Monday, 18 November 2013

SPAIN BARCELONA II

स्पेन बार्सिलोना II

मी फोनवरील संभाषण उत्तराला सांगितलं. अगं,  दिएगो म्हणाला की त्याचा मित्र येइलच इतक्यात.  ती वैतगलीच एकदम. तुम्ही नीट ऐकूनही घेत नाही. हा स्पॅनिशबाबा आपल्याला म्हणाला मिसेस दिएगो बाहेर गेली कुत्र्याला घेऊन आणि हे मित्राचं काय मधेच काढलं तुम्ही? मुंबईला गेल्यावर ENT specialist डॉक्टरांकडून तपासून घ्यायला हवं. तोंडाच्या पट्ट्याबरोबरच रस्त्यावरच्या प्रत्येक येणा-या जाणा-या कुत्रावाल्या बाईकडे बघत आली असे ती जाहीर करत असे आणि मी आसासून बघत बसे! ती पुढे जाईपर्यंत! 

पाच मिनिटं गेली आणि खरोखर ६ व्या मिनिटाला एक उंच स्लिम असा माणूस हसतमुखाने आमच्यासमोर उभा राहिला. मी टिअ‍ॅगो, नाही दिएगो नाही त्याचा मित्र टिअ‍ॅगो! सॉरी तुम्हाला वाट बघायला लावली. पण सुपरस्टोअरमधून काही वस्तू आणायच्या होत्या. आम्ही त्याच्याबरोबर लिफ्टने वर गेलो. दोघांनाही मिसेस दिएगो आणि कुत्रा आठवून हसू आवरत नव्हतं.  लिफ्टमधून बाहेर येऊन थांबलो. अपार्टमेंटचा चार नंबर लक्षात राहिला. आत शिरल्यानंतर एका खोलीच्या दोन छोट्या केलेल्या खोल्या, त्यातील कामाचा पसारा आणि दुस-या बाजूला किचन बघून जरा काळजीच वाटली. पण त्याने ही माझी खोली, ही बंद खोली दिएगोची असं सांगून शंका निरसन केलं. पुढे गेल्यावर एक खूप मोठा हॉल होता. त्यात एक डायनिंग टेबल, कोच, पुस्तक संग्रह असलेली मांडणी, शोभेच्या, सजावटीच्या वस्तू हे सारं नेटकेपणाने ठेवलेलं होतं. ते ओलांडून आम्ही डावीकडील दरवाजा उघडून आत गेलो. व्यवस्थित डबल बेड आणि स्वच्छ टॉयलेट अशी ती आमच्याकरता असलेली बेडरूम होती. किचन आम्ही वापरलेलं चालणार होतं. हॉलमधे टीव्ही होता त्याचा उपभोग घेता येणार होता. पुस्तकं (स्पॅनिशबरोबर इंग्रजीसुद्धा) तर होतीच. अर्थात येत्या दोन दिवसात शहर बघायचं की हे सारं उपभोगायचं हा आमचा चॉइस असणार होता.

टिअ‍ॅगोला विचारलं आम्ही जरा बाहेर जाऊन येणार आहोत. तर जवळपासची ठिकाणं सांग. तर त्याने ते चर्च, साग्रादा फमिलिआ, जे आम्ही येताना बघितले होते ते आणि एक जवळचा टॉवर सांगितले बघायला. बरं म्हणून आम्ही बाहेर पडलो.बहुधा वयस्कर (आपणच आपल्याला म्हातारे कशाला म्हणायचं?) म्हणून इतकेच पुरे असं त्याला वाटलं असावं.

बिल्डिंगच्या बाहेर पडताना गंमतच झाली. G म्हणजे तळमजला हे गृहीत धरून खाली आलो तर तिथे कचरा टाकायची जागा. पुनः वर आलो आणि एकवर उतरून जिना उतरून खाली आलो. म्हणजे आपला दुसरा मजला आहे तर! असे घोकत आम्ही बाहेर पडलो.

चर्च पुनः एकदा नीट बघून घेतले. भव्यता हा गुण वगळता बाकी काही मनावर परिणाम करत नव्हते हे खर. खूप बटबटीतपणा वाटला. हेच तर त्यातलं सौंदर्य! असं मला नंतर जाणकारांकडून समजलं. तिथून मग त्या टॉवरच्या शोधात निघालो. तसाही नकाशा वाचन हे आमचं क्षेत्र नाही याचा प्रत्यय पुनः आला. मग थोडस खाऊन घेतलं. इथे काय खाणार हा प्रश्न सोडवला पिझ्झेरियाने. ही भाकरी आपली पोटभरीची आणि त्यात आपल्याला चॉइसही असतो. काऊंटरवर एक बाबा होता तो स्पॅनिश असावा. त्याला गंध नाही इंग्रजीचा. एक चिनी(चपट्या नाकाच्या सगळ्यांनाच आपण चिनी म्हणतो मग ती व्यक्ती आपली पूर्वांचलातली का असेना!) मुलगी आली तिची तीच गत पण तिने आणखी एकीला बोलावले. तिला व्हेज म्हणजे काय ते माहीत होते. तिने छान हसून इंग्रजीत आम्हाला बसायला सांगितले. आम्ही काऊंटरवर उभे होतो तेव्हा आमच्या डाव्या हाताला असलेल्या भट्टीत त्या माणसाने दिलेला, एका लांब अशा सुमारे 10-12 फूट लांब, काठीच्या टोकावर असलेल्या पत्र्यावर विसावलेला पित्झ्झा बेस तिने ज्या शिताफीने आणि कौशल्याने आमच्या डोक्यावरून हसत हसत भट्टीत टाकला तो शॉट अप्रतिम होता.

आम्ही खाऊन घेतलं, टॉवर वगैरेचा नाद सोडला आणि साग्रादा फमिलिया स्टेशनला पसाज दी ग्रासियाच्या दिशेने जाणारी मेट्रो पकडली. तिकडे उतरून रेड लाइनने आम्ही कॅटलुनियाला जाणार होतो. त्याकरता वरती न येता भुयारातूनच जावे लागणार होते. एकाच ठिकाणी कितीतरी लाइन्स आहेत हे किती बरं वगैरे म्हणायला ठीक पण हे असे खालून किती किलो मीटर चाललो देव जाणे! भुयारातून जाताना दिशाही कळत नाही फक्त बाण बघत जायचे. यापेक्षा रस्त्यावरून शहर बघत तरी जाता आलं असतं.




इथला प्रसिद्ध रस्ता म्हणजे ला रांबला (La Rambla) जाण्यासाठी कॅटलुनिया स्टेशनवर उतरून बाहेर आलो मात्र ! आपल्या रानडे रोडसारखी जत्रा होती. सरळच्या सरळ जाणारा तो रस्ता. दोन्ही बाजूंनी झाडं आणि त्यापलीकडे दोन्ही बाजूंनी सुरळीत चालू असलेली वाहतूक. चालण्याचा रस्ता मध्यभागी होता. झुंडीच्या झुंडी त्या रस्त्याच्या दोहोकडे असलेल्या स्टॉल्सवरच्या वस्तू बघत खरेदी करत निघाल्या होत्या. इथे घाई कोणालाच नव्हती. मुख्यतः सुव्हेनिअरचे आणि खाण्याचे स्टॉल्स पण तिथे खूपसे रोपं फुलं यांचेही स्टॉल्स दिसले आणि जास्वंदीचं झाड बघितल्यावर तर कोणीतरी जिवाचं भेटावं तसा आनंद झाला.


पुढे जाता जाता उजव्या दिशेला बोखरिया मार्केट (Mercat de La Boqueria )!दिसलं. चला एक गोष्ट तरी हवी असलेली मिळाली म्हणून आम्ही वाहनांचा रस्ता ओलांडून त्यात गेलो. मार्केटसारखेच मार्केट. प्रचंड गर्दी. पण कचरा नाही. व्यवस्थित मांडलेला मांड सगळा. सुरवातीलाच असलेले विविध फळांचे गाळे. त्यात रचलेली फळं म्हणजे अप्रतिम कलाकारी होती. वेगवेगळ्या बेरीजचे आपल्याकडे जसे द्रोण तयार ठेवतात तसे इथे प्लॅस्टिकचे छोटे डबे होते. त्यातली रंगांची उधळण बघून सगळ्यांचे कॅमेरे सरसावत होते. मेडिटेरिनिअन म्हणजे भूमध्य सामुद्रिक हवामान फळा फुलांकरता विशेष पोषक असते हे भूगोलातील सत्य साक्षात समोर उभे होते. फळं काही ओळखीची, संत्री केळी वगैरे, काही अजस्त्र! प्रचंड मोठी भोपळ्यासारखी पण खूप मोठ्या आकाराचा भोपळा! अंजीर होते पण त्यांचा आकार खूप मोठा आणि उभट. त्यावर लिहिलेल्या नावामुळेच ओळखू आले आम्हाला. नेत्रसुख घेत पुढे निघालो तर नंतरचे स्टॉल्स पेयांचे होते. तिथेही तीच रंगांची मुक्त उधळण. खूप कॉम्बिनेशन्स होती. काही तर ऑड वाटण्यासरखी म्हणजे नारळ आणि आंबा किंवा किवी आणि आंबा वगैरे. पण एक युरोला एक ग्लास म्हणजे स्वस्तही. त्यामुळे तृषाशांती सुरू होती. सुका मेवा खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यातही अंजीर होते ते उभट आणि पांढरे होते. जात वेगळी असावी. इथे आम्हाला एका ठिकाणी केशर मिळालं. तितकच महाग, आपल्यासारखच १ ग्रॅम १० २ला १९ आणि ४ ग्रॅमला ३८ युरो. पुढचे अभक्ष भक्षणाचे गाळे वगळून आम्ही बाहेर पडलो.

डोळ्यावर विश्वास  बसत नाही? पण  हे खरे आहे.

पुनः रस्त्यावर येऊन आमची पूर्वीची दिशा पकडली. वाटेत जाता जाता डावीकडे एक सुंदर चौक दिसला. हा भाग म्हणजे बार्सिलोनाचं ओल्ड टाऊन त्यामुळे असे जुने चौक आहेत. त्यात फरसबंदी रस्ते आहेत. मधे सुंदर कारंजे आणि त्या भोवती बसायची व्यवस्था आहे. जुना हुतात्मा चौक आठवतो का? तो जेव्हा फ्लोरा फाऊंटन होता आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक असे तेव्हासारखाच सुंदर. तिथे थोडावेळ विसावलो आणि पुढे निघालो. हा रस्ता १.२ किमीचा. म्हणजे चालण्यासाठी शिवाजी पार्कची एक राऊंड. फारतर १२-१५ मिनिटं. पण त्यातली अडथळ्यांची (प्रेक्षणीय गोष्टींची) शर्यत मोठी! त्यामुळे आम्हाला वेळ लागत होता पण इथे घाई कसलीच नव्हती. इथला समर म्हणजे पर्यटकांना वरदानच. रात्री साडे नऊ दहापर्यंत उजेड असतो. ऊन्हामुळे वातावरण प्रसन्न मग उत्साहालाही उधाणच असणार. सातच्या आत वगैरेचा घोळ नाही

कोलंबसाचा पुतळा दिसला आणि ला रांबला संपला. इथे पुनः तसाच सुंदरसा चौक. भोवती असलेल्या त्यांच्या सुंदर इमारती. सगळ्या सरकारी. कॅटलुनिया डिफेन्शिया वाचून मजा वाटली. पण नंतर लक्षात आलं हा खरातर स्पेनचा एक प्रांत पण ते, कॅटलान्स, तसं मानत नाहीत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते स्वतंत्र आहेत. तशी त्यांची चळवळही आहे. त्यांची कॅटलान ही भाषा स्पॅनिशच्या जवळची असली तरी वेगळी आहे. कॅटलानचा काही भाग स्पेनमध्ये काही फ्रान्समध्ये आहे. म्हणजे काहीसं कुर्दिश किंवा बलुचिस्तानसारखं प्रकरण आहे हे. यांचा झेंडा स्पेनहून वेगळा आणि तो घरा घरांवर फडकत असतो. त्यामुळे या अशा त्यांच्या विविध खात्यांच्या इमारती दिसतात




इथून पुढे गेलं की काही अंतरावर समुद्र! पण त्या आधी आपण पोहोचतो ते बार्सिलोना पोर्टवर. पोर्ट मोठ आहे. मोठ्या बोटी दिसतात. इथेच एक maremagnum मॉल आहे. त्याच्या उतरत्या आरशासारख्या छपरातली आपली त्याकडे जातानाची प्रतिबिम्ब छान दिसतात तिथून पुढे मग बार्सिलोनेट म्हणजे जिथे ऑलिम्पिक अ‍ॅक्वा स्पर्धा झाल्या होत्या, आयमॅक्सचं ४डी थिएटर, अ‍ॅक्वेरियम या सगळ्या गोष्टी लागतात. या सगळ्यात आम्हाला वेळ घालवायचा नव्हता. आम्ही समुद्रावर गेलो. खूप लांबवर पसरलेला, सुंदर पांढरी वाळू आणि नितळ निळे पाणी असणारा किनारा. आधीच हा युरोपातला किनारा आणि त्यातही सूर्यदर्शनाचा योग म्हणजे या वेड्या लोकांना निमित्तच. कुटुंबच्या कुटुम्ब टॅन होण्यासाठी पसरलेली होती. समुद्रात जा पुनः सूर्यकिरणं खात आडवे व्हा हा अखंड उद्योग. किना-यावर अर्थातच फुटबॉल व्हॉलीबॉल वगैरे खेळही सुरू होते. पण मुख्य खेळ वाळूत कमीत कमी कपड्यात आडवं होण्याचा.लांबवर पसरलेला समुद्र, दूरवर दिसणा-या शिडाच्या होड्या आणि पलीकडे सुरू असलेले वॉटर स्कूटरसारखे खेळ याबरोबरच इथला लाकडी डेकही आठवणीत राहण्याजोगता. अधून मधून मंगोल   चेहे-याच्या मुली मसाजसाठी विचारत फिरत होत्या तसेच काही काळे लोक दलालगिरी करताना दिसत होते. अर्थात पर्यटन स्थळ म्हटलं की हे जोडधंदे आलेच.

कोलंबस पुतळ्यापासून आम्ही पहात होतो आपल्याकडे रस्त्यावर मांड मांडून बसतात तसे विक्रेते दिसत होते. अनधिकृतच असावेत असं आमचं बोलणं होत होतं. पुढे पोर्टच्या डेकवरही काहीजण दिसले. मुख्यतः काळे आणि आशियाई. आपले असावेत का? असा विचार डोकावत होता पण तसं कोणी ओळख वगैरे दाखवायला फारसं उत्सुक दिसलं नाही. हे मात्र आमच्या दोघांच्याही लक्षात आलं होतं. एकदम काहीतरी गडबड झाली आणि सगळे एकदम आपल्या मालावर झाकण टाकून (वस्तुतः ते एका लुंगी किंवा स्कार्फसदृश कापड अंथरून त्यावर वस्तू ठेवत.) बोचकं बांधून पुढे धावत गेले. इथेही आपल्याकडे गाडी येते तसे काहीतरी असावे ज्यापासून हे लोक दूर पळत असतील. जगात सगळीकडेच या गोष्टी असतात. प्रमाण कमी किंवा जास्त इतकेच.

                                                        भाग तिसरा पुढील मंगळवारी

1 comment:

  1. वाचायला लागल्यावर नजर दुसरीकडे वळतच नाही इतकं गुंतून जायला होते, अप्रतिम लिखाण अन फोटो सुध्धा सजीव वाटतात! फक्त हे मराठी लिहिण्याचा सराव नसल्याने कमी शब्दात अभिप्राय द्यावा लागतो!

    ReplyDelete