Monday, 16 December 2013

SPAIN BARCELONA VI

स्पेन बार्सिलोना VI

आता खाऊन परत जाऊ म्हणून एका हॉटेलमध्ये शिरलो. छान हसतमुख मंगोलिअन वेटर. हे चिनी काही पाठ सोडत नाहीत असं  उत्तरा  म्हणाली  तेव्हाच  तिला  म्हटलं  हा चिनी वाटत नाही फिलिपिनो  असावा.  तो  प्रत्येक गि-हाइकाशी बोलणार. इंग्रजी चांगलं. त्याला व्हेज म्हणजे काय ते माहिती त्यामुळे कशात सामिष नाही ते पदार्थ त्याने दाखवले. वाईनचा एकच ग्लास ना हे पण डोळे मिचकावत विचारलं. प्लेटस घेऊन येताना खुर्च्यांच्या रांगेतून सरळ न येता आट्यापाट्या खेळत नाचत आला. कामातला आनंद कसा लुटावा आणि तो दुस-याला सहभागी करून घेत कसा वाटावा याचं तो म्हणजे मूर्तीमंत उदाहरण होता

जेवून घरी यायला तरी साडे दहा झाले होते. आज टिअ‍ॅगोबरोबर बोलणे आवश्यक होते. उद्या सकाळी ९ ऐवजी आम्ही रात्री ३ वाजता निघणार होतो हे त्याच्या कानावर घालणे गरजेचे होते. निघताना किल्लीची व्यवस्था काय वगैरे बोलायला हवे. आमच्याकरता रात्रीच्या ऑड  वेळी टॅक्सी हवी असल्याकारणाने त्याकरता  रिक्वेस्ट  करायची  होतीच. दार उघडून आम्ही घरात शिरलो.  घरात दिवा होता पण टिअ‍ॅगो कुठे दिसला नाही. ठीक आहे म्हणत आम्ही आमच्या खोलीत गेलो. जरा फ्रेश होऊन मी बाहेर हॉलमध्ये येऊन बसलो असताना दोघेजण आले. टिअ‍ॅगोने ओळख करून दिली हा दिएगो, your host. मग त्याच्याशी गप्पा झाल्या. दोघेही इथले म्हणजे स्पेनमधले नाहीत हे कळले. दिएगो साग्रादा फमिलिआमध्ये (हा एक  मोठा ट्रस्ट आहे) नोकरी करतो. आमचं खरच दुर्दैव. वेळ कमी होता आणि तोही भेटला नाही सकाळी नाहीतर त्याच्याबरोबरच ते चर्च बघता आले असते. दिएगो कोलंबियाचा आणि टिअ‍ॅगो ब्राझिलचा त्याचा स्टुडिओ आहे. हा उद्योग, म्हणजे अपार्टमेंट मधल्या बेडरूम्स रेंट करण्याचा,  त्यांनी नव्याने सुरू केला होता. म्हणजे आम्ही पहिलेच पाहुणे होतो त्यांचे.स्वतःचा व्यवसाय असल्याने टिअ‍ॅगो कधीही available होऊ शकत होता. त्याला हे manage करणे शक्य होते. आमच्या अनुभवाप्रमाणे ते तो प्रामाणिकपणे करत होता आणि चांगले enjoy ही करत होता

आमचा बदललेला प्लॅन त्यांच्या कानावर घातला आणि टॅक्सीची अडचणही सांगितली. त्याने ताबडतोब टॅक्सीला फोन केला. अपार्टमेंटपाशी आल्यावर मला (=टिअ‍ॅगोला) फोन कर असेही टॅक्सीवाल्याला त्याने सांगितले. मी त्याला म्हटलं माझा नंबर टॅक्सीवाल्याकडे दे म्हणजे इतक्या ऑड वेळेला उठण्याची तुला आवश्यकता नाही पण त्याला त्याची तयारी होती. हे सगळं झाल्यानंतर पुढे म्हणाला टॅक्सीवाल्याने हो म्हटले म्हणजे तो येईल असे नाही. पण मला फोन कर असे मी त्याला सांगितले आहे. फोन आला की तुम्हाला मी पहाटे सांगतो.

आम्ही सव्वादोनचा गजर लावून झोपलो.  उठून आवरलं आणि तीन वाजता अपार्टमेंटची चावी टेबलावर ठेवून बॅगा घेऊन खाली अपार्टमेंटच्या दारात आलो. टॅक्सीवाला आला की फोन करून टिअ‍ॅगोला उठण्याचा त्रास नको द्यायला. पण ती वेळच आली नाही.

आम्ही वाट बघत बसलो होतो. आमचा अस्वस्थपणा वाढत होता. घड्याळात सव्वातीन वाजले होते. पावणेचारची बस.  अपार्टमेंटचा दरवाजा उघडून बाहेर पडलो की पुनः आत येणं शक्य नाही कारण किल्ली वर देऊन टाकली होती. पण इथे नुसते बसून काय साध्य होणार? उत्तराला म्हटलं उचल बॅग आणि चल रस्त्यावर. बाहेर आलो तर दूरवर एक टॅक्सी, हिरवा दिवा असलेली (इथे टॅक्सी रिकामी आहे हे कळण्यासाठी असा दिवा असतो) दिसली. मी जरा पुढे होऊन त्याला हात उंचावला. वेगाने पुढे येत त्याने टॅक्सी थांबवली. आमच्या बॅगा डिकीत टाकल्या आणि मी सांगितले बुसेस इस्टॅशिया!

रात्रीची वेळ. रस्ते सारे सुनसान. अनोळखी देश. पण मनात कुठे हा आपल्याला फसवेल वगैरे नव्हते त्यामुळे भीतीचा लवलेशही नव्हता. आपल्याच देशात आपण इतके निर्भर राहू शकतो का असा विचार मनात डोकावून गेला. रात्रीचे तीन वाजून गेले होते. रहदारी ती काय असणार रस्त्यावर? पण ट्रॅफिक लाइटस सुरू होते आणि टॅक्सीवाला प्रत्येक लाल दिव्याकडे गाडी थांबवून तो हिरवा होण्याची वाट बघत होता.


आम्ही काल बस स्टेशन बघून गेलो होतो उद्या एकदम नव्याने बघायला नको म्हणून. पण आताचा टॅक्सी थांबवली त्या एन्ट्रन्सचा काल आम्ही आलो होतो त्या बाजूशी काही संबंध नव्हता. आम्ही लिफ्टने खाली २८-२९ प्लॅटफॉर्मवर पोहोचलो. हा प्लॅटफॉर्म वगळता बाकी सारे बस स्टेशन सुनसान होते. एअरपोर्ट बस वगळता इतक्या लवकर बसेसची वाहतुक सुरू होत नसावी. कुठे तिकिट काढण्य़ाचे मशीन दिसते का ते पहात होतो. एका मशीनपाशी एक काळा माणूस उभा होता तो जाण्याची वाट बघत मागे उभा राहिलो. तेव्हढ्यात एक बाई (सफाई कामगार) झाडता झाडता थांबून विचारू लागली तिकेट? हातानेच तिने इथे नाही सांगितले. नंतर सरळ जाऊन बस थांबली आहे तिकडून वर जा आणि काऊंटरवर तिकिट मिळेल हे खुणेने सांगितले (भाषेची बोंब! तिची नव्हे आमची! आम्हाला स्पॅनिश येत नव्हते.) . "ग्राशियस" म्हणून आभार मानून आम्ही लिफ्टने वर गेलो. अर्धवट ज्ञान घातक असते त्याचा अनुभव आला. काल प्लॅटफॉर्म बघितला होता म्हणून आज त्या दिशेने धावत सुटलो. तेव्हा टॅक्सीतून उतरून आत आल्याबरोबर समोर असलेली खिडकी दिसलीच नव्हती त्या घाईत.  समोरच्या काऊंटरवर तिकिट काढून पुनः खाली आलो. बसचा ड्रायव्हर आला आणि आमच्या हातातली तिकिटं घेऊन स्वतःच स्वॅप केली. बरोबर ३.४५ वाजता गाडी सुरू होऊन ३.४६ला आम्ही एअरपोर्टच्या दिशेने प्रस्थान केले. चला आता काळजी नाही. विमानात बसले की आपल्या (आइंडहोवनच्या) घरी!

                                                                   इति बार्सिलोना अध्याय समाप्त


ता..

हे लेख वाचणा-या अनेकांनी फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटीत एक गोष्ट स्पष्ट केली की फोटोंच्या निवडीचा अधिकार राखून ठेवण्याचा अधिकार तुला कोणी दिला? उदा पार्क ग्युएलच्या इतक्या सुंदर गॅलेरीज किंवा सिरॅमिक्स वर्क्स, कासा मिलावरील शिल्पसदृष आकृती यांच्याविषयी तुला कळत नाही इथवर ठीक आहे पण म्हणून ते फोटो आम्ही बघू नयेत हे ठरवण्याचा अधिकार म्हणण्यापेक्षा नकाराधिकार तू वापरू शकत नाहीस.. मला हे पूर्णतया मान्य आहे म्हणून मी सर्व फोटो तुमच्यासाठी अपलोड करून त्याची लिंक खाली देत आहे म्हणजे ज्यांना खरोखर त्यात रस असेल त्यांना बघता येईल.


2 comments:

  1. लेखमाला संपली याची हुरहुर वाटते. असाच दूर देशी फिरत रहा आणि तुझ्याबरोबर वाचण्या-याच्या आनंदातही भर घालत रहा. जमलेली लेखमाला.

    ReplyDelete
    Replies
    1. बार्सिलोना अध्याय संपला.

      Delete