Monday, 5 August 2013

Austria Innsbruck


मुंबईहून निघून गुरूवारी रात्री उशीरा आइंडहोवनला पोहोचलो तेव्हा लगेच शनिवारी सकाळी ऑस्ट्रियाला जायला निघण्याचा बेत अंगाशी येणार असच वाटत होतं. पण रात्रीची शांत झोप मिळाली, शुक्रवारी दुपारी चांगली विश्रांती घेऊन झाल्यावर पूर्ण ताजेतवाने होऊन आम्ही ऑस्ट्रियन आल्प्स बघण्यासाठी इन्सब्रुकला जायला निघालो. प्रवास रेल्वेचा होता हे खूप छान झाले. मुंबई- अम्मान- अ‍ॅमस्टरडॅम प्रवासात अंग आंबून गेले होते. तसा एकूण दहा साडे दहा तासांचा प्रवास आणि मधले ३ तास म्हणजे फार नव्हेत. पण पहाटे पाच वाजता सुटणा-या विमानाच्या आडनिड्या वेळेमुळे झोपेचंही खोबरं झालं होतं. रेल्वेमध्ये गाडीच्या वेगाशी आपल्या मेंदूचा झुलण्याचा वेग अ‍ॅडजस्ट झाला म्हणजे मस्त डुलकी लागते आणि फ्रेश व्हायला होतं.

सकाळी ११ची गाडी गाठायची म्हणजे निदान १० वाजता घर सोडायला हवे. आइंडहोवन ते वेन्लो (Venlo) हा तासाचा प्रवास तिथून जर्मनीमधील ड्युसेलडॉर्फ हे सरहद्दीवरचं स्टेशन तासाभरावर. तिथे ICE ही स्पीड ट्रेन पकडायची आणि म्युनिकला यायचं संध्याकाळी पावणेसातला. तिथून रोजनहाइम (Rosenheim) हे ऑस्ट्रियामधील स्टेशन पुनश्च ICE या स्पीड ट्रेनने. आपण जसे पॅसेंजर एक्सप्रेस म्हणतो तसेच हे. फक्त यांच्या साध्या म्हणजे रेजिओनल (Regi/ Regional) गाड्यासुद्धा १००-१२० च्या स्पीडने धावतात, आपल्याकडे राजधानी कधीतरी १४०चा स्पीड घेते आणि तिला आपण सुपरफास्ट म्हणतो!, आणि नंतर कुफस्टाइन मार्गे इन्सब्रुक असा साधा सोपा (?) हिशोब होता. या प्रत्येक ट्रॅन्सफरच्या वेळी (आपण गाडी बदलतो हे लोकं ट्रॅन्सफर घेतात) पुढची गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येईल याचा त्या स्टेशनवरील इंडिकेटरवर शोध घ्यायचा. काहीवेळा मध्ये १५-२० मिनिटांचा अवधी असेल तर विशेष काही वाटायचं नाही पण जर मधे काहीच वेळ नसेल तर मात्र खूपच धावाधाव होते. अर्थात ती श्रीशैलची होते कारण त्याला गाडीही शोधावी लागते आणि आम्हालाही पुढे घालत न्याव लागतं!
तर असे आम्ही इन्सब्रुकला आलो.

हा प्रवास तीन देशातून झाला. नेदरलॅन्डहून सुरवात करून जर्मनी ओलांडून आम्ही ऑस्ट्रियात प्रवेश केला होता. वाटेत फ्रॅन्कफर्ट, म्युनिच ही जर्मनीतली मोठी शहरं लागली होती. बरोबरीने वेगवान रस्त्यांवरून आमच्या गाडीच्या वेगाशी स्पर्धा करणा-या मोटारी होत्या, काही ठिकाणी नदीतून संथपणे चालणा-या बोटी होत्या. एकूण प्रत्येकजण आपापली गती सांभाळून, स्वभावधर्मानुसार वाटचाल करत होता. आम्ही मात्र गाडीची गती ती आपली गती मानून आपला प्रवास करत होतो. खूपवेळा प्रत्यक्ष मुक्कामाला पोहोचण्यापेक्षा प्रवास अधिक मनोहारी असतो. युरोपातल्या प्रवासात एक जाणवलं ही लोकं ब्रिटिशांसारखी निमूट बसणारी नाहीत (माझा अनुभव पु. लं.नी अपूर्वाईत केलेल्या वर्णनापुरता). या तीनही देशातून प्रवास करताना इतर प्रवासी बघितले तर सतत त्यांचं तोंड चालू. प्रवासात खाणं वर्ज्य नाही आणि बोलणं तर त्याहूनही नाही. शेजारी येणारा माणूस त्यांच्यापॆकी असेल तर सरळ बोलणं सुरू होतं. दोघं बोलताहेत त्यात तिसरा मधेच दखल देतो, किमान हसून त्यात सामील होतो. आपल्याकडे विशेषतः गावातून दिसतं तसं वाटलं. बर आवाज सौम्य वगैरे असावेत तर तेही नाहीत. साळढाळ म्हणावीत तशी वाटली. अर्थात जर्मन्स म्हणे खूप रिझर्व्हड असतात, कदाचित प्रवासात नसतील! आमच्याच समोरील बाजूला फ्रॅन्कफर्ट एअरपोर्ट स्टेशनला एक गृहस्थ आणि एक बाई येऊन बसले. म्हणजे त्यांच्या आरक्षित जागेवर बसले. तो माणूस आल्यापासून फोनवर बोलत होता आणि समोर लॅपटॉपवर त्याचं काहीतरी चालू होतं. साधारण शेअरबाजार किंवा प्रॉपर्टी मॅटर्स असावीत असं वाटत होतं. ती बाई सतत हसत होती मधेच त्याच्याशी बोलत होती, त्याचा चेहरा आम्हाला दिसत नव्हता. एकूण बरोबर असावेत असा निष्कर्ष काढला खरा पण तो आधी उतरून गेला आणि उतरताना हाय बाय काही नव्हतं! म्हणजे अनौपचारीकपणा जर्मनांमध्येसुद्धा असावा.

इन्सब्रुकला पोहोचलो तेव्हा तशी रात्र झाली होती पण स्टेशन जागे होते. बाहेर बसचा ताफा होता. मशिनवरच २४ तास चालणारे डे तिकिट काढले. हे तिकिट एका ट्रीपपेक्षा थोडे जास्त पैसे देऊन घेतले म्हणजे कुठूनही कुठेही जायला तुम्ही मोकळे असता. बस आणि ट्रॅम दोन्ही ठिकाणी चालणारं हे तिकिट म्हणजे शहर पालथं घालायचा स्वस्तातला परवानाच.

आम्ही हॉटेल बुक केलं होतं ते हाइम गार्टन ह्योअर वेग (Höher Weg) या रस्त्यावर होतं. हॉटेलच्या मेलमध्ये त्यांनी बसचा नंबर, स्टॉपचं नाव दिलं होतं त्याप्रमाणे उतरलो आणि सरळ पुढे चालत गेलो. नदीवरचा पूल ओलांडून पलीकडे गेल्यावर डाव्या हाताला वळा, इथवर व्यवस्थित आलो. नंतर नदीला समांतर जाणारा रस्ता आणि त्याला फटकारून वर डोंगरावर जाणारा एक रस्ता दिसला. का कोण जाणे पण त्या रस्त्याने आम्ही वर गेलो आणि एका डेड एंडला पोहोचलो. बर विचारावं म्हणाल तर काळं कुत्र नाही रस्त्यात. त्यातून हॉरर फिल्मप्रमाणे आम्ही एखाद्या घरापाशी गेलो की भुताटकी झाल्यासारखा तिथला दिवा लागे, तिथून पुढे गेलो की बंद होई. पुनः काळोख! आम्ही दोघं गोंधळलो होतो, नंतर श्रीशैल म्हणाला अहो सेन्सर्स असतात काळजी नको. त्यानेच मग फोनवरून माहिती मिळते का बघायला फोनला हात घातला तेवढ्यात दूरवरून एक गाडी येताना दिसली. गाडीला हात केल्यावर त्यातील माणसाला हाइम गार्टन म्हणताच नदीला समांतर रस्त्याने पुढे गेलात की दिसेलच म्हटले आणि हायसे वाटले.

पुनः तो रस्ता उतरून खाली आणि पुढे चाल. हॉटेल लगेच थोड्या, अगदी २-३ मिनिटांच्या अंतरावर होतं. रात्रीचा एन्ट्रन्स वेगळा दाखवला होता. दरवाजा अर्थातच बंद होता पण एका काचेवर एक चिठ्ठी घडी करून चिकटवलेली. त्यात आमचं नाव, खोली नंबर, चावी कुठे आहे ते लिहिलेले. आम्ही किल्ली घेऊन खोलीत गेलो. इंटरनेटचा वाय फायचा पासवर्ड लिहिलेली चिठ्ठी टेबलावर होती. आपल्याकडे शंभरवेळा बेल दाबा, माणसाला बोलवा ही भानगड नाही सगळं सुरळीत, शिस्तीत आणि माणसाच्या अस्तित्वाशिवाय पार पडत होतं.

इन्सब्रुक हे तसं छोटं शहर अर्थात जेवणाखाण्याबाबत मात्र अशा ठिकाणी वेळेचं बंधन पाळणं आवश्यक ठरतं. कदाचित आम्हाला नीट दिशा कळली नसेल पण त्या दिवशी व्हेन्डिंग मशिनच्या आधारे पेयपदार्थांवर भागवावं लागलं. पब्स होते पण खाण्याच्या वेळा टळून गेल्या होत्या! त्यामुळे फक्त "प्यायच्या" पुरते ते उघडे होते.

दुसरा दिवस उजाडला. ब्रेकफास्ट्ची सोय (वेगळे पैसे देऊन का होईना) पण हॉटेलमध्येच होती. उगीच वणवण करण्यापेक्षा इथेच पोटभर खाऊन घेऊ हा विचार करून आम्ही भरपेट खाऊन घेतलं. तसही आपल्याला शाकाहारात त्यांच्याकडे काय मिळणार? विविध प्रकरचे ७-८ जॅम चे प्रकार २-३ प्रकारचे ब्रेड, चीज, बटर, केक्स, फळांचा रस, फळं, केलॉग्स, दूध,कॉफी, चहा अरे बापरे! आपल्याकडे आपण हे सारं किंवा हे इतकं घरी खातो? इथे भूकही लागते आणि त्याही पेक्षा एकदा सणसणीत खाऊन घेतलं की लंचच्या वेळी काहीतरी हलकं फुलकं खाऊन भागतं. जास्त वेळ फिरण्याकरता देता येतो.

बाहेर पडलो तर कालची नदी भेटली. काही अंतरावर एक सुंदरसा लाकडी पूल खुणावत होता. त्यापलीकडे रहदारीसाठीच्या पुलावर छान पिवळाधम्मक रंग असलेली ट्रॅम संथपणे निघाली होती. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि सकाळचं हे उत्साहवर्धक वातावरण. आतापावेतो अगदी हॉलंडमधे उतरल्यापासून ते आतापर्यंत सूर्य आम्हाला साथ करत होता. त्यामुळे रस्तेही प्रफुल्लित होते. माणसेही लगेच सूर्यदर्शनाचा सोहाळा साजरा करायला रस्त्यांवर होती, चालत, सायकलवरून. लाकडी पूल सुंदर कमानींचा होता. फक्त माणसांसाठी असलेल्या त्या पुलावर एक बारीकशी रेष, खालून वर येणारी, पाय-यांविना होती, सायकलींसाठी. सायकल या वाहनाचा पादचा-यांप्रमाणेच बारकाईने विचार करून त्याला प्रोत्साहन मिळावे किंवा जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात या दृष्टीने आखणी केलेली दिसते. पूल ओलांडून पलीकडे गेलो आणि आमच्या हॉटेलच्या समोरच्या बाजूला आलो. लांबून ते सौंदर्य कळत होतं. हॉटेलच्या मागे लागून टेकडी आणि त्यावर दूरपर्यंत घरं. हॉटेलसमोर रस्ता आणि पलीकडे नदी त्यामुळे त्याचं सौंदर्य बघायला आम्हाला नदी ओलांडायला लागली. हॉटेलच्या इमारती शेजारी लागूनच एक पहाड होता. वरून धबधबा कोसळत होता. आणि मागील डोंगरावर हिरव्या रंगाच्या सगळ्या छटा भेटीला आलेल्या होत्या. मन अगदी प्रसन्न झाले. रात्री येण्याचा हा एक फायदा! सगळं सौंदर्य सकाळी आश्चर्याच्या रूपात भेटीला येतं. नदीच्या या काठाने चालत आम्ही निघालो. तसं डे तिकिट होतं पण चालण्यातला आनंद त्या बस/ ट्रॅममधून फिरण्याला नाही आणि त्याही पलीकडे एकूणच पॉइंटस बघणं म्हणजे शहर बघणं नाही याबाबत आम्हा तिघांचं एकमत असतं. तर पुढे आलो तर वरच्या बाजूला काहीतरी छान दिसतं होतं. ट्रॅमचा सुरवातीचा थांबा होता. बाहेर तिकिट घेऊन मगच आत जाता येणार होतं. ही ट्रॅम डोंगरातील वळणा वळणाच्या रस्त्याने तुम्हाला इन्सब्रुकचं दूरदर्शन घडवते. काहीतरी ७ किंवा ८ युरोचं तिकिट होतं. माणसं मात्र कोणी फारशी जाताना दिसत नव्हती. इंटरनेटवर अतिशय स्पष्ट शब्दात लिहिलं होतं की याकरता पैसे खर्च करायची काही आवश्यकता नाही कमी पैशात त्याच सर्व भागाचं दर्शन घडवणारी ११ नंबरची ट्रॅम पकडा म्हणजे स्वस्तात/ डे तिकिटात काम भागेल. आम्ही अर्थात या महाग ट्रॅमने जाणार नव्हतो. त्यामुळे तसेच पुढे गेलो.

पुढे समोर दोन घुमट दिसत होते. या शहराच ओल्ड टाऊन (जुनं शहर) सुंदर आहे असं कून होतो. आमची दिशा बरोबरच होती पण संवाद साधायला हा उत्तम मार्ग असतो म्हणून कुत्रा घेऊन जाणा-या एका माणसाला विचारले. त्यानी किती मीटर लांब किती वेळ लागेल वगैरे इत्थंभूत माहिती दिली. ही ऑस्ट्रियन लोकं एकूणच वेलकमिंग अ‍ॅटिट्यूड असणारी वाटली. मदतीला तत्पर, हसतमुख आणि मुख्य म्हणजे इंग्रजीतून संवाद साधता येणारी. त्याचे आभार मानून आम्ही निघालो आणि एकदम समोरील बाजूचे ढग विरून तो समोर आला!कसा दिसला तो? देखणा, उत्फुल्ल! या ऑस्ट्रियन माणसांसारखाच स्वागत करायला उत्सुक. पांढरं उपरणं किंवा शेला (बायका पांघरतात म्हणून टाळत होतो पण दोन्ही खांद्यांवर शेल्यासारखाच तर पांघरला होता) घेऊन असा. हिरव्या रंगांमुळे अतिशय उठावदार झालेला पांढरा सतेज रंग. नव्याने एक पदर त्यावर चढवला होता का? म्हणून तर सकाळी ढगांचं आवरण नसेल? तर समोर उभा ठाकलेल्या आल्प्सकडे आम्ही अवाक होऊन पहात उभे राहिलो.

हे शहर म्हणजे दरीत वसलेलं, आल्प्सने चारी बाजूंनी कुशीत घेतलेलं शहर आहे. डोंगरावर चहुकडे हिरवळ, दाट झाडी आणि माथ्यावर पांढरे शुभ्र हिमथर. लोभसवाणं चित्र वाटलं. एका वेगळ्याच वातावरणात घेऊन जाणारं. इतक्या गजबजलेल्या शहरात हे सौंदर्य आपल्याला भेटतं. कोणतेही मानवी प्रयत्न ते हाणून पाडत नाहीत, आपल्याकडच्याप्रमाणे उंचचउंच इमारती वगैरे त्याला झाकोळून टाकण्याकरता उभ्या रहात नाहीत हे बघून मन प्रसन्न होतं. तर त्याला डोळ्यात साठवायला खूप वेळ आपल्याकडे आहे आणि तो येता पूर्ण आठवडा आपल्याबरोबरच आहे असं नव्हे तर आपण त्याच्या अंगाखांद्यावर खेळणार, बागडणार आहोत या जाणिवेने आम्हाला तंद्रीतून जागे केले.

आम्ही ओल्ड टाऊनमध्ये आलो होतो. जुन्या अठराव्या किंवा त्यापूर्वीच्या शतकातील इमारती, त्यांचं सौंदर्य अबाधित ठेवून राखलेली निगा आणि केलेली दुरुस्ती, शेजारी काही विजोड बांधकाम उभं रहाणार नाही याची घेतलेली काळजी. या लोकांचं स्वतःच्या आधी त्यांच्या शहरावर प्रेम असलं पाहिजे एरवी स्वतःचा फायदा बघणारी आपल्याकडली वृत्ती यांना आंधळं करून टाकती! आम्ही गेल्या वेळी स्टॉकहोमला गेलो होतो तेव्हा त्यांचे ओल्ड टाऊन (Gamla Stan) बघितले होते. तेव्हा तसा हा फारसा नवा अनुभव नव्हता. इमारतींचा प्रकार तसाच असला तरी प्रत्येक ठिकाणचं वैशिष्ट्य हे उरतच. म्हणून तर आपल्याला एखादं शहर आवडतं किंवा आवडत नाही. इथे तर या शहराची आल्प्सची पार्श्वभूमी खूप महत्वाची. एका ठिकाणी एक लांबलचक इमारत आहे, फारशी सुंदर नाही पण तिच्या समोर उभे राहिले की तिच्या पाठीशी उभा असलेला आल्प्स आपल्या पूर्ण सौंदर्यासह समोर दिसतो. त्याची ती बर्फाच्छादित शिखरे त्या इमारतीचा वरचा भाग असल्यासारखी दिसतात आणि तिला सौंदर्य बहाल करतात. सर्वसाधारण इमारतींवरचे घुमट हिरवे, सोनेरी असण्याची प्रथा युरोपात दिसते ती इथेही आहे. इमारतींवर दर्शनी भागात नक्षीकाम आहे. त्यांना सुंदर रंगात रंगवलेलं आहे. मोठे चौ, त्यात रेस्टॉरंटस, बाहेर टाकलेल्या खुर्च्या, पदार्थांचा आस्वाद घेत निवांत गर्दीकडे बघत असलेली माणसं, ऊन्ह खाणारी, असा एकूण माहोल. रमत गमत या सगळ्याचा आस्वाद घेत आम्हीही त्या परिसराचा एक भाग होऊन गेलो होतो. उन्हं असली तरी वा-याचा झोत सहन होत नव्हता. त्यांच्या दृष्टीने (यात श्रीशैलसुद्धा आला, तोही आता त्यांच्यातलाच ना?) हा स्प्रिंग आहे इतकं थडथडायला कशाला हवं? पण आपल्याकडे २०च्या खाली पारा गेला की आपण कडाक्याची थंडी पडली आहे म्हणतो, इथे तर १०-१२ च्या मधे असलेलं तापमान आम्हाला हाडं गोठवणारी थंडी वाटणं स्वाभाविकच!

इथे वेळेचा अंदाज काहीच येत नाही. सकाळी सव्वापाचला उगवणारा सूर्य संध्याकाळी (?) साडेआठ- नऊपर्यंत मुक्कामाला असतो त्यामुळे रात्री साडेनवापर्यंत छान उजेड असतो. एकूणच फिरायला छान वातावरण आणि भरपूर वेळ.

ओल्ड टाऊन आवडले हे खर असलं तरी अजून आम्हाला इग्लसची ट्रॅम पकडायची होती. त्या ट्रॅमचा सुरवातीचा थांबा बघितला तर चालण्याच्या टप्प्यात नव्हता. हातात डे तिकिट असताना उगीच चालण्यात हशील नाही म्हणून ट्रॅम घेतली. (हो, ओल्ड टाऊनमध्ये जरी बांधकामं जशीच्या तशी असली तरी वाहतूक व्यवस्था सगळी जय्यत आहे. ट्रॅम, बस यांची वाहतूक करता येईल असे रूंद रस्ते आहेत. जिथे ते नाहीत तिथे एक दिशा मार्ग केले आहेत. एकूण गैरसोयींना वाव नाही. तर ट्रॅमने ११ नंबरच्या सुरवातीच्या थांब्यावर आलो.

या शहराचा रंग लाल आहे का माहीत नाही पण रेल्वेस्टेशनच्या भिंतींचा अर्धा रंग लाल, बसचे रंग लाल आणि आता ही ट्रॅमही तोच सुंदर झळाळता लाल रंग ल्यालेली होती. कलकत्त्यातल्या आपल्या ट्रॅमचं वैभव (!) आठवलं. तिथे मेट्रोचं निमित्त करत एक एक करत संपवलेले ट्रॅमचे मार्ग, जगात नाहीशी झालेल्या या वाहनाचे सुटे भाग मिळत नसल्याने चालवणं कठीण वगैरे वाचताना त्या वेळी विश्वासही बसला होता कारण त्यावेळी इंटरनेटचा प्रचार नव्हता. इथलं ट्रॅमचं वैभव बघितलं आणि आपल्या दूरदर्शी(!) पणाला दाद द्यावीशी वाटली.

ट्रॅमचा हा मार्ग वेडा वाकडा, वळणा वळणांचा आणि डोंगर चढून जाणारा. डोंगरावर सर्वत्र देवदार, पाइन वृक्ष यांचं घनदाट जंगल. त्या जंगलाचा पट्टा मधेच साफ केलेला, इथेही चोरी होते की काय असं वाटायला लावणारा, पण नंतर कळलं की ही सारी व्यापारी लागवड आहे. जंगल तोडणे हे जंगल राखण्याचा अविभाज्य भाग आहे हे सत्य आपल्या आदिवासींना कळले तरी नव पर्यावरणवादी आणि जंगलखात्याला त्याची जाणीव नाही. तर या तोडलेल्या पट्ट्यातून इन्सब्रुकचं होणारं विहंगम दर्शन. हो, इथेही एक मनोरा आहे, शहराचं दर्शन घेण्याकरता, पण त्यावर जायला पैसे पडतात, हे आम्ही फुकट दर्शन घेतो आहोत. व्यापारी दृष्टी म्हणजे काय ते या पाश्चात्यांकडून शिकावं. पण अर्थात त्यांनीही उगीच आपल्याकडे पडदे लावून गणपतीचं दर्शनच तुम्हाला बाहेरून घेता येणार नाही अशी सोय केलेली नसते. तुमच्याकडे उधळायला पैसा असेल तर आम्ही संधी देतो इतकचं, एरवी तुम्हाला वंचित करावं हा उद्देश त्यांचा नाही.

आम्ही असेच मग मधेच एका स्टॉपवर उतरलो इकडे तिकडे उगीच बागडलो, स्वतःला दमवून घेतलं, हाइक करतो आहोत असा समज करून घेतला आणि मन भरल्यावर पुनः ट्रॅम पकडून खूप वरच्या टप्प्यावरच्या इग्लसकडे कूच केलं. हा मार्गच इतका सुंदर आहे की अंतिम टप्प्यापेक्षासुद्धा प्रवास महत्वाचा वाटावा, संपू नये असं वाटावं! इग्लसला ट्रॅम पोहोचली. सभोवार सुंदर फुलं. लावलेली नव्हेत. निसर्गाची किमया. नजर ठरत नाही तिथपर्यंत हिरवंगार, सुंदर, लॉनसारखं फक्त गवत त्याला शोभा यावी म्हणून आपल्या शेवंतीचं भावंड असावं अशी नाजूक पिवळी फुलं, वेगवेगळ्या आकारातली. हिरव्या रंगावरची पिवळी महिरप साजरी दिसत होती. आम्ही थोडा वेळ विसावलो. त्या गवतामधून रस्ते, पायवाटांसारखे होते. सिनेमात शोभावीत अशी छोटी छोटी मुल त्या रस्त्यांवरून एकामागून एक सायकली चालवत जात होती. ज्याला picturesq म्हणतात तसं. या इथे उंचसखल भाग कारण आम्ही डोगराच्या अंगाखांद्यावर होतो. खूपशी मोठी बाडं दिसत होती. प्लॅस्टीक शीटसची भेंडोळी होती. पीक पेरल्यानंतर रोपं लहान असेपर्यंत त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून या शीटस संरक्षण म्हणून अंथरतात त्याचप्रमाणे गवताचे यंत्राच्या सहाय्याने भारे तयार झाले म्हणजे त्याला गुंडाळण्याकरताही या शीटस उपयोगात येतात.या शेतातून, हिरवळीतून आणि फुलांच्या पखरणीतून आम्ही मनमुराद भटकलो. थोडा काळ तो समोरचा आल्प्स विसरलो. समोरच्या त्या छोट्या. मुलांच्या छोट्या सायकलीवरून चालणा-या खोड्यांचे आवाज आमच्यापर्यंत येत होते ते कत निवांतपणे बसलो. तो शांत निवांत, मिलिंद बोकिलांच्या शब्दात निभ्रांतपणा सोडून पुढे जावं असं वाटत नव्हतं पण आम्ही प्रवासी होतो. वेळेचं गणितही बघायला हवं होतं. तसेच ट्रॅमच्या समांतर जाणा-या रस्त्याने निवांत फिरू या म्हणजे वेळ झाली की त्यात बसून जाता येईल असा एक विचार होता पण मग हे निवांत गाव कसं दिसेल? म्हणून इग्लस या छोट्याशा गावात गेलो. सुंदर, वळणा वळणाचे रस्ते. रहदारी फारशी नाही. तरीही बसचा थांबा होता. साधारण तासाभरात का होईना येणारी बस होती. अर्थात इथे ट्रॅमही उपल्ब्ध होतीच. शिवाय रहिवाशांच्या स्वतःच्या गाड्याही असणारच. सायकलींचे रस्ते होते म्हणजे सायकलींचाही वापर पुरेसा असावा. गाव सुंदरच होतं. निद्रिस्त वाटलं. अर्थात ही गावं आहेत हे एक आणि आम्ही सीझन नसताना आलो होतो हे दुसरं. ही गावं गजबजलेली असतात स्कीइंगच्या सीझनला. त्यावेळी इथल्या हॉटेल्स, अपार्टमेंटसमधे जागा मिळणं मुश्किल असतं. आत्ता या वसंत ऋतुत येणारे आमच्यासारखे हवशे गवशे हे काही त्यांचं खरं गि-हाइक नव्हे. त्यामुळे तसा थंडा कारभार असतो.

गावातून मारलेली फेरी एक मात्र सांगून गेली की कोणत्याही प्रकारे गाव म्हणून आपल्याकडे जो प्रकार असतो तो इथे प्रत्ययाला येत नाही. त्यांच्या गावांमध्येही शिस्त आहे, सुविधा आहेत, व्यवस्थितपणा आहे, कदाचित त्यांच्या जीवनशैलीतच तो नेटकेपणा भरलेला आहे त्यामुळे गबाळग्रंथी कारभाराचं त्यांना वावडं असावं. हा नेटकेपणा शहर आणि गाव अशी दुफळी करत नाही. किंवा तो मोनोटोनसही वाटत नाही. प्रत्येक ठिकाणची रचना वेगळी, शिस्त वेगळी एवढच. परतीच्या ट्रॅमची वेळ झालेली होती. आम्ही आत्ता उभे आहोत तिथून आता तो सुरवातीचा थांबा लांब असणार होता म्हणून मग ट्रॅमच्या समांतर रस्त्याचा आधार घेत जवळचा थांबा गाठला आणि वाट बघत उभे राहिलो. इथल्या ट्रॅमना तीन दरवाजे होते. ड्रायव्हरकडेच एक मशीन असते तिथे हातातील कार्ड दाखवून स्थानिक लोक आत येत होते. आमच्यासारखे बरेच डे तिकिटवाले होते. आश्चर्य म्हणजे लोकांचा प्रामाणिकपणावर विश्वास असावा. एकदाही त्या ड्रायव्हरने आम्हाला तिकिट दाखवायला सांगितले नाही. परतलो तेव्हा खूप उशीर झाला होता. जेवून झोपायचे या विचारात असताना तिथे बसमधून बघितलेल्या इंडियन हॉटेलची आठवण झाली आणि त्या दिशेने निघालो. साहिब हे इथले भारतीय हॉटेल. जेवण उत्तम होते पण वाढणा-यांच्यात ओलावा नव्हता. कदाचित भारतीय लोकांची गर्दी असल्यामुळे असेल पण मला हा अनुभव नवा वाटला. साधारणपणे प्रत्येकाशी काहीतरी अनौपचारिक, -याचदा हिंदीतून संवाद साधण्याची नेहेमीची इतरत्र आढळणारी कृती ही जास्त महत्वाची वाटते, विशेषतः असं परदेशात आल्यावर.दुसरा दिवस निघण्याचा त्यामुळे सकाळी हॉटेलमधला नाश्ता घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.

टीप आणखी काही फोटो बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

1 comment:

  1. आनंदा ,
    हे वर्णनही तितकेच अप्रतिम . आणि PHOTO पहाण्याची संधी मिळाल्याने, अधिकस्य अधिकम . . . .
    छान !
    विलास

    ReplyDelete