Sunday, 9 September 2018

मनातलं





प्रत्येक वर्षी श्रीशैलकडे जाण्याचा नेम सुरु आहे. तसाच त्याविषयी आपल्या समाधानासाठी काहीतरी लिहून ठेवण्याचा नेमसुद्धा. पण मग असं काय झालं की २०१५ च्या स्कॉटलंडविषयी काहीच लिहिलं नाही? तेही एकवेळ मान्य कारण काही वैयक्तिक कारणं असू शकतात एखादेवेळी, नव्हे होतीच. पण त्यामुळे इतकी मरगळ? हा लिखाण दुष्काळ २०१७ मधे पण सुरु होता. म्हणजे याला इनर्शिया (जडत्व की बुद्धीमांद्य?) म्हणायचं का?

कारण परंपरा यात फार न शिरता यावेळी म्हणजे २०१८ च्या जुलैमध्ये परतल्यावर लिहायचं एवढाच निश्चय केला. पण मन स्वस्थ नव्हतं. त्याचीही कारणं अनेक. मुख्य म्हणजे यावर्षी स्प्रिंगमध्ये जर्मनीमधील बवारीया प्रांत, गेल्या वर्षी सप्टेंबरमधला स्लोवेनिया आणि त्याही आधी स्कॉटलंड-लंडन. मग आधी काय? की क्रमाने जायचं?

लिहिताना असं क्रम वगैरे ठरवून का लिहिलं जातं? जें मनाचा ठाव घेतं ते उफाळून येतं. मग त्याला थोपवणं कठीण काम. इथेही तेच झालं. स्लोवेनिया या देशानं मनात असं काही स्थान निर्माण केलं आहे की ज्याचं नाव ते! मागे माझ्या लिहिण्यावरून, किंबहुना न लिहिण्यावरून कोणीतरी म्हणालं होतं, त्यात वेगळं असं काय लिहायचं असतं? तीच झाडं तीच फुलं आणि तेच डोंगर! एका अर्थी ते सत्यच आहे. तरीही आपण ठिकठिकाणी जातो आणि प्रत्येक जागेचा वेगळा प्रत्यय घेतो. त्यावेळी हा विचारही मनात येत नाही की हिमालय काय आणि आल्प्स काय बर्फ तर बघायचा! कारण आपल्याला माहित असतं की या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.

डच डिझाईन वीकमधे व्हर्च्युअल रिआलिटी नावाचा एक प्रकार नेदरलँड्समधे बघितला होता. त्या त्या प्रदेशाप्रमाणे बदलणारं तापमान, वातावरण आणि समोरचा 3 D की 4 D स्क्रीन. म्हणजे बसल्या जागी अनुभूती मिळण्याची सोय. असं असलं तरी पर्यटन ते पर्यटनच. त्याचप्रमाणे या अनुभवांचं असतं. कदाचित लिहिणाऱ्याची शक्ती कमी पडत असेल पण निसर्ग जें अनुभव आपल्यापुढे ठेवतो ते ग्रहण करण्याचा आपला स्वभाव हवा. सुदैवाने आजवर मला प्रत्येक प्रवासाच्या वेळी त्यातला आनंद नव्याने घेण्यात अधिकाधिक सुख मिळत गेलं आहे. लिहिताना मी तेच सुख पुनः नव्याने अनुभवतो आहे. याच कारणाने मी कोणतेही नोटिंग वगैरे ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. सहज बोलता बोलता मी श्रीशैल किंवा उत्तरा कोणालातरी त्या दिवशी आपण बघ त्या हेअरपीन बेंड रस्त्यावरून जाताना..... अशी सुरवात केली की प्रत्येकाच्या स्मृती नव्याने चाळवल्या जातात, जागृत होऊ लागतात आणि अनेक गाळलेल्या जागाही आपोआप भरल्या जातात. ती मजा काही औरच असते. ट्रीपइतकीच या आठवणींची उजळणीही आनंददायी असते. ते सगळं शब्दबद्ध करण्यात मग मला आणखी आनंद मिळतो आणि तुम्ही त्यात सहभागी होऊन दिलेल्या प्रतिसादाने तो द्विगुणीत होतो.

यावेळी आणखी एक, आजवर नेदरलँड्सला जाऊन त्याविषयी फारसं न लिहिण्यात त्या देशावर तसा अन्याय केला आहे. तो काही अंशी तरी भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेही फक्त प्रवास वर्णन असं काही माझ्या मनात पूर्वीपासून नव्हतं हे आनंद अनुभव या नावातच स्पष्ट झाले आहे. आता ते अधिक प्रकर्षाने प्रत्यक्षात येऊ शकेल.

जाता जाता, आज मी पुनः मागे वळून पाहतो तेव्हा आजही तुरळक का होईना, पूर्वीचे लेख जगभरातल्या कोणीतरी वाचलेले दिसतात तेव्हा लिहिण्याची ऊर्मी दाटून येते. त्या भरात आता मी महिन्यातून तीन वेळा, प्रत्येक महिन्याच्या १०. २० व ३० तारखेला आपल्याला भेटणार आहे. आपला प्रतिसाद येण्याची नेहेमीप्रमाणे वाट बघत असणार आहे.




No comments:

Post a Comment