Sunday, 9 September 2018

SLOVENIA I

तुमचं यावेळी कुठे जायचं हे ठरलं नसेल तर आपण स्लोवेनियाला जाऊ या. श्रीशैलने थेट हल्ला केला होता. आजवर आईला कुठे जावं असं वाटतं वगैरे विचारणारा हा, असा थेट सगळं ठरवून का सांगत आहे? पण खरंतर आमच्या डोक्यात या अशा आड सिझनला म्हणजे पुनः गेल्या वेळेप्रमाणे सप्टेंबर महिन्यात, न जाता स्प्रिंग किंवा समर मध्ये जावं असं  होतं, त्यामुळे बेसावध पकडल्यासारखं झालं होतं. विचार करू म्हटलं तर कसला हा प्रश्न! अशावेळी सन्मान्य हो म्हणणं हा राजमान्य मार्ग आम्ही पत्करला.

स्लोव्हेनिया म्हणजे स्लोव्हाकिया ना? झेकोस्लोवाकियाचा भाग, असं मी थोडं माझं knowledge पाजळण्याचा प्रयत्न केला, तोही व्यर्थ गेला. एक कटाक्ष टाकून काय मूर्ख आहे,( हे माझ्या मनातलं, कारण हे फोनवरचं बोलणं, व्हिडीओ कॉल थोडाच होता!) त्याने सांगितलं, पूर्वीचा युगोस्लाव्हिया. सुंदर देश आहे. अजून फार टूरिस्टीक झाला नाही. लेक ब्लेड वगळता अंतर्भागात कोणी फारसे जात नाहीत, त्यामुळे आताच जाण्यात मजा आहे. तुम्हाला आवडेल.

चला म्हणजे आमची आवडही यानेच ठरवलेली दिसते असं म्हणत आम्ही तिकडे कुठे जाणार आहोत ती नावं सांग असं त्याला सांगितलं. कारण खरोखरच लेक ब्लेड म्हणजे स्लोव्हेनिया अशी आम्हीही वर्तमानपत्रातल्या यात्रा कंपनीच्या जाहिरातीतल्या माहिती (?) वरून कल्पना केली होती. त्याने दोन तीन नावं पाठवलीLjubljana Soca आणि Logar valley आमची उच्चारापासून बोंब. पुनः त्यालाच विचारणं आलं( त्या आधी इथे एक गंमत सांगितलीच पाहिजे. आम्ही नंतर रेंट केलेल्या गाडीतल्या जीपीएस काकुंचाही बहुधा आमच्यासारखा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांना कोणी श्रीशैल भेटला नव्हता त्यामुळे प्रत्येकवेळी अवघडून त्या लुजबुजीयाना असा काहीतरी विचित्र उच्चार करत होत्या.)  पहिलं लुब्लिआना, ती त्यांची राजधानी आणि नंतरच्या सोका आणि लोगार या दोन्ही valley. आपण अगदी दऱ्याखोऱ्यात राहणार आहोत त्यामुळे भरपूर चालणं होईल आणि तुम्ही रमालही तिथे चांगले.

हा त्याचा अंदाज मात्र शंभर टक्के खरा होता. निसर्गाच्या सान्निध्यात खूप चालणं असेल तर आम्ही खुश होतो हा आजपर्यंतचा अनुभव. इथेही तसाच अनुभव यावा ही इच्छा.

ऍमस्टरडॅम ते लुब्लिआना हे १ तास ४० मिनिटांचं फ्लाईट. अर्थात ते होतं सकाळी साडेसहा वाजता. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीची शेवटची ट्रेन पकडून स्किपोल विमानतळ गाठला. हो, इथे ट्रेन्स रात्रभर सुरु नसतात. त्यांची सकाळही आपल्याप्रमाणे चार वगैरे वाजता होत नाही! रात्र कशी जाणार किंवा विमानतळावर वेळ कसा जाईल हा प्रश्न आम्हाला कधीच पडत नाही. येणारी जाणारी माणसं , त्यांचे विभ्रम, भाषेच्या छटा, लहान मुलं तर आपलं भान हरवून टाकतात. या सगळ्यात झोपेची आठवणही होत नाही.

साडेसहाचं विमान म्हणजे अर्धा तास तरी आधी विमानात जायचं, म्हणजे साधारण साडेचार पाचच्या सुमाराला सिक्युरिटी चेक. तो होऊन आत गेलो. आज आकाश निरभ्र होतं. आकाशातून इथले, नेदरलँड्समधले रस्ते, पाण्यातून जाणाऱ्या बोटी हे सगळं आणि शिवाय शेतं आणि कुरणं बघायला मजा येते. आणि जर तो एप्रिल मे चा हंगाम असेल तर ट्युलिप्सचा नजारा खूपच देखणा दिसतो. आता सप्टेंबरमधे ही अशी शेतं बघण्याची काही मजा नाही. पण वरून ते ग्रीन हाऊसच्या पांढऱ्या प्लास्टिक आवरणातून पिवळा प्रकाश फेकणारे दिवे मात्र लक्ष वेधून घेणारे असतात. असाच बाहेर बघत असताना कधी नभ मेघांनी आक्रमिले ते कळलं नाही.

समोर दिसणारा ढगांचा पांढरा रंग किती भेसूर दिसतो. आपलं विमान तो भेदून पुनः जमिनीपर्यंत कसं पोहोचेल याची एक सततची हुरहूर मनाला लागून राहते.

फ्लाईट एक तास चाळीस मिनिटांचं म्हणजे आता जवळ आलं लुब्लिआना असं म्हणत आहे तोपर्यंत घोषणा झाली दहा मिनिटात आपण आल्प्स पार करू. घोषणा ठीक पण बाहेरच्या ढगांचं काय करायचं? त्यांचे तर थरांवर थर दिसत होते. पण आमचं नशीब जोरावर असावं. काहीतरी बर्फासारखं लांबवर दिसलं. भास असेल म्हणून सोडून दिलं तर सगळीकडेच त्या ढगांवर डोकं काढून आल्प्स आमच्याकडे पाहत होता. जवळ गेल्यावर मग फार ताणून न धरता त्याने आपलं सारं वैभव आमच्यापुढे खुलं केलं. आल्प्स तसा याआधी ऑस्ट्रिया स्वित्झर्लण्ड या ठिकाणी भेटला होता. पण आपल्याला नेहेमी भेटणारा आवडता मित्र पुनः पुन्हा भेटला तर होणारा आनंद द्विगुणितच होतो. आल्प्सचं हे विहंगम दर्शन अधिक मोहक होतं.

विमान उतरलं आणि टॅक्सी करत वळण घेऊन पुढे आलं तर समोर विमानतळाच्या इमारतीच्या दिशेने आणखी बर्फाच्छादित शिखरं ! म्हणजे इथेही आपल्याला बर्फाळलेले डोंगर बघायला मिळणार तर. हो, इथेही हा आहे आल्प्सच पण हा ज्युलिअन आल्प्स. मोठ्या आल्प्सचा धाकटा भाऊ. छोटा आहे ना !

हा विमानतळ राजधानीचा खरा पण हा नवस्वतंत्र, छोटासा देश. इथे आंतरराष्ट्रीय फ्लाईटस कितीशी असतील? कदाचित म्हणूनही अजून हा तसाच छोटा राहिला असेल ! बाहेर आलो आणि आपल्या गोवा किंवा औरंगाबादच्या विमानतळाची आठवण झाली

                                                                                                   (पुढील मजकूर 20 सप्टेंबर)       टीप :फोटो नक्कीच देणार आहे. मला याची जाणीव निश्चित आहे की निसर्गाचं वर्णन करायला शब्द तोकडे पडतात. त्यांना फोटोची साथ मिळाली तर शब्दांना उठाव मिळतो. हे जरी खरं असलं तरी इथे दिले जाणारे फोटो हे पूरक असायला हवे असं माझं पहिल्यापासून ठरलं आहे, धोरण म्हणू या हवं तर. त्यामुळे इथे फोटो अप्रस्तुत ठरले असते. पुढील भागापासून त्याशिवाय पर्याय कुठे आहे? )

#SLOVENIA


No comments:

Post a Comment