Tuesday, 9 October 2018

SLOVENIA : POSTOJNA JAMA



Postojna Jama 

आज लोगार व्हॅली कडे जाण्यासाठी निघायचं होतं. इथून पुढे आम्ही जिथे जिथे राहणार त्या अगदी छोट्याशा गावांमध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्टच्या बाबत बोंब होती. त्यामुळे गाडी भाड्याने घ्यायची ठरलं होतं. श्रीशैलच्या ड्रायविंगचा अनुभव गेल्या वर्षी स्कॉटलंडला घेतला होता. पण तो सरळ रस्त्यावरच्या चालवण्याचा. इथे घाटातले वळणाचे, अरुंद आणि धोकादायक रस्ते असणार होते. मनात धाकधूक असते आणि ती बोलून दाखवायची नसते. ही पथ्यं पाळावीच लागतात नाहीतर चालवणाऱ्या व्यक्तीचा मनोभंग होण्याची शक्यता.

घरातून निघताना पुनश्च टॅक्सी प्रकरण. पण आता आम्हाला तिळा उघड हा मंत्र सापडला होता. टॅक्सी आली. त्याला आम्ही बस स्टॉपवर घ्यायला सांगितली तर त्यानेच आपणहून विचारलं, कुठे जाणार? एअरपोर्ट म्हटल्यावर म्हणाला कशाला बस हवी? मी सोडतो ना २० युरोमध्ये! अगदी आंधळा मागतो एक तसा प्रकार झाला. अर्थात ही सोय फक्त फोनवरून बुक केलेल्या टॅक्सींना आहे. जर तुम्ही रस्त्यावर उभ्या टॅक्सीत बसला असाल तर मात्र रेट वेगळा.

आम्ही एअरपोर्टला जाऊन गाडी घेतली तो सकाळी साडेदहाचा सुमार. यांच्या नियमाप्रमाणे चोवीस तासाचा दिवस याप्रमाणे तीन दिवसानंतर साडे दहाच्या आत गाडी परत करायला हवी. सूट फक्त अर्ध्या तासाची. त्यानंतर मग एक दिवसाचा आकार, अधिक इन्शुरन्स आणि काँट्रॅकट न पाळल्याबद्दल दंड असे पैसे भरावे लागतील. सगळं ऐकून मला धडकी भरली कारण आम्ही जाणार ते अंतर किलो मीटरच्या हिशोबात आवाक्यात दिसत असलं तरी रस्त्यांच्या बाबत काहीच माहिती उपलब्ध नव्हती. श्रीशैल मात्र हल्लीच्या भाषेत कूल होता.

Postojna Jama

एअरपोर्ट वर गाडी घेतली आणि निघालो. नेहेमीप्रमाणे माझं रस्त्याकडे लक्ष नव्हतं, (यात नेहेमीप्रमाणे याच्यापुढे स्वल्पविराम हवा पण तो चुकून राहून गेला असेल असं आपल्याला वाटत असेल तर ती गैरसमजूत आहे, ते लक्ष नव्हतं याचं विशेषण आहे याची कृपया नोंद घ्यावी!!!) पुढे बसणाऱ्याची जबाबदारी वगैरे कर्तव्य माहित असली तरीही. थोड्या वेळाने पाट्या वाचताना लक्षात आलं अरे हा तर कालचा पिरानचाच रस्ता! सगळ्या खाणाखुणा पाठ झाल्यासारख्या होत्या. एका ठिकाणी काम सुरु होत त्यामुळे अर्धा रस्ता बंद होता. वाहनं हळू जात होती. टोल जवळ आल्यावर पुनः वेग मंदावत होता. गाडीतील जीपीएस सतत बदलत्या वेग मर्यादेची आठवण करून देत होतं. पण चालवणारे त्याकडे दुर्लक्ष करत शंभरावर वेगाने जात होतेच. आमचा "चालक" ही अपवाद नव्हता. पण वाहतुकीला एक शिस्त होती आणि त्यामुळे तो वेगही आश्वस्त करणारा होता.

जेमतेम ७५ किलोमीटरचा रस्ता. वाटेतले अडथळे आणि काही भागातला अरुंद रस्ता वगळता असलेला हाय वे यामुळे आम्ही कधी पोहोचलो ते कळलं नाही.


आधी या जामा, याचा 'उच्चार यामा करायचा कारण यांचा J हा Y सारखा असतो, या शब्दाचा स्लोवेनियन भाषेतला अर्थ, Caves किंवा गुहा. या निसर्गनिर्मित गुहा आहेत. इथे चुनखडीचा दगड खूप आढळतो. पाण्याच्या प्रवाहाने काही ठिकाणी हे खडक फोडून विविध आकार तयार झाले आहेत. अशा पुष्कळ गुहा या देशात आहेत, त्यातली ही मोठी आणि महत्वाची गुहा


पर्यटकांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहेत. आपण जातो तो स्वागताला बाग बगीचा आहे, पाण्यावर चालणारी पाणचक्की आहे वगैरे. पायऱ्या चढून जाण्याचे कष्ट घेऊन आपण तिकीट काउंटरवर पोहोचल्यावर आपल्याला इतर कष्ट काहीच नाहीत. तिकीट काढायचं आणि प्रवेशद्वारावर जायचं. तिकिटावर वेळ लिहिलेली असते. तिथे गेल्यावर तुम्हाला भाषेचा पर्याय विचारला जातो. प्रत्येक भाषेची वेगळी रांग असते. स्लोवेनियन, इटालियन, जर्मन, इंग्रजी अशा रांगांमध्ये ढकलाढकली न करता उभे राहण्याची जबाबदारी आपली. आत सोडताना भाषावार आत सोडतात. सगळ्या गुहेत आपण एका ट्रेनमधून फिरतो. इतक्या वेड्यावाकड्या ठिकाणी ही सोय फारच भारी वाटते. तिकीटाची रक्कम बघून मी श्रीशैलला म्हटलं फारच महाग वाटत आहे , जाणं इतकं आवश्यक आहे का, त्यावर तो फक्त हसला. अर्थात इकडे आलो ते त्याचा काहीतरी पूर्वाभ्यास असल्याखेरीज नाही हे मलाही पूर्ण माहित आहे तरीही..... (जित्याची खोड, दुसरं काय म्हणणार !)

रांग शांत आहे पण एवढ्यात काही माणसं घोळक्याने एकदम पुढे येऊन उभे राहतात. चेहेरा मंगोल म्हणजे चीन जपान असा कोणतातरी देश. या माणसांबद्दलचा आमचा हा पहिला अनुभव नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी एक प्रकारची नकारात्मक भावना वाढायला मदत होते आहे. अर्थात कोणीही काही बोलत नाही. हेसुद्धा या युरोपीय लोकांचे वैशिष्ट्य म्हणायचे का, अशी शंका जरूर येते.

भाषावार आत सोडण्यामागले तत्व कळते. गाडी म्हणजे दोन माणसं बसू शकतील अशा एकामागे एक असलेल्या सीट्स. प्रत्येक भाषेची वेगळी गाडी. ती क्रमाक्रमाने काही वेळ मध्ये ठेवून सोडतात. अर्थातच उघडी, छप्पर नाही अशा त्या गाडीत बसताना जत्रेत बसल्यासारखं वाटतं. गाडी आहे मात्र विजेवर चालणारी. प्रदूषण नियंत्रणाचा प्रयत्न असावा. या गुहा एकाला एक लागून, काही ठिकाणी मध्ये दरीने विभागलेल्या अशा आहेत. त्या सलग नाहीत. अर्थात या आमच्या ट्रीपमध्ये आम्हाला दिसणार आहेत त्या गुहा सलग नसल्या तरी जोडलेल्या आहेत.

पिवेक ही नदी. तिच्या जोरदार प्रवाहाने खडक फोडून तयार केलेले आकृतिबंध हे या गुहांचं स्वरूप. निसर्ग हा जगातला सगळ्यात मोठा कलाकार आहे ही आमची या स्लोव्हेनिया प्रवासाची थीम ठरावी असे प्रत्येक टप्प्यावर आम्हाला जाणवत होते. आजच्या दिवसात त्याची शिल्पकारीमधली गती तो आम्हाला आत्ता दाखवणार होता.


गाडी झोकदार वळण घेत पाण्याचा प्रवाह ओलांडून आत शिरली आणि सगळ्या लोकांच्या जॅकेटच्या चेन्स वर ओढल्या गेल्या. बाहेरच्या तुलनेत एकदम थंडाव्याची लहर आली. त्या धांदलीत मग कॅमेरे निघाले, मोबाईल सुरु झाले. फ्लॅश नको ही सूचना वारंवार देऊनही फ्लॅशचा प्रकाश आणि गाईडच्या सूचना ऐकू येत होत्या.




आत्ता आम्ही बघत होतो तो ट्रेलर होता. पण तोच इतका भारी होता की मघाचा तिकिटाच्या रक्कमेबद्दलचा माझा आक्षेप कुठल्या कुठे निघून गेला. गाडी पुढे जात असताना डावीकडे बघू की उजवीकडे बघू हे कळत नव्हतं. आत इतक्या ठिकाणी त्यांनी दिव्यांची उत्तम व्यवस्था केली आहे की कुठेही काळोख नाही, प्रकाश आहे पण भगभगीत नाही उलट त्या वातावरणातली गूढता गडद करणारा प्रकाश खूप सुखावह वाटला. सगळ्या गुहाभर फिरून गाडी आम्हाला प्रवेशद्वाराशी परत आणून सोडणार अशी माझी समजूत!

पण काही वेळानंतर गाडी एका ठिकाणी थांबली. गाईडने सगळ्यांना एकत्र करून सूचना दिली. इथून पुढे ज्यांना चढाचा त्रास असेल त्यानी डाव्या बाजूने चालत जाऊन स्टेशनवर थांबावं. तिथून परतण्याच्या गाडीची सोय आहे. बाकीचे इथून वर जातील. काहीसा निसरडा असा तो चढ, पण रेलिंग्स आहेत, पुरेसा उजेड आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढे काय या उत्सुकतेत भर घालणारा माहोल आहे. आमच्यातले कित्येक वयस्क ज्यांच्या हातात काठी होती तेही थांबून परतण्याचा वेडेपणा करू शकले नाहीत.

पाण्याच्या प्रवाहाने हे चुनखडीचे खडक छतापासून तोडले नाहीत, तर त्यांना जमिनीतून वेगवेगळ्या आकारात अलग केलं आहे. त्यामुळे काही ठिकाणी जमिनीवर उभे असलेले विविध आकाराचे कोरीव स्तंभ तर काही ठिकाणी छतापासून लोंबणाऱ्या त्या विविध आकृती! कॅमेऱ्यात किंवा व्हिडिओमध्ये टिपल्या जाणं केवळ अशक्य आहे असं ते सौंदर्य . ती प्रत्यक्ष बघायची आणि अनुभवायची गोष्ट आहे. प्रत्येक माणूस, तरीही लोभ मोह यापासून दूर न जाऊ शकलेला माणूस, पुनः पुनः त्याच मोहात फसत फोटोचा व्यर्थ प्रयत्न करत होता. एका क्षणानंतर मी त्यापासून दूर गेलो आणि फक्त डोळ्यामध्ये जितकं साठवता येईल तितकं साठवण्याचा प्रयत्न करत राहिलो.

गाईडची माहिती देणं सुरु होत. या गुहांचा शोध लागला तो अठराव्या शतकाच्या शेवटी शेवटी. पण या ठिकाणी पोहोचणं हे काही सोइची गोष्ट नव्हती.प्रथम तर ओढावी लागणारी गाडीच होती. नंतर मग डिझेलचं, विजेचं इंजिन असे टप्पे घेत ही आजची सुधारणा. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी या गुहांमध्ये स्फोटकांचा साठा ठेवला होता. तो जाळून नष्ट केला तेव्हा या निसर्गशिल्पांची खूप हानी झाली. इथे बांधलेल्या पुलाला रशियन पूल म्हणतात कारण तो रशियन युद्धकैद्यांच्या कडून बांधून घेतलेला आहे. या चुनखडीच्या डोंगरात सर्वत्र पांढरा रंग आहे पण मधूनच ती शिल्पं काळी दिसतात. हे माणसाचं कर्तृत्व! कितीही नको सांगितलं तरी त्या शिल्पांना हात लावण्याचा लोभ काही माणसं आवरू शकत नाहीत आणि त्या स्पर्शाने लगेच ते काळं पडतं. काही ठिकाणी लाल आणि ग्रे रंगही दिसतो तो त्या त्या ठिकाणी असणाऱ्या लोह किंवा मँगेनीज धातूच्या अस्तित्वामुळे.

गाईडची माहिती ऐकता ऐकता आम्ही पुढे सरकत होतो. एका ठिकाणी तिने निरोप घेतला आणि आम्हाला कुठे जमायचे आहे ते सांगून ती निघून गेली. या देशात इंग्रजीचा तसा संबंध नाही पण व्यवस्थितपणे ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचत होती. भाषेचं तिचं ज्ञान आणि हातात असलेला लाऊड स्पीकर दोन्ही उत्तम होते. विचारलेल्या शंकांना उत्तर मिळत होती. गाईड हे प्रशिक्षित माणसाचं काम आहे ही जाणीव आपल्याकडेही आली तर, हा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही.

उरलेला भाग रमत गमत फिरून आम्ही पुनः त्या स्थानकापाशी आलो. आता आम्हाला बाग बगीच्यामध्ये रस उरला नव्हता. हे असं आम्ही किती म्हटलं तरी आम्हाला बाहेर आल्यावर आठवण झाली इथला राजवाडा बघायचा राहिला आहे अजून! आभाळ भरून आलं होतं. आता घाई करण्याची आवश्यकता होती.


राजवाडा डोंगराच्या घळीत बांधला आहे. इतक्या दुर्गम भागातलं ते बांधकाम अचंबित करणारं आहे. आम्हाला अर्थातच आत जाण्यात रस आणि वेळ नव्हता आणि पावसाचा रंग बघून पुढचा टप्पा लवकर गाठण्याची उत्कंठा स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी पुनः कधीतरी या नेहेमीच्या आश्वासनावर पुढे निघालो



फोटोवरून कल्पना येणं कठीण असं जरी म्हटलं तरी ते द्यायचा लोभ आवरत नाही.






  


2 comments:

  1. Hard Rock Hotel Casino And Skypod - MapyRO
    Find your nearest Casino & Skypod in South Lake Tahoe. MapYRO users 고양 출장샵 can now 경기도 출장마사지 use your location 공주 출장안마 to browse and easily explore 경산 출장샵 the Casino & SkyPod, 동두천 출장마사지

    ReplyDelete