Monday, 26 August 2013

Austria Patsch (Innsbruck) Iझरव्हिलग्रॅटनचं स्वप्न संपून आम्ही सिलियनला सत्यात आलो. आमच्या यजमानांनी टॅक्सीने सिलियनला सोडून आम्हाला उपकृत केले आणि ते निघून गेले, बदल्यात आणखी आठवणी देऊन. आमचं सामान उतरताच पुनः येण्याचं आमंत्रण देण्यास ते विसरले नाहीत. कामामुळे स्टेशनवर गाडीच्या वेळेच्या खूप आधी आणून सोडावं लागल्याबद्दल त्यांनी पुनः एकवार सॉरी म्हटलं. आम्हालाच कानकोंडं झालं. झटक्यात निरोप घेऊन पाठ फिरवून गाडीत बसून ते निघूनही गेले. त्यांना भाड्यापोटी किती पैसे देऊ एव्हढं विचारण्याचीसुद्धा पचारिकता दाखवणं हा त्यांच्या आतिथ्यशीलतेचा अपमान झाला असता जणु काही. एकापरीने आम्हालाही बरं वाटलं. त्यांनी आतापर्यंत अगदी घरच्या माणसासारखंच तर आम्हाला वागवलं होतं. मन भरून आल्यासारखं झालं. आजही समोरच्या आकाशात ते ग्लायडर्स दिसत होते पण एकतर त्यात आता नाविन्य राहिलं नव्हतं आणि आता खरतर पुढे इन्सब्रुकला परत जाण्याचे वेध लागले होते. यावेळी शहरात न रहाता आम्ही ज्या इग्लस गावाच्या प्रेमात पडलो होतो त्यापासून पुढे जवळच अपार्टमेंट घेतले होते, तिथे रहाणार होतो. प्रत्येक वेळी नवीन अनुभव हे सूत्र असले प्रवासाचे की प्रवासही चैतन्यमय होतो.

इटलीच्या मरीन्सच्या(*) प्रश्नामुळे यावेळी आम्ही इटलीवजी ऑस्ट्रियाला आलो. पण इटलीला ते मान्य नसावे. सिलियनला आम्ही खूप लवकर स्टेशनवर आलो होतो. गाडी साडेबाराची. त्या गाडीपर्यंत मग थांबायचे तरी कशाकरता असा विचार केला. आधी ठरवल्याप्रमाणे वेळ काढण्यासाठी तिथल्या सिटी सेंटरमध्ये जायचं नाही हे ठरवलं. श्रीशैल गाडीची चौकशी करायला काऊंटरवर गेला इथे एक बरं असतं त्यांना म्हणजे काऊंटरवरच्या माणसांना सविस्तर बोलायला वेळ आणि इच्छा दोन्ही असतं. साडेबाराच्या आधी ११.१० वाजताच्या गाडीने जर तुम्ही गेलात तर इटलीतील सॅन कॅन्डिडो/ इन्निशेन तिथून फोर्तेझा/ फ्रान्झेनफेस्ट आणि मग युरोसिटी पकडून व्हेनिसहून म्युनिचला जाणा-या गाडीने इन्सब्रुकला जाता येइल. सविस्तर समजावून सांगतानाचे शब्द मी नोट केले. संभाषण संपवून श्रीशैल परतल्यानंतर तो म्हणाला कितीही टाळलं जरी तरी आपण इटलीत जाऊनच पुढे जाणार आहोत. म्हणजे तुमचे पाय इटलीला लागणार आहेत कारण ऑस्ट्रियाची बॉर्डर क्रॉस करून, इटलीत जाऊन मग आपल्याला DB OEEB Euro City मिळणार आहे. अगाध आहे! आम्ही या योगायोगाने आश्चर्यचकीत झालो. आपल्याकडे कोकणातून कोल्हापूरला जाताना कर्नाटकात शिरून जावं लागतं त्याचीही आठवण झाली.

सिलियनची गाडी छोटी, दोन डब्यांचीच. रुळावरच उभे आहोत असा तो प्लॅटफॉर्म. गाडीने सिलियन सोडलं तेव्हा "पुनरागमनाय च" असं म्हटलं असेल का? किती शक्य ते माहीत नाही पण इच्छा मात्र जरूर आहे. सॅन कॅन्डिडो आलं. या दोन दोन नाव असणा-या स्टेशनांची मला गम्मत वाटते. कोणतं नाव प्रचारात असेल? अर्थात ही दोन वेगळ्या भाषेतली दोन वेगळी नावं आहेत हे नंतर कळलं. तर इटलीमधल्या सॅन कॅन्डिडोला आलो आणि तिथून पुढे फोर्तेझाला जाणारी ट्रेन घेतली. गर्दी होती पण जागा न मिळण्याचा प्रश्न नव्हता. आम्ही २० मिनिटांच्या प्रवासानंतर इटलीमधील फोर्तेझाला पोहोचलो. फोर्ट म्हणजे किल्ला, तटबंदी या अर्थाने गावाला दिलेले हे नाव. ऑस्ट्रियन राजानेच अठराव्या शतकात हे भक्कम तटबंदीचं काम केलं होतं. प्लॅटफॉर्म पूर्ण ओलांडला कारण दुस-या बाजूला डॉइश भान (Deutsch Bahn) असण्याची शक्यता होती. समोर एक रेल्वे कर्मचारी आल्यावर त्याच्याशी इंग्रजीतून संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्याने आम्हाला "बाहेरचा दरवाजा दाखवला." त्याचा बहुधा आम्ही तिकिट खिडकी शोधत आहोत असा समज झाला असावा, त्याने दिशा दाखवली ती एक्झिटची होती, इतकच. भन्नाट वारा आणि पाऊस यांच्या मा-यात प्लॅटफॉर्मवर उघड्यावर शेड नसताना सामानासकट उभं रहायची माझी अजिबात इच्छा नव्हती. आम्ही सामान उचलून एक्झिटच्या दिशेने गेलो. तिथे बंद वातावरणात खूप लोकं गाडीची वाट बघत बसली होती. म्हणजे निदान गाडी या प्लॅटफॉर्मवरच येत असावी. आत आल्यानंतर कुडकुडणे थोडेसे कमी झाल्यासारखे वाटले. इटलीत होतो तरी गाडी डॉइश भान होती त्यामुळे ती वेळेत असण्याला पर्याय नव्हता.(#) इटली मागे पडून ऑस्ट्रियात कधी शिरलो ते कळलंही नाही. तशाही या सीमारेषा माणसाने निर्माण केलेल्या. युरोपातील देशांनी निदान त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न तरी केला आहे. आपले काय़? असा विचार मनात अस्वस्थपणाच फक्त घेऊन येतो.

इन्सब्रुक दुपारी अडीचच्या सुमारास आले. भूक तर खूप लागली होती. वाटेतल्या खाण्यावर भागवणे जमलेच नसते. श्रीशैलच्या डोक्यात एकदा लवकर मुक्कामाला पोहोचू नंतर बघू असं होतं पण पावसाचा जोर होता. जाणार त्या ठिकाणी काय आणि कसं असेल कोणी सांगावं? असा विचार करून आम्ही काहीतरी खाऊन घ्यावं म्हणून स्टेशनच्या समोरील फुटपाथकरता क्रॉस केला. छत्री काढू या, नको असं म्हणत असताना भिजणा-या कपड्यांपेक्षा भिजलेली छत्री सांभाळणं परवडेल म्हणून छत्र्या उघडल्या. इथे बघावं त्या हॉटेलवर केबाप (Kebap= कबाब) असं लिहिलेलं होतं त्यावरून ते कोणाचं असावं ते ध्वनित होत होतं म्हणून श्रीशैल ती हॉटेल्स टाळत होता. (धर्माकरता वगैरे नाही पण शाकाहाराची शक्यता कमी म्हणून) पण दुसरा पर्याय नाही म्हटल्यावर एका अशाच इटरीमध्ये गेलो. कबाब वगैरे असतील पण फक्त तेवढेच नव्हते. सॅन्डविचेस मिळाली. ती खात बसलो होतो तर दहा पंधरा विद्यार्थ्यांचं एक टोळकं आलं. हिंदीमधे गप्पा चालल्या होत्या. अशा परक्या ठिकाणी आपली (?) भाषा कायला बरं वाटतं खरं. आमच्याकडे बघून प्रत्येकजण हॅलो किंवा मान हलवून अथवा नुसते हसून पुढे गेले.

गेल्या वेळेप्रमाणे डे तिकिट काढू असं श्रीशैल म्हणाला खरा पण ते फुकटच गेले कारण एकतर ते विमानतळाकडे जाणा-या बसमध्ये दुस-या दिवशी चालणार नव्हते आणि आम्ही आज जिथे जाणार होतो ते पात्श (patsch) त्यांच्या सिटी बस कक्षेत येत नव्हते. थोडसं विषयांतर. पात्श या जर्मन शब्दाचा अर्थ प्रहार असा आहे. आमच्या बाबतीत तो अक्षरशः खरा ठरला! वेगळे तिकिट काढून आम्ही बसमध्ये बसलो. बसचा प्रवास छान होता. इन्सब्रुक शहर तसे ओळखीचे. जुन्या शहरातून (Old Town) जाताना आपण इथे आलो होतो, हे आपण बघितले होते वगैरे सगळं बोलून होत होते. नंतर शहराबाहेर पडून बसने डोंगर चढायला सुरवात केली. हळू हळू शहराच्या खुणा मागे पडत होत्या. खाली दूरवर शहरातील रस्ते, इमारती लहान होत गेल्या. डोंगर चढायला सुरवात केल्यावर आतापर्यंत साधारण वाटणारा पाऊस रौद्र रूप धारण करू लागला. एक एक करत प्रवासी उतरून गेले आणि आम्ही तिघच बसमध्ये उरलो. आपलं ठिकाण येणार कधी याची आता मात्र थोडीशी काळजी वाटू लागली होती.

                                                                                                                                                                                                                                                                     (उर्वरीत भाग पुढील लेखात)                           


*         फेब्रुवारी २०१२ मधे  इटलीच्या दोन मरीन्सना केरळच्या किना-यावर दोन कोळ्यांना ठार        मारल्य़ाप्रकरणी इट्लीच्या सरकारने घेतलेल्या वादग्रस्त भूमिकेची पार्श्वभूमी आहे.

#            इटली हे शिस्त आणि वक्तशीरपणा याबाबतीत आपल्यासारखे (पण आपल्यापेक्षा बरे) असे राष्ट्र. जर्मनी मात्र याच्या बरोबर उलट. हे उल्लेख युरोपात कित्येकवेळा येतात.

Monday, 19 August 2013

Austria Zel Am See II

दुसरा दिवस उजाडला तो ढगांचं आवरण घेऊनच. मनात पाल चुकचुकली. फुकट तर नाही ना जाणार दिवस पावसामुळे? इथे घरात बसून रहायचं म्हणजे शिक्षाच होती. बाल्कनीत बसून छान चहा घेतला. कुडकुडत होतो पण आत बसवेना. थोड्या वेळाने होत्याचं नव्हतं झालं. स्वच्छ सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश आणि समोर हिमचादर ओढलेला तो आल्प्स. कदाचित आम्हाला तो नव्याने पडलेला बर्फ दाखवण्यासाठी हा खेळ असावा. आल्हाददायक वातावरणात (=कुडकुडत) आम्ही आमचा मोर्चा वळवला शिखराच्या दिशेने. वाटेत एक रोप वे स्टेशन होतं. दरवाजा उघडा दिसला आम्ही शिरलो आत. अगदी आत गेल्यावर एक माणूस होता त्याच्याकडे चौकशी केली पण रोपवे मेन्टेनन्स सुरू होता. सुरवात जूनच्या १५ तारखेपासून होणार होती. या रोप वे. त्यांचा स्कीइंगचा सीझन असतो. दूर शिखराजवळ घसरगुंडीसारखे माळ असतात. एरवी, म्हणजे बर्फ नसते तेव्हा तिथे छान हिरवळ दिसते, ते स्कीइंग ग्राऊंड. या रोप वेमधे बसून किंवा कधी कधी रोप चेअर्स असतात म्हणजे बंदिस्त नाहीत त्याऐवजी फक्त खुर्चीत बसायचं, अर्थात पट्टे बांधलेले पण आपल्याला चहूकडे अगदी खालीसुद्धा बघता येतं अशी मोकळी खुर्ची. तर अशा या वाहनातून वर डोंगरावर पोहोचायचं. उतरल्या क्षणी स्कीइंगला सुरवात करायची. एवढा उतार असतो की त्यावर क्षणाची उसंत न मिळता घसरत खाली यायचं या कल्पनेनेच हबकून जायला होतं. याचेही कठीण, खडतर, सोपे असे प्रकार असतात, त्याचं ट्रेनिंगही इथे मिळतं. इन्सब्रुक आणि आसपासच्या या सगळ्या भागात हिवाळ्यात स्कीइंगचा मोठा सीझन असतो, इतका की इथे हॉटेल्स, अपार्टमेंटसमध्ये जागा मिळणं मुश्किल होतं.


तर हे सगळं कून होतो आता त्या ठिकाणी पायी चढून जायचं होतं. इथेही wandering paths आणि त्यांच्या ग्रेडस आहेतच. जागोजागी बोर्ड्स आहेत. आम्ही असाच एक रस्ता निवडला. वाटेत खूप ठिकाणी गोठलेला बर्फ होता, उ्न्हाने वितळणारा. त्याच्यावर चढण्याचा अयशस्वी प्रयत्न करून थोडसं घसरून घेतलं फोटो काढले आणि निघालो. तसा आज दिवस हातात होता पण पुनः इथेही पावसाची शक्यता गृहित धरावी लागते. निम्म्याहून अधिक उंचीवर आम्ही पोहोचलो होतो. प्रत्येक वेळी शेजारचं शिखर आपल्या एवढ्या उंचीवर तर आहे म्हणजे माथ्यावर आलोच असं वाटत राही. दाट झाडीमधून दिसणारं आकाश बघितलं की आपल्या मनाचा कौल बरोबर आहे असही वाटे आणि आता पुढची १५ मिनिटे नाहीतर परत असं म्हणत म्हणत आम्ही खूप दूरवर आलो पण माथा काही दिसे ना. बर्फाच्छादित शिखरे जी दूरवरून दिसतात ती तशीच असतील की तिथेही साठलेल्या बर्फाचे असेच आपण इथे बघत आहोत तसेच साठे असतील? आणि जे आपण इथे बघत आहोत तेच तिथे बघायचे तर उरलेले कष्ट सार्थकी लागतील का? श्रीशैलच्या मनाविरुद्ध त्याला परतीच्या प्रवासासाठी राजी केलं. वाटेत मघाशी एक ओढा ओलांडला होता. बर्फाचंच पाणी ते. बूट काढून त्यात पाय टाकताना संवेदना बधिर झाल्या होत्या. आता पाणी आणि जोर वाढलासा वाटला. वर माथ्यावर पाऊस झाला आणि पूर आला तर? कल्पनासुद्धा ग्रेट आणि घाबरवणारी होती. पुनः बूट काढून पाय पाण्यात टाकताना ब्रम्हाण्ड आठवलं पण पर्याय नव्हता.

पलीकडे आलो आणि तिघेही निवांत बसलो. कान्हाच्या जंगलातला तो आदिवासी गाईड सांगत होता ते आठवलं. कोणतंही जंगल कधीही शांत नसतं. प्रत्येकाला त्याचा त्याचा एक आवाज असतो. असा हा आवाज ऎकत आम्ही कापलेल्या झाडाच्या बुंध्यावर टेकलो. इथून पुढे आम्ही टप्प्यात होतो. बसून वरच्या झाडीचा अनुभव आठवणं झालं. या ठिकाणी फोटो काढले तरी त्याची खोली त्या फोटोत उतरत नाही आपण किती उंचीवर पोहोचलो ते आपल्या डोळ्यात साठवणं हा एकच पर्याय. याविषयी सगळ्यांचं एकमत झालं. वरती बघितलेल्या त्या रोप वे स्टेशनच्या बाहेरचा उतार बघून स्कीइंगचा थरार काय असेल याची कल्पना आली. नदीच्या किंवा समुद्राच्या सोडाच पण स्वीमिंग पूलच्या पाण्यात काठावरून फेकून दिल्यावर कसं वाटते असेल? तोच अनुभव की! किती जण धडपडत असतील किती जणांना लागत असेल आणि किती जखमी होत असतील या कल्पनेनेच हबकायला झालं. नंतर श्रीशैलचा ऑस्ट्रियन मित्र क्रिस घरी आला होता तेव्हा त्याने Air ambulance ने किती तरी वेळा जखमींना हलवावे लागते त्याच्या कथा सांगितल्या होत्या! ढग गोळा होत होते. या थंडीत पावसाचा मारा सहन करणं कठीण आणि ओले कपडे वाळणं त्याहून मुश्कील म्हणून सरळ आम्ही आमच्या "घरी" येऊन पोहोचलो. घरी उबदार तर असणारच होतं शिवाय चहाची लज्जत अनुभवण्याचं स्वर्गसुख होतं. तेही कष्टाविना फक्त गरम पाण्याच्या उपलब्धतेतून!


पावसाने हुलकावणीच दिली. अर्थात खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. संध्याकाळी पुनः बाहेर पडून सी, हो त्या तलावावर फिरायला. थंडीत, हा यांचा वसंत ऋतु असून, पाण्यात उतरण्याचं साहस करणं शक्य नव्हतं आणि आपल्याप्रमाणे मनात आलं आणि पाय बुडवून बसलं अशी कुठे शक्यताही नव्हती. तिथे पोहोण्याची वेगळी व्यवस्था होती, अर्थातच पैसे मोजून आणि ती १५ जून नंतरच उघडणार होती.

सिटी सेंटरमध्ये मनसोक्त फिरलो. अन्तोनस इंडियन हॉटेल असं एका ठिकाणी दिसलं त्याबरोबरीने इटालिअन वगैरे नावं होती, म्हटल कदाचित आपला गोव्याकडचा असेल.
पण दुस-या पाटीवर केबाप होतं म्हणजे नेहेमीप्रमाणे भूल होती. उगीचच इंडिश-चायनीश असं लिहून आकर्षित करायचं दुसरं काय. तिथल्या फार्मसीमध्ये गेलो. प्रवासात बसून मांडीवर रॅशेस आले होते. कदाचित फूड अ‍ॅलर्जीही असण्याची शक्यता होती. आम्ही क्रीम्सची वर्णनं वाचत होतो इतक्यात एक पोरगेलसा तरूण मुलगा पुढे आला May I help you म्हणत. त्याने आधी रंग कसा आहे, ओले की कोरडे वगैरे प्रश्न विचारले आणि मग दोन क्रीम्स दिली.एक जर काही इन्फेक्शन असेल तर दुसरं अ‍ॅन्टी इन्फ्लमेटरी.बोलता बोलता त्याचं लक्ष गेलं हाताच्या फुटलेल्यास्कीनवर त्याच्याकरता काही देऊ का म्हणून त्याने विचारलं. त्याच्या निरीक्षण आणि विक्री कौशल्याचं कॊतुक वाटलं. अर्थात अंग फुटण्यावर काही नको होतं. त्याला तसं म्हटलं आणि विचारलं इतकं चांगलं इंग्रजी कसं येत बाबा तुला. तर तो म्हणला मी Nano Technology मध्ये MS करून आता व्हेकेशनमध्ये फार्मसीमध्ये काम करतो आहे. इन्सब्रुकला शिक्षण झालं त्य़ामुळे इंग्रजी चांगलं आहे. भारताविषयीच्या त्याच्या चौकशा संपल्यावर आम्ही तिथून बाहेर पडलो. स्पार आणि बिल्ला या दोन्ही दुकानातून आवश्यक वस्तू घेऊन एका हॉटेलमध्ये भरपेट खाऊन घरी परतलो. उद्या इथून निघून आल्प्सच्या कुशीत (म्हणजे आतापर्यंत कुठे आहोत?) जायच होतं.

Monday, 12 August 2013

Austria Zel Am See I


इन्स्ब्रुकहून निघून आम्हाला पोहोचायचे होते झेल आम सी (Zel Am See) या गावी. इन्सब्रुक हे मोठे शहर. सर्व सुखसुविधांनी युक्त असे. आताचे हे अगदीच छोटे गाव असणार होते. आमचा प्रवास साधारण २-३ तीन तासांचा. गाडीचा वेग अर्थातच चांगला होता. इन्सब्रुकहून OEBB या ऑस्ट्रियन रेल्वेने झेल आम सीला जाता येते. प्रथम युरो स्टारने व्योरगल Wörgal स्टेशन आणि तिथून झेल आम सी. व्योरगलपर्यंत त्यांची स्पीड ट्रेन होती. त्यानंतर आपली लोकल, पासिंजर जी म्हणाल ती, वजा आपला स्पीड आणि गैरव्यवस्था. दोन किंवा तीन डब्यांची ही गाडी, त्यात स्क्रीन आणि घोषणा दोन्ही असतात. गाडीचा वेग स्क्रीनवर कळतो, बाहेरचे तापमान कळते. यात स्वच्छतागृह असते, ते स्वच्छ असते, त्यात पाणी (गरम आणि गार दोन्ही) आणि टॉयलेट रोल असतो. या सा-याची जो कोणी व्यवस्था ठेवत असेल त्याला मानलं पाहिजे कारण आम्हाला एकूण प्रवासात एकदाही रोल नाही किंवा पाणी नाही असं आढळलं नाही. तर गाडी व्योरगलला आल्यावर बदलली आणि लगेच लक्षात आलं आता काहीतरी वेगळं दिसणार आहे. नेहेमीच्या मार्गापासून फटकून जाणारा असा मार्ग, एकच लाइन, कारण वाटच तशी अगदी अरूंद, रानावनातून जाणारी. एका बाजूला दरी तरी किंवा डोंगराची भिंत तरी. नदीची सोबत होती. दूरवर वेडा वाकडा रस्ताही लपंडाव खेळत जंगलात नाहीसा होत मधेच सामोरा येत होता. नजर खिळवून ठेवणारा हा प्रवास आणि तेव्हढ्यात दूरवर आल्प्सची बर्फाच्छादित शिखरं दिसली आणि अंगावर काटा उभा राहिला. अभिजात सौंदर्य म्हणतात ते असे अचानक सामोरे आले.

एक विस्तीर्ण तलाव डावीकडे दिसू लागल्यावर श्रीशैल म्हणाला चला, आलं स्टेशन आणि लगेच अनाउन्समेंटही झाली. See हा तलाव या अर्थीच वापरलेला जर्मन शब्द. हा अल्पाइन तलाव. अल्पाइन म्हणजे आल्प्समधल्या पाण्यापासून तयार झालेला. स्टेशन अगदी छोटसच. स्टेशन लहानस म्हटलं तरी लिफ्टसह सगळ्या सुविधा होत्या. जिन्याच्या ठिकाणी सायकलकरता उतारही होता. रेल्वेस्टेशनला लागून एका बाजूला तो विस्तीर्ण असा जलाशय आणि उजव्या बाजूला टाऊन. टाऊन कसलं आपली खेडी तरी लोकसंख्येने याच्यापेक्षा जास्त असतील. पण इन्सब्रुकनंतर इथे आल्यावर शहर आणि गाव किंवा फारतर तालुक्याचं ठिकाण असावं असं गाव यातला फरक कळत होता. बाहेर बसेस उभ्या होत्या. तिथे चौकशी केली पण कोणाला तसं नीटपणे सांगता येईना. मग नेहेमीचा पर्याय शोधला. शोधायची गरज अर्थातच नसते कारण स्टेशनातून बाहेर पडताच तो दिसतो. i हे information चे चिन्ह ठळकपणे दिसते. सिटी सेंटर जवळच होते आणि तिथेच हे इन्फर्मेशन सेंटरही. ऑफिसमधे आमच्या आधी आलेली माणसे काउंटरवर दिसत होती, त्यांचं झाल्यावर जाऊ म्हणून आम्ही मागे उभे राहिलो तोवर एक बाई पुढे आली आणि तिने विचारायला सुरवात केली. पत्ता बघितल्यावर नकाशा समोर ठेवला आणि त्या घराची, आम्ही जे अपाटमेंट बुक केले होते, त्याची दिशा, अंतर दाखवले. एकूण २०-२५ मिनिटाची चाल असेल आणि बसने गेलात तर पुढच्या चौकात पोस्टाजवळ बस मिळेल पण अर्ध्या तासाची फ़्रिक्वन्सी आहे त्यामुळे वाट बघण्यापेक्षा चालत जाणं श्रेयस्कर हे ही तिने सांगितलं.

आम्ही त्या पोस्टाच्या चौकात आलो आणि बसचा विचार सोडून चालायला लागलो. शांत पहुडलेला रस्ता, दोन्ही बाजूने घरं पण तशी फारशी जाग नसलेली, तुरळक अंगणात काम करणारी मंडळी. एका ठिकाणी घर उतरवायचं, हो, पाडायचं काम चालू होतं. असं सारं बघत रमत गमत निघालो. समोर आल्प्सची शिखरं अगदी हाकेच्या अंतरावर होती. सामान टाकू काहीतरी खाऊन घेऊ आणि लगेच डोंगरावर जाऊ हा विचार प्रत्येकाच्या मनात आला. त्याला छेद अर्थातच स्टेशनला उतरल्यावर दिसलेला "सी" होता. ठीक आहे नंतर ठरवू म्हणून निघालो. २०-२५ मिनिटे म्हणताना सामान जवळ आहे त्याचा विचार केला नव्हता. शिवाय या डोंगरी लोकांची २० मिनिटे, आपली किती हा ही मनात न आलेला विचार. रस्ता सरळ म्हटला तरी चढ होताच. सावकाश, न दमता जायचं ठरवून पुढे गेल्यानंतर ओळखीच्या खुणा दिसू लागल्या. त्यांनी सांगितलेल्या खुणेपर्यंत आलो. मुख्य़ रस्त्याची साथ सोडून एक रस्ता आणखी चढ घेऊन वर जात होता. कच्चा रस्ता. दुतर्फा असलेली सुंदर छोटी घरं, त्याभोवतालची बाग असं निरखून बघत असता एक दुमजली काळ्या रंगाचं घर दिसलं, Haus Opitz. घरामागे फक्त डोंगर आणि घनदाट जंगल. या घरापुढे एक घर सोडून बाकी काही दिसत नव्हतं. पुढे डोंगराची आणखी चढण फक्त! घराला दोन नाही तीन मजले होते.

बेल वाजावली पण उत्तर नाही. प्रश्नार्थक नजरेने आम्ही श्रीशैलकडे बघत होतो. तो नेहेमीप्रमाणेच कूल होता. त्याने शांतपणे फोन लावला आणि पलीकडून त्याला सांगितलं गेलं, तिथेच बसा आम्ही १० मिनिटात पोहोचतो. दुकानातच आहोत. आम्ही घरासमोरच्या बागेत विसावलो. सांगितल्याप्रमाणे एक बाई ड्राइव्ह करत असलेली गाडी दाराशी थांबली. Wish करून एक गृहस्थ त्यातून उतरला. बाई गाडी गराजमधे ठेवायला गेली तोपर्यंत तो आमच्याशी बोलत होता. बाईने काहीतरी त्याला विचारले. एकूण टोनवरून बाईच्या स्वभावाप्रमाणे "बाहेरच काय उभे करून ठेवले आहेत त्यांना" असे विचारले असावे. त्याने काहीतरी उत्तर दिले बहुधा "चाव्या कोणाकडे आहेत?” अशा स्वरुपाचं काहीतरी! (आपल्या विचारांप्रमाणेच आपण दुस-याची पारख करतो!) त्याबरोबर लांबूनच जुडगा फेकून ती मोकळी झाली. त्याने दरवाजा उघडला आणि आम्ही धन्य झालो. मसाल्याच्या अगदी सुंदर वासाने आमचं स्वागत झालं. इन्सब्रुकला सिटी सेंटर मध्ये फिरताना मसाल्याच्या रिंग्स बघितल्या होत्या त्यांचा उपयोग इथे केला होता. फारच प्रसन्न स्वागत झाले. आम्हाला तिस-या मजल्यावरची खोली दिली होती. बाहेर एक बेड आणि किचन आतल्या बाजूला डबल बेड असलेली खोली. बाकी व्यवस्था नेहेमीप्रमाणे चोख होती. या घराला मागल्या बाजूला बाल्कनी होती. मागल्या बाजूला कुठे म्हणून निराश होण्याआधीच तीमधून दिसणरं जंगल, त्यातली पायवाट आणि धबधब्याची गाज याने आम्ही खूष झालो. बेडरूममधून खिडकीतून बघितले तर समोरच्या घरातील मुलांसाठीची घसरगुंडी वगैरे दिसलीच पण एक छोटा पोहोण्याचा तलाव, जमिनीच्या वर लाकडाने बांधलेला दिसला. प्लॅस्टिक शीटने झाकून ठेवलेला. श्रीशैल खालच्या मजल्यावर घरमालकांकडे जाऊन [पैसे देणे वगैरे सोपस्कार उरकून वर येईपर्यंत आमचे निरीक्षण आटोपले.

तसा उशीरच झाला होता. पोटा पाण्याकडे बघण्याची आवश्यकता होती. मुख्य म्हणजे थंडीपासूनचं संरक्षण म्हणजे चहाची नितांत गरज होती. परदेशातला मोठा प्रश्न म्हणजे चहा मिळणे. यावेळी आमचा प्रश्न गिरनार चहाने सोडवला होता. येण्यापूर्वी दादरला त्या दुकानात गेलो तर तयार चहाची जाहिरात दिसली. चौकशी केली तर त्यांनी सांगितलं पावडर आहे फक्त गरम पाण्यात टाकली की चहा तयार! साखर दूध काहीच नको. इथे आम्हाला किचन होते म्हटल्यावर गरम पाण्याचा प्रश्न नव्हता. चहाचे चारही म्हणजे मसाला, गवती चहा, आलं आणि केशर असे प्रकार आमच्या बरोबर होते त्यामुळे यावेळी खरच चैन होती. चहा घेऊन आम्ही बाहेर निघणार एव्हढ्यात दारावर टकटक झाली. त्या बाईने श्रीशैलला जरा खाली येता का म्हणून रिक्वेस्ट केली. कदाचित काहीतरी राहिलं असावं असं म्हणेपर्यंत तो वर आला. तिने चुकून त्याच्याकडून जास्त पैसे घेतले होते, हिशेबातली चूक, ते परत देण्यासाठी आमंत्रण होते. Great! जी गोष्ट आमच्या लक्षात येण्यासारखीही नव्हती ती लक्षात येताच तिने ताबडतोब दिलगिरी व्यक्त करून सुधारली होती.

बाहेर आलो आणि खेटून उभ्या असलेल्या डोंगराच्या दिशेने आमचे पाय वळले. इथे प्रत्येक ठिकाणी पाट्या दिसत होत्या. पायवाटांवर दिशा दाखवल्या होत्या. वेळ होती दुपार टळून गेल्याची म्हणजे फार वेळ हाती नव्हता. तर डोंगर वाटेने झेल आम सी पर्यंत ४० मिनिटांच्या दाखवलेल्या रस्त्याने निघू या असं ठरवून निघालो. या पाट्यांवर लाल काळ्या अशा रंगांनी रेषा दाखवल्या आहेत. त्या मार्ग सोपा ते खडतर कसा ते (उदा काळ्या रंगाची रेष अतिशय खडतर मार्ग दाखवते) दर्शवतात. दाट झाडी, इथेही अर्थातच देवदार, पाइनची लागवड. पायवाट अरूंद असली तरी व्यवस्थित होती. रमत गमत जाण्यासारखी. एकदम थबकलो. वेडावणारा गंध! या जंगलात? इथे तर फक्त रंगांची उधळण करणारी वासरहित फुले असतात हा समज. अनपेक्षित एखादा जुना मित्र भेटावा तसा हा गंध! न्यूयॉर्कच्या एका रस्त्यात असाच अचानक भेटला होता. जवळच पांढ-या फुलांचे घोस असलेले झाड होते. जवळ जाऊन बघितले. अंदाज बरोबर होता. घमघमाटाने त्यानेच आम्हाला आवतण दिले होते. नंतर तशी खूप झाडं भेटली पण हे पहिलेच म्हणून त्याची आठवण कॅमे-यात बंदिस्त झाली.

४० मिनिटे म्हटले तरी खूप वळणा वाकणाचा तो रस्ता खूपदा खाली वर करत पुढे जात आम्हाला हुलकावण्या देत होता. दूरवर जलाशयाचं अथांग पाणी त्याच्या लोभस निळ्या रंगाने खुणावत असताना आम्हाला घरं दिसू लागली आणि दहा मिनिटात आम्ही त्या सी च्या तीरावर पोहोचलो. संपूर्ण प्रदक्षिणा घालायची तर तीन कि. मी पेक्षा जास्त विस्तार असलेला हा विस्तीर्ण तलाव. मधेच दमायला झालं तर बोटीतून परत यायची सोय. अशा सुविधा इथे आहेत, अर्थात सीझनमधे. निवांत जलाशयाकडे आणि त्यातल्या विहार करणा-या राजहंसांकडे पहात बसलो. समोर आल्प्सची बर्फाच्छादित शिखरे, चहुकडून तलावाला कवेत घेणारी. आमच्या मागे रेल्वे स्टेशन त्याच्या पलीकडे गाव आणि त्यापलीकडे पुनः आल्प्स! दूरवरून एक सुंदर लाल रंगाचा ठिपका जवळ येत होता डौलदारपणे. OEBB, इथल्या रेल्वे कंपनीचं नाव, ची गाडी झोकात येत होती. या निसर्गात सहजपणे मिसळून जावी तशी. संध्याकाळ होऊन गेली होती. म्हणजे आठ वाजले होते आणि स्वच्छ सूर्यप्रकाश होता. सिटी सेंटरमधली दुकानं बंद होऊनही तास उलटले होते. आता जाग होती ती फक्त पब्ज आणि बार्स यांची. तशी हॉटेल्सही सुरू होती पण तुरळकपणे. परतायला हवं होतं म्हणून निघालो.

फोटोकरता या लिंकवर क्लिक करा

                                                                                                                                ( to be continued)