Monday, 1 June 2015

SWITZERLAND SCHILTHORN II


स्वित्झर्लंड शिलथॉर्न ()

म्युरेन हे तसं आडनिडं गाव. सरळपणे इथे येण्याला वाव नाही. म्हणूनच ही सव्यापसव्य. पण तरीही इथे येण्याकरता एकापेक्षा जास्त पर्याय आहेत याचं आश्चर्य वाटावं. गाव नितांत सुंदर. निद्रिस्त वाटावं असं. ठिकठिकाणी दिसणार्‍या स्कीइंगच्या पाट्या त्याचं महत्व अधोरेखित करतात. पण हे झालं हिवाळ्याच्या दिवसातलं. आत्ता या त्यांच्या समरमध्ये तिथे फुललेली फुलं, मुक्कामाला असणारे हायकर्स, ग्लायडर्स अशा असंख्य गोष्टींमुळे इथे गजबज असतेच. म्युरेनला ट्रेनमधून उतरल्यानंतर पुनः केबल कार घ्यायची होती शिलथॉर्नला जाण्याकरता. पण ते इथून उतरा आणि तिकडे केबल कार असं नव्हतं. विचारण्याची आवश्यकता पडणार नाही अशीच इथे व्यवस्था असते त्यामुळे जागोजागच्या पाट्यांना विचारतच आपण इप्सित स्थळी पोहोचतो. पण रस्ता सरळ असला तरी त्यात इतकी व्यवधानं आहेत की ती 10-15 मिनिटं 20-25 कधी होतात ते कळतच नाहीत. घरं खूप सुंदर. प्रत्येकाने जोपासलेली सौन्दर्य दृष्टी. जागोजागी वाढवलेली फुलं,  पानं काय न काय! होतं काय त्यामुळे की म्युरेन हे फक्त पार करून जाण्यापुरतं मर्यादित रहात नाही. आपण आपल्या नकळत त्याच्यात गुंततच जातो. साधे तोडून आणलेले लाकडाचे ओंडके घेतले तरी ते इतके व्यवस्थित रचून ठेवलेले दिसतात.

यांच्या रोजच्या जगण्यातसुद्धा गबाळेपणा कुठे असेल असं वाटत नाही. मला आमच्या व्हेनिसमधल्या क्रिस्तिआनोची आठवण झाली. स्विस लोकांच्या याच पिक्चर परफेक्ट गोष्टीवरून तो उपहासात्मक बोलला होता. कोणाला काय आवडावं हा ज्याचा त्याचा आणि त्या त्या वेळेचा प्रश्न असतो. आत्ता इथे तरी मला त्यांचा हा गुण मोहवून टाकणारा वाटला. म्युरेनमध्ये आमच्याबरोबर इतर लोकही असेच गुंगलेले दिसले त्यावेळी जरा बरं वाटलं. नाहीतर काही वेळा आपणच असे वेड्यासारखे वागतो की काय असा भ्रम होऊ लागतो!
पण या अशा वेडाला पोसणारी अशीच यांची व्यवस्था आहे. कुठेही रेंगाळा. अजिबात काळजीचं कारण नाही कारण या केबल कार्स अव्याहतपणे सुरूच असतात एक गेली तर त्यानंतरची मिळेल याची शाश्वती आहे. आता आम्हाला पुनः एक केबल कार घ्यायची होती. केबल कारमध्ये बसताना मला नेहेमी भास होतो आपण उंच टांगलेल्या एका दोराला लटकत आहोत. हातातलं बळ संपत चाललं आहे आणि आता कोणत्याही क्षणी........ हा विचार मनात डोकावत असताना मग माझी नजर बाहेर जाते. मघा मागे टाकलेलं सुंदर म्युरेन आम्हाला दुरून हात हलवत टा टा करत असतं, त्याच्या त्या आश्वस्त हाताकडे मग मी बघत रहातो. मघा म्युरेनच्या रस्त्यावरून येताना खूप वाटत होतं एक तरी दिवस इथे मिळायला हवा होता! हे पण नेहेमीप्रमाणेच!

म्युरेन तस किती विचित्र जागी वसलेलं गाव. केबल कार त्यांना लाऊटरब्राउनेन व्हॅलीशी जोडते. या कठीण परिस्थितीचाच USP बनवून या लोकांनी त्याला अनन्यसाधारण बनवलं आहे. इतक्या या अवघड जागीही सगळ्या सोयी सुविधांसह सज्ज अशी हॉटेल्स उभी आहेत. या गावातून बाहेर पडून केबल कारमध्ये बसल्यानंतरच्या सगळ्या भावनांना छेद देणारं त्याचं आकाशगामी दर्शन सुखावणारं होतं. आता खाली दूरवर दिसणारी हिरवी कुरणं, अगदी जवळ वाटावेत असे तुटके कडे, कपारी आणि सभोवताली सर्वदूर पसरलेली बर्फाच्छादित शिखरं. खरतर आतापर्यंत बर्फाचं नाविन्य कमी व्हायला हवं होतं पण देवभक्तांना देवळांचा कंटाळा येऊ नये त्याप्रमाणे आम्ही ओरपून प्यायलासारखे ते सारं नजरेत सामावून घेत होतो. का कोण जाणे पण या वातावरणाचा, या सौंदर्याचा कंटाळा कसा तो येत नाही. इथे बघितलं मग तिथे आणखी वेगळं ते काय असणार असं म्हणणार्‍यांची जात वेगळी. त्याबद्दल व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून सोडून देता येईल पण आम्ही मात्र ते मनापासून एन्जॉय करत होतो.

बर्गला केबल कार थांबली. थांबण्यापूर्वी अनाउन्समेंट झाली ज्यांना पुढे शिलथॉर्नला जायचं असेल त्यांनी दुसरी केबल कार घ्यावी. म्हणजे अजून पुढे प्रवास होता. आम्ही बाहेर आलो. त्या स्टेशनच्या दुसर्‍या भागातून पुढली कार आम्हाला शिलथॉर्नला घेऊन जाणार होती. हे स्टेशन उभे आहे ते एका प्रचंड शिळेवर. केबल कारची ती अजस्त्र यंत्रणा बघूनही थक्क व्हायला होतं. कसे या अवघड जागी हे मनोरे उभारले असतील. किती अवजड ती यंत्र, ती फिरणारी चाकं ते जाड घट्ट असे लोखंडी दोर. याचा मेन्टेनन्स हे कधी करत असतील? आणि कसा? वर्षाचे बारा महिने पर्यटक असताना यांना या सगळ्यासाठी कधी वेळ मिळत असेल? या लोकांकडून पर्फेक्शन, प्रिसिजन या गोष्टी नक्कीच आपण शिकण्यासारख्या आहेत. 'अशक्य ते शक्य करिता सायास' असं नुसतं न म्हणता, 'आधी केले मग सांगितले' असा त्यांचा बाणा त्यांच्या या सार्‍या कृतीत दिसून येतो.


आम्ही बाहेर पडून दुसर्‍या कारमध्ये गेलो. मधल्या वेळात आम्ही प्लॅटफॉर्मवर (?) उभे होतो तेव्हा कानावर मराठी पडलं. भाषा आपली असली तरी उच्चारणातला फरक मनात नोंदवून ठेवला. कोणीतरी फोनवर रिपोर्टिंग करत होतं. "हो हो व्यवस्थित आहोत. आता शिलथॉर्नच्या कारकरता उभे आहोत. नाही मघा रेंज नव्हती त्यामुळे लागला नसेल. आम्ही पण प्रयत्न केला पण फोन लागला नाही.” वगैरे नेहेमीचं संभाषण. साधारण साठीचे वाटावेत असे उंच, ताठ गृहस्थ आणि त्यांची साडी नेसलेली सुविद्य पत्नी. फोन झाला आणि आम्ही ओळखीचं हसलो. नेहेमीप्रमाणे कुठून आलात? काय काय कव्हर करणार हेच प्रश्न. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आम्हाला सुरवातीला छाती भरदार झाल्याचा भास होत होता (आम्ही गेले पंधरा दिवस फिरत होतो ना?). त्यांना तेच प्रश्न विचारल्यानंतर आमच्या छातीचा भाताच झाला. ते जोडपं मुलीकडे फिनलंडला गेलं होतं तिथे राहून मग नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क करून जर्मनीत आले तिथून अ‍ॅमस्टरडॅम, ब्रसेल्स वगैरे करून आता स्वित्झर्लंड नंतर पॅरीस आणि आणखी काय काय करून शेवटी इस्तंबूलला जाऊन मग भारतात परतणार होते. आम्ही नमस्कार केला त्यांना. "अहो परत कुठे येणं होणार? मग म्हटलं सगळं एका दमात करून घेऊ." “ बाकी ठीक, पण खाणंपिणं, त्याच काय?" या प्रश्नावर तर इतक्या सहज त्यांनी सांगितलं, थोडं बरोबर आणलं आहे आणि रेडी टू कुक ची पाकिटं बरोबर ठेवली आहेत. मघा जावयाचा फोन होता. त्यांना वाटतं आम्ही अडाणी माणसं, चुकतील वगैरे, त्यामुळे . पण काळजी करतात हो मुलं. हे शेवटचं वाक्य भिजल्या स्वरातलं. आम्ही तो त्यांचा प्रवास ऐकूनच भोवंडलो होतो. पुढे काय बोलणार? तेवढ्यात केबल कार आली आणि आम्ही बाकी सगळ्यांबरोबर आत गेलो.


                                              स्वित्झर्लंड शिलथॉर्न भाग तिसरा पुढील मंगळवारी
No comments:

Post a Comment