Monday, 30 March 2015

SWITZERLAND GLACIER EXPRESS


स्वित्झर्लंड ग्लेशिअर एक्सप्रेस

फुटबॉलच्या वर्ल्ड कप फायनलमुळे रात्री झोपायला उशीर झाला तरी सकाळी आरामात उठणे शक्य नव्हते. सकाळी जमेल तितका हेवी ब्रेकफास्ट करून ९ वाजता सेंट मॉरित्झहून सुटणारी ग्लेशिअर एक्सप्रेस पकडायची होती. सेलेरिनाला ती थांबते, नाही अशी दोन्ही मते होती. रेकॉर्डप्रमाणे हो पण तिथल्या लोकांच्या मते थोडं लवकर निघून सेंट मॉरित्झ गाठणे श्रेयस्कर. आम्ही safe रहायचं ठरवलं आणि आठ वाजता बाहेर पडलो. रात्री भरपूर पाऊस झाला होता. तसेही रात्री आम्ही जेवून परत येताना भिजूनच आलो होतो. ते सत्र रात्रभर तसेच चालू असणार असं बाहेरचं वातावरण सांगत होतं. सेलेरिना स्टाझला आलो तेव्हा स्टेशन सुनसानच होतं. मशीनवर तिकिटं काढण्याकरता आमच्याकडे सुट्टी नाणी नव्हती. पण कार्ड चालणार होते.


सेलेरिना स्टाझ स्टेशन परिसर. लाकडी कुंपणाचे दोन प्रकार. निसर्गाशी तादात्म्य


काल संध्याकाळी तसेही आम्ही त्या झोपाळू सेंट मॉरित्झला भेट दिली होतीच. त्यामुळे नव्याने काही बघण्याचा उत्साह नव्हता. पण प्रत्येक दिवस नवा उजाडतो. आज आम्ही सेंट मॉरित्झला पोहोचेपर्यंत सूर्य वर आला होता. डोंगराच्या कुशीत विसावलेला तो विस्तार असलेला तलाव छान झळाळत होता. वर चढावावरचं गावही उगीचच मग उत्फुल्ल वगैरे वाटून गेलं. मनाचे खेळ सगळे! वातावरणाच्या फरकाने आपल्या दृष्टीत किती फरक पडू शकतो त्याचं प्रत्यंतर येत होतं. आम्ही तसे वेळेआधी पोहोचलो होतो त्यामुळे या सौंदर्याकडे निवांतपणे बघायला वेळ मिळाला.

ग्लेशिअर एक्सप्रेसविषयी खूप वाचलं होतं. त्या वाचनातून आमच्यापर्यंत त्याचं ग्लॅमर पुरेपूर पोहोचलं होतं. या आधीची आमची तिरानो ते सेंट मॉरित्झची र्‍हेटिशं रेल्वे इतकी सुंदर होती तर ही आणखी किती छान असेल याची कल्पना करवत नव्हती. सेँट मॉरित्झ ते झरमॅट असा प्रवास करणारी ही गाडी. या गाडीला म्हणायचं एक्सप्रेस! पण तिची जाहिरातच मुळी जगातली सर्वात हळू जाणारी एक्सप्रेस म्हणून केली जाते! हा तिचा यूएसपी आहे! तिच्याविषयी लिहिलेलं मुळातून वाचायला हवं असं वाटतं म्हणून ते इथे देत आहे.

"The world’s slowest express train carves a cross-section through multifaceted Switzerland and offers pure travelling pleasure. Meals prepared by the chef are served in the Glacier Express restaurant car. The Railbar serves coffee, drinks and snacks in your seat.

This railway classic is the most scenic route between sightseeing attractions in the Graubunden holiday region, the high Engadin valley with St. Moritz, Davos, Europe’s highest-altitude town, sunny Canton Valais with its glacier world and the enchanting southern regions. The comfortable train passes through an area of outstanding natural beauty with fragrant, primeval forests, peaceful Alpine pastures, rushing mountain streams and spectacular valleys with a wealth of centuries-old customs.

हे जसेच्या तसे देण्यात माझा उद्देश म्हणजे त्यांची कोणत्याही गोष्टीची जाहिरात करण्याची पद्धत. “Slowest Express” या गोष्टीचं भांडवल होऊ शकतं? आपण बार्शी लाइट म्हणून ज्या गाडीला हिणवत असू तीसुद्धा हेरिटेजच्या नावाखाली यांनी खपवली असती!

गाडी देखणीच होती. नावाला शोभेलसा डब्यांचा स्नो व्हाइट रंग! त्याला तसाच छान लाल पट्टा. गाडीचं इंजिन त्या देशाच्या झेंड्याच्या लाल रंगाचं आणि त्याच रंगाचा लाल डबा onboard kitchen चा! सगळं मुळी राजेशाही! गाडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खिडकीला असलेल्या पूर्ण लांबीच्या काचा आणि पॅनोरामिक व्ह्यू!. म्हणजे छतापर्यंत जाऊन वरच्या बाजूला थोडी आतल्या बाजूला (अंतर्वक्र) आलेली काच, ज्यामुळे आकाशही नजरेत यावं! (याचा प्रत्यक्षात काही फायदा होतो असं मला तरी जाणवलं नाही हा भाग अलाहिदा!) एकूण दिमाखदार रंगरूप आणि स्विस नोकझोक असं हे तिचं स्वरूप! न आवडण्यासारखं काहीच नव्हतं त्यात!

 खिडकीच्या अंतर्वक्र काचा


बसल्यानंतर नेहेमीप्रमाणे सीटस, इंटिरिअर वगैरेचं कौतुक वाटून झालं आणि मग तो सीटजवळचा मॅप बघितला. सेलेरिना स्टाझला जाताना गाडीत असलेला मॅप सीटजवळच्या कॉफी टेबलसारख्या छोट्या फ़ळीवर मानचित्र असावं तसा होता. इथे एक जास्तीची गोष्ट म्हणजे कानात घालायला प्लग्ज होते. दिल्या जाणार्‍या माहितीपूर्वी त्याची सूचना समोरच्या स्क्रीनवर येत होती. इथे बोलल्या जाणार्‍या फ्रेंच, जर्मन, इटालिअन बरोबर इंग्रजीमधूनही बाहेरील दृष्याची माहिती दिली जाणार होती.  गाडी, तिचा मार्ग याविषयी अगदी संपूर्ण माहिती त्यांनी त्यांच्या परिपत्रकात दिली आहे आणि ते परिपत्रक प्रत्येक सीटवर ठेवलेलेही होते. एकूणच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये याची पूर्ण काळजी त्यांनी घेतलेली दिसत होती.

मात्र एकूण भाड्याचा विचार करता इतका पैसा खर्च करावा का याचा विचार निश्चित करावा असं आता वाटतं. आम्ही तिरानोहून सेंट मॉरित्झला आलो त्या गाडीला असलेल्या उघडणार्‍या खिडक्यांमधून दिसणारा निसर्ग या वातानुकूलित गाडीच्या खिडक्यांमधून गाळून आमच्यापर्यंत पोहोचणार होता. त्यामुळे frgrance वगैरे शब्द तसे अर्थहीनच. काचांच्या अडथळ्यामुळे फोटो काढले तरी तेही आमच्या प्रतिबिंबासह. फोटो काढण्यातला सुरवातीचा उत्साह मग एकदमच मावळून गेला.

गाडीत असलेल्या स्पीकर्सवरून माहिती मिळत होती. पण सतत डावीकडे उजवीकडे बघून नंतर नंतर कित्येकांनी त्या घोषणांचा दिवा लागल्यावर प्लग्ज कानात घालणंही बंद केलं. सतत आपल्याला कोणीतरी सूचना देऊन नाचवतं आहे हे कोणाला आवडणार? तसाही हा प्रवास खूप मोठा आहे. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत. एका ठराविक मर्यादेनंतर हे सगळं अति होतं हे खरच.

गाडी सुटण्यापूर्वीच श्रीशैलने पोटापाण्याची व्यवस्था करून ठेवली होती तरीही उत्सुकता म्हणून मेन्यूकार्ड बघितलं. त्यातले डिशमागे कमीतकमी२७/२८ स्विसफ्रॅन्क असलेले दर घेरी आणणारे होते. पण तरीही त्यातल्या Authentic Indian food ची अक्षर बघून आमचा जीव आनंदाने निवला. भारतीय खाद्यसंस्कृतीला जगातल्या पर्यटनव्यवसायातल्या अग्रगण्य देशाने दिलेली ती दाद बघून मन अगदी भरून आलं! पण ते सुख अगदी क्षणिक ठरलं. तो ऑथेन्टिक मेन्यू वाचल्यानंतर आमची शुद्धच हरपली! सुरवातीचा पदार्थ होता बीफ मद्रास! (Tender pieces of beef in medium hot coconut onion sauce) मद्रासमधल्या त्या सोवळ्या वातावरणातल्या त्या अर्वाच्य (उच्चारू नये असा) अब्रह्मण्यमच नव्हे तर अभारतीय पदार्थाला स्थान देणार्‍या त्या मेन्यू कार्ड बनवणा-या "जाणकाराला" भर चौकात फटके मारावेत असं वाटून गेलं (त्यावेळी बीजेपीचं राज्य नसूनही माझी ही प्रतिक्रिया! किती गोष्टी आपल्यात भिनलेल्या असतात त्याचा हा प्रत्यय!).

प्रवास तसा निवांत म्हणावा असा. सुरवातीला चुरपर्यंत असणारा उतार म्हणजे 1775 मीटरपासून पासून सुरवात करून आम्ही चुरला साधारण 600 मीटरपर्यँत खाली आलो. तिथून पुनः वर जात नंतर डिझेन्टिस करून Oberalp pass ला 2033 मीटरची उंची गाठली आणि उताराला लागत ब्रिगला 670 मीटरला येऊन झरमॅट्ला 1604 मीटरवर स्थिरावलो . हा सगळा मार्ग युनेस्कोने हेरिटेज मार्ग म्हणून जाहीर केला आहे आणि त्याची त्याच तर्‍हेने जपणूक होताना दिसत आहे. वर्षाचे 12 महिने अगदी हिमवर्षावातदेखील या गाड्या सुरू असतात.

या गाडीला सुरवातीला काही डबे आमच्या पूर्वीच्या गाडीसारख़े म्हणजे खिडक्यांच्या काचा उघडणारे होते. आमचं मध्यमवर्गीय मन लगेच श्रीशैलला सांगून मोकळं झालं, उगीच तुमचा हा खर्च असतो! त्याच मार्गाने या डब्यातून प्रवास करता आला असता! कमी तिकिटामुळे बचतही झाली असती ! ते डबे बहुधा स्थानिकांच्या सोयीसाठी असावेत. ते चुरला जाणारे होते. मधल्या एका स्टेशनवर ते आमच्यापासून वेगळे झाले! नंतर चौकशी केली तेव्हा मिळालेल्या माहितीप्रमाणे या गाडीनेच हा संपूर्ण प्रवास करायला हवा अस नाही. पण या हेरिटेज मार्गाची मजा घ्यायची तर ग्लेशियरला पर्याय नाही

सर्व प्रकारच्या उंच, सखल, उतरत्या, चढत्या, डोंगरातून, राना वनातून, घनदाट आणि विरळ अरण्यातून प्रवास करताना यावेळी गावांची फारशी सोबत नव्हती. विस्तीर्ण जलाशय हे तर आल्प्समधील वैशिष्ट्यच त्यामुळे त्यांचं अस्तित्व जागोजागी भेटत होतं. भेटत होतं म्हणण्यापेक्षा दिसत होतं. समुद्रकिनारी उत्कृष्ट बंगल्यात बसून वातानुकूलित खोलीतून रंगवलेल्या काचांमधून सूर्यास्ताचा आनंद घ्यायचा हे काही फारस रुचणारं नाही. समुद्राची गाज ऐकू आली नाही तर मग तो आपल्यापर्यंत पोहोचणार कसा? राणीच्या बागेत जाऊन वाघाला काय बघायचं? प्रत्ययकारी अनुभव नाही म्हणजे मग चित्र किंवा फारतर टीव्हीवर बघितल्यासारखं वाटणार!


तर असं स्विस विश्वरूपदर्शन झाल्यानंतर एक स्टेशन आलं आणि माणसांची झुंड्च्या झुंडं आत आली. ही संपूर्ण आरक्षित गाडी तर हे लोक कसे येऊ शकतात? झरमॅट हे कारफ्री झोन आहे. तेव्हा येणार्‍यांनी त्यांच्या गाड्यातून पाय उतार होणे आवश्यक. त्यांना इथे या झरमॅट आधीच्या टेश (Täsch) स्टेशन बाहेरील पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करून या गाडीत झरमॅटला जाण्याकरता प्रवेश मिळतो

                                                                            पुढील मंगळवारी झरमॅट


या प्रवासातल्या फोटोंविषयी माझी तक्रार असली आणि ती खरी असली तरीही काही फोटोंनी समाधानही दिलं त्यातले काही इथे देत आहे.




2 comments:

  1. छान वर्णन आणि टिका टिपण्णी .
    आपल्या दोघांचे दर्शनहि झाले -दंडवत घातला.

    ReplyDelete
  2. छान वर्णन आणि टिका टिपण्णी .
    आपल्या दोघांचे दर्शनहि झाले -दंडवत घातला.

    ReplyDelete