Saturday, 29 September 2018

SLOVENIA : PIRAN


पिरान


दुसऱ्या दिवसाची सकाळ. बाहेर बघतो तर समोरचं मैदान गायब! आकाशातले पांढरे ढग जमिनीवर अवतरले होते. काही म्हणजे काही दिसत नव्हतं. पुलंच्या अपूर्वाई मधल्या लंडनच्या धुक्याच्या वर्णनाची आठवण झाली. बाहेर तापमान होत ९ डिग्री. आज काय? हा आता प्रश्न होता. शहर तसं लहान आहे. आपण शेवटच्या दिवशी पुनः इथे येणार आहोतच त्यावेळी जर बघायला काही नसेल तर आणखी बोअर होईल त्यापेक्षा आज आपण पिरान नावाचा बीच आहे, आहे जरा लांब, पण बसने जाता येतं. तिथे दिवसही मजेत जाईल. श्रीशैलने असं म्हटल्यावर मग इथल्या किल्ल्याचा बेत रहित करून आम्ही पिरानला जाण्यासाठी निघायचं ठरवलं. आता टॅक्सीला फोन करू आणि निघू म्हणून फोन लावला तर अगम्य भाषेत सुरवात झाली. इंग्रजीतून बोलण्याची विनंती केली तर कालच्याप्रमाणे फोन कट केला. पुनः फोन लावला आणि तशीच सुरवात फक्त यावेळी कोणी बाई होती (कालचीच होती का? न कळे) आणि तिला इंग्रजी निदान कळत असावे. तिने पत्ता काय विचारलं. आता पुनः कालचाच प्रश्न. पत्ता हातात होता पण उच्चार? तिला स्पेलिंग सांगावं तर आपण a म्हणावं तर ती e समजणार आकड्यांचाही तोच घोळ. तिला मोबाईल नंबर विचारला. तिने सांगितला आणि इंग्रजीमध्ये कन्फर्म केला. दहा मिनिटात टॅक्सी दारात हजार झाली. त्याला पत्ता सांगताना आता प्रश्न नव्हता कारण स्टेशन आणि बस स्टॉप हे शब्द त्यानेही ऐकलेले असावेत!

बस अगदी वेळेत शिस्तशीर सुटली. रस्ता उत्तम, आजूबाजूला झाडांचं आच्छादन, दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर बर्फ होतं का? आम्ही आमच्यात वाद घालत असताना एक डोंगर अगदी जवळ आला तेव्हा जाणवलं हे चुनखडीचे डोंगर आहेत. जिथे खणला आहे तिथे ते पांढरे दिसतात आणि दुरून बर्फाचा आभास निर्माण करतात. एक मात्र, हा मागास (?) देश पण इथे त्या रस्त्याजवळच्या डोंगरांना जाळ्या बसवून वाहतूक सुरक्षित केली होती. ही लक्षणं मागासपणाची असतील तर आपल्याकडे नसलेल्या जाळ्या आणि देवाच्या भरवशावर टाकलेली माणसं या स्थितीला आपण कोणत्या श्रेणीत घालायचं?

पिरान येण्याआधीपासून दूरवर समुद्र दिसायला लागला होता. निळंशार पाणी हे आता अप्रूप न वाटण्याजोगी गोष्ट झाली होती का? सायकलवरून त्या डोंगराळ भागात हौशी पर्यटक दिसत होते. मधेच कुठे प्रोमेनेड आणि समुद्रस्नानाची सोय अशा जागा होत्या. पिरान आलं. अगदी अरुंद रस्त्यावरून एका अशक्य चिंचोळ्या गल्लीत यु टर्न घेऊन बस थांबली.

आम्ही सकाळी निघालो तेव्हा तापमान होतं ९ डिग्री. अर्थात अंगात स्वेटर होता. खाली उतरलो तर २३ डिग्री! कुठे लपवायचं याला? असं वैतागून म्हणत त्याला कमरेला गुंडाळलं आणि पुढे आलो.

एका बाजूला समुद्र दुसऱ्या बाजूला दूरवर एक किल्ला आणि उंचावर एक चर्च. आम्ही इथे दिवसाच्या ट्रीपला आलो आहोत याचं भान राखून आता ठरवायला हवं होतं. किल्ला तसा दूर आणि चढावर होता. समुद्र आम्हाला खुणावत होता आणि ते चर्च शहराच्या विहंगम दर्शनाकरिता उत्तम वाटत होतं. येताना आत्ता समुद्राचं दर्शन झालं होतं तरी एकतरी चक्कर म्हणून फिरून घेतलं. इथे पुळण नाही. त्यामुळे रस्ता आणि समुद्र यामध्ये त्यांनी चालण्याकरता रस्ता तयार केला आहे. काही जण समुद्र स्नानोत्तर उन्हात पहुडले होते. आम्ही बोटी वगैरे नेहेमीप्रमाणे बघून फोटो काढून चर्चच्या दिशेने निघालो. एक छान विस्तृत चौक लागला. तिथे सिटी सेन्टर असावं. निवांत बसायला आलेली लोकं, प्रवासी आणि पलीकडे असलेला इन्फर्मेशन किऑस्क यामुळे खूप लोकं दिसत होती.

अशा या माहोलमध्ये खरं आकर्षण असत ते लहान मुलांचं. छोटी, अगदी दोन तीन वर्षांची ही गोरी, ब्लॉन्ड मुलं, मुली इतकी उत्साही असतात की त्यांच्या निरीक्षणात आपल्यामध्ये उत्साहाची भरणी होते, थकवा निघून जातो. इथे मुलं चालायला लागली की छोटी सायकल आणून देतात. पॅडल नसलेली ती सायकल मुलं तोल सावरत दोन्ही पाय मारून चालवतात तेव्हा त्यांच्यावर नजर खिळली जाते. मग त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढायला त्यांचे आई बाबाच नव्हे तर आमच्यासारखे पर्यटकही मोबाईल/ कॅमेरा घेऊन सरसावतात.





आम्ही चौक ओलांडून पुढे निघालो. चर्च बघण्यात फारसा रस नव्हता. पण त्याची लोकेशन फार छान होती. इथून गाव नजरेच्या टप्प्यात होतं. छान दिसत होतं. मला तर आपल्या उत्तरेतल्या गाव/ शहरांची आठवण झाली. उतरत्या छपरांची, लालबुंद कौलं घातलेली ती एकाला एक खेटून असलेली घरं, एखाद्या घरावरची एकांतातली, आपल्याकडे बरसाती असावी तशी अरुंद- उभट खोली.








इथे वर असलेल्या या आवारात फोटो सेशन सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये रंगलेली होती. एका बाजूला एक जोडपं, तो, त्याच्या जरा रावडी वाटावा अशा कुत्र्यासोबत आणि ती, तिच्या उंदरासारखं तोंड असलेल्या अगदी किरट्या अशा दोन कुत्र्यांसह आपापल्या "बाळाचं" कौतुक करण्यात गुंग होते. तिला एकदम लहर आली आणि तिने तिचा फोटो काढायला नवऱ्याला फर्मावलं. तो बिचारा एका हाताने त्या रावडीला सांभाळण्याची कसरत करत तिचे फोटो काढू लागला.


आता दोन रस्ते होते. एक समुद्राची कड घेऊन डोंगराला पाठीशी घालत त्यामधून जाणारा अगदी अरुंद, चिंचोळा रस्ता, फारशी रहदारी नसलेला. आणि दुसरा आलो तो, परतीचा. आम्ही जरा पुढे जाऊन तरी बघू म्हणून निघालो. इथे निवांतपणा होता. पुळण इथेही नव्हती. होता तो खडकाळ समुद्रकिनारा. पण या निवांतपणाचा आस्वाद घेत काही कुटुंबं, जोडपी समुद्रस्नानाचा आनंद घेत होती. जाताना त्या अशा अरुंद रस्त्यावरूनही, उतार चढाची पर्वा न करता जाणारे बाईकस्वार म्हणजे सायकलवाले अचंबित करत होते. इथे त्या खडकांमधले दगड गोळा करून लगोऱ्या रचून ठेवलेल्या दिसत होत्या. खूप जणांना त्या रचतानाही आम्ही पाहिलं. त्याचं महत्व मात्र कळलं नाही. असेच पुढे जात किती पुढे आलो त्याचं भान आल्यावर आता जरा वर जाऊन दुसऱ्या मार्गाने परत फिरावं म्हणून निघालो खरे पण अगदी उभा चढ याशिवाय काही नव्हतं. कदाचित आम्ही या मार्गाने परत पोहोचलो असतो पण खूप दमछाक आणि लांबच्या रस्त्याने. आज आम्हाला परतीची बस पकडायची होती तेव्हा ते परवडलं नसतं. आलो त्या मार्गाने जाणं बरं म्हणून माघार घेतली.

   चर्चच्या टेरेस वरून दूरवर उंचावर दिसणारा किल्ला, समुद्राला लगटून डोंगराला फटकून       जाणारा चिंचोळा रस्ता 

बसला वेळ होता पण लोक थांबलेले दिसले. कदाचित गर्दीही होत असेल. नंतरच्या बसने परतायला उशीर आणि इथे आणखी थांबून साध्य काहीच होणार नाही म्हणून मग तिथेच थांबलो. एक बस लुब्लिआनाहून येऊन थांबली. सगळे त्या समोर रांगेत उभे राहिले. ड्रायव्हरने पाहिलं आणि दुर्लक्ष केलं. त्याचा डबा खाऊन झाला असावा. पुनः तो दरवाजापाशी आला. मागे गेला. आता सगळ्यांचा पेशन्स संपत आला होता. बस सुटायला तीन चार मिनिटांचा अवधी, बसवर पाटीही आहे मग हा वेळ का काढतो आहे ते कळेना. शेवटी एक मिनिट असताना त्या महाशयांनी दरवाजा उघडला आणि घोषणा केली ही बस नाही पलीकडची बस निघण्याच्या तयारीत आहे.

सगळे अवाक! पण भांडायला वेळ नव्हता. आम्ही त्या दुसऱ्या बसच्या दिशेने पळत गेलो. या ड्रायव्हरचा आता संताप झाला होता. त्याला उगीचच या उशिरा आलेल्या प्रवाशांमुळे उशीर होणार होता. त्याची अगम्य बडबड त्यात सुट्टे देणार नाही असा पुकारा इत्यादी सगळ्या गोंधळात बस निघाली. आपल्याकडेच असा गोंधळ असतो असं नाही तर हे लोकही असं वागू शकतात या समाधानात आम्ही लुब्लिआनला पोहोचलो.

आयत्या वेळी आपलेच आधीचे निर्णय कसे फिरवावे लागतात आणि सगळ्याच गोष्टींचं नियोजन कागदावर आखल्याप्रमाणे प्रत्यक्षात येणं शक्य नसतं याचे हे धडे होते. आजचा दिवस या लुब्लिआनामध्ये उगवला तो ९ डिग्री सेल्सिअस हवामान घेऊनआधीचा इथेच दिवस घालवायचा निर्णय बदलून गेलो पिरानला आम्ही निघताना मारे जॅकेट घालून पिरानला पोहोचलो तर तिथे २३ डिग्री! अंगात जॅकेट काय ठेवणार? त्याचं ओझं दिवसभर वागवावं लागलं. तरीही आजचा दिवस मात्र छान गेला होता आणि आता उद्याच्या दृष्टीने आपण तयारी करू या असं ठरवत आम्ही दिवसाचा निरोप घेतला. मनावर कोरलं गेलं ते सगळ्या बाजूने समुद्राने वेढलेलं, वेढलेलं?, खरं म्हणजे समुद्राच्या कुशीत पहुडलेलं टुमदार पिरान.




                            






No comments:

Post a Comment