Monday, 22 June 2015

SWITZERLAND (TRUüMMELBACH)


स्वित्झर्लंड  ट्र्यूमेलबाख





भणाणता वारा आणि कोसळणार्‍या पाण्याचा प्रचंड प्रपात, सभोवार पाण्याचे तुषार आणि ते कुंद धुरकट वातावरण. दिवे असले तरी तेही पिवळसर आणि प्रखर नव्हेत त्यामुळे इतकं सुंदर गूढरम्य वातावरण तयार झालं होतं. प्रत्येक ठिकाणी पाट्या. निसरड्या पायर्‍या, जपून पाऊल टाका. यात भरीला तो सांदीतून आणखी वेगाने घुसून आमच्यावर हल्ला करणारा वारा. खूपच ग्रेट अनुभव आहे. मघाचा आमचा सगळा नकारात्मक भाव वाहून गेला. आयुष्यात फार कमी वेळा अशा अनुभवता येतात आणि ती आपली चुकली नाही, खरतर श्रीशैलने आम्हाला चुकवू दिली नाही





ही एक लेव्हल झाली.  खूपच गर्दी या ठिकाणी. अरूंद गॅलेरी. त्या डोंगरात इतक्या अशक्य ठिकाणी या सगळ्या सुविधा देणारे ते स्विस लोक धन्य होत! याठिकाणचं सौन्दर्य बघून आम्ही वर गेलो. आता वरच्या गॅलेर्‍या आणखी अरूंद. पाण्याचा जोर वाढता. त्याला त्या पर्वताच्या खडकांचा अडथळा. मग त्यातून वाट काढताना त्याची होणारी घुसमट अजून जोरात बाहेर पडते आणि त्या खडकाला भेदून वाट काढते. पाण्याचा आणि त्या पर्वताच्या चाललेल्या त्या आदिम संघर्षातली वार्‍याची भूमिका कोणती ते न कळे. पण त्या सगळ्याच्या एकत्रित परिणामातून साकारलेलं शिल्प बघताना आम्ही दिङमूड. या ठिकाणी एक सुंदर कोनाडा तयार झाला होता. मग त्यात बसून वरच्या बाजूने फोटो काढण्याचे प्रयत्न. पण उडणारे पाण्याचे तुषार सारं व्यर्थ ठरवत होते. बरं वरच्या माणसाच्या सूचना खाली सोडा शेजारच्या माणसाला ऐकू येऊ नयेत इतक्या डेसिबलचा आवाज. तरीही कानठळ्या बसल्या आहेत असं कुठेही जाणवत नव्हतं. आवाजाच्या त्या व्हॉल्युमने आम्ही दडपणाखाली होतो पण भारावलेल्या स्थितीत. डोळे आणि कान दोन्ही तृप्त करणारी ती भावावस्था होती. यावरही आणखी एक लेव्हल होती ती आणखी अरूंद झाली होती. त्याच्या वरून कुठूनतरी याची सुरवात असेल का? हे सारं येतं कुठून आणि कसं? हे प्रश्न आम्ही खाली उतरल्यानंतर तिथे असलेल्या माहिती फलकावर वाचले.

पर्वताच्या अंतर्भागात असलेली ही दहा धबधब्यांची मालिका आहे. पर्वताच्या अंतर्भागात लिफ्टने जाऊन बघता येते अशी ही जगात कदाचित एकमेव असावी. हे धबधबे आहेत. त्यांचं उगमस्थान आहे या हिमनद्या (Glacier waterfalls) . सभोवताली असणारे युंगफ्राऊ, मॉंख आणि आयगर या हिमशिखरांपासून हे पाणी इथवर येतं. आणि आपल्या तांत्रिक भाषेत दर सेकंदाला 20000 लिटरपर्यंत पाण्याचा विसर्ग होतो. या ठिकाणी जाण्यासाठी या लोकांनी मग बोगदे खणले, लिफ्टची व्यवस्था केली, ठिकठिकाणी गॅलेर्‍या बांधल्या, वर जाण्याकरता त्या दगडांमध्ये पायर्‍या खणल्या, रस्ते तयार केले! ठिकठिकाणी उभे राहून बघता यावं म्हणून सोयीचे प्लॅटफॉर्म्स बांधले.

आपण धबधबे बघतो आपल्या देशातही. पण धबधबा म्हणजे डोंगरात कुठेतरी वरून उडी घेणारं पाणी यापलीकडे आपल्याला बघायला मिळालेलं नसतं. इथे आम्ही डोंगराच्या आत खणलेल्या एका बोगद्यात होतो. सभोवार बाकी काही नाही फक्त तो डोंगर, जलप्रपात आणि भणाणता वारा. एक दिव्य अनुभव वाटला तो. इतक्या अडचणीच्या ठिकाणी दिवा, लिफ्ट आणि इतर सोयी करणारे ते स्विस सरकार खरोखरीच धन्य होय!

सगळ्या दहा लेव्हलपर्यंत वर जाताना 200 पायर्‍या चढताना घसरण्याची भीती वगैरे भावना नंतर बाजूलाच पडतात. तसेही बरेच जण पहिल्या म्हणजे सहाव्या किंवा  सातव्या आठव्या लेव्हलनंतर परत फिरतात. पण प्रत्येक लेव्हलवरून दिसणारं तेच पाणी पण त्याचं नवीन आक्रंदन आणि पर्वताबरोबर चाललेला त्याचा संघर्ष हा प्रत्येक ठिकाणी नवा आहे. सुरवातीला वाटणारं भय नंतर त्याच्या प्रेमात पडून आपल्याला संमोहित अवस्थेत वर घेऊन जातं ती अवस्था वर्णन करण्याची नाही अनुभवण्याची आहे.

यानंतर परतीचा प्रवास. त्याला पर्याय दोन एक आल्या मार्गाने लिफ्ट घ्या आणि उतरून जा. दुसरा मार्ग चालत जाण्याचा. पायर्‍या आहेत. रेलिंग आहे. खाली उतरताना दूरवर दिसणारं दरीमधलं हिरवगार गाव आहे. आणि आणि बरच काही. उतरताना एका ठिकाणी येऊन थबकतोच आपण. तिथे नावाची पाटी आहे Corckscrew अक्षरशः पर्वताला पिळवटून काढून ते पाणी बाहेर पडतं. सगळ्या ठिकाणांचे फोटो घेतले, व्हिडिओ काढले पण जे देखिले, जे अनुभविले त्याची कणभरही सर नाही.

आम्ही खाली आलो. सुंदर बाग आहे. कॅफेटेरिआ आहे. आहे छानच पण इतक्या दिव्य सौंदर्याच्या धुंदीतून मानवनिर्मित काही बघावं असं वाटेच ना. आम्ही आपले शांतपणे रस्त्यावर स्टॉपजवळच्या एका बिल्डिंगच्या पायर्‍यांवर निवांत बसून बसची वाट बघत बसलो.

बस आली ती भरूनच पण लाऊटरब्रुनेन स्टेशनपर्यंतचे अंतर काही फार नाही. मघा त्या माहिती फलकावरच्या उल्लेखाप्रमाणे स्टेशनपासून इथवर 35-40 मिनिटात चालत हाइक म्हणून येताना इथे असणारे असंख्य (एकूण 72 धबधबे आहेत म्हणे) धबधबे बघत येता येतं. बसमधून जातानाही आम्ही त्यातले काही बघितले. एकूणच आता मघाचा नकारात्मक मूड गेला होता त्यामुळे जरा हे शहर पायी फिरू या का या विचारण्याला फारसा विरोध असण्याचा प्रश्न आला नाही.



स्टेशनला उतरून मग आम्ही चालत निघालो तेव्हा आपल्याकडलीच आठवण आली. हिल स्टेशनचे अरूंद रस्ते, दोन्ही बाजूंनी असलेली घरं किंवा हॉटेल्स आणि वाहनांची कसरत. पण हे फार वेळ नव्हतं. आम्ही गावाबाहेर आलो आणि दूरवर रेल्वेलाइन दिसली. सकाळी गाडीचा न आवडलेला हिरवा पिवळा रंग आता या हिरव्या पार्श्वभूमीवर शोभून दिसत होता. एक गाडी जरा पुढे जाते आहे तोवर पाठोपाठ दुसरी गाडी आली. आम्ही मग दूरवर असणार्‍या त्या बोगद्यात त्या गाड्या दिसेनाशा होइपर्यंत टक लावून बघत राहिलो. थोडं पुढे गेल्यावर एक धबधबा लागला. पण आम्ही जंगलातला वाघ बघून आल्यानंतर हरणं वगैरे बघण्यात आता रस वाटे ना. मग मागेच फिरलो तिथून. आता सरळ इंटरलाकेन.

इंटरलाकेनला आलो आणि मग हॉटेलवर परतण्यापेक्षा आज इथला हा मोठा रस्ता जरा हिंडू या असा विचार झाला. हा रस्ता आहे खूप छान. विस्तीर्ण असं मैदान आहे. आम्ही जरा निवांत बसलो होतो एका बाकावर. वरून धाडकन ग्लायडर्स अगदी आमच्या समोरच उतरले. प्रत्येक ठिकाणी दोघे जण होते. एक ट्रेंड दुसरा हौशी असं असावं. त्यांचं ते लॅंडिंग बघायला मजा येत होती. उतरताना विमान ज्याप्रमाणे काही अंतर धावत जाऊन थांबते त्याप्रमाणे जमिनीला पाय टेकताना त्यांना ते छत्रीसारखी फुगीर आकाराचे कापड फुस्स होऊन जमिनीवर पडले की थोडं पुढे जावं लागत होतं. आत्तापर्यंत या लोकांची कमाल आम्ही प्रत्येक शिखरावर बघितली होती. निवांतपणे शिखराच्या डोक्यावरून घिरट्या घालत असताना त्यांच्या भावना काय असतील?

हे शहर आहे सुंदरच पण त्याचं महत्व आपल्या एका भारतीय माणसाने ओळखलं आणि त्या त्याच्या कार्याची या शहरानेही जाण ठेवली.आपण बघितलेल्या कित्येक चित्रपटांचं शूटिंग या शहरात झालेलं आहे. ज्या व्यक्तीने या शहराचं सौंदर्य ओळखलं आणि त्याला भारतीय पर्यटन नकाशावर आणण्याकरता हातभार लावला त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणारी शिला (?) इथे आहे. त्या मैदानाच्या कडेला त्या शिलेवर त्या व्यक्तीचं नाव सन्मानपूर्वक लिहिलेलं आहे. यश चोप्रा!



या रस्त्यावरची दुकानं सुंदर आहेत. हा रस्ताच देखणा म्हणावा असा आहे. ठायी ठायी फुलांचे ताटवे, रचनात्मक मांडणी यांमुळे त्याला हे देखणेपण लाभलेलं आहे

 


इथल्या दुकानांमध्ये काऊ बेल्स, स्विस नाइफ आणि काचेच्या गाई मुबलक प्रमाणात दिसतात. खरेदी म्हटली की आत्ता नको हा माझा मंत्र असतो, काही वेळा तो योग्य ठरतो पण कित्येक वेळा फसायला होतं. इथे उत्तराने श्रीशैलच्या खनपटीला बसून काऊ बेल्सची खरेदी करून घेतली. पण तोही माझाच मुलगा त्याने फक्त बेल्स घेतल्या आणि स्विस नाइफ बर्नला गेल्यावर घेऊ म्हणून सांगितलं. नेहेमीप्रमाणे तिथे आम्हाला वेळ कमी पडला आणि त्या उपनगरात तसा फारसा स्कोपही नव्हता. नेहेमीप्रमाणे, मनात आलं की ताबडतोब घेऊन टाकायचं, नंतर मिळालं नाही म्हणून कटकट करण्यापेक्षा दोन पैसे जास्त परवडतील, असं म्हणून इंटरलाकेनमधला तो दिवस आटोपता घेत हॉटेलवर परतलो.

                                            पुढील मंगळवारी स्वित्झर्लंड माऊंट टिटलिस

कितीही फोटो, कितीही व्हिडिओ दाखवले तरी ते प्रत्यक्षदर्शनाचा आनंद देऊ शकत नाहीत याची मला जाणीव आहे. तरीही लोभ सुटत नाही, म्हणून हे दोन व्हिडिओ कॅमेर्‍यात शूट केलेले इथे देत आहे. आवाजाचा व्हॉल्युम अगदी कमी ठेवावा ही सूचना. 

सुरवातीला याच पानावर ते बघायला मिळावे म्हणून मी ते अपलोड केले पण वाचनात व्यत्यय येत असल्याकारणाने मी ते स्वतंत्रपणे दिले आहेत. 




No comments:

Post a Comment