Monday, 14 October 2013

DUTCH BIKING (PART IV)

भर रस्त्यावर सायकल चालवणारी ही इतकी छोटी मुलं ही आमची प्रेरणा!


आम्ही जात होतो तो रस्ता विचित्र होता. सायकलींकरता वेगळा रस्ता नाही. मधेच शोल्डरसारखं खडबडीत आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेला रस्ता अरुंद. इथे नेहेमी धावणारे आणि सायकलवाले दिसत तरी टोकाला असलेल्या क्लब्जमध्ये किंवा स्टेडियममध्ये जाणा-या गाड्या तुरळकपणे का होइना दिसत असत. त्या गाड्या या धावणा-या सायकलस्वारांना अडचण नको म्हणून शोल्डरला(खडबडित पट्ट्याला) मधे ठेवून दोन बाजूंना दोन चाकं अशा चालवल्या जात म्हणजे दोन्ही बाजूचा सपाट रस्ता सायकलकरता मोकळा रहात असे. पण दोन्ही दिशांनी एकाचवेळी गाड्या असतील तर नाइलाजाने काही वेळ एका बाजूने चालवत. गाडी समोरून दिसली की त्यामुळेच घाबरायला होत असे. पण या लोकांचं वैशिष्ट्य हे की त्यांच्याकडे नियमांना महत्व आहे आणि ते पाळण्याची शिकवण अंगी बाणलेली आहे. प्राधान्यक्रम अतिशय स्पष्ट! प्रथम पायी चालणारा. नंतर सायकल नंतर मग गाडी! सायकलवाल्याने समोरून येणा-या धावणा-याला वाट द्यायची, म्हणजे बाजूला व्हायचे तसेच गाडीवाल्याने रस्ता अरूंद असल्या ठिकाणी शांतपणे मागून गाडी आणायची. सायकल ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न नाही किंवा हॉर्न देणं नाही. हॉर्न देणं हा अपमान समजला जातो आणि आपल्यासारखी दुस-याचा पदोपदी अपमान करण्याची यांना शिकवण नाही.

आमचं सायकल चालवणं सुकर झालं ते या सगळ्या गोष्टींमुळे. आम्हाला माहीत होतं, मनात खात्री होती की नियम समजून घेतले आणि पाळले तर प्रश्न नाही. समोरून येणा-या गाडीत बसलेल्याला आपल्याला घाबरवून आनंद लुटण्याची कला अवगत नाही. सिग्नलला तो हिरवा होईपर्यंत थांबायचं हे प्रत्येकाचं कर्तव्य. त्यामुळे आपण हिरवा दिवा बघून गेलो तर धोका नाही. आणि सिग्नल लाल असताना रस्त्यावर एकही गाडी नाही म्हणून आपण सिग्नल तोडून रेटून पुढे जाण्याची यांची पद्धत नाही. अगदी मध्य रात्रीसुद्धा हे लोक सिग्नलला गाडी थांबवून सिग्नल हिरवा होण्याची वाट बघत शांतपणे उभे असतात. आमच्या सायकल चालवण्याचं श्रेय त्यामुळे डच लोकांना आहे.

आम्ही आता नेम केला की सकाळी थोडा वेळ आणि संध्याकाळी थोडावेळ सायकल घेऊन बाहेर पडायचं. रोज नवीन रस्ता. ट्रॅफिक आहे किंवा नाही हे पहायचं नाही. पण शक्यतो शांत वेळ निवडायची. म्हणजे साधारण दुपारी ११ आणि ४. तसा आमच्या घराजवळचा रस्ता शांत. पण एकदा असं झालं सायकल रस्त्यावर आणली आणि दोन्ही बाजूंनी मोठ्या गाड्या. काहीच कळेना. सायकल सरळ हातात धरून पुढे गेलो. सिग्नलपर्यंत जाइस्तोवर बस आणि ट्रेलरही या मांदियाळीत सामील झालेले बघितले तेव्हा काहीतरी गडबड आहे असं वाटलं. कसलीतरी मोजणी सुरू होती आणि त्याकरता तो मोठा ऑल्स्टरवेग बंद करून आमच्या इथल्या गल्ल्यांमधून वाहने काढली होती. असे प्रसंग अर्थात कमी आले. या आठवड्यात एक मात्र झालं की समोरून येणारी गाडी किंवा मागून वेगात येऊन पुढे जाणारा डच यांचे काही वाटेनासे झाले. ते त्यांच्या मार्गाने जातील आपण कशाला काही टेन्शन घ्या.

नंतरच्या शनिवारी रविवारी उन्हाचे दिवस होते. पुनः श्रीशैलने उत्साहात विचारले, जायचे का बाहेर? आम्ही यावेळी conditional होकार दिला. म्हटलं जाऊ या पण जरा दूरवर. तो चकितच झाला. आम्ही वरून जाणारा हायवे ओलांडून पलीकडे गेलो तर तिथे रस्त्याच्या कडेला नंबर आणि बाण होते. हे बाइकपाथ आणि चालणा-यांसाठी ट्रेकच्या खुणा. शहराच्या सभोवती छान जंगल आहे. जवळच्या गावांमधून शेतामधून जात हे रस्ते तुम्हाला वेगळ्या बाजूने शहरापर्यंत आणून सोडतात. रस्त्यावरील खुणांना समोर ठेवत गेलं तर चुकण्याचा प्रश्न नाही.


दोन्ही बाजूंना शेतं, गवताचे भारे, गुरं, मधून जाणारा रस्ता आणि सायकलवरचे आम्ही


या रस्त्यांवर काय नाही? हे शहर वसवलं ते पाच गावांना सभोवार ठेवून. ती गावं अजूही गावच आहेत. शेतं, गुरं, गवताचे भारे, शेणाचा वास, सगळी गावाकडची लक्षणं असली तरी मागासपणा नाही. घरं व्यवस्थित आणि सुखवस्तू अशी. रस्तेही तसेच. या सगळ्यापेक्षा कौतुकाची बाब म्हणजे कुठेही सुरक्षेचा प्रश्न नाही. स्त्री पुरू, मुलं एकेकटी सुद्धा दिसत या जंगलवाटांवर. सायकलवरून जाताना, धावताना! हो, इथे व्यायामाचं महत्व इतकं आहे की वयस्कर माणसेही धावताना दिसतात. तर आम्ही साधारण ५-६ कि.मी. चा फेरफटका मारून परतलो. परत येताना झालं असं की सिग्नलपाशी जाईपर्यंत सायकलकरता असलेला सिग्नल नेमका हिरवा होत असे. आम्ही दोघं त्याप्रमाणे अ‍ॅडजस्ट करून सिग्नल पार करतो आहोत हे बघून आमच्या गुरूला मग खात्री पटली असावी कारण निदान आता "बरी चालवता" असं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं.

काहीतरी नवीन करायच्या आमच्या प्रयत्नात हॉलंडमध्ये हॉलंडवासीयांप्रमाणे रहाण्याच्या आमच्या प्रयत्नाने आम्हाला खूप बळ दिलं. एरवी वेळ कसा घालवायचा याची आम्ही जरी तक्रार केली नसती तरी कुठे तरी ते मनात खटकत राहिलं असतं हे निश्चित. आता मात्र आम्ही स्वतंत्र होतो.

                                                               समाप्त


ही समाप्ती फक्त  डच बायकिंग या लेखमालेपुरती. पुढच्या मंगळवारी आपण भेटू या स्पेनमधील जिरोना व बार्सिलोना या शहरात.  

2 comments:

  1. डच बायकिंगचे चारही लेख सलग वाचले. केवळ लांबी जास्त म्हणून एखादा सलग अनुभव विभागण्यापेक्षा तो सलगपणे वाचताना चांगल्या त-हेने अनुभवता येतो. वाचकांनाही माझी सूचना असेल की अनुक्रमे म्हणजे डच बायकिंग भाग एक ते चार या क्रमाने वाचल्यास त्याचा प्रत्यय येऊ शकेल.

    ReplyDelete
  2. खरी गोष्ट आहे, मी सुध्दा सलग वाचते लिखाण एवढे ओघवते आहे कि समोर चलत चित्रपट उभा राहतो, फारच सुंदर!

    ReplyDelete