Monday, 4 May 2015

SWITZERLAND INTERLAKEN I


स्वित्झर्लंड इंटरलाकेन (१)

इंटरलाकेनला जायचं म्हणून सिऑनहून निघालो तेव्हा रस्त्यावरून स्टेशनकडे वळल्यानंतर उजवीकडे लांबवर दिसलेल्या त्या किल्ल्याच्या निरोपाने आणि द्राक्षमळ्याच्या दर्शनाने भारावलेले होतो. अचानक काहीतरी, अनपेक्षितपणे चांगलं गवसावं तसं हे सिऑन आणि तो फ्रेंच अन्नदाता. इथे येण्यापूर्वी फार काही ऐकलेलं नव्हतं त्यामुळे काही अपेक्षाही मनात ठेवल्या नव्हत्या. पण इथून निघताना मात्र प्रसन्न पण हुरहुरत्या मनाने निघत होतो.

आजचा प्रवास नकाशावर बघितल्यावर मजेशीर वाटावा असा. सिऑनहून पूर्वेकडे विस्पला जाऊन गाडी बदलायची होती. तिथून उत्तरेच्या दिशेने स्पीझ ( Spiez) आणि मग पुनः पूर्वेकडे इंटरलाकेन. इथेही इंटरलाकेन पूर्व आणि पश्चिम अशी दोन स्टेशनं.

इंटरलाकेन जवळ आलं आहे हे सांगायला लागत नाही. laken हे lake या जर्मन शब्दाचं बहुवचन. दोन मोठे तलाव लाभलेलं हे शहर.  द्रवीडची कामगिरी जशी सचिनच्या सान्निध्याने झाकोळली तसं या शहराच झालं आहे. या शहराचं महत्व त्याच्या भोवती असणार्‍या गिरीशिखरांकडे जाण्याकरता मुक्काम करण्याचं ठिकाण एवढच लक्षात येत. वास्तविक हे शहर आणि त्याचा परिसर अतिशय सुंदर आहे पण त्याच्या सभोवताली यापेक्षाही सुंदर स्थळं आहेत.

आम्ही इंटरलाकेन वेस्ट स्टेशनवर उतरलो ते सरळ हॉटेलवर गेलो. चालण्याच्या अंतरावरच होतं ते हॉटेल. पायर्‍या चढून दरवाजा उघडला तर आमचं स्वागत बुद्धाच्या ध्यानस्थ मूर्तीने केलं. समोरच काऊंटर म्हणण्यापेक्षा एक मोकळी चौकट दिसली ती रिसेप्शनची असावी असं गृहीत धरून तिकडे गेलो. मागून आवाज आला. एक मिनिट थांबा मी येतच आहे. आवाजाच्या दिशेने कोणी दिसत तर नव्हतं. दुपारची वेळ. नवीन आलेल्या गेस्टच्या गर्दीव्यतिरिक्त बाकी सगळे बाहेर पडले असतील आणि आत्ता तिथे दिसणारे कामगार असतील हा आमचा होरा अंशतः खरा ठरला. तेव्हढ्यात लगबगीने ती आलीच समोर.

साधारण साडेपाचच्या वर कदाचित पावणे सहाही असेल अशी उंची. गळ्याची हाडं दिसताहेत, उंचीमुळे तिचं बारीकपण की बारीक असल्यामुळे उंची अधोरेखित होत आहे. विलक्षण तेज डोळे आणि आत्मविश्वासपूर्ण बोलणं. हाय! माझं नाव उर्सुला! स्वतःची ओळख करून दिली आणि थांबायला लागलं म्हणून दिलगिरी व्यक्त केली. आमच्या हातातला इ मेलचा कागद बघितला, पासपोर्ट नोंदवले आणि म्हणाली आधी खोली दाखवते. त्या चौकटीतून बाहेर येऊन झटक्यात आम्हाला अवधी न देता आमच्याकडची सगळ्यात जड बॅग तिने उचलली आणि ताडताड समोरच्या जिन्याच्या पायर्‍या चढू लागली. आम्ही चकीत होऊन तिच्यामागे. श्रीशैलने बॅग देण्यासाठी कितीही सांगून उपयोग झाला नाही. ती तिसर्‍या मजल्यावर आमच्या खोलीसमोर जाऊनच थांबली. इथे तीन जिने चढावे लागतात ना. मला सवय आहे त्यामुळे मी मदत करते. जणू काही ते तिच कर्तव्य असल्यासारखी भावना तिच्या बोलण्यात होती. तुम्ही प्रवासातून आला आहात. दमला असाल. काही चहा कॉफी हवी असेल तर खाली या. नंतर मी तुम्हाला सगळी माहिती सांगते. असं म्हणून आली तशीच खाली उतरून गेलीदेखील. नंतरच्या त्या चार दिवसात आम्ही तिला कधीच स्वस्थ, कामाशिवाय बसलेली बघितलीच नाही. सतत on her toes म्हणावं तशी ती भिरभिरत असे.

आम्ही प्रवासातून आलो असलो तरी तो काही आपल्याकडला दम काढणारा प्रवास नव्हता. थोडं फ्रेश होऊन, हल्लीच्या सीरियलच्या भाषेत, जरा तोंडावर पाण्याचा हबका मार ताजंतवानं वाटेल असं सांगणारं कोणी भेटत नाही म्हणून हा सर्वपरिचित फ्रेश शब्द वापरला, पुनः खाली आलो तर टेबलावर या बाईने कॉफीची तयारी ठेवलेलीच होती. लांबूनच आम्हाला घ्यायला सांगितलं आणि कॉफी संपता संपता बाई पुनः आमच्यासमोर हजर. आपल्याकडे जरा भाजी फोडणीला टाकून येते असं म्हणत पदराला हात पुसत येणार्‍या बाईसारखा आविर्भाव !

इथे असणार्‍या सोयी सुविधांची आधी कल्पना देते. लॉंड्रीची सोय आहे. त्यात नाणी टाकली की ते वापरता येईल. तुमच्याकडे नाणी नसतील तर मला सांगा मी देऊ शकेन. पाणी गरम, गार दोन्ही इथे आहेत. गॅस स्टोव्ह आहे किंवा मायक्रोवेव्ह आहे. त्याचा वापर तुम्ही करावा अस मला वाटतं. कारण इथे सगळ्या गोष्टी खूप महाग असतात याची तुम्हाला कल्पना देणं माझं कर्तव्य समजते. यासंबंधात काही मदत हवी असेल तर मला नक्की सांगा मी इथेच असेन. त्यानंतर मग ब्रेकफास्ट्च्या वेळा सांगून झाल्या. त्यात काय काय असतं आणि ते भरपूर खाऊनच बाहेर पडत जा हेही सांगून झालं.

आता मुद्द्याचं. इथे तुम्ही आला आहात ते काही हॉटेलमधे बसण्यासाठी नाही. तर मला तुमचे इंटरेस्ट कळू द्यात मी तुम्हाला सुचवते त्याप्रमाणे. म्हणजे ही बाई स्वखुशीने आता आमचे इथले तीन दिवसही मॅनेज करून देणार! ग्रेटच! आम्ही येता येता आम्हाला समोर डोंगरावर काहीतरी छान दिसलं होतं. सुरवातीला आम्हाला पॅगोडा वाटला पण तो पॅगोडा नव्हता. तिच्याकडे चौकशी करणार तो तिनेच सुरवात केली. तुम्ही येताना डोंगराकडे बघितलं असेल तर ते हार्डर कुल्म Harder Kulm इंटरलाकेन ऊस्टहून तिथे जाण्यासाठी फ्युनिक्युलर रेल्वे आहे. तुम्ही सरळ नदीच्या अंगाने गेलात की ऊस्ट येईल. म्हणजे तो भागही तुमचा जाता जाता बघून होइल. नदीच्या दोन्ही अंगाने रस्ता आहे आणि आज तर स्वच्छ हवा आहे त्यामुळे काही प्रश्न नाही. संध्याकाळी जरा गावात फिरून होईल. उद्याचा दिवस जरा लवकर निघा. मला एक सांगा तुम्हाला पैसे खर्च करण्यामध्ये रस आहे की खूप फिरण्यामध्ये? आमच्या "युंग फ्राऊला जायचं आहे" या वाक्यावरचं हे तिचं उत्तर होतं. युंग फ्राऊ हे मार्केट केलेलं डेस्टिनेशन आहे. खूप जण, विशेषतः टूर कंपनीज तिथे घेऊन जातात त्यामुळे प्रसिद्ध आहे पण म्हणूनच एक्सपेन्सिव्ह आहे. मला नेहेमी वाटतं अशा ठिकाणी जाण्यात अर्थ नसतो. जे तुम्ही तिथून बघाल तोच सगळा टेरेन (Terrain) तुम्हाला शिलथॉर्नला गेल्यावर दिसतो. तिथेही सुंदर व्ह्यू आहे आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे शिलथॉर्नचा सगळा प्रवास हा तुम्ही एंजॉय करू शकता. युंग फ्राऊची रेल्वे बोगद्यातून जाते त्यामुळे प्रवासाचं सुख मिळणार नाही. तुम्ही जर माऊंट टिटलिस करणार असाल तर माझा सल्ला आहे की तुम्ही शिलथॉर्नला जावं. तुमचे प्रत्येकी 60 ते 80 फ्रॅंक्स वाचतील. Anyway हा निर्णय उद्याकरताचा आहे. तुम्ही स्वतः विचार करा आणि उद्या ठरवा. मात्र लवकर बाहेर पडा म्हणजे खूप वेळ मिळेल. इथे दुपारनंतर जर हवा बदलली तर मग ही सगळी शिखरं दिसणार नाहीत म्हणून सांगते. आणि हो या सगळ्याची तिकिटं तुम्हाला मी देइन त्याकरता तिथे रांगेत उभे राहण्याची गरज नाही. असं म्हणत तिने आम्हाला हार्डर कुल्मच्या फ्युनिक्युलरच रिटर्न तिकिट हातात ठेवलं. तुम्हाला भारतीय जेवायचं असेल तर इथे खूप रेस्तरॉं आहेत. जाताना जेवून मग वर जा

                                                                                भाग दुसरा पुढील मंगळवारी

हार्डर कुल्म (फोटो सौजन्य गूगल इमेज)

No comments:

Post a Comment