Monday, 22 October 2018

SLOVENIA CERKNICA-NATURAL BRIDGE TO LOGAR VALLEY

दाटून, अंधारून आलं, पाऊस भुरभुरतो आहे असं जरी असलं तरी सुरवातीला आम्ही खरोखरच मजेत होतो. आत्तापर्यंत तरी रस्ता तसा हमरस्ता म्हणावा असा होता. मेस्कारमधून बाहेर पडल्यावर तर एका गावाचा पॅनोरामा इतका सुंदर समोर आला की साऱ्या चिंता काळज्या विसराव्या आणि बघत बसावं. पण हा रस्त्याचा घोळ लक्षात आल्यावर मात्र जराशी चलबिचल झाली. या वेळे पर्यंत आम्ही सरकनिका गावापर्यंत आलो होतो.  आता तरी सरळ जाऊ रे, असं मी श्रीशैलला सांगत होतो तर इथला नॅचरल ब्रिज सुंदर आहे . जवळच असावा आणि जीपीएस वर दिसतो आहे तर जाऊ या, या म्हणण्यापुढे आम्ही मान डोलावली खरी पण एव्हाना धो धो कोसळणारा पाऊस परीक्षा बघणारा झाला होता. दाट धुकं त्यातून वाट काढत पुढे जाणारे आम्ही. सं काळजीचं वातावरण होतं. आता हमरस्ता सोडल्यानंतर आत वळल्यावर रस्ता कच्चा असला तरी पण ठीक होता. निदान दीड गाडी जाऊ शकेल असा रुंद होता.


पुढे गेल्यावर मात्र काहीशा चढानंतर उजव्या बाजूला डोंगराची भिंत आणि डावीकडे सरळ खोल दरी. धो धो पाऊस पडत आहे. सगळ्या रस्त्यावर फक्त आम्ही. खाली खोलवर अंधुक दिसणारा सरकनिका तलाव. वातावरण धूसर आणि म्हणून तणावपूर्ण, ते सोडता (म्हणजे काय?) प्रवास खूप छान सुरु होता. नॅचरल ब्रिज .५ असं पुढे दाखवणारं जीपीएस एकदम रूट कॅलक्युलेट करू लागलं. तरी आमच्या डोक्यात, ठीक आहे, पुढून वळून येता येईल असं होतं. सरळ पुढे जाताना आता मात्र भीती वाटण्याची अवस्था आली कारण चिटपाखरू नाही, वाहतूक काही नाही. गाडी वळवण्याची सोय नाही आणि पुढे कुठे जात आहोत ते कळत नाही अशा अवस्थेत समोरून गाडीचे दिवे दिसले. श्रीशैलने गाडी बाजूला घेतली की समोरची गाडी जाऊ शकेल. त्याने हात केला, तो माणूस थांबला. त्याला विचारलं तर म्हणाला तुम्ही खूप पुढे आला आहेत. Retour ( म्हणजे परत फिरा) . आता आली का पंचाईत. श्रीशैलने ठीक म्हटले. तो माणूस त्याच्या गाडीच्या दिशेने परत फिरला आणि श्रीशैलने गाडी वळवण्यासाठी दरीच्या दिशेने घेतली. तो माणूस तसाच मागे फिरला. म्हणाला, इथे नको. धोकादायक आहे. थोडा पुढे जा तिथे वळवण्याजोगी जागा आहे. इथे खूप डेंजरस आहे. आम्ही पुढे गेलो. जवळ जवळ एक किलो मीटर गेल्यानंतर थोडा रुंद भाग बघून गाडी परत फिरली. तोवर हा माणूस आमची वाट बघत उभा. त्याने आम्हाला फॉलो करण्याची खूण केली आणि आम्ही त्याच्या मागून निघालो. एका ठिकाणी आल्यावर त्याने गाडी बाजूला घेतली आणि आत जाणाऱ्या पायवाटेकडे इशारा केला. आम्ही गाडी बाजूला थांबवली आणि उतरून पायी जाण्यासाठी तिथे वळलो आणि रिव्हर्स घेऊन तो परत फिरला. बाप रे म्हणजे तो फक्त आम्हाला रस्ता दाखवण्याकरिता इतका लांब आला! धन्य आहे.

नॅचरल ब्रिज हे एक आश्चर्यच आहे. जमिनीच्या खालील भाग वाहत्या पाण्याने वाहून गेला आहे वरचा भाग अगदी in tact आणि खाली खोल दरी तयार झाली आहे. हा पूल म्हणजे उरलेले दगडाचे अवशेष आहेत. आपण त्यावरून पायी पलीकडे जाऊ शकतो. निसर्गातली ही अशी आश्चर्य बघायला मजा येते. इतकी यातायात झाली खरी पण काहीतरी वेगळं बघायला मिळालं या जाणिवेने सार्थक झाल्यासारखं वाटलं.

भर पावसातला तो ब्रिज आमच्याकडे पाहून सुखावला असेल. आधीच स्लोव्हेनिया हे काही टूरिस्टीक डेस्टिनेशन नाही आणि त्यात हे इतकं आडबाजूचं ठिकाण ! कोण येत असेल इथे कडमडायला ? आमच्यासारख्या भर पावसात इथे त्याला भेटायला आलेल्या वेड्यांना बघून त्याला का नाही आनंद होणार मग

सततचा पाऊस आणि चुकलेला रस्ता यामुळे काहीसे त्रासलेले आम्ही दिसलेल्या नेचर ब्रिजमुळे सुखावलो होतो. पडणारा पाऊस आणि तिथे वाढलेली झाडं दोन्ही त्या ठिकाणाचं यथार्थ दर्शन कॅमेरामध्ये टिपण्यासाठी असमर्थ होती. पण आम्ही डोळेभरून पाहिलेला तो पूल आमच्या स्मरणात कायम राहणार होता.

आता परतीच्या रस्त्याचा काही प्रश्न नाही. कामनिकपर्यंत सरळ रस्ता आहे. या श्रीशैलच्या वाक्याचा व्यत्यास माझ्या लक्षात यायला उशीर लागला. कामनिकपर्यंत खरोखर जीपीएस व्यवस्थित होतं. म्हणून मग पुढेसुद्धा जीपीएसने दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे जायचं आम्ही ठरवलं. साधारण तासाभरानंतर कसल्याच खुणा दिसत नाहीत आणि तासाच्या प्रवासानंतरही दिशा काही वेगळीच दाखवली जात आहे हे लक्षात आल्यावर थांबून आढावा घेतला. तिथे चौकशी केल्यावर त्यांनी परत फिरा आणि दुसऱ्या रस्त्याने जा असा सल्ला दिला. पण इतके पुढे आल्यावर..... पुन्हा जीपीएस सुरु केले गाडी निघाली आणि तिने गावातील एका अशक्य चढापाशी आम्हाला नेऊन सोडलं. तिथे ठरलं की आता हे जीपीएस बंद. आम्ही उतरणार होतो त्या हॉटेलला फोन केला त्यांनी सांगितलेल्या रस्त्यांपैकी एकाची दिशा मग जीपीएसवर टाकली आणि प्रवास सुरु केला. इथे एक धडा मिळाला. जीपीएस ला सूचना देताना फक्त हाय वे किंवा मुख्य रस्ता हवा. कच्चा रस्ता नको अशा सूचना देणं गरजेचं आहे. विशेषतः या अशा अनवट जागी तरी. जवळचा म्हणून तो दाखवेल तो रस्ता कदाचित विचित्र असण्याची शक्यता आहे.

आम्हाला उशीर झाला होता आणि आता अंधार दाटून यायला लागला होता. आम्ही जाणार ती व्हॅली म्हणजे आधीच अंधार लवकर होणार. त्यात इथे हे पांढरे ढग खाली उतरतात आणि धुक्याचा दाट थर तयार करतात. दऱ्याखोऱ्यातले अरुंद आणि कच्चे रस्ते, कोसळणारा पाऊस आणि अंधार, एका बाजूला सतत सोबतीला असणारा डोंगर आणि दुसऱ्या बाजूची दरी. आम्ही त्या सांगितलेल्या गावापर्यंत आलो आणि मग रस्ता मिळाल्याचा आनंद झाला. अर्थात तो फार टिकणारा नव्हता. धुकं अधिक अधिक दाट होत चाललं होत. गाडी वेग घेऊ शकत नव्हती आणि अंधार अधिक तीव्रतेने उतरत होता.

आमचा सारथी मात्र या सगळ्यात डोक्यावर बर्फाची लादी ठेवून आम्हाला समोरची न दिसणारी शिखरं किंवा मधूनच डोकावणारी कुरणं असं काही बाही दाखवत होता. शेवटी त्याला सांगितलंच की परतीच्या वेळी काय ती निसर्गशोभा बघू आत्ता यावेळी आमचं लक्ष फक्त समोरचा रस्ता आणि तुझं चालवण्यातलं कौशल्य यावर केंद्रित करू दे. या सगळ्यात जेव्हा रोबानोव कोट अशी डावीकडे बाण दाखवणारी पाटी आणि ४ कि.मी असा बोर्ड दिसला तेव्हा हायसं वाटलं. अर्थात आत्तापर्यंत रस्ता चांगला होता. इथून पुढे परीक्षा बघणारा होता. काळाकुट्ट अंधार, दोन्ही बाजूची आता यावेळी भयावह वाटणारी दाट झाडी, जीपीएस आम्हाला दिशा दाखवत होतं आणि आम्ही पुढे जात होतो. You have reached your destination या वाक्याने हर्षभरित व्हायचं की काळजी करायची तो आमचा प्रश्न होता. समोर काहीसं खोल एक हॉटेल दिसत होत. पण त्या दिशेने जाणार कसं ? पण गाडीच्या प्रकाशात एक शार्प उतार आणि पार्क केलेल्या काही गाड्या दिसल्या आणि खात्री पटली, आपण पोहोचलो एकदाचे रोबानोव कोट येथे .

       (या नंतरच्या प्रत्येक मंगळवारी पुढील भाग अपलोड होईल)  
No comments:

Post a Comment