Monday, 30 September 2013

DUTCH BIKING (PART II)

आम्हाला वाटलं त्याप्रमाणे हा माणूस मात्र डचच होता. त्याला सांगितल्या वेळी पोहोचलो होतो. हो हे ड्च पुनः सटकू असतात. वेळेत आला नाहीत म्हणून बाहेर गेलो असं सांगायलाही कमी करणार नाहीत. त्याने आम्हाला घराच्या मागील बाजूस नेलं. डच घरांची पद्धत अशी असते की घरांची, म्हणजे आपल्याकडे रो हाऊस असतात तशा घरांची एक रांग असते. त्याला पुढील बाजूने एक आणि शेजारील गल्लीच्या बाजूने एक असे दोन एन्ट्रन्स असतात. मागील बाजूने आपण अंगणात, मागीलदारी शिरतो आणि सायकल वगैरे ठेवण्यासाठी किंवा स्टोअररूम, अंगण तिथे असते. आम्ही त्याप्रमाणे मागील बाजूस गेलो तर पठ्ठ्याचे गराजच होते. खूप सायकली ओळीने उभ्या होत्या. आम्हाला चालतील अशा सायकली त्याने बाजूला काढल्या. पहिल्या दोन उंचीच्या एकाच गुणावर बाद झाल्या. त्यात उत्तराच्या सायकलची निवड पटकन झाली. तिला उंचीला कमी, पाय चटकन टेकतील अशी सायकल मिळाली. चालवताना काही त्रास नाही बघून ती फायनलही झाली. मला मात्र त्याने दाखवलेल्या सायकली. पसंत नव्हत्या. एकतर त्या जुनाट वाटत होत्या, दुसरं म्हणजे उंची कमी किंवा जास्त होती. शेवटी एक निळ्या रंगाची सायकल त्याने काढली. अगदी हवी तशी. मला टांग टाकायची नव्हतीच. चालवता येईल की नाही इतकं वाटत असताना सरळ एक राऊंड मारल्यावर वाटलं, जमेल की

माझी सायकल फायनल होईपर्यंत बाहेर रस्त्यावर उत्तराचं एकटीचच प्रॅक्टिस सेशन सुरू होतं. तिला संपूर्ण वळवणं (३६० अंशात) जमत नव्हतं. श्रीशैलचं म्हणणं त्याची कधी गरज भासत नाही. सरळ चालवता आली की झालं. वळवायची असलीच तर उतरून व्यवस्थित वळवायची की झालं! इथं कुठे स्पर्धेत भाग घ्यायचा आहे? तसही चुकीचं काहीच नव्हतं त्यात. आम्ही निघालो मग तिथून. पण सायकली हातात धरून, फुटपाथवरून चालत, बावळटासारखे!

"
मला विश्वास वाटत नाही तुम्हा दोघांचा. हा वहाता रस्ता आहे. थोडं असच गेल की पार्क लागेल. आतून जाऊ म्हणजे रहदारीचा प्रश्न नको". श्रीशैलने व्हर्डिक्ट दिल्यासारखं जाहीर केलं.

आता हा काय आमची परीक्षा घेणार की काय? आम्ही काय पार्कमध्ये चालवायच्या का सायकली? उत्तरा तेव्हढ्यात म्हणालीच मला,  "परस्वाधीन जिणं आणि पुस्तकी विद्या". "सत्तेपुढे शहाणपण नाही" असं मनात म्हणत निघालो. उगीच रस्त्यात वादावादी नको.

पार्कमध्ये बाइकपाथ होता. तसे हे आमचे नेहमीचे फिरण्याचे ठिकाण पण आतून सायकल चालवायची म्हणजे बाइकपाथवर माणसेही असणार. त्यांच्याबरोबर त्यांचे कुत्रेसुद्धा. त्यात हे ड्च सायकलवरून इतक्या जोरात पुढे निघून जातात! कशी चालवायची? हे सगळं मनात. कारण उघड बोलायची चोरी! तुम्ही हो म्हणालात म्हणून इतका खर्च केला असं म्हटलं तर काय घ्या? शेवटी पार्क जवळ आलं आणि आम्हाला परवानगी मिळाली. समोरून कोणी आलं की माझे हात थरथरत. सुदैवाने रस्ता अरूंद त्यामुळे आम्ही एकामागोमाग एक असू. हे सारे कोणाच्या (= श्रीशैलच्या) लक्षात येत नसे. पार्क संपल्यावर मग रस्ता, पण कमी रहदारीचा. पुढे सिग्नल आणि मोठा रस्ता. "तिथे सिग्नलच्या आधी थांबा." आम्हाला आदेश दिला गेला होता. मी ब्रेक दाबून सायकल थांबवली. उत्तराचा ब्रेक चेक केला नव्हता. ती स्टॉपसाइनच्या पुढे गेली आणि ब्रेक न लावता सरळ खाली उतरली. थोडी धडपड झाली तरी लोटांगण नाही याचं समाधान होतं. पण फार काळ ते टिकलं नाही.

" जमेल तितका बावळटपणा करायलाच हवा का? सायकल थांबवायला ब्रेक असतात. ते दाबून ती थांबवायची. मग उतरायचं!"

ही थिअरी तिलाही माहीत होती पण प्रॅक्टिकल जमत नव्हतं. होतं असं की ब्रेक जरा जास्त जोरात दाबावा लागे. या सायकलचं पॅडल उलट फिरवलं तरीसुद्धा ब्रेक लागतो याचा शोध अजून लागायचा होता. आणि हे माहीत असतं तरी मेंदूत ते प्रोग्राम्ड नव्हतं त्यामुळे लोच्या होता. पुनः सायकली हातात धरून आम्ही फुटपाथवरून घरी आलो. ही शिक्षा होती की खबरदारी कोण जाणे!                                                     उर्वरित भाग पुढील लेखात

पहिला फोटो   fietspad=bikepath सायकल  रस्ता

वरील फोटो स्थळ : EINDHOVEN GENNEPER PARKEN (डच उच्चाराप्रमाणे ख़ेनेपर पार्क)

1 comment: