Monday, 5 November 2018

SLOVENIA : LAKE BLED


दीपावली शुभचिंतन 


पॅनोरामिक रूटने निराशा केली हे खरं पण तरीही आम्ही धुक्यातलं सौंदर्य बघितलं ते अप्रतिम होतं. परतीच्या वाटेवर मग त्याचीच चर्चा सुरु होती. तसही याप्रकारचं धुकं आमच्या दोघांच्या पाहण्यात नव्हतं. ऐकली होती ती अपूर्वाई सारख्या पुस्तकातली वर्णनं पण अनुभवाची गोष्टच वेगळी. धुक्यालाही एक वास असतो, गंध असतो, शब्दात कसा वर्णायचा? तो तर स्वतःच प्रचीती घेण्याचा विषय. ती संधी आम्हाला त्या रूटने दिली त्याबद्दल त्याचे शतशः आभार मानून आम्ही सोलकावाला उतरलो.

घरकी मुर्गी तसं या गावाचं झालं. लोगारस्का डोलीनाला जाण्याचं, पॅनोरामिक रूटचा पायथा ही त्याची ओळख ! आम्ही त्याच्याकडे स्वतंत्रपणे बघितलं नाही याचा पश्चात्ताप झाला असता पण थोडक्यात वाचलो! साविन्या नदीला छेद देत तिला हरवण्याच्या थाटात रोबानोव कोट कडून आलेला रस्ता नंतर मात्र या नदीच्या इतका प्रेमात पडला आहे की तिची साथ तो क्वचितच सोडतो. पुढे आल्यानंतरची लागणारी खिंड दोघांना अलग करू पाहते पण हे पठ्ठे प्रेमवीर नंतर पुनः जवळ येतात. स्वतःचं वेगळं अस्तित्व टिकवूनही साहचर्य कसं टिकवावं याचा हा उत्तम वस्तुपाठ!

युरोपात ख्रिश्चन धर्म सर्वदूर आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण जावं तिथे प्रत्येक देशात त्यांच्या चर्चची बांधणी मात्र वेगळी आणि खास असते. सोलकावा चर्चही अपवाद कसा असेल? एका छोट्याशा उंचवट्यावर असलेलं ते पांढरेधोप चर्च नजर खेचून घेणारं आहे.

त्याच्या समोरचा रस्ता ओलांडल्यावरचा पूलही निवांत आणि आत्ममग्न असा. या गावाचा निरोप घेताना त्यामुळे काहीसं जडच गेलं. पण या आधी म्हटलं त्याप्रमाणे या अशा प्रवासातही आपल्याला "गुंतायचे नाही" हा धडा वारंवार गिरवावा लागतोच. त्याप्रमाणे आम्ही मग लेक ब्लेडकडे निघालो.


ज्याला आपण टूरिस्टीक म्हणतो त्याच उत्तम उदाहरण म्हणजे लेक ब्लेड. किंबहुना स्लोवेनिआ माहित नसणं शक्य आहे पण लेक ब्लेड माहित असतं. हे कर्तृत्व निःसंशय आपल्याकडल्या यात्रा कंपन्यांचं. पण आपल्याकडे होतं काय की त्या लेखांमध्ये किंवा त्यांच्या जाहिरातीमध्ये असतं त्यापलीकडे त्या देशात काही असूच शकत नाही या श्रद्धेने यात्रेकरू  (श्रद्धा आली म्हणजे यात्रेकरूच म्हणणं क्रमप्राप्त आहे ) मग हिरीरीने मतं मांडत सुटतात. लेक ब्लेड हे तसं नावारूपाला आलेलं ठिकाण. आहे सुंदर. आपल्याकडून थेट स्लोवेनियाला विमान सेवा नाही म्हणून मग शेजारच्या क्रोएशियात किंवा बेलग्रेड करून असे एक दिवस इथे येतात आणि स्लोव्हेनिया बघितल्याच्या आनंदात परततात. आम्हालाही असाच एक ग्रुप भेटला. चौकशी करताना त्यांच्या "किती दिवस राहणार तुम्ही" या प्रश्नाच्या उत्तरात दहा दिवस म्हटल्यावर अचंबित नजरेने "एवढं आहे काय या देशात?” असं त्यांनी विचारलं. आम्हीही तसं विशेष काही नाही, आम्ही आपले जरा इथे दऱ्या खोऱ्यातून फिरतो आहोत म्हटल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.

ढगाळ हवामानाने आमचा इथेही पाठपुरावा केला. इथला विस्तीर्ण तलाव, त्यातलं ते अतिशय देखणं चर्च, काठावरची तितकीच सुंदर रंगी बेरंगी झाडं आणि या सगळ्यावर पहारा देण्याकरताच जणू इथे ठाकला आहे असा तो किल्ला. स्वच्छ उन्हात हे सारं कॅमेऱ्यात टिपायला किती मजा येईल हे स्वप्नरंजनच राहिलं.


या शहरात आमचं अपार्टमेंट तलावापासून हाकेच्या अंतरावर पण गल्लीत होत. आम्हाला तो (तलाव) दिसत होता आणि नव्हताही. एका चिंचोळ्या गल्लीतून इतक्या विस्तीर्ण तलावाला बघायचं आमच्या जीवावर आलं. पोहोचलो ते संध्याकाळच्या सुमारास, पण उजेड असेतो. त्यामुळे मग वेळ न घालवता बाहेर पडणं हा आमचा पहिला अजेंडा होता. पण.........

गाडी वळवून त्या गल्लीत घेतल्यानंतर आमचा घरमालक आमच्या स्वागतालाच आला. कारणही तसच होत. अगदी आडनिड्या जागेत गाडी पार्क करायची होती. उतार, चढ अशी विचित्र जागा. शेजारी गाड्या उभ्या आणि त्यात तिला बसवायची हे सव्यापसव्य होत. मदतीकरता तो धावून आला होता. ते पार पाडून आम्ही सामान टाकलं, जागेचा ताबा घेतला पण हा पठ्ठ्या गप्पांच्या मूडमध्ये. होताही देखणा, उंचापुरा. घर दाखवलं आणि आलोच म्हणून नाहीसा झाला. येताना हातात छोटा ट्रे, त्यात तीन छोटे बिस्कीट पॅक्स आणि तीन खेळण्यातले असावेत असे लहान ग्लास, त्यात सुंदर किरमिजी लाल रंगाची होममेड वाईन. तळाला काहीतरी दिसत होत, त्या ब्लु किंवा ब्लॅक बेरीज असाव्यात. हे वेलकम ड्रिंक. या भागात कदाचित ही पद्धत असावी कारण आत्तापर्यंत कोणीच आम्हाला वाईन दिली नव्हती.

आम्ही निरोप घेऊन निघालो ते थेट तलावाकडे. पायी हिंडलात तर पाय भरून येतील अशी व्याप्ती. तलावाकाठाने रस्ता. एका ठिकाणी असलेली खिंड म्हणजे तिथून फक्त गाड्या जातील. पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी खिंड आणि तलाव या मधून वाट काढलेली. एरवी मात्र व्यवस्थित फुटपाथ आहेत. रमत गमत चालायला इथल्यासारखं सुख नाही. तलावात दिसणारं  छोटसं  बेट आणि त्यावरच्या झाडीमध्ये लपणार नाही असं इथल्या पद्धतीचं सुरेख, पांढर धोप, सरळ उंच नजर वेधून घेणार चर्च. आम्हाला त्या चर्चमध्ये जाण्यात वेळ कमी आणि म्हणून अजिबातच रस नव्हता.काठावरच्या झाडांनी आता त्यांचे "रंग" दाखवायला सुरवात केली होती. समोरचा किल्ल्याकडे जाणारा रस्ता खुणावत होता पण काळोखाच्या सावल्या उतरत असताना वर जाण्यात काहीच हशील नाही असं मत पडलं.

या ठिकाणी अगदी उत्तम असं भारतीय रेस्टोरंट आहे. मालक आणि वेटर्स गोरे असले तरी गेल्या पंचवीस वर्षांपासून तिथे असलेला भारतीय शेफ आहे. गर्दीमुळे त्याला भेटता आलं नाही हा भाग वेगळा पण त्याच्या हाताला चव होती. केशराचा भरपूर वापर केलेला पुलाव आणि त्याआधीच्या भाज्या यांनी मन प्रसन्न झालं. खूप दिवसांनी आपलं आणि सुग्रास अन्न मिळालं होतं त्यामुळे त्याची गोडी अधिक होती.

दुसऱ्या दिवशी मग आटपून आम्ही गाडी घेऊनच बाहेर पडलो. एकतर किल्ल्यापर्यंत पायी जाण्या येण्यात वेळ गेला असता आणि आम्हाला आणखी एका ठिकाणी जाऊन मुख्य मुक्कामाला पोहोचायचे होते. किल्ल्याजवळ पायथ्याशी पार्किंग आणि टॉयलेटस (आपल्याकडे याची वानवा असते म्हणून हे कौतुकाचं) भरपूर होती. चढ म्हणावा असा नाही त्यामुळे दमणूक नाही. वर जाताना वेगवेगळ्या कोनातून आपल्याकडे बघणारा तलाव मात्र फार देखणा!

दाराशी तिकीट काउंटर. १० युरोचं  तिकीट. किल्ला असा काही प्रेक्षणीय आहे असं फोटोवरून किंवा बाहेरून वाटत नाही. त्यामानाने ही रक्कम जास्त वाटते. पण यावर श्रीशैलचं म्हणणं पटलं, इतका खर्च करून आल्यावर तसेच परत फिरण्याने काय साध्य होणार आहे? तेव्हा बघू या आणि परत जाऊ या. आम्ही आत गेलो तर ही जत्रा तिथे ! यात्रा कंपन्यांचं हे आवडतं ठिकाण आहे त्यामुळे कायमच इथे गर्दी असते.

किल्ला अगदीच यथातथा आहे. आवर्जून बघण्यासारखं काही नाही. पण , इथून दिसणारा तलाव, ते चर्च आणि सारा परिसर ! पैशाकडे बघून मागे फिरणं किती महागात पडलं असतं  त्याचा अंदाज आला. गर्दीमुळे जरी वाट बघायला लागत होती तरी आम्ही शांतपणे त्या लोकांना पुढे जायला देऊन निवांतपणे नंतर फोटो काढत होतो. या सगळ्यात वेळ मात्र जास्त गेला.

खाली आलो आणि आता निघू या असं म्हणताना आमच्या कालच्या बोलण्याची आठवण झाली. आपण या तलावाला गाडीतून का होईना एक फेरी मारू या. मग गाडी वळवून पुढे नेली तर तिथे बदकाबरोबर राजहंस दिसले. फ़ोटोकरता थांबायचं तर रस्ता अरुंद, गाडी पार्किंगमध्ये टाकण्याला पर्याय नाही. पण इथे त्याचे रेटस अवाच्या सव्वा. कारण हे दिवसाचं पार्किंग. आत घेतलेली गाडी पुनः बाहेर काढायला अवसर न देता, वाटेतला चिखल, कालच्या पावसामुळे झालेला, तुडवत अटेंडंट बाई आमच्याकडे आलीतिने पावती फाडण्याआधी तिला मग सांगितलं की आम्हाला फक्त समोर जाऊन फोटो काढायचे होते. पुढे काही बोलायला अवसर न देता ती म्हणाली, ओके, काहीच प्रश्न नाही, पण फार वेळ लावू नका.

माणसावर असलेला विश्वास या देशांमध्ये टिकून आहे. सर्वसाधारणपणे माणसं खरं बोलतात यावर त्यांचा विश्वास आहे कारण आपल्यासारखं पदोपदी फसवणूक करणारी माणसं तिथे नसावीत. आम्हीही दिल्या सवलतीचा गैरफायदा न घेता तिथून पुढे निघालो. पुढचा भाग टेकडीसारखा, चढाचा. तलाव मधेच दिसेनासा होई त्या झाडामुळे. एका ठिकाणी गाडी थांबवून उतरलो. आता आम्ही उंचावरून त्याला बघत होतो. तलावासारखा तलाव त्यात काय बघायचं, इथून तिथून काय वेगळा दिसणार का? या वाक्याची आठवण झाली. कदाचित बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असेल पण निदान आपल्याला तरी तो कॅलिडोस्कोपिक वाटतो आणि हे आपलं भाग्य आहे हे जाणवलं !

इथे येणं हे काही ठरवलेलं नव्हतं. सहज चक्कर मारायची तलावाला म्हणून आम्ही निघालो आणि इथे पोहोचलो. कोणत्याही गावाची भेट ही तिथलं रेल्वे स्टेशन (आणि आपल्याकडे एस टी स्टॅन्ड) बघितल्याशिवाय पुरी होत नाही असं म्हणतात. गावाचं महत्व, संस्कृती यांचा प्रत्यय इथे येतो असं म्हणतात.! यावेळी गाडीतून (कारमधून) हिंडताना विसरच पडला होता या गोष्टीचा. पण आम्हाला पडला तरी सुप्त इच्छा शक्ती जागृत असावी. तिने आम्हाला त्या छोट्याशा, डोंगरात असलेल्या आणि तिथून पुढे कुठेच न जाणाऱ्या (? की असं वाटायला लावणाऱ्या ) रेल्वे स्टेशनला आणून सोडलं होतं.आता इथे फार रमण्यात अर्थ नव्हता. पण तरीही इथला कावा पिऊन पुढे जाऊ असा विचार करून आम्ही कावा कॅफे मध्ये गेलो. या कावाचा काश्मिरी कावाशी संबंध नाही कळल्यावर वाईटही वाटले पण या कावाने म्हणजे कॉफीने त्या सरदावलेल्या थंड हवेत जान आणली.

                (आपली भेट पुढील मंगळवारी)No comments:

Post a Comment