Monday, 15 June 2015

SWITZERLAND (TRUüMMELBACH)

स्वित्झर्लंड  ट्र्यूमेलबाखच्या वाटेवर 

शिलथॉर्नहून परतीच्या वाटेवर आता म्युरेनला रेंगाळायचं मनात असूनही शक्य नव्हतं. आम्हाला एकतर जिमेलवाल्ड(Gimmelwald) ला केबल कारने जाण्याचा पर्याय होता किंवा चालत जाण्याचा. हा मार्ग चालायला छान आहे असं वाचलं होतं आणि उर्सुलाची सूचना पण तशीच होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे खूप लोकं हायकिंग करत शिलथॉर्नला जाणारी पण आहेत तरीही या ठिकाणी चढापेक्षा उतार सोपा आहे आणि तो एंजॉय करता येण्याजोगा आहे. त्यामुळे अर्थात आम्ही जरी रेंगाळलो नाही तरी म्युरेन ओलांडून जिमेलवाल्डला जाणार होतो. वाटेत असंख्य वेळा डोक्यावरून जाणार्‍या येणार्‍या केबल कार्स दिसत होत्या. रस्ता तसा व्यवस्थित होता. काही ठिकाणी तर वाहनांचाही होता. आम्ही रमत गमत जात होतो तशी इतरही माणसं आमच्याप्रमाणे पायी उतरताना दिसत होती. सगळ्या ठिकाणच्या पाट्यांमुळे चुकण्याचाही तसा प्रश्न नव्हता.
शांतता हा इथला स्थायी भाव आहे आणि ही बाह्य शांतता आपल्या मनाच्या गाभ्यापर्यंत उतरत जाते. अशावेळी मग आपल्याला एरवी सहजपणे समोर येऊनही न जाणवणार्‍या गोष्टी जाणवू लागतात. कदाचित त्या आपल्यापर्यंत किंवा आपल्या आतपर्यंत पोहोचू लागतात. मनाची कवाडं उघडणं म्हणतात ते हेच असेल का? जागोजागी घरांभवताली असणारी फुलं, त्यांचं सौन्दर्य आता गृहीत धरल्याप्रमाणे सवयीचं झालं होतं. घरांप्रमाणे जागोजागी दिसणारी खिल्लारं म्हणजे स्वित्झर्लंडचं वैभवच! तसही हा भाग दूध दुभत्यासाठी प्रसिद्ध आहेच. त्यांच्या गाईंकडे बघितल्यावर ती समृद्धी जाणवते. पण हे दृष्टिसुख अनुभवण्यापूर्वी आपले कान तृप्त होतात ते गाईंच्या गळ्यात असलेल्या स्विस बेल्सच्या विशिष्ट नादाने. या घंटा बसक्या असतात, आपल्याप्रमाणे गोलाकार नाहीत. धातू मिश्र असावा. काही घंटा पितळेच्या वाटतात तर काही अ‍ॅंटिक लुक असणार्‍या असतात. यांचा नाद ऐकत रहावा असा. आम्ही रेकॉर्ड करायचा केलेला प्रयत्न फारसा यशस्वी झाला नाही पण तो कानात मात्र अजूनही रुणझुणतो आहे. या संगीताने आम्हाला जागोजागी खिळवून ठेवलं.खरतर या घंटानादाप्रमाणे आम्हाला थांबवणारी अनेक प्रलोभनं होती. वाहणारे ओहोळ होते, खळाळणारे प्रवाह होते, मधेच आमच्या भेटीला येणारे हिमाच्छादित पर्वत होते तर काही ठिकाणी असलेल्या गूढरम्य शांततेने आम्हाला रोखून धरलं होतं. उतरताना रस्त्यांचे तरी किती प्रकार होते. काही ठिकाणी असलेला पक्का रस्ता मधेच सोडून द्यायचा आणि जंगलासारख्या दाट झाडीतून उतरणार्‍या पायवाटेला लागायचं. तर मधेच उतरताना पायर्‍या असत. अशा एकांतात, निसर्गाच्या सान्निध्यात, कोणाही माणसाच्या व्यत्ययाशिवाय आपण आणि आपणच आहोत ही भावनाही किती अनुभवण्याजोगती असते त्याचा आम्ही प्रत्यय घेत होतो

कित्येकदा शब्दाविना.

जिमेलवाल्ड आलं. इथून पुढे पुनः खूपच कठीण उतार आहे. त्यामुळे आम्ही चालत जाण्याच्या फंदात पडलो नाही. इथून केबल कार घेवून मग स्टेचेलबर्ग. आम्ही स्टेचेलबर्गला आलो आणि जरा पुढे आलो तर तिथे आम्हाला लाऊटरब्रुनेनला घेऊन जायला बस उभी होती. चला आजचा दिवस छान गेला. आता आल्या मार्गाने परत. असं आम्ही दोघं म्हणत असताना श्रीशैल म्हणाला फार कंटाळला नाहीत ना तर इथे वाटेत एक ठिकाण आहे ते बघू आणि मग पुढे जाऊ. वाटेतच आहे वगैरे जरी म्हटलं तरी आता खरं म्हणजे कंटाळा आला होता. इतक्या छान अनुभवानंतर काहीतरी उगीच बाग बघ हे बघ असा वेळ काढण्याचा अजिबात उत्साह नव्हता. पण त्याचं म्हणणंही डावलता आलं नाही. सुदैवाने तुम्ही आता आला आहात हा समर आहे. (जुलै महिना) या दिवसात इथे येण्याचा मुख्य फायदा हा की सूर्य खूप उशीरापर्यंत असतो. त्यामुळे आपल्याला खूप उशीरापर्यंत फिरता येतं. इतक्या लांब येऊन आपण वाटेत काय आहे हे न बघताच कंटाळा करून हॉटेलवर जायचं तर या समरमधल्या मोठ्या दिवसांचा आपण काय फायदा घेणार? आता रात्री नऊपर्यंत उजेड असतो त्याचा घेता येइल तेवढा फायदा करून घेऊ. आमच्याकडे कंटाळा या एका कारणापेक्षाही, सबबीशिवाय दुसरे कोणतेही कारण नव्हते आणि त्याला तो बधणारा नव्हता. मुकाट्याने आम्ही ठीक आहे म्हणत ट्र्यूमेलबाख (Trümmelbach) वॉटरफॉल्स बघण्यासाठी वाटेत उतरलो.

उतरून बघितलं तर ही भली मोठी लाइन तिकिटासाठी. पुनः ते 10 की 15 युरो द्या. आम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये विरोधाच्या जागाच दिसत होत्या किंवा आम्ही त्या शोधत होतो बहुधा. पण श्रीशैलला या सगळ्याची सवय झाली असावी. त्याच्या लहानपणी कदाचित त्याने क्वचित कधीतरी केलेल्या हट्टाकडे आम्ही ज्याप्रमाणे दुर्लक्ष करत असू त्याप्रमाणे तो तिकिटांच्या रांगेत उभा राहिला. रांग जरी मोठी दिसत असली तरी त्यात फार वेळ मोडला नाही. तिकिटं काढून आम्ही पुढे निघालो. एक बंदिस्त असा कॉरिडॉर. तिथे उभे होतो. लिफ्ट आली. सामानाची असावी तशी. पण वर जातानाचा मार्ग "दिसत" होता. म्हणजे त्या मार्गावर पिवळसर प्रकाशाचे दिवे होते. लिफ्ट वर निघाली आणि थांबली.

आम्ही सहाव्या लेव्हलपर्यंत आलो होतो. थांबून बाहेर आल्यावर तसाच पिवळा प्रकाश, अंधार उजळवणारा. प्रचंड आवाज, तुफानी वारा आणि समोर दिसणार्‍या पायर्‍या. एखादी हॉरर फिल्म बघत आहोत हा फील. आम्ही वर जात आहोत आणि सगळं वातावरण धूसर होऊन जातं. आमच्या चष्म्याचा कोणीतरी ताबा घेतं आहे असं वाटतं आणि मग हसू येतं. भणाणता वारा आणि कोसळणार्‍या पाण्याचा प्रचंड प्रपात, सभोवार पाण्याचे तुषार आणि ते कुंद धुरकट वातावरण. दिवे असले तरी तेही पिवळसर, आणि प्रखर नव्हेत त्यामुळे इतकं सुंदर गूढरम्य वातावरण तयार झालं होतं. प्रत्येक ठिकाणी पाट्या. निसरड्या पायर्‍या, जपून पाऊल टाका. यात भरीला तो सांदीतून आणखी वेगाने घुसून आमच्यावर हल्ला करणारा................

                       स्वित्झर्लंड ट्र्यूमेलबाख (Trümmelbach)  पुढील मंगळवारीNo comments:

Post a Comment