Monday, 19 August 2013

Austria Zel Am See II

दुसरा दिवस उजाडला तो ढगांचं आवरण घेऊनच. मनात पाल चुकचुकली. फुकट तर नाही ना जाणार दिवस पावसामुळे? इथे घरात बसून रहायचं म्हणजे शिक्षाच होती. बाल्कनीत बसून छान चहा घेतला. कुडकुडत होतो पण आत बसवेना. थोड्या वेळाने होत्याचं नव्हतं झालं. स्वच्छ सूर्यप्रकाश, निरभ्र आकाश आणि समोर हिमचादर ओढलेला तो आल्प्स. कदाचित आम्हाला तो नव्याने पडलेला बर्फ दाखवण्यासाठी हा खेळ असावा. आल्हाददायक वातावरणात (=कुडकुडत) आम्ही आमचा मोर्चा वळवला शिखराच्या दिशेने. वाटेत एक रोप वे स्टेशन होतं. दरवाजा उघडा दिसला आम्ही शिरलो आत. अगदी आत गेल्यावर एक माणूस होता त्याच्याकडे चौकशी केली पण रोपवे मेन्टेनन्स सुरू होता. सुरवात जूनच्या १५ तारखेपासून होणार होती. या रोप वे. त्यांचा स्कीइंगचा सीझन असतो. दूर शिखराजवळ घसरगुंडीसारखे माळ असतात. एरवी, म्हणजे बर्फ नसते तेव्हा तिथे छान हिरवळ दिसते, ते स्कीइंग ग्राऊंड. या रोप वेमधे बसून किंवा कधी कधी रोप चेअर्स असतात म्हणजे बंदिस्त नाहीत त्याऐवजी फक्त खुर्चीत बसायचं, अर्थात पट्टे बांधलेले पण आपल्याला चहूकडे अगदी खालीसुद्धा बघता येतं अशी मोकळी खुर्ची. तर अशा या वाहनातून वर डोंगरावर पोहोचायचं. उतरल्या क्षणी स्कीइंगला सुरवात करायची. एवढा उतार असतो की त्यावर क्षणाची उसंत न मिळता घसरत खाली यायचं या कल्पनेनेच हबकून जायला होतं. याचेही कठीण, खडतर, सोपे असे प्रकार असतात, त्याचं ट्रेनिंगही इथे मिळतं. इन्सब्रुक आणि आसपासच्या या सगळ्या भागात हिवाळ्यात स्कीइंगचा मोठा सीझन असतो, इतका की इथे हॉटेल्स, अपार्टमेंटसमध्ये जागा मिळणं मुश्किल होतं.


तर हे सगळं कून होतो आता त्या ठिकाणी पायी चढून जायचं होतं. इथेही wandering paths आणि त्यांच्या ग्रेडस आहेतच. जागोजागी बोर्ड्स आहेत. आम्ही असाच एक रस्ता निवडला. वाटेत खूप ठिकाणी गोठलेला बर्फ होता, उ्न्हाने वितळणारा. त्याच्यावर चढण्याचा अयशस्वी प्रयत्न करून थोडसं घसरून घेतलं फोटो काढले आणि निघालो. तसा आज दिवस हातात होता पण पुनः इथेही पावसाची शक्यता गृहित धरावी लागते. निम्म्याहून अधिक उंचीवर आम्ही पोहोचलो होतो. प्रत्येक वेळी शेजारचं शिखर आपल्या एवढ्या उंचीवर तर आहे म्हणजे माथ्यावर आलोच असं वाटत राही. दाट झाडीमधून दिसणारं आकाश बघितलं की आपल्या मनाचा कौल बरोबर आहे असही वाटे आणि आता पुढची १५ मिनिटे नाहीतर परत असं म्हणत म्हणत आम्ही खूप दूरवर आलो पण माथा काही दिसे ना. बर्फाच्छादित शिखरे जी दूरवरून दिसतात ती तशीच असतील की तिथेही साठलेल्या बर्फाचे असेच आपण इथे बघत आहोत तसेच साठे असतील? आणि जे आपण इथे बघत आहोत तेच तिथे बघायचे तर उरलेले कष्ट सार्थकी लागतील का? श्रीशैलच्या मनाविरुद्ध त्याला परतीच्या प्रवासासाठी राजी केलं. वाटेत मघाशी एक ओढा ओलांडला होता. बर्फाचंच पाणी ते. बूट काढून त्यात पाय टाकताना संवेदना बधिर झाल्या होत्या. आता पाणी आणि जोर वाढलासा वाटला. वर माथ्यावर पाऊस झाला आणि पूर आला तर? कल्पनासुद्धा ग्रेट आणि घाबरवणारी होती. पुनः बूट काढून पाय पाण्यात टाकताना ब्रम्हाण्ड आठवलं पण पर्याय नव्हता.

पलीकडे आलो आणि तिघेही निवांत बसलो. कान्हाच्या जंगलातला तो आदिवासी गाईड सांगत होता ते आठवलं. कोणतंही जंगल कधीही शांत नसतं. प्रत्येकाला त्याचा त्याचा एक आवाज असतो. असा हा आवाज ऎकत आम्ही कापलेल्या झाडाच्या बुंध्यावर टेकलो. इथून पुढे आम्ही टप्प्यात होतो. बसून वरच्या झाडीचा अनुभव आठवणं झालं. या ठिकाणी फोटो काढले तरी त्याची खोली त्या फोटोत उतरत नाही आपण किती उंचीवर पोहोचलो ते आपल्या डोळ्यात साठवणं हा एकच पर्याय. याविषयी सगळ्यांचं एकमत झालं. वरती बघितलेल्या त्या रोप वे स्टेशनच्या बाहेरचा उतार बघून स्कीइंगचा थरार काय असेल याची कल्पना आली. नदीच्या किंवा समुद्राच्या सोडाच पण स्वीमिंग पूलच्या पाण्यात काठावरून फेकून दिल्यावर कसं वाटते असेल? तोच अनुभव की! किती जण धडपडत असतील किती जणांना लागत असेल आणि किती जखमी होत असतील या कल्पनेनेच हबकायला झालं. नंतर श्रीशैलचा ऑस्ट्रियन मित्र क्रिस घरी आला होता तेव्हा त्याने Air ambulance ने किती तरी वेळा जखमींना हलवावे लागते त्याच्या कथा सांगितल्या होत्या! ढग गोळा होत होते. या थंडीत पावसाचा मारा सहन करणं कठीण आणि ओले कपडे वाळणं त्याहून मुश्कील म्हणून सरळ आम्ही आमच्या "घरी" येऊन पोहोचलो. घरी उबदार तर असणारच होतं शिवाय चहाची लज्जत अनुभवण्याचं स्वर्गसुख होतं. तेही कष्टाविना फक्त गरम पाण्याच्या उपलब्धतेतून!


पावसाने हुलकावणीच दिली. अर्थात खूप आनंद झाला त्या गोष्टीचा. संध्याकाळी पुनः बाहेर पडून सी, हो त्या तलावावर फिरायला. थंडीत, हा यांचा वसंत ऋतु असून, पाण्यात उतरण्याचं साहस करणं शक्य नव्हतं आणि आपल्याप्रमाणे मनात आलं आणि पाय बुडवून बसलं अशी कुठे शक्यताही नव्हती. तिथे पोहोण्याची वेगळी व्यवस्था होती, अर्थातच पैसे मोजून आणि ती १५ जून नंतरच उघडणार होती.

सिटी सेंटरमध्ये मनसोक्त फिरलो. अन्तोनस इंडियन हॉटेल असं एका ठिकाणी दिसलं त्याबरोबरीने इटालिअन वगैरे नावं होती, म्हटल कदाचित आपला गोव्याकडचा असेल.
पण दुस-या पाटीवर केबाप होतं म्हणजे नेहेमीप्रमाणे भूल होती. उगीचच इंडिश-चायनीश असं लिहून आकर्षित करायचं दुसरं काय. तिथल्या फार्मसीमध्ये गेलो. प्रवासात बसून मांडीवर रॅशेस आले होते. कदाचित फूड अ‍ॅलर्जीही असण्याची शक्यता होती. आम्ही क्रीम्सची वर्णनं वाचत होतो इतक्यात एक पोरगेलसा तरूण मुलगा पुढे आला May I help you म्हणत. त्याने आधी रंग कसा आहे, ओले की कोरडे वगैरे प्रश्न विचारले आणि मग दोन क्रीम्स दिली.एक जर काही इन्फेक्शन असेल तर दुसरं अ‍ॅन्टी इन्फ्लमेटरी.बोलता बोलता त्याचं लक्ष गेलं हाताच्या फुटलेल्यास्कीनवर त्याच्याकरता काही देऊ का म्हणून त्याने विचारलं. त्याच्या निरीक्षण आणि विक्री कौशल्याचं कॊतुक वाटलं. अर्थात अंग फुटण्यावर काही नको होतं. त्याला तसं म्हटलं आणि विचारलं इतकं चांगलं इंग्रजी कसं येत बाबा तुला. तर तो म्हणला मी Nano Technology मध्ये MS करून आता व्हेकेशनमध्ये फार्मसीमध्ये काम करतो आहे. इन्सब्रुकला शिक्षण झालं त्य़ामुळे इंग्रजी चांगलं आहे. भारताविषयीच्या त्याच्या चौकशा संपल्यावर आम्ही तिथून बाहेर पडलो. स्पार आणि बिल्ला या दोन्ही दुकानातून आवश्यक वस्तू घेऊन एका हॉटेलमध्ये भरपेट खाऊन घरी परतलो. उद्या इथून निघून आल्प्सच्या कुशीत (म्हणजे आतापर्यंत कुठे आहोत?) जायच होतं.

1 comment:

  1. इंग्लीशमध्ये जे It takes you there असं पुस्तकाच्या ब्लर्बवर लिहिलेलं असतं तसं वाटतं

    ग्रेट, असं लिहिण्यासाठी असाच प्रवास तुला वारंवार घडो,

    जयंत गुणे

    ReplyDelete