Monday 26 November 2018

SLOVENIA : SLAP KOZJAK via SOCA GORGE

लेपेना व्हॅलीचा बोर्ड दिसला आणि आता उजवीकडे वळायचं, त्याप्रमाणे वळून उभ्या असलेल्या गाड्यांच्या अगदी शेवटी याने गाडी थांबवली. आम्हाला कळेना ही काही व्हॅली नक्कीच नाही. शेजारून नदी वाहत होती. पाणी अगदी निवळशंख. पाण्याचा रंग बघून माणसाचा सारा शीण निघून जावा असा, त्याला सी ग्रीन म्हणाव की emerald का सरळ पाचू म्हणायचं हा आमचा संभ्रम. इथे चुनखडीचा दगड त्यामुळे पाण्याचा हा रंग. पण आता आम्ही इथे येऊन आठवडा होईल म्हणजे या रंगाचं नावीन्य ते काय? तेवढ्याकरता इथे?

या ठिकाणी एक मोठी घळ होती, नदीचं नाव सोका म्हणून ही. सोका गॉर्ज ! रौद्र, भीषण, अनाघ्रात सौन्दर्य म्हणजे स्लोव्हेनिया हे आम्हाला पदोपदी जाणवत होतं. प्रत्येक ठिकाणाचा अनुभव वेगळा आणि नवा. इथे सौन्दर्य नक्कीच होतं, पण रौद्र नाही आणि भीषण तर अजिबात नाही. इथल्या वातावरणातल्या शांततेने त्याला आणखी गडद केलं होतं. स्तिमित होणं म्हणजे काय याचा प्रत्यय इथे पावला पावलावर आम्ही घेत होतो



नदीचा प्रवाह या दगडातून वाहत असता त्याच्या जोराने ते महाकाय दगड कापत ती पुढे जात आहे. तो नदी आणि अजस्त्र खडक यांचा संग्राम म्हणजे ही सोका गॉर्ज! हे पांढुरके चुनखडीचे खडक आणि त्यांना फोडून काढणारी नदी, पण दोघेही तितकेच तुल्यबळ. दगड कापले जात होते पण अढळपणे उभे होते आणि त्या कापल्या गेलेल्या दगडांमधून तितक्याच तडफेने नदी आपली पुढची मार्गक्रमणा करत होती. जितका दगडांचा विरोध वाढत होता तितका तिचा जोर. याला संग्राम कसा म्हणायचं? हे तर शिव पार्वतीचं युगुल नाट्य असावं किंवा सर्पमैथुन , असं इथे बघताना वाटत होतं! प्रेमाने पुरेपूर ओथंबलेलं आणि तरीही एकमेकांना घायाळ करून सोडणारं, दमवणारं आणि कस बघणारं !

त्या सौन्दर्याचा आस्वाद घेता यावा याकरता तिथे एक सुंदर, झुलणारा पूल बांधलेला होता



आमच्या योगीराजांना मग तिथे मयूरासनाची हुक्की आली. त्या दगडावर, जरा निसटलं तर जलस्नान घडावं अशा अवघड जागी त्याचं ते मयूरासन बघण्याकरता मला मात्र कॅमेऱ्याचा डोळा वापरावा लागत होता.



गॉर्ज बघितल्यावर Gorgeous म्हणजे काय याचा अर्थ पोहोचला. किती अंगाने ही गॉर्ज बघता यावी! तसा हा देश पर्यटन नकाशावरचा नव्हे, त्यातून आपल्याकडच्या पर्यटन कल्पनेत तो कुठेच बसत नाही. तरीही इथे आलेल्या १५-२० गाड्यांमधून लोक त्याचा आनंद घेत होते म्हणजे आता कुठेतरी पर्यटकांपर्यंत हा देश पोहोचण्यास सुरवात झाली असावी.

लेपेना व्हॅली अजून बरीच पुढे होती. आम्हाला वाटलं की असेच पुढे निघून जायचे असणार पण बघतो तर सगळ्याच गाड्या माघारी फिरत होत्या. सगळेच माघारी जात आहेत तर आपण पुढे जाऊन बघू म्हणून आम्ही काही अंतर पुढे गेलो पण अंतराचा अंदाज लागे ना. तेव्हा आता परत फिरणे इष्ट असा विचार करून माघारी फिरलो. तसा हा पाहण्याचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा लवकर पार पडला होता,  आमच्या कल्पनेप्रमाणे, म्हणजे आता घरी परतून आराम असा आमचा समज झाला. वाटेत किल्ला होता. पण इथे येतानाच बोलणं झालं होत की तितका काही इंटरेस्टिंग वाटत नाही म्हणजे थांबणे नसेल अशी आमची कल्पना. ती खरी होती पण कोबारीड आलं आणि गाडी वेगळ्या दिशेला वळली. आपण इथला स्लाप (धबधबा) कोझ्याक बघू या. रिन्का बघितला होता, आता हा.

गाडी एका पुलापाशी आली. हा नेपोलियन पूल. इथून पुनः त्या सोका नदीचं दर्शन घेतलं. इथल्या नदीकडे बघताना भान हरपणे म्हणजे काय ते कळतं. निवांतपणे नदीचा तो वाहण्याचा सूर ऐकत डोळे मिटून शांत बसलं तर तो मन थाऱ्यावर येण्याकरता चांगला स्ट्रेस रिलीफ होईल.

पूल ओलांडला आणि कोझ्याकची पाटी दिसली. गाडी त्या दिशेने जाऊ लागली. माहितीप्रमाणे पुलानंतर लगेच येणारा धबधबा दिसण्याचं काहीच चिन्ह नव्हतं. पण पुढला भाग मोहून टाकणारा होता. भूल पडावी तसे आम्ही पुढे पुढे जात होतो. जीपीएस सुद्धा बहुधा गंडलं असावं. एका गावात आलो, ड्रेझनिका नाव त्याचंगावाच्या शेवटी असलेल्या चर्चपर्यंत येऊन जीपीएस तसेच पुढे रस्ता दाखवत होते. तर आमच्यापुढे, पुढे दरीत जाणारा रस्ता ? आणि, आणि खालच्या बाजूला एक घर. मागे फिरायला हवं हे कळत होतं  पण कसं? रस्ता अरुंद, एका बाजूला चढ दुसरीकडे दरी आणि वळणावर गाडी मागे घ्यायची? हा काही एक्सपर्ट ड्रायव्हर नव्हे. मी खाली उतरलो, श्रीशैल म्हणाला आई गाडीत नको तिलाही खाली उतरवा. मला कळत नव्हतं गाडी मागे घेणाऱ्या या ड्रायव्हरला मी काय सूचना द्याव्यात? होती कसोटीची वेळ, पण श्रीशैलने पार पाडली खरी.

परत फिरलो आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर याने गाडी थांबवली. समोर बघा. आपण गेलो होतो ते चर्च किती सुंदर दिसत आहे. विसाव्याकरता त्या ठिकाणी बाक होतं. मनावरचा ताण दूर झाला होता आणि इतकं सुंदर दृश्य कॅमेऱ्यात साठवल्याशिवाय पुढे जाणं हा त्या दृश्याचा अपमान होता तो आमच्याकडून होणे शक्य नव्हते.



पुनः नेपोलियन ब्रिज असे म्हणत निघालो आणि गंमत म्हणजे आम्ही कुठे गंडलो तेही आम्हाला कळलं. कोझ्याकची पाटी आणि असलेला बाण बघूनच आम्ही ड्रेझनिकाच्या दिशेला वळलो होतो. पण गल्लत ही होती कि इथे गाडी पार्क करून उतरून पुढे चालत जाणे अपेक्षित होते. पूर्ण गृहपाठाअभावी झालेला हा गोंधळ होता. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे असे आम्ही एकटे नव्हतो. आम्हाला नंतर एक दोघांनी जेव्हा रस्ता विचारला तेव्हा हा सार्वत्रिक गोंधळ असावा असं वाटू लागलं. एखादी कठीण हाईक पार पडेपर्यंत असणारं टेन्शन आणि ती सुखरूप पार पडल्यावरचं समाधान आम्ही ड्रेझनिकाच्या फेऱ्यातून अनुभवत होतो. चला, त्या निमित्ताने ड्रेझनिका अनुभवलं!

कच्चा असला तरी रस्ता काही अंतरापर्यंत सरळ होता. नंतर मात्र दगड, गोटे, पाण्याचा प्रवाह, मधेच निसरड्या जागा वगैरे जे काही अपेक्षित असतं ते सगळं होतं. शेवटचा टप्पा अतिशय सुंदर, गुंगवणारा होता. उंचावरून पडणारं पाणी हे धबधब्याचं वैशिष्ट्य असणार त्यात नवल नाही. इथे त्या प्रवाहाने खोलवर केलेली दरी दिसत होती. दोन्ही बाजूला खडकांच्या उंच कमानी आणि वरून पडणाऱ्या त्या पाण्याला खडी ताजीम असावी असा सरंजाम. ते पर्वतही त्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन भारावले आहेत अशा त्या वातावरणात आपली गत आणखी वेगळी ती काय होणार?





एका उंचीवर, इथे साधारण एक माणूस व्यवस्थित जाऊ शकेल अशी फळी डोंगराच्या मध्यावर उंचावर ठोकलेली आहे. धरायला दोरी आहे ती धरून सरळ जात असता काहीच प्रश्न नाही. पण हा सिंगल ट्रॅक असेल तर. समोरून कोणी आले की मग धांदल उडते. खाली बघताना डोळे फिरतात उंचीमुळे आणि दोरी आणखी घट्ट धरून ठेवली जाते. सुदैवाने हा ऑफ सिझन त्यामुळे तुरळक गर्दीचा. तरीही काही तरुण आमच्या पुढे गेले होते ते परत येत असता हा प्रश्न आला पण त्यांनी समजुतीने आम्हाला ओलांडून जात तो सोडवला.

पाण्याचा धोधोटा, तो  वेडावणारा नाद. तेच, तसेच हिरवट निळसर छटा असलेलं नजरबंदी करणारं, निवळशंख पाणी, तळातले गोटे दाखवणारं. कितीही वेळ थांबलं तरी समाधान नव्हतं. आम्हाला तसा उशीर झालेला असल्याने आमच्या मागे गर्दी नव्हती त्यामुळे मनसोक्त थांबता आलं. पण परतीची वाट तर धरावीच लागणार! प्रसन्न मनाने "त्या"ला डोळ्यात साठवत निघालो.

                                पुढील भाग येत्या मंगळवारी.

यातील सर्व फोटो व व्हिडिओ श्रीशैल पत्की 



Monday 19 November 2018

SLOVENIA : TO LEPENA VALLEY

श्रीशैलने आमच्या या शेवटच्या टप्प्याचा लगेच आढावा घ्यायला सुरवात केली. इथे आपल्याला तीन रात्री आहेत. इथून आता पुनः राजधानी लुब्लिआनाला एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी आईन्डहोवनला परतणार. राजधानीतील किल्ला वगळता शहर तर स्लोव्हेनियातल्या पहिल्या दिवशीच पाहून झालं होतं. आता आमच्यापुढे मोठा प्रश्न होता, इतकं सुंदर घर, वातावरण आणि निसर्ग सोडून पुनः शहरात जायचं? की इथल्या मुक्कामात, राजधानीतील एक दिवस कमी करून इथे वाढवून घ्यायचा. दोन मुद्दे होते, एक, घरात राहता येईल का? ते पुढच्या बुकिंगवर अवलंबून असणार होतं. म्हणजे बाईंना विचारणं आलं. त्याबद्दल आत्ता काहीच ठरवता येणार नव्हतं. दुसरं म्हणजे गाडीचं रेंट कॉन्ट्रॅक्ट एका दिवसाने वाढवून घेतलं नाही तर दंड भरावा लागणार होता. आणि ती रक्कम बरीच असणार होती. आत्ता तर रात्र झाली होती. उद्याच्या कामामध्ये ही कामं प्राधान्यक्रमात ठेवून आम्ही झोपी गेलो.

काही जागांचे आणि आपले ऋणानुबंध असतात की काय असं वाटू लागतं. काल आलो इथे तेव्हापासून सूर्य महाराजांचा मुक्काम इथे आला. युरोपात, किंवा या पाश्चिमात्य देशांमध्ये ही नवलाईची गोष्ट. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि अनाघ्रात निसर्ग. यापरते आम्ही आणखी काय मागणार? प्रवासातल्या या दोन गोष्टींचं प्लॅनिंग आपल्या हातात नसतं. तो भाग नशिबावर सोपवायचा. आतापर्यंत लोगार व्हॅलीमध्ये आम्हाला पाऊस, ढग आणि मेघाच्छादित आभाळ हेच कायम भेटीला होतं. तक्रार नव्हे पण पॅनोरामिक रूटचा सगळा विचका पावसाने आणि आभाळाने केला होता. उंच डोंगरमाथ्यावरून दिसणारी इतर शिखरं आणि खोल दऱ्यात वसलेल्या गावांचा उंचावरून दिसणारा नजारा या दोन्ही गोष्टींना आम्ही मुकलो होतो. इथे मात्र ती सारी कसर भरून काढण्याचा प्रयत्न हा निसर्ग करणार आहे असं आश्वासक वातावरण आम्हाला काल आल्या क्षणापासून वाटू लागलं होतं.

आपण आज लेपेना व्हॅलीच्या दिशेने जाणार आहोत. आमच्या "गाईडने" आम्हाला सांगितलं. इथे असणार त्या दऱ्या किंवा शिखरं त्यामुळे त्यात काय असा भाव आमच्या चेहेऱ्यावर. खरंतर या भागाची काहीच माहिती जरी आत्तापर्यंत नव्हती तरी लोगारच्या पहिल्या टप्प्याने आम्हाला खूपच विस्मयचकित केलं होतं. इथे त्यापेक्षा आणखी वेगळं काय असू शकेल याचा अंदाज नव्हता. पण निसर्गाच्या साथीने त्याची चुणूक तर आम्ही बघितली होतीच आता अनुभव घ्यायचा होता.

रस्ता तसा बोवेक (Bovek ) पर्यंत सरळ आहे तेव्हा उगीच त्या जीपीएसची कटकट नको असं जरी श्रीशैल म्हणाला तरी आवाज बंद ठेवून ते सुरूच ठेवलं होतं. निम्मा रस्ता आलो आणि उजवीकडे विस्तीर्ण पठार आणि हिरवळ दिसली. माणसही दिसत होती. जरा नीट लक्ष द्या, काहीतरी "ऍक्टिव्हिटी" दिसते आहे. हे म्हटल्यावर त्याकडे लक्ष देणंलं. इतक्यात काही जण तिथे योगासनं करताना दिसले. झालं समोरच्या डोंगरांची आडवी रांग पार्श्वभूमीला येईल या बेताने याने गाडी हमरस्त्यापासून उजवीकडे छोट्या रस्त्यावर घेतली. तिथे मग याचं हॅण्डस्टॅण्ड, सर्वांगासन वगैरे सुरु. त्याच्या फोटोंची जबाबदारी माझी. मला समोर आलेल्या सूर्यामुळे धड काही दिसत नव्हतं. त्यात समोरून एखादी गाडी येत नाही ना या कल्पनेने उगीचच जीव खालीवर, पण हा मात्र मजेत. इथे वेळ खूप छान गेला. वातावरणाची, त्या मोकळ्या हवेची एक वेगळीच धुंदी मनावर होती की इथून हलू नये असं वाटावं. पण हे काही आमचं इप्सित ठिकाण,  डेस्टिनेशन, नव्हतं!



बोवेकच्या दिशेने आम्ही निघालो. अर्थात बोवेकाला आम्ही शहरात जाणार नव्हतो तर तिथे उजवीकडे वळून आम्हाला लेपेना व्हॅलीचा रस्ता घ्यायचा होता. ते वळण जवळ आलं आणि याच्या लक्षात आलं. कॅमेऱ्यातलं एस डी कार्ड काल फोटो ट्रान्सफर करण्याकरता पीसी मध्ये काढून ठेवलं ते पुनः कॅमेऱ्यात ठेवायचं राहून गेलं. त्यामुळे चला आता बोवेकला जाऊ आणि नवीन कार्ड घेऊ या.



गाडी उजवीकडे घेण्याऐवजी डावीकडे वळवून शहराच्या दिशेने निघालो. सिटी सेंटरमध्ये गाडी उभी केली आणि चौकशीला बाहेर पडलो. प्रथमदर्शनी हे गाव झोपाळू गाव आहे हे लक्षात येतं. आपल्याकडल्या गावांमधला जिवंतपणा ( म्हणजे गडबड गोंधळ) इथे अभावानेच आढळतो. तुरळक रहदारी आणि त्याहीपेक्षा बंद दुकानं यात आपण चौकशी कोणाकडे करायची हा प्रश्नच होता. एका माणसाने आम्हाला पोस्टात चौकशी करण्याचा सल्ला दिला. पोस्टात कार्ड मिळेल पण एस डी कार्ड कसं मिळणार? मनातल्या शंका कुशंका बाजूला ठेवून तिथे गेलो आणि विचारणा केली. कार्ड अर्थातच मिळालं नाही पण निदान ते कुठे मिळेल ते तिथल्या माणसाने सांगितलं. गाडी फिरवून आम्ही परत फिरलो आणि त्या दुकानापाशी आलो तर ते बंद ! शेजारच्या दुकानात चौकशी केली तर तो म्हणाला ती बाई सुटटी घेऊन (?) दीड महिना बाहेर गावी गेली आहे. सत्यानाश ! आता मोबाईलच्या फोटोंवर समाधान मानावे लागणार म्हणून चडफडत परत फिरणार तोच तो दुकानदार म्हणाला, तुम्ही जिथे गाडी आत घेतली ना, म्हणजे बोवेकच्या फाट्यावर तिथेच एक हार्डवेअरचे दुकानं आहे तिथे तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे इतका वेळचा आमचा हा फेरफटका मूर्खपणाचा म्हणायचा असं मनात म्हणत गाडी त्या दिशेने घेतली.

पण खरंच तो मूर्खपणा होता का? काही वेळा अशी डायव्हर्शन्स खूप छान असतात तसच हेही होतं. सुंदर, झोपाळलेलं असं ते शहर, गजबजाटाचा अभाव, शांतपणे स्वतःत बुडलेलं, आत्ममग्न, डोंगराच्या कुशीत वसलेलं ते गाव बघायला आम्ही तिथे यायला ते काही टुरिस्ट मॅपवरलं शहर नव्हे. हाही एक ऋणानुबंध म्हणायचा का? आपल्याला इथपर्यंत आणणारा?

फाट्याच्या अगदी सुरवातीलाच एक गोडाऊन वाटावं असं काहीतरी होतं आणि त्यात अगदी सुरवातीलाच ते एसडी कार्ड बघून आम्हाला हर्षवायू व्हायचा बाकी होता. घेतलं आणि आम्ही कूच केलं. खरंतर हातात तीन तीन मोबाईल असताना कशाला हवं हे सव्यापसव्य? असा विचार मनात आला पण कॅमेऱ्यातल्या फोटोंची सर मोबाइलमधल्या फोटोना येत नाही हे चक्षुर्वैसत्यं पाहिलं असल्यामुळे चर्चेला वाव नव्हता.

आपल्याला लेपेना व्हॅलीचा रस्ता हवा आहे. रस्ता सरळ आहे पण तुम्हीही लक्ष ठेवा. थोडक्यात नुसते सहप्रवासी होऊ नका जबाबदारी घ्या हा त्या सांगण्यातला गर्भितार्थ आम्हाला कळला. बाहेरच्या पाट्यांवर आम्हीही लक्ष ठेवू लागलो. वाटेत एक छान किल्ला लागला. बरीच लोकं तिथे फिरताना दिसली. थांबायचं का हे विचारून झालं पण श्रीशैलचा विचार दिसला नाही. त्याच्या डोक्यात काही वेगळं असेल म्हणून आम्ही फार लक्ष दिलं नाही. रस्ता तसा छान होता. वाहतूक फार नाही. झाडी रंगात न्हाहून निघालेली. रस्त्याला वळणं असली तरी धोकादायक नव्हती. एकूण प्रवास सुरळीत सुरु होता.


लेपेना व्हॅलीचा बोर्ड दिसला आणि आता उजवीकडे वळायचं, त्याप्रमाणे वळून उभ्या असलेल्या गाड्यांच्या अगदी शेवटी याने गाडी थांबवली. आम्हाला कळेना ही काही व्हॅली नक्कीच नाही. शेजारून नदी वाहत होती.




पाणी अगदी निवळशंख. पाण्याचा रंग बघून माणसाचा सारा शीण निघून जावा असा , त्याला सी ग्रीन म्हणाव की emerald का सरळ पाचू म्हणायचं हा आमचा संभ्रम. इथे चुनखडीचा दगड त्यामुळे पाण्याचा हा रंग. पण आता आम्ही इथे येऊन आठवडा होईल म्हणजे या रंगाचं नाविन्य ते काय? तेवढ्याकरता इथे?

             पुढील भाग येत्या मंगळवारी.



Monday 12 November 2018

SLOVENIA : SOCA VALLEY via BOHINJ

आता सरळ सोका व्हॅली असं आम्ही म्हणेपर्यंत इथून जाताना थोडं डी टूर करून एक तलाव आहे आणि तो फारसा दूरही नाही. अशी प्रस्तावना झाली तेव्हा ओळखलं की आमचं फायनल डेस्टिनेशन अजून खूप दूर आहे आणि तिथे पोहोचायला अजून खूप वेळ आहे. जरी आम्ही आमच्या रुटवरच गाडी घेतली होती तरी मध्ये फुटलेला फाटा मात्र कच्चा रस्ता असलेला होता. जीपीएस आम्हाला मार्ग दाखवत होतं. रस्त्यावरच्या पाट्याही दिसत होत्या. पण रस्ता इतका अरुंद, त्यात आमच्या पुढे एक बस होती. बसचा फायदा हा की समोरून वाहन येत नसे. त्यामुळे अगदी हळू आम्ही निघालो होतो. एका गावातल्या रस्त्यावर तर समोरासमोर आलेल्या बसने उद्भवलेला प्रश्न समोरच्याने माघार घेऊन सोडवला होता. पण इतकं सारं असलं तरी आम्हाला हवा असलेला बोहिंज तलाव दिसण्याचं चिन्ह नव्हतं. अचानक रस्ता जरासा रुंद झाला तेव्हा आशा पल्लवित झाल्या. एक पूल ओलांडला आणि गाडी तलावाशेजारी पार्क करून आम्ही उतरलो.



लेक ब्लेडसारखं भाग्य (?) याला नाही. त्यामुळे तसा हा निवांत आहे. दूरवर दिसणारे डोंगर, इथे नेहेमी दिसणारे अर्ध्यावर आलेले पांढरे ढगांचे पुंजके आणि क्षितिजापार आहे असा वाटणारा विस्तार असा हा बोहिंज. इथे आलो नसतो तर...... हा विचार मनात आला. खरंतर काहीच फरक पडणार नव्हता. आम्ही या सौन्दर्याला मुकलो असतो. लेक ब्लेड बघितल्यावर....... या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. पण लोकांच्या झुंडी नसलेला हा शांत तलाव, आहे हिमनदीपासून तयार झालेला, म्हणजे glacial lake आहे. इथला निवांतपणा तुमच्या आतपर्यंत पोहोचतो. हा Triglav Natioanal Park चा भाग आहे . म्हणजेच त्याच्या कोंदणात हे सौन्दर्य वसलेलं आहे.




सोका व्हॅली झाडलेस-झाबके

आता मात्र सरळ मुक्कामाला पोहोचायचं! हे कानावर जरी पडलं तरी मधेच कसलीतरी आठवण आल्यासारखं करून इथे मधेच अमुक आहे तेवढं बघून पुढे जाऊ असं तर हा म्हणणार नाही ना ही धास्ती कायम मनात होती. त्याला कारणही तसच होत. कुठेही जाण्यापूर्वी त्या देशाबद्दल आणि एकूणच तिथल्या बघावयाच्या गोष्टींबद्दल श्रीशैल जमेल तेवढी माहिती गोळा करतो. पण ही माहिती जुजबी, यात्रा कंपनीची नसते. याबाबतचे विविध ब्लॉग्ज, फोटो अशासारख्या गोष्टी त्याने नजरेखालून घातलेल्या असतात. ही याची चांगली सवय. पण..... कुठेही कसलीही नोंद घेऊन ठेवायची सवय नाही. सगळा भरवसा स्मरणशक्तीवर. कदाचित त्याच्या डोक्यात खूप गोष्टी असतात पण आम्हाला माहित नसतात. त्याचं एक कारण म्हणजे आमचं मन पूर्वग्रहदूषित असू नये हा त्याचा उद्देश !. पण यात होतं काय की आयत्या वेळी मग त्याला रस्त्यावरच्या नावाच्या पाट्यांवरून आठवण होते अरे हे खूप छान आहे इथे जाऊन मग पुढे जाऊ. हा प्रकार नॅचरल ब्रिज बाबत झाला होता. यात अनपेक्षित पण सुखद धक्काही असतो आणि काही वेळा अगदी ठरीव, पूर्ण प्लॅनिंग करून बंधनात राहिल्यासारखं एक एक टिक मार्क करत जाण्यातही मजा वाटत नसते. तर ते जाऊ द्या. आम्ही मार्गस्थ झालो!

आता झाडलंस- झाबके. टोलमीन हे जवळचं शहर. ते जीपीएस वर दिसत होतं म्हणजे निदान तिथवर तरी प्रश्न नसावा असं मानून आम्ही चाललो. रस्ता इथवर अधून मधून डोंगरातला, वळणांचा असला तरी मुख्य मार्ग होता त्यामुळे फारसा त्रास नव्हता. टोलमीनला आलो आणि आम्हाला झाडलंसची पाटी दिसली. हायसं वाटलं एकदम. पण अजून मुक्काम यायचा होता. रस्ता ओलांडून श्रीशैलने गाडी उजवीकडे घेऊन झपकन डाव्या रस्त्याला घेतली तर समोर पुढचा एकदम शार्प बेंड. रस्ता गावातून जाणारा, चढाचा. लागून असलेली घरं आणि अरुंद रस्त्यावर समोरून कोणी आलं तर बाजूला घेण्यासाठी जागा नाही. आमचं सुदैव की इथल्या प्रत्येक अवघड जागी आम्हाला सुखेनैव जात आलं, समोरून कोणी न येता. झाडलंस हे पायथ्यालगतचं गाव. आम्हाला जायचं होतं ते झाबकेला. पुढे जात राहिलो. डोंगरावरचा चढाचा रस्ता. आता अर्थातच वळणा वळणाचा, अरुंद आणि टोकदार वळणं असलेला. इथे घरं अगदीच एक एकटी आणि दूरवर. एकदाचं आमचं डेस्टिनेशन आलं आणि जीव भांड्यात पडला.

आमच्या अपार्टमेंटच्या मालकीण बाई स्वागताला आल्या. आमचा पहिला प्रश्न गाडी कुठे लावायची. इथेच दारात असं त्यांनी सांगितलं खरं पण तिथे विचित्र उतार होता. मग जाऊ दे इथे नको तिथे समोरच्या बाजूला थोडी आत पार्क कर असं ती म्हणाली. जेमतेम एक-दीड गाडीचा अरुंद रस्ता. इथे गाडी वळवणं अशक्य मग पुढे जा तिथे ते सव्यापसव्य करा. समोर दरी मागे डोंगर वगैरे आणि फिरवून आणा. घरात आलो आणि सगळा शीण गेला. या सौन्दर्याच्या प्रेमात पडायचं खरं, पण इथवर येईपर्यंत धाकधुक जी असते तिचा ताणही येतो. समोरासमोरच जुळी वाटावी अशी दोन घरं, या बाईंची. एका घरात आम्ही. घराला मागे बाल्कनी, मागच्या बाजूने हा पहिला मजला, पुढच्या बाजूने तळमजला. मागे दरीत उतरत जाणारा डोंगराचा भाग. समोर असाच डोंगर आणि अशीच विरळ घरं. या इथे बहुधा अपार्टमेंटची जबाबदारी बायकांची. त्यात नवऱ्याचा सहभाग फारसा दिसला नाही. त्याचा मधमाशा पालन व्यवसाय. घरात गुरं होती. थोडीशी उतारावरच्या जमिनीतली शेतीही.




घर प्रसन्न होतं. चहुबाजूने फुलं दिसत होती आणि मुख्य म्हणजे या गावात आम्ही सूर्य बघितला



भारतात राहून नको करणाऱ्या याच सूर्याची आम्ही किती आतुरतेने वाट बघत होतो याचं आम्हालाच मग आश्चर्य वाटायला लागलं. घराचा प्रसन्नपणा आमच्या आतपर्यंत पोहोचला, त्याला जोड मिळाली स्वच्छ, निरभ्र अशा वातावरणाची. घरभर फिरून होत आहे तोवर मालकीणबाई हजर झाल्या. सोबत एका ट्रेमध्ये छोट्या ग्लासमध्ये वाईन, त्याच्या तळात असलेल्या, आम्हाला आतापर्यंत परिचित झालेल्या बेरीज आणि दूध व घरचा मध. आपल्याकडे म्हणतात तसं थोडसंच दिलं आहे हो, हे वाक्यही. कुठेही गेलं तरी माणूस सारखाच हे पदोपदी प्रत्ययाला येतं. हे दिल्यानंतर मग तिने आमचा प्रोग्रॅम काय त्याची चौकशी केली.

त्यांच्या घरी दूध मिळू शकेल पण एकदिवस आधी सांगावं लागेल कारण बाई घरातलं सगळं आटोपून नोकरी करत होत्या, त्यामुळे सकाळी त्यांची गडबड असे. कोणतीही मदत लागली तरी सांगा हे ही सांगून झालं. संध्याकाळ उतरू लागली होती. "तरीही जर तुम्हाला उत्साह असेल तर असेच सरळ रस्त्याने पुढे जायला हरकत नाही. चांगला व्यायाम होईल." असा सल्ला देऊन त्या बाहेर पडल्या.

सोबत आणलेल्या पावाकरता हा मध उपयोगी पडेल हे आधी जाणवलं. आमच्या सोबत चहाचे सॅशे असतात त्यामुळे चहाचा प्रश्न पडत नाही. सगळा शीण त्या चहात बुडवून आम्ही चालत बाहेर पडलो.

अगदी अरुंद रस्ता. तुरळक घरं आणि क्वचितच समोर आलेली एखादी व्यक्ती. बाकी इतका उभा पहाड सोबतीला आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी खोल दरी , हिवाळ्याआधी रंग उत्सव साजरा करणारी झाडं, या सगळ्यामध्ये आम्हाला एकटेपणाची जाणीव होण्याची काहीच शक्यता नव्हती. आम्ही पुढे गेलो तर वळणावर समोरून येणाऱ्या आमच्या मालकीणबाई आणि बरोबर त्यांची वीस बावीस वर्षाची मुलगी. "आम्ही संध्याकाळी दोघी बाहेर पडून चालून येतो, तेवढाच व्यायाम. एरवी कामापुढे हे शक्य नसतं." असं हसतमुखाने सांगून त्या निघाल्या. मुलगी मतिमंद होती. त्यामुळे तर ही जबाबदारी त्यांच्यावरच पडत असावी.

परत येताना परसदारं बघत येत होतोरस्त्याच्या एका बाजूला उतार आणि दुसऱ्या बाजूला चढ. तसं खडतर आयुष्य. घरापुढच्या गाड्याही कशा पार्क करत असाव्यात हा प्रश्न पडेल असे उतार किंवा चढ. एका ठिकाणी कोणीतरी आमच्याकडे बघत आहे असा भास झाला. पण तो भास नव्हता. कुंपणापलीकडच्या गवतामध्ये एक मेंढा होता. दयनीय स्वरात ओरडून आमचं लक्ष वेधून घेत होता. आमच्या दिशेने कुंपणाकडे येतं होता.

पूर्ण अंधार होण्याआधी घरी परतायला हवं होतं. त्यामुळे फारसे कुठे न रेंगाळत परत फिरलो. घरात आलो आणि हीटरची आठवण झाली. रात्री थंडीचा कडाका असणार होता. म्हणजे कदाचित हीटरची गरज भासू शकली असती. पण इथे कुठेच तशी बटणं दिसली नाहीत. त्यामुळे बाईंना शेजारच्या घरी जाऊन त्रास देणं आलं. त्रास वाटला तरी काही गोष्टींना पर्याय नसतो. दार ठोठावून विचारलं तर हसतमुखाने त्यांनी सांगितलं, दोन्ही घरांचा कंट्रोल त्यांच्याकडेच होता आणि त्या रात्री तो सुरु करणार होत्या.

                        पुढील भाग येत्या मंगळवारी.

यातील सर्व फोटो श्रीशैल पत्की 

वि.सू. 
येथील प्रतिक्रिया आणि मला वैयक्तिक रित्या आलेल्या मेलमधे व प्रत्यक्ष प्रतिक्रियांमध्ये या वर्णनाच्या प्रभावीपणात फोटोंचा अतिशय महत्वाचा भाग असल्याचं म्हटलं आहे जे सर्वार्थाने खरं आहे. त्या अनुषंगाने एक सूचना अशी आली की फोटो क्रेडिट्स देण्यात यावी. श्रेय हे ज्याचं त्याला मिळायला हवं हे मलाही पूर्णपणे पटतं. यास्तव या लेखापासून तो उल्लेख येथे करत आहे.