Monday, 6 July 2015

SWITZERLAND MT TITLIS


स्वित्झर्लंड माऊंट टिटलिस

बर्न शहरातील काम आटोपून फ्रायबुर्गला परत येण्याकरता श्रीशैलला चार वाजून गेले होते. आता फ्रायबुर्गहून पुनः बर्नला जाण्याचा अजिबातच उत्साह नव्हता. आम्ही मग तिथेच छान हिंडून घेतलं. त्या दोन लेव्हल्सवरल्या गावातला नवीन आणि जुना भाग आम्हाला सहजपणे वेगळा करता आला होता. आज दिवसभरात इतकी पायपीट झाली होती! आजवर इतके हिंडलो, कधीकधी तर नाहक सुद्धा जसं इंटरलाकेनचा हार्डर कुल्म, पण कधी चुकूनही पायपीट हा शब्द आला नव्हता, मनातही आणि लिखाणातही, आज या शहरी भागातल्या तशा अर्थहीन फिरण्याकरता मात्र तोच मनात यावा याची गंमत वाटते! पण या फिरण्याने आणि त्याबरोबरच्या शारीरीक दमणुकीतून झोप मात्र छान लागली. दुसर्‍या दिवसाच्या माऊंट टिटलिसच्या प्रवासाच्या प्रतिक्षेतल्या त्या रात्री शांत झोप आवश्यकच होती.

आम्हाला एका ठिकाणी गाडी बदलून टिटलिसला जवळ असलेल्या एंगेलबर्गला (Engelberg) उतरायचं होतं. जवळ जवळ सगळी गाडी टिटलिसला जाणार्‍यांची असावी. जनांचा प्रवाहो चालला अशी सगळी जणं मग स्टेशनमधून बाहेर पडून रस्त्यावर आली. आम्हाला व्हॅटिकनला जाताना जसं कोणालाही न विचारता आणि त्याहीपेक्षा पाट्या बघायच्या आधीच लोकांच्या वहात्या गर्दीवरून दिशा दर्शन झालं तोच प्रकार आत्ता इथे पुनः झाला. अर्थात इथे सर्वत्र पाट्या आहेतच. सूचनांप्रमाणे, चालत 15 एक मिनिटांवर आम्हाला पहिली केबल कार घ्यायची होती. ती पहिली 15 मिनिटंसुद्धा रस्त्याला समांतर जाणार्‍या पाण्याच्या खळाळत्या प्रवाहाने सुंदर केली. शहराच्या धकाधकीतून निसर्गाच्या सान्निध्यात तादात्म्य पावण्यासाठी तर हा 15 मिनिटांचा भाग नसेल ना? पण नसावं तसं, कारण काही खरे रसिक(?) ते अंतरसुद्धा बसमधून पार करणारे होते!इथे आमची मनःस्थिती मात्र ग्रेट होती. इतक्या हट्टाने हे ठिकाण आम्ही या प्लॅनमध्ये बसवलं होतं. जर ओम फस झालं तर? अर्थात आता विचार करून उपयोग नव्हता. रमत गमत आम्ही पहिल्या केबल कारपाशी पोहोचलो. एकापाठोपाठ येणार्‍या, काहीवेळा हाताने पकडून ठेवलेल्या छोट्या 6 जणांच्यासाठीच्या या केबल कार्स. जत्रेतल्या फिरणार्‍या चक्राची आठवण यावी तस होतं . फक्त आम्हाला लहान मुलांप्रमाणे उचलून त्या चालत्या कारमध्ये टाकून देणं नव्हतं! एकापाठोपाठ एक अशा न थांबता घाईत बसायला लागावं अशा तर्‍हेने आत चढावं लागत होतं. कित्येक वेळा ग्रूपने बरोबर जाण्याकरता म्हणून एखाद्या कारमध्ये तीनच किंवा चार चार माणसंच फक्त दिसत होती. आमच्या कारमध्ये आम्ही तिघं आत गेलो आणि एक मुलगा मागोमाग आला. एकटाच होता. आपला, भारतीय. खरतर इथे भारतीय असण्याचं फारस कौतुकाच वाटाव अशी परिस्थिती नव्हती कारण पैशाला पासरी म्हणावे इतके भारतीय इथे दिसत होते. सवय असते ना त्याप्रमाणे आम्ही हसलो, तोही. कुठून आलात या नेहेमीच्या प्रश्नाने झालेली सुरवात मग आम्ही पुनः एंगेलबर्ग स्टेशनवर जाण्याकरता वेगळ्या दिशांना जाईपर्यंत कायम राहिली.

या छोट्या केबल कार्समधून एकामागून एक जाताना मजा येत होतीच पण आम्हाला त्या कारमध्ये बसल्यानंतर समोर दिसलेल्या पाटीने आधी लक्ष वेधून घेतलं. "बैठ लीजिए किंवा बैठे रहिये" अशी काहीतरी पाटी होती. हिंदीमधून पाट्या लिहिण्याची आवश्यकता वाटावी इतके भारतीय इथे येतात हे या पाट्या ओरडून जगाला सांगत होत्या. अमेरीकेमध्ये नायगाराला ज्याप्रमाणे भारतीय लोकांव्यतिरिक्त इतर लोक शोधावे लागतात त्याप्रमाणे इथे अवस्था असावी.

पहिला टप्पा संपला. दुसर्‍या टप्प्यातली केबल कार मोठी होती. त्याच्यावरच्या माहितीप्रमाणे 80 माणसांची क्षमता असलेली ही भली मोठी केबल कार होती. आता आम्ही चौघं असलो तरी इतर लोकही असल्याकारणाने जरा एकमेकांपासून दूर होतो. आतापर्यंतच्या सततच्या केबल कारमधल्या प्रवासाने आणि युंग फ्राऊ रीजनमधल्या शिखरांवर जाण्याच्या अनुभवाने आता आमचं लक्ष बाहेर होतच पण आतही काही टिपण्यासारख्या गोष्टी आहेत का याचा वेध घेत होतं. मघाचा सहप्रवासी इथे तिथे हिंडून पुनः आम्हाला जॉइन झाला होता. प्रवासाचा दुसरा टप्पा संपला.

आता तिसरा आणि शेवटचा टप्पा. जगातला पहिला फिरता गंडोला (World's first revolving Gondola) अशी ज्याची जाहिरात केली जाते त्यातून आता आम्ही जाणार होतो. याआधीच्याप्रमाणेच ही केबल कारही मोठी होती. गर्दी खूप होती. भारतीय जास्त, हे पुनः सांगण्याची आवश्यकताच नाही. प्रत्येकाच्या चेहेर्‍यावरची उत्सुकता. गंडोला आल्यानंतर साहजिकपणे आत जाण्याकरता अहमहमिका. खरतर एकदा फिरणारी केबल कार म्हटल्यावर कुठेही उभे राहून चालणार होतं. पण वास्तव तसं नव्हतं. गर्दी खूप होती त्यामुळे जे कठड्याला टेकून उभे होते त्यांना चांगली जागा होती. इथला आमचा चालक मात्र मजेशीर होता. त्याने सुरवातीला नमस्ते केलं . "चाली चाली" असे काहीतरी तो "हिंदीतून" बोलत होता. कदाचित एक दोन वाक्य माहित झाली असावीत त्याचा उपयोग करत असावा. आपल्याकडच्या माणसांचं इथे येण्याचं प्रमाण बघितल्यावर हिंदीमधल्या सूचना, घोषणा आणि असे अनौपचारीक संभाषणाचे प्रसंग हे स्वाभाविक म्हणायला पाहिजेत. ही पर्यटन क्षेत्रातली लोकं बहुभाषी असतात हेच इथेसुद्धा प्रत्ययाला येत होतं
माऊंट टिटलिसला उतरलो. बर्फाचं आता काय कौतुक? असं मनात येण्याआधी मनाने निर्वाळा दिला, नाही, इथे आलो ते बरं झालं. आतापर्यंत बघितलेल्या ठिकाणी बर्फ होताच. पण इथे आम्ही बर्फात होतो. नुकता पडलेला, ताजा ताजा, पायघड्या घातल्या आहेत जणु असा. त्याच्या त्या मऊसूत पणाचीच तर आम्हाला भीती वाटत होती. एखादा साळसूद मुलगा साळसूद चेहेर्‍याने हरकती करत असतो तसा तो बर्फ वाटत होता त्यावेळी. आम्ही त्यातून चालत होतो. आम्ही त्या बर्फातून चालत असता श्रीशैल आईबरोबर होता कारण सतत पाय घसरणं, अडकणं हे सुरू होतं. तिला हसत असताना एक दोन वेळा माझ्यावर जमिनीला समांतर होण्याची (पडलो तरी नाक वर ही म्हण म्हणूनच आली असावी!) पाळी आली त्यावेळी आमचा केबल कारमधला मित्र, त्याचं नाव अविनाश पाटील, चटकन पुढे आला. काका हात धरू का? मी म्हटलं बाबा माझा चालण्यातला आत्मविश्वास जाईल तू हात धरलास तर. मी माझ्या अंदाजाने येतो. त्यानेही उगीच आग्रह केला नाही पण तो त्या सगळ्या बर्फातील चालण्यामधे सतत बरोबर मात्र राहिला.

                                                        उर्वरित भाग पुढील मंगळवारी

No comments:

Post a Comment