Monday, 3 December 2018

TOLMIN GORGE VIA (?) Vršič PASS

पाण्याचा धोधोटा, तो नाद, वेडावणारा, तेच तसच हिरवट निळसर छटा असलेलं नजरबंदी करणारं, निवळशंख पाणी, तळातले गोटे दाखवणारं. कितीही वेळ थांबलं तरी समाधान नव्हतं. आम्हाला तसा उशीर झालेला असल्याने आमच्या मागे गर्दी नव्हती त्यामुळे मनसोक्त थांबता आलं. पण परतीची वाट तर धरावीच लागणार! प्रसन्न मनाने "त्या"ला डोळ्यात साठवत निघालो.

सं खरंतर अजून अंधार पडायला वेळ होता पण आज या अनुभवातून बाहेर येण्याची कोणाचीच तयारी नव्हती हे एक आणि आपण इतक्या सुंदर ठिकाणचे अपार्टमेंट घ्यायचे आणि अंधार पडल्यावर तिकडे पोहोचायचे हा त्या अपार्टमेंटवरचा अन्याय निदान आज तरी नको हा विचार पटण्याजोगा होता.


आमच्या घराच्या मागे एक दरीत उतरत जाणारा डोंगराचा भाग, दरी आणि समोर पुनः डोंगर. त्यावर आमच्या डोंगराप्रमाणेच तीन चार लेव्हलवरचा रस्ता आणि घरं. उतरत्या सूर्यप्रकाशातल्या त्या मावळतीच्या रंगछटांमध्ये ते दृश्य फारच मोहक वाटत होतं.  आज मालकीण बाईंना भेटून एक दिवस वाढवता येणार का ते बघायला हवं होतं. उद्या गाडीच्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल खुलासा झाला की आम्ही आणखी एक दिवस इथे राहायला मोकळे! मालकीणबाईनी सांगितले, सुदैवाने कोणाचे बुकिंग नव्हते. तसा हा ऑफ सिझन त्यामुळे प्रश्न नव्हता तरीही.......

दुसऱ्या दिवशी गाडीबद्दलची निश्चन्ती झाली आणि मग श्रीशैलने एक गुगली टाकला.
कालचा रस्ता कसा होता?
कसा म्हणजे?
काही कठीण वगैरे वाटलं का?
नाही.

मग त्याच रस्त्याने आपण आज पुढे जायचं आहे. पुढे थोडासा वळणा वळणाचा आहे. विरसीच (Vršič) पास म्हणून आहे तिथून आपण Cranska Gora ला जायचं आहे. रस्ता आहे चांगला पण तिथे एकूण ५० शार्प बेण्डस ( अतितीव्र उतार असलेली वळणं किंवा चढ ) आहेत. पण आज तुम्ही बघितलेलं आहे की तसा काही माझ्या ड्रायविंगबद्दल प्रश्न नाही . तेव्हा तसे जाऊ या.

आम्ही निघालो. बोवेक पर्यंत अगदी सरळ रस्ता त्यानंतर सुध्दा लेपेना फाट्यापर्यंत काही भीती वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. पण जसे आम्ही पुढे सरकलो तसे रस्त्याचे स्वरूप लक्षात येऊ लागले. क्षणात तो इतका झटकन वळे आणि त्या वळणावर चढ असे की छाती दडपायला लागली. लवकर ही वळणं संपून जाऊ दे असं म्हणत मी मनात त्यांची संख्या मोजत होतो. खरंतर त्याची काहीच गरज नव्हती कारण प्रत्येक वळणावर त्याचा क्रमांक लिहिलेला होता. आता अकरा राहिली फक्त असं म्हणत आहोत तर गाडी एका बाजूला घेऊन आम्ही थांबलो. हाच तो विरसीच पास, या ज्युलियन आल्प्समधलं सर्वोच्च ठिकाण. समोर ज्युलियन आल्प्समधील हिमाच्छादित शिखरं. इथे विसाव्याची जागा. सगळ्या गाड्या थांबलेल्या. समोर उभे कडे असलेला पर्वत. आम्ही त्याकडे विस्मयाने पाहत आहोत. स्वच्छ सूर्यप्रकाशात ती शिखरं तळपत आहेत. इथे गाडी पार्क करून हाईक करणारे दिसत होते. काही जण सायकलवरून या अवघड जागी आले होते.  
थंडी आहेच पण आत्ता या सगळ्या मोहमायेपुढे ती जाणवत मात्र नाही. आत्ता आम्हाला झाडांचे रंग भूल घालत नाहीत. चितमपल्लींच्या रानातल्या गोष्टींमध्ये एक मोराविषयीची आहे. समोर वाघ दिसला की तो खिळून उभा राहतो त्याच्याकडे बघत. त्याला मग बाकी कशाचं भान उरत नाही. आमची अवस्था काही वेगळी नव्हती. तिथे मग फोटो सेशन झालं आणि मनसोक्त वेळ तिथे काढल्यावर आठवण आली आपल्याला जायचं आहे तर क्रान्सका गोरा इथे, तेव्हा आत्ता इथे थांबून कसं चालेल? निघालो, आणखी एका वळणावर दगडांच्या मांडून ठेवलेल्या लगोऱ्या! काय असेल यांचं महत्व कोण जाणे पण प्रत्येक ठिकाणी या आम्हाला दिसत राहिल्या, इथे तर एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरपुढच्या वळणावर गाडी थांबली. रस्त्याचं काहीतरी काम सुरु होतं. म्हणून आम्ही मागे थांबलो. पाच मिनिटं , दहा, पंधरा किती वेळ लागणार आहे? श्रीशैल विचारायला पुढे गेला तेव्हा समजलं, लँड स्लाईड आहे रस्ता बंद . इतक्यात सुरु होणार नाही. मागे फिरा. अरे, मागे फिरा म्हणजे काय? आम्ही क्रान्सका गोराला कसे जाणार मग?

भाषेच्या प्रश्नामुळे इथे संवाद कठीण होता. इतक्या कठीण रस्त्याचा शेवटचा टप्पा सुरु झाला होता. अरे! आता फक्त शेवटची उणीपुरी १० वळणं राहिली आहेत आणखी काही क्षणात आम्ही ती पार केली असती...... पण पर्याय नव्हता. आम्ही मागे फिरलो. आता पुढे काय? क्रान्सका गोरा चुकणार की काय आपलं? पण तसं नव्हतं! क्रान्सका गोराला जायचं तर आता इटलीमार्गे रस्ता होता आणि तसे जाण्याव्यतिरिक्त गत्यंतर नव्हतं. हा रस्ता सरळ पण लांबचा होता. आत्ता दुपार झाली होती. बोवेकपर्यंत मागे येऊन जायचं म्हणजे खूपच उशीर होणार, मग आपण पोहोचणार कधी आणि अनुभवणार काय?

बहुधा याच्याकरताच आपल्याला एक दिवस इथे वाढवण्याची बुद्धी झाली असावी. सरळ मागे फिरलो. पण आज मात्र कालच्याप्रमाणे घरी परतलो नाही. आजच्या दिवसाचा राहिलेला भाग कारणी लावायचाच असं ठरवून मग टोलमीना गॉर्ज बघायला जायचं ठरवलं. तशी ती आमच्या घरापासून जवळ असणार होती त्यामुळे उशिराचा प्रश्न येणार नव्हता

टोलमीन शहराच्या आधी गाडी गॉर्जच्या दिशेने घेतली. इथे मुक्त प्रवेश नव्हता. तिकीट खिडकी होती. प्रवेश संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच होता. आम्ही तसे साडे चारच्या सुमाराला इथे होतो म्हणजे वेळेत म्हणायला हवं. पुढे दोन मलेशियन मुली होत्या त्यांचं झाल्यावर खिडकीवरल्या देखण्या तरुणाने हसून विचारलं, फ्रॉम इंडिया? आम्ही पुनः चकित! हो म्हटल्यावर म्हणाला I like bollywood songs ज्या देशाबद्दल आम्हाला इथे येईपर्यंत त्याचं नाव सुद्धा माहित नव्हतं तिथला एक गावातला मुलगा आम्हाला हिंदी गाण्यांविषयीच्या त्याच्या प्रेमाबद्दल सांगतो आहे! भरून पावलो अगदी

नंतर थोडा इतिहास आठवायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं, हा भूतपूर्व युगोस्लावियाचा भाग. म्हणजे मार्शल टिटो. अरे! म्हणजे हे नेहरूंच्या विदेश नीतीचं फळ आहे. त्या काळात नेहरू नासर आणि टिटो यांनी अलिप्ततावादाची मुहूर्तमेढ रोवली त्यातून हे देश जवळ आले. त्याची ही फळं आहेत.

त्याने तिकीट हातात ठेवलं आणि म्हणाला आखून दिलेला रस्ता आहे. पण जाताना असे सरळ गेलात तर फारसा चढ नाही आणि येताना सगळा उतार आहे. जर उलट केलं तर मात्र परतीच्या वेळी चढ लागेल. माझी सूचना तुम्ही आत्ता सरळ जा ते सोयीचं असेल. इतक्या आत्मीयतेने सांगितलेला त्याचा सल्ला अव्हेरणं शक्य नव्हतं.

गॉर्ज म्हणजे काय त्याची आता कल्पना आली होती. कालची बघितलेली सोका गॉर्ज तशी माळावरची किंवा सपाटीवरची गॉर्ज (गॉर्ज म्हणजे आपण ज्याला घळ म्हणतो) होती. म्हणजे तेव्हा आम्ही सपाटीवर होतो. आता चहुबाजूने डोंगर होते. इथे त्यामुळे अवघड ठिकाणी व्यवस्थित लाकडी रेलिंग्ज बसवलेली होती.डोंगर चढून साधारण अर्ध्यावर आल्यानंतर खाली खोल दरीत डोकावताना, उभे राहून, खरेतर चालता चालता, उंचावरून हे सौन्दर्य बघताना वेगळीच मजा होती. काल आम्ही भर दुपारी होतो. सूर्य तळपता होता. आता त्याची वाटचाल मावळतीकडची, अर्थात मंदावलेला प्रकाश, चहुबाजूंचा डोंगर विळखा अधिकच अंधारून टाकणारा, एक रम्य, गूढ गडद वातावरण तयार झालेलं आणि आम्ही फिरतो आहोत त्या वातावरणाचा एक अविभाज्य भाग बनून! त्या कल्पनेनेच अंगावर काटा यावा. इथेसुद्धा मार्ग आखीव होता. चढ अवघड असेल तिथे दगडाच्याच, घडीव नसल्या तरी पण पायऱ्या होत्या. त्यामुळे अवघड काहीच नव्हते. कुटुंबं लहान मुलांना घेऊन आलेली होती.वाटेत ठिकठिकाणी watch पॉईंट्स होते. या नदीने डोंगर उभा कापला आहे. त्यामुळे अगदी समोरासमोर त्यांच्या भिंती येतात. काही ठिकाणी या जबरदस्तीने विलग केलेल्या डोंगरांना मग प्रेमाचा उमाळा येतो आणि तिथे "किसिंग"पॉईंट्स तयार होतात तर काही ठिकाणी त्या प्रवाहातच मधेच अडकून पडलेला दगड गोमुख बनून आपल्याला आपल्याकडल्या संकल्पनांची आठवण देतो.


एकूणच मनसोक्त फोटो काढण्याकरता इथे वाव आणि वेळ दोन्ही होता. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला. इथून बाहेर पडल्यावर येणारे टोलमीन शहर म्हणजे आमच्या पायथ्याचं त्यामुळे निवांतपणे गॉर्ज उपभोगून आम्ही घराकडे मार्गस्थ झालो.


आता उद्या पुनः एकदा बोवेक मार्गे इटली आणि पुनः स्लोवेनियात येऊन क्रान्सका गोरा! आपल्याकडे कोल्हापुरातून मधेच कर्नाटकात शिरून राधानगरीमार्गे सावंतवाडीला येता येतं त्याची आठवण झाली. आजवर इटलीला, म्हणण्यापेक्षा इटलीमधून आम्ही गेलो नाही असं एकदाही झालं नाही. त्या जाण्याला अर्थ नसतो पण हा देश आमच्या अगदी गळ्यातच पडतो आणि आम्हाला खेचून नेतो त्याच्याकडे!

                        पुढील भाग येत्या मंगळवारी.

यातील सर्व फोटो श्रीशैल पत्की 


No comments:

Post a Comment