Monday, 15 October 2018

SLOVENIA : CERKNICA


सरकनिका : मेस्कारआम्ही केव्ज बघून निघालो ते सरकनिकाला जाण्याकरता. तिथे काय हा प्रश्न आम्ही कधी विचारत नाही कारण फक्त ते ठिकाण नव्हे तर जातानाचा निसर्ग आणि प्रवास याचा आनंद सुदैवाने आम्हाला तिघांनाही घेता येतो आणि त्यामुळेच आम्ही पॉईंट्स बघण्यामागे फारसे लागत नाही.

आम्ही केव्जहून निघालो तेव्हा दुपारचे चार वाजून गेले होते. अंतर फार नसले तरी कदाचित शोधाशोध करावी लागेल असे मला वाटले होते. पण जीपीएसमध्ये दाखवल्याबर हुकूम सगळे होते. आमची गाडी रस्ता सोडून कच्च्या रस्त्यावर घेतली आणि समोर एक अपार्टमेंटसारखी बिल्डिंग होती त्यासमोर नेऊन उभी केली. पाटी बरोबर होती पण आत काही जाग नव्हती. अखेरीस श्रीशैलने फोन लावला. आमची चूक नव्हती पण एकच नाव असलेल्या दोन जागा होत्या याचा शोध आम्हाला नंतर लागला. गाडी मागे घेऊन आधीच्या घरापाशी घेतली तर छतावर एक मुलगी गाडी पुढल्या दारी कशी घेऊन येता येईल याच्या सूचना देण्यासाठी उभी होती.

घर सुंदर होतं. समोर उत्तम बाग, बगीचा, कारंजे आणि खूपशा अँटिक वस्तू अंगणात ठेवलेल्या होत्या. या मोठ्या घरातला एक भाग मालकांकडे आणि दुसऱ्या भागातील एक स्वतंत्र मोठी बेडरूम आणि त्याला जोडून असलेली मोठी बाल्कनी ज्यात त्यांचा सोफा आणि चेअर्स होत्या ती आम्हाला दिली होती. अशा एकूण चार बेडरूम्स ते भाड्याने देतात असं दिसत होत.. ती मुलगी आणि तिचा भाऊ पुढे आले. पण बोलण्याचं काम तीच करत होती. "आत्ता पाच सव्वा पाच वाजले आहेत आणि साडेसहापर्यंत उजेड असतो. तुम्ही फ्रेश होऊन निघाला लगेच तर तुम्हाला पाऊण तासाचा अवधी मिळेल. या रस्त्याने गेलात तर खूपसं फिरून होईल. आज आत्ता पाऊसही नाही तेव्हा निघालेलं बरं. " अशा ठिकाणी या स्थानिकांचं ऐकून घेणं हे फायद्याचं असतं. आम्ही निघालो. क्षितिजापर्यंत पसरलेला सरकनिका आमच्या समोर होता. अडथळा म्हणाल तर काठावरच्या झाडांचा. तलावाच्या ध्यातून रस्ता जात होता. दोन्ही बाजूला दाट झाडी होती. यावर्षी पाऊस तितका झाला नाही म्हणून पाणी कमी आहे अशी माहिती मिळाली. असं म्हणतात की काही वेळा हा तलाव पूर्ण कोरडा पडतो.


या रस्त्यावर पर्यटक वाहनांना बंदी होती. फक्त गावकरी तिथून वाहनात बसून जाऊ शकत होते. गाडी पार्किंग लॉटमध्ये ठेवून आम्ही पायी निघालो. अंधार पडायला थोड्याच वेळात सुरवात होणार होती त्यामुळे थोडी घाई करावी लागली.
मला गोव्याला मावळत्या सूर्याच्या साक्षीने वार्षिक संमेलनाच्या वेळी मारलेला फेरफटका आठवला.

परतताना जेवून जाऊ, या विचाराने त्याच्या शोधार्थ पायपीट केली कारण हे गावढे गाव तेव्हा इथे सोय कितपत असेल त्याचा अंदाज नव्हता. पण यांच्या गावातूनही चांगली हॉटेल्स मिळण्यात अडचण येत नाही हा अनुभव इथेही आला. रात्रीच्या किर्र अंधारात परतीच्या वाटेवर आपल्याला नेमक्या ठिकाणी वळता येईल का आणि त्यातही त्या कच्च्या रस्त्यावर गाडी नीटपणे येईल ना अशा शंकाग्रस्त मनःस्थितीत गाडी घरासमोर नेऊन कधी उभी केली हे कळले नाही.

दुसरा दिवस उजाडला. उन्हाचा दिवस म्हणजे पर्वणी असेल असं वाटलं पण दुपारकडे पावसाचा अंदाज होता. थोड्याच वेळात सुरवात होणार होती. आम्हाला या घराकरता फारच कमी वेळ मिळणार म्हणून हळहळ वाटत होती. पण या गोष्टीला इलाज नसतो. असं गुंतून पडत राहिलं तर काहीच बघून होणार नाही याचीही मनात जाणीव होती. ब्रेकफास्टकरता खाली गेलो तर एका टेबलावर ब्रेड आणि जॅम बटर ठेवलं होतं. बस, एवढाच ब्रेकफास्ट? असा मनात आलेला प्रश्न मनातच ठेवून तो गोड मानायचं ठरवलं. संपता संपता ते गृहस्थ आले, आम्ही आल्याचं त्यांना कळलं नव्हतं. त्या न कळल्याबद्दल सॉरी झालं आणि कॉफी कशी हवी, ज्यूस कोणता हवा, ब्रेकफास्टला काय काय हवं वगैरे विचारून व्यवस्थित ऑर्डर घेतली आणि त्याप्रमाणे आणूनही दिलं. (कदाचित मनातल्या मनात आमच्या या शाकाहारी गरजांना हसलेही असतील कारण नंतर आलेल्यांनी दिलेली सविस्तर ऑर्डर त्यांना कामाला लावणारी होती.)

आवरून बाहेरच पडायचं त्याआधी इतकं सुंदर घर ज्यात आपण राहिलो ते बघावं म्हणून बागेत गेलो तर ते गृहस्थ समोर. गप्पांचा मूड असावा. म्हणाले, इथे फिरणार का, तर घराचा परिसर पण बघा सगळा. ही सगळी मालमत्ता त्यांच्या एकत्र कुटुंबाच्या मालकीची होती. मला जरा त्यांच्या घराच्या नावाबद्दल (मेस्कार) कुतूहल म्हणून अर्थ विचारला तर म्हणाले मेस्कार म्हणजे स्लोवेनिअनमध्ये उंदीर. आमचं आडनाव आहे ते. आमच्या आजोबांच्या वेळेपासूनची आमची ही इस्टेट आहे. त्यांना खूप मुलं होती. आता इथे मी आणि माझा भाऊ दोघेच आहोत. काल तुम्ही पुढे गेला होता ते माझ्या भावाचं घर. त्याला मूल बाळ नाही मग मी त्याला विचारलं तुझ्या घराचं नाव मी घेऊ का तर तो हो म्हणाला म्हणून ही सारख्या नावाची दोन रं दिसत आहेत. घराविषयी अगदी भरभरून बोलायचा त्यांचा मूड असावा पण मधेच त्यांचा मुलगा , डोक्यापासून पायापर्यंत काहीतरी काळ्या रंगाचा विचित्र पोशाख करून आला होता, त्याने थांबवलं म्हणून! तो आम्हाला सांगून त्याच्या ड्युटी वर जाण्याच्या घाईत होता. "मी केव्ह बॉय आहे, इथून जवळच असलेल्या गुहांमध्ये गाईडचं काम करतो त्यामुळे मला तुमच्याकरिता फार वेळ देता येत नाही" असं म्हणून क्षमा मागून निघाला. त्याच्या त्या ड्रेसचा उलगडा झाला. केव्ज पाण्याने भरलेल्या असतात म्हणून हा असा वेष! आपण संस्कार संस्कार म्हणून आपली पाठ थोपटतो पण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना (?) अशा तऱ्हेने सांगून जाणारी किती मुलं आपल्याकडे मिळतील याचा विचार मनात आल्यावाचून राहिला नाही.

बाग, त्यातली सुंदर झाडं, फुलं या साऱ्याचं कौतुक करत फोटो काढत जात असताना मालकीणबाई आल्या. फिरून येत आहात ना, मग असेच पुढे जा. आमची लाकडाची वखार आहे पुढे. त्या पलीकडून ओढा वाहतो. सगळं जंगलच आहे त्यापुढे. आवारात ओढा, त्यावर असलेली पाणचक्की, जंगल, चुकलो, जंगलात घर ही संकल्पनाच किती मस्त आहे. भैरप्पांच्या डोंगराएवढाची आठवण झाली.

सगळं बघितलं, आता निघायला हवं होत. आम्ही निघायला उशीर करत होतो आणि प्रत्येक ठिकाणी पोहोचायला मग संध्याकाळ होऊन जात होती. आज तरी आम्हाला ते परवडणार नव्हतं कारण आता आमचा पुढचा टप्पा होता लोगार व्हॅलीचा आणि अर्थातंच तिथला रस्ता हा परीक्षा बघणारा असणार होता.

लोभ हा माणसाचा मोठा शत्रू असतो. फिलॉसॉफी नाही, अनुभव सांगतो आहे. आम्ही निघतेवेळी मालकांनी आम्हाला सांगितलं की निघाल्यावर लगेच कच्चा रस्ता घ्या आणि पुढे गेल्यावर सगळा तलाव दिसेल. आम्ही निघालो आणि कुठे काय चुकलो माहित नाही पण भलतीकडे जात आहोत हे लक्षात आलं तेव्हा वेळ झाला होता. तलाव खूप दूर होता. आणि जीपीएस जर बघितलं तर ते पूर्ण गंडल्यासारखं वाटत होत कारण दरवेळी रिकॅलक्युलेट करून आम्हाला कुठेतरी गावातल्या अगम्य रस्त्यावर फसवण्याचा त्याचा उपदव्याप सुरु होता. कदाचित इथे मॅपिंग व्यवस्थित झालेलं नसावं पण आम्ही अडचणीत सापडत होतो हे खरं. शेवटी सरकनिका गावाच्या दिशेने जाऊन पुढे जाऊ या असा सूज्ञ विचार करून तासाभराचा हेलपाटा घेऊन परत फिरलो. एव्हाना आता अंधारून आलं होतं आणि पावसाची सुरवातही झाली होती

           (या नंतरच्या प्रत्येक मंगळवारी पुढील भाग अपलोड होईल)  

# Slovenia Cerknica   

No comments:

Post a Comment