Monday, 26 November 2018

SLOVENIA : SLAP KOZJAK via SOCA GORGE

लेपेना व्हॅलीचा बोर्ड दिसला आणि आता उजवीकडे वळायचं, त्याप्रमाणे वळून उभ्या असलेल्या गाड्यांच्या अगदी शेवटी याने गाडी थांबवली. आम्हाला कळेना ही काही व्हॅली नक्कीच नाही. शेजारून नदी वाहत होती. पाणी अगदी निवळशंख. पाण्याचा रंग बघून माणसाचा सारा शीण निघून जावा असा, त्याला सी ग्रीन म्हणाव की emerald का सरळ पाचू म्हणायचं हा आमचा संभ्रम. इथे चुनखडीचा दगड त्यामुळे पाण्याचा हा रंग. पण आता आम्ही इथे येऊन आठवडा होईल म्हणजे या रंगाचं नावीन्य ते काय? तेवढ्याकरता इथे?

या ठिकाणी एक मोठी घळ होती, नदीचं नाव सोका म्हणून ही. सोका गॉर्ज ! रौद्र, भीषण, अनाघ्रात सौन्दर्य म्हणजे स्लोव्हेनिया हे आम्हाला पदोपदी जाणवत होतं. प्रत्येक ठिकाणाचा अनुभव वेगळा आणि नवा. इथे सौन्दर्य नक्कीच होतं, पण रौद्र नाही आणि भीषण तर अजिबात नाही. इथल्या वातावरणातल्या शांततेने त्याला आणखी गडद केलं होतं. स्तिमित होणं म्हणजे काय याचा प्रत्यय इथे पावला पावलावर आम्ही घेत होतोनदीचा प्रवाह या दगडातून वाहत असता त्याच्या जोराने ते महाकाय दगड कापत ती पुढे जात आहे. तो नदी आणि अजस्त्र खडक यांचा संग्राम म्हणजे ही सोका गॉर्ज! हे पांढुरके चुनखडीचे खडक आणि त्यांना फोडून काढणारी नदी, पण दोघेही तितकेच तुल्यबळ. दगड कापले जात होते पण अढळपणे उभे होते आणि त्या कापल्या गेलेल्या दगडांमधून तितक्याच तडफेने नदी आपली पुढची मार्गक्रमणा करत होती. जितका दगडांचा विरोध वाढत होता तितका तिचा जोर. याला संग्राम कसा म्हणायचं? हे तर शिव पार्वतीचं युगुल नाट्य असावं किंवा सर्पमैथुन , असं इथे बघताना वाटत होतं! प्रेमाने पुरेपूर ओथंबलेलं आणि तरीही एकमेकांना घायाळ करून सोडणारं, दमवणारं आणि कस बघणारं !

त्या सौन्दर्याचा आस्वाद घेता यावा याकरता तिथे एक सुंदर, झुलणारा पूल बांधलेला होताआमच्या योगीराजांना मग तिथे मयूरासनाची हुक्की आली. त्या दगडावर, जरा निसटलं तर जलस्नान घडावं अशा अवघड जागी त्याचं ते मयूरासन बघण्याकरता मला मात्र कॅमेऱ्याचा डोळा वापरावा लागत होता.गॉर्ज बघितल्यावर Gorgeous म्हणजे काय याचा अर्थ पोहोचला. किती अंगाने ही गॉर्ज बघता यावी! तसा हा देश पर्यटन नकाशावरचा नव्हे, त्यातून आपल्याकडच्या पर्यटन कल्पनेत तो कुठेच बसत नाही. तरीही इथे आलेल्या १५-२० गाड्यांमधून लोक त्याचा आनंद घेत होते म्हणजे आता कुठेतरी पर्यटकांपर्यंत हा देश पोहोचण्यास सुरवात झाली असावी.

लेपेना व्हॅली अजून बरीच पुढे होती. आम्हाला वाटलं की असेच पुढे निघून जायचे असणार पण बघतो तर सगळ्याच गाड्या माघारी फिरत होत्या. सगळेच माघारी जात आहेत तर आपण पुढे जाऊन बघू म्हणून आम्ही काही अंतर पुढे गेलो पण अंतराचा अंदाज लागे ना. तेव्हा आता परत फिरणे इष्ट असा विचार करून माघारी फिरलो. तसा हा पाहण्याचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा लवकर पार पडला होता,  आमच्या कल्पनेप्रमाणे, म्हणजे आता घरी परतून आराम असा आमचा समज झाला. वाटेत किल्ला होता. पण इथे येतानाच बोलणं झालं होत की तितका काही इंटरेस्टिंग वाटत नाही म्हणजे थांबणे नसेल अशी आमची कल्पना. ती खरी होती पण कोबारीड आलं आणि गाडी वेगळ्या दिशेला वळली. आपण इथला स्लाप (धबधबा) कोझ्याक बघू या. रिन्का बघितला होता, आता हा.

गाडी एका पुलापाशी आली. हा नेपोलियन पूल. इथून पुनः त्या सोका नदीचं दर्शन घेतलं. इथल्या नदीकडे बघताना भान हरपणे म्हणजे काय ते कळतं. निवांतपणे नदीचा तो वाहण्याचा सूर ऐकत डोळे मिटून शांत बसलं तर तो मन थाऱ्यावर येण्याकरता चांगला स्ट्रेस रिलीफ होईल.

पूल ओलांडला आणि कोझ्याकची पाटी दिसली. गाडी त्या दिशेने जाऊ लागली. माहितीप्रमाणे पुलानंतर लगेच येणारा धबधबा दिसण्याचं काहीच चिन्ह नव्हतं. पण पुढला भाग मोहून टाकणारा होता. भूल पडावी तसे आम्ही पुढे पुढे जात होतो. जीपीएस सुद्धा बहुधा गंडलं असावं. एका गावात आलो, ड्रेझनिका नाव त्याचंगावाच्या शेवटी असलेल्या चर्चपर्यंत येऊन जीपीएस तसेच पुढे रस्ता दाखवत होते. तर आमच्यापुढे, पुढे दरीत जाणारा रस्ता ? आणि, आणि खालच्या बाजूला एक घर. मागे फिरायला हवं हे कळत होतं  पण कसं? रस्ता अरुंद, एका बाजूला चढ दुसरीकडे दरी आणि वळणावर गाडी मागे घ्यायची? हा काही एक्सपर्ट ड्रायव्हर नव्हे. मी खाली उतरलो, श्रीशैल म्हणाला आई गाडीत नको तिलाही खाली उतरवा. मला कळत नव्हतं गाडी मागे घेणाऱ्या या ड्रायव्हरला मी काय सूचना द्याव्यात? होती कसोटीची वेळ, पण श्रीशैलने पार पाडली खरी.

परत फिरलो आणि अर्ध्या रस्त्यात आल्यावर याने गाडी थांबवली. समोर बघा. आपण गेलो होतो ते चर्च किती सुंदर दिसत आहे. विसाव्याकरता त्या ठिकाणी बाक होतं. मनावरचा ताण दूर झाला होता आणि इतकं सुंदर दृश्य कॅमेऱ्यात साठवल्याशिवाय पुढे जाणं हा त्या दृश्याचा अपमान होता तो आमच्याकडून होणे शक्य नव्हते.पुनः नेपोलियन ब्रिज असे म्हणत निघालो आणि गंमत म्हणजे आम्ही कुठे गंडलो तेही आम्हाला कळलं. कोझ्याकची पाटी आणि असलेला बाण बघूनच आम्ही ड्रेझनिकाच्या दिशेला वळलो होतो. पण गल्लत ही होती कि इथे गाडी पार्क करून उतरून पुढे चालत जाणे अपेक्षित होते. पूर्ण गृहपाठाअभावी झालेला हा गोंधळ होता. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे असे आम्ही एकटे नव्हतो. आम्हाला नंतर एक दोघांनी जेव्हा रस्ता विचारला तेव्हा हा सार्वत्रिक गोंधळ असावा असं वाटू लागलं. एखादी कठीण हाईक पार पडेपर्यंत असणारं टेन्शन आणि ती सुखरूप पार पडल्यावरचं समाधान आम्ही ड्रेझनिकाच्या फेऱ्यातून अनुभवत होतो. चला, त्या निमित्ताने ड्रेझनिका अनुभवलं!

कच्चा असला तरी रस्ता काही अंतरापर्यंत सरळ होता. नंतर मात्र दगड, गोटे, पाण्याचा प्रवाह, मधेच निसरड्या जागा वगैरे जे काही अपेक्षित असतं ते सगळं होतं. शेवटचा टप्पा अतिशय सुंदर, गुंगवणारा होता. उंचावरून पडणारं पाणी हे धबधब्याचं वैशिष्ट्य असणार त्यात नवल नाही. इथे त्या प्रवाहाने खोलवर केलेली दरी दिसत होती. दोन्ही बाजूला खडकांच्या उंच कमानी आणि वरून पडणाऱ्या त्या पाण्याला खडी ताजीम असावी असा सरंजाम. ते पर्वतही त्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन भारावले आहेत अशा त्या वातावरणात आपली गत आणखी वेगळी ती काय होणार?

एका उंचीवर, इथे साधारण एक माणूस व्यवस्थित जाऊ शकेल अशी फळी डोंगराच्या मध्यावर उंचावर ठोकलेली आहे. धरायला दोरी आहे ती धरून सरळ जात असता काहीच प्रश्न नाही. पण हा सिंगल ट्रॅक असेल तर. समोरून कोणी आले की मग धांदल उडते. खाली बघताना डोळे फिरतात उंचीमुळे आणि दोरी आणखी घट्ट धरून ठेवली जाते. सुदैवाने हा ऑफ सिझन त्यामुळे तुरळक गर्दीचा. तरीही काही तरुण आमच्या पुढे गेले होते ते परत येत असता हा प्रश्न आला पण त्यांनी समजुतीने आम्हाला ओलांडून जात तो सोडवला.

पाण्याचा धोधोटा, तो  वेडावणारा नाद. तेच, तसेच हिरवट निळसर छटा असलेलं नजरबंदी करणारं, निवळशंख पाणी, तळातले गोटे दाखवणारं. कितीही वेळ थांबलं तरी समाधान नव्हतं. आम्हाला तसा उशीर झालेला असल्याने आमच्या मागे गर्दी नव्हती त्यामुळे मनसोक्त थांबता आलं. पण परतीची वाट तर धरावीच लागणार! प्रसन्न मनाने "त्या"ला डोळ्यात साठवत निघालो.

                                पुढील भाग येत्या मंगळवारी.

यातील सर्व फोटो व व्हिडिओ श्रीशैल पत्की No comments:

Post a comment