Monday 10 December 2018

KRANSCA GORA



आता उद्या पुनः एकदा बोवेक मार्गे इटली आणि पुनः स्लोवेनियात येऊन क्रान्सका गोरा! आपल्याकडे कोल्हापुरातून मधेच कर्नाटकात शिरून राधानगरीमार्गे सावंतवाडीला येता येतं त्याची आठवण झाली. आजवर इटलीला, म्हणण्यापेक्षा इटलीमधून आम्ही गेलो नाही असं एकदाही झालं नाही. त्या जाण्याला अर्थ नसतो पण हा देश आमच्या अगदी गळ्यातच पडतो आणि आम्हाला खेचून नेतो त्याच्याकडे!

हा क्रान्सका गोराचा आताचा रस्ता अगदी शहाणा सुरता होता. वाटेतील झाडांचे शिशिर ऋतूच्या स्वागताचे हेमंतकालीन रंग म्हणजे आमच्या डोळ्यांना ट्रीट, मेजवानीच होती. किती वेळा व्हिडीओ काढावा याचं काही भानच रहात नव्हतं. शेवटी एका क्षणी ठरवलं की आता फक्त डोळ्यांनी या सौन्दर्याचा आस्वाद घ्यायचा. आठवणी किती जतन करायच्या यालाही काही मर्यादा असायला हवी नाहीतर त्यातून बाहेर पडण्याची आणि नव्याने काही बघण्याची सवय राहणार नाही.


हे सगळं जरी मनाला पटत असलं तरी इथल्या निसर्गाच्या भव्यतेने, इथे असलेल्या प्रगाढ शांत वातावरणाने आणि या छोट्या छोट्या गावांच्या सौंदर्याने आम्ही क्षणोक्षणी मंत्रमुग्ध होत पुनःपुन्हा गाडी थांबवत डोळे भरून आणि कॅमेराभरून फोटो घेत मार्गक्रमणा करत होतो.

देश बदलला, संस्कृती बदलली आणि अर्थातच चर्चवास्तू बदलली. हे चर्च इटलीमधील गावातलं.


स्लोव्हेनिया संपल्याची पाटी होती. आता इटली आणि नंतर पुनः स्लोवेनियात गाडी शिरणार त्या आधी श्रीशैल म्हणाला जरा लक्ष ठेवा नाहीतर आपण ऑस्ट्रियामध्ये जाऊ. एका रस्त्याचाच फरक! दुरून, त्या रस्त्यावरून दिसणाऱ्या त्या घरांकडे बोट दाखवत तो म्हणाला ते तिकडे ऑस्ट्रिया ! उगीचच भूमीवर आखलेल्या काल्पनिक रेषा, मन आणि माणसांना दुभंगणाऱ्या. हे इयु (EU) देश शहाणे, त्यांनी त्या रेषा कागदापुरत्याच ठेवल्या आणि सारी बंधनं दूर करून टाकली

क्रान्सका गोरा हेसुद्धा तसं निद्रिस्त गावच. पण पहुडलेली सुंदरी अधिक सुंदर दिसते त्या न्यायाने त्याचं आकर्षण. इथेच एक जेसना तलाव आहे. खूपच सुंदर. सभोवार घनदाट झाडी. त्या झाडांच्या पानांच्या विलक्षण रंगामध्ये तो तलाव न्हान निघतो. निवळशंख पाणी. कुठे आकाशाला कवेत घेतल्यामुळे निळं, कुठे पानांच्या रंगाच्या मोहात हिरवं गार, तर कुठे चुनखडीच्या अस्तित्वाने हिरवट पाचू रंगाचं




मध्यावर एक पुतळा आहे. छान बसलेला. आपल्याला बोलावून शेजारी बसायला जागा देणारा, हाच क्रान्सका गोरा. गावही त्याच्याच नावाने ओळखलं जातं.



तलाव विस्तीर्ण आहे. त्याभोवती संपूर्ण फेरी मारू या म्हणून निघालो. मधेच एक जमिनीचा तुकडा आत घुसल्यासारखा होता. तिथे इतक्या थंडीत फोटो शूट सुरु होतं. पायघोळ शुभ्र वधू वस्त्र. खांदे उघडे अशी ती ललना विविध पोझ देऊन उभी होती. एक पोझ संपली की कोणीतरी येऊन तिला गरम कपड्यात गुंडाळत होतं, तिचा मेक अप सारखा केला जात होता. असेल लग्नाबिग्नाचं काहीतरी म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी बातमी होती. स्लोवेनियन एंट्री फॉर वर्ल्ड ब्युटी क्वीन आणि तेच फोटो झळकत होते! इतक्या महत्वाच्या त्या इव्हेंटला आमच्यासारखे, त्याचे महत्वाचं माहित नसलेले चार दोन प्रेक्षक असावेत! आपल्याकडल्या गर्दीची आठवण झाली.

जेसनाप्रमाणेच इथे आणखी एक तलाव खूप छान आहे आणि वाटेत आहे. तिकडे जात जात जाऊ या असे म्हणत आमची गाडी तिकडे वळली. जेसनाप्रमाणे Zelenci झेलेन्सी हा टुरिस्टसाठी प्रसिद्ध नसावा. बाहेर माहितीचा बोर्ड होता. तलावातील पाणी नितळ असणे त्याचे रंग मनोहारी असणे यातलं आमचं नावीन्य आता संपलं नसलं तरी ओसरलेलं निश्चित होतं. याच्या नावाप्रमाणेच Zelen म्हणजे स्लोवेनियन भाषेत हिरवा रंग होता. पण इथे आत विवरं दिसत होती. या विवरातून पाण्याचा सततचा पुरवठा या तलावात होत असतो. सावा ही स्लोवेनियातील मोठी नदी तिचं हे उगमस्थान.



त्या ठिकाणी लाकडी डेक होते, दोन watch टॉवर्स होते. अर्थात वर चढून आणखी वेगळं दिसण्यासारखं काहीच नव्हतं. तरी दृष्टिक्षेपाचा मोह असतोच. आमच्या व्यतिरिक्त एक आई तिच्या दोन लहान मुलांना घेऊन तिथे आली होती. त्या लाकडी डेकवर उपडी झोपून ती मुलं पाण्याकडे डोकावून पाहत होती. आम्हालाच काळजी वाटली, उगीचच. आई मात्र मुलांचं ते खेळणं एन्जॉय करताना दिसत होती, त्यांचे फोटो, व्हिडीओ काढण्यात गुंग होती. आपण उगीचच अति काळजीमुळे मुलांना बंधनात टाकतो का? विचार करायला हवा


मनसोक्त भटकंती पार पडली होती. वाढलेल्या एक दिवसाच्या मुक्कामाने आम्हाला बरच काही दिलं होतं. सुख समाधानात आम्ही वेळेत घरी परतलो. उद्याच्या परतीच्या तयारीसाठी.

दुसरा दिवस उजाडला. आम्हाला गाडी परत करायची होती लुब्लिआना एअरपोर्टला, म्हणजे तशी फारशी झगझग नसली तरी वेळ होती सकाळी १०.३० ची. अर्ध्या तासापर्यंतचा उशीर चालेल त्यानंतर एका दिवसाचं भाडं, इन्शुरन्स आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टची पेनल्टी असा बराच भुर्दंड पडणार होता. त्यामुळे वेळेत निघू या असं ठरवून साडे सातच्या सुमाराला बाहेर पडलो. गणितात अडीच तास दाखवलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी कामं सुरु असल्यामुळे एक दिशा वाहतूक सुरु होती. गणित सतत चुकत होतं. तशात जीपीएस ने काहीतरी घोळ घातला. त्याप्रमाणे गेलो असतो तर कुठल्या रानावनातून त्याने नेलं असतं ते तोच जाणे. श्रीशैलने खबरदारीचा उपाय म्हणून एक ऍप डाउनलोड करून ठेवलं होतं माझ्या मोबाईलमध्ये. त्याचा आधार घ्यायचं ठरवलं. त्याने आम्ही त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि आम्ही अर्ध्या तासात फ्री वे वर आलो. हा रस्ता तसां लांबचा होता. थेट एअरपोर्टला जाण्याऐवजी तो लुब्लिआना मार्गे आम्हाला घेऊन जाणार होता पण तरीही वेगाचं गणित आता अगदीच हाताबाहेर नव्हतं. त्यातही इथे हवामानाने थोडा इंगा दाखवलाच. खाली उतरलेल्या ढगांच्या दाट आवरणातून वेगाने गाडी नेणं ही कसरत करत वेग मर्यादांना ओलांडत आम्ही १० वाजून २५ मिनिटांनी जेव्हा गाडी परत केली तेव्हा जितं मया असा भाव श्रीशैलच्या चेहऱ्यावर होता.

आज पुनः त्या हिमाच्छादित शिखरांचं दर्शन घेऊनच आपण एअरपोर्टमधे शिरू असे म्हणत आम्ही मोर्चा वळवला खरा पण..... उत्तराची भविष्यवाणी खरी झाली होती. उतरलो त्यादिवशी उन्हात नहात आम्हाला हसतमुखाने या म्हणत फोटोला सामोरी आलेली शिखरं आमच्या परतीच्या कल्पनेनेच की काय दुर्मुखलेली, ढगाआड लपलेली होती.


                  स्लोवेनिया पर्व समाप्ती. अर्धविराम. कारण अजून खूप  
                  काही सांगायचं बाकी आहे, पण ते काहीशा विश्रांतीनंतर.

टीप : वर्णनाची प्रचीती यावी याकरता फक्त फोटोंचा वापर केला. पण हे फोटो फीचर नव्हे. कारण लेख आधी लिहून नंतर काही शे फोटोमधून हे निवडले आहेत. या उपदव्यापात काही खूप सुंदर फोटो, व्हिडीओ, त्यांना या लेखामध्ये काही स्थान नसल्याने वगळणे क्रमप्राप्त होते. जाता जाता, आपल्याकडे शेवट गोड करा म्हणण्याची पद्धत आहे, स्वीट डिश म्हणून हा व्हिडिओ ज्यात स्लोवेनियाचं सौंदर्य प्रकर्षाने प्रतिबिंबित होतं.


   


ओघामध्ये अडचणींचा केलेला उल्लेख, या स्वरूपाचा स्वतः प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडेल अशी आशा आहे.

यातील सर्व फोटो व व्हिडिओ श्रीशैल पत्की 




No comments:

Post a Comment