Monday, 29 October 2018

SLOVENIA : ROBANOV KOT (LOGAR VALLEY)


रोबानोव कोटचं हे हॉटेल सुंदर होतं. खोलीला दोन बाजूला टेरेस होती त्यामुळे आत्ता जरी काही दिसत नसलं तरी उद्या छान व्हयू मिळण्याची शक्यता होती. आत्ता खाली दूरवरून कानावर येणारी पाण्याची झुळझुळ मात्र कानाला सुखवत होती. दिवसभराच्या थकव्यानंतर आता काहीतरी पोटपूजा व्हावी इतकी माफक अपेक्षा होती. इथे निरामिष जेवण काय असणार? मिळेल ते पूर्णब्रह्म म्हणायचं !

सकाळ उगवली पण इथे आमच्या राशीला ढगाळ हवामान आणि पाऊस असणार होता. दुर्दैव! आणखी काय? एरवी हा समोर दिसणारा डोंगरांच्या रांगेचा नजारा लखलखत्या सूर्यप्रकाशात बघायला किती मजा आली असती. समोरच्या बाजूला उताराची जमीन होती. सर्वत्र हिरवंगार गवत. आमच्या समोरच नदीच्या प्रवाहाचं अस्तित्व आवाजावरून जाणवत होतं. समोरच्या डोंगरापर्यंतच्या कुरणावर असंख्य गुरं वासरं चरत होती. ते गोधन नेत्रसुखद होतं. समोरच प्रवाहावर फिरणारी पाणचक्की दिसत होती. वातावरणातला शिरशिरी आणणारा गारवा, समोरचे ते अर्ध्या डोंगरावर तरंगणारे ढग आणि त्यापलीकडे दिसणारी बर्फाची शिखरं! वर्णनातीत हा एकच शब्द. कॅमेरा, शब्द सारेच अपुरे. कॅमेरा झाला तरी तो फोटो काढणार, त्याला वातावरणाची जोड कशी देता येईल? आपण आपलं डोळ्यांच्या माध्यमातून त्याला आपल्या आत खोलवर ओढून घ्यायचं.
हा भाग आता नो डेव्हलपमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. इथे खूप कमी पर्यटक येतात, याचं एक कारण तसा हा भाग अडचणींचा. त्यातून नवीन बांधकामांवर बंदी असल्याने नवीन हॉटेल्स नाहीत. म्हणजे सुखसुविधांवर मर्यादा येते. तरीही इथे येणारे ऍडव्हेंचर प्रिय लोक चालण्यासाठी, हाइकसाठी पोहोचतातच. हाईक करता आम्हाला तेवढा वेळ नव्हता पण मनसोक्त भटकंती करायची हे मात्र ठरवलेलं होत.

ब्रेकफास्ट करून निघालो. माहितीपत्रकात सांगितल्याप्रमाणे सोलकावा गावात गेलो. अगदीच जवळ हे गाव. नदीचं नाव साविन्या! नाव पण किती आपल्याला आपलं वाटावं असं! तिच्या काठचं हे सोलकावा. तिथल्या माहिती केंद्रात जाऊन माहिती घ्यायची होती. खूप चित्रं  आणि पक्षी, प्राणी वगैरेची माहिती होती पण त्यात आम्हाला गम्य नव्हतं. तिथून पुढे गेल्यावर एका ठिकाणी गाडी पार्क करून साडेसात मैलावर (की कि.मी.?) एक रिंका धबधबा होता. तो नेचर ट्रेल करायचं आम्ही ठरवलं. जाऊन येऊन पंधरा कि.मी. म्हणजे काही फार नाही असं आम्ही दोघांनी म्हटल्यावर मग प्रश्नच उरला नाही.


     ( धुकं धुकं आणि फक्त धुक्याकडे घेऊन जाणारी ही झोकदार वाट!)

सुरवातीचा डांबरी रस्ता ओलांडून आत झाडीत शिरताना ओलांडलेला साकव (हो, पुलाप्रमाणे उपयोगात येणारा झाडाचा ओंडका म्हणजे साकव नाहीतर काय म्हणणार?) पुनः कोकण, गोव्याची आठवण करून देत होता. आता हा हिवाळ्याचा, पानगळीचा मोसम. पर्णसंभार उतरवायची घाई झालेल्या वृक्षांच्या बरोबरीने हिरवेगार वृक्ष होते. काहींना पानगळीची चाहूल लागून कासाविशी येऊन पिवळे पडलेले तर काही त्या कल्पनेने मोहरून गुलाबी लालसर झालेले.एकाच ठिकाणी असणारे सहयोगी आणि त्यांच्यात इतका फरक असावा? निसर्गाची कमाल वाटत होती. चालताना काही ठिकाणी झाडांचे ओंडके कापून पायऱ्या केल्या होत्या. झाडांच्या छायेतून जाताना वातावरणातला ढगाळपणा मग तितका जाणवत नव्हता. पण तरीही अधून मधून का होईना दिसणारा क्षीण सूर्य हवाहवासा होता.


पुढे जात असता किलबिलाट ऐकू आला. शाळेची ट्रिप आली होती. एका ठिकाणी मुलं, मुली उभ्या होत्या त्यांच्या हातात कागद, पेन आणि त्यांच्या बरोबरच्या शिक्षक, शिक्षिका माहिती सांगत होत्या ती ऐकून नोटिंग घेणं सुरु होतं. आम्ही त्यांनी अडवलेल्या वाटेवर मागे शांतपणे त्यांना डिस्टर्ब् होऊ नये या बेताने उभे होतो. काही क्षणानंतर त्यांच्या शिक्षकांचं आमच्याकडे लक्ष गेलं. मुलांना सूचना दिल्या गेल्या आणि रस्ता मोकळा केला गेला. पुढे जाताना त्या मुली आम्हाला चक्क नमस्ते नमस्ते म्हणाल्या ते ऐकून आम्ही थंडगार

या देशाविषयी आपल्या देशात किती लोकांना माहिती असेल? आम्ही इकडे येण्यापूर्वी माहिती करून घेतली होती. पण आम्हाला प्रत्येकजण हो माहित आहे पूर्वीचा झेकोस्लोव्हाकिया ना असच विचारत होता. रं त्याचं नकाशातील स्थान सांगावं तर माहितीचं नाव ऑस्ट्रियाच्या दक्षिणेला इतकच ! इथे ही शाळेतली जेमतेम सहावी सातवीतली मुलं आम्हाला आमच्या दिसण्यावरून की उत्तराच्या कुंकवावरून नमस्ते करत होती ! एकाच वेळी आश्चर्य आणि कौतुक वाटलं.


त्यांना मागे टाकून पुढे गेलो आणि मग चढाचा भाग लागला. आतापर्यंत चालणं खूप झालं होतं. आता चढाचा भाग, पण पायवाट पुसट झाल्यासारखी वाटली. इतक्यात झाडात काहीतरी खसफसलं! दूर वर एक प्राणी होता का? नीट काही कळलं नाही. आम्ही थोडे मागे आलो. नदीचं कोरड पात्र आणि पलीकडून लांबून जाणारा रस्ता दिसत होता. पात्रातून पुढे गेलो तर तो रस्ता पुनः आमच्या वाटेत आला. तिथे एक जर्मन कि स्पॅनिश जोडपं, सायकलवरून आलेलं, दम खात उभं होतं. त्यांना म्हटलं अजून किती लांब? तर म्हणाले, नाही आता पोहोचलातच तुम्ही जवळ जवळ. हा शब्द खूप छान आहे. यातून काहीच स्पष्ट होत नाही आणि सगळं सांगितलं जातं. (ह्ये काय आलं की, असं आपल्याकडे गावातली माणसं म्हणतात त्याची प्रकर्षाने आठवण झाली) रस्ता ओलांडला आणि पायवाटेने पुनः निघालो पुढे. खाली नदीचा प्रवाह, जाणारी पायवाट आणि उजव्या बाजूला चढाचा भाग. त्यावरच्या झाडीतून जाताना एका ठिकाणी एक हिरवं जोडपं बसलेलं दिसलं. छान लाल भडक रंगाचा टी शर्ट त्या आजोबांनी घातला होता. खाली खोलवर दिसणाऱ्या दरीकडे बघत निवांत बसले होते ते दोघे जण. उत्तराला बोलायची लहर आली आणि तिने पुनः त्यांना विचारलं, रीन्का स्लाप किती दूर आहे? त्यावर ते आजोबा उत्तरले, कदाचित जवळ, कदाचित लांब आहे, पोहोचाल किंवा नाहीसुद्धा. आणि मग डोळा बारीक करून गंमत केल्यासारखा खोडकर चेहेरा केला. आजींनी मग हसून निरोप दिला. त्यांना नवऱ्याच्या या स्वभावाची सवय असणार

आता मात्र पाण्याचा आवाज येऊ लागला. धबधबा दिसत नसला तरी तो जवळ आल्याचं आम्हाला सांगत होता. तिथे एक छान टपरी होती. आत्ता बंद होती.


                     (याहून सुंदर काय असणार?)

जरा वेळ थांबू या म्हणून आम्ही बसलो तर दोघेजण, "तरुणम्हातारे" सायकल दामटवत आले. दमलेले दिसत होते. तेही थांबले आणि त्या बाईने हॅलो केलं. बहुधा बायकांना बोलायला आवडत असतं. हीसुद्धा अपवाद नव्हती. "गेल्या वेळी आम्ही तीन महिने रजा काढून फिरलो होतो. क्रोएशिया, इटली असं फिरलो. दरवेळी एवढी रजा कशी मिळणार? माझा मुलगा इंजिनिअरिंग करतो. मुलगी जॉब करते" वगैरे. आतापर्यंत अॅक्सेंट वरून अमेरिकेची आहेत दोघे असा अंदाज श्रीशैलने मला सांगितला होता. तेवढ्यात त्या बाईने श्रीशैलकडे तिचा मोर्चा वळवला. कुठून आलास म्हटल्यावर नेदरलँडस सांगितल्यावर त्या देशाविषयी बोलून झालं. इतकं होईपर्यंत तो बावा धड हसू नाही असा स्थितप्रज्ञ होऊन बसला होता त्याने एकदम विचारलं तुझं प्रोफेशन आणि शिक्षण काय म्हणून. त्यात श्रीशैलच्या अमेरिकेतल्या शिक्षणाचा उल्लेख होताच त्याला माहेरचं कुत्रं भेटल्यागत कंठ फुटला. अमेरिकेच्या लोकांना त्या देशापलीकडे काही असतं याची बहुधा जाणीवच नसावी असं वाटायला लागतं हे अशा प्रकारचं वागणं बघून!

आतापावेतो पुरेपूर छळून आमची परीक्षा घेतली आहे आणि त्यात आम्ही चांगल्या मार्काने पासही झालो आहोत याची खात्री करून घेतल्यावर "मग त्याने" आम्हाला दर्शन दिलं. स्लोवेनियन भाषेत धबधबा याला शब्द आहे स्लाप (slap ) आमच्या दृष्टीने त्याचं इंग्रजीकरणच योग्य होत.

इथे त्यांनी वेगवेगळ्या लाकडी मनोऱ्यातून धबधबा बघण्याची व्यवस्था केलेली आहे. हा काही मोठा किंवा प्रचंड धबधबा नव्हे पण तरीही या ट्रेलचा तो अंतिम क्षण आहे. इथे आल्यानंतर त्याचं दर्शन सुखावणारं वाटतं आणि त्याचबरोबरीने येताना होणारं निसर्गवाचन लुभावणारं ठरतं .
परत येताना कळलं की आपण जे आडबाजूने आलो ते सरळ रस्त्यानेही येता येतं. फरक इतकाच की सरळ गाडी घेऊन आलो असतो तर त्याचे ७ युरो द्यावे लागले असते. त्या पेक्षाही आमचं निसर्गवाचन अपूर्ण राहीलं असतं आणि वाटेत ती शाळेतली नमस्ते करणारी ती मुलं ? फायदा तोट्याची गणितं अशी गणिती पद्धतीने थोडीच सोडवायची असतात?


आता परतीच्या वाटेवर मग आम्ही उगीच आडमार्गाने न येता सरळ रस्त्याने निघालो. या रस्त्याचा फायदा म्हणजे इथली वाटेतली घरं, त्यांचे घोडे असलेले स्टड फार्म्स बघता आले. गवताची साठवण करण्याची त्यांची वेगळी पद्धत कळली. आणि मुख्य म्हणजे या आमच्या परतीच्या प्रवासात आम्हाला पाऊस भेटला नाही.

लोगरस्का डोलीना आल्यावर आता बाकी काही शक्य नव्हतं. आता उद्या आपण पॅनोरामिक रूट आहे तो बघू हे ठरवून माघारी फिरलो. दमणूक झाली होती हे एक आणि आपल्या हिमालयाप्रमाणे इथेही दुपारी दोन नंतर हमखास हवा बदलते. त्यात आम्ही आलो तेच धुके आणि पाऊस दोघांना घेऊन त्यामुळे अशा ठिकाणी जाण्यात अर्थ नव्हता

दुस-या दिवशी निघालो खरे पण निसर्गाची साथ नसेल तर तो रूट कितीही पॅनोरामिक असो तुमच्या दृष्टीस येत नाही. आमचं नशीब की अधून मधून तरी निसर्गाला आमची दया येऊन तो सूर्याला थोडक्या वेळासाठी मोकळं सोडत होता. आम्ही तेव्हढ्यात जे आणि जितकं मिळेल ते डोळ्यात साठवत होतो. पण यातली खरी मजा आहे ती इथून या घाटातून दिसणारं खोरं आणि डोंगर माथे ते मात्र आम्हाला दिसू शकले नाहीत. या अशा हवामानाचा आणखी एक मोठा दोष म्हणजे फोटोची शक्यता कमी होते. तरीही आम्ही जी कुरणं बघितली, गाई चरताना बघितल्या आणि वाटेतली टुमदार गावं बघितली ती नेत्रसुखद होती. हा भाग उन्हाळ्यात ट्रेकिंगला निश्चित चांगला आहे.
पाऊस आणि धुकं या वातावरणात किती पुढे जायचं हे शेवटी ठरवायला लागतं. रस्त्यांवरच्या खुणा अपुऱ्या होत्या आणि कोणाला विचारावं तर तशी वस्ती दिसत नव्हती. त्यामुळे मग आम्ही पुढच्या (?) वेळी नक्की असं म्हणत सोलकावाच्या दिशेने परत फिरलो.

                ( प्रत्येक मंगळवारी पुढील भाग अपलोड होईल)  
Monday, 22 October 2018

SLOVENIA CERKNICA-NATURAL BRIDGE TO LOGAR VALLEY

दाटून, अंधारून आलं, पाऊस भुरभुरतो आहे असं जरी असलं तरी सुरवातीला आम्ही खरोखरच मजेत होतो. आत्तापर्यंत तरी रस्ता तसा हमरस्ता म्हणावा असा होता. मेस्कारमधून बाहेर पडल्यावर तर एका गावाचा पॅनोरामा इतका सुंदर समोर आला की साऱ्या चिंता काळज्या विसराव्या आणि बघत बसावं. पण हा रस्त्याचा घोळ लक्षात आल्यावर मात्र जराशी चलबिचल झाली. या वेळे पर्यंत आम्ही सरकनिका गावापर्यंत आलो होतो.  आता तरी सरळ जाऊ रे, असं मी श्रीशैलला सांगत होतो तर इथला नॅचरल ब्रिज सुंदर आहे . जवळच असावा आणि जीपीएस वर दिसतो आहे तर जाऊ या, या म्हणण्यापुढे आम्ही मान डोलावली खरी पण एव्हाना धो धो कोसळणारा पाऊस परीक्षा बघणारा झाला होता. दाट धुकं त्यातून वाट काढत पुढे जाणारे आम्ही. सं काळजीचं वातावरण होतं. आता हमरस्ता सोडल्यानंतर आत वळल्यावर रस्ता कच्चा असला तरी पण ठीक होता. निदान दीड गाडी जाऊ शकेल असा रुंद होता.


पुढे गेल्यावर मात्र काहीशा चढानंतर उजव्या बाजूला डोंगराची भिंत आणि डावीकडे सरळ खोल दरी. धो धो पाऊस पडत आहे. सगळ्या रस्त्यावर फक्त आम्ही. खाली खोलवर अंधुक दिसणारा सरकनिका तलाव. वातावरण धूसर आणि म्हणून तणावपूर्ण, ते सोडता (म्हणजे काय?) प्रवास खूप छान सुरु होता. नॅचरल ब्रिज .५ असं पुढे दाखवणारं जीपीएस एकदम रूट कॅलक्युलेट करू लागलं. तरी आमच्या डोक्यात, ठीक आहे, पुढून वळून येता येईल असं होतं. सरळ पुढे जाताना आता मात्र भीती वाटण्याची अवस्था आली कारण चिटपाखरू नाही, वाहतूक काही नाही. गाडी वळवण्याची सोय नाही आणि पुढे कुठे जात आहोत ते कळत नाही अशा अवस्थेत समोरून गाडीचे दिवे दिसले. श्रीशैलने गाडी बाजूला घेतली की समोरची गाडी जाऊ शकेल. त्याने हात केला, तो माणूस थांबला. त्याला विचारलं तर म्हणाला तुम्ही खूप पुढे आला आहेत. Retour ( म्हणजे परत फिरा) . आता आली का पंचाईत. श्रीशैलने ठीक म्हटले. तो माणूस त्याच्या गाडीच्या दिशेने परत फिरला आणि श्रीशैलने गाडी वळवण्यासाठी दरीच्या दिशेने घेतली. तो माणूस तसाच मागे फिरला. म्हणाला, इथे नको. धोकादायक आहे. थोडा पुढे जा तिथे वळवण्याजोगी जागा आहे. इथे खूप डेंजरस आहे. आम्ही पुढे गेलो. जवळ जवळ एक किलो मीटर गेल्यानंतर थोडा रुंद भाग बघून गाडी परत फिरली. तोवर हा माणूस आमची वाट बघत उभा. त्याने आम्हाला फॉलो करण्याची खूण केली आणि आम्ही त्याच्या मागून निघालो. एका ठिकाणी आल्यावर त्याने गाडी बाजूला घेतली आणि आत जाणाऱ्या पायवाटेकडे इशारा केला. आम्ही गाडी बाजूला थांबवली आणि उतरून पायी जाण्यासाठी तिथे वळलो आणि रिव्हर्स घेऊन तो परत फिरला. बाप रे म्हणजे तो फक्त आम्हाला रस्ता दाखवण्याकरिता इतका लांब आला! धन्य आहे.

नॅचरल ब्रिज हे एक आश्चर्यच आहे. जमिनीच्या खालील भाग वाहत्या पाण्याने वाहून गेला आहे वरचा भाग अगदी in tact आणि खाली खोल दरी तयार झाली आहे. हा पूल म्हणजे उरलेले दगडाचे अवशेष आहेत. आपण त्यावरून पायी पलीकडे जाऊ शकतो. निसर्गातली ही अशी आश्चर्य बघायला मजा येते. इतकी यातायात झाली खरी पण काहीतरी वेगळं बघायला मिळालं या जाणिवेने सार्थक झाल्यासारखं वाटलं.

भर पावसातला तो ब्रिज आमच्याकडे पाहून सुखावला असेल. आधीच स्लोव्हेनिया हे काही टूरिस्टीक डेस्टिनेशन नाही आणि त्यात हे इतकं आडबाजूचं ठिकाण ! कोण येत असेल इथे कडमडायला ? आमच्यासारख्या भर पावसात इथे त्याला भेटायला आलेल्या वेड्यांना बघून त्याला का नाही आनंद होणार मग

सततचा पाऊस आणि चुकलेला रस्ता यामुळे काहीसे त्रासलेले आम्ही दिसलेल्या नेचर ब्रिजमुळे सुखावलो होतो. पडणारा पाऊस आणि तिथे वाढलेली झाडं दोन्ही त्या ठिकाणाचं यथार्थ दर्शन कॅमेरामध्ये टिपण्यासाठी असमर्थ होती. पण आम्ही डोळेभरून पाहिलेला तो पूल आमच्या स्मरणात कायम राहणार होता.

आता परतीच्या रस्त्याचा काही प्रश्न नाही. कामनिकपर्यंत सरळ रस्ता आहे. या श्रीशैलच्या वाक्याचा व्यत्यास माझ्या लक्षात यायला उशीर लागला. कामनिकपर्यंत खरोखर जीपीएस व्यवस्थित होतं. म्हणून मग पुढेसुद्धा जीपीएसने दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे जायचं आम्ही ठरवलं. साधारण तासाभरानंतर कसल्याच खुणा दिसत नाहीत आणि तासाच्या प्रवासानंतरही दिशा काही वेगळीच दाखवली जात आहे हे लक्षात आल्यावर थांबून आढावा घेतला. तिथे चौकशी केल्यावर त्यांनी परत फिरा आणि दुसऱ्या रस्त्याने जा असा सल्ला दिला. पण इतके पुढे आल्यावर..... पुन्हा जीपीएस सुरु केले गाडी निघाली आणि तिने गावातील एका अशक्य चढापाशी आम्हाला नेऊन सोडलं. तिथे ठरलं की आता हे जीपीएस बंद. आम्ही उतरणार होतो त्या हॉटेलला फोन केला त्यांनी सांगितलेल्या रस्त्यांपैकी एकाची दिशा मग जीपीएसवर टाकली आणि प्रवास सुरु केला. इथे एक धडा मिळाला. जीपीएस ला सूचना देताना फक्त हाय वे किंवा मुख्य रस्ता हवा. कच्चा रस्ता नको अशा सूचना देणं गरजेचं आहे. विशेषतः या अशा अनवट जागी तरी. जवळचा म्हणून तो दाखवेल तो रस्ता कदाचित विचित्र असण्याची शक्यता आहे.

आम्हाला उशीर झाला होता आणि आता अंधार दाटून यायला लागला होता. आम्ही जाणार ती व्हॅली म्हणजे आधीच अंधार लवकर होणार. त्यात इथे हे पांढरे ढग खाली उतरतात आणि धुक्याचा दाट थर तयार करतात. दऱ्याखोऱ्यातले अरुंद आणि कच्चे रस्ते, कोसळणारा पाऊस आणि अंधार, एका बाजूला सतत सोबतीला असणारा डोंगर आणि दुसऱ्या बाजूची दरी. आम्ही त्या सांगितलेल्या गावापर्यंत आलो आणि मग रस्ता मिळाल्याचा आनंद झाला. अर्थात तो फार टिकणारा नव्हता. धुकं अधिक अधिक दाट होत चाललं होत. गाडी वेग घेऊ शकत नव्हती आणि अंधार अधिक तीव्रतेने उतरत होता.

आमचा सारथी मात्र या सगळ्यात डोक्यावर बर्फाची लादी ठेवून आम्हाला समोरची न दिसणारी शिखरं किंवा मधूनच डोकावणारी कुरणं असं काही बाही दाखवत होता. शेवटी त्याला सांगितलंच की परतीच्या वेळी काय ती निसर्गशोभा बघू आत्ता यावेळी आमचं लक्ष फक्त समोरचा रस्ता आणि तुझं चालवण्यातलं कौशल्य यावर केंद्रित करू दे. या सगळ्यात जेव्हा रोबानोव कोट अशी डावीकडे बाण दाखवणारी पाटी आणि ४ कि.मी असा बोर्ड दिसला तेव्हा हायसं वाटलं. अर्थात आत्तापर्यंत रस्ता चांगला होता. इथून पुढे परीक्षा बघणारा होता. काळाकुट्ट अंधार, दोन्ही बाजूची आता यावेळी भयावह वाटणारी दाट झाडी, जीपीएस आम्हाला दिशा दाखवत होतं आणि आम्ही पुढे जात होतो. You have reached your destination या वाक्याने हर्षभरित व्हायचं की काळजी करायची तो आमचा प्रश्न होता. समोर काहीसं खोल एक हॉटेल दिसत होत. पण त्या दिशेने जाणार कसं ? पण गाडीच्या प्रकाशात एक शार्प उतार आणि पार्क केलेल्या काही गाड्या दिसल्या आणि खात्री पटली, आपण पोहोचलो एकदाचे रोबानोव कोट येथे .

       (या नंतरच्या प्रत्येक मंगळवारी पुढील भाग अपलोड होईल)  
Monday, 15 October 2018

SLOVENIA : CERKNICA


सरकनिका : मेस्कारआम्ही केव्ज बघून निघालो ते सरकनिकाला जाण्याकरता. तिथे काय हा प्रश्न आम्ही कधी विचारत नाही कारण फक्त ते ठिकाण नव्हे तर जातानाचा निसर्ग आणि प्रवास याचा आनंद सुदैवाने आम्हाला तिघांनाही घेता येतो आणि त्यामुळेच आम्ही पॉईंट्स बघण्यामागे फारसे लागत नाही.

आम्ही केव्जहून निघालो तेव्हा दुपारचे चार वाजून गेले होते. अंतर फार नसले तरी कदाचित शोधाशोध करावी लागेल असे मला वाटले होते. पण जीपीएसमध्ये दाखवल्याबर हुकूम सगळे होते. आमची गाडी रस्ता सोडून कच्च्या रस्त्यावर घेतली आणि समोर एक अपार्टमेंटसारखी बिल्डिंग होती त्यासमोर नेऊन उभी केली. पाटी बरोबर होती पण आत काही जाग नव्हती. अखेरीस श्रीशैलने फोन लावला. आमची चूक नव्हती पण एकच नाव असलेल्या दोन जागा होत्या याचा शोध आम्हाला नंतर लागला. गाडी मागे घेऊन आधीच्या घरापाशी घेतली तर छतावर एक मुलगी गाडी पुढल्या दारी कशी घेऊन येता येईल याच्या सूचना देण्यासाठी उभी होती.

घर सुंदर होतं. समोर उत्तम बाग, बगीचा, कारंजे आणि खूपशा अँटिक वस्तू अंगणात ठेवलेल्या होत्या. या मोठ्या घरातला एक भाग मालकांकडे आणि दुसऱ्या भागातील एक स्वतंत्र मोठी बेडरूम आणि त्याला जोडून असलेली मोठी बाल्कनी ज्यात त्यांचा सोफा आणि चेअर्स होत्या ती आम्हाला दिली होती. अशा एकूण चार बेडरूम्स ते भाड्याने देतात असं दिसत होत.. ती मुलगी आणि तिचा भाऊ पुढे आले. पण बोलण्याचं काम तीच करत होती. "आत्ता पाच सव्वा पाच वाजले आहेत आणि साडेसहापर्यंत उजेड असतो. तुम्ही फ्रेश होऊन निघाला लगेच तर तुम्हाला पाऊण तासाचा अवधी मिळेल. या रस्त्याने गेलात तर खूपसं फिरून होईल. आज आत्ता पाऊसही नाही तेव्हा निघालेलं बरं. " अशा ठिकाणी या स्थानिकांचं ऐकून घेणं हे फायद्याचं असतं. आम्ही निघालो. क्षितिजापर्यंत पसरलेला सरकनिका आमच्या समोर होता. अडथळा म्हणाल तर काठावरच्या झाडांचा. तलावाच्या ध्यातून रस्ता जात होता. दोन्ही बाजूला दाट झाडी होती. यावर्षी पाऊस तितका झाला नाही म्हणून पाणी कमी आहे अशी माहिती मिळाली. असं म्हणतात की काही वेळा हा तलाव पूर्ण कोरडा पडतो.


या रस्त्यावर पर्यटक वाहनांना बंदी होती. फक्त गावकरी तिथून वाहनात बसून जाऊ शकत होते. गाडी पार्किंग लॉटमध्ये ठेवून आम्ही पायी निघालो. अंधार पडायला थोड्याच वेळात सुरवात होणार होती त्यामुळे थोडी घाई करावी लागली.
मला गोव्याला मावळत्या सूर्याच्या साक्षीने वार्षिक संमेलनाच्या वेळी मारलेला फेरफटका आठवला.

परतताना जेवून जाऊ, या विचाराने त्याच्या शोधार्थ पायपीट केली कारण हे गावढे गाव तेव्हा इथे सोय कितपत असेल त्याचा अंदाज नव्हता. पण यांच्या गावातूनही चांगली हॉटेल्स मिळण्यात अडचण येत नाही हा अनुभव इथेही आला. रात्रीच्या किर्र अंधारात परतीच्या वाटेवर आपल्याला नेमक्या ठिकाणी वळता येईल का आणि त्यातही त्या कच्च्या रस्त्यावर गाडी नीटपणे येईल ना अशा शंकाग्रस्त मनःस्थितीत गाडी घरासमोर नेऊन कधी उभी केली हे कळले नाही.

दुसरा दिवस उजाडला. उन्हाचा दिवस म्हणजे पर्वणी असेल असं वाटलं पण दुपारकडे पावसाचा अंदाज होता. थोड्याच वेळात सुरवात होणार होती. आम्हाला या घराकरता फारच कमी वेळ मिळणार म्हणून हळहळ वाटत होती. पण या गोष्टीला इलाज नसतो. असं गुंतून पडत राहिलं तर काहीच बघून होणार नाही याचीही मनात जाणीव होती. ब्रेकफास्टकरता खाली गेलो तर एका टेबलावर ब्रेड आणि जॅम बटर ठेवलं होतं. बस, एवढाच ब्रेकफास्ट? असा मनात आलेला प्रश्न मनातच ठेवून तो गोड मानायचं ठरवलं. संपता संपता ते गृहस्थ आले, आम्ही आल्याचं त्यांना कळलं नव्हतं. त्या न कळल्याबद्दल सॉरी झालं आणि कॉफी कशी हवी, ज्यूस कोणता हवा, ब्रेकफास्टला काय काय हवं वगैरे विचारून व्यवस्थित ऑर्डर घेतली आणि त्याप्रमाणे आणूनही दिलं. (कदाचित मनातल्या मनात आमच्या या शाकाहारी गरजांना हसलेही असतील कारण नंतर आलेल्यांनी दिलेली सविस्तर ऑर्डर त्यांना कामाला लावणारी होती.)

आवरून बाहेरच पडायचं त्याआधी इतकं सुंदर घर ज्यात आपण राहिलो ते बघावं म्हणून बागेत गेलो तर ते गृहस्थ समोर. गप्पांचा मूड असावा. म्हणाले, इथे फिरणार का, तर घराचा परिसर पण बघा सगळा. ही सगळी मालमत्ता त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या मालकीची होती. मला जरा त्यांच्या घराच्या नावाबद्दल (मेस्कार) कुतूहल म्हणून अर्थ विचारला तर म्हणाले मेस्कार म्हणजे स्लोवेनिअनमध्ये उंदीर. आमचं आडनाव आहे ते. आमच्या आजोबांच्या वेळेपासूनची आमची ही इस्टेट आहे. त्यांना खूप मुलं होती. आता इथे मी आणि माझा भाऊ दोघेच आहोत. काल तुम्ही पुढे गेला होता ते माझ्या भावाचं घर. त्याला मूल बाळ नाही मग मी त्याला विचारलं तुझ्या घराचं नाव मी घेऊ का तर तो हो म्हणाला म्हणून ही सारख्या नावाची दोन रं दिसत आहेत. घराविषयी अगदी भरभरून बोलायचा त्यांचा मूड असावा पण मधेच त्यांचा मुलगा , डोक्यापासून पायापर्यंत काहीतरी काळ्या रंगाचा विचित्र पोशाख करून आला होता, त्याने थांबवलं म्हणून! तो आम्हाला सांगून त्याच्या ड्युटी वर जाण्याच्या घाईत होता. "मी केव्ह बॉय आहे, इथून जवळच असलेल्या गुहांमध्ये गाईडचं काम करतो त्यामुळे मला तुमच्याकरिता फार वेळ देता येत नाही" असं म्हणून क्षमा मागून निघाला. त्याच्या त्या ड्रेसचा उलगडा झाला. केव्ज पाण्याने भरलेल्या असतात म्हणून हा असा वेष! आपण संस्कार संस्कार म्हणून आपली पाठ थोपटतो पण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना (?) अशा तऱ्हेने सांगून जाणारी किती मुलं आपल्याकडे मिळतील याचा विचार मनात आल्यावाचून राहिला नाही.

बाग, त्यातली सुंदर झाडं, फुलं या साऱ्याचं कौतुक करत फोटो काढत जात असताना मालकीणबाई आल्या. फिरून येत आहात ना, मग असेच पुढे जा. आमची लाकडाची वखार आहे पुढे. त्या पलीकडून ओढा वाहतो. सगळं जंगलच आहे त्यापुढे. आवारात ओढा, त्यावर असलेली पाणचक्की, जंगल, चुकलो, जंगलात घर ही संकल्पनाच किती मस्त आहे. भैरप्पांच्या डोंगराएवढाची आठवण झाली.

सगळं बघितलं, आता निघायला हवं होत. आम्ही निघायला उशीर करत होतो आणि प्रत्येक ठिकाणी पोहोचायला मग संध्याकाळ होऊन जात होती. आज तरी आम्हाला ते परवडणार नव्हतं कारण आता आमचा पुढचा टप्पा होता लोगार व्हॅलीचा आणि अर्थातंच तिथला रस्ता हा परीक्षा बघणारा असणार होता.

लोभ हा माणसाचा मोठा शत्रू असतो. फिलॉसॉफी नाही, अनुभव सांगतो आहे. आम्ही निघतेवेळी मालकांनी आम्हाला सांगितलं की निघाल्यावर लगेच कच्चा रस्ता घ्या आणि पुढे गेल्यावर सगळा तलाव दिसेल. आम्ही निघालो आणि कुठे काय चुकलो माहित नाही पण भलतीकडे जात आहोत हे लक्षात आलं तेव्हा वेळ झाला होता. तलाव खूप दूर होता. आणि जीपीएस जर बघितलं तर ते पूर्ण गंडल्यासारखं वाटत होत कारण दरवेळी रिकॅलक्युलेट करून आम्हाला कुठेतरी गावातल्या अगम्य रस्त्यावर फसवण्याचा त्याचा उपदव्याप सुरु होता. कदाचित इथे मॅपिंग व्यवस्थित झालेलं नसावं पण आम्ही अडचणीत सापडत होतो हे खरं. शेवटी सरकनिका गावाच्या दिशेने जाऊन पुढे जाऊ या असा सूज्ञ विचार करून तासाभराचा हेलपाटा घेऊन परत फिरलो. एव्हाना आता अंधारून आलं होतं आणि पावसाची सुरवातही झाली होती

           (या नंतरच्या प्रत्येक मंगळवारी पुढील भाग अपलोड होईल)  

# Slovenia Cerknica