Monday 19 November 2018

SLOVENIA : TO LEPENA VALLEY

श्रीशैलने आमच्या या शेवटच्या टप्प्याचा लगेच आढावा घ्यायला सुरवात केली. इथे आपल्याला तीन रात्री आहेत. इथून आता पुनः राजधानी लुब्लिआनाला एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी आईन्डहोवनला परतणार. राजधानीतील किल्ला वगळता शहर तर स्लोव्हेनियातल्या पहिल्या दिवशीच पाहून झालं होतं. आता आमच्यापुढे मोठा प्रश्न होता, इतकं सुंदर घर, वातावरण आणि निसर्ग सोडून पुनः शहरात जायचं? की इथल्या मुक्कामात, राजधानीतील एक दिवस कमी करून इथे वाढवून घ्यायचा. दोन मुद्दे होते, एक, घरात राहता येईल का? ते पुढच्या बुकिंगवर अवलंबून असणार होतं. म्हणजे बाईंना विचारणं आलं. त्याबद्दल आत्ता काहीच ठरवता येणार नव्हतं. दुसरं म्हणजे गाडीचं रेंट कॉन्ट्रॅक्ट एका दिवसाने वाढवून घेतलं नाही तर दंड भरावा लागणार होता. आणि ती रक्कम बरीच असणार होती. आत्ता तर रात्र झाली होती. उद्याच्या कामामध्ये ही कामं प्राधान्यक्रमात ठेवून आम्ही झोपी गेलो.

काही जागांचे आणि आपले ऋणानुबंध असतात की काय असं वाटू लागतं. काल आलो इथे तेव्हापासून सूर्य महाराजांचा मुक्काम इथे आला. युरोपात, किंवा या पाश्चिमात्य देशांमध्ये ही नवलाईची गोष्ट. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि अनाघ्रात निसर्ग. यापरते आम्ही आणखी काय मागणार? प्रवासातल्या या दोन गोष्टींचं प्लॅनिंग आपल्या हातात नसतं. तो भाग नशिबावर सोपवायचा. आतापर्यंत लोगार व्हॅलीमध्ये आम्हाला पाऊस, ढग आणि मेघाच्छादित आभाळ हेच कायम भेटीला होतं. तक्रार नव्हे पण पॅनोरामिक रूटचा सगळा विचका पावसाने आणि आभाळाने केला होता. उंच डोंगरमाथ्यावरून दिसणारी इतर शिखरं आणि खोल दऱ्यात वसलेल्या गावांचा उंचावरून दिसणारा नजारा या दोन्ही गोष्टींना आम्ही मुकलो होतो. इथे मात्र ती सारी कसर भरून काढण्याचा प्रयत्न हा निसर्ग करणार आहे असं आश्वासक वातावरण आम्हाला काल आल्या क्षणापासून वाटू लागलं होतं.

आपण आज लेपेना व्हॅलीच्या दिशेने जाणार आहोत. आमच्या "गाईडने" आम्हाला सांगितलं. इथे असणार त्या दऱ्या किंवा शिखरं त्यामुळे त्यात काय असा भाव आमच्या चेहेऱ्यावर. खरंतर या भागाची काहीच माहिती जरी आत्तापर्यंत नव्हती तरी लोगारच्या पहिल्या टप्प्याने आम्हाला खूपच विस्मयचकित केलं होतं. इथे त्यापेक्षा आणखी वेगळं काय असू शकेल याचा अंदाज नव्हता. पण निसर्गाच्या साथीने त्याची चुणूक तर आम्ही बघितली होतीच आता अनुभव घ्यायचा होता.

रस्ता तसा बोवेक (Bovek ) पर्यंत सरळ आहे तेव्हा उगीच त्या जीपीएसची कटकट नको असं जरी श्रीशैल म्हणाला तरी आवाज बंद ठेवून ते सुरूच ठेवलं होतं. निम्मा रस्ता आलो आणि उजवीकडे विस्तीर्ण पठार आणि हिरवळ दिसली. माणसही दिसत होती. जरा नीट लक्ष द्या, काहीतरी "ऍक्टिव्हिटी" दिसते आहे. हे म्हटल्यावर त्याकडे लक्ष देणंलं. इतक्यात काही जण तिथे योगासनं करताना दिसले. झालं समोरच्या डोंगरांची आडवी रांग पार्श्वभूमीला येईल या बेताने याने गाडी हमरस्त्यापासून उजवीकडे छोट्या रस्त्यावर घेतली. तिथे मग याचं हॅण्डस्टॅण्ड, सर्वांगासन वगैरे सुरु. त्याच्या फोटोंची जबाबदारी माझी. मला समोर आलेल्या सूर्यामुळे धड काही दिसत नव्हतं. त्यात समोरून एखादी गाडी येत नाही ना या कल्पनेने उगीचच जीव खालीवर, पण हा मात्र मजेत. इथे वेळ खूप छान गेला. वातावरणाची, त्या मोकळ्या हवेची एक वेगळीच धुंदी मनावर होती की इथून हलू नये असं वाटावं. पण हे काही आमचं इप्सित ठिकाण,  डेस्टिनेशन, नव्हतं!



बोवेकच्या दिशेने आम्ही निघालो. अर्थात बोवेकाला आम्ही शहरात जाणार नव्हतो तर तिथे उजवीकडे वळून आम्हाला लेपेना व्हॅलीचा रस्ता घ्यायचा होता. ते वळण जवळ आलं आणि याच्या लक्षात आलं. कॅमेऱ्यातलं एस डी कार्ड काल फोटो ट्रान्सफर करण्याकरता पीसी मध्ये काढून ठेवलं ते पुनः कॅमेऱ्यात ठेवायचं राहून गेलं. त्यामुळे चला आता बोवेकला जाऊ आणि नवीन कार्ड घेऊ या.



गाडी उजवीकडे घेण्याऐवजी डावीकडे वळवून शहराच्या दिशेने निघालो. सिटी सेंटरमध्ये गाडी उभी केली आणि चौकशीला बाहेर पडलो. प्रथमदर्शनी हे गाव झोपाळू गाव आहे हे लक्षात येतं. आपल्याकडल्या गावांमधला जिवंतपणा ( म्हणजे गडबड गोंधळ) इथे अभावानेच आढळतो. तुरळक रहदारी आणि त्याहीपेक्षा बंद दुकानं यात आपण चौकशी कोणाकडे करायची हा प्रश्नच होता. एका माणसाने आम्हाला पोस्टात चौकशी करण्याचा सल्ला दिला. पोस्टात कार्ड मिळेल पण एस डी कार्ड कसं मिळणार? मनातल्या शंका कुशंका बाजूला ठेवून तिथे गेलो आणि विचारणा केली. कार्ड अर्थातच मिळालं नाही पण निदान ते कुठे मिळेल ते तिथल्या माणसाने सांगितलं. गाडी फिरवून आम्ही परत फिरलो आणि त्या दुकानापाशी आलो तर ते बंद ! शेजारच्या दुकानात चौकशी केली तर तो म्हणाला ती बाई सुटटी घेऊन (?) दीड महिना बाहेर गावी गेली आहे. सत्यानाश ! आता मोबाईलच्या फोटोंवर समाधान मानावे लागणार म्हणून चडफडत परत फिरणार तोच तो दुकानदार म्हणाला, तुम्ही जिथे गाडी आत घेतली ना, म्हणजे बोवेकच्या फाट्यावर तिथेच एक हार्डवेअरचे दुकानं आहे तिथे तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे इतका वेळचा आमचा हा फेरफटका मूर्खपणाचा म्हणायचा असं मनात म्हणत गाडी त्या दिशेने घेतली.

पण खरंच तो मूर्खपणा होता का? काही वेळा अशी डायव्हर्शन्स खूप छान असतात तसच हेही होतं. सुंदर, झोपाळलेलं असं ते शहर, गजबजाटाचा अभाव, शांतपणे स्वतःत बुडलेलं, आत्ममग्न, डोंगराच्या कुशीत वसलेलं ते गाव बघायला आम्ही तिथे यायला ते काही टुरिस्ट मॅपवरलं शहर नव्हे. हाही एक ऋणानुबंध म्हणायचा का? आपल्याला इथपर्यंत आणणारा?

फाट्याच्या अगदी सुरवातीलाच एक गोडाऊन वाटावं असं काहीतरी होतं आणि त्यात अगदी सुरवातीलाच ते एसडी कार्ड बघून आम्हाला हर्षवायू व्हायचा बाकी होता. घेतलं आणि आम्ही कूच केलं. खरंतर हातात तीन तीन मोबाईल असताना कशाला हवं हे सव्यापसव्य? असा विचार मनात आला पण कॅमेऱ्यातल्या फोटोंची सर मोबाइलमधल्या फोटोना येत नाही हे चक्षुर्वैसत्यं पाहिलं असल्यामुळे चर्चेला वाव नव्हता.

आपल्याला लेपेना व्हॅलीचा रस्ता हवा आहे. रस्ता सरळ आहे पण तुम्हीही लक्ष ठेवा. थोडक्यात नुसते सहप्रवासी होऊ नका जबाबदारी घ्या हा त्या सांगण्यातला गर्भितार्थ आम्हाला कळला. बाहेरच्या पाट्यांवर आम्हीही लक्ष ठेवू लागलो. वाटेत एक छान किल्ला लागला. बरीच लोकं तिथे फिरताना दिसली. थांबायचं का हे विचारून झालं पण श्रीशैलचा विचार दिसला नाही. त्याच्या डोक्यात काही वेगळं असेल म्हणून आम्ही फार लक्ष दिलं नाही. रस्ता तसा छान होता. वाहतूक फार नाही. झाडी रंगात न्हाहून निघालेली. रस्त्याला वळणं असली तरी धोकादायक नव्हती. एकूण प्रवास सुरळीत सुरु होता.


लेपेना व्हॅलीचा बोर्ड दिसला आणि आता उजवीकडे वळायचं, त्याप्रमाणे वळून उभ्या असलेल्या गाड्यांच्या अगदी शेवटी याने गाडी थांबवली. आम्हाला कळेना ही काही व्हॅली नक्कीच नाही. शेजारून नदी वाहत होती.




पाणी अगदी निवळशंख. पाण्याचा रंग बघून माणसाचा सारा शीण निघून जावा असा , त्याला सी ग्रीन म्हणाव की emerald का सरळ पाचू म्हणायचं हा आमचा संभ्रम. इथे चुनखडीचा दगड त्यामुळे पाण्याचा हा रंग. पण आता आम्ही इथे येऊन आठवडा होईल म्हणजे या रंगाचं नाविन्य ते काय? तेवढ्याकरता इथे?

             पुढील भाग येत्या मंगळवारी.



No comments:

Post a Comment