Monday, 23 September 2013

DUTCH BIKING (PART I)"आपण तुम्हाला सायकली घ्यायच्या का? ” श्रीशैलचा मला प्रश्न.
आंधळा मागतो एक अशी खरी तर अवस्था आमची दोघांची. जरा एक राऊंड मारून येऊ का असं त्याला विचारायचं हजार वेळा मनात येऊन गप्प रहाणार कारण आम्हालाच तेवढा कॉन्फिडन्स नाही. आम्हा दोघांना सायकल चालवता येते. म्हणजे त्यावर बसून आम्ही पॅडल मारतो आणि न पडता तोल सावरत मोकळ्या रस्त्यावर इकडून तिकडे फेरी मारू शकतो ही आमची लेवल. तशी आम्ही रस्त्यावर म्हणाल तर श्रीशैल ६-७वीत असताना मध्य प्रदेशात मांडू येथे चालवलीही होती सायकल. पण तो होता आपद्धर्म. तिथे तशी वाहतूक व्यवस्था नव्हती आणि टॅक्सी परवडणारी नव्हती. आर्थिक पेक्षा मानसिक दृष्ट्या ! म्हणून केलेलं ते धाडस होतं. आता साठीला आल्यावर ही थेरं कशाला हवीत असे कॉमेंटस भारतात असतो तर निश्चितच झाले असते. गेल्या वेळी इथे आलो तेव्हाच आमच्या मनात होते सायकलबद्दल त्याला विचारायचे. पण मुलगा झाला तरी काही गोष्टी पुढे रेटायच्या जिवावर येतात. नाहीच जमली चालवायला तर? हे आधी मनात येतं. सायकलींच्या किमती तरी कमी आहेत का? सेकन्ड हॅन्ड म्हटली तरी १०० युरोच्या आसपास, पुढेच पण कमी नाहीत म्हणून जीव होत नव्हता. पण त्यानेच विचारल्यानंतर मग प्रश्नच नव्हता.


" बाबा तुम्ही येणार का बरोबर" शनिवारी मला श्रीशैलने विचारले. म्हटलं कुठे? आत्ता इतक्या सकाळी? खरतर सकाळचे दहा वाजून गेले होते पण उगीचच. म्हणाला सायकल बघितली आहे नेटवर. बरी वाटते. जाऊन पाहून येऊ. बरी वाटली तर चालवत आणता येईल ना तुम्हाला? आता आली का पंचाइत. विकत घ्यायला हो म्हटल्यावर आता माघार घ्यायची म्हणजे नामर्दपणा. छाती पुढे काढून हो म्हटलं खरं. पण जरा धडधडलच. कारण रस्त्यावर चालवण्याचा कुठे अनुभव असायला! त्यातून हे हॉलंडवाले गर्भात असल्यापासून चालवतात सायकल. हात सोडून उलटे पालटे कसेही. स्पीड वगैरे तर विचारायची सोय नाही. पण धीर करून रेटून दिलं खरं.

कोणातरी यासर नावाच्या माणसाची बदली झाल्याकारणाने सायकल विकायची होती. त्याच्याकडे आम्ही निघालो होतो. श्रीशैलबरोबर जाताना त्याच्यामागे डबलसीट बसून गेलो. तसं २०-२५ मिनिटं सायकलने म्हणजे फार अंतर नव्हे. पण आता ते असं अधांतरी बसणं नको वाटलं. गेलो तर जी सायकल विकायला काढली होती त्या सायकलचा ब्रेक घट्ट करायचा होता, पॅडल तुटलं होतं वगैरे. तीन चार दिवसात करतो असं तो विकणारा म्हणाला. किंमत ठरली आणि बुधवारी येतो सांगून आम्ही परत निघालो. बाहेर आल्यावर श्रीशैल म्हणाला नावावरूनच कळलं की हा डच नाही. पण निदान इथे (हॉलंडस्थायिक) रहाणारा असता तरी त्याने अशी वागणूक दिली नसती. आपल्याकडे पारशी जशी गाडी सांभाळतात तसे हे डच लोक आहेत. सायकलला जिवापाड सांभाळतील. हे डील काही प्रत्यक्षात येणारं नाही. मी बाकी ठिकाणी बघतो.

खरोखरीच दुस-या दिवशी "त्या" माणसाचा फोन आला की दुरुस्ती वगैरे जमणार नाही. आहे तशी घ्यायची तर घ्या. श्रीशैलचं म्हणणं खरं ठरलं होतं.

त्याच दिवशी मग आणखी एका ठिकाणी जायचं ठरवलं. या वेळी मात्र आम्ही तिघेही निघालो. कालच परत येताना जरा बघू रे म्हणून मी श्रीशैलच्या सायकलवर टांग टाकायला गेलो आणि पायाने एवढ्या उंच जायला चक्क नकार दिला. पाय तेवढा वर जायला तयार नाही. मग म्हटल एक मिनिट, तुझ्या सायकलवर पाय तरी पोहोचतात का ते बघू तर तेही नाही. म्हणजे माझा उंचीचा अंदाज साफ़ चुकला होता. तेव्हा ठरवलं आता जेन्टस सायकल वगैरे नाही. लेडिज सायकल घ्यायची म्हणजे टांग टाकायची भानगड नाही आणि उतरायला सोपी. मग उत्तरा म्हणाली असं जर असेल तर माझ्या उंचीचा अंदाज तुम्हाला कसा येणार? मीही येते. तिघांनीही जाऊ. म्हणून त्यादिवशी आमची तिघांची वरात निघाली खरेदीला.


                                                                  उर्वरित भाग पुढील लेखात

लेखाच्या  सुरवातीचा फोटो: बाईक  पाथ लाल रंगात रंगवलेला.  मोठ्या रस्त्याचा भाग असल्याकारणाने रूंद व दुपदरी. 

No comments:

Post a Comment