Friday 18 September 2020

घरटं (THE NEST)

 

घरटं


आमच्या घराची एक गंमत आहे. या आमच्या दोन खोल्या आहेत ना  त्या  दोन्ही खोल्यांना   स्वतंत्र अस्तित्व आहे. म्हणजे दोन्ही खोल्यांतून  बाहेर जायला दरवाजे आहेत. अर्थातच ते दरवाजे गॅलरीत उघडतात . नाही, बाल्कनी नाही,  हो, मलाही फरक कळतो दोन्हीमधला. ही आमची आहे ती गॅलेरीच. आमच्या मजल्यावरच्या बिऱ्हाडांना जोडणारी,  कॉमन गॅलरी. तर  आमचं घर शेवटून दुसरं. म्हणजे आमच्या पलीकडे एक बिऱ्हाड आहे. त्यांचं पार्टीशन आमच्या घराला काटकोनात येतं. त्यामुळे सगळ्यांना वाटतं आमचंच घर कोपऱ्यातील. पण तसं ते नाही. त्यात पुनः होतं काय या कोपऱ्यातल्या  घरातली माणसं या पुढल्या दरवाजाचा वापर अभावानेच करतात. त्यांचं आपलं जाणं येणं मागल्या दारानेच असतं.

 

आमचं हे घर आहे अगदी मुंबईच्या राजमार्गावर. हा रस्ता आपला चोवीस तास  बारा महिने    वाहत असतो. उसंत म्हणून कधी घेत नाही. पण त्याने जरी घेतली नाही तरी आम्ही त्यातली उसंत शोधून काढली आहे.  आमच्या या गॅलरीत आमचा एक छानसा बगीचा आहे. लहानसा नाही, मी छानसा म्हटलं. त्यात तीन चार जास्वंदी, तुळस, गुलाब, रातराणी अशा झाडांबरोबरच एक छान कुंद किंवा कुंदाचं झाड आहे. 

 

हे झाड माहित नसेल म्हणून सांगतो. या झाडाला गुच्छ लगडतात  फुलांचे. छान, नाजूक, मंद सुवास असलेली पांढरी फुलं अशी घोसाघोसाने झाडाला ओळखम्बुन असली की बघणाऱ्याची नजर त्यावरून हटत म्हणून नाही.  अशा या आमच्या बागेत आम्ही एक ओटा केला आहे बसण्यासाठी. त्यावरचा हिरवा मार्बल या हिरव्या वातावरणात आणखी हिरवेपणा आणतो. पावसाळ्यातल्या कुंद- धुंद वातावरणात पावसाने संततधार धरलेली असावी आणि गरमागरम वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन इथे बसून स्वर्ग सुख अनुभवावे, ही अगदी परमावधी.

 

पण आता काही हे सुख आम्हाला अनुभवायला  मिळत नाही. अहो नाही, ही तक्रार वगैरे अजिबात नाही. अगदी खूप त्रास द्यायला लागला आहे लब्बाड, यातला भाव लक्षात ठेवून माझं हे वाक्य वाचायचं.

 

तशी मला निसर्गाची आवड असली तरी ती सुट्टीपुरती मर्यादित. त्यातही पक्षी, प्राणी प्रेम फक्त अभयारण्याच्या सीमेपुरतं म्हणजे तिथून बाहेर  पडलं की संपलं. तसंही इथे या वाहत्या रस्त्याकाठी राहताना सान्निध्यात असणारे पक्षी म्हणजे कावळा आणि कबुतर. दोघांचाही मला अतिशय तिटकारा आहे. आम्हाला सठी सहामाशी दिसणारी चिमणी माझ्या काही आवडीची नव्हे.

 

तर अशात हा लॉक डाऊन  सुरु झाला आणि जरा रस्त्यावरच्या वर्दळीने थोडा अर्धविराम घेतला. तेवढी एक संधी घेऊन आमच्या कडे एक पाहुणा आला. नाही, तो तसा पाहुणा नाही, एक अगदी चिमणीच्या निम्म्या आकाराचा पक्षी एक दिवस दिसला. लांब बाकदार चोच, पोटाकडे  अंग लिंबू रंगाचं आणि मानेकडे चॉकलेटी की कसा तो रंग. इतकासा  तो जीव पण किती नाचरा. एक क्षण शांत बसेल, मला फोटो काढायची संधी देईल तर शपथ. बरं येताना एकटा येईल तर तेही नाही . येत ते जोडीनेच. छान आहेत दोघेही. असे संवाद आमच्यात होऊ लागले. पण एक मात्र यांचा खूप राग येत असे. जास्वंदीच्या झाडावरच्या कळ्या आणि फुलं म्हणजे यांच्या बापाची इस्टेट असं समजून त्याचा फराळ करत. ती कुरतडलेली फुलं बघताना यांचा राग राग मनात दाटून  येई. एकदा तर संपूर्ण फुल खाऊन त्याचा देठ फक्त  उरला होता. आमच्या देवांनी तरीही ही "शबरीची बोरं" समजून घेतली.

 

या दोघांचा एक आवडता उद्योग म्हणजे   येणार आणि कुंदाच्या त्या झाडाच्या प्रकाशाच्या उलट दिशेने, आमच्या घराकडे आलेल्या  लांब लचक फांदीवर बसून मस्त झोके घेणार. हा सगळा वेळ त्यांच्या चुकचुकूटाने भरून गेलेला असे. त्या चोचीने फुलातील मध चोखताना त्यांची होणारी घाई तर प्रेक्षणीयच होती. आता रोजच येत आहेत तर याचं नाव काय ते तरी शोधून काढावं म्हणून बघितलं तर याला सन बर्ड म्हणतात असं समजलं. मराठीत फुलचुख्या . 

 

सकाळी उठल्यावर प्रथम झाडांना पाणी घालणे ही आमची रोजची एक सवय आहे. खरं सांगायचं तर त्याचं कारण म्हणजे रस्त्यावर असलेली दुकानं उघडल्यावर पाणी घातलं तर होणारी आरडा ओरड टाळण्यासाठीची आमची ही लगबग  असते, बाकी काही नाही. पण होतं काय, त्याआधी या गॅलेरीतला कचरा काढणं हे क्रमप्राप्त असतं. तर सकाळची ही पहिली दोन कामं, कचरा काढणे आणि मग झाडांना पाणी घालणे.

 

या पक्ष्यांविषयी पुनः. तर  रोज ते दोघे आमच्याकडे येत होते. येत आणि इतक्या लवकर, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते तोवर दिसेनासे होत. त्यांचा एक चाळा म्हणजे कुंदाच्या फांदीवर  छान झोके घेत, चुकचुक करत. त्याची मजा आत बसूनच आम्ही घेत असू.  कारण इतका लाजरा पक्षी हा की जरा चाहूल लागली की गायब! पंधरा एक दिवस झाले असतील. बरं येऊन  सरळ बसतील, झोके घेतील आणि जातील तर ते नाही. आधी वर असलेल्या लोखंडी पाइपवर बसून इकडे तिकडे न्याहाळत चुकचुकाट करायचा आणि कोणी हटकत नाही बघून मग त्यांचं विमान त्या फांदीच्या धावपट्टीवर उतरत असे. क्षणभर झोके घेतले की निघाले. असला उठवळपणा  खूप. 

 

आम्हाला आता त्यांचं येणं, नाचणं, चुकचुक आवाज करणं अगदी सवयीचं झालं होत, इतकं की त्यांचा आवाज ऐकला  नाही तर आले नाही का ग किंवा रे असे प्रश्न असत. एक दिवस मी आमच्या गॅलेरीचा कचरा काढत असताना खूप कचरा दिसला. सकाळी एकदा काढल्यावर इतका केर पुनः होण्याचं काहीच कारण नव्हतं. ना कोणी लहान मूल, ना येणं जाणं. असेल वाऱ्याने आला म्हणून सोडून दिलं तर थोड्या वेळाने पुनः तेच. तेवढ्यात  हिच्या लक्षात आलं.  ते जरा त्या फांदीवर बघा. झोके घेता घेता त्यांनी जागेची रेकी केलेली दिसते आहे. घरट्याची तयारी आहे. आता मात्र त्या दोघांना हाकलून लावलं पाहिजे. ही फांदी फुलं संपली की आपण तोडणार हे नक्की.   दुसरं म्हणजे अंडी घातली, पिल्लं झाली  की   कावळ्यांवर लक्ष ठेवायला जमेल? नंतर त्या गोष्टीचा त्रास नको. बोलून होताच  निर्णय अमलात आणला. त्या इवल्याशा जीवांनी कष्टाने आणलेले गुंतवळ आणि  काय काय सगळं उचकटून फेकून दिलं.

 

 दुसऱ्या दिवशी उठून बघतो तो तर पुनः तेच. हा एवढासा इवाला जीव, इवलुशी त्याची चोच आणि त्यातून तो हे आणण्यासाठी किती खेपा घालत असेल. राहू द्यावं का?  नको,  हा लोभ आपल्याला परवडणारा नाही असं म्हणून लागोपाठ तीन वेळा ते तिथून साफ केलं.

 

आम्हाला वाटलं, झालं, आता काय ते येत नाहीत. दुपारची झोप काढून उठेपर्यंत त्यांनी आपलं काम सुरु ठेवलं होतं. पुनः मूळपदावर. पुनः ते उचकटलं. यावेळी लक्ष ठेवून तिथेच ठाण मांडून बसलो की ते येऊ नयेत. घिरट्या घातल्या पण आले मात्र नाहीत.

 

दुसरा दिवस उजाडला. त्या चुकचुक्यानी जाग आली. कारभार पुनः सुरु झाला होता. ते काही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांनी न थकता तो डोलारा पूर्वपदाला आणला.  त्यांनी आम्हाला गांधीवादी प्रयत्नांनी हरवलं होतं. शेवटी आम्ही हार मान्य केली आणि त्यांचा घरबांधणीचा हक्क मान्य केला.

 

आता आम्हाला त्यांनी पूर्णपणे बदलून टाकलं आहे. सतत त्यांच्या जाण्या येण्याकडे आमचं लक्ष केंद्रित झालेलं असतं. कधीही दोघे जोडीने  येतात. एकाच्या चोचीत बांधकाम साहित्य असतं. दुसरा नुसताच दांडीवर बसून इकडे तिकडे मान फिरवत बसतो. चोचीतलं साहित्य योग्य जागी टाकलं की दोघेही उडून जातात पुनः येण्यासाठी. कधी आणि काय खातात देव जाणे. सध्या तरी त्यांचा बांधणीचा व्यवसाय त्यांना इतर काही सुचू देत नाही.

 

 सुरवातीला तो गुंतवळ आणि शेवाळाचा लांबच लांब डोलारा होता.  आम्हाला कळत नव्हतं की यात अंडी कशी घालू शकतील? शिवाय आणखी एक बाब होती . इतक्या खाली असलेल्या त्याच्यावर झडप घालणे मांजरीला सहज शक्य होते. पण लवकरच   त्याने किंवा तिने तो  खाली लोंबणारा  सगळा  भाग व्यवस्थित  शिवून घट्ट केला आहे . आता त्याला वरती एक टोपी आहे. त्याखाली एक व्यवस्थित बसता येईल असा खोलगट खोपा आहे. हॅट घातलेला माणूस कसा दिसेल तसा त्याचा आकार आहे शेंड्याकडे. त्याखाली तो खोपा आणि मग लांब लचक दाढी असावी तसे ते गुंतवळ. आम्ही ते फक्त आमच्या डोळ्यांनी पाहतो. कॅमेऱ्यात पकडण्याचे आमचे प्रयत्न व्यर्थ गेले आहेत.

 

 आता बहुधा आत अंडी घातलेली असावीत. हा आपला अंदाज. कारण आता तो चुकचुकाट बंद झालेला आहे. अंडी आत आहेत का हे बघण्याचा आमचा प्रयत्न असफल झाला कारण ती अतिशय छोटी असतात असं समजतं,  त्यामुळे ती दिसणं कठीण आहे हे एक आणि तो खूप व्यवस्थित खोल आहे हे दुसरं.

 

ती मात्र  सुरवातीचे दिवस सतत आत बसून होती.

 

आता आमची दिनचर्या पूर्णपणे बदललेली आहे. झाडांना पाणी घालणे हे तिच्या तिथे असण्या नसण्यावर अवलंबून आहे. झाडावर फुलं असली तरी ती दुपारी बाराच्या सुमारास तोडायची. तिला खायची असतील तर खाऊ दे बिचारीला असा सूर असतो.  आमच्या पलीकडच्या डबल जास्वंदीला सध्या इतका आनंद झालेला आहे की विचारू नका. पण आम्हाला तिथे जाणे निषिद्ध   .. कारण ते झाड कुंदाच्या पलीकडे आहे. आणि या आमच्या बाईचा संताप इतका की जरा कोणी जवळ येत आहे म्हटलं की ती तरातरा उठून निघूनच जाते.  तिचं परत येणं  खूप मोहक!  येते, जरा शेजारच्या जास्वंदीच्या  झाडावर विसावते, म्हणण्यापेक्षा विसावल्यासारखं करते आणि एका क्षणात झपकन आत शिरते. ती इतक्या छोट्याशा जागेत वळून आत बसते कशी हे कोडं आम्हाला अजून उलगडायचं आहे. ती आत गेली की आम्हाला दिसते ती  तिची बाकदार चोच. बाहेर   गॅलेरीत  जायचं किंवा नाही हे त्या चोचीच्या दिसण्यावर आता अवलंबून असतं. आता पुढल्या दारातून असणारी आमची वाहतूक आम्ही  मागील दरवाजाकडे वळवली आहे.

 

काल बोलता बोलता ही म्हणाली की अहो अजिबात नाही, इथे नकोच  इथून सुरवात करून आपण आता हे व्यवस्थित बाळंतपण करण्यापर्यंतचा प्रवास करून आलो आहोत. घरची लेक बाळंतपणाला यावी आणि तिला नकळतसुद्धा त्रास   होणार नाही अशा तऱ्हेने आपलं हे वागणं आहे.

 

हो. हा सृजनोत्सव आहे.  त्याचं स्वागत तसंच होणं आवश्यक आहे. आम्ही आता सानुल्या बाळांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत.

आता आमच्या गॅलरीत रोज कचरा पडतो. पडेल तितक्या वेळा आम्ही तो न कटकट करता काढतो. बांधकामाच्या वेळी इतका त्रास होणारच. इथे तर सृजनाची चाहूल घेऊन हे आपल्याकडे आले आहेत. त्यांना मदत करता नाही आली तरी दुरून शुभेच्छा तरी देऊ . येणाऱ्या त्या सनबर्डच्या पिल्लाची आम्ही आता वाट पाहत आहोत. 

 

                                    (अपूर्ण. पुढील आठवड्यात पुन्हा भेटू. )






8 comments:

  1. अगदी साध्या गोष्टीतही काही अर्थपूर्ण शोधण्याची तुझी हातोटी जबरदस्त आहे.बारीक-सारीक तपशीलासहित आत्मीयतेने लिहिलं आहेस.त्यामुळे डोळ्यासमोर चित्र उभे राहिले. प्रत्येक पॅरेग्राफ वाचताना पुढे काय लिहिलं असेल अशी उत्सुकता राहते.
    ... आता सृजन सोहळ्याच्या प्रतीक्षेत.(छायाचित्रासहित)

    ReplyDelete
    Replies
    1. छायाचित्र पुढल्या भागात अवश्य

      Delete
  2. दीपक, पूर्णपणे सहमत.
    संवयीने एक चूक काढतो. शीर्षकात H दोनदा आला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आणि सवयीप्रमाणे मी त्या दुरूस्त करतो.

      Delete
  3. Probably it may be for iHakurdesai😝

    ReplyDelete
  4. वाह !! सगळं चित्र अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं .
    आता पुढच्या लेखाची प्रतीक्षा आहे .

    ReplyDelete
  5. मला आवडलं.
    तुझ्या लेखन सवयीला अनुसरुन वाचकांना तु जिथे घेऊन चालला आहेस त्या तुझ्या घराची इत्यंभुत माहिती दिली आहेस.नेपथ्य समजावुन दिल्यावर रंगमंचावर वावरणार्‍या पात्रांची ओळख चित्रदर्शी पध्दतीने करुन दिली आहेस. या सनबर्डस् चं रंगमंचावरचं नाट्य आपुलकीच्या भाषेत रंगवलं आहेस ,तुम्हां उभयतांचा विंगेतला वावर पण वाचकाला कौतुकास्पद वाटतो आहे.पहिला अंक छान रंगला आहे .दुसर्‍या अंकाची आतुरतेने वाट पाहतोय एक वाचक,हेमंत.

    ReplyDelete
  6. माहेरवाशिणीचं किती कौतुकाने करताय सगळं ?

    ReplyDelete