Monday, 9 December 2013

SPAIN BARCELONA V

स्पेन बार्सिलोना V 

पार्क ग्युएलवरून परतीच्या  प्रवासात कासा मिला ही गौडीची प्रसिद्ध इमारत बघितली. एका रस्त्यावरून सुरू होऊन वळून दुस-या रस्त्यावर संपणारी ही मोठी इमारत. गच्चीवर काही शिल्पसदृष आकृती आहेत. आमच्या एका आर्किटेक्ट मित्राने फ्री फ्लोइंग बाल्कनीजचं उदाहरण म्हणून यापैकी एक बिल्डिंग दाखवल्याचं मला चांगलं स्मरतं. या प्रत्येक इमारतीत जाण्याकरता १२ ते १५ युरो द्यावे लागतात. त्यामुळे बाहेरून दर्शन आणि फोटोरूपी आठवण जवळ ठेवत आम्ही तिथून निघालो.
   
Casa Milà





दुपारचा एक वाजून गेला होता. पोटपूजा झाली नव्हती. मघा पार्कमध्ये दुप्पट पैसे देऊन कॉफी घेतली त्याचा काय तो पोटाला आधार होता. सगळीकडे मांसाहाराचा जल्लोष होता. अर्थात हे स्पेन आहे हे आम्हाला सुद्धा माहीत होते त्यामुळे तक्रार नव्हतीच. शेवटी कंटाळून एका सुपर स्टोअरकडे, आपल्याकडचा वाणी, वळलो. म्हटलं निदान केळी, फळं तरी मिळतील. केळी घेतली आणि समोर केक्स दिसले, पुढे काऊंटरवर आलो तर सामोसे. चला म्हणजे आपल्याच माणसाचं दिसतं आहे दुकान!  तो काऊंटरवरचा मुलगा पुढे आला त्याला हिंदीतून विचारलं बाबा फ्रेश का तर म्हणाला नका घेऊ, सकाळचे आहेत आणि केव्हा बनवले असतील कोण जाणे. आम्ही हे ठेवतो, बनवत नाही. त्याला आमच्याकडे बोलताना पाहून त्या गो-या लोकांच्या चेहे-यावरचे कौतुक की आणखी काही भाव बघून गंमत वाटली. पण जरा तेवढच आपल्या (!) माणसाशी बोललो याचं समाधान आणि हो, आम्ही आज खूप बचत केली होती हे मात्र खरेच

आता फिरत निघू या म्हणत दिशाहीन फिरत असताना दूरवर, त्या रस्त्याच्या टोकाशी, एकदम तो समोर उभा

Torre Agbar

अगबार टॉवर!. एका फ्रेन्च आर्किटेक्टने उभा केलेला हा सुळका रात्रीच्या रोषणाईत छान दिसतो असं सांगितलं जातं. आत असलेल्या कॉर्पोरेट ऑफिसेसमुळे आत जाण्याची परवानगी नाही.  एरवी इथून शहराचं दर्शन सुंदर झालं असतं. इथे येताना वाटेत लागणारा ट्रॅम वे पार करून आलो होतो. आम्ही काढलेल्या तिकिटावर ट्रेन (मेट्रो ) बस याबरोबर ट्रॅमही होती. त्यात बसून आम्ही ओल्ड टाऊन म्हणजे Ciutata Vella हा शेवटचा स्टॉप गाठला. अलीकडेपर्यंत हा भाग म्हणजेच बार्सिलोना होतं. विसाव्या शतकात मग ते विस्तारलं आणि ऑलिंपिकनंतर त्याला हे आधुनिक रूप मिळालं

उतरलो तेथून हाकेच्या अंतरावर समुद्र होता. काल खरतर येऊन गेलो होतो. आज  निदान धावती भेट तरी द्यावी म्हणून गेलो. आजही ऊन असल्याने उत्साहाचा माहोल होता. सगळे टॅन होणारे आडवे पडलेले होते. बीचबॉल, व्हॉलीबॉल वगैरे खेळ सुरू होतेच. काल लक्षात न आलेला डेक आज नव्याने बघितला.

आम्ही तिथून पुढे होऊन मग कॅथेड्रल किंवा इतर काही बघण्याकरता जाणार होतो. पण आमचा आणि नकाशाचा मेळ तसाही कधी जमला नाही. रस्तोरस्ती असलेले बाण आणि नकाशा यांचा अजिबात मेळ नव्हता. आम्ही निघालो तेथे एक मोठा चौक दिसला आणि मोठे पार्कही. झू बोटॅनिकल गार्डन वगैरे पाट्या पाहून परत फिरायचं तर आर्क डी ट्रॉम्फची पाटी दिसली. सुदैवाने तोही मिळाला आणि मग लक्षात आलं की याच्या जवळच बुसेस इस्टाशिया (Busos Estacia) आहे. ते Trein Estacia Barcilona Noord च्या जवळ आणि बस स्टेशनही त्याच्या जवळ. उद्या विमानतळाची बस शोधण्याकरता यायच होतं ते हे अनायासे झालं. हे सगळं बोलणं सुरू आहे आम्हा दोघात इतक्यात श्रीशैलचा फोन!

Arc de Triomf

बाबा तुमचं उद्याचं बार्सिलोनाहून निघणारं फ्लाइट रद्द झालं आहे फ्रान्समधल्या संपामुळे. तेव्हा बार्सिलोनाऐवजी जिरोनाहून आइंडहोवनचं फ्लाइट बुक करून तुम्हाला मेल करतो. प्रिंट आऊट घ्या. आज रात्रीच जिरोनाला जा म्हणजे सकाळी धावपळ नको. फ्लाइट सकाळी ६.५५ चे आहे. बार्सिलोनाहून बस निघते ती ३.४५ला त्याऐवजी जिरोनातून ५ वाजता निघता येईल. थोडी झोपही होईल. इतका द्राविडी प्राणायाम कशासाठी तर एक दीड तासाच्या झोपेसाठी.  काही तासांकरता कमीतकमी ६५ युरो द्या जिरोना हॉटेलला. शिवाय रेल्वे भाडं वेगळं. मी श्रीशैलला म्हटलं तिकीट मेल कर पुढचं माझ्यावर सोपव. आम्ही बस स्टेशनजवळ आहोत. इथली व्यवस्था मी करेन. तशीच वेळ आली तर रात्रीची शेवटची बस घेऊन एअरपोर्टला जाऊ पण १०० वर युरो फुकट घालवायचे नाहीत. नशीब! ऐकलं माझं. आम्ही बसची चौकशी केली आणि इकडे तिकडे करेपर्यंत त्याचा फोन, मेल केला आहे प्रिंट आऊट घ्या आणि मला सांगा किंवा मेलला रिप्लाय करा. आम्ही कॉफी घेऊन जात असता इंटरनेट अशी अक्षरं दिसली. सुदैवाने कॅफे होता. आत गेलो तर चेहरा भारतीय वाटला म्हणून विचारले तर दिल्लीकर होता. गप्पांना सुरवात, तोपर्यंत प्रिंटआऊट तयार झाली. मध्यंतरीच्या वेळात दिवस कसे खराब आहेत, रुमानियाच्या मुलाला कसं लुबाडलं, तुम्ही कशी काळजी घ्या हे सगळं त्या दिल्लीकराने आम्हाला सांगून झाल्यावर आम्ही तिथून प्रिंट  आऊट घेऊन निघालो.


आता फार गुंतायचं नाही कारण घरी जाऊन टिऍगोला सांगून टॅक्सी ठरवायला हवीटॅक्सी कंपनीचे फोन नंबर माझ्याकडे असून उपयोग नव्हता. त्यांची भाषा स्पॅनिश, म्हणजे  भाषेचा प्रश्नकॅथेड्रल अजून बघायचं होतं आणि ते मार्केटपैकी मार्केट दुरुस्तीसाठी बंद होतंओल्ड टाऊनमधल्या गल्ल्या धुंडाळताना एक चर्च दिसलं होतंभव्य वगैरे पण कॅथेड्रल ते हे नसावं असं वाटलंतिथून निघालो तो एक काही छानसं डोकावतं आहे बिल्डिंगआडून ते पाहू आणि निघू असं ठरवीत पुढे गेलो आणि थेट कॅथेड्रलसमोर

Barcelona Cathedral

टिऍगोचे शब्द आठवले, I will definitely go to Cathedral. आल्याचं समाधान झालंअतिशय सुंदर अशी ती वास्तू आहे. समाधानानं आता परत जाऊ म्हणून निघालो तर उत्तराला त्या पिकासो मुझीची आस लागलीते म्हणे सुंदर आहे बाहेरून सुद्धाकोण सांगतं हे तिला ते माहीत नाहीशोधत गेलो तर एका सामान्य अरूंद गल्लीत तशीच एक इमारत होती त्यावर म्युझिअमचा बोर्ड  होताएक दोन पेंटिंग्जची दुकानं दिसली. म्युझियम दिसल्यामुळे (!) उत्तराची भुणभुण थांबली होती. म्युझियम अर्थात बंद होतं त्यामुळे मीही आनंदात  होतो.  तसाही पॅरीसनंतर मी म्युझियम न बघण्याचा पण केला आहे. इथून आता उत्तराला नवीन काही आठवण्याच्या आत लवकरात लवकर काढता पाय घेणं श्रेयस्कर  होतं.
                                                    
                                          भाग सहावा आणि शेवटचा पुढील मंगळवारी

No comments:

Post a Comment