Monday, 2 December 2013

SPAIN BARCELONA IVस्पेन बार्सिलोना IV 

सकाळी जाग काहीशी उशीराच आली. तसही आज लवकर बाहेर पडून चालणार नव्हतं. कारण टिऍगोला भेटून जायचं होतं. तो उशीरापर्यंत जागणारा म्हणजे सूर्यवंशी असणार! आरामात आम्ही आटोपलं पण तो आधीच आवरून तयार होता. हातात एक मॅप घेऊन त्याने काल काय काय झाले त्याची यादी ऐकून घेतली. झालेल्या ठिकाणांवर नकाशाच्या प्रिंट आऊटवर फुल्ली मारली आणि म्हणाला
"अरे तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त पाहिलं आहे की शहर! मीसुद्धा त्या मॅजिक फाऊंटन वगैरेकडे गेलो नाही आजवर! पण आज तुम्ही सकाळी बाहेर पडणार तर मग सुरवातीलाच पार्क ग्युएलParc Guell करा. खूप मोठं आणि छान आहे त्यामुळे वेळ खूप लागेल आणि मग जमेल त्याप्रमाणे ओल्ड टाऊन मधे भटका. पण I would go to the Cathedral in Old Town. या लोकांचं हे वैशिष्ट्यच म्हणायला पाहिजे. आपण कस नेहेमी आज्ञार्थी बोलतो. म्हणजे "आधी तुम्ही हे बघा नंतर कॅथेड्रलला मात्र जाच”. यांचं तसं नाही ते म्हणताना मी इथे नक्की गेलो असतो किंवा मला इथे जायला जास्त आवडेल असं म्हणतात.

"कसं जायचं ते मी सांगतो" अस म्हणत मग तो मॅपकडे वळला. पसाज दी ग्रासिया किंवा पॅरालल स्टेशन. इथे गेलात की या रस्त्यावर तुम्हाला २४ नंबरची बस मिळेल ती घेऊन तुम्ही पार्कला जा. खूप मोठं आहे. फिरायला आणि बघायलाही. तिथून शहराचा एरिअल व्ह्यूही छान दिसतो. आज जरा मी दिवसभर बाहेर असेन पण For anything you need please contact me without any hesitation. हेझिटेशन कसलं? काल तर रात्री उशीराही हाक मारलीच होती की! असं मनात म्हणत त्याचे आभार मानून आम्ही फिरायला बाहेर पडलो.

पसाज दी ग्रासिया स्टेशन आम्हाला नवीन नव्हतं. या शहरात पाऊल ठेवलं तेच इथे त्यामुळे ओळखीचं. आम्ही रस्त्यावर आलो आणि स्टॉपचा अंदाज घेत होतो कारण २४ नंबरची बस खरी, पण कुठे जाणारी हे कुठे माहीत होतं? .बसला यायला ९ मिनिटं होती (हो इथल्या स्टॉपवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पट्टीवर बसची वेळ आणि किती वेळात ती अपेक्षित आहे दोन्ही दाखवतात)  तोपर्यंत निरीक्षण करू म्हटलं तर बरेच आमच्यासारखे टूरिस्ट दिसले म्हणजे बहुधा बरोबर आहोत. बस आली आणि कार्ड स्वॅप करायचं कुठे असा विचार करत असता ड्रायव्हरने हात दाखवून खूण केली. त्याला पार्क म्हणेपर्यंत त्याने जोरदार मान हलवली हसत हसत. आधीच्या प्रत्येक प्रवाशने हाच प्रश्न विचारला असावा. खच्चून भरलेल्या त्या बसमध्ये आम्ही एका कोप-यात उभे राहिलो.

बस सुरू झाली. वेगाचा प्रश्नच नव्हता. शहरातून सिग्नलच्या मांदियाळीतून ती जाणार होती त्यामुळे शहर दर्शन होत होतं. एक दोन स्टॉप्स गेल्यावर बघितलं तर आजूबाजूला सगळे सहप्रवासी म्हातारे! आपण कोण हा विचार त्यावेळी तरी मनात आला नाही. सगळ्या जास्तच नटलेल्या बायका आणि काठीच्या आधारावर जेमतेम उभे असलेले त्यांचे नवरे. बसलेल्यांमध्येही म्हातारे पुरूष किंवा स्त्रियाच होत्या. हास्यविनोद मोठमोठ्याने सुरू होते. गंमत म्हणजे शेजा-याने केलेल्या विनोदावर हसायला इथे बंदी नव्हती. ओळख पाळख काही लागत नव्हती. आमच्या शेजारची एक बाई बाहेर बघत मधेच मान वळवून कोणावर तरी कॉमेंट करून हसत होती आमच्याकडे पाहून रिस्पॉन्स मागितल्यासारखे हसत होती. एकूण मस्त माहोल होता. उभे राहिल्याचा त्रास या वातावरणामुळे नाहीसा झाला. इतक्यात एका स्टॉपवर एक तरूण बाई चढली. काय ते कळलं नाही पण एका म्हातारीने चटकन उठून तिला बसायला सांगितले. ती नाही नाही म्हणत होती तर दोघी तिघींनी तिला जबरदस्तीने बसायला भाग पाडले. मला काही कळत नव्हते. त्या शेजारच्या बाईने सगळी अ‍ॅक्शन करून दाखवली आणि त्या म्हाता-या बायांनी गर्भार बाईला ती नको नको म्हणत असताना बळे बळे बसायला कसं भाग पाडलं ते माझ्यासमोर उभं केलं की हसू आवरेना आम्हा दोघांना.

एखाद्या कसलेल्या गाइडप्रमाणे वाटेतल्या सुंदर इमारतींकडे निर्देश करत तिच्या बरोबरच्या बाईला शहर दाखवत होती. In fact जाता जाता आम्हाला दिसलेल्या (किंवा अशा प्रकारे दाखवल्या गेलेल्या) गौडीच्या ला कासामुळे (आमच्या इंटरनेट होमवर्कमुळे सगळी चित्र आम्हाला पाठ झाली होती) परत येताना कुठे उतरायचं हे ठरवता आलं. वळणा वाकणाचा तो रस्ता ४०-४५ मिनिटानंतर संपला आणि पार्क आल्याचं सगळ्यांना कळलं. उतरण्याची इथे कोणालाच घाई नसते. त्याप्रमाणे आम्हीही निवांत उतरलो आणि सुरू झालो.

उजवी बाजू धरून जायचं असं ठरवल्यानंतर प्रवेशद्वारावरील वादकांच्या गर्दीकडे दुर्लक्ष करून आत गेलो. सन १९०० मधे गौडीने हे पार्क उभं केलं. त्याने बांधलेल्या वेगवेगळ्या टेरेसेस बघताना थक्क व्हायला होतं. गुहा वाटाव्या असं हे बांधकाम दुरून नैसर्गिक वाटावं असं आहे. झाडांचे बुंधे वाटावेत असे खांब तो वापरतो. हे खांब पुनः सरळ नाहीत. सौंदर्याची त्याची आणि आमची व्याख्या जरी वेगळी असली तरी या गोष्टी बघताना स्तिमित व्हायला होतं. ते बघत बघत आम्ही अरूंद पायवाटांवरून चालत वरच्या दिशेने गेलो तेव्हा एका रस्त्याला लागलो. हा सर्वोच्च भाग असावा या पार्कचा. इथून शहर खाली दिसत होते. रस्ता मात्र प्रायव्हेट रोड असावा. कच्चा रस्ता. कदाचित एखादी गाडीही येत असेल. पण तिथून खाली उतरत जाणारा रस्ता एका टेनिस ग्राऊंडसारख्या मैदानावरून पुनः बागेकडे वळत होता. येताना पाय-या चढून आलो होतो आता रस्त्याने उतरायचं ठरवलं.

इथे असलेली इतर वास्तु शिल्प बघितली.सिरॅमिक्सच्या काही छान रचना दिसतात. एक मोठी पाल, त्याला म्हणताना ड्रॅगन म्हटले तरी ती पालच, आहे सिरॅमिक्समधलीच. तिच्या प्रतिकृती जागोजागी विकायला दिसत होत्या. वाटेतले बहुसंख्य विक्रेते दिसत तर आपलेच होते पण कोणीही ओळखीचं हसायला तयार नाही असं का हा विचार कालपासून डोक्यात घोळत होता त्याचं उत्तर आज मिळालं त्यांच्या संभाषणातून. "अरे वह लडकी लाहोर तक गयी उसके लिये लेकिन वह माना नहीं तो क्या करेगी बेचारी" तरीच! आमचा हिंदू बाणा उत्तराच्या कपाळावरील कुंकवाने स्पष्ट केला होता त्यामुळे त्यांना शत्रूराष्ट्रातील आमच्याविषयी संभ्रम नसावा आणि म्हणून ते हसत नव्हते! पण अशातही काही जण या पलीकडचे त्यातही मजा करणारे असतात. बरेच जण तिथे पाण्याच्या बाटल्या विकत होते. आमच्याकडे हातातच असलेली पाण्याची बाटली जाहीर करत होती की आम्ही पाणी घेणार नाही. ऍक्वा ऍक्वा असा स्पॅनिश जप सुरू असताना एकजण जवळ येऊन मोठयाने पानी असे ओरडला आणि आम्ही चमकून त्याच्याकडे पाहिल्यावर हसून हात करून पुढे निघून गेला.

खूप फिरलो या पार्कमध्ये. उंचावर असलेला एक क्रॉस बघितला. फोटो घेतले. शहराचे फोटो घेतले. कालपासून आम्ही बघत असलेले पोर्ट, साग्रादा फमिलिया चर्च, तो अघबार टॉवर ज्याने आम्हाला हुलकावणी दिली होती सगळं पहात होतो त्यावेळी स्वाभाविकपणे आठवण झाली आयफेल टॉवरवरून दिसलेल्या पॅरीसची. आखीव रेखीव सुंदर रस्ते, ती सुंदर सीन नदी, त्यातल्या बोटी, एखादाच अपवाद असणारी ती विजोड उंच इमारत वगळता प्रत्येक चौक प्रत्येक इमारतीवरील घुमट हा इतक्या सौंदर्यपूर्ण रीतीने त्या त्या जागी मांडला होता. एकदाही आम्हाला कुठली असुंदर, कुरूप तर सोडाच, गोष्ट दिसली नाही. इथे आम्ही आलो खूप अपेक्षेने पण दिसत होतं ते फक्त गजबजलेलं शहर, दाटीवाटीने उभी असलेली घरं, इमारती!. ना कसलं नियोजन ना सौंदर्य. अर्थात हा फक्त एरिअल व्ह्यू आहे. प्रत्यक्षात मात्र तितकेच सुंदर रस्ते, झाडं, मैदानं, चौक आणि वास्तु शिल्पं या बार्सिलोना शहरातही आहेत याचा प्रत्यय आम्ही कालपासून घेत होतो आणि आजही त्याचा प्रत्यय येणार होता.

                                                        भाग पाचवा पुढील मंगळवारीगौडीच्या टेरेस. त्या लांबून बघताना इतक्या नैसर्गिक वाटतात! आज शतकानंतरही उभं असलेलं हे बांधकाम आपल्याला अश्चर्यचकित करून सोडतं.

पार्क ग्युएलवरून दिसणारं बार्सिलोना शहर! फोटोत बांधकाम सुरू असणारं साग्रादा फमिलिआ हे चर्च व डावीकडचा सुळका अघबार टॉवरचा. एक एकोणिसाव्या शतकाची साक्ष काढणार तर दुसरा विसाव्या शतकाचा प्रतिनिधी.

दुरून दिसणा-या या टेरेस

नैसर्गिकतेचा आभास हे गौडीचं वैशिष्ट्य आहे का?


आणि हे तिरके खांब, हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणारे


ही सिरॅमिक्सची करामत! गौडीची खासियत!


या ठिकाणी त्याने टाइल्सचा वापर केला आहे.
परीराज्यातला महाल. हा माणूस स्वप्नात तर जगेत नसेल?


शब्दाविना सौंदर्य कळावेNo comments:

Post a Comment