनासारखे येण्याला मर्यादा होत्याच. प्रत्येक वेळी हे फोटो प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने काढावे लागत त्यामुळे स्पष्ट प्रतिमा मिळत नसे. आणि दरवाजातून टप्प्यात येईल इतकेच कॅमेरा टिपणार होता. पण या इतक्या नाचर्‍या, अस्थिर आणि आकाराने लहान जीवापुढे आमचं काही चालणार नव्हतं. घरट्याचा खोपा काही आम्हाला मोबाईल फोटोत पकडणे शक्य झाले नाही कारण खोलीचा (depth) अंदाज फोटोत येत नव्हता. 

आम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच त्यांच्या जवळ जाण्याचा मोहही टाळला.

एक निश्चित या पक्षांची स्वच्छतेची काहीतरी व्यवस्था असावी जी आम्हाला उमगली नाही. एवढ्या दिवसांच्या वास्तव्यानंतर घरट्यातून दुर्गंधी येते आहे किंवा विष्ठा पडलेली आहे असं कधी झालं नाही.

आणि हो, एक महिन्याभरात  आम्ही रोज जोडी जोडीने येणारे पक्षी बघत आहोत. ती “तीच” जोडी आहे की आणखी कोणती ते कळायला मार्ग नाही पण आता पुन्हा जास्वंदीच्या कळ्या खाल्लेल्या असतात, घरटं आम्ही अजून तसंच ठेवलं आहे. न जाणो इतर कोणी त्याचा वापर करण्याचं ठरवलं असेल?    


 



हे आमचं कुंदाचं झाड आणि हीच ती  फांदी 




                                                                   ही घरट्याची सुरवात 



नाही, हा शेवट नाही. हा सगळा कचरा चुकलो, साहित्य आणून टाकलं. आता ते व्यवस्थित विणून घेणार.  दोरा कोणता?  ते गुंतवळ मग कशाकरता आहेत?




पक्षांच्या वावराने आनंदलेली, फुलारून आलेली जास्वंद. खरं तर निसर्ग चक्रच  हे. परागीकरणाचं काम या पक्ष्यांनी केलं त्याचा हा परीणाम।   

पिल्लांना भरवताना 


या व्हीडिओची तारीख आहे 28 ऑगस्ट. सकाळी 8 वाजून 36 मिनिटं.   ही अशी काय वेड्यासारखी घरट्यावर , इकडे तिकडे करते आहे?  ही निरवनिरव सुरू आहे याची जराही कल्पना आम्हाला आली नाही.


 



तुम्ही इतका वेळ माझ्याबद्दल ऐकत होता. प्रत्यक्षात त्याच्या मानेकडे सुंदर मोरपीशी रंग होता. कदाचित आपल्याकडील जात वेगळी असेल. .
फोटो गूगलच्या सौजन्याने

Sunday 27 September 2020

सृजनोत्सव

 

सृजनोत्सव


हे घरटं बांधायला सुरवात झाली आणि आम्ही आता त्यात पूर्ण बुडूनच गेलो आहोत. सकाळ होते कधी आणि हा दरवाजा उघडतो कधी याची आतुरता असते. आतुरता या शब्दापेक्षा खरंतर इंग्रजीमधील anxiety हाच शब्द वापरायला हवा. त्यात या व्यतिरिक्त अंतर्भूत असलेले काळजी, चिंता वगैरे सगळ्या छटा आता आम्हाला एकत्रच जाणवत होत्या.

 

झोपताना, रात्रीत काही दगा फटका तर होणार नाही ही भीती. सकाळी लवकर दार उघडून तिथे एक काठी ठेवत असू. ही काठी कावळे येऊ नयेत म्हणून. शिवाय दिवाळीतील  कंदील लावायच्या हुकला एक सीडी लटकावून ठेवली होती, म्हणे सीडी लावली की  कावळे उपद्रव देत नाहीत. आम्ही अंधश्रद्धेच्या जवळ जात आहोत का अशी मला तर शंकाच यायला लागली होती.

 

साधारण नागपंचमीच्या एक दोन दिवस आगे  मागे ती घरट्यात बसायला सुरवात झाली असावी.  ती आत आहे याला पुरावा फक्त तिची बाहेर दिसणारी चोच होती. शांत बसलेली असे, काही हालचाल न करता. ती आहे हे बघून आम्ही मग अजिबात तिकडे जवळपास फिरकत नसू. दिवसातून दोन तीन वेळा फारच तर चारपाचदा खाण्याकरता असेल पण ती तिथे घरट्यात  दिसत नसे. सुरवातीला लक्षात आलं नाही पण एकदा समोर बसलो  असताना बाहेरून हलका चूक असा  आवाज आला, बोलवावं  तसा, आणि ही झटक्यात नाहीशी झाली. तेव्हापासून आम्हीही लक्ष ठेवू लागलो. अंदाज बरोबर होता. तिचा मित्र आणि ती दोघे एकत्र जात असावीत.

 

अंडी घातली आहेत का हे बघण्याचा आमचा प्रयत्न मात्र सपशेल फसला. एकतर यांचा जीव तो किती? तसाच त्यांच्या अंड्यांचा आकार असणार. त्यात तो खोपाही बटव्याप्रमाणे  व्यवस्थित खोल, पुनः अंतर्वक्र त्यामुळे कसलाच अंदाज लागत नव्हता. पण तिचे तिथे गुपचूप आवाज न करता बसणे हे आणखी कसले लक्षण असू शकणार होते? तसा हा पक्षी अगदी अस्थिर, एकाजागी बसत म्हणून  नाही तिथल्या तिथेही तो उड्या मारत राहतो, म्हणून खात्री वाटायला लागली होती की अंडी घालून ती उबवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला असावा.

 

आता वाट बघणे आले. उबवण्याचा काळ दोन ते तीन आठवड्याचा असतो असं मी वाचलं होतं. म्हणजे अजून बराच वेळ असावा अशी आम्ही कल्पना करत होतो.

 

घरट्याच्या बांधणीला सुरवात झाली ती १३ जुलै च्या आधीच्या आठवड्यात. त्याआधीचे  त्यांचे तीन प्रयत्न हाणून पाडले होते.  नागपंचमी होती २५ जुलै रोजी. म्हणजे साधारण तीन आठवड्याचा त्यांचा अंडी उबवण्याचा काळ धरला तर  ऑगस्टच्या  तिसऱ्या  आठवड्यात बाळांची हालचाल लक्षात यायला हवी होती. अर्थात त्या घरट्यात डोकावणे अशक्य होते. ती तिथे आसपास असे किंवा जवळच्या झाडावर असे. मी झाडांना पाणी घालायला जरी गेलो तरी विशिष्ट आवाज काढून नाराजीचा सूर लावे आणि तरीही मी तिथेच असलो तर सरळ डोक्यावरच्या रॉडवर बसून ओरडत राही.

 

श्रावणातला सोमवारचा दिवस होता. सतरा तारीख ऑगस्टची . सकाळी पाणी घालत असताना अगदी क्षीण आवाज आला घरट्यातून. खात्री करून घेण्यासाठी मी बायकोला हाक मारली. तर अगदी  कान  देऊन ऐकलं तरच  ऐकू येईल इतका नाजूक आवाज होता. चला म्हणजे आता नक्की झालं की पिल्लू आहे आत. इतके दिवस नुसतेच अंदाज बांधत होतो. तरीही आजूबाजूच्या शेजाऱ्यांना याचा पत्ता लागू दिला नाही. मला मनातल्या मनात हसू येत होतं. तिसरा महिना लागल्याशिवाय उगीच गवगवा नको अशी सूचना घरातल्या मोठ्या स्त्री व्यक्तीकडून मिळत असे त्याची आठवण झाली.  सगळ्यांना पिल्लू  बघायची उत्सुकता होती पण दिसत तर काही नव्हतं. आवाज पुढचे दोन तीन  दिवस गेल्यानंतर थोडा मोठा झाला आणि त्याची चाहूल आमच्या शेजारीही सगळ्यांना  लागली.

 

आता आमचं फक्त आवाजावर समाधान होणं कठीण होतं. पण पिल्लू  खूप लहान असावं. तिच्या भरवण्यावरून ते लक्षात येई. घरट्याच्या दारात, कठड्यावर आपले पाय रोवून   ती पूर्ण आत झुकून भरवताना आम्हाला दिसत होती. त्याअर्थी तिचं बाळ वरती येण्याएवढं मोठं नसावं. पण फार  वाट पाहावी लागली नाही. एक दिवस हळू पुढे गेलो तर हे रावसाहेब चोच वरच्या दिशेला करून बसले होते. त्याच्या मानेकडला लिंबू रंग छान दिसला. चाहूल लागताच ते लहान मुलं कोपऱ्यात कशी हात वर घेऊन लपतात तसं चोच वर करून लपलं होतं. आता आमचा लपंडाव सुरु झाला होता. क्वचितच त्याच्या लक्षात न येऊन  ते तसेच वर राहत असे.

 

दोन तीन दिवसांनंतर, आता मात्र त्यांची आई आत झुकून भरवेनाशी झाली. आता  ती पाय घट्ट रोवून उलट बाजूला ९० अंशाच्या कोनात झुकत असे आणि ती इवली चोच झटक्यात तिच्या चोचीतून घास हिसकावून घेत असे.

 

अशात एक दिवस एक चिमणीसुद्धा आमच्या कठड्यावर सोबत बसावं तशी येऊ  लागली. ती म्हणे हे दोघे पूर्वी येत त्यांच्या बरोबरीने येत असे. असेल मैत्रीण वगैरे म्हणून दुर्लक्ष केलं. मी काही दिवसांनी विसरूनही गेलो. तर एक दिवस  घरटं असलेली फांदी जोरात हेलकावे घेताना दिसली. माझ्या काळजात चर्रर्र झालं. बाहेर बघतो तर चिमणा चिमणीची जोडी जास्वंदीच्या झाडावर बसून तिकडेच बघत होती. काय होतं ते बघू या म्हणून मी उभा राहून बघत होतो तर त्या दांडगट चिमण्याने पुनः घरट्याच्या दिशेने झेप घेतलेली बघताच मी इतक्या जोरात ओरडलो आणि धावलो की घरात कळेना काय उत्पात झाला ते.  त्यानंतर मात्र पुन्हा त्या दोघांना बघितलं नाही. बायको म्हणाली "बहुधा जोडीने आलेले ते दोघेही आता जागा शोधत असतील. आपण आता मॅटर्निटी होम सुरु करू या."

 

जास्वंदीच्या झाडांवरची फुलं आता खाण्याकरता लागत नव्हती. फुलांचा बहर दृष्ट लागण्याजोगा होता. इतक्यात माझ्या लक्षात आलं की घरट्यात दिसणारी  चोच एक नाही दोन आहेत. तारीख बघितली तर सोमवार २४ ऑगस्ट.  मला आश्चर्य वाटलं की इतक्या दिवसात लक्षात कसं आलं नाही. नीट निरखून पाहिलं तर पहिल्याची चोच काळी दिसत होती  तर दुसरी मात्र कोवळी लाल रंगाची होती. दुसरं बाळ नंतर आलं असावं का?  अंडी फोडून बाहेर येण्याच्या वेळा वेगळ्या असतात का?  कल्पना नाही.

 

पण या दोन चोची दिसायला लागल्यावर मजा येई. काही वेळा त्या  एका शेजारी एक दिसत तर काही वेळा एकावर एक दिसत. एवढ्याशा त्या घरट्यात दोघांना जागा कशी पुरत असेल? . आता आवाज वाढलेला  होता.  आम्ही लपवलं तरी  काही लपून राहणार नव्हतं. आमची काळजी वाढली होती.  आतापर्यंत आम्ही घर दिवसा  बंद न ठेवण्याची खबरदारी घेतली होती. अगदी फिरायला जातानाही पूर्वीप्रमाणे दोघे बरोबर न जाता वेगळ्या वेळी जात असू. जेणेकरून दरवाजा बंद ठेवण्याची वेळ येणार नाही. पण आता  गणपतीचे दिवस होते. नेहेमीप्रमाणे दिवसभर नाही तरी पहिल्या दिवशी घराला कुलूप लावून दर्शनाकरता जाणं भाग होतं. आम्ही जाऊन आलो.  सुदैवाने  काही अघटित  घडलं नाही. सगळं सुस्थित सुरळीत सुरु होतं.

 

ऑगस्टची २८ तारीख. आदल्या रात्री आम्ही रात्री उशिरा घरी आलो होतो. धूमधार पाऊस पडत होता. संध्याकाळपर्यंत मोकळं असलेलं वातावरण एकदम कुंद  होऊन गेलं होतं. रात्रभर  पावसाची संतत धार लागलेली होती. पाऊस अक्षरश: ओतत होता. वातावरण अगदी सुन्न  होतं.  पण आज आम्ही आमच्याच व्यापात गुंतलेले होतो. माझी पूजा झाली, देवांना फुलं वाहून झाली, तीर्थ झाडांना अर्पण करून झालं. सगळं नेहेमीसारखं सुरू होतं. आमच्या गप्पा सुरू असताना एकदम आम्ही दोघेही चमकलो.    

 

बाळांचा आवाजअरे! असं कसं होईल. इतके शांत कधीच नसतात. बायको म्हणाली उगीच ओरडू नका. पावसाचा परिणाम असेल,  पावसामुळे शांत झाली असतील. बऱ्याच वेळात त्यांच्या आई बाबांची खेप झालेली मी बघितली नाही. तुम्हाला एवढच वाटत असेल तर घरट्यात  डोकावून बघा. चोच वरती करून निवांत बसलेली दिसतील. मला राहवेना. मी हळू बाहेर गेलो. डोकावून बघितलं तर सगळं शांत होतं. कसलीही हालचाल दिसली नाही. मला एकदम आत कुठेतरी  हलल्यासारखं झालं.

 

एवढ्या पावसात आज हे दोघे त्या दोन इतक्या छोट्या जीवांना घेऊन कुठे गेले असतील? आजच जायचं  नडलं होतं का? त्यांना उडता  येतं  की  नाही याची आधी खात्री नको होती का करून घ्यायला. इतका बेजबाबदारपणा कसा दाखवू शकतात आपल्या मुलांविषयी? माझ्या तोंडाचा पट्टा सुरु होता. आता बायकोलाही काळजी वाटू लागली. कसे गेले असतील? कुठे असतील हे अजिबात कळेना आणि पाऊस तर मी म्हणत होता.

 

आम्ही विचार करायचं सोडून देऊ या असं ठरवलं आणि जेवून झोप काढली.  जाग्रणानंतर आवश्यकता होतीही. दुपारी चार सव्वा चारच्या सुमाराला  जाग आली. नेहेमीप्रमाणे अगदी हळू आवाज न करता दरवाजा उघडला आणि घरट्याकडे गेलो,  सवयीप्रमाणे, पण आता ते रिकामं होतं. विषण्ण होऊन आत वळत होतो तर रस्त्यावरच्या झाडातून परिचित  आवाज आला. मी पुन्हा बायकोला हाक मारली. तुम्हाला भास होतात वगैरे मला ऐकून घ्यायचं नव्हतं. तिनेही ऐकलं आणि जीव भांड्यात पडला. सुखरूप  आहेत. म्हणजे प्रश्न नाही. त्यांनी निर्णय का घेतला वगैरे चर्चा करण्यात अर्थ नव्हता,  त्यांनी तो समर्थपणे घेतला आणि  व्यवस्थितपणे अमलात आणला हे महत्वाचं. होतं.

 

बातमी शेजारीसुद्धा कळली. आता तुम्हाला निवांत झोपायला हरकत नाही, काळजी नको वगैरे अर्धवट चिडवण्यातले पण वस्तुस्थिती निदर्शक सल्ले देऊन झाले. आणि नंतर कोणीतरी म्हणालं आता ते घरटं काढून टाकायला हरकत नाही. ते काही आता येणार नाहीत. सत्य असलं तरी ते इतक्या स्पष्टपणे सांगायची आवश्यकता नसते. निदान त्या दिवशी ताबडतोब तर निश्चित नाही. मी शांतपणे इतकंच सांगितलं, घरटं केव्हा काढायचं ते मी सांगेन तोपर्यंत त्याला कोणीही हात लावायचा नाही. कदाचित माझा सूर कणसूर लागला असावा. भरलेली सभा बरखास्त झाली.

 

नंतरचे दोन तीन दिवस गेले. चौथ्या दिवशी, सोमवारी ३१ ऑगस्टला संध्याकाळी आम्ही घरात  शेजाऱ्यांबरोबर गप्पा मारत होतो. बाहेर चूक असा बोलावल्याचा आवाज आला आणि मी ओरडलो, आले ते. नाही,  भास नव्हता तो. सगळं कुटुंबं आलं होतं. आवाजावरून लहान मोठे कळत होते. तो वर रॉडवर होता. छोटे कंपनी कठड्यावर. आणि ती? ती पुनः घरट्यावर येऊन फडफडली.

 

कशाकरता आली असतील? आम्हाला दाखवायला? पिल्लांचं जन्मस्थान त्यांना दाखवावं म्हणून? कारण काही असो. बाळंतपण  व्यवस्थित पार पडून सासरी गेलेल्या मुलीबद्दल जे आईबापांना  वाटेल ती भावना आम्हा सगळ्यांच्या मनात होती. आज खरोखरीच कृतार्थ भावनेने शांत झोपायला आम्ही मोकळे होतो. 

Friday 18 September 2020

घरटं (THE NEST)

 

घरटं


आमच्या घराची एक गंमत आहे. या आमच्या दोन खोल्या आहेत ना  त्या  दोन्ही खोल्यांना   स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे दोन्ही खोल्यांतून  बाहेर जायला दरवाजे आहेत. अर्थातच ते दरवाजे गॅलरीत उघडतात . नाही, बाल्कनी नाही,  हो, मलाही फरक कळतो दोन्हीमधला. ही आमची आहे ती गॅलेरीच. आमच्या मजल्यावरच्या बिऱ्हाडांना जोडणारी,  कॉमन गॅलरी. तर  आमचं घर शेवटून दुसरं. म्हणजे आमच्या पलीकडे एक बिऱ्हाड आहे. त्यांचं पार्टीशन आमच्या घराला काटकोनात येतं. त्यामुळे सगळ्यांना वाटतं आमचंच घर कोपऱ्यातील. पण तसं ते नाही. त्यात पुनः होतं काय या कोपऱ्यातल्या  घरातली माणसं या पुढल्या दरवाजाचा वापर अभावानेच करतात. त्यांचं आपलं जाणं येणं मागल्या दारानेच असतं.

 

आमचं हे घर आहे अगदी मुंबईच्या राजमार्गावर. हा रस्ता आपला चोवीस तास  बारा महिने    वाहत असतो. उसंत म्हणून कधी घेत नाही. पण त्याने जरी घेतली नाही तरी आम्ही त्यातली उसंत शोधून काढली आहे.  आमच्या या गॅलरीत आमचा एक छानसा बगीचा आहे. लहानसा नाही, मी छानसा म्हटलं. त्यात तीन चार जास्वंदी, तुळस, गुलाब, रातराणी अशा झाडांबरोबरच एक छान कुंद किंवा कुंदाचं झाड आहे. 

 

हे झाड माहित नसेल म्हणून सांगतो. या झाडाला गुच्छ लगडतात  फुलांचे. छान, नाजूक, मंद सुवास असलेली पांढरी फुलं अशी घोसाघोसाने झाडाला ओळखम्बुन असली की बघणाऱ्याची नजर त्यावरून हटत म्हणून नाही.  अशा या आमच्या बागेत आम्ही एक ओटा केला आहे बसण्यासाठी. त्यावरचा हिरवा मार्बल या हिरव्या वातावरणात आणखी हिरवेपणा आणतो. पावसाळ्यातल्या कुंद- धुंद वातावरणात पावसाने संततधार धरलेली असावी आणि गरमागरम वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन इथे बसून स्वर्ग सुख अनुभवावे, ही अगदी परमावधी.

 

पण आता काही हे सुख आम्हाला अनुभवायला  मिळत नाही. अहो नाही, ही तक्रार वगैरे अजिबात नाही. अगदी खूप त्रास द्यायला लागला आहे लब्बाड, यातला भाव लक्षात ठेवून माझं हे वाक्य वाचायचं.

 

तशी मला निसर्गाची आवड असली तरी ती सुट्टीपुरती मर्यादित. त्यातही पक्षी, प्राणी प्रेम फक्त अभयारण्याच्या सीमेपुरतं म्हणजे तिथून बाहेर  पडलं की संपलं. तसंही इथे या वाहत्या रस्त्याकाठी राहताना सान्निध्यात असणारे पक्षी म्हणजे कावळा आणि कबुतर. दोघांचाही मला अतिशय तिटकारा आहे. आम्हाला सठी सहामाशी दिसणारी चिमणी माझ्या काही आवडीची नव्हे.

 

तर अशात हा लॉक डाऊन  सुरु झाला आणि जरा रस्त्यावरच्या वर्दळीने थोडा अर्धविराम घेतला. तेवढी एक संधी घेऊन आमच्या कडे एक पाहुणा आला. नाही, तो तसा पाहुणा नाही, एक अगदी चिमणीच्या निम्म्या आकाराचा पक्षी एक दिवस दिसला. लांब बाकदार चोच, पोटाकडे  अंग लिंबू रंगाचं आणि मानेकडे चॉकलेटी की कसा तो रंग. इतकासा  तो जीव पण किती नाचरा. एक क्षण शांत बसेल, मला फोटो काढायची संधी देईल तर शपथ. बरं येताना एकटा येईल तर तेही नाही . येत ते जोडीनेच. छान आहेत दोघेही. असे संवाद आमच्यात होऊ लागले. पण एक मात्र यांचा खूप राग येत असे. जास्वंदीच्या झाडावरच्या कळ्या आणि फुलं म्हणजे यांच्या बापाची इस्टेट असं समजून त्याचा फराळ करत. ती कुरतडलेली फुलं बघताना यांचा राग राग मनात दाटून  येई. एकदा तर संपूर्ण फुल खाऊन त्याचा देठ फक्त  उरला होता. आमच्या देवांनी तरीही ही "शबरीची बोरं" समजून घेतली.

 

या दोघांचा एक आवडता उद्योग म्हणजे   येणार आणि कुंदाच्या त्या झाडाच्या प्रकाशाच्या उलट दिशेने, आमच्या घराकडे आलेल्या  लांब लचक फांदीवर बसून मस्त झोके घेणार. हा सगळा वेळ त्यांच्या चुकचुकूटाने भरून गेलेला असे. त्या चोचीने फुलातील मध चोखताना त्यांची होणारी घाई तर प्रेक्षणीयच होती. आता रोजच येत आहेत तर याचं नाव काय ते तरी शोधून काढावं म्हणून बघितलं तर याला सन बर्ड म्हणतात असं समजलं. मराठीत फुलचुख्या . 

 

सकाळी उठल्यावर प्रथम झाडांना पाणी घालणे ही आमची रोजची एक सवय आहे. खरं सांगायचं तर त्याचं कारण म्हणजे रस्त्यावर असलेली दुकानं उघडल्यावर पाणी घातलं तर होणारी आरडा ओरड टाळण्यासाठीची आमची ही लगबग  असते, बाकी काही नाही. पण होतं काय, त्याआधी या गॅलेरीतला कचरा काढणं हे क्रमप्राप्त असतं. तर सकाळची ही पहिली दोन कामं, कचरा काढणे आणि मग झाडांना पाणी घालणे.

 

या पक्ष्यांविषयी पुनः. तर  रोज ते दोघे आमच्याकडे येत होते. येत आणि इतक्या लवकर, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर दिसेनासे होत. त्यांचा एक चाळा म्हणजे कुंदाच्या फांदीवर  छान झोके घेत, चुकचुक करत. त्याची मजा आत बसूनच आम्ही घेत असू.  कारण इतका लाजरा पक्षी हा की जरा चाहूल लागली की गायब! पंधरा एक दिवस झाले असतील. बरं येऊन  सरळ बसतील, झोके घेतील आणि जातील तर ते नाही. आधी वर असलेल्या लोखंडी पाइपवर बसून इकडे तिकडे न्याहाळत चुकचुकाट करायचा आणि कोणी हटकत नाही बघून मग त्यांचं विमान त्या फांदीच्या धावपट्टीवर उतरत असे. क्षणभर झोके घेतले की निघाले. असला उठवळपणा  खूप. 

 

आम्हाला आता त्यांचं येणं, नाचणं, चुकचुक आवाज करणं अगदी सवयीचं झालं होत, इतकं की त्यांचा आवाज ऐकला  नाही तर आले नाही का ग किंवा रे असे प्रश्न असत. एक दिवस मी आमच्या गॅलेरीचा कचरा काढत असताना खूप कचरा दिसला. सकाळी एकदा काढल्यावर इतका केर पुनः होण्याचं काहीच कारण नव्हतं. ना कोणी लहान मूल, ना येणं जाणं. असेल वाऱ्याने आला म्हणून सोडून दिलं तर थोड्या वेळाने पुनः तेच. तेवढ्यात  हिच्या लक्षात आलं.  ते जरा त्या फांदीवर बघा. झोके घेता घेता त्यांनी जागेची रेकी केलेली दिसते आहे. घरट्याची तयारी आहे. आता मात्र त्या दोघांना हाकलून लावलं पाहिजे. ही फांदी फुलं संपली की आपण तोडणार हे नक्की.   दुसरं म्हणजे अंडी घातली, पिल्लं झाली  की   कावळ्यांवर लक्ष ठेवायला जमेल? नंतर त्या गोष्टीचा त्रास नको. बोलून होताच  निर्णय अमलात आणला. त्या इवल्याशा जीवांनी कष्टाने आणलेले गुंतवळ आणि  काय काय सगळं उचकटून फेकून दिलं.

 

 दुसऱ्या दिवशी उठून बघतो तो तर पुनः तेच. हा एवढासा इवाला जीव, इवलुशी त्याची चोच आणि त्यातून तो हे आणण्यासाठी किती खेपा घालत असेल. राहू द्यावं का?  नको,  हा लोभ आपल्याला परवडणारा नाही असं म्हणून लागोपाठ तीन वेळा ते तिथून साफ केलं.

 

आम्हाला वाटलं, झालं, आता काय ते येत नाहीत. दुपारची झोप काढून उठेपर्यंत त्यांनी आपलं काम सुरु ठेवलं होतं. पुनः मूळपदावर. पुनः ते उचकटलं. यावेळी लक्ष ठेवून तिथेच ठाण मांडून बसलो की ते येऊ नयेत. घिरट्या घातल्या पण आले मात्र नाहीत.

 

दुसरा दिवस उजाडला. त्या चुकचुक्यानी जाग आली. कारभार पुनः सुरु झाला होता. ते काही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांनी न थकता तो डोलारा पूर्वपदाला आणला.  त्यांनी आम्हाला गांधीवादी प्रयत्नांनी हरवलं होतं. शेवटी आम्ही हार मान्य केली आणि त्यांचा घरबांधणीचा हक्क मान्य केला.

 

आता आम्हाला त्यांनी पूर्णपणे बदलून टाकलं आहे. सतत त्यांच्या जाण्या येण्याकडे आमचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. कधीही दोघे जोडीने  येतात. एकाच्या चोचीत बांधकाम साहित्य असतं. दुसरा नुसताच दांडीवर बसून इकडे तिकडे मान फिरवत बसतो. चोचीतलं साहित्य योग्य जागी टाकलं की दोघेही उडून जातात पुनः येण्यासाठी. कधी आणि काय खातात देव जाणे. सध्या तरी त्यांचा बांधणीचा व्यवसाय त्यांना इतर काही सुचू देत नाही.

 

 सुरवातीला तो गुंतवळ आणि शेवाळाचा लांबच लांब डोलारा होता.  आम्हाला कळत नव्हतं की यात अंडी कशी घालू शकतील? शिवाय आणखी एक बाब होती . इतक्या खाली असलेल्या त्याच्यावर झडप घालणे मांजरीला सहज शक्य होते. पण लवकरच   त्याने किंवा तिने तो  खाली लोंबणारा  सगळा  भाग व्यवस्थित  शिवून घट्ट केला आहे . आता त्याला वरती एक टोपी आहे. त्याखाली एक व्यवस्थित बसता येईल असा खोलगट खोपा आहे. हॅट घातलेला माणूस कसा दिसेल तसा त्याचा आकार आहे शेंड्याकडे. त्याखाली तो खोपा आणि मग लांब लचक दाढी असावी तसे ते गुंतवळ. आम्ही ते फक्त आमच्या डोळ्यांनी पाहतो. कॅमेऱ्यात पकडण्याचे आमचे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत.

 

 आता बहुधा आत अंडी घातलेली असावीत. हा आपला अंदाज. कारण आता तो चुकचुकाट बंद झालेला आहे. अंडी आत आहेत का हे बघण्याचा आमचा प्रयत्न असफल झाला कारण ती अतिशय छोटी असतात असं समजतं,  त्यामुळे ती दिसणं कठीण आहे हे एक आणि तो खूप व्यवस्थित खोल आहे हे दुसरं.

 

ती मात्र  सुरवातीचे दिवस सतत आत बसून होती.

 

आता आमची दिनचर्या पूर्णपणे बदललेली आहे. झाडांना पाणी घालणे हे तिच्या तिथे असण्या नसण्यावर अवलंबून आहे. झाडावर फुलं असली तरी ती दुपारी बाराच्या सुमारास तोडायची. तिला खायची असतील तर खाऊ दे बिचारीला असा सूर असतो.  आमच्या पलीकडच्या डबल जास्वंदीला सध्या इतका आनंद झालेला आहे की विचारू नका. पण आम्हाला तिथे जाणे निषिद्ध   .. कारण ते झाड कुंदाच्या पलीकडे आहे. आणि या आमच्या बाईचा संताप इतका की जरा कोणी जवळ येत आहे म्हटलं की ती तरातरा उठून निघूनच जाते.  तिचं परत येणं  खूप मोहक!  येते, जरा शेजारच्या जास्वंदीच्या  झाडावर विसावते, म्हणण्यापेक्षा विसावल्यासारखं करते आणि एका क्षणात झपकन आत शिरते. ती इतक्या छोट्याशा जागेत वळून आत बसते कशी हे कोडं आम्हाला अजून उलगडायचं आहे. ती आत गेली की आम्हाला दिसते ती  तिची बाकदार चोच. बाहेर   गॅलेरीत  जायचं किंवा नाही हे त्या चोचीच्या दिसण्यावर आता अवलंबून असतं. आता पुढल्या दारातून असणारी आमची वाहतूक आम्ही  मागील दरवाजाकडे वळवली आहे.

 

काल बोलता बोलता ही म्हणाली की अहो अजिबात नाही, इथे नकोच  इथून सुरवात करून आपण आता हे व्यवस्थित बाळंतपण करण्यापर्यंतचा प्रवास करून आलो आहोत. घरची लेक बाळंतपणाला यावी आणि तिला नकळतसुद्धा त्रास   होणार नाही अशा तऱ्हेने आपलं हे वागणं आहे.

 

हो. हा सृजनोत्सव आहे.  त्याचं स्वागत तसंच होणं आवश्यक आहे. आम्ही आता सानुल्या बाळांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत.

आता आमच्या गॅलरीत रोज कचरा पडतो. पडेल तितक्या वेळा आम्ही तो न कटकट करता काढतो. बांधकामाच्या वेळी इतका त्रास होणारच. इथे तर सृजनाची चाहूल घेऊन हे आपल्याकडे आले आहेत. त्यांना मदत करता नाही आली तरी दुरून शुभेच्छा तरी देऊ . येणाऱ्या त्या सनबर्डच्या पिल्लाची आम्ही आता वाट पाहत आहोत. 

 

                                    (अपूर्ण. पुढील आठवड्यात पुन्हा भेटू. )