Monday, 25 May 2015

SWITZERLAND SCHILTHORN I


स्वित्झर्लंड शिलथॉर्न (१)

उर्सुलाने केलेली घाई आणि अर्थातच तिने आमच्या उरलेल्या कामाची घेतलेली जबाबदारी ( वॉशिंग मशिनमध्ये टाकलेले कपडे वाळवून बॅगेत भरून ठेवण्याची) यांच्या भाराखाली वाकत आम्ही हॉटेलमधून प्रस्थान ठेवले. तिच्या म्हणण्याप्रमाणे उशीरच झाला आहे ही टोचणी मनाला होतीच. हॉटेलपासून स्टेशन जवळ होतं. तिथून आम्हाला इंटरलाकेनमधल्याच ऊस्ट ( ईस्ट) स्टेशनला जायचं होतं. पुढचच स्टेशन. त्यामुळे प्रश्न नव्हता. ऊस्ट स्टेशन आल्यावर गाडीबाहेरबाहेर पडलो तेव्हा लक्षात आलं की ते स्टेशनही सुंदर, नेटकं आहे. मागे डोंगरांची पार्श्वभूमी लाभलेलं. आज अर्थात त्याच्याकडे बघायला त्याचं कौतुक करायला आमच्याकडे वेळ कमी होता. उर्सुलाने दिलेल्या कागदाप्रमाणे 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर गेलो आणि लाऊटरब्रुनेनची गाडी पकडली. त्यामुळे स्टेशनचं बाह्यदर्शन घडलच नाही.

*यावेळच्या गाडीचा रंग मात्र खूप वेगळा होता. हिरवा आणि पिवळा. आतापर्यंत स्वित्झर्लंडच्या झेंड्याच्या लाल रंगाची झालेली सवय आम्हाला या आताच्या गाडीच्या रंगाविषयी बोलताना जरा डावीकडेच रोखून धरत होती. पण सगळा रस्ता त्या गाडीच्या संगतीत काढल्यावर वाटलं की या इथल्या वातावरणाला किती साजेसा आहे हा रंग! आत्तापर्यंत बर्फाळ शिखरांच्या सान्निध्याची सवय, इथे तीही होतीच पण इथल्या डोंगरांवर हिरवाई होती. तसा इथे सपाटीचाही प्रदेश होता. त्यामुळे झाडांचा सहवास सुखद वाटत होता. आणि हो या सगळ्या मार्गावर म्हणजे आम्ही इंटरलाकेन वेस्टपासून सुरवात केली तिथपासून सोबत केल्यासारखा झुळझुळणारानदीचा प्रवाह साथीला होता. एकूणच हा निसर्ग तसा मैत्रीपूर्ण वाटणारा, त्यात या हिरव्या रंगाची साथ आणि त्यात मिसळून जाणारा हा गाडीचाही हिरवा पिवळा रंग! हे निसर्गाच्या तादात्म्याचं भान आपल्याकडेही ठेवायला हवं. तो आपल्याकडच्या डब्यांचा कळकट रंग फार विरूप दिसतो. जाऊ दे. निसर्गाच्या कौतुकात बुडालेलं असतानाच लाऊटरब्रुनेन आलं.

आता उतरून केबल कार घ्यायची की मग ग्र्युटशाल्प (Grütschalp). काही वेळा आपल्या नकळत आपलं शरीर, मन गती घेत असतं का? मधले संदर्भ मग सुटून का जावेत तस नसेल तर? की आपल्या मेंदूच्या आवडत्या गोष्टी साठवण्याच्या सवयीचा हा भाग असेल? गोंधळायला झालं आहे हे निश्चित! खरं तर गोंधळ वगैरे काही नाही. फास्ट फॉरवर्ड केल्याप्रमाणे आपण फिरतो आहोत. आज हे शिखर उद्या ते. जाताना ही गाडी मग फ्युनिक्युलर किंवा केबल कार किंवा माऊंटन रेल्वे....... काय आणि किती साठवणार डोक्यात? मग ही अशी सरमिसळ झाल्यासारखं, भोवंडल्यासारखं होणं स्वाभाविक नाही का? तसही प्रत्यक्षात येणारी भोवळ आपल्याला शांत बसायला उद्युक्त करते. आताही माझ्याकडे तोच उपाय होता त्यावरचा!

सिऑनला गेल्यानंतर आम्हाला स्वित्झर्लंडचं मानवी रूप बघायला मिळालं. नाही, म्हणजे आधी बघितलं ते अमानवी नव्हतं! ते स्वर्गीय होतं. त्यात वावरताना आम्हाला मग काही आवरणं(covers) आवश्यक होत होती. आता ती आवरणं झुगारून द्यायला प्रोत्साहन दिलं ते सिऑनने. साध्या शर्ट पॅन्टमध्ये बाहेर पडता येणं हे किती सुखाचं असतं ते आधी त्या गरम कपड्यांच्या लोढण्यासकट वावरल्यानंतर कळतं. इथेही शिलथॉर्नला जाण्याकरता निघताना आम्ही आलो होतो मोकळे ढाकळे, सगळ्या अनावश्यक गोष्टींना (गरम कपड्यांना) हॉटेलवर ठेवून.

ग्र्युटशाल्पहून आम्हाला रेल्वेने म्युरेनला जायचं होतं. इथे म्हणे पूर्वी सरळ लाऊटरब्रुनेन ते म्युरेन अशी ट्रेन होती. पण हा मधला म्हणजे ग्र्युटशाल्पचा चढ खूप सरळ आहे. त्याकरता ट्रेनऐवजी हा केबल कारचा जास्त सोयीचा पर्याय. लाऊटरब्रुनेनहून ग्र्युटशाल्पला वर येताना मधे मधे ते रेल्वेचे अवशेष दिसतात. केबल कारचा प्रवास तसा जेमतेम 5-7 मिनिटांचा. रोमांचक वगैरे अजिबात नाही. सुरवातीला दिसणारा रस्ता, एखादं दुसरं वाहन, गाव, कामं करणारी माणसं मागे टाकून पुढे जाताना बराचसा खडकाळ भाग दिसतो. झाडं आहेत पण ती आहेत एवढ्यापुरेशीच त्यांचं अस्तित्व. बर्फाळ डोंगरांचं सान्निध्य हा त्यातला चांगला भाग.

ग्र्यूटशाल्पला समोर एक उभा चढ आणि त्यावरून गेलेला रेल्वेमार्ग दिसत होता. इतक्या सरळ चढावर गाडी कशी जात असेल? मनात हा विचार येतो आहे तोच वरून एक डबा येताना दिसला. बोगद्यासारखं काहीतरी दिसत होतं तिथून सरळ खाली येत होता. थोडा वेळ गेला तर खालून वर जाणारा तसाच एक डबा वर चढत होता. दोघेही ठराविक वेळी समोरासमोर आले तिथे तो रेल्वेमार्ग दुभागला होता. आपापल्या रस्त्याने मग त्यांनी एकमेकाला ओलांडलं आणि पुनः एकच लाइन असलेल्या मार्गावरून त्यांच मार्गक्रमण सुरू झालं. लांबून हे सारं बघायला मजा येत होती. आमच्या रमत गमत जाण्यामुळे या गोष्टींचा आनंद मनसोक्त उपभोगता येतो.केबल कार जेव्हा प्लॅटफॉर्मला लागते तेव्हा ती अचूकता बघायला बरं वाटतं. बाहेर पडायची दोन्ही बाजूला असलेली व्यवस्था, एका बाजूला उतरणारी माणसं, ती उतरून रिकाम्या कारमध्ये दुसर्‍या बाजूने आत चढणारी माणसं. उगीच कल्ला नाही. शांतपणे हे व्यवहार होतात. त्यांना त्यांची स्वतःची गती असते आणि तरीही या सगळ्याला घड्याळाचं बंधन असतं. आपल्याकडे आपण हॉर्न वाजवतो, उतावीळपणे ओव्हरटेक करतो, पुढे जातो, तरीही उशीरा पोहोचतो. मग इथे अस काय आहे की कोणतीही लगबग, ढकलाढकल वगैरे न होता निवांतपणे पण रेंगाळत नव्हे तर स्वतःची एक अंगभूत गती असल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट पार पडते तीही ठराविक वेळात?

केबल कारमधून बाहेर आलो. इथून आता रेल्वेने म्युरेन.

                                                     स्वित्झर्लंड शिलथॉर्न भाग दुसरा पुढील मंगळवारी* काही वेळा आपल्याला जे म्हणायचं आहे त्याची प्रचिती देण्यासाठी शब्द आणि फोटोही अपुरे आहेत की काय असं वाटतं. अशा वेळी कदाचित व्हिडिओमुळे अधिक स्पष्टता येइल असं वाटल्यावरून प्रथमच हा व्हिडिओ देत आहे. कॅमेर्‍यावर शूट केला असल्याने मर्यादा आहेत. 


No comments:

Post a Comment