Monday 7 October 2013

DUTCH BIKING (PART III)





सायकली घरी आल्या तो शनिवार होता. श्रीशैलच्या anxiety चा परिणाम उलट होत होता. त्याची काळजी आम्हाला कळत होती आणि तो वैतागायला नको म्हणून आम्ही गप्प होतो.

दुसरा दिवस उजाडला. ऊन होतं. न्हाचं या लोकांचं अप्रूप आता श्रीशैलमध्येही आलं होतं. सततच्या ढगाळ हवामानानंतर येणारा सूर्य किती अप्रूपाचा असतो ते मुंबईत राहून कळणार नाही हे आम्हालाही थोड्याच दिवसात कळणार होतं.चला लवकर आटोपून बाहेर जाऊ या. छान ऊन आहे तोपर्यंत सायकल हाणून येऊ. "आटोपणे" म्हणजे आंघोळ हा आमचा concept आता आम्ही बाजूला ठेवला होता. आंघोळ ही सुट्टीच्या दिवशी ऐच्छिक म्हणजे न करण्याची गोष्ट असते हे आम्हाला एव्हाना ठाऊक झालं होतं. खाऊन घेतलं आणि निघालो.

एखाद्या सणासारखी माणसं घराबाहेर पडलेली होती. म्हणजे सजून धजून नव्हे, फक्त संख्येने सणासारखी. इथे ऊन पडलं की कपडे फेडायचे, म्हणजे स्वतःचे, हे सर्वमान्य. हाफ पॅन्ट आणि टी शर्टमध्ये लगेच हे लोक बाहेर पडतात. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सगळे. त्यांना स्वेटरशिवायचे असे दिवसही फार अनुभवता येत नाहीत हे खरच. तर रस्त्यावर गर्दी होती. यातून सायकल काढायची या कल्पनेने पोटात गोळा आला होता. पण बोलायची सोय नव्हती.

"इथून निघून आपण सिग्नलपर्यंत गेलो की तिथे उतरायचं. स्टॉप साइनच्या आधी.”

(बोलण्यातही अधोरेखित वाक्य असते हे आम्हाला इथे आल्यानंतर कळलेलं व्याकरण!)

"ब्रेक लावण्यापेक्षा आधीच जरा स्पीड कमी करून सायकल सावकाश घेतलीस तर तुलाच बरं पडेल.”

या सूचना आईकरता. त्या कून आम्ही सायकलवर स्वार झालो. मला तिच्यापेक्षा कणभर, कणभरच, जास्त चांगली(?) येते चालवता हे काल जाहीर झालं होतं त्यामुळे मी आधी, नंतर उत्तरा आणि शेवटी  पहा-याला श्रीशैल अशी आमची वरात बाहेर पडली. सुदैवाने एकही गाडी आम्हाला आडवी आली नाही त्यामुळे निर्विघ्नपणे सिग्नलपाशी उतरलो. वाट बघून मग माणूस हिरवा झाल्यावर सायकली हातात धरून पलीकडे गेलो.

"हा ऑल्स्टरवेग. मोठा रस्ता आहे पण इथे बाइकपाथ आहे त्यामुळे बसचं अवधान राखलत तर चालवायला सोपं. फक्त एक करा की सायकल रस्त्याच्या उजव्या कडेनेच चालवा. (वाहतूक आपल्या उलट दिशेने असते) डच लोकं खूप जोरात चालवतात. पुढे जाताना तुम्ही त्यांच्या मधे आला नाहीत तर त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही.”

हे सगळं कायला ठीक. पण तो डच माणूस जवळून जाण्यापूर्वी सूचना म्हणून एक हलकीशी टिंग अशी बेल वाजवे आणि मला दचकायला होत असे. तसेही आमच्या लहान रस्त्यांवर समोरून किंवा बाजूने गाडी आली की माझा थरथराट असे. फक्त माझं वरचं रॅन्किंग सोडायचं नाही म्हणून मी बोलत नव्हतो इतकच. तर आम्ही त्या रस्त्याच्या शेवटी पोहोचलो आणि पुनः थांबायची सूचना!

"आता पुनः रस्ता ओलांडायचा आणि पलीकडून परतायचं. पहिल्याच दिवशी उगीच जास्त नको!”

जास्त आणि कमी हाच ठरवणार मग प्रश्न कुठे येतो आमचा? हे अर्थातच मनातल्या मनात. मुलं मोठी झाली म्हणजे मुलांना घाबरून रहायला लागतं, असं आई नेहेमी म्हणायची त्याचा प्रत्यय आला.
आम्ही रस्ता ओलांडायला उभे होतो तेव्हा मी म्हटलं,
"हा रस्ता नंतर आपल्या रुस्टेनलानला जाऊन मिळतो. मस्त झाडं आहेत दोन्ही बाजूंनी.
श्रीशैल माझ्या तोंडाकडे बघतच राहिला. तुम्हाला काय माहीत? म्हटलं अरे आम्ही फिरायला बाहेर पडलो की या हायवे पर्यंत येतो रोज नवीन रस्त्याने आणि मग परततो. तेव्हा रस्ते चांगले माहीत झाले आहेत गेल्या आठवड्यात.




बर! म्हणून त्याने सोडून दिलं.
घराचा गुण! आमच्या घरात चांगलं म्हणायची पद्धत नाही! (हे अर्थातच उत्तराचं )

रस्ता ओलांडल्यावरचा रस्ता हा वाहने नसलेला. त्यामुळे टेन्शन फ्री होता. पुढच्या वळणावर मात्र डावीकडे वळताना दोन्ही बाजूंनी गाड्या बघण्य़ाची आवश्यकता होती. मी हाताने सिग्नल वगैरे न देताच डावीकडे वळलो त्याबरोबर सूचना झाली.

"लहान मुलं बघा. आई वडिलांबरोबर असतानाही वळण्यापूर्वी हात दाखवतात. तुम्ही सिग्नल न देता वळलात आणि मागून जोरात येणारा कोणी आपटला तर काय होईल याचा विचार करा.”

हे मात्र खरं होतं. आज तो बरोबर आहे, तो सगळी काळजी घेत होता. मागे कोणी नाही याची खात्री करून घेत होता म्हणून प्रश्न नव्हता. उद्यापासून सवय हवी हाताने सिग्नल दाखवून मगच वळण्याची पण त्याआधी सवय करायला हवी एक हात सोडून सायकल चालवण्याची.

फोटोंविषयी

  1. ज्या रस्त्यांवर वेगळे बाइकपाथ असतात ते गेरूच्या रंगात रंगवलेले असतात.  काही ठिकाणी रस्त्याच्या सुरवातीस असलेली पाटी सायकलचा मार्ग फक्त जाण्यासाठी किंवा जाण्या तसेच येण्यासाठीसुद्धा आहे हे बाणाने दाखवते.
  2. झाडांचे आच्छादन असलेले रस्ते, सायकलकरता सायकलचे चिन्ह असलेला सिग्नल आणि वाहतूक नसताही सिग्नलला थांबलेला सायकलस्वार.




                                                    उर्वरित भाग पुढील लेखात

No comments:

Post a Comment